मुंबईच्या प्रश्नावर उत्तर काय?

गेल्या काही महिन्यांत मुंबईत ‘मूळचे’ विरूद्ध ‘बाहेरचे’ असं भांडण लावण्याचा प्रयत्न चालला आहे. या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ‘अनुभव’च्या मार्च २००८ च्या अंकात निळू दामले यांच्याकडून आम्ही एक लेख लिहून घेतला होता. जगातल्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलेल्या आणि एकूणात शहरांच्या विकासाचा अभ्यास असलेल्या निळू दामले यांनी ‘मुंबईचा खरा प्रश्न काय?’ या अनुषंगाने आपलं मत त्या लेखात मांडलं होतं. मुंबईसारखं शहर सुसह्य बनवायचं तर काय करायला हवं, याविषयीही त्यांनी काही उपाय त्या लेखात सुचवले होते. मुंबईसारख्या शहरामध्ये माणसांची आवक-जावक चालूच राहणार आहे व तीच मुंबईच्या विकासाची खूण असणार आहे, त्यामुळेच मुंबईसाठी पायाभूत सुविधांचा गंभीरपणे विचार करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे, मुंबईत बाहेरून येणारे लोंढे थांबावेत, यासाठी देशातील मागास भागांचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, असंही त्यांनी म्हटलं होतं. जगातल्या इतर महाशहरांनी लोंढ्यांचा आणि अव्यवस्थेचा प्रश्न जसा सोडवला तसा मुंबईतही सोडवता येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं.

या लेखावर चर्चा व्हावी आणि अशा चर्चेसाठी ‘अनुभव’ने व्यासपीठ म्हणून भूमिका बजावावी, असा विचार आम्ही केला आणि ‘वाचक चर्चा’ जाहीर केली. शहराच्या नियोजनासंदर्भात अभ्यास करणा काही मंडळींनीही या वाचकचर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहन आम्ही त्यांना केलं. त्यातील बहुतेकांनी या चर्चेचं स्वागत करून आपला सहभाग दिला आहे. या अभ्यासक मंडळींची टिपणं वाचकांना याविषयावर विचार करण्यास उद्युक्त करतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. सर्वच लेखकांचं म्हणणं सर्वांना पटणारं नसेल, हे उघड आहे. मात्र मुंबई व मुंबईसार‘या महाशहरांच्या प्रश्नाकडे कसं पाहावं लागेल, आणि ही शहरं सुसह्य करण्यासाठी काय करावं लागेल, याची दिशा स्पष्ट होण्यासाठी या टिपणांचा उपयोग होऊ शकतो.

-संपादक
अंकः एप्रिल २००८

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा