छोडो मुंबई !

गेल्या १५ वर्षांत जागतिकीकरणानंतर देशात कितीही बदल झाले, तरी राजकीय सत्ताकेंद्र हेच सर्वांत शक्तिमान केंद्र राहिलं आहे. अशा केंद्राभोवती गर्दी होणारच. त्यामुळे हे केंद्र इथून हलवलं पाहिजे, तरच इथली त्या केंद्राभोवती बांडगुळांप्रमाणे निर्माण होणारी केंद्रं हलतील आणि माणसांना मुंबईत यायला लागण्याचं प्रमाण कमी होईल.
प्रकाश अकोलकर
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

मुंबईच्या भवितव्याबद्दल अलीकडल्या काळात अनेकांना चिंता निर्माण झाली असून, त्याबद्दल नाना प्रकारची अनुमानं काढली जाऊ लागली आहेत. पण गेल्या दीडशे वर्षांत या महानगरावर सातत्यानं होत असलेला बलात्कारच मुंबईच्या आजच्या बकाल स्वरूपास कारणीभूत आहे, याबद्दल मात्र कोणाचं दुमत नसल्याचं दिसतं. हे बलात्कार शारीरिक होते, तसेच मानसिक, आर्थिक आणि राजकीयही होते. सर्वच राजकीय पक्षांनी या शहराकडे ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ या एकाच भावनेनं बघितल्यानं आज मुंबईला ही अवकळा आली आहे. गिरणी संपानंतर दोन दशकं उजाड पडलेल्या मध्य मुंबईतील जमिनींवर आता चकाचक मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेलं उभी राहत असली, तरी हा सगळा डोलारा एखाद्या नाटकातल्या देखाव्याप्रमाणे आहे. तो केव्हाही कोलमडून पडू शकतो. निळू दामले यांच्या मते कोणत्याही शहराची वाढ ही त्याकडे आकर्षित होणा-यांच्या संख्येवर अवलंबून असते, आणि ती वाढ खुंटते तेव्हा ते शहर मृतप्राय होऊन जाते. प्रत्यक्षात या शहराची जी काही वाढ दिसते, ती वाढ नसून सूज आहे, आणि त्यामुळेच निळू दामले म्हणतात त्याप्रमाणे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करून वा मुंबईत येणा-यांची जबाबदारी त्यांना नोक-या देणा-यांवर सोपवून इथले प्रश्न सुटणार नाहीत. भले, जगातल्या अन्य काही शहरांत तसं झालं असलं तरी!
मुंबईत येणा-यांना रोखता येत नाही, मग त्यांच्या निवासासाठी टोलेजंग माड्या बांधा. रस्ते अपुरे पडतात, मग फ्लायओव्हर्स बांधा. तेही अपुरे पडतात, मग ‘रोड ऑन रोड’ बांधा. (रोड ऑन रोड ही संकल्पना जेजे फ्लायओव्हरच्या रूपानं वापरून झाली आहे.) रेल्वे अपुरी पडते, मग मेट्रो आणा. अशा स्वरूपाच्या उपायांनी प्रश्न सुटणार नाहीत. हे उपाय रोगापेक्षा भयंकर आहेत. कारण आता एखाद्यावेळी या संपूर्ण महानगरावरच स्लॅब टाकून दुसरं शहर वसवण्याची कल्पना कोणी मांडली, तरी त्याची गणना अत्यंत कल्पक नगरनियोजनकारांत होऊ शकेल!
मुंबईच्या भवितव्याची ख-या अर्थानं काळजी असलेल्या डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञानं १९६०च्या दशकातच मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर स्वयंपूर्ण अशा छोट्या टाऊनशिप्स उभारण्याची सूचना केली होती. त्यातूनच पुढं सिडको व नवी मुंबई यांची उभारणी झाली. प्रत्यक्षात नवी मुंबईतूनही दक्षिण मुंबईत मंत्रालयाच्या दिशेनं ये-जा करणा-यांची संख्या लाखांच्या घरात गेली आणि अडचणी भूमिती श्रेणीत वाढत गेल्या.
मुंबईत येऊन अगदी सामान्य माणूसही पोट भरू शकतो, आणि अगदी अत्युच्च बुद्धिमत्तेचा माणूसही आपला कस पणाला लावून मान्यता मिळवू शकतो. या दोन कारणांमुळे इथं लोक येत राहिले आणि यापुढंही येत राहतील. प्रश्न त्यांना इथं यायला लागू नये, अशी परिस्थिती देशाच्या अन्य भागांत निर्माण करण्याचा आहे. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ या घोषणेच्या जोरावर हे राज्य झाले खरं; पण आता राज्यकर्त्यांनी या महानगरात बसून कारभार करण्याचा मोह टाळला पाहिजे. गेल्या १५ वर्षांत जागतिकीकरणानंतर देशात कितीही बदल झाले, तरी राजकीय सत्ताकेंद्र हेच सर्वांत शक्तिमान केंद्र राहिलं आहे. अशा केंद्राभोवती गर्दी होणारच. त्यामुळे हे केंद्र इथून हलवलं पाहिजे, तरच इथली त्या केंद्राभोवती बांडगुळांप्रमाणे निर्माण होणारी केंद्रं हलतील आणि माणसांना मुंबईत यायला लागण्याचं प्रमाण कमी होईल. कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या आगमनानंतर लोकांना आता घरीच बसून ऑफिसची कामं करता येतील, असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात ते झालंच नाही. लोक हातात लॅपटॉप घेऊनही पुन्हा नरिमन पॉइंटचीच वाट चालताना दिसू लागले. हे तत्काळ बंद व्हायला हवं. १९६० आणि ७०च्या दशकात नरिमन पॉइंटजवळ भराव घालून मुंबईत जमीन निर्माण केली गेली. त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. आता बिल्डर लॉबी पुन्हा समुद्रात भराव घालण्याची मागणी करीत आहे. तसं झाल्यास तो या महानगरावरचा अखेरचा घाव ठरेल, हे ध्यानात घेतलेलं बरं!
मोबाईलः ९८९२७२७७००
ई-मेलः akolkar.prakash@gmail.com

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा