'युनिक फीचर्स' चे निवडक लेख

मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात युनिक फीचर्सने 1991 मध्ये प्रवेश केला. पुण्या-मुंबईच्या मोठ्या दैनिकांपासून विविध साप्ताहिक, मासिकांमध्ये आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये युनिक फीचर्सच्या पत्रकारांच्या टीमने लिहिलेले लेख प्रसिद्ध झाले. त्या त्या काळात महत्त्वाच्या वाटणा-या विषयांचा शोध घेऊन दुर्लक्षित मुद्दे पुढे आणण्याचं काम या लेखांनी केलं. लोकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलून लिहिल्या गेलेल्या शोधलेखांनी युनिक फीचर्सची स्वतंत्र अशी ओळ्ख निर्माण केली.
या लेखांचा संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. गेल्या वीस वर्षांतील काही निवडक लेख वाचकांसाठी आगाऊ उपलब्ध करून देत आहोत.

पुन्हा (महिलांना) मंदिरप्रवेश

प्रार्थनास्थळांत प्रवेश मिळणं हा खरंतर प्रत्येक माणसाचा हक्क. पण स्त्रियांच्याबाबत या सांस्कृतिक हक्कावर अगदी आज;एकविसाव्या शतकातही गदा येताना दिसतेय. महाराष्ट्रात आजही अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. ही प्रथा घटनाविरोधी तर आहेच, परंतु स्त्रियांच्या सन्मानाशी आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातील अशा मंदिरांचा शोध घेऊन लिहिलेला लेख.
(महाराष्ट्र टाइम्स - ३ सप्टेंबर १९९५)

सांस्कृतिक राजधानीचं गौडबंगाल

पुण्याला भव्य इतिहास आहे आणि या प्रदीर्घ इतिहासामुळे पुण्याकडे महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व आलेलं होतं. त्यातून ‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे’ असं म्हणण्याची चाल पडली. परंतु आजचं पुणं सांस्कृतिक राजधानी तर सोडाच, ‘सुसंस्कृत’ तरी आहे का, असा प्रश्न पडतो. आठ-दहा ज्येष्ठांशी, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक वगैरे क्षेत्रांतील अभ्यासकांशी बोलल्यानंतर एवढे मुद्दे पुढे आले की त्यातून पुण्याच्या सांस्कृतिक नेतृत्वाचा विस्कटलेला चेहरा दिसू लागला. आम्ही मिळवलेली माहिती, पुण्याच्या बदलत्या संस्कृतीची शेकडो उदाहरणं आणि अभ्यासकांची निरीक्षणं एकत्र गुंफून एक विस्तृत लेख आम्ही लिहिला. ‘साप्ताहिक सकाळ’च्या २००६च्या दिवाळी अंकात हा लेख आला होता.

टीआरपी के लिए कुछ भी करेगा!

घडणार्‍या घटना-घडामोडी क्षणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार्‍या या यंत्रणा कशा चालतात शिवाय स्पर्धेपायी बातम्यांना मनोरंजनाचा तडका कसा दिला जातो आहे याचा फर्स्टहँड रिपोर्ट देणारा हा लेख. वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, संपादक, निर्माते यांची होणारी घालमेल आणि त्यांच्यावर बाजाराचा असलेला दाब या लेखातून पुढे आला. सामाजिक प्रश्न उपस्थित करण्याची आणि या प्रश्नांवर उत्तरं शोधणार्‍या प्रयत्नांना लोकांसमोर आणण्याची मोठी ताकद या माध्यमात आहे, परंतु दुर्दैवाने ही बाब त्यांच्या अजेंड्यावर दिसत नाही.
(‘महाराष्ट्र टाइम्स’ दिवाळी अंक, २००२)

मार्क्स ते माफिया

मुंबईच्या कामगार चळवळीने एके काळी देशाच्या कामगार चळवळीला दिशा आणि शक्ती दिली होती. मात्र, कामगारांना आर्थिक-सांस्कृतिक-राजकीय प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या या चळवळीला युनियनबाजी आणि त्यातून आलेली राडेबाजी याने कसं पुरतं ग्रहण लागलं आहे, याचा वेध या शोधलेखात घेतला होता. अनेक संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांना भेटून आणि शेकडो घटनांचे धागे जुळवून हा शोधलेख वाचकांपुढे आला होता. त्याचं शीर्षक स्फोटक आणि तरीही समर्पक असल्याने या लेखाने मुंबईतल्या कामगार जगताचं लक्ष वेधून घेतलं होतं.
(‘लोकसत्ता’ दिवाळी १९९७)

महाराष्ट्रात काँग्रेस टिकून आहे ती का?

१९९०च्या आसपासचा काळ राजकीय धामधुमीचा होता. एकीकडे मंडल आयोगाचं वादळ घोंघावत होतं आणि दुसरीकडे बाबरी-राममंदिराचा वाद पेटला होता. या दोन्ही वादांच्या कैचीत काँग्रेस पक्ष सापडला होता आणि जिथे तिथे पराभूतही होत होता. दिल्लीतही हातून सत्ता जाण्याची नौबत पक्षाला अनुभवावी लागली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र काँग्रेस कशी का असेना, टिकून होती. राष्ट्रीय चित्र एक असताना महाराष्ट्र त्याला अपवाद का, असा प्रश्‍न तेव्हा चर्चेत येत असे. आम्ही या प्रश्‍नाचा शोध घ्यायचं ठरवलं. ‘काँग्रेस टिकून आहे ती का’ याचा शोध घेत गेलो. राजधानी मुंबईत तर कानोसा घेतलाच पण विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात गेलो. शिवाय प्रत्येक विभागातील एका जिल्ह्याच्या राजकारणाचा केस स्टडी केला, स्थानिक, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय नेत्या-कार्यकर्त्यांशी बोललो आणि महाराष्ट्रात काँग्रेस टिकून असण्यामागील कारणांची ठोस कारणमीमांसा केली.
‘लोकसत्ता’ने हा भला मोठा लेख ‘लोकसत्ता दिवाळी १९९३’ अंकात जसाच्या तसा छापला.

पोलिस कोणाचे?

पोलिसांची सार्वजनिक प्रतिमा ‘ते भ्रष्ट असतात, कामचुकार असतात, हडेलहप्पी असतात’ अशी असते. ते दुबळ्याच्या आणि पीडिताच्या बाजूने उभे राहतील अशी खात्रीही लोकांना वाटत नाही. एकुणात, लोकांना त्यांच्याबद्दल खात्री, विश्वास आणि आपुलकी वाटत नाही.
ज्यांच्या संरक्षणार्थ आपण तैनात आहोत त्यांनाच आपल्याबद्दल संशय आहे, ही भावना पोलिसांचं नीतिधैर्य (मोराल) खराब करणारी असणार. त्यामुळे लोकांचं पोलिसांबद्दलचं हे मत एका बाजूला ठेवून पोलिस स्वत:कडे कसं पाहतात, स्वत:च्या कामाकडे कसं बघतात, त्यांची नोकरी-संसार-कामाच्या वेळा-पगार पाणी-सांसारिक अडचणी-आजारपणं-मानसिक ताण वगैरेंकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
हा लेख १९९८ मध्ये ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकात आला होता.

ठाकरे लोकप्रिय का आहेत?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नुकतच निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर पाहून ठाकरे एवढे लोकप्रिय का असा प्रश्न अनेकांच्या मनात पुन्हा एकदा उमटला. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे शिवसेना सत्तेवर येण्याच्या वर्षभरआधी १९९५ साली युनिक फीचर्सने नेमक्या याच प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न एका सर्वेक्षणाद्वारे केला होता. या लेखाचं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेची अवस्था काय होईल याविषयीही यात मतं व्यक्तं झाली होती. युनिक फीचर्सच्या वाचकांसाठी हा लेख आम्ही पुन्हा प्रकाशित करतोय.

खुदाने आज तक कौमकी हालत नहीं बदली

१९९९ व २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकही मुस्लिम खासदार निवडून गेलेला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेतही केवळ १२ मुस्लिम आमदार आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत जवळपास १३ टक्के असलेला मुस्लिम समाज आपलं ठळक अस्तित्व उमटवू शकत नाही? याचं कारण समाजाच्या वाट्याला आलेला चिंचोळा अवकाश आणि या समाजाची झालेली आर्थिक-सामाजिक कोंडी. या कोंडीला समजावून घेण्याचा हा प्रयत्न...

सुवर्ण त्रिकोणाचा चौथा कोन

मुंबई-पुणे-नाशिक या तीन शहरांचा उल्लेख ‘गोल्डन ट्रँगल’ म्हणजे ‘सुवर्ण त्रिकोण’ असा केला जातो. विकासाच्या, प्रगतीच्या शक्यता या तीन शहरांमध्ये आहेत असं मानलं जातं. या तीन शहरांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत जोरदार प्रगती करून ती शक्यता प्रत्यक्षातही आणून दाखवली आहे.
आज तारखेला या शहरांमध्ये सुखा-समाधानाने, मौज-मजेने जगण्यासाठी सर्व काही आहे. पण गंमत अशी आहे, की या शहरांपासून तासाभराच्या अंतरावर शहरांतील झगमगाटाचा अंशही पोहोचलेला नाही.
खोटं वाटतं?... मग वाचा हा लेख.

नदी शहरात येते तेव्हा..

काठोकाठ पाण्याने भरलेली नदी पाहिली की पाहणा-याच्या चित्तवृत्ती उल्हसित होऊन जातात.
पण हल्ली नदी ही संस्थाच धोक्यात आलेली दिसतेय. धरणांमुळे नद्या अडवल्या जातात नि त्यामुळे
पुढे त्यांची पात्रं कोरडी पडतात. दुसरीकडे शहरी सांडपाण्याने नद्यांचं भीषण वेगाने प्रदूषण होतंय.
त्यातून नद्या मृत्युमुखी पडताहेत...
जीवनदायिनी नद्यांचा गळा शहरं कसा घोटत आहेत हे पाहायचं असेल तर पुण्यातील मुठा नदीपेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कुठलं नसेल.
मुठा नदीसोबत दहा-बारा मैलांची भटकंती करून तज्ज्ञांच्या मदतीने रेखाटलेलं चित्र.

घुसळण कट्टा