प्रतिक्रिया

जसे या संकेतस्थळावरील लेखनावर आपण प्रतिक्रिया देता तसेच इथे या संकेतस्थळाबद्दल प्रतिक्रिया देऊ शकता.

Comments

प्रिय संपादक, अनुभव आणि आयोजक, ई साहित्य संमेलन,

युनिक फीचर्सतर्फे चालवले जाणारे ई-साहित्य संमेलन हे मराठी साहित्य जगतातले एक अतिशय महत्वाचे आणि क्रांतिकारी पाऊल ठरले आहे; आणि काही काळ त्याच्या नियोजनात सामील असल्याचा मला अभिमान आहे. रत्नाकर मतकरी, ग्रेस, महानोर आणि नेमाडे यांच्यासारखे अतिशय ज्येष्ठ आणि साहित्यिक कर्तृत्वाने आदरणीय साहित्यिक या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष झालेले आहेत. यांच्यात एक समान गोष्ट म्हणजे हे कुणीच साहित्यिक अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, खरे तर काहीसे फटकूनच राहणारे आहेत. अर्थात यांच्या साहित्यिक योग्यतेबद्दल आणि योगदानाबद्दल चर्चादेखील संभवत नाही, इतके ते ठळक आणि भरीव आहे. पैकी तिघांना साहित्य अकादमी पुरस्काराने तर रा रा नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवले आहे. बाकी साहित्यिक मानसन्मान आणि पुरस्कारांची तर गणतीच करता येणार नाही. कविता, कादंबरी, नाटक अशा अतिशय महत्वाच्या साहित्यप्रकारात त्यांनी अचाट कामगिरी केली आहे. अशा महान साहित्यिकांना अध्यक्ष करणे हे अशा संमेलनाचे यश मानता येईल, एका अर्थाने प्रयोजनही मानता येणे अशक्य नाही!

या पार्श्वभूमीवर नेमाडे यांच्यानंतर यंदाच्या संमेलनासाठी अनिल अवचट यांचे नाव बघून आश्चर्य वाटले. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, बाबा अवचट या माणसाविषयी मला अपार आदर, मैत्रभाव आणि आत्मीयता आहे. त्याचे एकूण सामाजिक काम आणि व्यक्तिमत्व आदरणीयच आहे. शिवाय बाबा एक माणूस म्हणून देखील लोभस आहे. पण मला वाटते ग्रेस, मतकरी, महानोर आणि नेमाडे यांच्या रांगेत बसायला इतर अधिक कर्तृत्ववान साहित्यिक आहेत. एक माणूस आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबा निर्विवादपणे श्रेष्ठ असला तरी साहित्यिक कर्तृत्वात रंगनाथ पठारे, भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया, राजन गवस, राजन खान, सानिया, कविता महाजन, मेघना पेठे, आशा बगे, जयंत पवार वगैरे अनेक साहित्यिक या पदासाठी अधिक योग्य ठरले असते.

पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो, की बाबा अवचट याच्या लोभस व्यक्तिमत्वाविषयी, सामाजिक भानाविषयी आणि लोकप्रियतेविषयी संशय घेण्यास जागा नाही. त्याबाबत वाद संभवत नाही. आपण सगळेच प्रेम करतो बाबावर. पण साहित्यिक कर्तृत्वात, विशेषत: अभिजात मराठी साहित्य विश्वावर ठसा उमटवणे, साहित्याला काही एक दिशा देणे या बाबतीत उदाहरणार्थ रंगनाथ पठारे यांच्यासारखे लेखक जास्त योग्य ठरले असते. आणि पार्श्वभूमी नेमाडे यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या श्रेष्ठ लेखकाची असताना हे जरा जास्तच जाणवले.

रिपोर्ताज हा दाखलपात्र साहित्यप्रकार मानला तरी अलिकडचे बाबाचे लेखन तितकेसे समाधानकारक नाही. वेध, छेद, पूर्णिया, गर्द वगैरे बाबाची पुस्तके सुरेख होती. त्यामानाने अलिकडचे दिवाळी अंकीय लेखन त्या उंचीचे नाही. मुख्य म्हणजे नेमाडे, पठारे, बोकील, जयंत पवार, गवस, सानिया वगैरे लेखकांचे लेखन ज्या खोलीचे आहे, त्याची तुलना संभवत नाही. केवळ पाचव्या वर्षीच या ई-साहित्य संमेलनाने लोकप्रियता हा एकमेव निकष महत्वाचा मानायला सुरवात करावी असे मला वाटत नाही.

असो. संमेलनास मन:पूर्वक शुभेच्छा! निदान आपला बाबा या महत्वाच्या संमेलनाचा अध्यक्ष झाल्याने त्याच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा मिळून एकूण वाचनसंस्कृतीत मात्र घसघशीत वाढ व्हावी अशी अपेक्षा ठेवता येईल. बाबाने या वर्षात या माध्यमातून त्या दिशेने जोमदार कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संमेलनाला आणि बाबा अवचटला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.

सस्नेह,

- संजय भास्कर जोशी

नुकतीच आनंदवन आणि हेमलकसा येथे भेट देण्याचा प्रसंग आला. येतांना "प्रकाशवाटा" आणि "आनंदवन प्रयोगवन " हि समकालीन ची दोन पुस्तके आणली आणि लगोलाग वाचली. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम सुरु आहे. आपल्या सारख्या लोकांनी ते समाजासमोर आणलं. आमची दृष्टी अधिक व्यापक केल्याबद्दल आभार. यापुढेही आपल्याकडून खूप चांगलं वाचायला मिळेलच