मला (आणि वाचकांनाही) जागं केलेलं पुस्तक - अनिल अवचट

लेखक, मग तो कमी लिहिणारा असो किंवा भरपूर; त्याची काहीच पुस्तकं लोकप्रिय होतात, सर्वमान्य ठरतात, महत्त्वाची मानली जातात.
अशा पुस्तकांबद्दल वाचकांना नेहमीच कुतूहल वाटत असतं, जिज्ञासा वाटत असते. हे पुस्तक कसं सुचलं, कोणत्या काळात-कोणत्या पार्श्‍वभूमीवर लिहावंसं वाटलं, त्या पुस्तकाचं स्वागत कसं झालं, उलटसुलट चर्चा झाल्या का, त्या पुस्तकाचा वाचकांवर व एकूण समाजावर किंवा सामाजिक विचार-व्यवहारांवर काही परिणाम झाला का, या पुस्तकाने मराठी लेखनशैलीत काही भर घातली का, वळण दिलं का, वगैरे अनेक प्रश्न वाचकाच्या मनात तरळत असतात.
अशाच काही प्रश्नांवर आम्ही मराठीतील नामवंत आणि प्रतिभावंत लेखकांना लिहिण्याचं आमंत्रण दिलं आहे. आपल्याला स्वत:चं जे पुस्तक महत्त्वाचं वाटतं त्या पुस्तकावर लेखकाने लिहावं, असं आवाहन आम्ही त्यांना केलं आहे. या लेखमालिकेची सुरुवात मराठी रिपोर्ताज शैली रुजवलेले अनिल अवचट करत आहेत, गाजलेल्या आपल्या ‘माणसं’ या पुस्तकाबद्दल लिहून.
- संपादक

‘माणसं’! या पुस्तकावर माझा विशेष जीव आहे. या पुस्तकाने मला खूप काही दिलं. हे पुस्तक इतकं वाचलं जाईल असं मला वाटलं नव्हतं. या पुस्तकातील लेख मौज दिवाळी अंकातून (एक अपवाद : ‘अंधेरनगरी निपाणी’ या लेखाचा. तो ‘पुरोगामी सत्यशोधक’मधे आलेला.) प्रसिद्ध झाले होते. ते त्या त्या वेळी वाचकांनी वाचले असणारच. मग आता ते पुस्तक कशाला घेतील, असं मला वाटत असे. एक दिवस कोल्हापूरचे माझे ज्येष्ठ, पितृतुल्य स्नेही बापूसाहेब पाटलांचा ङ्गोन आला. ते आणि लीलाताई दोघंही काश्मीर ट्रिपला जाऊन आले होते. त्यांनी बरोबर हे एकच पुस्तक नेलं होतं. ते आल्या आल्या ङ्गोनवर पुस्तकाविषयी इतके भरभरून बोलले की बस! जीव भांड्यात पडला. बापूसाहेब माझे गुरू. मी त्यांच्याकडून शिकू पाहत होतो. त्यांच्याकडूनच हा प्रसाद मिळावा?
वास्तविक ते एकसंध लिहिलेलं पुस्तक नाही. त्यातील लेख दर वर्षी प्रसिद्ध होत गेलेले. त्यांचं हे संकलन. पहिल्या आणि शेवटच्या लेखात चार वर्षांचं अंतर. पहिला लेख ठरवून लिहिला गेला नव्हता. पुण्याला एका संशोधकांबरोबर मदतनीस म्हणून मी काम केलं होतं. ते अमेरिकेतले मराठी. जी. एस. कुलकर्णी हे त्यांचं नाव. त्यांना इथल्या गरीब वर्गात ङ्गिरून काही अभ्यास करायचा होता. पण या वर्गात त्यांना प्रवेश कसा मिळणार? मी चळवळीत भाग घ्यायचो, म्हणून त्या थरात माझ्या भरपूर ओळखी. कितीतरी मित्रही. त्यामुळे मी त्यांना घेऊन गरिबांच्या वस्त्यांतून ङ्गिरलो. पण गंमत म्हणजे हा अभ्यास संपल्यावरही त्यावर काही लिहावं असं मला वाटलं नव्हतं. मी घटनांवर लिहीत असे. माझे ‘कोंडमारा’मधील दलित अत्याचारावरील लेख, ‘संभ्रम’मधले बुवाबाजीवरचे लेख हे वेगळेच. त्या त्या ठिकाणी जायचं, घटनेची सर्व बाजूंनी माहिती घ्यायची आणि लिहून मोकळं व्हायचं. ही आताची गरीब वस्त्यांमधली यात्रा म्हणजे कुठे घटना नव्हती की त्यात कुणी ङ्गसवणारी, शोषण करणारी व्यक्ती नव्हती, की कुठला ‘हिरो’ नव्हता. म्हणून लिहायचं मनातही आलं नाही. ते लक्षात आणून द्यायचं काम ‘मौजे’च्या श्री. पु. भागवतांनी केलं.
माझ्या भटक्या उत्सुकतेमुळे काम नसलं तरी अनेक ठिकाणी मी डोकावत असे. मुंबईतलं असं ठिकाण म्हणजे ‘मौज’चं ऑङ्गिस. वास्तविक मी ‘साधना’ किंवा ‘माणूस’ किंवा ‘मनोहर’ अशा साप्ताहिकांमध्ये लिहिणारा. ‘मौजे’विषयी मनात दबदबा होता. आपण लिहितोय ते साहित्य आहे की नाही माहीत नव्हतं. जे बघतो ते इतरांना सांगायचं, एवढंच घडत होतं. त्यात कल्पकता नव्हती, नवी पात्रनिर्मिती नव्हती, आकर्षक शेवट नव्हता की ते वाचून डोळ्यांतनं पाणी यावं इतका भावनेचा परिपोष नव्हता. तरीही ‘मौजे’त हमखास जायचोच- श्री. पु.,राम पटवर्धन यांचं बोलणं ऐकण्यासाठी. अशाच एका बैठकीत दुष्काळामुळे पुण्यात दाखल झालेल्या गरीब वस्त्यांविषयी मी भरभरून बोललो. त्यांनी गंभीर चेहरे करून ऐकून घेतलं.
मी पुण्याला परत आल्यावर चक्क श्री. पुं.चा ङ्गोन. जे सांगितलं ते मी लिहावं, असं ते सुचवत होते. मी थक्क. मी साप्ताहिकांचा लेखक. इथे ‘मौजे’चे मान्यवर संपादक मला लिहायला सांगत होते. भल्या भल्या लेखकांकडून त्यांच्या संपादकीय कामाविषयी ऐकलेलं. कथेचा शेवट किती वेळा बदलायला लावला वगैरेच्या कथा. इथे आपलं कसं होणार? पण मला लिहावंसं वाटलं खरं. परत एकदा स्टेशनजवळच्या उघड्यावर बसलेल्या लोकांना भेटलो. परत जिवाला चटका लावणार्‍या हडपसरच्या त्या दुष्काळग्रस्त वस्तीत जाऊन आलो. या वेळी ती दृश्यं पाहून अधिकच विद्ध झालो. जसा गेलो, जशी माणसं आणि त्यांची अवस्था बघत गेलो, तसा मी लिहीत गेलो. तो ‘माणसं’ पुस्तकातील ‘माणसं’ हा पहिला लेख. आश्चर्य म्हणजे ‘मौजे’त तो जसाच्या तसा छापला गेला. पुढे सर्व लेखांचं पुस्तक झालं, तेव्हा त्याचे नावही या लेखाचेच, ‘माणसं’ हे ठरलं. श्री. पुं. नी त्या शब्दासमोर एक उद्गार चिन्ह काढलं. म्हणाले, ‘‘हे ठीक होईल.’’ खरोखरच त्या नुसत्या उद्गार चिन्हामुळे केवढा ङ्गरक पडला. किती अर्थ ध्वनित झाला. मी श्री. पुं. ना मानायचो ते यासाठी.
मला हा एक नवाच रस्ता सापडला. इथे घटना नव्हती, अत्याचार नव्हता की कोणी शत्रू. पण परिस्थितीच अशी, की जिथे आपोआप रोज अनेक अत्याचार घडत आहेत. जिथे रोजचं जीवन हाच परिस्थितीने केलेला अत्याचार आहे. मग तसे मानवसमूह आठवू लागलो, तर आमच्यासमोर नाना पेठ उभीच होती. आम्ही तिथे ‘हमाल पंचायती’चा दवाखाना चालवत होतो. माझी पत्नी सुनंदाचा मी सहायक होतो. आमचे बहुतेक पेशंट म्हणजे हमाल कुटुंबीय. मी हमाल चळवळीत बाबा आढावांबरोबर जमेल तसा सहभागी होत होतोच. पण या हमालजीवनात लिहिण्यासारखं काही आहे असं जाणवलं नव्हतं. मला जाणवलेलं दृश्य असं : आमच्या दवाखान्यासमोर एक ट्रक मोकळा करण्याचं काम चाललेलं. वर ट्रकमधले दोन हमाल ते भलं मोठं शंभर किलो वजनाचं पोतं पलटत पलटत कडेला आणत. एक हमाल त्याचं जाड गोधडीचं जाकीट घालून खाली ओणवा उभा असे. ट्रकच्या कडेला आणलेलं ते पोतं वरनं त्या हमालांनी ढकललं की ते बरोबर खालच्या वाकलेल्या हमालाच्या पाठीवर येई. वरून आलेलं ते पोतं झेललंच गेलं जसं. त्या वेळी त्या खालच्या हमालाचा वेदनेने आक्रसलेला चेहरा मी विसरणं शक्य नाही.
हमालांमधील लक्ष्मणराव सुद्रिक हे ज्येष्ठ हमाल दवाखान्यात येऊन बसायचे. त्यांच्या एका वाक्याने मला असंच हलवलं. म्हणाले, ‘‘या शहरात कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला हमालाची पाठ लागलेली नाही.’’
मी म्हटलं, ‘‘असं कसं?’’
ते म्हणाले, ’’तुमच्या पोटातलं अन्न... ती धान्याची पोती आम्हीच उतरवलीत. तुमच्या पायाखालची ङ्गरशी, या बिल्डिंगचं सिमेंट, तुमच्या दवाखान्यातल्या औषधांचे बॉक्स कुणी उतरवलेत, आम्हीच ना?’’
या वाक्याने मला हादरवलं. हमाल पंधरा एक वर्षंच कामं करतात, पण बंदिस्त गुदामात-धुरळ्यात काम करून त्यांना टीबीसारखे रोग जडतात.. वगैरे मी ऐकत होतोच. पण सुद्रिकांच्या त्या वाक्याने मला एक उलगडा झाला. उलगडा असा, की या सगळ्याचे आरोपी, गुन्हेगार नंबर एक आपणच आहोत. आपण त्यांच्या दु:खांची जबाबदारी टाळूच शकत नाही. त्या दृष्टीने मला लेखाची थीम सापडली. मनात आलं, हा लेख म्हणजे हमालांच्या परिस्थितीचं नुसतं वर्णन नसणार, तर त्यांच्या दु:खाची जबाबदारीही आपणा सर्वांची, हे तो मान्य करणार. त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणार.
त्या लेखाने खूपच खळबळ झाली. ‘मौजे’ला विनंती करून आम्ही त्या लेखाच्या एक हजार प्रती छापून मागितल्या. त्यांनीही त्या कर्तव्यभावनेने विनाखर्च करून दिल्या. आम्ही हमालांमध्ये त्या पुस्तिकांचं वाचन केलं, कारण बरेच हमाल निरक्षर होते. त्यांच्या प्रतिक्रियाही वेगळ्याच. धान्याच्या गुदामातला एक हमाल म्हणाला, हे मिरची गुदामातले हमाल- यांची गुदामं आमच्या शेजारी. आम्ही युनियन मीटिंगला बरोबर बसतो, पण यांचे एवढे हाल आहेत हे आम्हाला कळलं नाही. मालधक्क्यावर ङ्गरशा उतरवणार्‍यांचे हाल इतर हमालांना माहीत नव्हते. कित्येक हमालांना हे त्रास कामाच्या स्वरूपामुळे होतात, संरक्षण नसल्याने होतात, हे प्रथमच कळलं. उदा. सिमेंटची पोती वाहणारे. अंगावरच्या सिमेंटच्या धुळीमधे घाम बसला की वाळून कडक पापुद्रे बनतात, ते घसरून जखमा होतात, वगैरे वगैरे.
हे बघण्याची नजर मला मेडिकलमधल्या प्रिव्हेंटिव मेडिसिनने दिली. कामावरच्या परिस्थितीमुळे, असुरक्षिततेमुळे कामगारांना शारीरिक त्रास होतात, त्याविषयी माहिती त्यात होती. ती पुस्तकं आता समोर जिवंत झालेली पाहत होतो.
मी त्या लेखात हमालांच्या कमाईपेक्षा त्यांच्या कामामुळे होणार्‍या प्रश्नांवर भर दिला होता. अंधारी गुदामं, त्यात खिडक्या नाहीत की वर पंखे नाहीत, वगैरे. त्या उल्लेखानंतर हमाल पंचायतीच्या मीटिंगमधे संपाच्या मागण्यांचा क्रम बदलला. या सुधारणांना पहिला क्रम. मग पगारवाढ. काही खराब गुदामं हमालांनीच बाद केली. आम्ही अशा गुदामात काम करणार नाही... असं बरंच काही घडलं. त्या काळात दवाखान्यात एक शेटजीही औषधाला आले होते. मी कुणाला तरी हमालांच्या प्रश्नांविषयी सांगत होतो, तर ते शेटजी म्हणाले, ‘‘काही सांगू नका डॉक्टर. या हमालांना भरपूर कमाई असते. त्यांच्या डायर्‍या बघा.’’ ऐकणारा एक तरुण हमाल पोरगा म्हणाला, ‘‘असं हाय ना, मंग तुमच्या पोरालाही घाला की हमालीत!’’ शेटजी म्हणाले, ‘‘हे काहीही बोलताहेत.’’ असं म्हणून उठूनच गेले. तो पोरगा म्हणजे त्या युनियनमध्ये तयार झालेला ताठ कण्याचा ग्रामीण तरुण.
असं प्रत्येक लेखाविषयी लिहायचं म्हटलं तर खूप लिहावं लागेल. पुढच्या झोपडपट्टीवरच्या लेखाविषयी थोडं आठवतंय ते सांगतो. झोपडपट्टीतल्या लोकांविषयी गैरसमज खूप. उदा. ते गरीब नसतातच. त्यांच्या घरात सगळे मिळवते असतात. घरात टीव्ही, ट्रांझिस्टर... वगैरे असतात. मी त्या तरुण हमालाची आठवण ठेवून असं म्हणणार्‍या एका गृहस्थांना म्हटलं, ‘‘तुम्ही एक दिवस झोपडीत राहून दाखवा. दुसर्‍या दिवशी तुम्ही म्हणाल ते मान्य.’’ तेही तसेच निरुत्तर झाले. पण मी त्यांच्या जागी असतो तर ते आव्हान म्हणजे संधी मानली असती. पण त्यांना तसं करावंसं वाटलं नाही.
मी पुस्तकात लिहिलं आहेच, पण तरीही काही दृश्यं आठवताहेत. तिनईकर सेक्रेटरी असताना मी त्यांच्याबरोबर परळच्या टेकडीच्या उतारावरची एक झोपडी पाहिली होती. पावसाळ्यात वरनं मोठमोठ्या शिळा गडगडत येतात. तसं तिथे झालेलं. एका झोपडीत गेलो, तर छप्पर ङ्गाटलेलं आणि मोठ्ठी शिळा (त्या झोपडीच्या आकाराची). समोर शिळेखालून बाहेर आलेला हिरव्या लुगड्याचा काही भाग आणि एक चिरडलेला पिंजरा. या दोन खुणा आत काय झालंय ते सांगत होत्या. मी नि:शब्द झालो होतो. पण पुढचा आघात त्या शिळेपेक्षा मोठा. ती माणसं तिनईकरांना हात जोडून सांगत होती, ‘‘आम्हाला इथून हलवू नका. आम्ही पुढच्या वर्षी आधीच वरचे दगड ढिले करून काढून टाकू.’’ काय म्हणायचं?
झोपडपट्टीवर लिहावं, असं वाटायलाही कारण मीरा बापटचं संशोधन. ती लंडन युनिव्हर्सिटीहून अभ्यासासाठी आलेली पूर्वीची वर्गमैत्रीण. तिलाही असाच त्या गरीब जगात प्रवेश मिळत नव्हता. तो आणीबाणीचा काळ होता. बाबा आढाव तुरुंगात होते. मी ‘पुरोगामी सत्यशोधक’च्या संपादनासाठी बाहेरच राहिलेलो. चळवळी ठप्प होत्या. मलाही वेळच वेळ होता. पण मी त्यात शिरलो तो मीराच्या एका वाक्याने : ‘‘या वस्त्या हा शहराचा अविभाज्य भाग आहे, आणि एवढंच नव्हे तर तो आवश्यक भाग आहे.’’ हे शहर चालवणार्‍यांतला मोठा वर्ग शहरातल्या महागड्या घरात जाऊ शकत नाही, तो इथे असतो. बहुतेक कामगार, रिक्षावाले, बरेचसे पोलिस शिपाई, शहर स्वच्छ ठेवणारे सङ्गाई कामगार, मेकॅनिक, वायरमन, हॉस्पिटलमधली सङ्गाई करणारे, वॉर्डबॉईज, पेपर-दूध टाकणारी पोरं... सगळे अशाच वस्त्यांमध्ये राहतात. त्यांच्याशिवाय हे शहर चालूच शकणार नाही, हे कळल्यावर जसे डोळेच उघडले. नंतर परत एकदा पाहणी केली. त्यातनं लेख तयार होत गेला. त्या वेळी मी झोपडी संघाच्या कामातही असे. बाबा, शांती नायक, कल्याणकर, चिल्लाळ अशी आमची लढाऊ गुरू मंडळी.
ऐन पावसाळ्यात महानगरपालिका झोपड्या उठवायची. त्यांचे गरिबीचे संसार उद्ध्वस्त करायची. मग त्यांना आम्ही अडवायचो. त्यातनं आम्हाला एखादा दिवस पोलिस लॉकअपमध्ये घालवायला लागायचा. नागझरी या नाल्यात नदीच्या पुराचं पाणी शिरलं की कडेच्या झोपड्यांतही पाणी शिरायचं. मग त्यांना हलवा एखाद्या म.न.पा.च्या शाळेमधे. ते उघडे संसार, तिथल्या तिथे तीन दगड शोधून काटक्यांची आग पेटवून भाकरी थापणार्‍या बायका आठवल्या की वाटतं, या खर्‍या भारतमाता! कितीही आपत्ती आली तरी रडत न बसता भुकेल्या पोरांच्या तोंडात घास कोंबणारी ही खरीखुरी आई.
कुठे आपलं जग आणि कुठे हे, अशी सारखी तुलना मनात येई. मित्रांपैकी वगैरे कोणी जागा कमी आहे म्हणून कुरकुरत असला तर मनात यायचं, अरे, तिकडे ज्या घरात उभंही राहता येत नाही अशा झोपड्या बघ आणि मग खंत कर. त्या वेळी मी शिबिरात सर्वत्र बोलताना एक वाक्य बोलायचो, ‘‘ज्यांच्या डोक्यावर छप्पर आहे, ज्यांच्या घरात दोन वेळ अन्न शिजतं, ज्यांना मुलं शाळेत पाठवता येतात त्यांनी समाजाकडे आता काही मागू नये. कारण हेही नसलेली किती तरी माणसं जगत आहेत. त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे.’’
या पाहणीतनं आणि लेख लिहिल्यावर हे समजलं. लेख लिहिणं ही मलाच शहाणं करण्याची एक प्रक्रिया होती. माझ्या भोवतीच्या जगाकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो.
जसं ते लक्ष्मणराव सुद्रिकांचं वाक्य, मीराचं वाक्य. या वाक्यांनी जशी जग बघायची दृष्टी दिली, तसंच निपाणीवरच्या लेखाबाबत झालं. तेव्हा सुनंदा मेंटल हॉस्पिटलमधे काम करीत होती. तिथे निपाणीचे पेशंट घेऊन एक गृहस्थ आले होते. ते बहुधा तंबाखू गुदामात मुनीम होते. ते मला भेटायला घरी आले. एका धंद्याने व्यापलेलं गाव कसं असतं याविषयी मला कुतूहल होतंच. मी त्यांना विचारत राहिलो. तिथली भयानक परिस्थिती त्यांना पुरती सांगवेना. ते इतकंच म्हणाले, ‘‘काय सांगू तुम्हाला, आमचं निपाणी म्हणजे अंधेरनगरीच आहे!’’ ते ऐकून मी थरारलोच. निपाणीचा आमचा चळवळीतला मित्र सुभाष जोशी. आमच्या देवदासींविषयीच्या कामात तो असे, पण या परिस्थितीविषयी तो कधी बोलला नव्हता.
मग काय... मी निपाणीत दाखल झालो. त्या तंबाखू कुटणार्‍या महिला सकाळी आठपासून रात्री बारा-बारा वाजेपर्यंत गुदामात असायच्या. त्या इतक्या दडपणाखाली असत की एखादीला मालकाने ऑङ्गिसवर बोलावलं की तिला त्याची जी इच्छा असेल ती पुरी करावीच लागे. घरी नवरा छोटा शेतकरी किंवा शेजमजूर. त्याला हे सांगितलं तर तो उलट हिलाच घराबाहेर काढायचा... म्हणून त्या महिलेचा अक्षरश: तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती.
त्या बायका कुणाशीच बोलायला तयार नसत. त्या पहाटे साडेपाच-सहालाच त्यांच्या चार-सहा कि.मी. अंतरावरच्या गावातून निघायच्या. त्यामुळे मी पहाटे पाचलाच मित्राबरोबर तिथे जाऊन थांबू लागलो. त्या जराशा पळत चालायच्या. मग आम्हीही त्यांच्याबरोबर तसे पळत चालायचो. तीन-चार दिवसांनी त्या बोलू लागल्यानंतर त्यांच्या जीवनाची खिडकीच उघडली आणि दु:खाचा, शोषणाचा मोठा झोतच डोळ्यांवर आदळला.
निपाणीवरचा लेख मी ‘पुरोगामी सत्यशोधक’मधे छापला. तो हिंदीमधे भाषांतर करून ‘गांधी मार्ग’मधे आला. तिथून तो हिंदीतील ‘दिनमान’मधे पुनर्मुद्रित झाला. हमालांप्रमाणे याही लेखाच्या हजार प्रती काढून निपाणीला पाठवल्या. त्यांचं तिथे वाचन झालं. या विषयावर गावात आतापर्यंत चिडीचूप होतं, पण या लेखामुळे तो विषय आता ढवळला गेला. त्यानंतर एका मालकाने एका महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, तेव्हा सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्या मालकाला चपलेने बडवत एका मैदानात आणलं. मग त्या सुभाष जोशीकडे आल्या. म्हणाल्या, ‘‘सर, आम्हाला तुमच्या युनियनमधे यायचंय.’’ ज्या महिला साधं बोलायला तयार नव्हत्या त्या महिला या प्रसंगाने हजारोंच्या संख्येने युनियनमध्ये आल्या. नंतर तसे अत्याचार स्त्रियांवर कधी झाले नाहीत. कामाच्या वेळा निश्चित झाल्या... असं बरंच काही घडलं.
या पुस्तकातला सगळ्यात प्रदीर्घ लेख म्हणजे भटक्या विमुक्तांवरचा. त्याला ‘अनिकेत’ हे शीर्षक संपादकांपैकी कोणी तरी दिलं असावं. प्रत्यक्षात असं आकर्षक त्यांच्या जीवनात काही नाही. त्यांच्या जीवनात आहे रानोमाळ भटकंती, काही दांडग्या गावकर्‍यांचा त्रास, अंगावर ङ्गाटके कपडे.... पोलिसांनी आळ घेऊन भीषण मारहाण करणं... इत्यादी इत्यादी. येरवड्याच्या आमच्या घरासमोर एकदा एक भटकं कुटुंबं पाहिलं. त्यांच्याकडून कळलं, की त्यांची दर वर्षीची कोकण ते देश आणि देश ते कोकण अशी भटकंती चालू असते. या लोकांची कुठे ‘पालं’ पडलेली दिसली की मी थांबायचोच... आणि मग नवं जग दिसायचं. आपल्या समाजाच्या पोटात किती जाती लपल्या आहेत कोण जाणे! एकदा एक मैदानातलं पारध्यांचं पाल लांबून दिसलं. त्यांनी पालाला लाल रंगाची झालर लावलेली. मी म्हटलं, वा वा! आज काय सणबिण आहे की काय? जवळ जाऊन बघतो, तो त्यांनी रेडा कापलेला आणि त्याची आतडी पालावर वाळायला टांगलेली. बाप रे! असं दृश्य मी प्रथमच पाहत होतो. किती वेगळं जीवन! रानातले मसणजोगीही पाहिले... किती सांगायचं?
हा लेख खूप मोठा होत गेला. जवळपास मी चार वेळा परत लिहून काढत कमी करत आणला, तरी अंकाची बावीस पानं होतील एवढा मजकूर. अखेरीस दिला तसाच पाठवून, आणि गंमत म्हणजे राम पटवर्धनांनी छापला जसाच्या तसा. मी संपादकांना म्हणालो, ‘‘पहिल्यांदाच या जमातींवर लिखाण येत होतं, म्हणून मी लेखाच्या सौष्ठवाचा विचार सोडून दिला.’’ यावर संपादक हसून म्हणाले, ‘‘तो लेख पाहून आम्हीही अंकाच्या सौष्ठवाचा विचार सोडून दिला!’’
लेख वाचल्यावर लक्ष्मण माने म्हणाला, ‘‘मी त्या जातीत जन्मलो पण आमच्यात एवढ्या जाती आहेत हे मलाही माहीत नव्हतं.’’ नंतर त्याने ‘उपरा’ लिहिलं. भटक्या विमुक्तांची संघटना काढली. लक्ष्मण गायकवाड याने ‘उचल्या’ हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर त्यांची संघटना लढेही देऊ लागली. भटक्या समाजावर मी लेख लिहिला तेव्हा कुणाचा आधार नव्हता. यावर कुणी लिहिलेलं पुस्तक नव्हतं की ना त्यांच्यात काम करणारं कोणी होतं. मुंबईत राहून नगरसेवक असलेले दौलतराव भोसले मात्र भेटले. त्यांनी बोलावलेल्या परिषदेपासून सुरुवात झाली. पुढे वार्धक्य, आजारपण यामुळे दौलतराव काम करीनासे झाले. नंतर लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके ही पिढी उदयाला आली. या प्रक्रियेला हात लागणं हे लेखकांचं श्रेय.

तरीही एक प्रश्न आहेच. खरोखर लेखनाचा समाजजीवनावर परिणाम होतो का? ‘माणसं’मधल्या लेखांपैकी हमाल, तंबाखू कामगार यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. पण तो नुसत्या लेखाचा झाला असता का? पुण्यात बाबा आढावांची, निपाणीत सुभाष जोशींची संघटना होती, चळवळ होती म्हणून त्यांनी लेखांचा उपयोग करून चळवळ पुढे नेली. पण ही चळवळ नसती तर? मग जिथे चळवळ नसते तिथे लेखनाचं काय प्रयोजन? लिहिणार्‍याने आपल्या मर्यादा आणि ताकद लक्षात घ्यायला हवी. लेखन हे दृष्टी देण्याचं काम करतं. काही वेळा प्रत्यक्ष उपयोग दिसत नसला तरी बीजं पेरली जात असतात. ती विखरून पडतात. कुठे तरी रुजतात. नाही तरी वनस्पती एवढ्या बिया जमिनीवर टाकतात, त्यातल्या किती थोड्या रुजतात! बाकीच्या मरतात. पण त्या वाया जातात का? नाही. जमिनीला त्या वेगळ्या प्रकारे समृद्ध करतातच की!
‘माणसं’मधील लेखांचे असे दूरस्थ परिणाम आजही ऐकू येतात. या पुस्तकामुळे गरिबांकडे पाहायची दृष्टी बदलली, ही प्रतिक्रिया तर नेहमीचीच. सुस्थितीतला माणूस या प्रश्नांबाबत काही करायला जाणार नाही, पण निदान आसपासच्या गरिबांकडे जास्त माणुसकीने पाहायला लागला असेल. उशिरा आलेल्या मोलकरणीकडे पाहायचा मालकीणबाईंचा सूर खालचा असेल. कदाचित उशिराचं कारण त्या समजावून घेतील. हा दृष्टीतला बदल किती महत्त्वाचा! गरीब म्हणजे कामचुकार, चोर अशी भावना जाऊन ‘तीही आपल्यासारखीच माणसं आहेत’ ही भावना पसरणं किती महत्त्वाचं! आणि हमालांमधे लेखनाच्या वाचनानंतरची प्रतिक्रिया तर किती आश्चर्याची! त्या हमालांना शेजारच्या हमालाचं दु:ख कळलं. गरिबांमधेही असा डोळसपणा येतो, हेही काम मोठंच.
वाचकांच्या प्रतिसादाचं मलाही आश्चर्य वाटतं. ‘अंतर्नाद’ या गंभीर प्रकृतीच्या मासिकाने त्यांच्या वाचकांना गेल्या शंभर वर्षातील शंभर पुस्तकांची निवड करायला सांगितलं. त्या शंभरात ‘माणसं’ होत. एवढंच काय त्यातनंही वीस पुस्तकांची निवड करायला सांगितली, तर त्यातही ‘माणसं’ होतंच. आपल्या पोराचं हे कवतिक कुठल्या आईला आवडणार नाही?
’माणसं’ या पुस्तकात हालअपेष्टा, शोषण, भीषणता खच्चून भरली आहे. तरीही हे पुस्तक लोक वाचतात याचं मला आश्चर्य वाटते. यात अजिबात रंजकता नाही, उलट दाहकता आहे. तरीही पैसे खर्चून लोक ते वाचतात. हे पुस्तक मागे कधी तरी विद्यापीठाने एम.ए.ला अभ्यासक्रमात नेमलं होतं. तेव्हा शिकवणारे एक प्राध्यापक सांगत होते, ‘‘तुमचं पुस्तक शिकवताना वर्ग नुसता खळबळत असतो. वर्गातल्या मागच्या बाकावरची मुलं एरवी उदासीन असतात, ती मुलंही मोठमोठ्याने बोलत हातवारे करीत सहभाग घेतात. एरवी दुसरं काही शिकवताना वर्ग झोपाळलेला असतो.’’ असं का व्हावं? आनंद यादव म्हणाले होते, ‘‘तुमच्या पुस्तकावरचा प्रश्न मुलं उत्साहाने सोडवतात. भरभरून लिहितात.’’ त्या मुलांना एकदा भेटल्यावर विचारलं, तर म्हणाले, ‘‘ते प्राचीन मराठी आम्हाला कळत नाही. तुमचं कसं सोप्पं असतं! तुम्ही बोलल्यासारखं लिहिता.’’
माझं सगळं लिहिणंच बोलल्यासारखं. त्यामुळे आपण बोलताना कधी अवघड शब्द वापरत नाही, तसेच इथेही ते नसतात. त्यामुळे वाचकाशी प्रिय मित्रासारखा संवाद हे पुस्तक करतं. मला साहित्यिक भाषा येत नाही. मला साहित्यिक व्हायचंही नव्हतं. हे प्रश्न लोकांपर्यंत जावेत, याच इच्छेने मी हे सर्व लिहिलं. कुणाला काल्पनिक वाटू नये म्हणून सगळ्या व्यापार्‍यांची, अडत्यांची नावं तीच ठेवलीत. ज्यांना शंका असेल त्यांनी तिथे जावं, पाहावं हा हेतू.
या लेखांची मला मिळालेली एक देणगी म्हणजे या लेखांनी मला साप्ताहिकातील छोट्या लेखांकडून दिवाळी अंकातल्या मोठ्या लेखांकडे आणलं. मी घटनेऐवजी समूह पाहू लागलो. पूर्वीच्या लेखाचा अभ्यास सात-आठ दिवसांचा. आता वर्ष-वर्ष त्यांच्यात राहून त्यांचं जीवन अनुभवू लागलो. पूर्वी मी प्रश्न विचारायचो. आता मी सगळं जीवन न्याहाळू लागलो. काही प्रमाणात अनुभवूही शकलो. यात प्रश्न विचारणं हा भाग थोडाच राहिला. पूर्वी घटनेला दोन-चार-सहा पदर असत. ते शोधणं, ऐकणं हे काम होतं. इथे समोर मानवसमूह होता. त्यांच्यात प्रवेश मिळवणं अवघड होतं. घटना घडली असेल तेव्हा मनं संतापलेली किंवा हताश असतात. त्यांना बोलकं करणं सोपं काम असतं. इथे वर्षानुवर्षांची परिस्थिती स्वीकारलेली. हलाखीतली बिनतक्रार माणसं. ‘इथून उठवू नका’ अशी तिनईकरांना विनंती करणारी. हे नवं आव्हान होतं. पण एकदा लोकांनी आपल्याला स्वीकारलं की एका मोठ्या विस्तीर्ण जगात आपण मिसळून जातो, हा एक कृतार्थ क्षण.
पण माझ्या या लेखनावर कुणी समीक्षकांनी ‘हे ललित साहित्य आहे की नाही’ यावर खूप वाद घातला. ‘हे प्रभाकर पाध्ये, दुर्गा भागवतांसारखं ललित साहित्य नाही. मग याला कुठल्या कॅटॅगरीत बसवावं?’ वगैरे. पण मला याच्याशी कर्तव्य नव्हतं. झोपडीत गडगडत आलेल्या शिळेखाली चिरडल्या गेलेल्या हिरव्या लुगड्यातल्या स्त्रीने मला अस्वस्थ केलं होतं. ङ्गरशी उचलताना ती मधेच कचकल्याने पायावर येऊन ज्या हमालाच्या पायाचा तुकडा पडला त्या हमालाशी मला कर्तव्य होतं.
या पुस्तकाला अनेक पारितोषिकं मिळाली. त्यातलं एक लक्षात राहिलं. विंदा करंदीकर त्यांच्या नातीला घेऊन पुण्यातल्या त्यांच्या लेकीच्या घरासमोर उभे होते. मी थांबलो. विंदा त्यांच्या नातीला म्हणाले, ‘‘हे मोठे लेखक आहेत. यांनी ‘माणसं’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कारही मिळालाय.’’ मी हसून म्हटलं, ‘‘त्या पुस्तकाला तो पुरस्कार मिळाला नाही. पण आत्ता तो मिळाला!’’
या पुस्तकाने मला पुढची दिशा दाखवली. आधीच्या चळवळीत माझं मन रमत नव्हतं. हे लिहिताना वाटलं, की आपल्याला झेंडे घेऊन घोषणा देत रस्त्याने ङ्गिरता येत नसेल, पण या लिहिण्याच्या मार्गाने समाजऋण ङ्गेडूयात. हेही एक समाजकार्यच की! पण चळवळीतल्या एका विचारवंताने या पुस्तकावर आक्षेप घेतला होता, की ‘या लिखाणात वैचारिक मांडणी नाही.’ त्यावर माझं म्हणणं असं होतं, की ‘समाज कसा जगतोय ते मी लिहितोय. त्यावर तुम्ही वैचारिक मांडणी करा की. सगळी कामं एका माणसाला कशी जमतील? आपल्याला जमतं ते काम आपण करावं.’
त्यानंतर मी वेश्या, देवदासी, यंत्रमाग कामगार, थिएटरमधले डोअरकीपर्स, हळदीच्या पेवात उतरून धोकादायक काम करणारे कामगार... अशा बर्‍याच विषयांवर लिहिलं. काही काही प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करून ‘प्रश्न आणि प्रश्न’ हे पुस्तक लिहिलं. त्यातला मच्छीमारांवरचा लेख वाचून माझे गुरू धोंडे सर म्हणाले, ‘‘हे तर पीएच.डी.चं काम आहे.’’ त्याने मला खूप हुरूप आला. त्या काळात आमची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची. सुनंदाला मिळणार्‍या पाचशे रुपये पगारात आम्ही भागवत होतो. काही मित्र म्हणाले, ‘‘तू इंग्लिशमध्ये लिहीत जा. तिथे भरपूर पैेसे मिळतील.’’ मी म्हणालो, ‘‘मी माझ्या लोकांवर लिहितो. त्यांच्यासाठी कोणी करू शकेल तर ते लोकही मराठीच. इंग्रजीत लिहून काय करू? दिल्लीत बसून कुणी हा लेख वाचला तर तो कसा यांच्यासाठी काम करणार? नंतर कुणी भाषांतर केलं तर माझी हरकत नाही.’’
‘माणसं’ या पुस्तकाने मला ओळख दिली. लोकांना माझी ओळख पटली असेल, तशी माझी मलाही झाली. या पुस्तकाने मला रस्ता दाखवला, तो मी चालू शकतो असा आत्मविश्वासही दिला.
ऐंशी सालात प्रकाशित झालेलं हे पुस्तक बाजारात अजून टिकून आहे. बारावी आवृत्ती संपत आली आहे. १९७४ ते ८० या दरम्यान लिहिलं गेलेलं हे लेखन आजच्या तरुणाला वाचावंसं वाटावं हे आश्चर्यच. सद्भावना अजून टिकून असल्याची ती पावतीच. हे लेख लिहिले तेव्हाच्या परिस्थितीत आता काही बदलही झाले आहेत, पण दैन्य, दारिद्य्र, शोषणाची रीत तशीच आहे. संपन्नता आली आहे पण ती वरच्या वर्गात. झोपडपट्टीत रेडिओ, टीव्ही, मोबाइल आले आहेत, पण मिठी नदीला पूर आला की अख्खी वस्ती पाण्याखाली जायची राहत नाही. आपल्या चांगुलपणाचे विसर्जन जसे!
या पुस्तकाने मला जागं केलं, सर्वांसहित जगायला शिकवलं.
- अनिल अवचट
दूरध्वनी : ०२०-२५६५९४०७
aawachat@gmail.com

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा