अमृत बंग

अमृत बंग हा निर्माण या सामाजिक उपक्रमाचा समन्वयक. तरूण मुलामुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून त्यांना कृतिशील बनवण्यासाठी हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी अमृत आणि सरकारी अमिताभ खरे यांच्याशी मारलेल्या गप्पा.

---------------------------------------------------------------

निर्माणचा प्रसार मागील पाच वर्षात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात झाला आहे. या उपक्रमामागे दोन वेगवेगळी कारणं आहेत. आजुबाजूला अनेक क्षेत्रातले प्रश्नं दिसतात. पण ते सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरूण मुलंमुली त्यात उतरताहेत असं काही चित्रं दिसत नाही. म्हणजे सत्तर-ऐंशीच्या दशकात जशा अनेक चळवळी झाल्या, त्यातून तरूण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. पण आज असं दिसत नाही. दरम्यान कॅपिटॅलिस्टिक इकॉनॉमीचा खूप जास्त प्रसार झाल्यामुळे मनी मेकींग म्हणजेच पैसा कमवणं हे एकच तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे अशा प्रकारची फिलॉसॉफी खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरताना दिसत आहे.

म्हणून मग या प्रकारच्या कामामध्ये नवीन नेतृत्त्व कसं येईल, नवीन ब्लड कसं येईल यासाठी काहीतरी करायला पाहिजे हा एक उद्देश झाला. हा त्याचा सामाजिक संदर्भ. दुसरा उद्देश असा की, आजच्या तरूण पिढीकडे बघितलं तर... अर्थात मीसुद्धा त्याच गटात मोडतो आणि मलाही प्रश्नंस पडले आहेत. आमच्या पिढीची जी शिक्षणपद्धती आहे ती आम्हाला भरभरून माहिती देते, आम्ही लकी ठरून चांगल्या कॉलेजमध्ये गेलो तर आम्हाला स्किल्स देखिल मिळतात. जे मिळत नाही ते म्हणजे आपण हे कशासाठी करायचं तो हेतू. आपण मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग नेमका कसा करायचा हे काही आमची शिक्षणव्यवस्था आम्हाला सांगत नाही. मग ब-याचदा असं होतं की आमच्या वतीने बाकीचीच लोकं तो हेतू ठरवतात. त्यांच्या हेतूसाठी आम्हाला कामावर घेतात. माझंच उदाहरण म्हणजे, मी जेव्हा बीई होऊन बाहेर पडलो तेव्हा आपण नक्की काय करायचं हे मला माझ्या बीईच्या शिक्षणाने शिकवलं नव्हतं. त्यामुळे माझ्या वतीने सिमेंटेक कंपनीने हा निर्णय घेऊन टाकला होता की माझ्या स्किल्सचा आणि शिक्षणाचा उपयोग कुठे व्हायला हवा. सिमेंटेक जॉईन करणं हा माझा चॉईस होता पण तेव्हा माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शनही नव्हता.
अशी सगळ्यांचीच थोड्याफार फरकाने परिस्थिती असते. आत्ताच मी कृषी महाविद्यालयातून येतोय. तिथल्या मुलांकडचे ऑप्शन्स काय आहेत. तर शेती करणं, सरकारी नोकरी मिळवणं किंवा अगदीच कुणी ऍकेडेमिकली चांगलं असेल तर जीआरए घेऊन रिसर्च करणं, म्हणजे काय माहित नाही. अशी सगळ्याच क्षेत्रातली परिस्थिती असल्यामुळे आपापल्या क्षेत्रातले प्रश्नं , आव्हानं काय आहेत हे मुलांना माहितीच नसतं. हे या मुलांना जाणवून द्यावेत. त्यांनी ते सोडवण्यासाठी उडी घेतली तर त्यांनाही काहितरी चांगलं काम मिळेल आणि त्यांच्या कामातनं तो प्रश्न्सुद्धा सुटायला हातभार लागेल याची सांगड आपल्याला घालता येईल का म्हणून निर्माणचा उपक्रम सुरू झाला.

यात आपण कुणाचं ब्रेन वॉशिंग करत नाही. कुठलाही तरूण मुलगा किंवा मुलगी घ्यायची, त्यांना कुठल्यातरी आयडिऑलॉजीने झपाटून टाकायचं आणि त्यांनी पुढे तशाच पद्धतीचं काम करावं असं निर्माण करत नाही. इथे प्रत्येक व्यक्तीला आपला विषय ठरवण्याची मुभा आहे आणि तिनेच ते शोधून काढावं याची ही प्रकिया आहे. यात निर्माणचा रोल म्हणजे हे होण्यासाठी शिक्षणप्रकियेचा विकास करणं आहे. ती काही मोठी ऑर्गनाझेशन नाही. सर्च ही आमची पॅरेंट ऑर्गनाझेशन आहे आणि बाएफ, एमकेसील, युनिक फिचर्स, ग्राममंगल, प्रगती अभियान, चेतना विकास सारख्या अनेक संस्थांनी मिळून चालवलेली ती एक प्रोसेस आहे. निर्माणचं स्वतःचं काही एडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर नाही. त्याच्या भानगडीत आत्ता पडायचं नाही असंही आम्ही ठरवलं आहे.

शिक्षणप्रकियेची जी तत्त्वं आहेत, गांधीजींनी जे नयी तालीमचं तत्त्व सांगितलं होतं, त्यातून या प्रकियेला चालवता येतं का याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. नयी तालीमचा नटशेल असा अर्थ म्हणजे, एज्युकेशन फॉर लाईफ’, एज्युकेशन थ्रू लाईफ’ आणि एज्युकेशन थ्रूआऊट लाईफ’. आत्ता आमची जी गोची आहे, ती अशी की आत्ता आमचं सरळ सरळ एक आर्टिफिशिअल डिव्हिजन होतं. वयाच्या चोविस पंचवीस वर्षापर्यंत आम्ही फक्त शिक शिक शिकायचं आणि त्यानंतर फक्त काम करायचं. शिकणं आणि जगणं यात जणू काही विसंगती निर्माण झाली आहे. बहुतांश डिग्री कोर्सेस आहेत ते आमच्यात इनकॉम्पिटन्सचा सेन्स म्हणजे कमतरतेची भावना तयार करत आहेत. एमबीबीएस केलेल्या पोराला विचारलं तर त्याला असं वाटतं की एमडी केल्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ नाही, एमडी करणा-या मुलाला विचारलं तर त्याला वाटतं की सुपरस्पेशलायझेशन केलशिवाय त्याच्या जगण्याला अर्थ नाही. अशी कमीपणाची भावना भरायची आणि ती कमी करण्यासाठी उपाय काय तर नवीन पदवी. या धंद्याला आम्ही सरसकट बळी पडतो. शिकताना एखाद्या चॅलेंजला आम्ही कसं भिडू शकतो, त्याच्यावर कशी मात करू शकतो हे सहसा आमच्यापुढे कधीच येत नाही.

त्यामुळेच अशा एका शिक्षणपद्धतीची गरज आहे जी आम्हा तरूणांना जीवनाच्या जास्त जवळ आणेल. त्यातनं आम्हाला आम्ही काय करावं हे शोधायला मदत होईल. त्यामुळे निर्माण ही शाळांना बायपास करणारी प्रकिया नक्कीच नाही. पण त्याला पूरक अशी आहे. आम्ही त्यात शिबिरांची एक सेरीज आयोजित करतो. प्रत्येक कॅम्प सहा सहा महिन्यांच्या अंतराने असतो. प्रत्येक बॅचचे ६० एक जण प्रत्येक कॅम्पमधनं जातात. सहसा डिसेंबर-जानेवारीमध्ये ते आयोजित होतात. त्याची वयोमर्यादा १८ ते २८ अशी आहे. सुदैवाने आज महाराष्टातल्या वेगवेगळ्या भागातून मुलंमुली येताहेत. सुरूवातीला ते फक्त पुणे-मुंबई सेंट्रीक असं होतं. कोकणातनं अजून फारसं काही आमच्या हाती लागलेलं नाही. पण तेही हळूहळू होईल.

इंजिनिअरींग, मेडिकल, मिडिया, शेती, बायोटेक्नॉलॉजी, लॉ अशा अनेक क्षेत्रातली मुलं आहेत. पण जास्त इंजिनिअरींग आणि मेडिकलचे आहेत. निर्माणच्या आजपर्यंत तीन बॅचेस पूर्ण झाल्या आहेत. जवळपास तीनशे मुलं मुली आमच्या प्रकियेतून गेले आहेत. यात वेगवेगळे टप्पे असतात. एक विषय आहे तारूण्यभान. तरूण होतानाचे जे शारिरीक, मानसिक टप्पे असतात त्याची ब-याच जणांना माहिती नसते. सेक्शुऍलिटी हा असा विषय आहे ज्यात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो, प्रत्येकाला कुतूहल असतं पण त्यावरच ग्रुपमध्ये सगळ्यात कमी शेअरिंग होतं, खास करून जेव्हा मुलं आणि मुली एकत्र असतील तेव्हा. मग त्याला उगाचच विकृत स्वरूप येण्याऐवजी त्याचं वैज्ञानिक कारण जर आपल्याला कळलं तर एक निकोप वातावरण तयार होतं.

दुसरा टप्पा असा की प्रत्यक्ष गावात जाऊन चार दिवस राहाणं. पण पाहुणा म्हणून नाही तर त्या गावातली एक व्यक्ती म्हणून. त्यांच्यासारखंच करायचं. त्यांचे प्रश्नं अनुभववायचे आणि मग त्यावर चर्चा करायची.

त्यानंतर मग समाजातले प्रश्नंन सोडवण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यांच्याशी इंटरऍक्शन हा टप्पा. त्यात मुलं तो प्रश्नंा समजून घेतात, त्यावर कसं काम लोक करतात हे बघतात. त्यातून कुठले कुठले मार्ग असू शकतात हे त्यांना कळतं. मग कुणाला रिसर्चची पद्धत भावेल, कुणाला सोशल बिझनेसची, कुणाला मिडियाची..

प्रत्येकाला आपला आपला विषय निवडावा लागतो. मी जर डॉक्टर असेल तर साहजिकच माझं कार्यक्षेत्र ते असेल. हे नक्कीच आवश्यक आहे की शेतीची किमान माहिती मला असावी. त्यातले प्रश्नं् कळावेत. माझ्या ताटात येणारं अन्न कसं येतं त्याची मला जाणीव असावी. पण माझं काम मात्र मेडिकल फिल्डमधलं असेल. या सगळ्याला कौन्सेलिंगची गरज असते. पण ते अनौपचारिक पद्धतीने. म्हणजे ते गप्पांमधून होऊ शकतं. वन टू वन बोलण्यातून होऊ शकतं. कॅफे गुडलकमधे होऊ शकतं...हे गरजेचं असतं स्वतःच कल्पना घासून बघण्यासाठी. यात प्रत्येक व्यक्तीवर जितकं जास्त इन्व्हेस्ट आपण करू तितका त्याचा उपयोग होतो. त्यामुळे तोही आमचा एक रोल आम्ही समजतो. हे सगळे कॅम्प्स संपल्यानंतर प्रत्येकाने पुढच्या पाच वर्षांचा प्लॅन सांगायचा असतो. तो ढोबळ असतो.

स्वभाव, स्वधर्म’ आणि युगधर्म’ या तीन गोष्टींची मांडणी विनोबांनी केली. त्यांच्या आधारे मला नेमकं काय काम करायचं आहे हे आपण ठरवू शकतो. माझा वैयक्तिक स्वभाव कसा आहे, स्वधर्म म्हणजे मी कशा प्रकारचं काम करावं हा माझा धर्म आहे... आणि युगधर्म म्हणजे हीच गोष्ट एका मोठ्या प्रमाणात. म्हणजे देशाने पर्यावरणाच्या प्रश्ना वर काम करणं हा सध्या युगधर्म असेल वगैरे..
नेमकं उत्तर यातनं येत नाही पण ते येण्यासाठी जी वैचारिक स्पष्टता लागते ती त्यातून येते.

चाळीस मुलामुलींनी आजर्पंत निर्माणच्या या प्रक्रियेतून जात प्रत्यक्ष कामात उडी घेतली आहे. त्यामागे अजून अडीचशे जण आहेत. आता आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये काही गोष्टी वाढवण्याच्या विचारात आहोत. ज्या चाळीस जणांनी हे काम सुरू केलं आहे त्यांचे प्रश्न् वेगळे आहेत. आता मी हातातलं काम जास्त चांगलं कसं करू, या कामातलं पुढचं क्षितीज काय आहे हे त्यांना समजणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मग आम्ही काही कंटिन्युअस अशी एज्युकेशनल प्रोसेस डेव्हलप करू शकतो का..त्यांचा वर्ल्ड व्ह्यू मोठा व्हावा म्हणून आणि कामासंबंधी काही स्पेसिफिक स्किल्स असतील ती त्यांच्यात यावी म्हणून...हे आमच्यापुढचं एक आव्हान आहे.

निर्माणची आत्ताची प्रकियासुद्धा आम्ही हळूहळू डेव्हलप करत नेलेली आहे. आमचा ऍप्लिकेशन फॉर्मसुद्धा नेहमीचे प्रश्नंू विचारणारा नाही. आपल नेहमीच्या शिक्षणाप्रमाणे फॅक्टस पाठ करून सांगा असं आम्ही म्हणत नाही तर तुमच्या आत काय आहे ते सांगणं अपेक्षित आहे.

एक नीड बेस्ड ग्लॅडर आहे. बेसिक नीड्‌स, त्यावर सिक्युरिटी नीड्‌स असतात, त्याच्यावर ब्लॉगिंगची नीड आहे, सेल्फ एस्टीम हे त्यावर आणि त्यानंतर सेल्फ ऍक्च्युअलाझेशन आहे. मला वाटतं, बहुतांश माझ्या पिढीचे लोक हे पहिल्या दोन-तीन पाय-या पूर्ण करण्यातच गढून गेले आहेत. त्या पूर्ण होतात तेव्हा साठ वगैरेच्या आसपास वय झालेलं असतं. वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे सेल्फ ऍक्चुअलाझेशनच्या पातळीवर मुलांना नेण्यासाठी कशी मदत करता येईल, मी अशा लोकांना मदत केली ज्यांच्या पहिल्या दोन पाय-याही अजून पूर्ण झालेल्या नाहीत..तर मी माझ्या सेल्फ ऍक्चुअलाझेशन स्टेपवर लवकर पोचू शकेन का असाही एक भाग आहे. अर्थात हे फक्त एक उदाहरण. प्रत्येकाला आपला मार्ग ठरवण्याचा हक्क नक्कीच आहे.

आता यात पण फरक आहे..या पाय-यांमध्ये आपण खरे खरे कुठे आहोत आणि आपल्याला काय वाटतं की आपण कुठे आहोत यात ब-याचदा फरक असतो. हा जो फरक असतो त्याचा पुरेपूर प्रभाव आपल्या निर्णयांवर पडतो. आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्या अजून बेसिक गरजाच पूर्ण झालेल्या नाहीत. या दैनंदिन जीवनाच्या गरजांमध्येच आम्ही इतके अडकून जातो की त्याच्या पुढचा टप्पा काय आहे हे बघणं होत नाही. हा सर्व्हे आम्ही केला होता तेव्हा ७२ टक्के लोकांमध्ये आम्हाला असा फरक आढळला होता. पण अर्थात ती एक खूपच छोटी सॅम्पल साईझ होती. पण पुन्हा मला हा सेन्स ऑफ इनकॉम्पिटन्सचा जास्त परिणाम वाटतो. आमच्यात काय गोष्टी आहेत यापेक्षा काय नाहीयेत हे सांगण्यातच अनेक सिस्टिम्सनी धन्यता मानलेली असल्यामुळे हे होतं.

मुळात सामाजिक काम हे आपल्याला वेगळं असं काढता येत नाही. प्रत्येकजण करत असलेलं काम हे समाजाचा भाग असतं. फार तर आपल्याला अपेक्षित अशा कामाला आपण सामाजिकरित्या उपयोगी असलेलं काम म्हणू शकतो. लोकं आपलं काम नीट करत नाहीत, भ्रष्टाचार करतात, वेळेवर जात नाहीत हा सगळा वेगळा भाग झाला..पण सोशल वर्क म्हटलं की, ते करणारी काहितरी वेगळी जमात आहे...असा समज तयार होतो..त्यांच्याविषयी गृहितकं तयार होत जातात...ही जमात कॉटनचा कुर्ताच घालणार..तो भणंगासारखाच राहील, त्याला अकाऊंटेबिलिटी नसली तरी चालेल, त्याने फक्त काम करायचं पण त्याच्या कामाचा परिणाम मोजायचा नाही...हे होण्याची काहिच गरज नाही. याच्यात एक इंटेलेक्चुअल अपील आहे ...पण सोशल अपीलसुद्धा आहे..म्हणजे मी जे काही करतो त्याचा उपयोग होतो का समाजाला...की अमेरिकेतल्या माणसाचा बँकिंग व्यवहार सोपा व्हावा म्हणून मी इकडे सॉफ्टवेअर बनवतो, त्यांना इराकवर मिसाईल टाकायला सोपं जावं म्हणून आम्ही इथे काहितरी प्रोग्रॅम करतो. माझ्या कामाचं इतिकर्तव्य काय आहे हे शोधायचा निर्माण हा प्रयत्न आहे.