बिनामस्टरची कंपनी

- मिलिंद सरवटे.

तेराशे कर्मचारी काम करत असलेली एखादी कंपनी बिना मस्टरची चालते असं जर कोणाला सांगितलं, तर त्या व्यक्तीचा चटकन विश्वास बसणार नाही. शिवाय एवढं करून ती कंपनी वर्षाला एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा नफा मिळवते असं सांगितलं, तर ती चक्क थापच वाटेल. पण हे प्रत्यक्षात घडतं आहे. फार दूर नाही, तर आपल्या मुंबईतच. ‘सफोला’ आणि ‘पॅराशूट’ सा-या नामवंत ब्रॅड्सची मालकी असलेल्या ‘मॅरिको’ या कंपनीनं हा चमत्कार प्रत्यक्षात साकारला आहे.

कसा, ते सांगत आहेत या यशस्वी प्रयोगाचे एक शिल्पकार आणि ‘मॅरिको’च्या एच आर आणि स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख मिलिंद सरवटे...

- जानेवारी, २००९.

सुप्रसिद्ध वैश्विक कवी शेल सिल्व्हरस्टाइनची एक सुंदर कविता आहे. तिच्या ओळी ‘शेकड्या-हजारांमधे माणसं कामाला असूनही ब-याच संस्था-कंपन्या मोठं उद्दिष्ट का गाठू शकत नाहीत?’ या प्रश्नाचं उत्तर अत्यंत समर्पकपणे देतात.

जगन्नियंता म्हणतात-

तो एकदाच भेटला मला.

हसून म्हणाला,

‘‘काय लेका, चालवतोस हे जग? घे हे चक्र... काही काळ खराखुरा जग.’’

मलाही आयडिया बरी वाटली.

‘‘हरकत नाही’, म्हणालो मी.

‘‘पण, एकदाच नीट सांग-

माझा टी. ए. काय? डी. ए. काय?

बोनस किती मिळेल?

लंच-टाइम कधी होईल?

आणि रजा कशी असेल?

जॉब सोडताना नोटिस कोण कुणाला देणार?

ज्युरिसडिक्शन कुठलं, आणि...’’

‘‘आण ते चाक इकडे !’’ खेकसलाच तो.

‘‘जग असं चालत नाही!

तुझ्यापुरतंच म्हणशील, तर तुझं काही खरं नाही.’’

जगन्नियंता म्हणतात तो पुन्हा कधीच भेटला नाही.

मला कधीच भेटला नाही! (स्वैर अनुवाद)

या कवितेतला ‘तो’ स्वत: कुठेच, कुठलीच जबाबदारी न घेता फक्त ‘सेवाअटी, शर्ती व नियम’ काय काय आहेत, याच्या चौकशा करतोय. त्यामुळे साक्षात देवानं जग चालवण्याची संधी देऊनही, विश्वास टाकूनही तो ते चाक हातात घेऊच शकत नाही. मथितार्थ, कितीही चांगली, व्यावसायिक संस्था-कंपनी जरी काम, नोकरी करण्यासाठी मिळाली, तरी जर नोकरदार माणूस सक्षमपणे, एका दृढ विश्वासानं काम करू शकत नसेल, आपल्या नोकरीच्या ठिकाणावर जर त्याची श्रद्धा नसेल, तर त्याची आणि पर्यायानं कंपनीची वाढ कशी होणार? कुठून आणि कशी ते दोघंही मोठी उद्दिष्ट्यं साध्य करू शकणार?

अर्थात, भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात आजवर बोटचेपे नोकरशहा जसे होते, तशा पिळवणूक, मनमानी करणा-या कंपन्याही होत्या. गडबड दोन्ही बाजूंनी होती. शेवटी ‘सेवा मागणारा’ आणि ‘सेवा पुरवणारा’- हे नातं भले व्यावसायिक असेल, पण ते आहे एक नातंच. इतर नात्यांसारखाच ‘विश्वास’ हा त्याचा भरभक्कम पाया असायला हवा. आणि भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात ब-याच जागी हा विश्वास डळमळीत होत जाताना आपण पाहतो. त्याची कारणं अनेकविध असू शकतात. परंतु, हा ‘विश्वास’ हे एक मनुष्यबळ विकासाचं एक मूल्य म्हणून अंगिकारणारी एक संस्था आहे, हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. ‘आमची’ कंपनी... ‘मॅरिको’!

आणि या विश्वासाची घट्ट वीण असूनही ती काही चार-दोन लोकांची छोटी किंवा घरगुती कंपनी नाही. २००३-०४ मधे १००० कोटी रुपयांची आमची उलाढाल होती, जी या वर्षी बहुधा २४०० कोटींपर्यंत पोहोचेल. आमच्या ‘पॅराशूट’, ‘सफोला’ या ब्रँड्सनी तर लोकांचा विश्वास कमावला आहेच; पण नव्यानं स्थिरावू पाहणारा आमचा ‘काया’ ब्रँडही त्याच मार्गावर आहे.

जगभर पसरलेली आमची ‘टीम’ आहे... संशोधन, विक्री, विपणन, मनुष्यबळ विकास, अर्थविभाग, या सगळ्याच कामांमधे कार्यरत. भारतात जवळपास तेराशे लोक आमच्याकडे काम करतात. या सगळ्यांचीच कार्यक्षमता, उत्पादकता ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशीच आहे. आमचा गेल्या वर्षीचा निव्वळ नफा होता १६९ कोटी रुपये, जो चालू वर्षी आणखी वाढेल. गेल्या तीन वर्षांत आमच्या विक्रीत ३०% आणि नफ्यामधे ४०% वाढ झालेली आहे. आम्ही ‘तिकडची’ कंपनी नाही, आम्ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहोत. पाच देशांमध्ये आमच्या शाखा आहेत आणि तीस देशांत आमची उत्पादनं विकली जातात. केवळ ‘विश्वासा’वर आणि कार्यक्षमतेवर इतकी मजल आम्ही मारू शकलो आहोत.

‘मस्टर’ ही कल्पनाच आमच्याकडे नाही, इथपासून विश्वासाच्या या धाग्यांच्या विणेची सुरुवात होते. आपल्या स्वयंनिर्णय आणि जबाबदारीनंच मॅरिकोमधला सेवकवर्ग कामावर येतो-जातो. कोण केव्हा आलं-गेलं हे बघत बसण्याच्या अनुत्पादक कामापेक्षा एखाद्या सहका-याचं ‘मॅरिको’मधे एकंदर ‘कॉंट्रिब्युशन’ काय, याकडे आमचं लक्ष असतं. म्हणून ‘मस्टर’ नाही. पण नुसतं ‘मस्टर’चं नष्टर नाही इथेच हे थांबत नाही. आमच्याकडे ‘कॅज्युअल लीव्ह’ हा प्रकारही नाही. कारणपरत्वे, जर गरज भासलीच, तर आमच्यापैकी कुणीही, कोणत्याच अर्ज-विनंत्या न करता चार दिवसांपर्यंतही कामापासून दूर राहू शकतो. वैद्यकीय आणि ‘प्रिव्हिलेज’ रजा मात्र आहेत- कामापासून लांब राहणं आवश्यकच झालं तर.

इतकंच काय, आमच्याकडे किरकोळ खर्च मंजूर करणे (एक्स्पेन्स ऍथॉरायझेशन) हाही प्रकार आम्ही ठेवलेला नाही- ‘बॉस’च्या अखत्यारीत. कामादरम्यान पूर्वनियोजित खर्चाचा भाग जर समोर आला, तर ‘मॅरिको’वासी कुणीही सरळ व्हाउचर बनवून कॅशियरकडे जाऊन सरळच पैसे घेऊ शकतं. पैसे देण्याघेण्याच्या आमच्या एका अद्वितीय पद्धतीनं हे शक्य केलंय. आम्ही या पद्धतीला म्हणतो, (क्लेम एक्स्पेन्सेस अगेन्स्ट सेल्फ ऍथॉरायझेशन) परस्परसंशयाचं निराकरण करून विश्वासाचा पाया आणखी मजबूत करणारी ही सोय आहे.

हे सगळं आम्ही का करतो? आम्ही भिडस्त आहोत का? आमच्याकडे ‘वरिष्ठ’ अधिकारीच नाहीत का? काहीच नियंत्रण न ठेवता ‘मॅरिको’ चालते तरी कशी? वाचकांच्या मनात उद्भवलेल्या या सगळ्या प्रश्नांचं एकच मूलभूत उत्तर म्हणजे ‘विश्वासानंच विश्वास वाढतो’ हे सूत्र. त्यामुळे स्वेच्छेचं, स्वयंशिस्तीचं वातावरण आपोआप निर्माण होतं. त्यानं मग आपसूकच भरीव सक्षमीकरणही होतंच.

अशा सक्षम, प्रोत्साहित चमूला मग अनावश्यक ‘बॉसिंग’ची गरजच नसते. व्यवसायात चांगली फळं मिळावीत, यासाठी संबंधित विषयावर त्यांना निर्णय घेण्यासाठी थोडंसं दिशादर्शन केलं की पुरेसं असतं. आमचा व्यावसायिक नफा येतो तो यातूनच. सबल, सक्षम बनवणा-या कार्यपद्धतीचा तो एक परिणाम आहे इतकंच.

ऊठसूठ प्रत्येक व्हाउचरसाठी वरिष्ठांची मंजुरी, हे म्हणजे आपल्या घरच्यांपैकीच कुणाला तरी साध्या काही खर्चासाठीही कुटुंबप्रमुखाची ‘मंजुरी’ घ्यायला लावण्यासारखंच आहे. कल्पना करा... तुम्ही आजारी आहात- आणि औषध आणायला जाण्याआधी मुलीनं तुमच्या हातात एक व्हाउचर सरकवलं- म्हणजे मग तिला तुमच्या बायकोकडून ते पैसे ‘सँक्शन’ करून मिळणार असतील- तेही जर ‘कॅश सेक्शन’ तेव्हा चालू असेल तर! नाही, आपण असं करत नाही. आणीबाणीच्या वेळी आपण जर काम करणा-यावर पूर्ण विश्वास टाकतो, तर एरवीही तोच विश्वास ठेवायला काय हरकत आहे? ‘विश्वास’ आणि ‘मोकळेपणा’ या दोन डगरी पक्क्या ठेवल्या तर मग आपण आपल्या लोकांबरोबर एक मोठा सर्जनशील धोका घेऊ शकतो. त्यांनी उत्कृष्ट ‘रिझल्टस्’ देण्याची शक्यता अधिक असणारा धोका!

पण या सगळ्याचा अर्थ असा नाही, की ‘मॅरिको’त अंदाधुंदी आहे, सावळा गोंधळ आहे, अनागोंदी कारभार आहे. अजिबात नाही. आमची निश्चित कार्यसंस्कृती (वर्क कल्चर) आहेच. त्या सगळ्यात न बसणारं जर कुणी आलंच, असलंच - तर ही कार्यसंस्कृतीच त्याला दूर करायलाही समर्थ आहे. काही जीवनमूल्यांवर आधारित अशी ही कार्यसंस्कृती आहे. ही मूल्यं एखाद्या दीपगृहासारखी आहेत. कधी वेळ आलीच, तर ती ‘मॅरिको’तल्या सर्वांनाच दीपगृहासारखी मार्गदर्शनही करतात. ‘मॅरिको’ समूहाच्या सभासदांना हे माहीत असतं, की ते या मूल्यांच्या बरोबरीनं आहेत की नाहीत. त्यातूनच त्यांना निर्णय घेऊन कृती करण्याची प्रेरणा मिळते. बरं, ही मूल्यंदेखील आम्ही प्रचारकी, जुनी-पुराणी, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ अशी ताठर ठेवतच नाही. आमच्या दृष्टीनं ही मूल्यं म्हणजे इष्ट वर्तणुकीतून चांगले व्यावसायिक परिणाम येण्यासाठी असलेले आमच्याच कार्यसंस्कृतीचे घटक. हा तक्ताच पहा, की चांगले ‘बिझनेस रिझल्ट्स’ येतात कुठून.... (आकृती क्र.१ पाहा)

सुनिश्चित ठरवलेल्या सकारात्मक मूल्यांची सर्वाधिक मदत होते ती कोंडी फोडण्यासाठी. आमच्यातल्या कुणालाही एखादी समस्या सुटत नसेल, कोणता पर्याय निवडावा याचा निर्णय होत नसेल, तर या मूल्यांना सर्वांत सुसंगत असा कुठला पर्याय आहे, हे निवडलं की इष्ट उत्तरं आपोआपच मिळतं.

वेगवेगळी ठरवली गेलेली लक्ष्यं, उद्दिष्टं ही कामानुसार भिन्न भिन्न स्वरूपाचीही असू शकतात; पण त्या सर्वांच्या मुळाशी ‘मॅरिको’नं ठरवलेलं ‘व्यावसायिक वृद्धी’ हेच तत्त्व असतं. ही मूल्यं ‘मॅरिको’च्या वाढीला पोषक अशीच आखली आहेत. आमच्या कार्यपद्धतीतली, संस्कृतीतली ही मूल्यं म्हणजे खुणेचे दगडच आहेत म्हणा. पण आम्ही कायमच त्यांचा संदर्भ व्यवसायवृद्धीबरोबरच ठेवल्यामुळेच ही मूल्यं आता निव्वळ एखाद्या पॉवरपॉइन्ट प्रेझेंटेशनचा विषय न राहता आमच्या ‘रिझल्ट्स’मधून, वर्तणुकीतून प्रतिबिंबित होतात. मग आमच्याकडे काहीच नियम, आदेश नाहीत का? असं नाहीये. धोरणं आणि अभिषिक्त गोष्टी (एन्टायटलमेंटस्) आमच्याकडे कमी आहेत- ‘अधिकृत’ अशा; पण मार्गदर्शक तत्त्वं (गाईडलाइन्स) खूप आहेत- या सगळ्यामागचं अधिष्ठान आणि प्रेरणा सांगणारी. त्यांचा रोजच्या जगण्यातला वापर मात्र आम्ही प्रत्येक ‘मॅरिको’ सदस्यावरच सोडला आहे.

अनावश्यक नियंत्रण, पहारे काढून टाकून आम्ही तत्काळ स्वरूपाची आणि थेट अशी अमूल्य (वेळेची आणि पैशाची) बचत करत असतो. नेहमीच्या ठरीव खर्चासाठी ‘पुरावे’ देण्याघेण्यात, मंजु-या घेण्यात वाया जाणारी शक्ती आम्ही वाचवतो. कामावर नसण्याची विविध कारणं शोधण्यात आमच्या लोकांचा वेळ जाऊ नये, तो वाचावा, हे आम्ही पाहतो आणि वर्षअखेरीस ‘सीएल’ संपवण्यासाठी झुंबडही उडत नाही. (...आणि अनेक काल्पनिक ‘मदर्स-इन-लॉ’ किंवा सासवांना मृत्यूपासूनही वाचवतो!)

एका सार्वत्रिक सत्याचं जितंजागतं उदाहरण आम्ही बनू पाहत आहोत. ते म्हणजे मालक आपल्या नोकरांचा वेळ विकत घेऊ शकतो, चैतन्य किंवा ‘आत्मा’ नाही. यावरूनच ‘मॅरिको’तल्या आणखी एका भरीव सक्षमीकरणाच्या उपायाची माहिती इथे द्यावीशी वाटते... ती म्हणजे आमची ‘मॅरिको’तली ‘सदस्य-सभासद’ ही संकल्पना. ‘मॅरिको’त आम्ही कुणाला ‘सेवक’ म्हणत, गणत किंवा लेखतच नाही. प्रत्येकजण आहे तो/ती ‘आमचा सदस्य’. हे कशासाठी? तर निव्वळ करार-मदार करून असणा-या ‘नोकरी’पेक्षा ‘सदस्यत्व’ या संकल्पनेमुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर ऊर्ध्वगामी वाढ होते. (आकृती क्र.२ पाहा.)

‘मॅरिको’च्या बहुतांश सर्व लोकांमध्ये त्यामुळेच ‘माझी कंपनी’ हा दृष्टिकोन आढळतो. हे सगळं निव्वळ फॅड, किंवा बोलाचालीच्या गोष्टी, या पातळीवर नाहीये. ‘सदस्यत्व’ संकल्पनेमुळे ‘मॅरिको’तले लोक खरोखरीच ‘मॅरिको’ला आपली हक्काची जागा मानतात. इथेच त्यांना त्यांची आकांक्षा फुलवणा-या व्यक्तिगत उत्कर्षाच्या संधीही दिसतात. ‘मॅरिको’च्या रूपानं या व्यवसायाच्या सर्व पैलूंना ते थेट स्पर्शू शकतात. हे म्हणजे एखाद्या मोठ्या घरासारखंच आहे. कुणी ’क्ष’ मनुष्य एचआरमधे काम करतो आहे, पण आमच्या संशोधन व वृद्धी विभागासाठी त्याची काही कल्पना असेल, तर तो बेलाशक पुढे जाऊन ती मांडू शकतो. आपल्याच घराच्या ’दुस-या खोलीत’ जायला कुणाच्या परवानग्यांची गरजच काय? आमचे सदस्य पूर्ण ‘मॅरिको’च ‘त्यांची’ समजतात, त्यामुळे पुटं गळून जाऊन त्यांचा दृष्टिकोनही व्यापक होतो. माझंच उदाहरण पहा. सीएफओ (चीफ फायनान्सिअल ऑफिसर) असण्यापासून ते चीफ-एचआर ऍन्ड स्ट्रॅटेजीपर्यंत माझा प्रवास सुकर झाला, कारण मी मनुष्यबळ विकासाचं काम जवळून पाहत आलो होतो. त्यालाही मी आपलं स्वत:चं काम मानलं होतं.

संस्थात्मक वृद्धीचा आमचा बराचसा प्रयत्न खरंतर आमच्या ‘सदस्यां’च्या व्यक्तिगत प्रगतीसाठी प्रयत्नशील असाच आहे. ‘संस्था’ आणि ‘व्यक्ती’ यांच्या वृद्धीचा हा परस्परपूरक गोङ्गच आम्हाला ‘मॅरिको’ बनवून गेला आहे. निव्वळ ‘कर्मचारी’ म्हणून वावरण्यापेक्षा ‘सदस्य’ कामाच्या जागी त्याचं चैतन्य घेऊन येतो. मग कामाच्या जागीही त्याच्या अंगभूत वैविध्याला वाव मिळतो. मतं-मतांतरं, सच्च्या भावना, दृष्टिकोन अधिक निकोपपणे उमटायलाही वाव मिळतो. संस्थेत एक मोकळंढाकळं वातावरण तयार होतं. प्रत्येकजणच पूर्वग्रहरहित मनानं ऐकू शकतो, आणि गरज असेल तर आणि तेव्हा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. परस्परांमधले व्यवहार अधिक विश्वास, सह-अनुभूती, भरवसा, आदर आणि चांगुलपणा यावर आधारित होतात. समूहाचं भवितव्य घडवण्यात ‘सदस्यत्व’ संकल्पना प्रत्येक सदस्याला वाव देते. यातूनच मग एका निष्ठेची, स्वामित्वाची भावना जागृत होते. असे निष्ठावान लोकच उद्योजकता आणि सर्जनशीलता प्रत्यक्षात उतरवू शकतात. ‘कमिटमेंट’ कमी असणा-या, पण खूप नियंत्रित केल्या गेलेल्या लोकांच्या तुलनेत ते आश्चर्यजनक वाटेल अशी कामगिरी करून जातात.

‘मॅरिको’ कार्यरत असणा-या सर्वच ठिकाणी हे सगळं राबवलं गेलंय का? अगदी सगळीकडे अद्याप नाही. कारण काही स्थानिक, कार्यात्मक आणि वैधानिक गोष्टींकडे लक्ष देऊन मगच आम्ही ते करू. पण आमच्या ’असामान्य’ अशा ज्या गोष्टी, धोरणं आहेत, ती ऐंशी टक्के ठिकाणी आम्ही राबवली आहेत.

आणि मग या सगळ्याचा अर्थ सगळं अगदी छान, सुरळीत, गोड गोड चाललंय, असा घ्यायचा का? अर्थातच नाही.

या सगळ्याला न जुमानणारे, हे पचनीच न पडणारे चुकार लोकही भेटतात. पण अशांचं काय होणार, हे प्रत्येकालाच माहिती आहे. आमच्यात एक नियम पक्का आहे. एखाद्याची भावनिक आणि व्यावसायिक बांधिलकीच (इंटिगिटी) जर गेली तर त्याचं समूहातून बाहेर पडणं स्वाभाविकपणेच होतं. आमची मूल्यं आम्ही कसोशीनं जपतो. आम्ही मनुष्यबळ विकास वा लोकव्यवस्थापन यातला अंतिम चरण गाठलाय, असंही आमचं म्हणणं नाही. अजूनही खूप काही करता येण्यासारखं आहे.

हे ‘असामान्य’ विचार फक्त कॉर्पोरेट सेक्टरलाच लागू आहेत, असं नाही. ‘सक्षमीकरण’ ही संकल्पना अगदी घरगुती पातळीवरही लागू होते. विशेषत: आपल्या भावी पिढीबरोबर वागता-बोलताना. कुठलीच मर्यादा घालून न देता आपल्या मुलामुलींना उपरोल्लेखित तत्त्वाची ओळख करून द्या. त्यांना सांगा, की ते जे, जितके म्हणतील तितके पैसे त्यांना तुम्ही द्याल. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक ‘मर्यादा’ त्यांच्याबरोबर ‘शेअर’ करा. आणि मग गंमत पहा. विसंवादाच्या गैरसमजांच्या जोखडातून तुम्ही दोघंही कसे मुक्त होता ते जरूर पहा.

‘सक्षमीकरण’ या संकल्पनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अर्थव्यवस्थेत तेजी असो अथवा मंदी- ही संकल्पना काम करते- उपयुक्त ठरते. कारण तिच्यात काही अंगभूत फायदे असे आहेत, की ‘बाहेरच्या’ वातावरणावर ते मुळीच अवलंबून नाहीत.

- त्यामुळे समूहाच्या सर्वांत वरच्या पदापासून खालपर्यंत निर्णयक्षमता झिरपत, पाझरत जाते.

- खर्चिक, अनावश्यक अशा नियंत्रण-नियमनावरचा अनाठायी खर्च वाचतो.

- व्यावसायिक निष्ठेचे काही नवे निकष त्यामुळे निर्माण होतात. व्यक्तींपेक्षा संस्थेवर निष्ठा ठेवायला शिकवणा-या या प्रणालीमुळे समूहाचं/संस्थेचं आयुष्यमान वाढतं.

- या संकल्पनेमुळं समूहांतर्गत अनेक ‘आंतरउद्योजक’ (इंट्राप्रेन्युअर्स) तयार होतात, जे सामूहिक भवितव्याचा त्यांच्या पद्धतीने विचार करून त्याला हातभार लावतात.

- याच संकल्पनेमुळे मूल्याधारित वर्तणूक नसणारे लोक आपोआप बाहेर पडतात. अतिरिक्त नियंत्रित वातावरणात ते कदाचित (कागदी नियमांच्या आधारे) तग धरून राहू शकतात; पण सक्षम, खुल्या हवेत त्यांचा टिकाव लागणं अवघड असतं.

- कोत्या मनोवृत्तीपेक्षा खुली मनं निर्माण करणारी ही संकल्पना आहे.

- व्यक्तिगत वाढीत स्वामित्वाची भावना आणून ही संकल्पना संकुचित व्यक्तिमत्त्वविकास टाळते.

आता सगळ्यांनाच हे जमेल असं नाही. ‘मॅरिको’ हे करते, कारण ती एक आगळी-वेगळी कंपनी आहे. या असाधारण दृष्टिकोनामुळेच पाश्चात्त्य ब्रँडशी असलेली स्पर्धा आमच्या ‘पॅराशूट’नं जिंकली, ‘सफोला’सारखा ब्रँड सफल केला आणि ‘काया’सारखा नवा ब्रँड सुस्थापित केला. सध्याच्या काहीशा मंदावलेल्या वातावरणातही आमची स्टॉक मार्केटमधली किंमत (३२०० कोटी रुपये) त्यामुळेच टिकून आहे.

याचं आणखीही एक रहस्य आहे... ‘मॅरिको’ सदस्यांचा अनकॉमन सेन्स! (आगळीवेगळी जाण)
पण त्याविषयी पुन्हा केव्हा तरी!

- मिलिंद सरवटे.
९८२०१८३०६०.

(या लेखाचे स्वैर मराठी रुपांतर आणि शेल सिल्व्हरस्टाइनच्या कवितेचा अनुवाद संतोष शिंत्रे यांनी केला आहे.)

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा