सुहास कुलकर्णी

अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्षं ते लिहीत आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले दिसतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी आत्मपर, अनुभवपरही लिहिलेलं असलं, तरी अनिल अवचट म्हटलं की त्यांनी हाताळलेले सामाजिक विषय, वंचितांच्या-उपेक्षितांच्या जगण्याची करून दिलेली ओळख आणि नानाविध सामाजिक प्रश्नांना भिडू पाहणाऱ्या धडपड्या मंडळींची त्यांनी घेतलेली नोंद याचीच आपल्याला प्रामुख्याने आठवण येते. पूर्णिया, वेध, हमीद या त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांप्रमाणेच छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे-उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न आणि कार्यरत ही पुस्तकं त्यांची वरील ओळख अधोरेखित करत असतात. त्यांची अमेरिका, गर्द, पुण्याची अपूर्वाई आणि मुक्तांगणची गोष्ट ही पुस्तकंही एकेक विषय उलगडून दाखवणारी आणि वाचकांना नवी आणि वेगळी दृष्टी देणारी आहेत.
‘रिपोर्टिंगचे दिवस’ हे नवं पुस्तक प्रकाशित होण्याआधी अवचटांची तीस-बत्तीस पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कोणत्याही लेखकाची सर्वच पुस्तकं वाचकांना आवडतील, भावतील असं होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे, गरजेप्रमाणे, समजेप्रमाणे आणि आवाक्याप्रमाणे वाचक लेखकाचं साहित्य ‘आपलं’ मानत असतो. अवचटही त्याला अपवाद नसणार. परंतु केवळ त्यांनी लिहिलंय म्हणून त्यांचं पुस्तक घेणारा आणि त्यांचं वाचणारा वाचक मराठीत उदंड आहे. सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय मराठी माणूस आपलं सुरक्षित आणि सुरळीत चाललेलं दैनंदिन जगणं सोडून ज्या विषयांच्या भानगडीत पडणार नाही, अशा विषयांच्या पोटात शिरून अवचटांनी लिहिलं आहे. हे विषय आतून पाहणं आणि त्याची संगती लावून वाचकांना सांगणं, हे काम एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे त्यांनी केलं आहे. एका अजब चिकाटीने ते हे काम करत आले आहेत. हे विषय, त्यातील प्रश्न, माणसांचं जगणं याबद्दल त्यांना जैव आस्था असल्याने ‘मी काही मुद्दामहून चिकाटीने वगैरे केलं नाही’ असं ते म्हणतीलही; परंतु त्यांचं लेखन वाचूनच आपल्या भवतालाचं भान आलेला वाचकवर्गही महाराष्ट्रात मोठा आहे, हेही तितकंच खरं आहे.
अनिल अवचट साधारणपणे १९६८ पासून लिहू लागले. माझ्या पिढीचा जन्म त्याच्या आसपासचा. त्यामुळे आम्ही वयाच्या विशी-बाविशीत होतो नि आपल्या आसपासचं जग समजून घेऊ पाहत होतो, तेव्हा अवचटांचं लेखन सर्वांत जवळचं वाटत होतं. तोपर्यंत त्यांची दहा-बारा पुस्तकं प्रकाशितही झालेली होती. या पुस्तकांतील लेख जेव्हा नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होते तेव्हा आमच्या पिढीने ते वाचण्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, अशी पुस्तकं वाचतच आमची सामाजिक समज आकार घेत गेली. आपल्याला दिसतं ते आणि तेवढंच आपलं जग नाही, याउलट आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या आणि जाणिवांच्या पलीकडे एक विशाल असं गरिबांचं, कष्टकऱ्यांचं जग आहे, याची लख्ख जाणीव अवचटांच्या लेखनामुळे झाली. आपल्याला आपला भवताल, आपला समाज समजून घ्यायचा असेल तर अमानुष कष्ट आणि अंधाऱ्या वर्तमानात गुंतलेलं हे जग समजून घ्यायला लागेल, हेही लक्षात आलं. या वर्गाचे प्रश्न हे समाजातील सर्वांत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या वर्गाचं जिणं सुधारणं म्हणजे समाजाचं जिणं सुधारणं आहे, ही जाणीवही या काळात खोल होत गेली. त्यामुळे माझ्या पिढीचं अनुभवविश्व आणि विचारविश्व रुंदावण्यामध्ये अनिल अवचटांच्या लेखनाचा वाटा मोठा आहे, असं वाटतं.
नेहमी असं म्हटलं जातं, की माहितीपर लेखनापेक्षा ललित- म्हणजे कथा, कविता, आत्मचरित्र, कादंबरी या लेखनाचा वाचकावर अधिक खोल परिणाम होत असतो. पण, अनिल अवचट हा कथा-कादंबऱ्या लिहिणारा लेखक नाही. सतत फिरतीवर राहून विषयांचा माग काढणारा हा लेखक आहे. हा पत्रकारी पिंडाचा माणूस आहे. पृष्ठभागावर येणाऱ्या विषयांचा माग घेण्यापेक्षा पृष्ठभागावर न येणाऱ्या विषयांत उतरणारा हा लेखक आहे. जे विषय अन्यथा मराठी वाचकासमोर सोपेपणाने, सुबोधपणे आलेच नसते ते विषय, ते जग अवचटांनी वाचकांसमोर आणलं आहे. त्यांनी जशी वंचितांच्या जगाची अस्वस्थ करून सोडणारी ओळख करून दिली आहे, तशीच धार्मिक रूढी-परंपरा, जातिग्रस्त मानसिकता, सरंजामी व्यवस्था, जातिधिष्ठित शोषण आणि व्यसनाधीनता अशा गंभीर विषयांचंही भान त्यांनी वाचकांना दिलं आहे. लेखनाचा खोल परिणाम याहून वेगळा काय असतो? कथा-कादंबरीच्या ‘फॉर्म’मध्ये न लिहिताही ते वाचकाच्या मनात उतरतात, याला कारण अर्थातच त्यांची लेखनशैली. त्यांना भेटलेल्या माणसांच्या जगण्यातूनच त्यांनी हे विषय उलगडले असल्याने त्यांचं लेखन माहितीच्या पलीकडे जातं आणि पाहता पाहता आपलं बनून जातं.
अवचटांचं आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी केलेलं सर्व लेखन स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने केलं आहे. कुणी पैसे दिले म्हणून, कुणी ‘असाइनमेंट’ दिली म्हणून किंवा कुण्या एनजीओने फंडिंग केलं म्हणून त्यांनी हे लेखन केलेलं नाही. समाजाविषयी आणि त्यातल्या माणसांच्या जगण्याविषयीचं कुतूहल आणि आपुलकी आहे म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळेच हमाल, मजूर, दलित, भटके, विस्थापित, दुष्काळग्रस्त, देवदासी, वेश्या, व्यसनी इथपासून ते विविध प्रकारचे कसबी कारागीर, जुन्या बाजारातले व्यावसायिक, स्टेशनवरची बेवारस पोरं, मंडईतले भाजीवाले, तबले वगैरे वाद्य बनवणारे अशी हजार प्रकारची माणसं आपल्याला त्यांच्या लेखनातून भेटतात. या माणसांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन वारंवार भेटणं, त्यांना बोलतं करणं, त्यांचं जगणं-मरणं-कष्टणं समजून घेणं, त्यांच्यातलं कसब नेमकेपणाने हेरणं आणि त्यांच्या प्रश्नांची नेटकेपणाने मांडणी करणं हे काम खचितच सोपं नाही; पण वर्षांमागून वर्षं ते हे काम न थकता करत आले आहेत. एवढंच काय, अजूनही नव्या उत्साहाने ते नवनव्या विषयांत शिरत असतात. अमुक एखादा विषय महत्त्वाचा वाटला की ते त्यापाठी लागत असतात. पुस्तकं जमवतात, संबंधित तज्ज्ञ मंडळी हुडकतात, कार्यकर्त्यांना गाठतात, प्रत्यक्ष फिरून येतात आणि झपाटून लिहून काढतात. हा सर्व उपक्रम ते एकट्याने राबवतात. त्यांच्यामागे ना कोणती संस्था आहे, ना हाताशी दोन-चार माणसं. युरोप-अमेरिकेत अशा तऱ्हेचं काम करणारे जे लेखक-पत्रकार असतात, त्यांच्याकडे कुठली तरी फेलोशिप असते, पाठीशी एखादी संशोधनसंस्था असते, लेखनाची भली थोरली रॉयल्टी देणारी प्रकाशनसंस्था असते. सोबतीला एक-दोन सहायक असतात, प्रवासखर्चाची सोय असते. अवचटांकडे असला काही प्रकार नाही. सारा कारभार एकट्याचाच. ही गोष्ट सर्वस्वी विरळा आहे.
कामाची ही शैली आणि उरक कुणाचाही जीव दडपून टाकणारा आहे; पण त्यांच्या लेखनात या साऱ्या वणवणीचा आणि मेहनतीचा मागमूसही नसतो. एखादी डॉक्युमेंटरी पाहावी इतक्या सहजतेने वाचक त्यांचं लेखन वाचत जातो. या लेखनामागे किती कष्ट घेतले आहेत हे वाचकाला कळतही नाही. एखादी गोष्ट सांगावी तसा अवचट विषय सांगू लागतात आणि गोष्टीच्या सहजतेनेच विषय उलगडून दाखवतात- अगदी सहज, सोपेपणाने. आपल्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत. कुठे जडजंबाल शब्द नाहीत, कुठे अलंकारिकता नाही. संपूर्ण समकालीन भाषा. त्यांचं लेखन वाचताना असं वाटतं, की आपण असे फिरलो असतो तर अगदी असंच लिहिलं असतं. पण कुणी तसा प्रयत्न केला की तसं जमत मात्र नाही. असं होण्याचं कारणही त्यांची त्यांची शैली आहे. त्यांना जसं दिसलं तसं त्यांनी लिहिलेलं असतं. हे लिहिताना लेखाची सुरुवात अमुकच प्रकारे व्हावी, माहिती तमुकच क्रमाने द्यावी, माहितीचं विश्लेषण अमुक पद्धतीनेच असावं, वगैरे रूढ मार्ग ते सहजपणे नाकारतात. त्यांना जसं लिहावंसं वाटतं तसं ते लिहीत जातात. ही बंडखोरी आणि त्यातून तयार झालेली शैली भुरळ पाडणारी आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनिल अवचटांचं लेखन मी आणि माझी पिढी वीस-बावीस वर्षं वाचत आहे. माझ्या पिढीचे अनेक वाचक त्यांच्याकडे त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत असतीलही; परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्या मनातील भावना शब्दांकित करण्याची संधी मला मिळाली आहे.
आपण एखाद्या लेखकाविषयी विचार करतो तेव्हा या लेखकाने आपल्याला काय दिलं याचा विचार आपण आपोआप करतो. हा विचार एक वाचक या नात्याने होत असतो. पण, अवचटांच्या लेखनाचा आणि माझा संबंध हा केवळ एक वाचक एवढाच मर्यादित नाही. गेली वीस-बावीस वर्षं मी त्यांचं लेखन वाचत आलो आहे हे खरंच; परंतु त्यापलीकडे माझ्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या पत्रकारितेशीही त्यांच्या लेखनाचा जवळचा संबंध आहे. त्यांनी लिहिलेलं वाचायचं, पचवायचं, स्वत:ची समज वाढवून घ्यायची, त्यांनी ज्या रीतीने पत्रकारिता केली ती दृष्टी स्वत:च्या कामात आणायची आणि त्यांनी तयार केलेल्या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न ‘युनिक फीचर्स’ या माध्यमसंस्थेमार्फत करायचा, अशा रीतीने त्यांची-माझी पक्की गाठ बांधली गेली आहे.
अवचटांनी तयार केलेल्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न म्हणजे काय?
‘युनिक फीचर्स’ ही माध्यमसंस्था १९९० मध्ये सुरू झाली. आम्ही चार-पाच मित्रांनी एकत्र येऊन या संस्थेमार्फत पत्रकारितेत स्वत:ची वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. कुठल्या एका दैनिकात काम न करता एकाच वेळी अनेक दैनिकांसोबत, नियतकालिकांसोबत काम करायचं, अशी मूळची कल्पना. हेतू हा, की ‘बाहेर’ राहून मनाजोगतं काम करता यावं. ही प्रेरणा कुठून आली, असा प्रश्न विचारला तर त्याचं एकच एक उत्तर नसणार, पण कदाचित एक उत्तर ‘अवचटांकडून’ असं असू शकतं. अवचटांचा आयुष्यभर स्वतंत्र राहून काम करण्याचा संदर्भ त्याला असू शकतो. दुसरं म्हणजे आम्हा मित्रांची प्रत्येकाची वाचनाची, अभ्यासाची, रमण्याची आवड वेगवेगळी असली, तरी अवचटांचं वाचणं ही ‘कॉमन’ गोष्ट होती. त्यामुळे काम कसं करायचं तर अवचटांसारखं, असं मनात चालू राहत असे. त्यांनी समाजाचा जो कोपरा वाचकांना दाखवला तो आणखी उकलून पाहण्याचा, जरा अधिक शिस्तीने, समाजशास्त्रीय अभ्यासाचा आधार घेऊन पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला तो त्यामुळेच.
‘युनिक फीचर्स’च्या टीमने खूप खपून धारावी या अति प्रचंड झोपडपट्टीवर आणि तिथल्या जगण्यावर, तिथल्या व्यवहारांवर एक शोधलेख ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकासाठी १९९५ साली लिहिला होता. हा लेख वाचून कुणी तरी म्हटलं होतं, की ‘साप्ताहिक सकाळ’च्या यंदाच्या दिवाळी अंकात अनिल अवचटांचे दोन लेख आहेत. एक स्वत:च्या नावाने आणि दुसरा ‘युनिक फीचर्स’च्या नावाने!’ हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा भारी मजा वाटली होती. अवचटांचा वाटावा असा लेख आपण लिहिला याचं केवढं अप्रूप आम्हाला तेव्हा वाटत होतं! त्यानंतर मुंबईतील भेंडीबाजार, आग्रीपाडा, वेश्यांच्या वस्त्या, कोळीवाडे वगैरेंवर आम्ही लेख लिहिले, तेव्हाही ‘अवचटांची छाप आहे तुमच्यावर’ असं कुणी कुणी म्हणत असेच. ज्या माणसाचं वाचून आमची पिढी तयार झाली, त्यांच्याशी वाचकांनीच अशी नाळ जोडून टाकली! या सर्व काळात ना कधी अवचटांशी गाठीभेटी होत, ना कधी बोलणं-चालणं. खेड्यापाड्यांतली मुलं जशी कपिल किंवा सचिनच्या खेळाकडे बघून आपापले धडे गिरवतात, तसं आमचं अवचटांबद्दल चालू होतं.
आणखी एक गंमत सांगण्यासारखी आहे. अवचटांच्या ‘वेध’ या पहिल्यापैकीच्या पुस्तकाला विजय तेंडुलकरांची प्रस्तावना आहे. ही गोष्ट १९७५ ची. त्यानंतर तब्बल पंचवीस-सत्तावीस वर्षांनंतर ‘युनिक फीचर्स’चं पहिलं पुस्तक ‘अर्धी मुंबई’ प्रकाशित झालं, त्यालाही तेंडुलकरांचीच प्रस्तावना आहे. ‘वेध’बद्दल लिहिताना तेंडुलकरांनी अवचटांच्या ठायी असलेल्या ‘सामाजिक जाणिवे’ची नोंद केली होती. ‘अर्धी मुंबई’बद्दल लिहिताना ‘युनिक फीचर्स’च्या पत्रकारांमधील ‘सजग समाजशास्त्रीय दृष्टी’ तेंडुलकरांना भावली होती. तेंडुलकरांनी हेरलेली ही गोष्ट आम्हाला नेहमीच बळ देत आली आहे. अवचट जेव्हा लिहीत होते तेव्हा भारतात तुलनेने सामाजिक शास्त्रांचा विकास झालेला नव्हता. नंतरच्या पिढ्यांना मात्र समाजशास्त्रीय अभ्यासाची पार्श्वभूमी मिळाली. त्यामुळे या नव्या शस्त्रामुळे आम्हाला अवचटांच्या सामाजिक जाणिवेला अधिक धार आणता आली आणि एका लेखकाचं काम पुढे नेण्याचा आनंद मिळवता आला. अवचटांनी तयार केलेल्या रस्त्याने पुढे जाणं म्हणजे हेच!
‘युनिक फीचर्स’ने गेल्या दोन दशकांत जी पत्रकारिता केली त्याच्यावर अन्य काही पत्रकार, लेखक, अभ्यासक नि संपादकांप्रमाणेच अवचटांचाही प्रभाव आहे, ही गोष्ट त्यामुळे मान्यच करायला हवी. विशेषत: रिपोर्ताज, शोधलेख हे लेखनप्रकार हाताळण्याबाबत तर नक्कीच. मराठीत हा लेखनप्रकार पहिल्यांदा हाताळला तो अवचटांनी. त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय, की सुरुवातीला त्यांचे असे लेख येऊ लागले तेव्हा त्यांना कुणी अभ्यासक सांगत, की अशा लेखनाला ‘रिपोर्ताज’ म्हणतात, हा मूळचा फ्रेंच शब्द आहे वगैरे. याचा अर्थ रिपोर्ताज हा लेखनप्रकार हाताळण्यासाठी म्हणून अवचट लिहीत नव्हते; परंतु आम्ही जेव्हा लिहिते झालो तेव्हा अवचटांचे ‘रिपोर्ताज’ मराठीत रुळलेले होते. या रिपोर्ताजचं गारूड आमच्यावरही होतं. एखादा प्रश्न समजून घ्यायचा तर लोकांमध्ये जायला हवं, त्यांचं जगणं, त्यांचं म्हणणं समजून घ्यायला हवं आणि हे सारं रिपोर्ताजच्या फॉर्ममध्येच लिहायला हवं, असं वाटे. कदाचित अवचटांइतके चांगले, सहज आणि मोकळेढाकळे रिपोर्ताज आम्ही लिहू शकलो नसू; पण त्यांच्या या लेखनशैलीची कास आम्ही धरून राहिलो, ‘प्रचंड मेहनत’ ही पूर्वअट असलेला हा लेखनप्रकार हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करत राहिलो. ‘अनुभव’ या (आमच्याच) मासिकासह अनेक नियतकालिकांत आणि दिवाळी अंकांत ‘युनिक फीचर्स’च्या टीमने लिहिलेले रिपोर्ताज (-शोधलेख) प्रसिद्ध होत असतात. त्यातून येत्या काळात या लेखांचे संग्रह करून त्यांची पुस्तकं वाचकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अर्धी मुंबई’ हे शोधलेखांचं पुस्तक तर सर्वज्ञात आहेच. या प्रकारचं काम करत असताना अनिल अवचटांनी शोधलेली वाट आपण सोडता कामा नये, अशी एक सुप्त जाणीव मनात असते, हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं.
अवचटांकडून आणखीही काही गोष्टी ‘युनिक फीचर्स’ने घेतल्या आहेत. दिसतं त्यापलीकडे असलेलं वास्तव समजून घेण्याची वृत्ती, प्रश्नांप्रमाणेच त्यांची उत्तरं शोधणाऱ्या धडपड्या मंडळींचा शोध, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये जाऊन विषय समजून घेण्याची शैली, या बाबी आम्ही आमच्या अंगी बाणवत आलो आहोत. ‘मला काय वाटतं’ याऐवजी ‘मला काय दिसतं’ हे सांगणं महत्त्वाचं, हा धडाही आम्ही त्यांच्याकडूनच घेतला असावा. जे दिसेल ते वस्तुनिष्ठपणे सांगणं, त्यात सांगणाऱ्याची वैचारिक भूमिका-आवडीनिवडी वगैरे येऊ न देणं ही गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळत असतो. अवचटांच्या लेखनातही दुराग्रह नाहीत, अभिनिवेश नाहीत. त्यांच्यात तटस्थता आहे. हे गुण आत्मसात करणं सोपं नाही; परंतु पत्रकारिता वस्तुनिष्ठपणे करायची तर ही गोष्ट करणं आलंच.
अवचटांकडून एवढं सारं घेतलं असं म्हणताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हल्ली हल्ली अनेकदा गुंतागुंतीच्या सामाजिक व अर्थराजकीय विषयांवर अवचट भाबडी किंवा स्वप्नाळू वाटेल अशी भूमिका घेताना दिसतात. त्यामुळेच त्यांची शहरांबद्दलची, चंगळवादाबद्दलची, पर्यावरणाबद्दलची मतं अनेकदा पटणारी नसतात. राजकीय प्रक्रियेपासून फटकून राहण्यासारख्या काही भूमिकाही आम्हाला पटणाऱ्या नसतात. त्यांच्या या भूमिकांबद्दल त्यांच्यावर कुणी कुणी टीकाही करतं, तेव्हा मात्र असं वाटतं, की आपल्याला एवढं काही दिलेल्या माणसाला त्याचा स्वत:चा विचारव्यूह बाळगण्याचं स्वातंत्र्य आहेच की!
तर असे हे आमचे गुरुजी!

रिपोर्टिंगचे दिवस या पुस्तकातील लेख वाचल्यानंतर कुणाच्याही लक्षात येईल, की हे पुस्तक आजच्या आणि उद्याच्या पत्रकारांच्या दृष्टीने फार उपयुक्त आहेत. या पुस्तकातील सर्वच लेख वाचकांना जवळचे वाटणारे असले, तरी नव्या पत्रकारांना यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. ‘रिपोर्टिंगचे दिवस’ या पुस्तकातील एकेक लेख वाचताना असं वाटत राहतं, की या लेखांत दिसणारी चित्रमय लेखनशैली अवचटांनी पुढे स्वत:च्या लेखनात नीट विकसित केली, परंतु अगदीच मोजके अपवाद वगळता मराठीत हा प्रवाह रुजू शकला नाही. याचं एक कारण कदाचित मराठी पत्रकारितेचा कल अधिककरून मतं मांडण्याकडेच राहिला यात असू शकतं. बारकाईने, तपशीलवार चित्रण करणं आणि निरीक्षणं मांडणं असा प्रयत्न आपल्याकडे तुलनेने खूपच कमी दिसतो. अमुक एखादी घटना, प्रसंग, घडामोड किंवा प्रक्रिया कशी घडते आहे, त्याच्याशी संबंधित माणसं कोण, कशी आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं वागणं-बोलणं कसं आहे, त्यांच्या बोलण्यात-वागण्यात अंतर आहे काय, इथपासून ते अमुक एका घडामोडीचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे त्यांचं त्याबद्दल म्हणणं काय आहे, वगैरे सर्व बाजू समोर आणाव्यात आणि त्यावर विचार करून मत बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकाला द्यावं, ही गोष्ट मराठी पत्रकारितेत म्हणावी तशी मूळ धरू शकलेली नाही. जे काही घडत आहे त्यावर माझं मत काय आहे हेच प्रामुख्याने सांगितलं गेलं आहे, जात आहे. त्यात ‘माझं’ आणि ‘मत’ या दोन गोष्टींना विनाकारण महत्त्व प्राप्त होतं. शिवाय जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे आपलं मत मांडत असल्यामुळे ते मत पुरेसं वस्तुनिष्ठ किंवा वास्तवास धरून असेलच असंही नाही. त्यामुळे खरं तर वाचकाला वास्तव काय आहे हे सांगणं गरजेचं. त्यासाठी वास्तवाचं चित्रण, वर्णन केलं पाहिजे, आपल्याला कळलेले कंगोरे सांगितले पाहिजेत आणि मगच (हवं असेल तर) आपलं मत दिलं पाहिजे. परंतु आपल्याकडे दैनिकं-साप्ताहिकांमध्ये जे छापून येतं ते पाहिलं की या दृष्टीचा संपूर्ण अभाव असल्याचं जाणवतं. पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही ही दृष्टी कितपत गंभीरपणे दिली जाते माहीत नाही. त्यामुळे ज्यांना आपला समाज नीटपणे समजून घ्यायचा आहे आणि पत्रकारितेमार्फत, लेखनामार्फत वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे अशांना हे पुस्तक बरंच उपयुक्त ठरू शकतं.
अवचटांनी हे लेख लिहिले तेव्हा साप्ताहिकं-मासिकांमधून विस्ताराने लिहिण्याची सोय होती, आज ती उरलेली नाही, त्यामुळे ही लेखनशैली मागे पडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आजही जागेची अडचण नसलेली मासिकं प्रकाशित होत आहेत, दिवाळी अंकांची संस्कृती विस्तारते आहे, पुस्तकं प्रकाशित करणं पूर्वीसारखं अवघड राहिलेलं नाही, नवं तंत्रज्ञान वापरून इंटरनेटवर ब्लॉग्ज वगैरे लिहिणंही सहज शक्य झालं आहे. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांमध्येही रिपोर्ताज प्रकार हाताळता येऊ शकतो व काही मंडळी हा प्रयत्न करतही आहेत. मात्र, टीव्हीवरील रिपोर्ताज पाहताना मेंदू प्रामुख्याने दिसणारी चित्रं पाहण्यात गुंततो आणि आशय मात्र सुटून जातो. त्यामुळे छापील रिपोर्ताजची जागा दृक्श्राव्य रिपोर्ताज घेऊ शकतील असं वाटत नाही. त्यामुळे या नव्या, बदललेल्या परिस्थितीत अवचट शैलीच्या रिपोर्ताजची परंपरा चालू राहणं आणि बळकट बनणं आवश्यक बनतं. ‘युनिक फीचर्स’च्या वतीने आम्ही हा प्रयत्न करत आहोतच, परंतु संपूर्ण पत्रकारितेनेच ही दृष्टी स्वीकारण्याची गरज आहे.
या पुस्तकाने ही गरज अधोरेखित झाली तर अवचटांच्या लेखनाचे वाचक म्हणून, त्यांच्या प्रवाहाचे संवाहक म्हणून आणि त्यांचे प्रकाशक म्हणून आम्हाला आनंदच होईल.
-सुहास कुलकर्णी

(`रिपोर्टिंगचे दिवस` या अनिल अवचट यांच्या समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित भाग.)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content