टीआरपी के लिए कुछ भी करेगा!

घडणार्‍या घटना-घडामोडी क्षणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार्‍या या यंत्रणा कशा चालतात शिवाय स्पर्धेपायी बातम्यांना मनोरंजनाचा तडका कसा दिला जातो आहे याचा फर्स्टहँड रिपोर्ट देणारा हा लेख. वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, संपादक, निर्माते यांची होणारी घालमेल आणि त्यांच्यावर बाजाराचा असलेला दाब या लेखातून पुढे आला. सामाजिक प्रश्न उपस्थित करण्याची आणि या प्रश्नांवर उत्तरं शोधणार्‍या प्रयत्नांना लोकांसमोर आणण्याची मोठी ताकद या माध्यमात आहे, परंतु दुर्दैवाने ही बाब त्यांच्या अजेंड्यावर दिसत नाही.
(‘महाराष्ट्र टाइम्स’ दिवाळी अंक, २००२)

“ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण टेलिव्हिजनवरच्या वृत्तवाहिन्या म्हणजे बॉलिवुडचे मसाला हिंदी चित्रपटच आहेत. या वृत्तवाहिन्यांमध्ये थरार आहे, नाट्य आहे, कॉमेडी आहे आणि हिंसाचार तर मागाल तेवढा आहे.” स्टार कॉमचे व्यापार व्यवस्थापक रवी किरण यांनी केलेलं हे वर्णन. त्यांच्या मते हिंदी चित्रपटातील चित्रण खोटं आहे, हे समजून लोक पाहत असतात. पण वृत्तवाहिन्यांवरचं सगळं चित्रण खरं असतं. त्यामुळे लोक भलतेच रंगून जातात.

अकरा सप्टेंबरला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला हे याचं बोलकं उदाहरण. संपूर्ण देशभर तेव्हा कोणतीही करमणुकीची वाहिनी पाहिली गेली नसेल, फक्त वृत्तवाहिन्याच पाहिल्या गेल्या असतील. कारण सरळ होतं. त्या हल्ल्याच्या बातमीत बॉलिवुड सोडाच, अगदी हॉलिवुडपटात दाखवतात तसा थरार होता. बेस्टसेलर कादंबरीत शोभावी अशी कल्पनाशक्ती लढवलेली होती. जगातली एकमेव महासत्ता हादरवून सोडणारे हे ‘वीर’ कोण आहेत याच्या उत्सुकतेनं जो सस्पेन्स ताणला गेला होता त्याला तर तोडच नव्हती. त्यामुळे सिनेमापेक्षा ही बातमी पाहण्यात ‘मजा’ होती.

वृत्तवाहिन्या लोक सिनेमासारख्याच बघतात. त्यांची त्यात खूप करमणूक होते. लालूप्रसादांकडे लोक बातमी म्हणून पाहतच नाहीत, तर मनोरंजन म्हणून बघतात. आपल्याकडच्या वृत्तवाहिन्या पाहिल्या की चॅनेलवालेही बातम्यांकडे मनोरंजन म्हणून पाहत आहेत असं वाटू लागतं. लोकांचा जीव रमावा, त्यांच्या चार घटका मजेत जाव्यात, त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून या वाहिन्या आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. याला कारण आहे. मुळात या वाहिन्या धास्तावलेल्या असतात. रिमोट कंट्रोलच्या भीतीमुळे त्यांना खरोखरच कापरं भरलेलं असतं. लोकांमधला पेशन्स कमी झालाय, त्यांचा अटेन्शन स्पॅन दिवसेंदिवस खालावतो आहे, या भीतीमुळे त्या फार तपशिलात न शिरता भराभर बातम्या सांगत सुटतात. लोक चॅनेल बदलतील, टीव्ही बंद करतील, या धास्तीपोटी एका मिनिटात १0 बातम्या सांगितल्या जातात. दोन मिनिटांत पंचवीस बातम्या सांगितल्या जातात. रात्री साठ मिनिटांत शंभर बातम्या सांगितल्या जातात. प्रत्येक ‘कमर्शियल ब्रेक’च्या वेळी निवेदक-निवेदिकांचे चेहरे इतके केविलवाणे झालेले असतात की विचारू नका! त्यांनी आता ‘पाया पडतो बाबांनो, पण चॅनेल बदलू नका’ एवढंच म्हणणं शिल्लक राहिलेलं असतं. खरं तर लोक शांतपणे एक वाहिनी पाहायला तयार असतात, पण यांची घाई न संपणारी असते. एक वाहिनी म्हणते, ‘सबसे तेज’, तर दुसरी लगेच म्हणते, ‘आपको रखे आगे’. अशा वेळी त्यांना विचारावंसं वाटतं, ‘सबसे तेज आगे जायेंगे हे खरंय, पण एवढी घाई करून पुढे कुठे जायचंय ते तर सांगाल?’
आज तक, स्टार न्यूज, झी न्यूज, राष्ट्रीय सहारा व एनडीटीव्ही इंडिया या पाच हिंदी, तर एनडीटीव्ही २४ बाय ७, हेडलाइन्स टुडे या दोन इंग्रजी अशा सात वृत्तवाहिन्यांनी किमान शहरांतल्या तरी सुशिक्षित-विचारी-चौकस-जागरूक वर्गाला बर्‍यापैकी ताब्यात घेतलं आहे. टीव्हीवरच्या मालिकांमधली ‘सस्ती एन्टरटेनमेंट नको’, अशी मनोभूमिका असलेला प्रेक्षकही या वृत्तवाहिन्यांकडे खेचला गेला आहे. थोडक्यात, विचार करू शकणारा- आपल्या विचारांनी प्रभाव पाडू शकणारा- एकूण निर्णयप्रक्रियेत स्वत:चा वाटा सांगणारा जो बोलका वर्ग देशात आहे तो या वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षक बनला आहे. आजघडीला या प्रेक्षकांची संख्या सुमारे दोन कोटी आहे, असं मानलं जातं. उद्या ही संख्या चार-पाच कोटींच्या घरात जाईल. वृत्तवाहिन्यांची उपयुक्तता व लोकप्रियता जसजशी वाढत जाईल तसतशी वृत्तवाहिन्यांची प्रेक्षकसंख्याही वाढत जाईल, असे आडाखे बांधले जात आहेत. या आडाख्यांच्या आशेवरच बडेबडे उद्योगसमूह वृत्तवाहिन्यांमध्ये पैसे गुंतवू इच्छित आहेत. आजमितीला वृत्तवाहिन्यांमध्ये वर्षभरात पाचशे कोटींची उलाढाल होते असा अंदाज आहे. गुंतवणूक वाढल्याने ही उलाढालही वाढणार आहे. ती वाढल्याने प्रेक्षकसंख्या वाढवली जाणं अपरिहार्य आहे. एकुणात, उद्याचा हा मोठा उद्योग ठरण्याची शक्यता आहे.

वृत्तवाहिन्या हे आपल्यासाठी तसं नवं प्रकरण आहे. कालपर्यंत आज तक, झी आणि स्टार एवढ्या तीनच वाहिन्या आपल्याकडे होत्या; पण या वर्षी अचानक चार मोठ्या वाहिन्या सुरू झाल्या. येत्या काही दिवसांत आणखी वृत्तवाहिन्या सुरू होण्याच्या घोषणा अपेक्षित आहेत. रामोजीराव यांच्यासारखे या क्षेत्रातील ‘एशियन टायगर’ अनपेक्षित मोठं पाऊल उचलण्याच्या विचारात आहेत, असंही ऐकू येत आहे. अशा प्रकारे ‘बातमी’ आणि ‘माहिती’ यांना खूपच महत्त्व प्राप्त होत आहे, होणार आहे. आज या वृत्तवाहिन्या सुशिक्षित प्रेक्षकांना आपल्या पाठीवर बसवून घेऊन निघाल्या आहेत; मात्र त्या कुठे घेऊन निघाल्या आहेत, हे तूर्त तरी प्रेक्षकांना माहीत नाही. वृत्तवाहिन्यांना तरी ते माहीत आहे का नाही, याची कल्पना येत नाही. त्यांच्यातील स्पर्धेपायी जिकडे यश अधिक मिळेल- जिकडे प्रेक्षक अधिक मिळतील- जिकडे जाहिराती अधिक मिळतील तिकडे वृत्तवाहिन्या जातील, असं त्यांच्या आजवरच्या वर्तन-व्यवहारातून दिसत आहे.

‘चोवीस तास बातम्या देणार्‍या वृत्तवाहिन्या’ ही भारतीयांच्या दृष्टीने एक नवीनच घटना आहे. आपल्याला मूळची सवय सकाळी वृत्तपत्र वाचण्याची, सायंकाळी सातच्या ‘बातम्या’ ऐकण्याची (पाहण्याची नव्हे) आणि रात्री दिल्ली दूरदर्शनवरील राष्ट्रीय वार्तापत्र पाहण्याची. त्यामुळे एकाच वेळी सात वृत्तवाहिन्या २४ तास देशभरातील बारीकसारीक बातम्या दाखवत आहेत, ही वाचकांच्या दृष्टीने मोठी घडामोडच आहे. पूर्वीचे दूरदर्शनवरचे बातम्यांचे आणि चर्चेचे कार्यक्रम किती फिकट, अनाकर्षक, रटाळ आणि जुनाट होते असं वाटायला लावणारं रूप या नवीन वृत्तवाहिन्यांनी घेतलं आहे. चकचकीत, रंगीबेरंगी, आकर्षक, दिलखेचक असं या वाहिन्यांचं रुपडं आहे. सुंदर दिसणारी, सुंदर बोलणारी सुंदर माणसं आपल्या कौशल्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. प्रणय रॉय, रजत शर्मा, करण थापर, विनोद दुआ, वीर संघवी, राजदीप सरदेसाई, श्रीनिवास जैन, बरखा दत्त, दिबांग, अभिज्ञान प्रकाश अशी नवी स्टार मंडळी वृत्तवाहिन्यांमुळे देशभर चमकू लागली आहेत. लोक एखाद्या मंत्र्याला ओळखणार नाहीत, परंतु या व अशा डझनभर पत्रकारांना नावाने-चेहर्‍याने ओळखू लागले आहेत. प्रेक्षकांमध्ये या पत्रकारांचे फॅन निर्माण होऊ लागले आहेत. वृत्तवाहिन्यांमुळे एक नवीच पिढी एका अर्थाने देशाचं नेतृत्व करू लागली आहे. ही सारी किमया वृत्तवाहिन्यांच्या छोट्याशा पडद्याने केली आहे. बातम्यांचा-माहितीचा जबरदस्त धबधबा या वाहिन्यांमधून वाहतो आहे. बातम्यांच्या या ढगफुटीत आपण वाहून तर जाणार नाही ना, अशी शंका यावी एवढा त्याचा प्रवाह जास्त आहे. बातमी ऐकून विचार करण्याची, त्यावर मत बनवण्याची प्रत्येक माणसाच्या मनात चालणारी प्रक्रियाच गोठून जाईल की काय, असा प्रश्न पडावा इतका वृत्तवाहिन्यांचा बातम्या डोक्यावर ओतण्याचा वेग वाढला आहे. प्रेक्षकांनी बातम्या कशासाठी पाहाव्यात हे वृत्तवाहिन्या सांगत नाहीत. प्रेक्षकांनी बातम्या पाहत राहावं यासाठी मात्र वाट्टेल ते करायला त्या तयार आहेत, असं चित्र आहे.

जगात वृत्तवाहिन्यांची दोन प्रारूपं आहेत. एक ब्रिटिश, तर दुसरं अमेरिकन. एक बीबीसी, तर दुसरं सीएनएन. या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. बीबीसी शांतपणे काम करणारी, सखोल माहिती देणारी, विश्‍लेषण करणारी वाहिनी आहे; तर सीएनएन ही सगळ्यात आधी बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध असलेली वाहिनी आहे. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात काहीही घडलं तरी काही मिनिटांच्या आत आपण ते प्रेक्षकांना दाखवलं पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. व्यापाराच्या भाषेत बोलायचं, तर तेच त्यांचं ‘युनिक सेलिंग प्रपोझिशन’ (यूएसपी) आहे. त्यामुळे या प्रकारच्या वृत्तवाहिन्यांमध्ये कल्पनेपलीकडची घाई अनुस्यूत असते. भारतातल्या वृत्तवाहिन्यांनी सीएनएनचं हेच प्रारूप निवडलं आहे. वाहिन्यांनी तसं जाहीर केलेलं नसलं, तरी फक्त दहा-दहा मिनिटं त्या वाहिन्या पाहिल्या तरी यांच्या शेपटीला कुणी तरी फटाक्यांची माळ लावलेली आहे, अशी शंका येते.

सीएनएनचं पहिलं वैशिष्ट्य घाई, आणि दुसरं, सगळ्या गोष्टी लाइव्ह दाखवणं. हे वैशिष्ट्यही आपल्या वाहिन्यांना लागू आहे. मग ती गुजरातची दंगल असो की कारगिलचं युद्ध असो. स्वामिनारायण मंदिरात घुसलेले अतिरेकी असोत की देशाच्या संसदेला पडलेला घेराव, आपलं काम एकच- लाइव्ह दाखवणं आणि सगळ्यात आधी दाखवणं. मेळघाटातली कुपोषित बालकं सगळ्यात आधी आपल्याकडेच दिसली पाहिजेत. धावत्या लोकलमध्ये महिलेवर झालेला बलात्कार सगळ्यात आधी आपल्याकडेच कव्हर व्हायला पाहिजे. यामागचं सूत्र एकच- सिच्युएशन एक्स्प्लॉइट करो। सबसे पहिले व्हिज्युअल्स हमारे चॅनलकोही मिलने चाहिए।

‘सबसे पहिले’ची भानगड आली ती टीआरपीमधून. कोणती वाहिनी किती प्रेक्षक पाहतात, याच्या मोजणीला टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजेच ‘टीआरपी’ म्हणतात. हे टीआरपी ज्या वाहिनीकडे जास्त त्या वाहिनीला जाहिराती जास्त आणि पर्यायाने पैसा जास्त मिळणार, असं हे गणित आहे. त्यामुळे बॉम्बस्फोट झाल्याची बातमी ऐकल्यावर सामान्य माणसाच्या डोळ्यांपुढं काजवे चमकतात, तर वाहिन्यांच्या डोळ्यांपुढे टीआरपी चमकतात. चॅनेलच्या दृष्टीने तो संधीचा दिवस असतो. आता आपल्याला टीआरपी मिळणार! अशी आशा त्यात भरलेली असते. वास्तविक पाहता कुठून तरी अशी भयानक बातमी कळली की टीव्हीवर जी कुठली पहिली वृत्तवाहिनी मिळेल ती लोक पाहतात. पण बातमी एकदा कळल्यावर लोक वाहिनी बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी आपलीच वाहिनी पाहत राहावं म्हणून वाहिन्यांना नाना लटपटी कराव्या लागतात. एखाद्या खळबळजनक घटनेने मिळवून दिलेली संधी चॅनेलवाले सहजी सोडत नाहीत. त्यांनी त्यासाठी हरतर्‍हेने तयारी केलेली असते.

लोकांनी सलग आपलीच वाहिनी पाहावी याच्या तयारीसाठी वेगवेगळ्या वाहिन्यांनी परदेशांतून सल्लागार आणले, तिकडच्या वाहिन्या घडवणारे लोक आमंत्रित केले. त्यांनी पहिलं काम केलं, ते म्हणजे पत्रकाराची व्याख्या बदलली. बातमीसाठी कुठंही जाऊन धडकणारा, लोकांशी संवाद साधू शकणारा, त्यात बातमी शोधू शकणारा आणि वेळेत ती व्यवस्थित लिहू शकणारा, अशी पूर्वी त्याची छापील माध्यमातली व्याख्या होती. पण या परकीय सल्लागारांनी ती बदलली. त्यांनी सांगितलं, पत्रकार देखणा किंवा देखणी असली पाहिजे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात डॅश पाहिजे. त्याच्या लुक्समध्ये गंमत पाहिजे. त्याला किंवा तिला स्टाइलमध्ये बोलता आलं पाहिजे. पत्रकाराचे कपडे नव्या फॅशन्सप्रमाणे चित्ताकर्षक असले पाहिजेत. प्रसंग कितीही भयंकर असला, तरी तो पत्रकार प्रसन्न दिसला पाहिजे. कारण तो वाहिनीचा चेहरा असतो, आणि लोकांना प्रसन्न वाहिनीच पाहायला आवडते.

दिसण्याबरोबरच गिमिक्सवरही काम केलं गेलं. वृत्तवाहिन्यांमधले सेलिब्रिटी प्रणय रॉय यांनी त्यासाठी स्वत:च एक स्टाइल बुक (शैलीपुस्तक) तयार केलं. बातम्या सांगण्याची, दाखवण्याची, सादर करण्याची अशी शैली तयार केली आणि ‘एनडीटीव्ही’च्या दोन्ही वाहिन्यांना ती लागू केली. प्रत्येक बातमीत काही दृश्यं साधारण असतात, काही उत्तम असतात, तर काही सर्वोत्तम असतात. प्रणय रॉयनी असा दंडक घातला, की सर्वोत्तमच्या खालोखालचं उत्तम दृश्य बातमीच्या सुरुवातीला दाखवा, म्हणजे (त्यांच्या मते) प्रेक्षक त्या बातमीला ‘हुक’ होतो, आणि बातमी संपताना सर्वोत्तम दृश्य दाखवा, म्हणजे प्रेक्षकाच्या मनात ती बातमी ठसते. या पद्धतीमुळे ते पुढची बातमी पाहतात आणि रिमोटचं बटण दाबून वाहिनी बदलत नाहीत. ‘आजतक’च्या मते लोकांची बोलीभाषा जेवढी वाहिनीमध्ये येईल तेवढे लोक वाहिनी एन्जॉय करतात. त्यामुळे विलासराव देशमुखांचं सरकार अडचणीत आलं तेव्हा ‘दिक्कत मे देशमुख’ असा शब्दप्रयोग केला गेला, तर पेप्सी आणि कोकला संसदेत विरोध झाला, तेव्हा ‘संसद मांगे नो मोअर’! अशी किती तरी उदाहरणं देता येतील.

या गिमिक्सचाच आणखी एक प्रकार म्हणजे अत्यंत थोड्या वेळात लोकांच्या प्रतिक्रिया दाखवणं. देशातला कितीही मोठा नेता असला तरी दहा ते वीस सेकंदांतच त्याची प्रतिक्रिया संपली पाहिजे. अडखळत बोलणार्‍या नेत्यांची प्रतिक्रिया नकोच. मध्ये मध्ये थांबत, म्हणजे पॉज घेत बोलणारे नेते फारच फुटेज खातात. त्यांची प्रतिक्रिया अगदी नाइलाज झाला तरच. देशात फारच काही तरी भयंकर घडलं आणि वाजपेयी किंवा सोनिया गांधीच प्रतिक्रिया देत असतील, तर जास्तीत जास्त चाळीस सेकंद. त्याहून अधिक कुणालाच नाही. हा चाळीस सेकंदांचा नियम कुठून आला माहिताय? माणसाची पापणी एकदाही न लवता सलग चाळीसच सेकंद राहू शकते, हा त्या नियमाचा आधार. माणसाला पापणी लवेपर्यंत नवीन दृश्य पाहिजे, नाही तर तो वाहिनी बदलतो, ही या वृत्तवाहिन्यांच्या मनातली भीती असते. या भीतीपोटी वृत्तवाहिन्या कोणत्याही थराला जाताना दिसतात.

लोकांनी वाहिनी बदलू नये आणि वाहिनीपासून पळून जाऊ नये म्हणून चॅनेलवाल्यांच्या नाना लटपटी-खटपटी सतत चालू असतात. त्यामुळे मिसळ झणझणीत होण्यासाठी वरून तर्री ओतावी त्याप्रमाणे प्रत्येक बातमीमध्ये ताजा मसाला घातला जातो. या भानगडीत आपण काय करतोय हेही या वाहिन्या विसरून जातात. क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा ही मुळात लोक आवडीनं पाहतात अशी गोष्ट. आपलं वैशिष्ट्य निर्माण करण्यासाठी एका वाहिनेने स्पर्धेनिमित्त चालणार्‍या सट्टाबाजाराचे आकडे दाखवायला सुरुवात केली. एकाने दाखवले म्हणून इतरही दाखवायला लागले. कोणाचं शतक होईल, कोण किती बळी घेईल, कोण जिंकेल, कोण हरेल, पाऊस किती वाजता पडेल, या वेगवेगळ्या अंदाजांवर लावले गेलेले आकडे सांगायचे. हवामानाचे आकडे सांगावेत तसे रोज न चुकता सांगायचे. आपल्या समाजात सट्टा म्हणजे नावाला बट्टा, असं आजही मानलं जातं. त्यामुळे असे उद्योग जे कोणी करतात, ते चोरीछुपे करतात पण या वाहिन्यांनी हे भान ठेवलं नाही. सट्ट्याच्या खेळात ‘अनपेक्षितपणा’ खच्चून भरलेला असल्याने तिकडे प्रेक्षकांना खेचून नेलं गेलं. वाहिन्यांच्या या उद्योगामुळे सट्टा, सट्टाबाजार, सटोडिये या सार्‍यांना समाजमान्यता नि ग्लॅमर मिळालं. पण वृत्तवाहिन्यांना या पातकाचं सोयरसुतक दिसत नाही.

दृक्श्राव्य माध्यमात परिणामकारकता सर्वाधिक आहे. हे माध्यम ‘दूध का दूध, पानी का पानी’ करू शकतं. तहलका, डोनेशन फी अशी काही प्रकरणं या माध्यमातून आल्याने किती परिणामकारक झाली ते आपल्याला माहीत आहेच. शिवाय ज्या गोष्टी, घटना आपल्याला कालपर्यंत दिसत नव्हत्या त्या या वाहिन्यांमुळे दररोज दिसू लागल्या आहेत. उदा. पूर्वीच्या काळी गुजरातचा भूकंप आणि गुजरातची दंगल या दोन्ही महाभयानक घटना त्रयस्थांच्या नजरेतून ऐकाव्या-वाचाव्या लागल्या असत्या. वृत्तवाहिन्यांमुळे मात्र त्या आपल्याला खूपच तपशिलात पाहायला मिळाल्या. खरोखर कोण भरडलं जातंय हे लोकांना स्वत:च्या डोळ्यांनी पाहता आलं. दोन्ही प्रकरणांत पोलिस-शासन-प्रशासन काय करतंय, काय करत नाहीये हेही पुढे आले. सशक्त लोकशाहीच्या दृष्टीने आणि माहितीच्या दृष्टीने ही बाब अधोरेखित करण्याएवढी महत्त्वाची आहे. अण्णा हजारेसारख्यांनी आंदोलन न करताही लोकांना मिळालेला हा एक प्रकारचा ‘माहितीचा अधिकारच’ आहे. वृत्तवाहिन्या हा अधिकार नागरिकांना अधिकाधिक मिळवून देऊ शकतात; पण त्याऐवजी सनसनाटीपणाच्या आहारी जाण्याचा विकार या वाहिन्यांना बळावलेला दिसतो.

अजब वाटावी अशी वेगळीच ‘शोध पत्रकारिता’ या वाहिन्यांवरून चालू असते. सचिन तेंडुलकरच्या फेरारी गाडीला सरकारने कर माफ केल्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाची छाननी नि चिरफाड करण्याऐवजी वृत्तवाहिन्या ‘सचिन फेरारी गाडी घेऊन घरी परतत आहे’ अशी व्हिज्युअल्स दाखवत होत्या. एका वृत्तवाहिनीची महिला पत्रकार तर सचिनच्या घराच्या दारात दिवसभर ठाण मांडून होती. इकडे दिल्लीच्या स्टुडिओतून (लाइव्ह बरं का!) निवेदक तिला विचारत होता, ‘सचिनने ती लाल रंगाची फेरारी कुठं पार्क केली आहे? नेहमीच्या पार्किंगमध्ये की बाहेर अंगणात, की कुठे गुप्त जागी?’ आता या प्रश्नावर हसावं की रडावं? हीच बातमी वृत्तपत्रांनी किती गंभीरपणे दिली होती ते आठवून पाहा. त्यावरील अग्रलेख आठवून पाहा. बातमीच्या मुळाशी जाण्याची ही धडपड जणू वृत्तवाहिन्यांच्या रक्तातच नाही. माहितीच्या अधिकाराचा आविष्कार करण्याऐवजी निरर्थक माहिती प्रेक्षकांच्या माथी मारून त्यांचं मनोरंजन करण्याकडेच या वाहिन्यांचा कल सध्या तरी दिसतोय.

कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली की नळ सुरू व्हावा तशी बदाबद माहिती आपल्या अंगावर पडायला लागते. तिचं काय करायचं हे बिचार्‍या प्रेक्षकाला आजवर कळलेलं नाही. वर्तमानपत्रामध्ये लेख, अग्रलेख, स्फुटं असा काही मजकूर नक्की असतो, जो वाचकांचा दृष्टिकोन घडवत असतो. इथेही सत्य माहिती, आकडेवारी, आकृत्या, आलेख, नकाशे असं सगळं येतं; पण त्या माहितीवर प्रक्रिया केलेली नसते. त्याला हेतू नसतो पण गती मात्र खूपच असते. मुळात हे काही एका हेतूने दाखवलं गेलं तर माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करतो; पण इथे तर त्याचा पत्ता नसतो. पडद्यावरची आकडेवारी वाचेपर्यंत बदलते आणि पुढचं दृश्य येतं. कारण एकच : प्रेक्षकांच्या डोळ्याची पापणी लवली तर काय घ्या? माहिती समजून घेण्यापेक्षा तुम्ही केवळ ती वाहिनी चालू ठेवून त्यांना टीआरपी मिळवून देणं जास्त महत्त्वाचं नाही का? एखाद्या विषयाचे विविध पैलू, दृष्टिकोन मांडणारे चांगले चर्चात्मक कार्यक्रम आधीपासून होतात. ‘प्रिया तेंडुलकर शो’ हे त्यातलं ठळक आणि चांगलं उदाहरण. पण त्या बाईंच्या आणि कार्यक्रमाच्या कारकिर्दीत तो कार्यक्रम तीन वाहिन्यांवर फिरवावा लागला आणि तीनही वेळा मध्येच बंद केला गेला. कारण काय, तर टीआरपी!

खरं तर वर्तमानपत्राइतकंच देशभरातले चांगले पत्रकार या वृत्तवाहिन्यांतूनही आज काम करत आहेत. त्या बिचार्‍यांची प्रामाणिक तळमळ बघणार्‍याच्या लक्षात येतेही. पण ते बिचारेच ठरतात; कारण वाचन, विचार, व्यासंग, मनन, चिंतन अशा गोष्टींना त्यांच्या आयुष्यामध्ये जागाच उरलेली नाही. सर्व जागा रिमोट कंट्रोल, टीआरपी, व्हिज्युअल्स, बाइट्स, फोनोज अशा भानगडींनी व्यापलेली आहे. वृत्तवाहिनीच्या एका खास प्रतिनिधीने सांगितलेली ही कैफियत वाहिन्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बरंच काही सांगून जाते. तो म्हणतो, “मी जेव्हा एखादी महत्त्वाची बातमी द्यायला कॅमेर्‍यापुढे उभा राहतो तेव्हा माझ्या एका कानात दिल्लीचा इअरफोन असतो, तर दुसर्‍या कानात मुंबईचा. दोन्ही स्टुडिओजमधून सतत सूचना केल्या जातात. बर्‍याचदा त्या परस्परविरोधी असतात. समोरच्या मॉनिटरवर ज्या लेखी सूचना फिरत असतात त्या बर्‍याचदा पुसट असल्यामुळे वाचता येत नाहीत. अशात मी जे काही बोलत असतो ते लाइव्ह चालू असल्यामुळे संपूर्ण देश पाहत असतो. मग या तिघांच्या सूचनांच्या मार्‍यात डोक्यात नीट सलग विचार करून तोंडावाटे योग्य शब्द बाहेर येणं, न अडखळणं, शब्दावर शब्द न चढणं, चेहरा हसरा राहणं, त्या पन्नास सेकंदांत संपूर्ण बातमी सांगितली जाणं, ही सारी कसरत अक्षरश: जीवघेणी असते. छातीचे ठोके आणि नाडी यांची पार वाट लागलेली असते.”

पत्रकारांना खरोखरच दमवणारं हे माध्यम आहे. वर्तमानपत्र चोवीस तासांतून एकदाच निघतं. वर्तमानपत्रांच्या कचेरीत ही काही धावपळ-गडबड असते ती संध्याकाळी सात ते रात्री बारापर्यंत. दिवसाचा वेळ वाचायला, चर्चेला, आल्या-गेलेल्यांना भेटायला, आदल्या दिवशीच्या अंकाचं परीक्षण करायला, उद्याच्या अंकात काय द्यायचं याची निवड करायला देता येतो. इथे वाहिन्यांमध्ये दिवसाचे २४ तास फक्त डेडलाइनच असते. त्यामुळे सतत चवड्यावर उभं राहिल्यासारखी स्थिती. टाचा टेकवायच्याच नाहीत मुळी. अशा सतत चवड्यांवर उभ्या राहिलेल्या माणसाच्या गुडघ्यांचा, मणक्यांचा आणि मन:स्थितीचा क्षणभर विचार करून पाहा म्हणजे या पत्रकारांचं काय होत असेल याची कल्पना येईल. मुंबईत रात्री नऊला बाँबस्फोट झाला तर रात्री दोनपर्यंत लाइव्ह दाखवावं लागतंच. शिवाय वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीसाठी सकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर हजरही राहावं लागतं. मधल्या चार तासांत झोप लागली नाही तर पुढच्या दिवसाची वाट लागते म्हणून झोपेची गोळी घेऊन सकाळी सहाचा गजर लावून झोपणारे पत्रकारही आहेत. याचं मुख्य कारण त्यांची स्पर्धा आहे ती फक्त व्हिज्युअल्सची. वृत्तपत्रातला पत्रकार आपण मिळवायच्या बातमीचं नियोजन करू शकतो, शांतपणे खात्री करून घेऊ शकतो व मन लावून बातमी लिहू शकतो. वाहिनीत ही शक्यता नाही. तिथे प्रेक्षकांना दाखवायला हवी असतात ती दृश्यं.... मुख्यमंत्री दारातून आत जातानाची, पोलिस अधिकारी त्यांना सलाम करतानाची, धडाधड गाड्या येतानाची आणि खडाखड दारं उघडतानाची. ही असली दृश्यं खरं तर बिनकामाची असतात. ती बघून प्रेक्षक काय करणार? पण हा विचार टीआरपीपुढे अगदीच निष्प्रभ ठरतो.

वाहिन्यांच्या गेल्या दोन-चार वर्षांच्या प्रवासावर नजर फिरवली तर वृत्तवाहिन्यांमुळे राजकीय मारामार्‍यांना बराच बढावा मिळालेला दिसतो. सकाळ-संध्याकाळ पक्षोपक्षांमधील भांडणं-मतभेद-साठमार्‍यांचं चित्रण सतत बघायला मिळतं. या बातम्यांमध्ये गॉसिप, रहस्य, उत्सुकता, आक्रमकता, हिंसाचार अशा बाबी खच्चून भरलेल्या असल्याने चॅनेलवाले वाढवून-चढवून या बातम्या दाखवत असतात. त्यामुळे टीआरपी मिळण्याची शक्यताही वाढत असते. भारतातल्या राजकारणात गेल्या दशकभरात जी अस्वस्थता आणि अस्थिरता आहे त्याचाही फायदा या वाहिन्यांनी करून घेतलेला दिसतो. त्याच वेळेस राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही वाहिन्यांच्या पाठीवर बसून प्रसिद्ध मिळवण्याचं तंत्र आत्मसात केलेलं दिसतं. आपण कितीही बोललो तरी आपला चेहरा दहाच सेकंद झळकणार आहे, हे अनुभवाने लक्षात आल्यानंतर आपलं म्हणणं तेवढ्यात बसवण्याची कला काही नेते शिकले; तर लालूप्रसादांसारख्या नेत्यांनी आपल्या रांगडेपणाचा तोटा होऊ न देता त्याच्याच बळावर पाहिजे तेवढ्या बाइट्स मिळवायचं तंत्र अवलंबलं. प्रेक्षकांना विनोदाचं आकर्षण असतं आणि दोन क्षण हसवणूक झाली तर हवीच असते, हे लक्षात घेऊन लालूजींसारखे लोक त्याचा भरपूर फायदा घेताना दिसत आहेत. वृत्तवाहिन्यांनाही असे लोक हवे असल्यामुळे, सभ्य-सौम्य-विचारी आणि मर्यादशील वर्तन असणारी नटवरसिंग, शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, कुशाभाऊ ठाकरे, इंद्रकुमार गुजराल, पीएम सईद अशी ज्येष्ठ नेतेमंडळी वाहिन्यांवर फारशी कुठे दिसत नाहीत. हे लोक आपलं मत टीव्हीवर मांडण्याबाबत जवळपास ‘मिसफिट’ आहेत, असंच वाहिन्यांचं जणू म्हणणं असतं. वाहिन्यांच्या या भूमिकेमुळे भारताच्या राजकारणावर निश्चितपणे काहीएक परिणाम झाला आहे. होत आहे.

देशातल्या बहुसंख्य राजकारण्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी प्रतिमाही वृत्तवाहिन्यांमुळे निर्माण होत आहे. लालूप्रसाद, मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी यांसारखे किती तरी प्रादेशिक नेते केवळ या माध्यमामुळे देशभर परिचित झाले. इथे नोंदवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे या वृत्तवाहिन्यांचा उदय आणि प्रादेशिक नेतृत्वांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचा काळ हा साधारणपणे एकच आहे. प्रमोद महाजन, सीताराम येच्युरी, जयपाल रेड्डी, येरन नायडू, अमरसिंग असे अनेक नेते त्यांच्या पक्षांनी टेलिव्हिजनवर रोज प्रतिक्रिया आणि मुलाखती देण्यासाठीच ठेवलेले आहेत. काही दिवसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष-चिटणिसांबरोबरच पक्षाचा टीव्हीसाठीचा चेहरा, असं एक स्वतंत्र पदही तयार झालं तर आश्चर्य वाटायला नको. या पदासाठी पक्षांतर्गत निवडणूक घ्यायची झाल्यास सिनेमासारखी स्क्रीन टेस्टच घ्यावी लागेल आणि डोळ्याची पापणी लवायच्या आत तो नेता किती वाक्यं बोलतो यावर त्याचा विजय निश्चित होईल. कपिल सिब्बल, अरुण जेटली, मणिशंकर अय्यर यासारखी मंडळीही टेलिव्हिजनवर अस्खलित बोलण्याच्या बळावरच राजकारणात प्रभावी झाली आणि राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवू शकली. एखाद्या व्यक्तीला तिच्या पात्रतेपेक्षा किंवा सामाजिक-राजकीय वजनापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवून देण्याचा उद्योग या वाहिन्या रोज करताना दिसतात. दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत प्रवीण तोगडिया हे नाव अहमदाबादच्या बस स्टँडवर कोणाला विचारलं असतं तरी त्यांच्याबद्दल कुणी सांगू शकलं नसतं; पण टीव्हीवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये आक्रमकपणे बोलू शकण्याच्या क्षमतेमुळे आज हा माणूस देशभर माहिती झाला आहे. प्रत्येक गावात त्याचं बोलणं ऐकायला गर्दी होते. गुजरातच्या दंगलीनंतर ‘एनडीटीव्ही’वर एकतर्फी बातम्यांचे आरोप झाले. ही वाहिनी हिंदूविरोधी आहे अशी टीका झाली. राजदीप सरदेसाईंच्या गाडीवर हल्ला झाला. त्या काळात हिंदूंची बाजू कोणी तरी खणखणीतपणे मांडणारा त्यांना हवा होता. आम्ही समतोल पत्रकारिता करतो हे सिद्ध करणं चॅनेलच्या दृष्टीने गरजेचं होतं. प्रवीण तोगडियांसारख्या लोकांना या परिस्थितीचा फायदा झाला. आधी एनडीटीव्ही आणि नंतर इतर वाहिन्या त्यांचं तर्कसंगत आणि आक्रमक बोलणं दाखवत राहिल्या.
कदाचित चॅनेलवाल्यांची ती गरजही होती. हिंदी सिनेमात जशी डायलॉगबाजी असते तशी डायलॉगबाजी करणारी, आगखाऊ बोलणारी माणसं चॅनेल्सना हवी असू शकतात. वाहिन्यांना काय हवंय हे समजून घेऊन अशी माणसं अधिकाधिक बांधेसूद, आक्रमक बोलू शकतात आणि प्रसिद्धी मिळवू शकतात हे तोगडियांनी दाखवून दिलं आहे. चॅनेलवाल्यांनीही त्यांना आपला वापर करून घेऊ दिला आहे.

भारतातली लोकशाही राजकारणकेंद्रित आहे, असं म्हटलं जातं. त्याला आपल्या वृत्तवाहिन्या खतपाणीच घालताना दिसतात. खरं तर त्यामध्ये लोकांचा दृष्टिकोन समृद्ध करण्याची, त्यांना विचारप्रवृत्त करण्याची खूप क्षमता आहे; परंतु राजकीय बातम्यांना अव्वल स्थान देऊन लोकांचं मनोरंजन करण्याकडे त्यांचा ओढा आजवर तरी दिसतो आहे. परंतु आता चॅनेल्समधील काही महत्त्वाच्या लोकांमध्ये याबाबत पुनर्विचार सुरू झालेला दिसतो. प्रणय रॉय, रवीना राज कोहली, लक्ष्मी गोयल, अरुण पुरी अशा मंडळींच्या मुलाखतींतून त्यांना राजकारण कमी दाखवावं असं मनापासून वाटत असल्याचं पुढे येऊ लागलंय. त्यामुळे विधायक बातम्या देण्याचा हेतूही काही वाहिन्यांमध्ये दिसू लागला आहे. स्टार न्यूजच्या प्रमुख रवीना राज कोहली यांनी देशाच्या अनेक भागांत जाऊन सर्वेक्षण केलं आणि वडोदर्‍याच्या वकिलांना, वाराणसीच्या विद्यार्थ्यांना, चेन्नईच्या व्यापार्‍यांना काय पाहायला आवडेल याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेतला. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांत एक गोष्ट स्पष्टपणे पुढे आली : लोकांना त्यांच्या जगण्याशी निगडित बातम्या बघण्यातच रस आहे. पक्षांच्या आत चाललेल्या गटबाज्या आणि पक्षोपपक्षांमधल्या मारामार्‍यांचा आमच्याशी काय संबंध, असा प्रश्न या लोकांनी थेटपणाने विचारला. याचा अर्थ पत्रकारितेच्या भाषेत ज्याला विधायक बातम्या म्हणतात त्या मोठ्या प्रमाणावर देण्याची गरज आहे, हे पुढे आलं. याचा स्टार न्यूजने विचार करून रोज एका सामाजिक प्रश्नावर दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या दाखवायला सुरुवात केली आहे. त्यात काही रिपोर्टही असतात. स्टारची संपूर्ण भारतात २४ कार्यालयं आहेत. या सर्व ठिकाणचे पत्रकार मिळून प्रत्येक आठवड्याचे विषय निश्चित करतात आणि प्रत्येकजण आपापल्या भागातून बातम्या गोळा करतात. वैद्यकीय क्षेत्रातला हलगर्जीपणा, पिण्याचं पाणी, दुष्काळ, महिलांवरील अत्याचार, अशा विषयांचा पाठपुरावा केला जातो. ‘आजतक’नेही लोकांचे नागरी सुविधांचे प्रश्न आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडी यांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. एनडीटीव्हीने अलीकडेच उच्च शिक्षणात चालू असलेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मोठ्या शिताफीन चव्हाट्यावर आणलं. रिअ‍ॅलिटी बाइट्ससारखे कार्यक्रम म्हणजे विधायक बातम्यांचाच एक भाग होता. पण अडचण अशी असते, की या कार्यक्रमांना चांगला प्रेक्षक मिळू शकत नाही. कारण हे कार्यक्रम ‘प्राइम टाइम’मध्ये- संध्याकाळच्या वेळात जेव्हा सर्वाधिक प्रेक्षक टीव्हीपुढे बसतो तेव्हा-दाखवता येत नाहीत. कारण टीआरपीच्या स्पर्धेत हे कार्यक्रम टिकत नाहीत. या कार्यक्रमांत लोकांच्या जगण्याचे खरेखुरे प्रश्न असतात, पण सनसनाटी नसते. सनसनाटी असते ती राजकारण्यांच्या बातम्यांत. मग असे विधायक कार्यक्रम दुपारच्या वेळात, म्हणजे ‘नॉन-प्राइम टाइम’मध्ये दाखवावे लागतात. पण अशा वेळेला या वाहिन्या पाहिल्याच जात नाहीत. या ‘कॅच’मुळे एक गंमत घडत आहे. सामाजिक पत्रकारितेचा वसा या वाहिन्यांनी घेतला तर त्यांना प्रेक्षक मिळत नाहीत, आणि वसा अर्ध्यात टाकला तर पुण्य पदरात पडत नाही. शिवाय राजकारण्यांच्या बातम्यांचा अतिरेक होतोय, हा शिक्का कपाळी राहतो तो राहतोच.

राजकीय मारामार्‍यांशिवाय घटनांना आपल्या वाहिनीमध्ये स्थान असावं, असा प्रयत्न वाहिनीतले लोक करू लागलेले आहेत आणि सामाजिक-सांस्कृतिक आणि जीवनातल्या अन्य क्षेत्रांतल्या घटनांना स्पर्श करू लागले आहेत, ही गोष्ट खरी असली, तरी इतर विषयसुद्धा या वाहिन्या लोकांपर्यंत कसे पोहोचवतात हे मोठं पाहण्यासारखं आहे. अगदी अलीकडचं नाशिकच्या कुंभमेळ्याचं उदाहरण घेण्यासारखं आहे. शेकडो वर्षं हा कुंभमेळा होत आहे, परंतु वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने हा पहिलाच कुंभमेळा आहे. त्यामुळे बातम्यांमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही ना काही कव्हरेज सतत दिलं गेलं. जवळपास प्रत्येक वृत्तवाहिनीने कुंभमेळ्यावर दररोज काही ना काही कार्यक्रम सादर केले. खरं पाहता कुंभमेळा हा परंपरेने चालत आलेला धार्मिक सोहळा आहे. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे लोकच सहभागी होत आले आहेत. तो प्रामुख्याने साधु-संन्याशांचा सोहळा आहे. अगदी नाशिकचे स्थानिक नागरिकही कुंभमेळ्याच्या ऐन पर्वण्यांमध्ये तिकडे फिरकत नाहीत. परंतु वृत्तवाहिन्यांनी कुंभमेळा अशा पद्धतीने सादर केला की जणू हा तमाम भारतीयांचा सोहळा आहे. हा दृष्टिकोन ठेवून मुद्दामहून कुंभमेळ्याचं सादरीकरण केलेलं होतं की रोजच्या बातम्यांमधून ते आपोआप घडत गेलं, हे कळण्याचा काही मार्ग नाही. परंतु सोहळे, उत्सव, स्पर्धा या अशाच पद्धतीने ‘सेलिब्रेट’ करण्याची एक पद्धत वृत्तवाहिन्यांनी स्वीकारलेली दिसते. कदाचित २४ तास काही ना काही दाखवावं लागत असल्यामुळे एकाच घटनेचे पाच-पंचवीस कंगोरे शोधण्याची वृत्तवाहिन्यांना गरज वाटत असणार, आणि त्यामुळे कोणतीही घटना, कोणताही सोहळा, कोणताही उत्सव हा ओढून-ताणून वृत्तवाहिन्या ‘साजरा’ करताना दिसतात.

घडणारी प्रत्येक घटना सेलिब्रेट करायची, अशी भूमिका एकदा अंगी भिनवली की तारतम्य नावाची गोष्ट हातातून कशी सुटते, याचं हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्या हे उत्तम उदाहरण आहे. या भूमिकेमुळे देशावर दूरगामी परिणाम करू शकणार्‍या गंभीर राजकीय घटनाही सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला जातो, ही त्यातली धोकादायक गोष्ट आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष मुशर्रफ भारतात पंतप्रधानांसोबत चर्चा करण्यासाठी जेव्हा आग्य्राला आले होते, तेव्हा वृत्तवाहिन्यांच्या या सेलिब्रेट करण्याच्या भूमिकेचा फटका आपल्याला सर्वप्रथम बसला होता. भारतभेटीत मुशर्रफ यांच्यावर वृत्तवाहिन्यांनी एवढा फोकस ठेवला होता की त्या काळात तेच हीरो बनले होते. मुशर्रफ यांनी लष्करी गणवेशाऐवजी शेरवानी कशी घातली आहे, त्यांच्या हसण्याचालण्यातून- देहबोलीतून काय व्यक्त होत आहे, त्यांच्या पत्नी सेहबा बेगम कशा आहेत, या दोघांची राहण्याची व्यवस्था केलेलं पंचतारांकित हॉटेल कसं आहे, तिथे खाण्यापिण्याची कशी चंगळ आहे, ते राहत आहेत तो सूट कसा आहे, तिथून ताजमहाल कसा दिसतो याच्या बातम्या दाखवण्याचा अगदी कळस गाठला गेला होता. मुशर्रफ यांची नेहरवाली हवेलीची भेट आणि नंतर रद्द झालेला अजमेरचा दौरा याबाबतही अशीच अवास्तव उत्सुकता तयार केली गेली. या सार्‍या भानगडीमुळे मुशर्रफ हे कुणी थोर आंतरराष्ट्रीय नेते किंवा मसीहा आहेत आणि भारतात येऊन काश्मीरप्रश्नावर उपाय काढून भारतावर जणू उपकार करणार आहेत, अशीच भावना दुर्दैवाने प्रेक्षकांची बनत होती. त्या आग्राभेटीत भारतातल्या टीव्ही मीडियाने मुशर्रफ यांना ज्या पद्धतीने स्वत:चा वापर करू दिला, त्यावरून आपली माध्यमं टीआरपी मिळविण्यासाठी आणि २४ तास चॅनेल चालविण्याचा हट्ट भागविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे कळलं. जे मुशर्रफभेटीचं तेच दिल्ली-लाहोर बसयात्रेचं. अशी बससेवा सुरू होणं ही महत्त्वाची घटना असली तरी तिचं ज्या पद्धतीनं गौरवीकरण आणि उदात्तीकरण चॅनेलवाल्यांनी केलं त्यातून या बससेवेबद्दल अवास्तव अपेक्षा निर्माण झाल्या. या बससेवेमुळे भारत-पाकिस्तानमधील ताण जणू संपून जाणार आहे, अशा पद्धतीने ही बातमी चार दिवस रंगवली गेली. कारगिलचं युद्ध वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने दाखवलं, त्यातून आपण जणू डब्ल्यूडब्ल्यूएफची मॅच दाखवत आहोत, असा त्यांचा आविर्भाव होता. या आविर्भावामुळे कारगिलच्या युद्धाला वन-डे मॅचचं स्वरुप आलं. आणि आज काय घडलं, उद्या काय घडणार एवढीच निर्दयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातून राष्ट्रप्रेमाचे भलभलते उमाळे देशभर पिकले; परंतु ‘युद्ध नको’ ही भूमिका काही ते प्रेक्षकांच्या मनात निर्माण करू शकले नाहीत. याचं कारण साधं होतं. वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने युद्ध हा सेलिब्रेट करण्याचा एक मोठा इव्हेन्ट होता. त्यात माणसं कितीही मरोत, नुकसान कितीही होवो, अर्थव्यवस्था कितीही खड्ड्यात जावो; याबद्दल त्यांना जणू काहीही देणंघेणं नव्हतं. घटनांकडे पाहण्याची ही उथळ, बेफिकीर आणि बाजारू वृत्ती दररोज वृत्तवाहिन्यांमधून आपल्याला दिसते आहे.

वृत्तवाहिन्यांकडे ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट’ या पद्धतीने बघायचं झाल्यास त्यांची काळी बाजू अगदीच ठळकपणे दिसते. मात्र याचा अर्थ वृत्तवाहिन्या ही काही समाजाला खड्ड्यात घालणारी घटना आहे असं मात्र नाही. या माध्यमात अफाट शक्ती आहे. सजग पत्रकारिता करून लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तवाहिन्या भक्कम करू शकतात. सर्व प्रकारच्या सत्ताधीशांना उत्तरदायी बनवू शकतात. सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करून पारदर्शकता आणू शकतात. जिथे विकासाचा-प्रगतीचा सूर्य पोहोचतच नाही ते जग दाखवू शकतात. आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकणारे चांगले प्रयोग- चांगले उपक्रम- त्यामागे धडपडणारी माणसं समाजासमोर आणू शकतात. नव्या जगातील नव्या शक्यता-संधी यांची जाण करून देऊ शकतात. आपली समज अधिक भक्कम करू शकतात... करण्यासारखं खूप काही आहे. आपल्या वाहिन्यांवर तुकड्यातुकड्याने काही गोष्टी केल्याही जात आहेत, परंतु त्यातून अजून हाताशी ठोस लागत नाही. कदाचित या प्रयत्नांमागे जी ऊर्जा उभी करायला हवी ती उभी राहत नसेल. कदाचित ज्या नव्या मध्यमवर्गाकडे पाहून हे माध्यम चालवलं जातं त्याच्या बदललेल्या जीवनमूल्यांमुळे वाहिन्यांचं स्वरूप असं बनत असेल. वृत्तवाहिन्यांमध्ये खरं पाहता मध्यमवर्गीयांच्या दृष्टिकोनाला झोंबणार्‍या अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या ‘न पाहण्याकडे’ या वर्गाचा कल दिसतो. सामाजिक हिताचे कार्यक्रम हा वर्ग पाहत नाही. परिणामी, ‘टीआरपी’चा प्रश्न तयार होतो. वाहिन्यांमध्ये पैसा गुंतवणार्‍यांना तर पैसा दामदुप्पट करून हवा असतो. इथे गोची सुरू होते... आणि वाहिन्या टीआरपी मिळवण्यासाठी कंबरेचं सोडून डोक्याला बांधायच्या तयारीला लागतात... एका प्रभावशाली माध्यमाचा भलताच प्रभाव पडू लागतो.

त्यामुळेच आपल्या वृत्तवाहिन्या पुरेशी विधायक भूमिका पार पाडू शकत नाहीत. सुरुवातीला म्हटल्यानुसार मसाला हिंदी चित्रपटांप्रमाणे त्या रंजनाचं काम करू लागतात, सर्व क्षेत्रांतील ग्लॅमरवर गुजराण करून दुकान चालवू लागतात....
...किमान आजचं चित्र तरी असंच आहे.

(महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी २००२)

घुसळण कट्टा