मी अनुभवलेली देशोदेशीची कार्यमानसिकता

-विलास ढवळे.

विलास ढवळे हे ‘लॉर्ड इंडिया केमिकल्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांचा जगातल्या अनेक देशांशी, विशेषतः अमेरिका, जपान,ब्रिटन, जर्मनी अशा प्रगत देशांशी संबंध आला. त्या त्या देशातील कॉर्पोरेट क्षेत्राशी व्यवहार करताना त्यांना तिथल्या कार्यमानसिकतेचा-कार्यसंस्कृतीचा परिचय घडला. त्याचं हे अनुभव कथन!

- जानेवारी, २००८.

सध्याचे दिवस हे जागतिकीकरण अनुभवण्याचे आहेत. ते चांगलं की वाईट, असावं की नसावं या चर्चा आता मागे पडल्यात. जागतिकीकरणाच्या महाप्रचंड घुसळणीचे जे काही बरेवाईट परिणाम आहेत ते आपण अनुभवतो आहोत. या बाबतीत मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये जगातल्या अनेक देशांशी माझा प्रत्यक्ष संपर्क आला. त्या देशांशी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करण्याची संधी मिळाली. त्यातून तोवरच्या आयुष्यात न कळलेल्या अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. अर्थात, याचं श्रेय मी माझ्याकडे अजिबातच घेत नाही. कॉपोरेट क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मी नोकरी करत असल्यामुळे कामाचा भाग म्हणून मला जगभर फिरण्याची आणि त्या त्या देशातल्या कंपन्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली.

कदाचित सुरुवातीपासूनच माझ्या मनात मानवी मनासंबंधी कुतुहल असल्यामुळे असेल, मला वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या मानसिकतेचं निरीक्षण करण्याचा छंद लागला. त्यातून जपान आणि चीन किंवा अमेरिका आणि जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांच्या मानसिकतेची मी एकमेकांशी तुलना करू लागलो. एकीकडे कामाचा भाग म्हणून मी या लोकांना भेटत होतो, त्यांच्याबरोबर बोलत होतो, पत्रव्यवहार करत होतो. पण दुसरीकडे त्यांच्या बोलण्याचं, वागण्याचं हालचालींचं निरीक्षण करून त्यावर विचार करण्याचा मला चाळाच लागला.

शेवटी मानवी मन हे जगभर सगळीकडे सारखंच असणार, असं आपण मानतो. त्यात तथ्य हे आहेच पण तरीसुद्धा प्रत्येक देशाची म्हणून एक मानसिकता असते, असं आता मला जाणवू लागलं आहे. त्या देशाचा इतिहास, तिथं झालेली आक्रमणं, तिथला निसर्ग, तिथली संस्कृती या सगळ्याचं प्रतिबिंब तिथे जन्मलेल्या आणि राहणा-या माणसांच्या वागण्यात दिसतं. मी काही या विषयाचा अभ्यासक नव्हे पण कामाच्या निमित्तानं माझा देशोदेशीच्या निवडक लोकांशी संपर्क आला. त्यातून काही निरीक्षणं ही नोंदवण्यासारखी आहेत.

अमेरिका, जपान, कोरिया, चीन, ब्रिटन, जर्मनी अशा अनेक देशांशी माझा कामाच्या निमित्तानं कमी अधिक प्रमाणात संपर्क आला. या सगळ्यात जपानी माणूस हा अत्यंत शांत आणि सुसंस्कृत असा असतो. त्याला तुम्ही कधी मोठ्यांदा ओरडताना पाहणार नाही. तो अत्यंत मृदुभाषी असतो. तो फारसं बोलत नाही. याचं एक कारण त्याला इंग्रजी येत नाही, हे असतंच. पण एरवीसुद्धा जपानी लोकांत तो जेवढा मोकळा असेल तेवढा तो बाहेर कधीच नसतो. त्याच्या बोलण्यात तो ज्ञानाचं प्रदर्शन कधी करत नाही. एखादा प्रश्न त्याला विचारला तर तो त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर माहिती असेल तरच ते देतो. बहुतेक जपानी लोकांना ते करत असलेल्या कामाचं सखोल ज्ञान असतं. पण समोरच्याला तसं न भासवणं हे त्यांच्या संस्कृतीत चांगलं लक्षण मानलं जातं.

‘नाही’ हा शब्द जपानी माणसाला अगदीच वर्ज्य असतो. मुळात त्यांना नकार द्यायला आवडत नाही. त्यांच्या संस्कृतीत ते उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं. त्यातून अगदीच वेळ आली तर तो कोणतेतरी वेगळे शब्द वापरतो. त्याचा अस्वस्थपणा आपल्याला त्याच्या अबोलपणातही जाणवतो. पण आपल्याकडे जसं स्पष्टपणे ‘नाही’ सांगण्याची पद्धत आहे, तसं जपान्यांमध्ये अजिबातच चालत नाही. शिस्त आणि नीटनेटकेपणा याबाबतीत जपानी लोक खूपच काटेकोर असतात. मला याबाबतीत त्यांच्याकडून जसे अनुभव आले तसे इतरत्र कुठेच आले नाहीत. आमची एखादी मिटिंग झाली की, जपानी माणूस लगेच एक व्यवस्थित कागद घेऊन अतिशय सुंदर अक्षरात ते लिहून काढतो. त्यामध्ये मिटिंगचे शक्य तेवढे तपशील भरतो. आवश्यकता असेल तर आकृत्या, नकाशे आणि तक्ते यांचासुद्धा वापर करतो. तो कागद नंतर वाचावा असा असतोच पण जपूनही ठेवावा इतका सुंदर असतो.

आपल्या तोंडातून गेलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो. तो कधीही परत घेता येत नाही, असं आपण बोलतो. पण जपानी लोक खरोखरच तसं वागतात. शब्दांना शस्त्र मानून खरोखरच त्यांचा जपून वापर करतात. समोरच्या माणसाला ते शब्दातूनच काय पण कशातूनच प्रतिसाद देत नाहीत. त्यांची कम्युनिकेशनची पद्धत हा एक अजब प्रकार असतो. समोरचा माणूस बोलत असताना आपण जसं बरं, हो का, अच्छा, बरोबर आहे असे शब्द वापरून काहीतरी प्रतिसाद देत असतो, तसा जपानी माणूस अजिबात देत नाही. इतकंच काय पण एखादी गोष्ट पटली तर मान डोलवणं किंवा पटली नाही तर हातवारे करणं, किमानपक्षी डोळ्यांमधून प्रतिसाद देणं असे देहबोलीचे प्रकारही ते वापरत नाहीत. आपण जे बोलतो आहोत ते त्यांच्या डोक्यात शिरतं आहे की नाही अशी शंका यावी इतके ते थंड असतात. पण मला अनुभवातून लक्षात यायला लागलं की त्यांना सगळं व्यवस्थित कळत असतं. त्यांचं ऐकणं आणि बोलणं अत्यंत विचारपूर्वक असतं. आपण ज्याला वायफळ म्हणतो असं जपानी माणूस कधीच बोलणार नाही. कदाचित इतक्या आखीव रेखीवपणामुळे त्याच्यामधली उत्सफुर्तता हरवत असेल, पण त्या बदल्यात प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याचे फायदे त्याला मिळत असतात.

आंतरराष्ट्रीय सभा आणि परिषदांमध्ये नेहमी येणारा एक अनुभव आहे. जेव्हा अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतात तेव्हा एक दृश्य हमखास दिसतं. जपानी माणूस एकतर सहसा बोलायला उभा राहात नाही आणि उभा राहिला तर मात्र टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता सभागृहात पसरते. संपूर्ण सभागृह चित्त एकाग्र करून ऐकत असतं. याचं कारण जपानी माणूस बोलतो तेव्हा अत्यंत महत्त्वाचं आणि जे अपरिहार्य आहे, तेच बोलतो. त्याच्या बोलण्यातले काही शब्द आपण नीट ऐकले नाहीत तर पुढचे संदर्भ लागणार नाहीत, इतकं नेमकेपणानं तो बोलत असतो. जपानी माणसाकडं अशा परिषदांमध्ये आदरानं पाहिलं जातं. याबाबतीत एक विनोदही प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सभांमध्ये आदर्श अध्यक्ष कोणाला मानावं? तर जो जपानी माणसाला बोलतं करू शकतो आणि भारतीय माणसाला बोलताना थांबवू शकतो त्याला, असं सांगितलं जातं. आपल्या भारतीय लोकांना बोलताना थांबवण्याची वेळ जगात अनेक ठिकाणी येते, हे खरंच आहे.

जपानी माणसाला त्याच्या अंगावर गेलेलं आवडत नाही. तो फारसा अनुकूल प्रतिसाद देत नाही. म्हणून जर तुम्ही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलात की तो मनात खोलवर नाराज होतो. त्याच्या बोलण्याला जर तुम्ही फक्त मुंडी हलवलीत तरच तो ठीक असतो. याचं कारण कोणत्याही स्थितीत तो आपलं निर्णय स्वातंत्र्य गमवायला तयार नसतो. प्रत्येक गोष्टीचा त्याला स्वतःच्या विचारांनी निर्णय करायचा असतो. तो करण्यासाठी त्याला स्वतःचा मानसिक वेळ हवा असतो. या दरम्यान इंग्रजीत ज्याला ब्रेन वॉश करणं म्हणतात, तसं करण्याचा कोणी प्रयत्न केला तर जपानी माणसाच्या मनाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होतात.

तंत्रज्ञानाचा वापर करताना काही बाबतीत जपानी माणूस जगाच्या मागे आहे’ असं विधान जर कोणी केलं, तर लोक त्याला वेड्यात काढतील. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, हे जरी खरं असलं तरी काही बाबतीत स्थितीप्रिय असतो. आपण जपानी माणसाला इ-मेलद्वारे एखादं पत्र पाठवलं तर तो ब-याचदा काहीच प्रतिसाद देत नाही. इकडे आपण अस्वस्थ होतो. त्याला आपली मेल उघडली की नाही, त्यानं ते पत्र वाचलं का नाही, हे आपल्याला काहीच कळत नाही. पण फोन करून तशी विचारणा केलेलं त्याला अपमानास्पद वाटतं, कारण त्यानं ती मेल पाहिलेली असते आणि त्यावर उत्तर लिहिण्यासाठी त्याला वेळ हवा असतो. अगदी कालपरवापर्यंत जपानी फॅक्सनी उत्तर पाठवायचे. जपानी माणसांच्या बाबतीत मला न सुटलेल्या कोड्यांपैकी हे एक आहे.

जपानी लोक अत्यंत जातियवादी असतात हे मला अनुभवातून जाणवलेलं आणखी एक सत्य आहे. मी जर एखाद्या जपानी कंपनीकडून काम मिळवण्याचा प्रयत्न करत असेन तर माझ्या कंपनीची एखाद्या जपानी कंपनीबरोबर भागीदारी असावी लागते किंवा मी काम करत असलेल्या कंपनीत जपानी माणसं असावी लागतात. तरच माझ्या कंपनीचा विचार जपानी लोक करतात. कारण शक्यतो आपला व्यवहार फक्त जपानी कंपन्यांबरोबरच व्हावा असाच त्यांचा पहिला प्रयत्न असतो. त्यातून जपानबाहेरच्या एखाद्या कंपनीची एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत मक्तेदारी असेल आणि तिच्याशिवाय पर्यायच नसेल तरच ते त्या कंपनीचा विचार करतात. आजच्या खुल्या जागतिक व्यापाराच्या काळातही जपानी लोक याबाबतीत अत्यंत कट्टर आहेत.

आपल्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत जपानी लोकांचं बाकीच्या जगापेक्षा स्वतंत्र शैली आहे. बाहेरच्या देशातल्या व्यक्तीला जर त्यांनी त्यांच्या कंपनीत घेतलं तर त्या व्यक्तीला सर्वांत आधी ते एक वर्षासाठी जपानला पाठवतात. तिथेच त्याला वर्षभर प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यातले सहा महिने जपानी भाषेचं शिक्षण सक्तीचं असतं. त्यानंतर जपानी संस्कृती आणि कंपनीमधल्या वातावरणाची त्याला व्यवस्थित ओळख करून दिली जाते. त्यामागे हेतू असा असतो की, जपानी संस्कृतीमध्ये ती व्यक्ती रुळली तरच जपानी कंपनीत नीट काम करू शकेल. अन्यथा त्याला जपानी कार्यशैली आत्मसात होऊ शकणार नाही. प्रत्यक्षात ती कार्यशैली इतकी सुंदर असते की, एकदा तिचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला बिगर जपानी कंपनीत काम करण्याची इच्छाच उरत नाही. मारुती किंवा टोयोटा या कंपन्यांमध्ये असे अनेक अधिकारी आहेत की ज्यांनी आधी असा अनुभव घेतला आहे आणि आता ते जपानी कार्यशैलीत रुळले आहेत. म्हणजे एका अर्थानं जपानी कंपन्या या बिगरजपानी कर्मचा-याचं ब्रेन वॉशिंगच करतात, असंही म्हणता येईल.

अमेरिकेसह संपूर्ण जगाला स्वत:पुढे नमवणारा देश असं जपानचं काही बाबतीत वर्णन करावं लागेल. मी पूर्वी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे आलेला असाच एक अनुभव सांगण्यासारखा आहे. एका जपानी कंपनीबरोबर आमचे नियमित व्यवहार होते. आणखी एका नव्या उत्पादनाच्या ऑर्डरसाठी आम्ही टेंडर भरलं होतं. ते भरत असताना आमच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्व प्रकारची तांत्रिक काळजी आम्ही घेतलेली होती. शिवाय आमच्या स्पर्धक कंपन्याही टेंडर भरणार असल्यानं आमची किंमत स्पर्धेत टिकेल अशीच ठेवली होती. प्रत्यक्षात ती ऑर्डर आम्हाला न मिळता आमच्या जपानी स्पर्धक कंपनीला मिळाली. आम्ही कंपनीच्या निर्णयाचा पूर्ण आदर करत चौकशी केली की आमच्या स्पर्धक कंपनीच्या उत्पादनात असं काय होतं की जे आमच्या उत्पादनात कमी पडलं? आमच्या लक्षात आलं की, आम्हाला तंत्रज्ञानाच्या एका क्षुल्लक बाबीवरून नाकारण्यात आलं होतं आणि ती बाब स्पर्धक जपानी कंपनीही पूर्ण करू शकत नव्हती. इतकंच काय जगातील अन्य कोणतीच कंपनी ती करू शकत नव्हती. मी त्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून चालू धंदाही बंद झाला.

आम्ही बाहेरून चौकशी केल्यानंतर कळलं की, आम्ही तो प्रश्न विचारल्यामुळे त्या जपानी व्यवस्थापनाचा अपमान झाला. आम्ही जर आमची उणीव मान्य करून क्षमा मागितली असती, तर निदान चालता धंदा बंद झाला नसता. याबाबतीत अगदी अमेरिकन कंपन्यासुद्दा जपानपुढे टरकून उभ्या असतात. आता तारतम्याच्या कसोटीवर हे योग्य की अयोग्य? कारण एखाद्या जपानी कंपनीला काम देताना असे नियम ते लावत नाहीत. पण जर तुम्ही त्यांच्या दारात गेला आहात तर अशा चर्चा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं.

काही महत्त्वाच्या मिटिंग्जच्या निमित्तानं मी टोकिओला जातो तेव्हा जपानी संस्कृतीमध्ये आजही स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान आहे, असं मला लक्षात आलं. ऑफिसमधल्या महिला कर्मचारीही दुय्यम भूमिका घेताना दिसतात. जपानी माणूस हा अत्यंत रिझर्व असतो. तो कधीही समोरच्याला स्वत:च्या कौटुंबिक जीवनात डोकावू देत नाही. त्यामुळे त्याच्या घरातलं वातावरण कसं असतं हे कळायला मार्ग नाही पण त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. उदा. संध्याकाळी सहा वाजता ऑफिस संपलं की जपानी कर्मचारी सहका-यांबरोबर कुठेतरी जेवायला जातात. तिथे दारू आणि जेवण झालं की रात्री आठच्या पुढे घरी जायला निघतात. तिथेसुद्धा मुंबईप्रमाणं घरी पोचायला तास-दीडतास लागतो. मग माझ्या मनात प्रश्न येतो या लोकांचं कौटुंबिक जीवन काय असतं?

जपानी लोकांच्या अगदी विरुद्ध असे अमेरिकन लोक असतात. ते पहिल्याच भेटीमध्ये अगदी अनौपचारिकपणे बोलायला लागतात. आपल्याला पहिल्या नावानी हाक मारतात. त्यांनाही आपण पहिल्या नावानी हाक मारावी अशी त्यांची अपेक्षा असते. ते इतके मोकळे असतात की पहिल्या भेटीत स्वत:चा घटस्फोट कसा झाला याविषयी तपशीलात बोलायला लागतात. (आपल्याकडे अगदी जुनी ओळख असली तरी असे विषय लपवण्याचाच प्रयत्न होतो.) थोड्या परिचयानंतर ते आपल्याला घरी येण्याचं निमंत्रण देतात. हे सगळं चालू असताना शिष्टाचारांची फारशी फिकीर करत नाहीत. सहज समोरच्याच्या खांद्यावर हात टाकतात.

अमेरिकनांच्या या अनौपचारिकतेचा अर्थ असा अर्थातच नव्हे की ते व्यवहाराला सोपे आहेत. उलट ते वागायला जेवढे सोपे तेवढे व्यवहाराला कठीण आहेत. त्यांच्याशी व्यावसायिक वाटाघाटी करताना अक्षरश: कस लागतो. त्यांना सर्व गोष्टी स्वत:च्या अटींवरच करून घ्यायच्या असतात. त्या बाबतीत त्यांच्या मनात स्पष्टता असते. फक्त त्याचा ताण ते वातावरणात जाणवू देत नाहीत. त्यांच्या कंपनीत एखादा कर्मचारी आजारी असेल आणि त्यानं तसं वरिष्ठाला सांगितलं तर, तो वरिष्ठ पटकन असं म्हणतो की, ‘ओके टेक इट ईझी.’ पण ‘टेक इट ईझी’चा अर्थ असा नसतो की त्या दिवशीचं काम अर्ध टाकून त्याला घरी जाता येईल.

तीच गोष्ट अमेरिकन कंपनी दुस-या कंपनीबरोबर व्यवहार करत असते तेव्हा घडते. अमेरिकन लोक समोरच्या कंपनीबराबेर मैत्रीच्या नात्यानी वागतील. त्यांच्या अडचणी समजून घेतील. त्याविषयी सहानुभूती व्यक्त करतील. पण जेव्हा व्यवहाराचा प्रश्न येईल तेव्हा मात्र कोणतीही सवलत देणार नाहीत. अर्थात एक मान्य केलं पाहिजे की समोरच्यावर आवाज चढवून ते दडपण आणत नाहीत. भारतात आपण ज्याप्रमाणं म्हणतो की, हे काम आजच्या आज झालंच पाहिजे, तसं ते कधीच बोलत नाहीत.

एकदा एका अमेरिकन कंपनीतल्या अधिका-यानं एका ग्रीक माणसाला काम दिलं होतं. अमेरिकन अधिका-यानं त्या ग्रीकाला विचारलं, ‘‘हाऊ मच टाइम वुईल यू टेक फार धीस जॉब?’’ तो ग्रीक म्हणाला, ‘‘वन वीक.’’ दोघांनाही ते मान्य झाल्यानंतर त्या ग्रीक व्यक्तीनं अक्षरश: रात्रंदिवस काम करून बरचसं काम आवरत आणलं. पण आठवडा संपला तेव्हा ते पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळं त्या ग्रीकानं आणखी दोन दिवसांची मुदत मागितली. त्यावर तो अमेरिकन म्हणाला, ‘‘वुई हॅड अ कॉन्ट्रॅक्ट. यु आस्कड फॅर वन वीक. यु शुड क्लोज बाय टुडे. व्हाय टू डेज मोअर?’’ त्यानंतर त्या ग्रीकानं दोन दिवसांत काम पूर्ण केलं आणि राजीनामा देऊन निघून गेला.

दोघांच्याही मानसिकतेवर प्रकाश टाकणारं हे उदाहरण आहे. या प्रकरणात ग्रीक माणसाचं म्हणणं साधारणपणे आपल्या भारतीय माणसासारखं असतं. तो म्हणतो, मी एवढं दिवसरात्र काम केलं त्याची याला काहीच किंमत नाही. मुळात असं काम मी पूर्वी केलेलं नाही. त्यामुळे मला त्यासाठी काही चर्चा, मार्गदर्शन याची गरज होती. त्यातलं हा काहीच द्यायला तयार नाही. फक्त मी एक आठवडा मान्य केला त्यावरच बोट ठेवतो. त्यावर अमेरिकन माणसाचं म्हणणंही समजण्यासारखं आहे. त्याच्या मते, या कामाला किती वेळ लागेल हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मी त्याला दिलं होतं. त्यावेळेला माझा कुठलाच आग्रह नव्हता. तो दहा दिवस म्हटला असता तरी माझी तयारी होतीच. शेवटी काम तो करणार असल्यानं त्या कामाला किती वेळ लागेल हे त्यानंच ठरवायला पाहिजे. आता त्याचा अंदाज चुकला याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. कराराचं महत्त्व त्याने शिकलं पाहिजे.

माझा स्वत:चा अमेरिकन लोकांबरोबर आजवर खूपच संपर्क आलेला आहे. अजूनही येत असतो. अमेरिकन माणूस हा स्वत:मध्ये अत्यंत गुरफटलेला असतो, असा माझा अनुभव आहे. कारण ते बोलत जरी आपल्याशी असले तरी प्रत्यक्षात स्वत:शीच बोलत असतात. एका अर्थानी आत्ममग्न माणसाची लक्षणं सर्वच अमेरिकनांमध्ये दिसतात.

काही अनुभव अगदी साधे असतात पण ते दीर्घकाळ लक्षात राहतात. एकदा अमेरिकेत सकाळी आवरून मी हॉटेलच्या बाहेर उभा होतो. मला नेण्यासाठी कोणीतरी गाडी घेऊन येणार होतं. थंडीच्या दिवसात पुणे किंवा नाशिकला असते तशी सुखद हवा होती. त्या संपूर्ण आसमंतात मी एकटाच होतो. तेवढ्यात समोरून एक अमेरिकन स्त्री आली. माझ्यापाशी थांबून म्हणाली, ‘‘इजंट इट ए वंडरफुल डे? व्हॉट ए लव्हली वेदर!’’ मी म्हणालो, ‘‘येस, आय ऍम ऑल्सो एन्जॉईंग!’’ साधारणपणे दोन मिनिटं अशा प्रकारचा संवाद झाला आणि ती गेली. त्या संवादात खूपच मोकळेपणा होता. कोणत्याही देशात एखादी परकीय व्यक्ती गेली आणि स्थानिक व्यक्ती जर हसून बोलली तर त्याला खूप बरं वाटतं. ती त्याची मानसिक गरज असते. याचा अर्थ असा नव्हे की, लगेच मैत्री होईल. हा साधा अनुभव नोंदवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत असा अनुभव अनेकांना येऊ शकतो. पण जपान किंवा जर्मनीमध्ये हे कदापिही शक्य नाही.

जगातल्या अनेक प्रगत देशांप्रमाणं अमेरिका हाही आक्रमक विस्तारवादी देश आहे, हे आपण पाहतोच. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या ज्याप्रकारे जगभर आपले हातपाय पसरत असतात ते लक्षणीय आहे. शिवाय अगदी वेगळ्या संदर्भात पाहिलं तर ‘युद्धखोर’अशीही अमेरिकेची प्रतिमा आहेच. त्यामुळे हे कधी कोणावर हक्क करतील किंवा शस्त्रास्त्रांच्या बाबतीत कधी कोणाशी संधान बांधतील याविषयी अनेक देश धास्तावलेले असतात. पण जिथपर्यंत कामाच्या निमित्तानं माझा संबंध येतो तिथं ही मानसिकता मला अमेरिकनांच्या वागण्या-बोलण्यात दिसत नाही. कदाचित हा विरोधाभास आहे की माझं याबाबतीत निरीक्षण अपुरं आहे हे शोधायला हवं.

अमेरिकन माणसांमध्ये नॅशनल स्पिरीट मात्र पुरेपूर असल्याचं मला जाणवतं. एकदा एका अमेरिकन कंपनीनं करार करताना आम्हाला सांगितलं होतं की, तुमचे कोणी वितरक इराणमध्ये वितरण करत असतील तर त्यांना आपण बनवत असलेलं हे उत्पादन देऊ नका, कारण आमच्या सरकारनं आम्हाला तसं सांगितलं आहे. इतर देशातल्या कंपन्या त्यांच्या सरकारकडं दुर्लक्ष करतील, पण अमेरिकन कंपन्या तसं करत नाहीत. काही प्रमाणात त्यांच्यातल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेमुळे तसं करत असतील तर काही प्रमाणात त्यांच्या देशातल्या न्यायव्यवस्थेला घाबरत असतील. त्यांची न्यायव्यवस्था अत्यंत तगडी असल्यामुळं जर इराणमध्ये त्यांचं एक जरी उत्पादन सापडलं तरी या कंपनीवर कडक कारवाई होऊ शकते. आपली भारतीय कंपनी न्यायव्यवस्थेच्या भीतीनं असं वागेल का, असा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारतो तेव्हा ‘नाही’ असं उत्तर येतं. अमेरिकेतली अभ्यासक्रमातली पुस्तकं आणि व्यवहार यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. त्यामुळे कदाचित आपल्या देशात कशाप्रकारे व्यवहार करायचा आहे याविषयी त्यांना शाळेपासूनच ज्ञान मिळत असेल. आपल्याकडे तसा तो नाही आणि आपल्याकडे कशाचाच कशाशी कसा संबंध नाही, याविषयी आपल्याला बोलायलाही आवडतं.

‘अमेरिका’ हा उप-या लोकांचा देश आहे. त्यामुळे त्यांना युरोपियन किंवा आशियाई देशांसारखी दीर्घ परंपरा नाही हे खरंच आहे. पण त्यामुळे त्यांना कमी लेखलं जावं, असं मला वाटत नाही. याचं कारण त्यांना मोठी परंपरा नाही याचा अर्थ तिथे संस्कृती नाही असा होत नाही. ते लोक सुसंस्कृत आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागातून आल्यामुळे परस्परावलंबित्व आणि एकमेकांचा आदर करणं हे गरजेतून का होईना पण त्यांच्यामध्ये आलं आहे. मी एकटा राहू शकत नाही, तुम्हीही एकटे राहू शकत नाही. मी तुमचा आदर करतो, तुम्ही माझा आदर करा आणि आपण सगळे मिळून प्रगती करू अशी भावना त्यांच्यामध्ये दिसते. त्यांच्याकडे जमीन खूप आहे, इतर नैसर्गिक स्रोत खूप आहेत. पण मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे त्यांचा भर हा कृतीवर अधिक दिसतो. जगातले अनेक देश पाहिल्यावर मला असं वाटतं की, केवळ आशियाई देशांमध्ये बोलण्यावर भर असतो. परंतु आशियामध्येही चीन, जपान, कोरिया या देशांमध्ये कृतीवरच भर असल्याचं आपल्याला दिसतं.

इतर देशांपेक्षा आपण अमेरिकेत खूप लवकर स्वीकारले जातो. जो माणूस मनानी मोकळा आणि विचारांनी सेक्युलर असेल त्याला अमेरिका जवळची वाटते. आपल्याला अमेरिकन माणसाचा अजून एक गुण फार जवळचा आणि कौतुकास्पद वाटतो. तो म्हणजे ‘नैतिकता’. अमेरिकन माणूस आपल्या व्यवहारात आणि वागण्यात त्याला फार वरचं स्थान देतात. तुम्ही अमेरिकन नाही आहात म्हणून वरकरणी कोणतीच वेगळी वागणूक तिथे दिली जात नाही. आज लाखो आशियाई लोक अमेरिकेत स्थायिक होत आहेत त्यामागचं एक कारण हेही आहे. अमेरिकेला ‘मेल्टींग पॉट’ असं म्हणतात हे या अर्थानं बरोबर आहे. मला नेहमी असं वाटतं की अमेरिकन माणसांचा हा मोकळेपणा जपानी लोकांकडं असता तर जागतिक व्यापारात त्यांची आता झाली त्यापेक्षा खूपच अधिक प्रगती झाली असती.

अमेरिकन लोक जेवढे मोकळे आहेत तेवढे जर्मन लोक बंदीस्त आहेत, असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मनाभोवती, समाजाभोवती अदृष्य अशी एक तटबंदी असते. ती तुम्हाला दिसत नाही आणि भेदताही येत नाही. एकतर जर्मन हे जपान्यांइतकेच जातीयवादी असतातच आणि उद्धटही असतात. ते समोरच्याला अत्यंत तुच्छ लेखतात. त्यांचा अहंगंड कमालीचा असतो. आवाजात अरेरावी असते. ते सरळ म्हणतात ‘नो नथिंग डुईंग. धीस इज द वे आय वुईल डू धिस.’ ते ऐकताना आपल्याला खूप म्हणजे खूपच त्रास होतो. पण शांतपणे विचार केला की लक्षात येत त्यांच्या उर्मटपणामागचा विचार बरोबर असतो. पण आपल्या विषयाचं इतकं सखोल ज्ञान असणारी माणसं वागताना इतकी अविचारी का होत असतील हे मला कळू शकत नाही. एक कारण असंही असू शकेल की, त्यांच्याकडे स्पेशलायझेशन खूपच लवकर चालू होतं. एखाद्याला जर इंजिनिअर व्हायचं असेल तर ते फार आधी ठरवलं जातं. मग त्याच्या शिक्षणातून इतर विषय बाद होतात. त्यातून तो एका विषयात सखोल अभ्यास करू शकतो पण त्याची वाढ एकांगी होते. असं संपूर्ण समाजाचं होत असल्यानं एकारलेला समाज असं वर्णन आपण करू शकतो. दैनंदिन वागण्यातल्या या अरेरावीपासून ते इतर देशांवर हल्ले करण्यापर्यंतचे अविष्कार त्याचेच असू शकतील.

एका जर्मन कंपनीबरोबर व्यवहार करत असताना मी एक शिफारस केली होती. त्यावर तिथला जर्मन अधिकारी म्हणाला, ‘धीस इज बुलशीट.’ मी मनात रागावलो आणि मला वाईटही वाटलं. कारण मी खूप विचारपूर्वक ती शिफारस केली होती. माझ्या मनात पहिलं वाक्य आलं ‘हाऊ कॅन यू से धीस इज बुलशीट?’ पण त्याच्याकडून काम करून घ्यायचं असल्यानं मी ते मोठ्यांदा बोललो नाही. मी म्हटलं, ‘‘आय डोंट अंडरस्टँड व्हाय यू आर सेईंग लाईक धिस?’’ त्यावर तो म्हणाला, तुझं वय ते काय, तुझा अनुभव काय. मी आजवर खूप प्लँटस् स्वत: उभे केले आहेत. ही साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी त्याला म्हटलं, ‘‘तुझा इतका अनुभव आहे मग तू मला समजावून का सांगत नाहीस? त्यातून माझं शिक्षण होईल’’ त्यावर ‘पुन्हा कधीतरी’ असं म्हणत त्यानं मला उडवून लावलं. पण हे उदाहरण प्रातिनिधिक मानायला हरकत नाही, असं सर्वसाधारण जर्मन्यांचं वर्तन असतं.

जर्मन आणि ब्रिटिश हे आपल्यादृष्टीने दोन्हीही युरोपियन देश आहेत. पण प्रत्यक्षात या दोन्ही देशांच्या मानसिकतेमध्येही फरक आहे. आपल्याला जर्मनांपेक्षा ब्रिटिश जवळचे वाटतात. एकतर त्यांच्याशी आपलं जुनं नातं आहे. त्यांच्याकडून आपण दुर्गुणही भरपूर घेतलेले आहेत. ब्रिटिशांमध्येही शिष्ठपणा आणि अहंगड आहे. आपण भारत देश म्हणून पन्नास वर्षांत इतकी प्रगती केली आहे, असं आपण मानतो. पण ब्रिटिशांना आतून ते अजिबात मान्य नाही. केवळ आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे संकेत म्हणून ते उघडपणे तसं बोलत नाहीत इतकंच. ते आपल्याला वरकरणी बरोबरीच्या नात्यानं वागवत असले तरी तो फक्त देखावा असतो. त्यांच्याकडून खरी मान्यता मिळवण्यापासून आपण अजून खूपच लांब आहोत. त्यांच्या मनात आपण आजही त्यांची वसाहतच आहोत. त्यामुळे उगीच भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. गमतीची गोष्ट म्हणजे अमेरिका आणि ब्रिटिश ही राजकीयदृष्ट्या भावंडांसारखी वागत असली तरी सामान्य अमेरिकन माणसाला ब्रिटिश माणूस तसा रूचत नाही. ब-याचदा अमेरिकन ब्रिटिशांची टवाळीही करतात.

ब्रिटिशच काय पण जगातले अनेक देश भारताकडं कसं पाहतात हा खरोखरीच अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या खोलात कधीतरी जाता येईल. पण तोपर्यंत मला असं वाटतं की, आपण भारतीय आपल्या देशाकडं कसं पाहतो याचा विचार लवकरात लवकर झाला पाहिजे. पुढची अनेक वर्षं जगासाठी भारताचे आणि भारतासाठी जगाचे दरवाजे सताड उघडे राहणार आहेत हे स्पष्टच आहे. त्यामुळे आपले लाखो लोक बाहेर जात राहणार आणि तेवढेच बाहेरचे भारतात येत राहणार. यात मला छळणारी गोष्ट म्हणजे परदेशातल्या लोकांशी भारतीयांचा संपर्क येतो तेव्हा भारतीय लोक आपल्याच देशाची यथेच्छ निंदानालस्ती करतात. इथली अस्वच्छता, भोंगळ प्रशासन, भ्रष्टाचार, दूरदृष्टी नसलेले राज्यकर्ते याची इतकी वर्णनं करतात की हा साप गारुड्यांचा देश होता ते बरं होतं की काय असा विचार परदेशी लोकांच्या मनात येऊ शकतो. कारण एखाद्या परदेशी व्यक्तीच्या मनात अशी नकारात्मक प्रतिमा तयार झाली की ती कायमसाठी राहते. कुठेही भारताविषयी बोलण्याची किंवा लिहिण्याची वेळ आली की तो त्या चष्म्यातूनच आपल्याकडे पाहतो. आपली कमकुवत बाजू आपल्याला मान्य असली तरी ती तेवढीच नसून काही चांगली बाजूही आहे हे विसरून चालणार नाही आणि जगापुढे शो केस होत असताना चांगली बाजूच मांडणं हे हिताचं आहे. असो.

आपली जगाकडे पाहण्याची नजर जर चौकस असेल तर माणूस म्हणून आपण खूप समृद्ध होऊ शकतो आणि या बाबतीत मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. देशोदेशींच्या मानसिकता शोधताना वैविध्य तर खूपच सापडतं. अगदी टोकाचे फरक जाणवतात. एखादा संपूर्ण समाज एकाच पद्धतीनं कसा विचार करत असतो, याचं चकित करणारं दर्शन घडतं. पण या वैविध्यामागे, एकारलेपणामागे, काहींच्या उदारतेमागे आणि काहींच्या अहंगंडामागे एक समान सूत्र आहे. ते आहे चिरंतन मूल्यांचं. मला असं स्पष्टपणे जाणवतं की, या सगळ्याच देशांमधले लोक मूल्यांची जपणूक काटेकोरपणे करणारे नसतीलही, पण मूल्यं असतात आणि ती असलीच पाहिजेत यावर मात्र सर्वांचा दृढ विश्वास आहे. संपूर्ण मानव जातीला एकत्र गुंफणारा तोच धागा आहे.

-विलास ढवळे.
मोबाईल ९८२०७०३१८८

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा