ठाकरे लोकप्रिय का आहेत?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नुकतच निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर पाहून ठाकरे एवढे लोकप्रिय का असा प्रश्न अनेकांच्या मनात पुन्हा एकदा उमटला. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे शिवसेना सत्तेवर येण्याच्या वर्षभरआधी १९९५ साली युनिक फीचर्सने नेमक्या याच प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न एका सर्वेक्षणाद्वारे केला होता. या लेखाचं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेची अवस्था काय होईल याविषयीही यात मतं व्यक्तं झाली होती. युनिक फीचर्सच्या वाचकांसाठी हा लेख आम्ही पुन्हा प्रकाशित करतोय.

bal_thackeray.jpg
....शिवसेनेमध्ये बाळ ठाकरे यांचा एकछत्री अंमल चालतो. यामुळे त्यांचे विरोधक त्यांना फॅसिस्ट म्हणतात. शिवसेना आपलीशी वाटणा-यांना मात्र हीच बाब अतिशय अभिमानाची वाटते.
वरचा आदेश बिनतक्रार मान्य करणं आणि बाहेरच्या लोकांनाही तो मानायला भाग पाडणं अशी पद्धत ठाकरेंनी शिवसेनेत घालून दिली आहे. विरोधकांना ही हुकूमशाही वाटते. तर संघटना म्हणून हीच आपली खरी शक्ती आहे असं वाटतं. यामधून ठाकरेंभोवती शिवसेनेत आणि बाहेरही एक वलय तयार झालं आहे.
महाराष्ट्रात सर्व थरांमध्ये त्यांच्याविषयी जबरदस्त आकर्षण असलेलं दिसतं. विदर्भापासून कोकणापर्यंत कोठेही, कधीही त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी हे त्याचं एक उदाहरण आहे.
शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. त्यानंतर तीस वर्षांनी या पक्षाचं राज्य आलं आहे. म्हणजेच एका अर्थाने ठाकरे यांचा प्रभाव आज कळसाला पोहोचला आहे. गेल्या दहा-एक वर्षात तो अधिक वेगाने वाढला आहे.
या प्रभावाची कारणं काय आहेत किंवा असावीत याची चिकित्सा नेहमी केली जात असते. अशा चिकित्सेच्या प्रयत्नांचा आणखी एक भाग म्हणजे हे सर्वेक्षण आहे.
ठाकरे शिवसैनिकांना आवडतात ते का, याचा हा शोध आहे....

सर्वेक्षणाचं स्वरूप
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद ही राज्यातली चार प्रमुख शहरं, तसंच परभणी जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वत्र केवळ शिवसैनिकांकडूनच फॉर्म्स भरून घेतले आहेत. कारण शिवसेनेविषयी आम जनतेत बरंच आकर्षण असलं तरी ठाकरेंच्या आदेशावर काय वाटेल ते करायला तयार होणा-या शिवसैनिकांचं मानस अधिक जाणून घ्यायचं होतं. यामध्ये अनेक ठिकाणचे शाखाप्रमुख, विभागप्रमुख तसंच नगरसेवकांचाही समावेश आहे.
सर्वेक्षणासाठी घेतलेलं एकूण सॅम्पल संख्येने थोडं आहे. मुंबई (५०), पुणे (७६), नागपूर (९४), औरंगाबाद (१००) आणि परभणी (११४) असे एकूण ४३४ फॉर्म्स भरून घेतले आहेत.
सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये बाळ ठाकरे का आवडतात असा एकच प्रश्न् विचारण्यात आला होता. त्याखाली सात पर्याय देण्यात आले होते आणि त्यांचा पसंतीनुसार क्रम लावण्यास सांगण्यात आलं होतं. या पर्यायांखेरीज आणखी काही म्हणायचं असेल तर त्यासाठी मुभा होती.
हे पर्याय असे होते -
- मनातलं बोलतात.
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतात.
- बिनधास्त भाषण करतात.
- त्यांनाच लोकांचे प्रश्न् कळतात.
- एक घाव दोन तुकडे ही त्यांची कार्यपद्धती आवडते.
- देशावर प्रेम न करणारे ते सगळे देशद्रोही ही त्यांची भूमिका आवडते.
- एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी कायद्याची चौकट मोडली तरी चालेल, ही त्यांची भूमिका पटते.
या पर्यायांबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. ठाकरे यांच्या लोकप्रियतेसंदर्भात आजवर अनेक जणांनी विश्लेतषण केलं आहे. यापैकी बहुतेक जणांनी मुख्यत: तीन कारणांमुळे हा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे. एक म्हणजे ठाकरे यांचं वक्तृत्व. त्यांची भाषणं हा शिवसेनेच्या अलीकडच्या वाढीतला महत्त्वाचा घटक ठरला आहे. या भाषणांना सर्व थरातले, वयांचे स्त्री-पुरुष गर्दी करत असतात हे आपण नेहमी पाहतो. अर्थात, लोकांची प्रचंड गर्दी खेचणारे इतरही काही राजकीय नेते देशात मौजूद आहेत. पण ठाकरेंचं बरंचसं राजकारण निव्वळ त्यांच्या वक्तव्यांपासून, भाषणांमधूनच पुढे चाललेलं असतं. त्यामुळे त्याला बरंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दृष्टीने वक्तृत्वाच्या संदर्भात दोन पर्याय देण्यात आले होते. ठाकरेंच्या बोलण्यासंदर्भात ते अगदी साध्या-साध्या लोकांना वाटतं तेच बोलून दाखवतात अशी एक प्रतिक्रिया असते. (उदा. आम्ही लाऊडस्पीकर लावले की त्रास होतो मग मशिदींवरचे भोंगे का काढत नाहीत?) दुसरं म्हणजे ब-याच जणांना त्यांच्या बेधडक बोलण्याचं कौतुक असतं. (उदा. सत्ता आली तर मी मुसलमानांना पाकिस्तानात हाकलून देईन किंवा पाकिस्तानवर थेट हल्ला करून त्याला धडा शिकवीन.)
आम्ही यामध्ये जाणीवपूर्वक हे दोन स्वतंत्र पर्याय म्हणून टाकले होते आणि त्याला लोकांनी प्रतिसादही दिला.
ठाकरेंच्या लोकप्रियेतेचं अलीकडे वारंवार सांगितलं जाणारं दुसरं कारण म्हणजे त्यांचा हिंदुत्वाचा पुरस्कार. मुळात मुंबईतील मराठी माणसावरील अन्याय दूर करण्यासाठी जन्म घेतलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार सुरू केला तेव्हा त्यांचा खरा पाठीराखा वर्ग त्यांच्यापासून दूर जाईल असा काहींचा अंदाज होता. पण तो खोटा ठरला. त्यामुळे ठाकरेंविषयीच्या आकर्षणात खरोखर हिंदुत्ववादी भूमिकेचा आक्रमक पुरस्कार याला असलेली दाद किती हे संख्यात्मक दृष्टीने तपासण्यासाठी हा पर्याय दिला होता.
हिंदुत्ववादी भूमिकेशी संबंधित दुसरा भाग म्हणजे काही ठराविक लोकांना सतत देशद्रोही म्हणून हिणवून त्यांच्याबाबत लोकांमध्ये द्वेष निर्माण करणं हा होय. किंबहुना ठाकरे यांच्या वक्तव्यापैकी बराचसा भाग हा या तथाकथित देशद्रोह्यांबाबत आणि त्यांचा बंदोबस्त कसा करावा लागेल याबाबत असतो. त्याबाबत त्यांच्या पाठीराख्यांचा कल काय आहे हे देशावर प्रेम न करणारे ते सगळे देशद्रोही ही त्यांची भूमिका आवडते, या पर्यायाद्वारे तपासून पाहायचं होतं.
हुकुमशाहीचा पुरस्कार हे ठाकरेंच्या प्रभावाचं तिसरं महत्त्वाचं कारण मानलं जातं. लोकशाही प्रणालीला, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या पद्धतीला ते नेहमीच तुच्छ ठरवत असतात. एकाच कोणाकडे तरी सत्ता असावी आणि त्याने फटाफट निर्णय घ्यावेत असं त्यांना वाटतं. शिवाय लोकांचं भलं होण्यासाठी काय वाटेल ते केलं तरी चालेल असंही ते म्हणतात (उदा. बलात्कार करणा-याला जाहीर फटके मारावेत म्हणजे बलात्कार होणार नाहीत.) आपल्या देशातील लोकशाहीच्या चेंगट राबवणूकीला वैतागलेले लोक ब-याचदा हिटलरी प्रणालीचं गुणगान करत असतात. त्यामुळे ठाकरेंमधला हुकूमशाहीचा भाग त्यांच्या पाठीराख्यांना नक्की किती भावतो हे पाहण्यासाठी या फॉर्ममध्ये दोन पर्याय ठेवले होते. (एक घाव दोन तुकडे ही कार्यपद्धती आवडते. आणि प्रसंगी कायद्याची चौकटही मोडण्याची भूमिका पटते.)
याखेरीज लोकांचे प्रश्न त्यांनाच कळतात असाही पर्याय होता. लोकांचे प्रश्ना ओळखून त्याची अचूक सोडवणूक तेच करू शकतात अशी भूमिका काही वेळेला व्यक्त होत असते. त्यांच्या अनुयायांमध्ये या भूमिकेला कितपत पाठिंबा आहे हे या पर्यायाद्वारे पाहायचं होतं. लोकांच्या नाडीवर त्यांचा हात आहे असं सतत म्हटलं जातं. याचा अर्थ लोकांचे प्रश्नण नेमकेपणाने त्यांनाच कळले आहेत असा लावला जातो की काय हेही तपासायचं होतं.
एकूण कल
सर्वेक्षणाबद्दलचे सर्वसाधारण निष्कर्ष पाहिले तर ठाकरेंची हिंदू राष्ट्र-वादाचा पुरस्कार करण्याची भूमिका ही शिवसैनिकांना सर्वाधिक आकर्षक वाटते असं दिसतं. यासंबंधी फॉर्ममध्ये दोन पर्याय होते ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतात आणि देशावर प्रेम न करणारे ते सगळे देशद्रोही ही त्यांची भूमिका पटते. एकूण फॉर्म भरून घेतलेल्यांपैकी ६४ ते ६५ टक्के शिवसैनिकांनी पहिल्या तीन पसंतीक्रमामध्ये या दोन्ही पर्यायांना स्थान दिलं आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार याला ६५.५१ टक्के सैनिकांनी तर देशद्रोहीपणाबद्दलच्या भूमिकेला ६४.२८ टक्के सैनिकांनी पहिल्या तीनांमध्ये स्थान दिलं आहे. बहुतेक फॉर्ममध्ये ज्वलंत हिंदुत्व हा पर्याय पहिला असेल तर देशद्रोही हा दुसरा, किंवा उलट, अशी स्थिती आहे.
पुणे, मुंबई आणि औरंगाबाद इथे ज्वलंत हिंदुत्व या मुद्दयाला सर्वाधिक पहिला क्रम आहे तर नागपूर आणि परभणी इथे देशद्रोहीया मुद्दयाला अधिक पहिली पसंती आहे.
हिंदुत्व-पुरस्काराच्या खालोखाल सैनिकांनी ठाकरे यांच्या वक्तेपणाशी संबंधित पर्याय उचलून धरलेले दिसतात. एकूणांपैकी ४१.४७ टक्के सैनिकांनी बिनधास्त भाषण करतात या पर्यायाला पहिल्या तीनांमध्ये स्थान दिलं आहे. तर ३६ टक्के जणांनी मनातलं बोलतात हा पर्याय पहिल्या तीनांमध्ये घेतला आहे.
हिंदुत्व-पुरस्काराइतका हा कौल सर्वत्र निर्णायक मात्र नाही. उदाहरणार्थ- यापैकी केवळ परभणीमध्येच मनातलं बोलतात हा पर्याय पसंतीक्रमात दुसरा आहे. (तिथे देशद्रोही हा मुद्दा पहिला आणि हिंदुत्वाचा मुद्दा तिसरा आहे. एकट्या परभणीचा अपवाद वगळता इतरत्र असं झालेलं नाही.) पुण्यात आणि औरंगाबादेमध्ये बिनधास्त भाषण करतात हा पसंतीक्रमात तिसरा पर्याय आहे. पण नागपूरमध्ये मात्र हे दोन्ही पर्याय पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. या पर्यायांना सर्वात पहिली पसंती देणा-यांची संख्याही सर्व ठिकाणी अतिशय कमी आहे.
वक्तेपणापाठोपाठ सैनिकांनी ठाकरेंचा बेधडकपणा उचलून धरला आहे.
एक घाव दोन तुकडे ही कार्यपद्धती आवडते हा पर्याय पहिल्या तीनांमध्ये समाविष्ट करणारे सैनिक एकूणात ३३.४१ टक्के इतके आहेत. मुंबई (४६ टक्के) आणि नागपूर (४० टक्के) या दोन ठिकाणी या पर्यायाला एकूण पसंतीक्रमांमध्ये पहिल्या तीनांत स्थान मिळालं आहे. इतरत्र मात्र हा पर्याय बराच तळाला गेला आहे.
एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी कायद्याची चौकट मोडली तरी चालेल ही त्यांची भूमिका आवडते तसंच त्यांनाच लोकांचे प्रश्ना कळतात हे दोन अगदी तळाकडचे पर्याय आहेत. हिंदू राष्ट्र-वादासंबंधीचे पर्याय जितक्या निर्णायक रीतीने सार्वत्रिक पहिले आहेत तितक्याच निर्णायक रीतीने हे दोन्ही पर्याय तळाला आहेत.
यापैकी कायद्याची चौकट हा पर्याय पहिल्या तीनांमध्ये घेणारे एकूण २६ टक्के लोक आहेत. त्याच वेळी हा पर्याय शेवटच्या तीनांमध्ये टाकणारे ४५. ८५ टक्के लोक आहेत. मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी या पर्यायाला पहिल्या पसंतीचं एकही मत मिळालेलं नाही. दोन्हीकडे निम्म्यांहून अधिक सैनिकांनी हा पर्याय शेवटच्या तीनांमध्ये टाकला आहे. परभणीमध्ये त्याला पहिली पसंती देणारे अगदी थोडे सैनिक (दोन टक्के) आहेत. पण एकूण पसंतीमध्ये तिथे तो शेवटच्या क्रमावर गेला आहे. मुंबईतही हा पर्याय शेवटच्या स्थानावर आहे.
ठाकरेंनाच लोकांचे प्रश्नम कळतात हा पर्याय सर्वानुमताने सर्वात तळाच्या स्थानावर टाकण्यात आला आहे. त्याला पहिल्या तीनांमध्ये स्थान देणारे एकूण २४.४२ टक्के सैनिक आहेत. तर ५२.५३ टक्के सैनिकांनी त्याला शेवटच्या तीनांमध्ये घातलं आहे. पुणे आणि मुंबई इथे एकाही शिवसैनिकाने या पर्यायाला पहिली पसंती दिलेली नाही. पुण्यात ३६ टक्के तर नागपुरात ३३ टक्के लोकांनी तो सातवा पर्याय दिला आहे. पुण्यात ६६ टक्के, औरंगाबादेत ४२ टक्के आणि नागपुरात ७१ टक्के लोकांनी हा पर्याय शेवटच्या तीनांमध्ये टाकला आहे. याखेरीज लक्षणीय संख्येने ज्याबाबत मतच नोंदवलं गेलेलं नाही, असा हा एकमेव पर्याय आहे. मुंबईत २४ तर औरंगाबादेत २० टक्के सैनिकांनी या पर्यायाबाबत पूर्ण मौन बाळगलं आहे. परभणीमध्ये ३१ टक्क्यांनी या पर्यायाला पहिल्या तीनांमध्ये तर ५४ टक्क्यांनी शेवटच्या तीनांमध्ये स्थान दिलं आहे. त्यामुळे तेथील एकमेव संमिश्र प्रतिक्रिया वगळता इतरत्र हा पर्याय सर्वात शेवटी असल्याचाच कौल दिसतो आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे ठाकरेंची हिंदुत्व-पुरस्काराची आणि काही गटांना देशद्रोही ठरवण्याची भूमिका सैनिकांना सर्वाधिक आवडते. त्याखालोखाल त्यांना त्यांचं बेधडक बोलणं आणि हुकूमशाहीचा पुरस्कार करणं हे आवडतं. बहुतेकांच्या बाबतीत कायद्याची चौकट मोडण्याची त्यांची भूमिका फार अग्रक्रमाने पसंत पडणारी नाही. सरतेशेवटी, लोकांचे प्रश्नक त्यांनाच कळतात, असं ठाकरेंबाबत फार आवडीने म्हणणारे शिवसैनिक अगदीच नगण्य आहेत. बहुतेकांनी या पर्यायाचा शेवटीच विचार केला आहे.
पसंतीक्रमाच्या पलीकडे
ठाकरे आवडण्यामध्ये हिंदू राष्ट्र-वादाचं आकर्षण हा यातील बहुतेक सैनिकांच्या बाबत मुख्य भाग असलेल्या फॉर्मवरील को-या जागेमध्येही त्यासंबंधीच अधिक करून मतं किंवा शेरे लिहिले गेले आहेत. पाकिस्तान आणि पर्यायाने इथलेदेखील मुस्लिम यांच्याविरूद्धची ठाकरेंची जहरी टीका यापैकी ब-याच जणांनी उचलून धरली आहे. यासाठी ठाकरेंवर अनेकविध विशेषणं उधळण्यात आली आहेत. चंद्रकांत देसाई (लालबाग) हे लिहितात की, ठाकरे यांनी हिंदूंना हिंदूत्वाचे दिवस दाखवण्यासाठी संसाराची पर्वा न करता जे अखंड परिश्रम घेतले आहेत, त्यामुळे ते हिंदूंच्या गळ्यातील ताईत आहेत. काळाचौकीच्या विश्वनाथ मांडगावकर यांच्या मते बाळासाहेबांची ही कळकळ पाहूनच हा देश हिंदूंचा आहे याची जाणीव होते. परळच्या विकास परब यांनी त्यांना (जणू) शिवाजीचे वारसदार ठरवलं असून हिंदवी स्वराज्याची जोपासना करू शकेल असा नेता अशी बिरूदावली दिली आहे.
औरंगाबाद तसंच परभणीतील अनेक सैनिकांनी बाबरी मशीद पाडण्याचं श्रेय ठाकरेंनाच आहे असं ठामपणे बजावलं आहे. नागपुरातही असे काही सैनिक आहेत. पण पुणे वा मुंबईतील सैनिकांनी तसा काही उल्लेख केलेला नाही.
याचा अनुषंगिक भाग म्हणजे मुसलमान आणि पाकिस्तान यांच्याविरूद्ध आग ओकणं. मुसलमानांच्या विरोधात ठाकरे जे फुत्कार नेहमी टाकतात त्यांचं त्यांच्या सैनिकांनी तर्हेातर्हेनने, गौरवाने वर्णन केलं आहे. उदा. ते मुसलमानांविरूद्ध खरं बोलतात, त्यांना जागा दाखवतात, धडा शिकवतात, लाड करत नाहीत इत्यादी जिंतूरच्या सुमित्राबाई ठाकूर यांनी आव जाव घर तुम्हारा असल्या गोष्टीला त्यांचा विरोध असल्याचं आदराने नमूद केलं आहे. जिंतूरच्या आर. एच. ठाकूर यांना (वय ४७) कोणीही पाकिस्तानी, मग तो खेळाडू असो वा कलावंत, इथे येता कामा नये ही भूमिका बेहद पसंत आहे. देशद्रोह्यांना गोळ्या घालून मारावं हे बरोबरच आहे असं ते म्हणतात. पुण्याच्या वि. व. परांजपे यांनी तर, सत्तेवर आल्यावर पाकिस्तानी आणि बांगला निर्वासितांना परत पाठवू ही भूमिका आवडते, असा स्वत:चा नवीन पर्याय करून त्याला दुस-या क्रमांकाची पसंती दिली आहे. त्यांना पाकिस्तान्यांबद्दल राग आहे म्हणून ते आवडतात असा स्वत:चा पर्याय सुचवणारे नागपूर, औरंगाबादचे काही सैनिक आहेत.
ठाकरे यांचं बेधडक बोलणं आणि हिटलरशाहीचा पुरस्कार करणं याबाबतही त्यांचा आग्रहाने गौरव झालेला दिसतो. विशेषत: त्यांच्या बोलण्याबाबत ब-याच प्रतिक्रिया आल्या. पुण्याचे बरेच शिवसैनिक म्हणाले, बिनधास्त भाषण करणं हे ठाकरेंचं तितकंसं महत्त्वाचं वैशिष्ट्य होऊ शकत नाही. बिनधास्त भाषण सगळेच करतात. पण ठाकरेंचं भाषण ऐकल्यावर काहीतरी करण्यासाठी हात शिवशिवतात किंवा स्फुरण चढतं हे महत्त्वाचं आहे.
सुनील गोडांबे (वय २६) यांनी तर अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण करणारं वक्तृत्व आवडतं, असा स्वत:चा नवीन पर्याय करून तो पहिल्या पसंतीचा ठरवला. (गंमत म्हणजे बिनधास्त भाषण करतात आणि लोकांचे प्रश्नर त्यांनाच कळतात या दोन पर्यायांवर त्यांनी मत नोंदवलेलं नाही.) मुंबईच्या शेखर देशमुख यांनी ठाकरे हे लोकांच्या मनामनातला आक्रोश व्यक्त करतात, अशी तरफदारी केली आहे. राजू जैन (वय २२) यांना त्यांचा आवाज रूबाबदार वाटतो. याखेरीज त्यांच्या भाषणात जोर असतो, ते तरुण रक्त पेटवतात, इत्यादी प्रकारचे शेरेही आले आहेत.
त्यांच्या बेधडक वागण्याचंही अनेकांना आकर्षण वाटतं. लालबागच्या प्रदीप अपंडकरांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते त्यावर ठाम राहतात, असं म्हटलं आहे. शिवाय तरुणपणी ते जेवढे जहाल होते तेवढेच अजूनही आहेत म्हणून कौतुक केलं आहे. संतोष गांगण यांनी त्यांना प्राचीन शिवशाहीला उजाळा देऊन तरुणांमध्ये बाणेदारपणा निर्माण केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. राम निजामपूरकर यांना जगाने बदनाम केलं तरी देशासाठी मी हिटलर होईन, ही ठाकरेंची भूमिका आवडते. जिंतूरच्या एस. आर. ठाकूर यांना गुंडांना दहशत बसवणारी गुंडगिरी ठाकरेंना आवडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. वसमतच्या एका सैनिकाने त्यांच्या हातात (सतत) रिमोट कंट्रोल असतो, याची तारीफ केली आहे. दादरचे शाखाप्रमुख प्रवीण देव्हारे यांचा, ठाकरे जे जे बोलतात ते त्या स्थितीत बरोबरच असतं, ते चुकूच शकत नाहीत, असा ठाम विश्वास आहे.
मात्र ठाकरे यांच्या वागण्या-बोलण्याबाबत स्तुती करत असताना त्यांच्या काही गोष्टी खटकण्यासारख्या आहेत हेही नमूद केलंय. पुण्याच्या प्रदीप कुलकर्णी (वय २८) यांना त्यांची प्रश्नत सोडवण्याची तडफ आवडते पण हिटलर होण्याची आकांक्षा पटत नाही आणि आवडतही नाही. लालबागमधील एका कॉलेज-विद्यार्थ्यांने त्यांचा हुकूमशाहीकडे झुकणारा स्वभाव आवडत नाही, असं म्हटलंय.
ठाकरे यांनी संजय दत्त याला मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी केल्याबाबत सुरुवातीला स्वागत केलं होतं. नंतर मात्र एकाच रात्रीत त्यांनी भूमिका बदलून सामना या दैनिकातील लेखाद्वारे संजय दत्त हा उगवता तारा असल्याचं म्हटलं होतं. लालबाग, परळमधील किती तरी शिवसैनिकांनी याबाबत स्पष्टपणे नाराजी नोंदवली आहे, हे विशेष उल्लेख करण्यासारखं आहे. याखेरीज ठाकरे यांच्याभोवती अलीकडे नव्याने जमा झालेले नेते, बिल्डर इत्यादींविरुद्धही काहींनी नाराजी व्यक्त केली. पण ती केवळ तोंडी! लेखी देणं काही त्यांना शक्यच नव्हतं. कायद्याची चौकट मोडण्याबाबतच्या पर्यायाला अनेक सैनिकांनी क्रमांकच टाकलेला नाही. त्यापैकी काहींना याचा अर्थ काय असं विचारलं असता, काय बोलायला लावू नका, एवढंच ते म्हणाले.
अर्थात, असे अपवाद असले तरी ठाकरे बेधडक वागायला सांगतात ते भल्यासाठीच, अशी बहुतेक सैनिकांची श्रद्धा दिसते. पुण्याच्या शिवसैनिकांनी फॉर्ममधील शेवटच्या पर्यायामध्ये, एखादं चांगलं काम करण्यासाठी कायद्याची चौकट मोडली तरी चालेल... असा बदल सुचवला. पण तरीही मूळ फॉर्म त्यांनी आहे तसाच भरून दिला. शिवाय लोकहिताचं काम करण्यासाठी आम्ही अवश्यपणे कायदा तोडू असं वर बजावलं. मात्र चांगलं काम किंवा लोकहिताचं काम कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं हे काही त्या सैनिकांना विचार करूनही सांगता आलं नाही.
त्यांनाच लोकांचे प्रश्ना कळतात हा पर्याय बहुतेकांनी सर्वत्र खालच्या स्थानावर टाकला आहे. मात्र कोणीही त्यासंबंधी भाष्य केलेलं नाही. एकाही सैनिकाने ठाकरे यांनी अमुक प्रश्न् सोडवला, धसाला लावला किंवा प्रभावीपणे मांडला, असं काही म्हटलेलं नाही. यासंदर्भात दादरच्या महेंद्र जोशी या एकमेव सैनिकाची प्रतिक्रिया बोलकी ठरावी. फॉर्ममधला हा पर्याय वाचून ते म्हणाले, मला हा पर्यायच अप्रस्तुत वाटतो. कोणाही एका नेत्याला वा व्यक्तीलाच लोकांचे प्रश्नर कळतात, असं होऊच शकत नाही. लोकांचे प्रश्नु आम्हालाही कळतात..
अगदी काही मोजके अपवाद वगळता बहुतेक शिवसैनिकांनी उपलब्ध पर्यायांमध्येच पसंतीक्रम ठरवला आहे. काही थोड्यांनी मात्र मूळ पर्यायातील शब्दरचना बदलून किंवा स्वत:चा नवीन पर्याय समाविष्ट करून फॉर्म भरून दिला आहे. बहुसंख्यांच्या बाबतीत समोर आला तो फॉर्म भरला, अशी कर्मणी भूमिका असणंही शक्य आहे. पण अपवाद म्हणून नवीन पर्याय समाविष्ट करणा-यांचे पर्यायही वर उल्लेख केलेल्या मुद्दयांपेक्षा फार वेगळे नाहीत. या दृष्टीने अगदी ढोबळपणे बोलायचं झाल्यास, वर सांगितलेल्या प्रभावाच्या कारणांच्या चौकटीत बहुसंख्यांना ठाकरेंबद्दल काही ना काही वाटत आहे. एकूण ठाकरेंच्या आकर्षणाबाबत फॉर्ममध्ये आलेल्या पर्यायांहून सर्वस्वी वेगळा असा मुद्दा जवळपास कोणीही उपस्थित केलेला नाही.
थोडे अपवाद म्हटले ते असे आहेत. सुजाता राशिंगकर आणि इतर काही महिला शिवसैनिकांनी ठाकरे हे भ्रष्टाचारी नाहीत, असं मुद्दाम नमूद केलं आहे. (याउलट नागरपूरच्या शिवसैनिकांनी, बोलण्याच्या ओघात जेव्हा भ्रष्टाचारांचा मुद्दा आला तेव्हा थोडाफार भ्रष्टाचार सर्वत्रच चालतो, अशी भूमिका घेऊन ठाकरेंचं समर्थन केलं.)
महिला शिवसैनिकांनी भरलेल्या फॉर्ममधली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे त्यापैकी अनेकींनी ठाकरे यांचे आदेश शिवसेनेत विनातक्रार मान्य केले जातात हे आपल्याला आवडतं, असं म्हटलं आहे.
एक नेता-एक आदेश ही पद्धत अनेक सैनिकांना मनापासून आवडते. सांगलीचे विलास तुपे म्हणतात, ठाकरे यांनी शिवसेना एकछत्री भूमिकेतून टिकवून ठेवली हा चमत्कारच आहे. त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. याबद्दल परभणीतील शिवसैनिकांनी बराच आनंद व्यक्त केला.
यामध्ये काही जणांना त्यांच्यात दैवी गुणांचा साक्षात्कार झाला आहे. जिंतूरच्या एस. आर. ठाकूर यांना ते जे बोलतात ते करून दाखवू शकतात याबद्दल खात्री आहे. तर लालबागच्या अशोक पवार यांना ते हिंदुस्थानचे राष्ट्राध्यक्ष बनण्यास एकमेव लायक राज्यकर्ते आहेत, असं वाटतं. तर दादरच्या कयाम शेख यांनी अत्यंत भाविकपणे लिहिलं आहे. खरोखर बाळासाहेबांच्या पाठीमागे जगदंबेचा आशीवार्द आहे.
प्रश्नाावलीचा रोख पूर्णपणे ठाकरे यांच्याभोवती फिरणारा असल्याने ठाकरे यांनी सध्या आणखी काय करावं तसंच त्याच्यानंतर शिवसेनेचं काय होईल, याबाबतही काही मतं आली. नागपूरमध्ये तेरा जणांनी मनोहर जोशी हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ठाकरेंनी सध्याचा मुख्यमंत्री बदलावा किंवा स्वत:च ते पद घ्यावं, असे पर्याय निर्माण होत होते. त्यावर ४७ जणांनी ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला ताबडतोब पाठिंबा दर्शवला. पण इतर अनेकांना तसं वाटत नाही. दादरचे प्रवीण देव्हारे यांनी, पद नसल्यामुळेच ते आपला वचक ठेवू शकतात, असं मत व्यक्त केलं. शिवाय ठाकरे हे देशाचे नेते असल्याने मुख्यमंत्रीपद हे त्यांना फार छोटं वाटतं, असंही ते म्हणाले. परळ विधानसभा मतदारसंघातून काढण्यात आलेले चंदूमास्तर वाईरकर यांनाही असंच वाटतं. बाळासाहेब हे शेवटी मानवतेचे पुजारी होऊन जगाला मार्ग दाखवतील, अशी त्यांची निष्ठा आहे. नागपूरमध्ये बहुसंख्य शिवसैनिक आता दिल्लीच काबीज करायला हवी या मताचे आहेत.
ठाकरे यांच्यानंतर काय, या प्रश्नांवर मात्र अनेकांना काही बोलणंच सुचत नाही. देव्हारे यांना ही कल्पनाही सहन होत नाही. नागपूरमधील ४४ सैनिकांची अशीच अवस्था होते. २९ जणांना, राज किंवा उद्धवमध्ये सेना सांभाळण्याचे गट्‌स नाहीत इतकंच सांगता येतं. तर पुण्यातील वारजे येथील शिवसैनिक म्हणतात, ठाकरे निधन पावतील तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेचं एक टोक मुंबईत आणि दुसरं पुण्यात असेल.
वेगवेगळ्या भागातील शिवसेनेचं स्वरूप कसं वेगळं आहे याचा ओझरता अंदाज या प्रतिक्रियांवरून कळून येतो. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी. त्यामुळे येथील अनेक शिवसैनिक हे मुळापासून ठाकरे यांच्याबरोबर असलेले आहेत. त्यामुळे ते सर्वाधिक कडवे आहेत. (इतर भागातील शिवसैनिकांना ते बाटगे मानत असल्याचं मुंबैवाल्यांच्या बोलण्यावरूनही लक्षात येतं. आणखी एक जाता जाता नोंदलेली गोष्ट. मुंबैवाले मुळापासून शिवसेनेत असल्याने ठाकरेंविषयी त्यांना कुटुंबप्रमुखासारखा आपलेपणा वाटतो. तर इतरत्र एखाद्या हिरोविषयी असल्यासारखं आकर्षण दिसतं. हे सर्वेक्षण करत असतानाच मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. त्यांचा उल्लेख मुंबईतले अलीकडे शिवसेनेत आलेले किंवा मुंबईबाहेरचे शिवसैनिक मॉंसाहेब वगैरे करत असताना लालबागवाले मात्र सर्रास बाळासाहेबांच्या मिसेस असं म्हणत होते.) त्यामुळे मुंबैवाल्यांना ठाकरे यांचं नसणं ही कल्पना रूचत नाही. पुणेवाले त्याची फॅन्टसी करू शकतात. तर नागपूरवाले थेट जमिनीवरचा विचार करतात. याचाच उत्तरार्ध म्हणजे शिवसेना हा एक राजकीय पक्ष असून त्याच्याद्वारे काहीतरी मिळवायचं आहे ही जाणीव नवीन शिवसैनिकांमध्ये पक्की आहे. त्याच्या नेमकं उलट लालबाग-परळवाल्या ओरिजिनल सैनिकांचं आहे. शिवसेनेचं आज महाराष्ट्रात राज्य आलं असलं तरी यांच्या शाखेत अजून साधा फोन नाही. कार्यकर्तेही एकदम साधे. अर्थात, धर्माच्या नावाने पेटण्यात मात्र हे एकाच माळेचे मणी आहेत.
निष्कर्ष, शक्यता, सूचितकं इत्यादी
संख्यात्मक दृष्टीने पाहता हे सर्वेक्षण फारसं मोठं नव्हतं हे उघड आहे. शिवाय व्यापक सर्वेक्षणासंदर्भातल्या अगदी बारीकसारीक आवश्यकता यामध्ये तंतोतंत पाळल्या गेल्या असतीलच, असं सांगता येणार नाही. यामुळे या सर्वेक्षणाच्या मर्यादांची आम्हाला जाणीव आहे.
तरीही या मर्यादित प्रयत्नांमधूनदेखील काही ठोस निष्कर्ष निघण्याची शक्यता सूचित झाली आहेच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे यांच्या पाठीराख्यांमध्ये तथाकथित हिंदू राष्ट्र-वादी विचारसरणीचा प्रभाव हा खोलवर पडला आहे, असं चित्र या सर्वेक्षणातून उभं राहत आहे.
याबाबत अनेक शक्यतांचा विचार करता येईल. एक म्हणजे मुळामध्ये या सैनिकांना ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण होतं आणि आता ठाकरे यांनी हिंदुत्व पत्करल्याने त्यांच्या अनुयायांनीही डोळे मिटून तेच पत्करलं आहे, असं म्हणता येऊ शकेल. दुसरा संभव असा आहे की, या अनुयायांपर्यंत हे हिंदू म्हणून वावरण्याचं वेड कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पोहोचत होतं. त्याच वेळी ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत त्याचा पुरस्कार सुरू केला. त्यामुळे हिंदुत्वाचे हीरो म्हणून हे अनुयायी त्यांच्याकडे पाहू लागले. (लालबागच्या प्रमोद इंदप या कॉलेजातील विद्यार्थ्याने त्यांना मशहूर, नीडर हिंदू वक्ता, अशी खास बिरुदावली प्रदान केली आहे.) यापैकी कोणतीही शक्यता घेतली तरी बहुसंख्य शिवसैनिक त्यांना हिंदुत्ववादी म्हणूनच मानतात.
याचाच एक अर्थ असाही निघू शकतो की, आजवर शिवसेनेच्या राजकारणाला ठाकरेंना वाटतं म्हणून तसं घडेल अशी एक जी चौकट होती ती आता हिंदुत्वाच्या कामासाठी हे घडेल अशी रूपांतरित झाली आहे. अर्थात, यातही मुळात ठाकरेंना हिंदुत्वासाठी काहीतरी घडावं असं वाटल्याने ही तथाकथित विचारसरणी पुढे आली असेल. पण तरीही निव्वळ एका व्यक्तीवरची निष्ठा हा घटक बदलून हिंदुत्व म्हणून प्रचाराला जाणा-या विचारव्यूहावरची निष्ठा हा घटक हळूहळू शिवसैनिकांमध्ये रूजू लागला आहे, असं म्हणता येऊ शकेल.
ही शक्यता पुढे चालवत नेली तर काय काय होतं हेही पाहण्यासारखं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्यातून उद्भवलेल्या राजकारणावर एकचालकानुवर्ती म्हणून टीका होत असली तरी संघाच्या सर्वदूर पसरलेल्या तर्हेसतर्हेाच्या कार्यकर्त्यांची निष्ठा ही एका विचारव्यूहावर असते. त्यातूनच भाजपच्या संसदीय राजकारणाला आज सगळीकडे भक्कम संख्यात्मक पाठिंबा मिळतो आहे. शिवसेना ही अगदी अलीकडेपर्यंत एकचालकानुवर्ती असली तरी कोणत्याही विशिष्ट विचारव्यूहावर निष्ठा ठेवणारी संघटना नव्हती. १९८० नंतर ही स्थिती बदलली आहे. शिवसेनेची संसदीय राजकारणातली घोडदौडही त्यानंतरच सुरू झाली. ठाकरे आणि त्यांचे अनुयायी आता हिंदुत्ववादी झाले आहेत. म्हणजे सध्या देशभर फैलावलेल्या या व्यापक विचारव्यूहाचा ते एक घटक झाले आहेत. याचाच अर्थ ठाकरे यांच्या निष्ठेच्या जोडीने किंवा खालोखाल आणखी एक निष्ठा शिवसैनिकांना मिळाली आहे. म्हणजेच शिवसेनेचं राजकारण फक्त ठाकरे यांच्यातूनच उद्भवेल किंवा संपेल, अशी जी आजवरची स्थिती होती ती आता बदलली आहे. त्यातच आता शिवसेनेला राज्य मिळाल्याने संसदीय राजकारणात या पक्षाचे ठाकरे यांच्याव्यतिरिक्त नवे हितसंबंध तयार होऊन तेही शिवसेनेला (ठाकरे यांच्याशिवायदेखील) टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतीलच. त्यासाठी सर्वसाधारण प्रचाराला किंवा गर्दी आपल्यामागे ठेवण्याला या नेत्यांना हिंदुत्वाचा विचारव्यूह उपयोगी पडू शकतो.
अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे एका रेषेत एकच एक ताणलेली, अशी ही शक्यता आहे. दुस-या बाजूला निव्वळ ठाकरेंबाबतच्या जबरदस्त आकर्षणातूनच हिंदुत्वाचं अनुयायीपण स्वीकारण्याची कृतीही घडलेली असू शकते. उद्या ठाकरे यात नसले किंवा बदलले तर हा पाठीराखा वर्ग विखरूनही जाऊ शकतो. (पण ज्याच्या जोरावर राज्य मिळालं तो विचारव्यूह ठाकरे कशाला सोडतील किंवा त्यांचे अनुयायी एखाघा संघटित ताकदीची जाणीव झाल्यावर ती स्वत:हून कशी विसर्जित होऊ देतील, असे प्रश्न राहतातच.)
ठाकरे यांच्या वक्तृत्व शक्तीचा प्रभाव आमच्या सर्वेक्षणातून पुरेसा व्यक्त झाला आहे. या शक्तीबाबत अनेकदा बोललं गेलं आहे. त्यामुळे त्याबाबत पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
ठाकरे का आवडतात, याबाबत तळाला टाकली गेलेली जी कारण आहेत ती मात्र अग्रगण्य कारणाइतक्याच ठोसपणे काही गोष्टी सूचित करतात. लोकशाही नको ठोकशाही हवी, असं ठाकरे नेहमी सांगतात. हेच वक्तव्य एक घाव दोन तुकडे, अशा पर्यायाद्वारे आम्ही शिवसैनिकांपुढे मांडलं होतं. ठाकरे यांच्या फॅसिस्ट राजकारणावर टीका करताना त्यांचे विरोधक ब-याचदा असं गृहित धरता की, त्यांच्या ठोकशाहीला लोकांचा अधिकतर पाठिंबा असावा. पण प्रत्यक्षात शिवसैनिकांनी दिलेल्या कौलावरून ही वस्तुस्थिती नाही, असं म्हणावं लागेल. कारण एक घाव दोन तुकडे या पर्यायाला केवळ एक तृतीयांश आणि कायद्याची चौकट मोडण्याच्या पर्यायाला तर त्याहूनही कमी सैनिकांनी पहिल्या तीनांमध्ये स्थान दिलेलं आहे.
याचाच एक अर्थ असा की, ठाकरेंची ठोकशाही हा शिवसैनिकांना फार पसंत असणारा मुख्य मुद्दा नव्हे. अर्थात, यामुळे लगेच दुस-या टोकाला जाऊन हे अनुयायी ठोकशाहीपासून परावृत्त झाले आहेत, असं समजण्याचंही कारण नाही. पण ढोबळपणे असं म्हणता येईल की, इथल्या प्रचलित लोकशाही व्यवस्थेबद्दल पराकोटीची चीड किंवा द्वेष या अनुयायामध्ये अजून तरी तयार झालेला नाही. पण याबाबत इतपतच सावध बोलता येईल. कारण एकूण पसंतीक्रमामध्ये हा मुद्दा मधल्या स्तरावर आहे. तो केव्हाही अग्रगण्य होऊ शकतो.
पहिल्या आणि मधल्या स्तरावरच्या मुद्यांचा एकत्रितपणे विचार केला तर असं दिसतं की, ज्वलंत हिंदू राष्ट्र-वाद आणि ठोकशाही यांचा प्रभावी शैलीत पुरस्कार करणारे ठाकरे अनुयायांना आवडतात. हे तीनही गुण ठाकरे यांच्यात बेहद्द आहेत, असं त्यांच्या अनुयायांना वाटतं. पण याचाच अर्थ हेच तीन गुण कमी अधिक प्रमाणात एकवटलेला दुसरा कोणी नेता पुढे आला तर त्यालाही कदाचित हे अनुयायी उचलून धरतील. देशाच्या आजच्या राजकारणाच्या संदर्भात विचार कला तर या तीन वैशिष्ट्यांचा प्रादुर्भाव असणारी हिंदू विचारव्यूहवादी बरीच मंडळी सध्या संघ समूहाच्या भोवती भोवतीने आहेत. म्हणजेच ठाकरे यांची लोकप्रियता उद्या त्यांनाही मिळू शकते. या देशात हिंदू विचारव्यूहाचा फॅसिझम अवतरण्याबाबत काही विचारवंत जी काळजीयुक्त मतं व्यक्त करत असतात तिला या निष्कर्षातून पुष्टीच मिळत आहे.
याबाबतच्या संख्याशास्त्रीय निकालाकडे दुस-या बाजूने पाहायचं झाल्यास, एक घाव दोन तुकडे हा पर्याय कायद्याची चौकट यापेक्षा वरचं स्थान मिळवून आहे. एक घाव दोन तुकडे यामध्ये भराभर निर्णय घेणं इतकंच संदिग्धपणे सूचित होतं. तर कायद्याची चौकट हा पर्याय थेट बेकायदा गोष्टीचं समर्थन करणारा आहे. अशा थेट समर्थनाला शिवसैनिक अजूनही बिचकत आहेत असं कदाचित म्हणता येईल. विशेषत: पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये या पर्यायाला एकाचीही पहिली पसंती नसणं आणि बहुसंख्यांनी त्याबाबत मौन बाळगणं हे उल्लेखनीय आहे. अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे याबाबतही लगेच दुस-या टोकाला जाऊन शिवसैनिकांना कायदेशीरपणा हा फार प्रिय आहे, असं समजण्याचं कारण नाही. पण तरीही यावरून गोष्टी कायदेशीर असाव्यात, माणसाने कायद्याने वागावं, असा जो लोकशाहीला पोषक असलेला आम कल असतो त्याचा सैनिकांवरही ब-यापैकी प्रभाव आहे, असं म्हणता येतं.
त्यांनाच लोकांचे प्रश्न कळतात, हा पर्याय सार्वत्रिक ठोसपणे शेवटाला आला आहे. याचेही वेगवेगळे अर्थ निघू शकतात. एक तर लोकांचे प्रश्नश कळणं ही काही नेता आवडण्याची पूर्व अट नाही, ठाकरेमध्ये त्याहूनही कितीतरी मौलिक वैशिष्ट्यं आहेत, असं बहुतेकांचं मत असलं पाहिजे किंवा मग, लोकांचे रोजच्या जगण्यातले प्रश्नी ठाकरेंना कळतात किंवा ते त्यासाठी विशेष आवडावं असं काही करतात, असं म्हणण्याजोगी फारशी परिस्थिती नाही. याबाबत अनेकांचं एकमत असावं. याचाच आणखी एक अर्थ असा की, ठाकरे हे काही संदिग्ध, धूसर, मूर्त नसलेल्या, लोकांच्या भावनांमधूनच जन्म घेणा-या अशा गोष्टींचा पुरस्कार करत असावेत आणि तेच लोकांनाही बरं वाटत असावं.
यासंदर्भात एक थोडं वेगळं उदाहरण देता येईल. निवडणूकीच्या काळात परळ भागात महानगरसाठी सर्वेक्षण करत असताना एका शाखाप्रमुखांना (हे नगरसेवकही आहेत.) विचारलं होतं की, या भागात लोकांचे प्रमुख प्रश्नर काय आहेत? त्यावर ते म्हणाले होते, लोकांचे प्रश्नह म्हणजे वेगळे काय असतात? ते तसाच मी. म्हणजे लोकांकडे पाणी आलं नाही की माझ्याकडेही येत नाही. वगैरे. आता निव्वळ एवढ्या उत्तरावरून लोकांशी एकरूप झालेले नेते, असा त्यांचा गौरव करता येईल. पण याच गृहस्थाची महापालिकेतली कामगिरी पाहिली तर एकूण नियोजन, येत्या दहा-वीस वर्षांतली लोकवस्तीची वाढ वगैरेंचा काहीच आवाका त्यांना नाही हे स्पष्ट दिसतं. हे गृहस्थ शिवसेनेत अगदी सुरुवातीपासून आहेत आणि त्यांच्या कट्टरपणामुळे लोकप्रियही आहेत.
एकूणच लोकांचे प्रश्नट आणि ते सोडवण्याचे मार्ग याबाबत शिवसैनिकांमध्ये ज्या कल्पना असतात त्या सोप्या, बाळबोध असतात; असं अभ्यासकांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहेच. अँब्युलन्स सुरू करणं किंवा वडापावची गाडी टाकायला मदत करणं वगैरेसारख्या कल्पना मुंबईत अलीकडेपर्यंत लोकप्रिय होत्या. (आता वाईकरमास्तर वगैरे मंडळी ज्या पैसेवाल्यांचा उल्लेख करतात ते लोक शिवसेनेत अलीकडे वेगाने येऊ लागल्यावर त्या बदलू लागल्या. त्या नव्या जमान्यानुसार असाव्यात असं मानायला जागा आहे. उदा. बिल्डर्सना प्लॉट सोडवून देणं इत्यादी.)
या सर्वेक्षणाच्या चौकटीत विचार केला तरीही हा पर्याय शेवटी टाकला जाण्याची अनेक वैशिष्ट्यं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. झुणका-भाकर किंवा ४० लाख झोपडवासीयांना घर अशासारखी निवडणूकीपूर्वीची आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात असल्याचा गाजावाजा हे सरकार करत आहे. तरीही या प्रश्नांीच्या सोडवणूकीने शिवसैनिक काही फारसे प्रभावीत झालेले नाहीत किंवा ठाकरे आवडण्याशी याचा काही संबंध जोडावा, असं एकाही शिवसैनिकाला वाटलेलं नाही. हे सूचितक पुढे चालवत नेलं तर मुळात ठाकरे याबाबतची आश्वासनं देत होते तेव्हा ती काही शिवसैनिकांच्या दृष्टीने फारशी महत्त्वाची नव्हतीच मुळी, असंही म्हणता येण्यासारखं आहे. किंबहुना ठाकरे यांनी मनातलं बोलणं किंवा एक घाव दोन तुकडे अशी त्यांची कार्यपद्धती असणं हे लोकांच्या प्रश्नांपेक्षा हिंदुत्वाशीच अधिक संबंधित आहे, असंच या सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरून सूचित होत आहे.
या निष्कर्षांमध्ये (किंवा सूचितकांमध्ये) जगावेगळं, आजवरच्या रूढ समजाच्या विपरीत असं काही नाही. किंबहुना लोकांचे प्रश्नध दडवून, विकृत पद्धतीने मांडून किंवा बाजूला सारून केलेलं धर्माचं आवाहन या देशात गेल्या काही वर्षांत अधिक भर्रकन पेट घेत आलेलं दिसतं आहेच. या पेटवणा-यांमधे ठाकरे हे अधिक आघाडीचे पुढारी आहेत हेही सर्वांना ठाऊक आहे. या सर्वेक्षणामधून त्याला संख्याशास्त्रीय आधार मिळाला आहे. तोही त्यांच्याच शिवसैनिकांकडून मिळाला आहे.
ठाकरे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी मनोवस्था असलेल्या पक्षाच्या अनुयायांचं हे सर्वेक्षण होतं. हा पक्ष पूर्वीसारखा निव्वळ एक संघटना किंवा दबावगट न राहता राज्यात प्रमुख राजकीय पक्ष झाला आहे. लोकशाही व्यवस्थेचाच फायदा घेऊन संसदीय राजकारण करू पाहतो आहे. या पक्षाच्या एकमेव पुढा-यांचे आवडण्यासारखे गुण सांगताना त्याचेच अनुयायी लोकांचे प्रश्नन त्याला कळतात की नाही, हा दुय्यम मुद्दा ठरवत आहेत. हिंदुत्वाची टक्केवारी या मुद्दयापेक्षा चाळीसने अधिक आहे. याचाच अर्थ हा सर्व पक्षच या पुढा-याप्रमाणे लोकांचे प्रश्नी नगण्य स्तरावर ढकलत आहे. तरीही त्यांना लोकशाही व्यवस्थेत थारा मिळतो आहे आणि पुढेही राजकारण करायचे त्यांचे मनसुबे आहेत.
ठाकरे यांच्या राजकारणाचा ज्यांना कोणाला प्रतिवाद करायचा आहे त्यांना ही विसंगती ठळकपणे अधोरेखित करावी लागेल.
शेवटी, एक गोष्ट नमूद करायला हवी. वर नोंदलेले निष्कर्ष, शक्यता यामधून ठाकरे आणि त्यांचे पाठीराखे याबाबतचं राजकीय वास्तव सूचित होत आहे. परंतु ठाकरे यांचे पाठीराखे त्यांच्यावर इतकी आंधळी निष्ठा कशी आणि का ठेवतात याबाबतची संपूर्ण कारणमीमांसा यामधून स्पष्ट होते, असं मात्र म्हणता येणार नाही. निव्वळ आकडेवारीच्या आधाराने ते शक्यही नाही. बहुसंख्य शिवसैनिकांनी ठाकरे शिवसैनिकांवर प्रचंड प्रेम करतात, असं नमूद केलं आहे. लक्षावधींच्या समुदायाला अशा रीतीने बेभान करणं याचा मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय असा इतरही अनेक तर्हां्नी तपास करण्याची गरज आहे.
अर्थात, त्याची कारणं काहीही निघाली आणि ठाकरे यांनी इतकी प्रचंड गर्दी जमवणं काहीसं अनाकलनीयपणे चकित करणारं वाटलं तरी आताच नमूद केलेल्या राजकीय वास्तवाबरोबर ते ताडून बघितलं तर हा सर्व प्रकार धोकादायकच आहे हे स्पष्ट आहे.
ठाकरेंच्या विरोधकांना यालाही शह घावा लागेल.
विभागवार निष्कर्ष
या चाचपणीचे विभागवार निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई -
मुंबईमध्ये लालबाग-परळ, दादर आणि धारावी अशा कामगार, मध्यम आणि गरीबवर्गीयांच्या तीन प्रातिनिधिक वस्त्यांमध्ये सर्वेक्षण केलं. एकूण पन्नास फॉर्म्स भरून घेतले.
मुंबईमध्ये ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्काराचा मुद्दा सर्वात प्रभावी दिसतो. या पर्यायाला ६२ टक्के लोकांनी पहिली पसंती दिलेली असून एकूण ८६ टक्के लोकांनी पहिल्या तीन पसंतीक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. देशावर प्रेम न करणारे ते देशद्रोही, या पर्यायाला त्याखालोखाल म्हणजे ५२ टक्के लोकांचा पहिल्या तीनांमधला कौल मिळाला आहे.
कायद्याची चौकट मोडण्याबाबतचा पर्याय बहुतेकांनी तळाला टाकला आहे. या पर्यायाला सातवी पसंती देणा-यांचं प्रमाण ३४ टक्के तर शेवटच्या तीन पसंतीमध्ये त्याचा समावेश करणार्यां चं एकूण प्रमाण ५२ टक्के आहे. या पर्यायाला एकाही शिवसैनिकाने पहिली पसंती दिलेली नाही. शिवाय अठरा टक्के लोकांनी याबाबत मत नोंदवण्याचंच टाळलं आहे.
ठाकरेंनाच लोकांचे प्रश्नप कळतात यालाही एकाही शिवसैनिकाने पहिली पसंती दिलेली नाही. शिवाय दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम मिळवूनसुद्धा केवळ २२ टक्के लोकांनी पहिल्या तीनात याला स्थान दिलेलं दिसतं. त्याहून अधिक म्हणजे २४ टक्के लोकांनी यावर मतच नोंदवलेलं नाही. तर मनातलं बोलतात याला अवघ्या आठ टक्के लोकांनी पहिली पसंती दिली आहे.
बिनधास्त बोलतात आणि एक घाव दोन तुकडे या पर्यायांना सर्वसाधारणपणे प्रत्येकी ४४ ते ४६ टक्क्यांच्या आसपास पहिल्या तीन क्रमांकांची पसंती मिळालेली आहे. पण या दोन्ही पर्यायांना पहिल्या पसंतीची केवळ चौदा टक्के मतं मिळाली आहेत.
थोडक्यात, पहिल्या तीन पसंतींच्या आधारे मुंबईच्या शिवसैनिकांचा सर्वसाधारण पसंतीक्रम असा निघतो - १) ज्वलंत हिंदुत्व २) देशद्रोही ३) एक घाव दोन तुकडे ४) बिनधास्त बोलतात ५) मनातलं बोलतात ६) लोकांचे प्रश्नत कळतात ७) कायघाची चौकट
पुणे -
पुण्यात एकूण ७६ फॉर्म्स भरून घेतले.
ज्वलंत हिंदुत्वाचा ठाकरेंचा पुरस्कार अधिकांश जणांना आवडतो. ३७ टक्के लोकांनी याला पहिली आणि ७५ टक्के लोकांनी पहिल्या तीनातली पसंती दिली आहे. त्याखालोखाल देशद्रोही या पर्यायाचा क्रमांक लागतो. २८ टक्के लोकांनी त्याला पहिली आणि ५५ टक्के लोकांनी पहिल्या तीनातली पसंती दिली आहे.
त्यांनाच लोकांचे प्रश्न कळतात हा पर्याय तळाला गेला आहे. या पर्यायाला एकानेही पहिली पसंती दिलेली नाही. ३६ टक्के लोकांनी सातवा पर्याय म्हणून तो निवडला आहे. ६६ टक्के लोकांनी त्याला शेवटच्या तिनांत टाकला आहे. तीन जणांनी मत नोंदलेलं नाही. शिवाय दुस-या आणि तिस-या क्रमांकाची मिळूनही एकूण १४ टक्केच मतं याला मिळाली आहेत.
कायद्याची चौकट हाही तळाला गेलेला पर्याय आहे. त्यालादेखील पहिल्या पसंतीचं एकही मत इथे नाही. दुस-या आणि तिस-या पसंतीची मिळूनही अकरा टक्केच मतं आहेत. बरोबर ५० टक्के लोकांनी हा पर्याय शेवटच्या तीनात टाकला आहे.
मनातलं बोलतात आणि बिनधास्त भाषण करतात, हे पर्याय मधल्या स्तरावर कोठेतरी आहेत. पहिल्या पर्यायाला ४० टक्क्यांनी तर दुस-या ५० टक्क्यांनी पहिल्या तिनातलं स्थान दिलं आहे.
सर्वसाधारण पसंतीक्रम असा आहे -
१) ज्वलंत हिंदुत्व २) देशद्रोही ३) बिानधास्त भाषण ४) मनातलं बोलतात ५) एक घाव दोन तुकडे ६) कायद्याची चौकट ७) लोकांचे प्रश्नआ कळतात.
नागपूर -
इथे एकूण ९४ फॉर्म्स भरून घेतले.
इथे देशावर प्रेम न करणारे ते देशद्रोही, ही ठाकरे यांची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय आहे. या पर्यायाला ५० टक्के लोकांनी पहिली पसंती दिली आहे. तर ९० टक्के लोकांनी पहिल्या तीन पसंतीक्रमांकामध्ये याला स्थान दिलं आहे. ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्दयाचा त्याखालोखाल म्हणजे ६२ टक्के लोकांनी पहिल्या तीनांत समावेश केला आहे.
लोकांचे प्रश्नव कळतात हा पर्याय बहुमताने तळाला गेला आहे. ३३ टक्के लोकांनी त्याला सातवा (शेवटचा) पर्याय ठरवला आहे. शेवटच्या तीन पसंती लक्षात घेतल्या तर सुमारे ७१ टक्के लोकांनी तो तळाच्या तीन पसंतीमध्ये टाकला आहे. जेमतेम पाच टक्के जणांनी त्याला सर्वात पहिली पसंती दिली आहे.
मनातलं बोलतात याला पहिली पसंती देणारे अवघे तीन टक्के लोक आहेत. हाच पर्याय ४५ टक्के लोकांनी शेवटच्या तीन पसंतीमध्ये टाकला आहे. पहिली पसंती देणा-यांपेक्षा अधिक म्हणजे चार टक्के लोकांनी याबाबत मतच नोंदवलेलं नाही.
बिनधास्त भाषण करतात, याला पाच टक्के लोकांनी पहिली पसंती दिली आहे. २२ टक्के लोकांनी या पर्यायाचा पहिल्या तिनांत तर ५२ टक्के लोकांनी शेवटच्या तिनांत समावेश केला आहे.
एक घाव दोन तुकडे, या पर्यायाला तेरा टक्के लोकांनी पहिली पसंती दिली आहे. तर १७ टक्के लोकांनी तीच शेवटची पसंती ठरवली आहे. कायद्याची चौकट हा पर्याय सहा टक्के लोकांनी पहिल्या क्रमांकाचा म्हणन निवडला आहे तर १७ टक्के लोकांनी तोच शेवटी टाकला आहे.
नागपूरमधला सर्वसाधारण पसंतीक्रम असा आहे.
१) देशद्रोही २) ज्वलंत हिंदुत्व ३) एक घाव दोन तुकडे ४) कायद्याची चौकट ५) मनातलं बोलतात ६) बिनधास्त बोलतात ७) लोकांचे प्रश्नय कळतात.
औरंगाबाद -
इथे शंभर फॉर्म्स भरून घेतले.
सर्वाधिक ३८ टक्के लोकांनी ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्काराच्या मुद्दयाला पहिली पसंती दिली आहे. ६८ टक्के लोकांनी पहिल्या तीनांमध्ये याला स्थान दिलं आहे. तीन टक्के लोकांना हा सातव्या क्रमांकाचा पर्याय वाटला आहे.
पसंतीक्रमात देशद्रोही हा पर्याय दुस-या क्रमांकावर आहे. वीस टक्के लोकांनी त्याला पहिली पसंती आणि ५५ टक्के लोकांनी पहिल्या तीनांतील पसंती दिली आहे. ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्दयावर दहा टक्के आणि देशद्रोही या मुद्दयावर अकरा टक्के लोकांनी मौन बाळगलं आहे.
त्यांनाच लोकांचे प्रश्नब कळतात, हा पर्याय सर्वात तळाला गेला आहे. त्याला सातवा पर्याय ठरवणारे बारा टक्के तर शेवटच्या तीनांमध्ये टाकणारे ४२ टक्के लोक आहेत. अवघ्या सात टक्के लोकांनी त्याला पहिली पसंती दिली आहे. वीस टक्के लोकांनी यावर मतच नोंदवलेलं नाही.
मनातलं बोलतात यालाही सातवा पर्याय ठरवणारे बारा टक्के लोक आहेत. एकूण ३१ टक्के जणांनी तो शेवटच्या तीनांमध्ये टाकला आहे. २९ टक्के लोकांनी याबाबत नोंदलेलं नाही. एकूणात या पर्यायाबाबतचं मौन सर्वाधिक आहे. बिनधास्त भाषण करतात याला ४७ टक्क्यांनी पहिल्या तीनांत स्थान दिलं आहे, पण २७ टक्क्यांनी याबाबत मौन बाळगलं आहे.
येथील सर्वसाधारण पसंतीक्रम असा दिसतो.
१) ज्वलंत हिंदुत्व २) देशद्रोही ३) बिनधास्त भाषण ४) एक घाव दोन तुकडे ५) मनातलं बोलतात ६) कायद्याची चौकट ७) लोकांचे प्रश्न कळतात.
परभणी -
शहर आणि जिल्हा मिळून एकूण ११४ फॉर्म्स भरून घेतले.
देशावर प्रेम न करणारे ते सगळे देशद्रोही, ही ठाकरेंची भूमिका अधिक लोकप्रिय आहे. एकूण सुमारे २२ टक्के लोकांनी त्याला पहिली पसंती दिली आहे. ५९ टक्क्यांनी पहिल्या तीन पसंतीमध्ये या पर्यायाला स्थान दिलं आहे. एक टक्क्याहूनही कमी लोकांना तो शेवटचा पर्याय वाटला आहे.
त्याखालोखाल दुसरा पर्याय असा स्पष्ट नाहीच. मनातलं बोलतात, बिनधास्त भाषण करतात आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतात यांना साधारण सारखीच पसंती आहे. मनातलं बोलतात याला १७ टक्क्यांनी पहिली आणि ५१ टक्यांनी पहिली तीनातली पसंती दिली आहे. ज्वलंत हिंदुत्वाला १५ टक्क्यांनी पहिली आणि ५१ टक्क्यांनी पहिल्या तीनातली पसंती देऊ केली आहे. तर बिनधास्त भाषण करतात याला १८ टक्क्यांनी पहिला आणि ४६ टक्क्यांनी पहिल्या तीनातला पर्याय ठरवला आहे.
शेवटच्या पयार्याबाबतही हेच झालं आहे. यात २५ टक्के लोकांनी कायद्याची चौकट या पर्यायाला सातवा पसंतीक्रम दिला आहे. ५६ टक्के लोकांनी त्याला शेवटच्या तीनात टाकलं आहे. एक घाव दोन तुकडे याला २२ टक्क्यांनी सातव्या क्रमांकावर आणि ५४ टक्क्यांनी शेवटच्या तीनामध्ये टाकलं आहे. कायघाची चौकट, याला पहिली पसंती देणारे मात्र जेमतेम दोन टक्के लोक आहेत तर एक घाव दोन तुकडेला सुमारे दहा टक्क्यांनी पहिली पसंती दिली आहे.
त्यांनाच लोकांचे प्रश्ने कळतात, या पर्यायाबाबत संमिश्र प्रतिक्रीया आहे. १४ टक्के लोकांनी त्याला पहिली पसंती दिली असून ३१ टक्क्यांनी पहिल्या तीनांत स्थान दिलं आहे.
सर्वसाधारण पसंतीक्रम असा आहे.
१) देशद्रोही २) मनातलं बोलतात ३) ज्वलंत हिंदुत्व ४) बिनधास्त भाषण ५) त्यांनाच लोकांचे प्रश्ना कळतात ६) एक घाव दोन तुकडे ७) कायद्याची चौकट.
युनिक फीचर्स टीम
(अक्षर, दिवाळी १९९५)

घुसळण कट्टा