मुंबईचा प्रश्न

मुंबईच्या प्रश्नावर उत्तर काय?

गेल्या काही महिन्यांत मुंबईत ‘मूळचे’ विरूद्ध ‘बाहेरचे’ असं भांडण लावण्याचा प्रयत्न चालला आहे. या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ‘अनुभव’च्या मार्च २००८ च्या अंकात निळू दामले यांच्याकडून आम्ही एक लेख लिहून घेतला होता. जगातल्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलेल्या आणि एकूणात शहरांच्या विकासाचा अभ्यास असलेल्या निळू दामले यांनी ‘मुंबईचा खरा प्रश्न काय?’ या अनुषंगाने आपलं मत त्या लेखात मांडलं होतं. मुंबईसारखं शहर सुसह्य बनवायचं तर काय करायला हवं, याविषयीही त्यांनी काही उपाय त्या लेखात सुचवले होते. मुंबईसारख्या शहरामध्ये माणसांची आवक-जावक चालूच राहणार आहे व तीच मुंबईच्या विकासाची खूण असणार आहे, त्यामुळेच मुंबईसाठी पायाभूत सुविधांचा गंभीरपणे विचार करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे, मुंबईत बाहेरून येणारे लोंढे थांबावेत, यासाठी देशातील मागास भागांचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, असंही त्यांनी म्हटलं होतं. जगातल्या इतर महाशहरांनी लोंढ्यांचा आणि अव्यवस्थेचा प्रश्न जसा सोडवला तसा मुंबईतही सोडवता येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं.

या लेखावर चर्चा व्हावी आणि अशा चर्चेसाठी ‘अनुभव’ने व्यासपीठ म्हणून भूमिका बजावावी, असा विचार आम्ही केला आणि ‘वाचक चर्चा’ जाहीर केली. शहराच्या नियोजनासंदर्भात अभ्यास करणा काही मंडळींनीही या वाचकचर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहन आम्ही त्यांना केलं. त्यातील बहुतेकांनी या चर्चेचं स्वागत करून आपला सहभाग दिला आहे. या अभ्यासक मंडळींची टिपणं वाचकांना याविषयावर विचार करण्यास उद्युक्त करतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. सर्वच लेखकांचं म्हणणं सर्वांना पटणारं नसेल, हे उघड आहे. मात्र मुंबई व मुंबईसार‘या महाशहरांच्या प्रश्नाकडे कसं पाहावं लागेल, आणि ही शहरं सुसह्य करण्यासाठी काय करावं लागेल, याची दिशा स्पष्ट होण्यासाठी या टिपणांचा उपयोग होऊ शकतो.

-संपादक
अंकः एप्रिल २००८

मुंबईचा खरा प्रश्न काय?

मुंबईत उत्तर भारतीयांविरूद्ध राज ठाकरे यांनी नव्याने मोहिम हाती घेतली आहे. त्यातून मारपीट, बाचाबाची, भाषणबाजी वगैरे चालू आहे.
मुंबई हे सर्वार्थाने असह्य शहर बनलं आहे. शहराच्या क्षमतेपेक्षा पाच-सहा पट अधिक माणसं मुंबईत राहत आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे. त्यावर उपाय म्हणून ‘मूळचे’ आणि ‘बाहेरचे’ असं भांडण सुरू केलं जात आहे.
असंच भांडण लंडनमध्ये नि पॅरिसमध्ये काढलं गेलं होतं. पण तिथल्या सरकारांनी ते मानलं नाही. त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला नि ही शहरं सुसह्य नि सुंदर करून टाकली. काय केलं त्यांनी? आपल्याला ते जमेल? आपल्याला काय करावं लागेल?
जगातल्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलेले नि शहरांच्या वाढीचा अभ्यास असलेले निळू दामले मुंबईच्या प्रश्नाकडे कसं पाहतात?

-निळू दामले
अंकः मार्च २००८

प्रश्नावर उत्तरं आहेत; पण ती प्रत्यक्षात येणार कशी?

बेकायदेशीरपणा, अव्यवस्था, भोंगळपणा यामागची मानसिकता समजून घेणं वेगळं आणि त्याला स्वीकारणं वा प्रतिष्ठा मिळवून देणं वेगळं. ‘आपल्याला कोणी संकुचित तर म्हणणार नाही ना?’ या भयापोटी हे सर्व स्वीकारण्याची आपल्याकडची रूढ पद्धत सुशासन आणि कायद्याचे राज्य या दोन्ही संकल्पनांना मूठमाती देणारी आहे.
विनय सहस्रबुद्धे
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक, ठाणे

छोडो मुंबई !

गेल्या १५ वर्षांत जागतिकीकरणानंतर देशात कितीही बदल झाले, तरी राजकीय सत्ताकेंद्र हेच सर्वांत शक्तिमान केंद्र राहिलं आहे. अशा केंद्राभोवती गर्दी होणारच. त्यामुळे हे केंद्र इथून हलवलं पाहिजे, तरच इथली त्या केंद्राभोवती बांडगुळांप्रमाणे निर्माण होणारी केंद्रं हलतील आणि माणसांना मुंबईत यायला लागण्याचं प्रमाण कमी होईल.
प्रकाश अकोलकर
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

प्रस्थापित स्थानिक हेच खरं मुंबईचं दुखणं!

आजच्या कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मुंबईच्या मूलभूत समस्या जाणून घेण्याची इच्छा आणि बौद्धिक कुवत नाही. मुंबईच्या समस्यांचे भांडवल करून राजकीय फायदा उपटणं इतकंच काम राजकारण्यांनी केलं आहे. त्यापायी मुंबईचा आर्थिक -हास झालेला आहे. परंतु आज हे जाणणारे द्रष्टे, प्रगल्भ नेतृत्व नसणं, हे मुंबईचं सर्वांत मोठं दुर्देव
आहे.
सुलक्षणा महाजन
शहर नियोजन अभ्यासक, ठाणे

गरीबकेंद्री नियोजन, हाच मुंबईच्या विकासाचा मार्ग

सधन आणि गरीब घरांना सरसकट वाढीव एफ.एस.आय. दिला तर विकासकांची चांदी होते, परंतु सधन घरांमधून घराच्या क्षेत्रफळाच्या मानाने राहण-या लोकांची संख्या गरीब घरांत राहणार्या लोकांच्या संख्येशी तुलना केल्यास कमी असते. म्हणजेच गरिबांच्या वस्तीत लोकसंख्येची घनता जास्त असते. यासाठी त्यांना जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते. म्हणून सरसकट एफ.एस.आय. न वाढवता गरिबांच्या घरांना वाढीव एफ.एस.आय.पेक्षा वाढीव जमीन उपलब्ध करून देणं जास्त उपयुक्त आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागेल.
नीरा आडारकर
शहर नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्त्या, मुंबई

अन्यथा मुंबई विषमतेचं आगर बनेल!

मुंबईत राहणा-या नागरिकांसाठी त्यांना परवडण्याजोगी घरं, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्यातील आरोग्यविषयक सुविधा, ही मुंबईच्या विकासासाठीची सध्याची खरी गरज आहे. ती भागवायची असेल तर आर्थिक सुबत्तेबरोबरच अशा सामाजिक विकासाच्या सोयी-सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नांना अग्रक्रम द्यावा लागेल.
रत्नाकर महाजन
राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, मुंबई

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा