शिंगणापूरला शनि पावला तो असा!

भक्तांच्या दृष्टीने देवस्थानांना पावित्र्याचा स्पर्श लाभलेला असतो. भाविक देवस्थानांत जातात, देवधर्मासोबत दानधर्म वगैरे करतात आणि देवासमोर हात जोडून परततात. हा क्रम वर्षानुवर्ष चालू आहे. पण गेल्या पंधरावीस वर्षात भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे देवस्थानांचा पसारा चांगलाच वाढत आहे. त्यामुळे ज्या गावात ही देवस्थानं असतात, ती गावं संपूर्णपणे ‘देवस्थानकेंद्रीत’ बनताना दिसत आहेत. मुख्य शक्तीकेंद्र बनत आहेत.
पूर्वी जवळपास अज्ञात असलेलं शनिशिंगणापूर अशाच रितीने भरभराटीस आलं आहे. एक साधंसं-छोटंसं भक्तीस्थान कसं शक्तीस्थान बनलं त्याची ही गोष्ट. पुणे विद्यापिठाचा राज्यशास्त्र विभाग आणि युनिक फीचर्स यांच्या अभ्यासावर आधारित शोध वृत्तांत. साप्ताहिक सकाळच्या (२००६) दिवाळी अंकात प्रकाशित झालेला

आपल्या देशात एकूणच देवदेवतांचा बोलबाला जास्त. महाराष्ट्रही देवदेवतांच्या स्थानांविषयी अजिबात मागे नाही. आपल्याकडेही देवस्थानं आणि तीर्थस्थानं बक्कळ आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एखादं तरी प्रसिद्ध मंदिर किंवा देवस्थान हमखास आहेच आहे. गणपती, महादेव, दत्त, देवी यांची परंपरा सांगणारी शेकडो देवस्थानं आपल्याकडे आहेत. संतपरंपरेतली अनेक देवस्थानंही श्रद्धेचा भाग बनली आहेत. त्याशिवाय शिर्डी, शेगाव, अक्कलकोट अशी चमत्कारी पुरुषांसाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणंही भक्तांना आपल्याकडे खेचत असतात. त्याही पलिकडे गावोगावचे स्थानिक देव वेगळेच. एकूणात, महाराष्ट्रात देवस्थानांना काही कमी नाही, भक्तांना तर नाहीच नाही. कोणत्याही देवस्थानात केव्हाही जा, जिकडे तिकडे भक्तांची तोबा गर्दी दिसते. गेल्या काही वर्षांत तर या गर्दीतही लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतं. गर्दी वाढली तर देवस्थानही वाढतात. देवस्थानांची संख्या जशी वाढते,तसाच देवस्थानांचा आकारही वाढतो. भक्तांची गर्दी दान-देणगीतून पैसा देऊन जाते. या दान-देणगीतून भक्तांसाठी सोयी-सुविधा उभ्या होतात. सोयी आहेत म्हणून वाढीव भक्त येऊ लागतात. पाहता पाहता देवळाचं देवस्थान होतं.

एवढ्यावर हा सिलसिला थांबत नाही, ज्या गावात हे देवस्थान पसरत असतं, ते गावही या व्यवहारांत गुरफटतं. गाव नव्याने आकाराला यायला लागतं. महाराष्ट्रात अशी अनेक गावं दिसतात. या गावांच्या यादीत आणखी एक गाव ठळकपणे जोडलं गेलं आहे ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर. कधी काळचं साधंसुधं; पण आता अचानक श्रीमंत बनलेलं.

शनिशिंगणापूर या गावाचं नाव जोडलं गेलंय शनिदेवाशी. शनि हा सूर्यमालेतला सातवा ग्रह. ग्रह म्हणून शनिची ओळख आहेच; पण शनिदेव म्हणूनही त्याची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा पापग्रह वा दुष्टग्रह म्हणून गणला जातो. चुकीच्या मार्गाने जाणार्‍या व्यक्तींना तो योग्य शासन देऊन पुन्हा कर्तव्याकडे आणि शेवटी परमार्थाकडे वळवतो असं ज्योतिषशास्त्र मानतं. शासन करण्याच्या गुणामुळे या ग्रहाबद्दल लोकांमध्ये आदरयुक्त भीती आणि भीतियुक्त दहशत आहे. म्हणूनच बारा राशींपैकी कुठल्याही राशीला शनिदेवाच्या साडेसातीचा फेरा सुरू झाला की ज्योतिषावर विश्वास ठेवणारे मनातून धास्तावतात आणि त्यांचे पाय शनिमंदिराकडे वळू लागतात. श्रीराम किंवा हरिश्चंद्रालाही जिथे शनिदेवाने सोडलं नाही, तिथं आपल्यासारख्या पामरांची काय कथा, अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा शनिदेवाची करुणा भाका, त्याची आराधना करा आणि त्याची कृपा संपादन करा, यावर श्रद्धाळूंचा जास्त भर असतो. त्यामुळे शनिमंदिरात, मारुती मंदिरात किंवा शिंगणापूरसारख्या शनिमाहात्म्य लाभलेल्या गावी शनिवारी आणि शनिअमावस्येच्या दिवशी विलक्षण गर्दी असते. त्यातही शनिशिंगणापूरला जाऊन शनिची पूजा बांधल्यावर साडेसातीचा (वा पत्रिकेत शनिग्रहाचा) त्रास असल्यास तो निश्चित कमी होतो याची खात्री श्रद्धाळूंना असल्याने, शनिशिंगणापूरची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
शनिशिंगणापूरमधे शनिचं मंदिर आहे; पण केवळ चौथ-याच्या स्वरूपात. मंदिराला असतो तसा कळस नाही, छत नाही किंवा गाभाराही नाही. सगळा उघड्यावरचा कारभार. इतर शनिमंदिरात दिसते तशी मूर्तीही इथे नाही. मूर्तिस्वरूपात आहे तो फक्त साडेपाच फुटी पाषाण. हाच शनिदेव. शनिदेव ज्या चौथ-यावर स्थानापन्न झालेले आहेत, तो चौथरा फक्त पुरुषांनाच खुला आहे. स्त्रियांना शनिच्या चौथ-यावरून जाण्याची परवानगी नाही. त्यांना खालून-दुरून नमस्कार करावा लागतो. हा या गावाचा स्वघोषित कानून आहे. तरीही शिंगणापूरला स्त्री-पुरुषांची भरपूर गर्दी असते आणि गावाने ठरवलेल्या नियमांना धरून पूजा-दर्शनाची रीत पाळली जाते. शेकडोंचे लोंढे येतच राहतात.

खरं पाहता संपूर्ण भारतभरात शनिदेवाची जागृत ठिकाणं इतरही आहेत; मात्र या सगळ्या ठिकांणांपेक्षा शिंगणापूरला कांकणभर अधिकच ग्लॅमर लाभलंय. दहा-पंधरा वर्षांपूर्वी शिंगणापूरची वाट वाकडी करून जेमतेम वीस-पंचवीसजण दर्शनाला यायचे आणि आज हेच प्रमाण सर्वसामान्य दिवशी हजाराहून अधिक असतं. शनिवारी, अमावस्येला, शनिअमावस्येला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी लाखाहून अधिक भाविक शिंगणापूरला येतात. यंदाच्या शनिअमावस्येला तर तब्बल पाच लाख भाविकांनी इथे उपस्थिती लावली. एवढा मोठा बदल झाला कसा?

शिंगणापूर : पूर्वीचं नि आजचं

सातआठ वर्षांच्या अवधीनंतर एखादी व्यक्ती आज शिंगणापूरला गेली, तर ती एकदम अचंबितच होईल एवढं हे गाव बदलून गेलेलं आहे. कुणा दैवी शक्तीच्या आशीर्वादाने एखाद्या गरीब खेड्याचं एका रात्रीतून राजनगरीत वा राजप्रासादात रूपांतर होणा-या ज्या सुरस, अद्भुत आणि चमत्कारिक कथा पुराणात सांगितल्या जातात, तशीच जादूची कांडी शनिशिंगणापूरवर फिरली आहे. या चमत्कारामुळे पूर्वीचा गाव आणि शनिचं देवस्थान अक्षरश: अभूतपूर्वरीत्या बदलून गेलं आहे.

शिंगणापूरमध्ये सात-आठ वर्षांपूर्वीही गर्दी असायची पण फारशी नाही. शिर्डीमागे राहुरीवरून शिंगणापुरात यायला निघालं, की आपण एखाद्या साध्याशा खेड्यात चाललो आहोत, याचा अदमास लगेच यायचा. आजूबाजूच्या उसाच्या फडातून आणि हिरव्यागार शेतातून जाणारा रस्ता शिंगणापूरला आणून सोडायचा. वाहनांची गर्दी तुरळकच असायची. शिंगणापूरच्या वेशीवर येताक्षणी बाजूच्याच मुळा सहकारी कारखान्यातून बाहेर टाकल्या जाणा-या मळीचा गोडसर दर्प नाकाला झोंबायचा. तेव्हा गावंही साधं होतं आणि देवस्थानही. शनिच्या या देवस्थानाला लागूनच बाजूच्या भल्या मोठ्या मोकळ्या जागेत पूजेचं सामान आणि तेल विकणा-या ब-याच टप-या होत्या. पक्कं बांधकाम नावालाच दिसायचं.

देवाजवळच्या एका कोप-यात एक भली मोठी भिंत होती. आणि भिंतीच्या आधाराने पाण्याचा आडवा पाईप टाकलेला होता. या पाईपलाच मध्ये मध्ये छिद्र पाडून त्याला सायकलच्या ट्यूब्ज जोडलेल्या होत्या. त्यातून बदाबदा पाणी पडायचं. अंघोळ करून ओला पंचा गुंडाळून शनिचं दर्शन घ्यायचं हा इथला रिवाज आहे. स्वच्छतागृह नावाचा प्रकार नव्हताच. गरजेला आडोसाच शोधावा लागायचा. अनवाणी पायाला बसणारे चटके डोक्याला ठणका आणायचे. केव्हा एकदा देवळाच्या परिसरातील झाडांच्या सावलीत जातो असं व्हायचं. तेव्हा तिथे होता फक्त शनिचा चौथरा, त्यासमोरचं एक हॉलसारखं मंदिर, नारळ फोडण्याची जागा आणि कार्यालयाची बैठी इमारत. शेजारीच लक्ष्मीचं जुनं मंदिर आणि एक विहीर, एवढाच काय तो कारभार होता. मुबलक झाडांची सावली, उसाच्या शेतातून येणारा गार वारा यामुळे दर्शनाला येणा-यांच्या जीवाला विसावा लाभायचा. शहरापासून दूर एखाद्या शांत ठिकाणी आलोय असं वाटायचं. व्यवसायाची लगबग वा खेचाखेच अजिबातच नव्हती.

आजचं शिंगणापूर आणि त्याहीपेक्षा इथलं श्री शनैश्वर देवस्थान खूप खूप बदललं आहे. हा बदल चकित, अचंबित आणि थक्क करणारा आहे. देवस्थानात दिसणारी श्रीमंती चक्रावून टाकणारी आहे. आता कुणी इकडे आला तर शिंगणापूरच्या वेशीपासूनच गावात आलेल्या सुबत्तेची आणि बदललेल्या अभिरुचीची झलक जाणवू लागते. जिथे मातीची साधीशी जुनी परंपरागत घरं होती, तिथे आता सिमेंटच्या बांधकामाची घरं-दुकानं उभी राहिली आहेत. देवस्थानापर्यंत येणारा रस्ता पक्का आणि प्रशस्त बनलेला आहे. देवळापाशी येताच आधी केव्हातरी शिंगणापूरची वारी केलेला तर गडबडूनच जाईल. दक्षिणेकडील भव्य गोपुरांची आठवण येईल असं भव्य महाद्वार भक्तांच्या स्वागताला आता उभं आहे. अनेक जुन्या देवळांच्या भव्य प्रदेशद्वारावर सनई-चौघड्याची व्यवस्था असते, तशीच सोय या प्रवेशद्वारावरही आहे. विशेषप्रसंगी इथं सनई-चौघड्याचं वादन होतं आणि एरवी सकाळ-संध्याकाळ आरतीच्या आधी-सायरन वाजवला जातो. महाद्वाराचं बांधकाम प्रशस्त, कल्पक आणि महागडं आहे. महाद्वारातून आत गेल्यावर मंदिर परिसराचे तीन भाग स्पष्टपणे नजरेच्या टप्प्यात येतात. डाव्या हाताला देवस्थानचं भलं-मोठं प्रशासकीय कार्यालय आहे. आलिशान केबिन्स, उंची सोफासेटस्, महागडे पडदे असं देवस्थान कार्यालयाचं पंचतारांकित स्वरूप आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आहे दर्शन रांगेची लांबलचक प्रशस्त इमारत. ठराविक अंतरावर मोठे-मोठे पिलर्स व त्यावर दोन्ही बाजूने उतरता स्लॅब आणि खाली चकचकीत आधुनिक टाईल्स. दर्शन रांगेच्या इमारतीत आता कायमस्वरुपी रेलिंग्ज बसवून घेतलेली आहेत. अंतराअंतरावर क्लोज सर्किट टीव्ही बसवलेले आहेत. या लांबलचक दर्शन रांगेच्या दुस-या टोकाला शनि चौथरा, जुनं प्रशस्त हॉलवजा मंदिर असून जनसंपर्क कार्यालय, ध्यानमंडप, अभिषेक भवन, दर्शन झाल्यावर बाहेर नेणारं दर्शन रांग संकुल उभारण्यात आलं आहे. या क्रमांक दोनच्या दर्शन रांग संकुलाला लागूनच बहुउद्देशीय सभागृह असून, त्यात भजन, कीर्तन आणि इतर कार्यक्रम होतात. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला प्रसादालयाची एक मजली इमारतही आहे.

या सर्वच बांधकामाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. त्यात वास्तुसौंदर्य आहे. रंगसंगतीचा सुरेख वापर केलेला आहे. संगमरवर आणि महागड्या टाईल्स यांचा मुबलक वापर करण्यात आला आहे. वाढती गर्दी आणि गर्दीचं नियंत्रण या गोष्टी लक्षात घेऊन प्रशस्त बांधकाम केलंय. देवस्थानच्या समोरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागी आता व्यापारी संकुल, स्नानगृह, पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह, महिलांसाठी अंघोळीची स्वतंत्र व्यवस्था, हॉटेल्स आणि पार्किंगची व्यवस्था असं सगळं अतिशय आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलंय. व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर भक्तनिवासाची उत्तम सुविधा केलेली आहे.

हे सगळंच बांधकाम, सोयी आणि त्या परिसराचा झालेला विकास बघितला की त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असणार हे क्षणात लक्षात येतं. केवळ दशकभराच्या काळातला हा कायापालट आहे. सर्वसाधारण मंदिर ते राजेशाही देवस्थान असा.

सुपरफास्ट विकास

गेल्या आठ-दहा वर्षांत अचानक नावारूपास आलेल्या शनिशिंगणापूरचा ‘देवस्थान’ म्हणून झालेला हा प्रवास मोठा गंमतीशीर आहे. भक्ति-श्रद्धा नावाची चीज काय जादू करू शकते याचं हे अजब उदाहरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई या गावाची एक वाडी म्हणजे शिंगणापूर. खरंतर हे अगदी आडगाव आहे. रेल्वे किंवा बसने इथं पोहोचणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण एखाद्या देवस्थानाबद्दल श्रद्धा निर्माण झाली की, या अडचणी लोक सहजी पार करतात. शिवाय शिंगणापूर हे गाव साईबाबांच्या शिर्डीपासून साधारण ७०-७५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे शिर्डीला येणारे भाविक शिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनलाही येतातच. पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी या गावाबद्दल कुणाला काही माहितही नव्हतं. पण चमत्कार व्हावा तसं हे ठिकाण देशभर प्रसिद्धीला आलं आणि इथला सारा माहोलच बदलून गेला.

तसं पाहिलं तर या गावाचा शनिदेवाशी संबंधित इतिहास सुमारे साडेतीनशे वर्षांचा आहे. असं म्हटलं जातं की, साडेतीनशे वर्षांपूर्वी एके दिवशी इथे चमत्कार घडला. शिंगणापूर-सोनई वगैरे परिसरात अतिशय मुसळधार पाऊस कोसळल्याने गावच्या नाल्याला पूर आला आणि या पुरात एक मोठी शिळा वाहून आली. एवढी मोठी शिळा कशी वाहून आली असेल याचं आश्चर्य गुरं राखायला आलेल्या गुराख्यांना वाटलं. त्यातल्या एका मुलाने हातातल्या काठीने शिळेला ढोसून हलवण्याचा प्रयत्न करताच ज्या ठिकाणी ढोसलं तिथून रक्तस्राव सुरू झाला. हा प्रकार कळताच गावकरी ती शिळा बघायला जमले. असं सांगितलं जातं की, त्याच रात्री शनिदेवांनी गावातल्या एका देवभक्ताला स्वप्नात जाऊन ‘गावात माझी प्रतिष्ठापना करा’ असा आदेश दिला. त्यानुसार दुस-या दिवशी गावक-यांनी ती शनि शिळा बैलगाडीत उचलून गावात आणण्याचा प्रयत्न केला पण ती तसूभरही हलली नाही. त्या रात्री शनिमहाराजांनी त्याच भक्ताला पुन्हा स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं की, ‘दोन व्यक्ती जे नात्याने सख्खे मामा-भाचे असतील, त्यांनी मला बोराटीच्या फासावर ठेवून बैलगाडीने गावात न्यावं. बैलगाडीचे दोन बैल पूर्ण काळे आणि नात्याने मामा-भाचेच असावेत. गावात माझी प्रतिष्ठापना मामा-भाच्यांनीच करावी.’ या दृष्टांताप्रमाणे अटी पाळून शनिदेवाला गावात आणण्यात आलं आणि एका शिळेवर त्यांची स्थापना करण्यात आली. ‘मंदिर बांधायचं नाही’ असाही खुद्द देवाचाच आदेश असल्यामुळे गावक-यांनी मंदिर न बांधता या देवाची पूजा-अर्चा सुरू केली. असं म्हणतात की कोण्या एका भक्ताने छत बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते सगळं बांधकाम कोसळलं. असंही सांगितलं जातं की, या मंदिराभोवतीच जे कडूलिंबाचं एक झाड आहे, त्या झाडाची एक फांदी वाढून शिळेवर जेव्हा जेव्हा तिची सावली पडते, तेव्हा ती फांदी जळून तुटून खाली पडते. त्यामुळे एक साधासा चौथरा व चौथ-यावर साडेपाच फुटी पाषाण असं या बिन मंदिराच्या देवस्थानाचं स्वरूप बनलं.

शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं आगमन साडे-तीनशे वर्षांपूर्वी झालं तरी हे गाव नावारूपाला यायला जवळपास १९६० साल उजाडावं लागलं. तोपर्यंत गावक-यांची प्रथेप्रमाणे पूजा-अर्चा-प्रार्थना सुरू होती. घरातल्या शुभकार्याला देवाला आमंत्रण देणं, नवदांपत्याने शनिच्या दर्शनाला जाणं, नवजात बालकाला देवाच्या पायाशी ठेवणं आणि या दुष्काळग्रस्त भागात पाऊसच पडला नाही तर शनिदेवाला कौल मागणं वगैरे प्रथा-परंपरा सुरू होत्या. अनेक पिढ्यांनी केलेली शनिदेवाची अशी आराधना फळास येण्याची लक्षणं १९६० नंतर दिसू लागली.

या सुमारास शनिशिंगणापूरमधे उदासीबाबा नावाच्या साधूंच्या प्रेरणेने गावक-यांनी देवस्थानचा कारभार एका ट्रस्टच्या माध्यमातून चालवायला सुरुवात केली. उदासीबाबा हे या परिसरातलेच होते. गावकरी त्यांना मानत. ट्रस्ट स्थापन झाल्यावर शिंगणापूरमध्ये येणा-यांचं प्रमाण थोडं वाढू लागलं. शनिशिंगणापूर ट्रस्टचा कारभार १९६३पासून सुरू झाला आणि १९७० मध्ये मुळा नदीचं पाणी कॅनॉलच्यामार्फत सोनई आणि आसपासच्या परिसरात खेळू लागलं. परिसराच्या विकासासाठी एक मोठा मार्ग यातून खुला झाला. जिरायती शेतकरी बागायती शेतीकडे वळले. उसाचे फडे शेतातून डोलू लागले. या नगदी पिकामुळे गावाला पैसा दिसू लागला. गावात ट्रॅक्टर आले. काहींच्या दारात जीप-मोटारसायकली उभ्या राहिल्या. यातून एक झालं, गावक-यांच्या हातात पैसा खेळू लागल्याने त्यांनी आपल्या ग्रामदेवतेच्या दगडी चिरेबंदी चौथ-याला संगमरवरी लाद्यांनी मढवलं.

१९६० पासून पुढच्या साधारण वीस वर्षांचा काळ लक्षात घेतला तर असं लक्षात येतं की, शिर्डी, शेगाव, अक्कलकोटसारख्या साधू-संतांची गावंही याच काळात प्रतिष्ठेस येत होती. साईबाबांचं शिर्डी संस्थान तर झपाट्याने आकाराला आणि सुबत्तेस येत होतं. शिर्डीचे वारकरी वाढू लागले आणि त्यांचे पाय शिंगणापूरच्या दिशेने वळू लागले. यातच मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना शिंगणापूरची लोकप्रियता वाढण्यास कारणीभूत ठरली. मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तुकाराम गडाख हे बडं राजकीय प्रस्थ. त्यांच्या या साखर कारखान्याने परिसरात सुबत्ता आणली होतीच. सोबतच या कारखान्याने गणेशोत्सव वा इतर धार्मिक कारणांच्या निमित्ताने मोठ्या कलाकारांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं. या निमित्ताने लेखक, नेते, अभिनेते, गायक कलाकार, निर्माते - दिग्दर्शक यांच्या भेटी सातत्याने होऊ लागल्या. या गावातल्या घरांना दारं-खिडक्या नाहीत, आणि तरीही चोरी होत नाही, अशा या गावाबद्दल त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होणं साहजिकच होतं. त्यामुळे सोनईच्या मुळा साखर कारखान्यावर येणा-या मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींची माथी शनिदेवाच्या चौथ-यावर टेकली जाऊ लागली. या सर्व घडामोडींमुळे शिंगणापूरची,शनिदेवाची आणि देवस्थानची प्रसिद्धी दूरपर्यंत पसरू लागली. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बासू भट्टाचार्य हे शिंगणापूरच्या वैशिष्ट्यामुळे इतके प्रभावित झाले की, त्यावर एक चित्रपट काढायची घोषणाही त्यांनी लगोलग केली. याला खूप प्रसिद्धी मिळाली. दारं-खिडक्या नसलेल्या गावावर चित्रपट काढण्याच्या कल्पनेने बासूदा झपाटून गेले होते असं म्हणतात. तो सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही; पण शिंगणापूरला ‘स्टार पब्लिसिटी’ मात्र मिळून गेली. त्यातून असं घडलं की, शिंगणापूर गावाला आणि विश्‍वस्थांना देवस्थानाच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली. त्यात दडलेलं भविष्य त्यांना दिसू लागलं. त्यातून त्यांनी जाणीवपूर्वक शिंगणापूरकडे सगळ्यांचं लक्ष जाईल असे प्रयत्न सुरू केले. भक्तिमार्गातल्या एका छोट्या आणि आडमार्गावरच्या देवस्थानाच्या कायापालटाची ही सुरुवात होती. भक्तीला केंद्रस्थानी ठेवून एका मोठ्या आणि अव्याहत सुरू राहणा-या उलाढालीची ती पायाभरणी होती.

पण शनिशिंगणापूरच्या आजच्या अवाढव्य श्रीमंती थाटाच्या देवस्थानला निमित्त ठरलं ते वेगळंच. १९९०च्या सुरुवातीला कॅसेट किंग गुलशनकुमार आणि चित्रपट गायिका अनुराधा पौडवाल हे शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आले होते. या गावाचं वैशिष्ट्य आणि श्रद्धाळूंच्या मनातलं शनिचं स्थान लक्षात घेऊन गुलशनकुमार यांनी शनिदेवाची भक्तिगीतांची कॅसेट बाजारात आणली. ही कॅसेट तुफान गाजली. त्यांनी पाठोपाठ ‘सूर्यपूत्र शनिदेव’ हा चित्रपट झळकवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या श्रद्धाळूंना आपल्या रोजच्या प्रश्नावर तोडगा सापडल्याचा साक्षात्कार झाला. शिर्डीतल्या साईभक्तांबरोबरच शनिदेवाच्या भक्तगणातही झपाट्याने वाढ झाली. शिंगणापूरकडे येणार्‍या खडबडीत रस्त्यावर ट्रॅव्हल्सच्या गाड्या, आलिशान मोटारी वळू लागल्या. अगदी अचानक शनिशिंगणापूरची क्रेझ तयार झाली. मराठी, अमराठी, भारतीय, परदेशस्थ भारतीय, विदेशी पर्यटक शनिशिंगणापूरला येऊ लागले. हा सिलसिला वाढत गेला आणि आता भारतातील आध्यात्मिक-धार्मिक वलय लाभलेल्या गावांच्या यादीत शनिशिंगणापूरचीही ठळकपणे नोंद झाली.

महाराष्ट्रातल्या एकूणच सर्व मोठ्या देवस्थानांचा आणि संतस्थानांचा विचार केला तर असं लक्षात येतं की, त्यांच्या स्वरूपात गेल्या दोन दशकांच्या काळात बराच बदल झाला आहे. केवळ प्रसिद्धीच नाही तर त्यापाठोपाठ आलेल्या पैशाच्या महापुराने या सर्व गावांचा नक्षा बदलून गेला आहे. शिंगणापूरमधील बदल तर सुपरफास्ट म्हणावा असा आहे. मात्र भक्तांचा पैसा प्रामुख्याने देवस्थानाकडे आल्यामुळे देवस्थान राजेशाही थाटाचं झालंय. पण गावाचा विकास मात्र त्या धर्तीचा नाही. छोट्या-छोट्या व्यवसायांमधून गावाला पैसा मिळतो आहे. त्यामुळे देवस्थानसारखा गावाच्या विकासात बांधीवपणा नाही.

पैसाच पैसा

भाविक जेव्हा एखाद्या देवस्थानात दर्शनासाठी जातो, तेव्हा देवदर्शनाचा भाग म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे छोटी-मोठी रक्कम दानपेटीत टाकतोच. कधी तो रुपया असतो; कधी त्याहून अधिक. पावती फाडून मोठी रक्कम देणगी देणारे भाविकही खूप असतात. त्यामुळे देवदर्शनासाठी जेवढे जास्त लोक येणार तितकी जास्त रक्कम जमा होणार! या जमा होणा-या रकमेतून देवस्थान श्रीमंत बनत जातं. शनिशिंगणापुरात तर वर्षाला दहा-पंधरा लाख लोक हजेरी लावतात. त्यामुळे इथे पैशाचा ओघच तयार झालाय. देवस्थानचा जो अभूतपूर्व विकास झालाय त्यात या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. शिवाय अन्य कुठल्याही देवस्थांनापेक्षा शिंगणापूरला वेगळं महत्त्व आहे. लोक शनीच्या फे-यातून सुटका व्हावी, शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी इथे येत असल्याने अधिक मोकळेपणाने देणगी देतात. भाविक जेवढा श्रीमंत तेवढी त्याची काळजीही मोठी, त्यामुळे तो श्रद्धेचा भाग म्हणून देणगी देताना पैशाकडे बघत नाही. अशा मोठ्या देणग्या देण्याच्या कथा इथे ब-याच सांगितल्या जातात. पूर्वीच्या काळी मर्दा नावाच्या सोलापूरच्या व्यापा-याने इथे धर्मशाळा बांधून दिली होती. ‘सूर्यपुत्र शनिदेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तर अनेक श्रद्धाळूंनी लाखो रुपयांच्या देणग्या देवस्थानच्या हाती सोपवल्या. काही भाविक शनिला दागदागिने अर्पण करतात. गेल्या शनिअमावस्येला एका शनिभक्ताने ५१ लाखांचा हि-यांचा हार देवाला चढवल्याची चर्चा ग्रामस्थांत होती. अर्थात, ब-याचजणांचा कल रोख देणग्या देण्याकडेच असतो. देवस्थानाने काही ‘गुप्तदाना’च्या पेट्याही ठेवलेल्या आहेत. शिवाय अभिषेक, विशेष पूजा वगैरेमधूनही देवस्थानला उत्पन्न मिळतं. देवस्थानतर्फे रोख देणग्या, मनीऑर्डर, धनादेश, स्वीकारले जातात आणि देणगी देणा-यांना ताबडतोब आयकरात सूट मिळणारं ८० जी प्रमाणपत्रही देण्यात येतं.

देणग्या वा पूजा-अर्चेतून मिळणा-या उत्पन्नाशिवाय उत्पन्नाचा आणखी एक घसघशीत मार्ग देवस्थानने शोधून काढला आहे. देवस्थानने स्वत:च्या मालकीच्या जागेवर जवळपास १०० चौरस मीटर जागेत पार्किंग स्लॉट आणि पूजा-अर्चेचे सामान विकणारे जवळपास शंभर स्टॉल्स उभारले आहेत. या स्टॉल्सचा लिलाव दरवर्षी केला जातो आणि ते अकरा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात. या लिलावातून देवस्थान समितीला एक चांगली रक्कम वर्षामागून वर्ष मिळत आहे. साधारण २०१५ फूट आकाराच्या स्टॉल्सना-जे मोक्याच्या ठिकाणी आहेत, त्यांना किमान दीड ते दोन लाखांची बोली लागते. आणि थोडे आत असलेले आणि मोक्याच्या जागी नसलेले स्टॉल्सही त्यांच्या महत्त्वानुसार सर्वसाधारणपणे २५ हजार ते एक लाख रुपये बोलीने जातात. हे सगळं लक्षात घेतलं तर देवस्थान समितीला भाड्यातून मिळणारं उत्पन्न किती मोठं आणि खात्रीचं आहे हे लक्षात येतं. याशिवाय उत्पन्नाचे इतरही मार्ग आहेत. जसं देवस्थानात भक्तांनी वाहिलेल्या नारळांचा ढीग लागतो. यातले काही नारळ दुकानदारांना जरा कमी भावात पुन्हा विकले जातात, आणि उरलेल्या नारळापासून खोबराबर्फी बनवून ती प्रसाद म्हणून ५रु. पॅकेट या दराने विकली जाते. नारळ बर्फी तयार करणं आणि ती विकणं हा एक उद्योगच जणू संस्थानतर्फे चालवला जातो.

नारळासारख्या गोष्टीचा पुनर्वापर आणि पुनर्विक्री किमान शक्य आहे; पण शनिदेवाला जे शेकडो लिटर तेल वाहिलं जायचं ते १९९० पर्यंत वाहूनच जायचं. शिवाय या तेलाने सगळीकडे तेलकट घाण पसरायची. पण १९९० नंतर भाविकांचं प्रमाण वाढलं. त्यातल्या श्रीमंत भाविकांना केवळ एक कॅन भरून तेल वाहून समाधान मिळत नसावं. शनिदेवाला जास्तीत जास्त तेल वाहणं म्हणजे शनिदेवाप्रती जास्त भक्तिभाव व्यक्त करणं या अहमिकेतून तेलाचा एक छोटा टँकरच शनिला वाहण्याच्या रंजक कथा इथं कानावर पडतात. एवढं तेल नुसतंच वाया जातंय, हे लक्षात आल्यावर वाहिलं जाणारं तेल साठवण्याची व्यवस्था केली गेली आणि पुढे हे तेल साबण कंपन्यांना, इतरांनाही विकलं जाऊ लागलं. तेलाच्या या विक्रीतूनही देवस्थान समितीला चांगलं घसघशीत अगदी लाखोंच्या आकड्यांत (कानोकानी ऐकलेला आकडा पन्नास-पंचावन्न लाख) उत्पन्न मिळतं. अशा विविध मार्गांनी देवस्थानचं एकूण उत्पन्न वर्षाला ६ ते ७ कोटी रुपये एवढं होतं.

एवढ्याशा टीचभर गावात ६-७ कोटी रुपयांचं उत्पन्न हे प्रचंडच म्हणायचं. त्यामुळे एवढ्या उत्पन्नाचा पुढे काय विनियोग करायचा असा प्रश्न पडणं स्वाभाविकच म्हणायचं. यावर मार्ग म्हणून मोठमोठ्या भक्तनिवासांची आणि अद्ययावत हॉस्पिटल्सची उभारणी सुरू आहे. विश्वस्तांनी देवस्थानला नवं स्वरूप तर दिलेलं आहेच,शिवाय कोट्यवधी रुपयांची कामं मंदिर परिसरात सुरू आहेत. दीड कोटी रुपयांचं आणखी एक प्रसादालय, ६० लाख रुपये किमतीच्या निवासी खोल्या; आणखी एक भक्तनिवास, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहं, भव्य पार्किंग व्यवस्था, व्यापारी संकुलं, संपूर्ण मंदिर परिसराला वीजपुरवठा करणारा जनरेटर अशी अनेक बांधकामं सध्या सुरू आहेत किंवा नजीकच्या काळात हाती घेतली जाणार आहेत. पाच कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही बांधण्याची योजना आहे. याशिवाय आणखी एका शाळेची, निर्माल्यापासून खत तयार करण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची उभारणी देवस्थान करणार आहे. गावाबाहेरची जवळपास सहा हेक्टर जागा विकत घेण्याचाही विश्वस्तांचा विचार आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी पंढरपूरजवळ एक एकर जागा विकत घेतलेली असून, तिथेही भक्तनिवास उभारण्याचं काम सुरू आहे. या सा-या वाढत्या पसा-यामुळं श्री शनैश्वर देवस्थानमध्ये आज तब्बल दीडशे कर्मचारी कामाला आहेत. थोडक्यात, कधीकाळी दुर्लक्षित असलेलं, सर्वसाधारण परिस्थितीतलं हे देवस्थान महाराष्ट्रातल्या श्रीमंत देवस्थानांच्या यादीत अगदी अल्पावधीतच जाऊन बसलंय.

देवस्थान आणि मानवी इच्छा आकांक्षा

ज्या गावात पूर्वी विशेष काहीच नव्हतं, त्या गावात अचानक एका देवस्थानात वर्षाकाठी ६-७ कोटी रुपये येऊ लागल्यानंतर गावाचे सर्वच व्यवहार त्याभोवती फिरणं, स्वाभाविकच म्हणायचं. एखाद्या मोठ्या शहरात एवढा पैसा आला असता,तर कदाचित त्या शहराच्या व्यवहारात खूप मोठा फरक पडला नसता. देवस्थानच्या ट्रस्टींना शहरात जरा जास्त मान मिळाला असता आणि शहरातले हितसंबंधी लोक देवस्थानच्या मर्जीत राहण्यासाठी थोडे धडपडले असते. पण शिंगणापूर हे गाव इतकं छोटं, की गावच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांना देवस्थानने व्यापून टाकलं आहे. यातून दोन गोष्टी शिंगणापुरात घडताना दिसतात. पहिली म्हणजे ‘गाव वजा देवस्थान’ असा विचार केला, तर भलं मोठं शून्य बाकी उरावं इतकं हे गाव शनिच्या महिमेवर अवलंबून आहे. परंतु त्याबरोबर दुसरीही एक गोष्ट अशी घडतेय, ही भाविकांसोबत प्रचंड पैसा देवस्थानात जमा होतोय पण गावक-यांना या पैशात तितकासा वाटा मिळत नाहीये. देवस्थानात येणारा पैसा देवस्थानाबाहेर जाणार नाही, अशी पक्की ‘व्यवस्था’ इथे तयार केलेली दिसते. त्यामुळे गावात याबाबत सुप्त असंतोष जाणवतो. शनिच्या वास्तव्यामुळे हे गाव बरे दिवस बघत आहे याचं गावक-यांनाना पुरेपूर भान आहे, पण प्रत्यक्ष गावक-यांच्या आर्थिक विकासाला देवस्थान हातभार लावत नाही अशीही भावना लोकांमध्ये आहे.
शनिशिंगणापूर हे देवस्थानाचं ठिकाण असलं तरी, ते चालवणारी माणसंच आहेत. त्यामुळे माणसांमधले गुण-दोष, इच्छा-आकांक्षा, ईर्षा-स्वार्थ इत्यादी मानवी भावना या गावातही वास्तव्यास आहेत. सामाजिकदृष्ट्या विचार करता या गावात मराठा समाजाचं सर्वार्थाने प्रभुत्व आहे, कारण लोकसंख्येच्या दृष्टीने या समाजाचं प्रमाण उल्लेखनीय आहे. दलित व अन्य मागासजातींचं प्रमाण अगदीच कमी आहे. मराठा समाज बानकर, शेटे, दरंदले आणि बोरुडे या चार आडनावांत बहुतांशी विभागलेला आहे. विशेष म्हणजे देवस्थानचे अकरा विश्‍वस्तही या चार नावांतच विभागलेले आहेत. विद्यमान अध्यक्ष रावसाहेब बानकर असून, उपाध्यक्ष भाऊसाहेब दरंदले आणि पंढरीनाथ शेटे आहेत. बारावं पद हे व्यवस्थापकाचं असून, विद्यमान व्यवस्थापक हे संजय बानकर आहेत. अशाप्रकारे मराठा समाजातील मंडळींचा संस्थानावर ताबा आहे. एरवी कोणत्याही गावात जातीजातींमधील स्पर्धेतून त्या गावातील व्यवहारांचा पोत ठरतो. पण इथे गावात बहुसंख्य लोक हे मराठा समाजातीलच असल्यामुळे त्या प्रकारचा वाद शिंगणापुरात नाही. देवस्थान आणि गाव दोन्हीकडे एकाच समाजाची संख्या निर्विवाद आहे. पण तरीही देवस्थान आणि गाव यांच्यामध्ये निर्विवाद सख्य आहे, असं नाही. थोडक्यात देवाचं ठिकाण असलं तरी माणसांमधले वाद इथेही आहेतच. या दोन घटकांमध्ये आलबेल नसल्याचं कारण दिसतं ते त्यांच्यातील आर्थिक तफावतीत.

या सा-याला दुसराही एक कंगोरा आहे स्थानिक राजकारणाचा.संस्थानांवर ज्या मंडळींचा ताबा आहे, त्यांच्याशी न जुळणा-या लोकांचा शिंगणापूरच्या ग्रामपंचायतींवर ताबा आहे. मात्र ग्रामपंचायतीचं उत्पन्न वर्षाला केवळ लाखाच्या आकड्याइतकं कमी असल्यामुळे विश्‍वस्तविरोधी गटाच्या शक्ति प्रदर्शनाला खूपच मर्यादा आहेत. देवस्थानचं ६-७ कोटींचं वार्षिक उत्पन्न कुठे नि ग्रामपंचायतीचं लाखामधलं उत्पन्न कुठे! त्यामुळे विश्‍वस्त मंडळींनाही ग्रामपंचायतीतील सत्तेत फारसा रस नसतो, असं लोक सांगतात. मागच्या १९ जूनला शिंगणापूरमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. विरोधी गटच नसल्याने या निवडणुकीत अजिबात चुरसच नव्हती. परिणामी सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. सध्या शिवाजी शेटे सरपंच आहेत. देवस्थानच्या कारभाराबद्दल शिवाजी शेटे कडवटपणाने बोलतात. ‘देवस्थानच्या कारभारात शंका घेण्यासारख्या ब-याच जागा आहेत. पण त्या पुराव्यासह सिद्ध करणं अवघडच आहे. दरवर्षी जे ऑडिट होतं ते प्रसिद्ध केलं जात नाही, असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. शेटे यांचा मुख्य आक्षेप आहे तो दरवर्षी करण्यात येणा-या गाळे-लिलावासंदर्भात. देवस्थानकडून हे गाळे स्थानिक तरुण गावक-यांना चालवायला मिळाले तर गावाचा बेरोजगारीचा प्रश्न सुरू शकतो. परंतु पैशाच्या मोहापायी जवळपास ८० टक्के गाळे बाहेरगावच्या व्यक्तींना दिले जातात, असं सरपंचांचं म्हणणं आहे. ‘ट्रस्टच्या मालकीच्या शाळा आहेत. परंतु या शाळांची प्रगती अगदीच असमाधानकारक आहे. दहावीच्या परीक्षेत यंदा शिंगणापूरमधला एकही विद्यार्थी पास होऊ शकला नाही. कारण ट्रस्टींचं शाळांकडे लक्षच नाही. त्याचं लक्ष केवळ इमारती उभारण्याकडे आहे’, असंही सरपंच शेटे म्हणतात. ‘विश्वस्तपदांची, देवस्थान समितीची नेमणूक निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत कशी आणि केव्हा होते याचा गावक-यांना कधीच पत्ता लागत नाही, कारण हे अकरा विश्वस्तच परस्परांची पुनर्नेमणूक करून घेतात. गावक-यांपैकी कोणी विश्वस्तपदासाठी अर्ज केला तरी आमच्या गावचे लोक धर्मादाय आयुक्तांच्या निकषात कधीच बसत नाहीत आणि त्याचं कारणही आम्हांला सांगितलं जात नाही,’ गावक-यांना देवस्थानात संधी नाही असं सरपंच इथे सुचवतात. ‘गावाच्या विकासकामातही देवस्थानचा म्हणावा तसा सहभाग नाही. यासाठीच या गटाने ग्रामपंचायतीपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. ग्रामपंचायतीत ते आमचे विरोधक बनल्यास आमचा देवस्थानच्या कारभारात हस्तक्षेप वाढेल या भीतीने संपूर्ण ग्रामपंचायत आमच्या ताब्यात दिली आहे,’ असं शेटे म्हणतात. ही गोष्ट जर खरी असेल तर लोकशाहीतील हे एक विरळा उदाहरण ठरावं.

सरपंचांनी जी आरोपांची सरबत्ती लावली त्याची शहानिशा करण्यासाठी जेव्हा गावक-यांचा कानोसा घेतला गेला, तेव्हा गावक-यांमध्येही परिघाबाहेर ठेवल्या जाण्याची भावना असल्याचं जाणवतं. श्री शनैश्वर मंदिराच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक आणि पर्यायाने राजकीय सत्तेचा व प्रतिष्ठेचा प्रसाद आज काही मोजक्या लोकांनाच मिळतोय त्याची चव आपल्यालाही मिळायला हवी, अशी इथल्या असंतुष्ट लोकांची इच्छा आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी व्यावहारिक दृष्टिकोन जरा उदार केला तर इतरांचंही कल्याण होईल असं त्यांचं म्हणणं दिसतं. श्रीमंत देवस्थानने केवळ फायद्याचा विचार न करता गावाच्या विकासाचाही सहानुभूतीने विचार करावा, असं मत सर्वसामान्यपणे व्यक्त होताना दिसत होतं.

ग्रामपंचायतीचं उत्पन्न अत्यंत तोकडं आहे. निधीअभावी ग्रामपंचायतीचं वीज कनेक्शनही तोडण्यात आलं आहे. गावात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. तिच्या देखभालीचा खर्च करण्याची क्षमता ग्रामपंचायतीकडे नाही. गावातील शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. या सर्व प्रश्नाबाबत देवस्थानने काही करावं अशी इथल्या ग्रामस्थांची इच्छा दिसते. त्याबद्दल विचारता देवस्थानचे उपाध्यक्ष भाऊसाहेब दरंदले यांनी ग्रामस्थांचे व सरपंचांचे कुठलेच आक्षेप मान्य केले नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे येणार्‍या भाविकांसाठी सोय करणं हे देवस्थान समितीचं प्रथम कर्तव्य आहे, आणि हा उद्देश लक्षात ठेवूनच सर्व निर्णय आतापर्यंत घेतले गेले आहेत. ग्रामविकासाच्या योजना राबवणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे पण त्यांच्याकडे नियोजन नसल्याने ते या संदर्भात अयशस्वी ठरत आहेत,’ असं त्यांचं म्हणणं. मात्र गावक-यांमध्ये देवस्थान-समितीच्या विरोधात असंतोष असल्याचं ते मान्य करतात. पण या नाराजीला जी कारणं आहेत त्यावर काही उपाय दिसत नाही, असंही सांगतात. देवस्थान समितीच्या ताब्यात असलेले गाळे केवळ ३०-४० हजारांत द्यावेत अशी इथल्या काही गावक-यांची अपेक्षा असते. पण ज्या गाळ्यापोटी एक लाख रुपये मिळतात ते कमी भावाने कसे देता येतील, असा त्यांचा सवाल आहे. एकूणात समोरासमोर उभे ठाकलेले दोन गट तहासाठी तयार नाहीत असं दिसतंय.

देवस्थानचे विश्वस्त आणि गावकरी यांच्यात खटलेबाजीही बर्‍याच काळापासून सुरू आहे. यातला एक खटला भाड्याने गाळे देण्याच्या संदर्भातच होता. देवस्थान समितीने गाळे अकरा महिन्यांसाठी नव्हे तर, अकरा वर्षांसाठी भाड्याने दिलेत असं गावातल्या सतरा गाळेधारकांचं म्हणणं होतं. परंतु खटल्याचा निकाल ट्रस्टच्या बाजूने लागला. आता या गाळेधारकांकडे पस्तीस लाख रुपये भाडं थकलेलं आहे. त्याच्या वसुलीसाठी ट्रस्टतर्फे प्रयत्न सुरू आहेत. हेही गावकर्‍यांच्या नाराजीचं एक कारण आहे. या नाराजी पलीकडेही काही प्रश्न इथे येणा-याला पडतात. वर्षातल्या काही महत्त्वाच्या दिवशी शिंगणापूरात लाखो भाविक येत असले आणि हे विशेष दिवस सोडूनही शिंगणापूरात कमी-जास्त प्रमाणात हजाराहून अधिक भाविक हजेरी लावत असले तरी इथं मुक्काम करण्याचा बेत आखून येणारे अगदीच कमी असतात. शिंगणापूर दर्शन हा फारतर तीन तासांचा कार्यक्रम आहे आणि या तीन तासांसाठी दीड-दोनशे रुपये देऊन भक्तनिवासाच्या किंवा लॉजच्या खोल्या वापरणारेही असतात; पण त्यांची संख्या खूपच कमी असते. सर्वसामान्यत: भाविक शिर्डीकडे निघालेले असतात किंवा शिर्डीला मुक्कामाची व्यवस्था लावून शिंगणापूरला आलेले असतात. त्यामुळे या गावात कुणी मुक्काम करत नाही. असं असतानाही विश्वस्तांतर्फे आलिशान भक्तनिवासाची उभारणी का केली जाते किंवा एकावेळी पाचशे भाविक जेवू शकतील, असं भव्य प्रसादालय बांधण्यामागचं कोडं तसं न सुटणारं आहे. देवस्थान समितीने बांधलेल्या प्रसादालयाचा यात्राकाळात उपयोग होतो खरा; पण इतर दिवशी इथे बहुतेकदा भिका-यांचीच गर्दी जास्त असते. भाविक प्रामुख्याने शिर्डीतून येत असल्याने शिंगणापूरात जाऊन आपल्याला पूर्ण जेवण घ्यायचं आहे असा विचार जवळपास कोणाच्याच मनात नसतो. दर्शन घ्यावं, नारळ, साखरफुटाणे, नारळ बर्फी खात फिरावं. आवश्यकता असेल तर भुकेसाठी वडापाव, मिसळ, डोसा, उत्तप्पा वगैरे खावं याकडेच अनेकांचा ओढा असतो. तशी हॉटेल्स वा टप-या देवस्थान परिसरात मुबलक आहेत. त्यामुळे श्री शनैश्वर देवस्थानने या सोयिसुविधा निर्माण केल्यातरी, आज त्याचा लाभ भाविक हवे तसे घेताना दिसत नाहीत. गरज नसताना या सुधारणा केल्या गेल्या आहेत का, असा प्रश्न त्यामुळेच कुणालाही पडावा. शंभर खाटांचं आणि मोठी ऑपरेशन्स होऊ शकणा-या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्याचंही घाटत आहे. आठ हजारांच्या या गावात छोटे-मोठे डॉक्टर्स व हॉस्पिटल असताना खरोखरच त्याचा काही उपयोग होईल का, असा प्रश्न पडतो. देवस्थान समितीतर्फे सध्या पंचवीस बेडचं एक हॉस्पिटल चालवलं जातं त्याची अवस्था सलाईनवर ठेवल्यासारखी आहे. त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यापेक्षा थेट ५ कोटींची गुंतवणूक असणारं हॉस्पिटल उभारणं यामागचा उद्देश अनाकलनीय आहे. शिर्डी देवस्थानचं अनुकरण करण्याचा हा प्रयत्न असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शिंगणापूरात ग्रामपंचायत व देवस्थान दोन दिशांना तोंडं करून उभे आहेत आणि बिनकामाच्या सुधारणा करण्यात देवस्थान पैसा दवडतं आहे, असा सूर इथे ऐकायला मिळतो.

सारं काही श्रद्धेभोवती

कोणत्याही गावात असतात तसे आरोप-प्रत्यारोप इथेही असले आणि थोडी खळखळ चाललेली असली, तरी देवस्थानच्या निमित्ताने गावात येणा-या पैशाचे तुषार गावक-यांवरही उडत असल्याने एकूण बरे चालले आहे. आणि त्यामुळेच काही बाबींबाबत गावकरी आणि देवस्थानं समिती यांचं अगदी घट्ट एकमत आहे. ‘माझ्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचं छत नको, देऊळ नको’, असा आदेश शनिदेवांनी दिलेला होता, असं मानून शिंगणापूरमधील सर्व घरं-दुकानं-हॉटेल-लॉज-कार्यालयं वगैरे दारांविना व कडी-कुलपाशिवाय आपले व्यवहार चालवतात. सश्रद्ध व्यक्ती ही अशा समज-मान्यता-परंपरांचा आदर करून कितीही अडचणी आल्यातरी त्याच्याशी जुळवून घेतात. पण आजच्या आधुनिक विचारसरणीच्या आणि विज्ञानवादी समाजासाठी हे पचवणं अवघड जातं. त्यांनी पुढे जाऊन फार चिकित्सा करण्याचा पवित्रा घेतला तर ‘हा शनिदेवांचा आदेश आहे आणि इथे चोरीच होत नाही’ असं ठामपणे सांगितलं जातं. कुणी चोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर शनिदेव त्याला तातडीने कडक शासन करतं असंही सांगितलं जातं. आणि खरोखरच कुणालाही आश्चर्य वाटावं अशा रीतीने या गावातल्या घरांना दारं-खिडक्या-कुलपं नाहीत. मात्र खुद्द देवस्थान समितीच्या संपर्क कार्यालयातील काही रूम्स् मात्र व्यवस्थित बंद दिसल्या. तसंच गावामध्ये चोरी होत नसली तरी कुठलीही ‘गडबड’ होऊ नये म्हणून बँका, पतपेढ्यांनी आपला संसार शेजारच्या सोनईत थाटला आहे. अगदी शिक्षकही हजेरीवही वा पेपर्स, उत्तरपत्रिका सुरक्षिततेच्या काळजीपोटी स्वत:च्या घरी घेऊन जातात. या गावाने चोरीबद्दल जी समज स्वीकारली आहे त्यामुळे आणखी एक गंमत तिथे घडताना दिसते. देवस्थानच्या आवारात पोलिसचौकी आहे, पण तिथे गुन्हा नोंदवण्याची सोय नाही. वास्तविक यात्रेच्या दिवशी अनेक भाविकांच्या मूल्यवान वस्तू ‘गायब’ होतात पण त्यांची नोंद त्या वस्तू ‘हरवल्या’ वा ‘गहाळ झाल्या’ अशीच होते. पोलिसचौकीत चोरीचीच नव्हे तर खून, बलात्कार, मारामारी वगैरे कशाचीच इथे अधिकृत नोंद होत नाही. एकदा एका चोराने शिंगणापूरात आलेल्या प्रवासी महिलेचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या हातात तुळशीची माळ आली. तेव्हा देवानेच मंगळसूत्राचं रूपांतर तुळशीमाळेत केलं आणि चोराला पकडून दिलं, अशी रंजक कथा लगोलगीने पसरली. अशा अनेक कथा-दंतकथांचं वलय शनिशिंगणापूरभोवती पसरलंय.

या गावाने आणखी एक समज परंपरेने स्वीकारला आहे. ‘महिलांनी शनिदेवाचा चौथरा चढून दर्शन घेऊ नये, दुरून दर्शन घ्यावे’ अशी स्पष्ट सूचना इथे लिहिलेली आहे. या प्रथेमुळे मधल्या काळात शिंगणापूर एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर काही सामाजिक संस्थांनी हा अंधश्रद्धेचा व महिलांना असमान वागणूक देण्याचा प्रकार आहे, असं मांडत महिलांच्या दर्शनावरील बंदी उठवावी अशी मागणी केली होती. परंतु ग्रामस्थांनी, विहिंप, शिवसेना वगैरेंनी या आंदोलनाला जोरदार विरोध केला. विश्वस्त मंडळींनीही या मागणीची दखल घेतली नाही. त्यावेळी तिथे भरपूर दबाव निर्माण झाला होता; पण हे आंदोलन अपेक्षित टोक गाठू शकलं नाही. ‘चला चोरी करू या’ असं आंदोलन अंनिसने आरंभलं आहे, अशी हवा तयार झाल्यामुळेही शनिशिंगणापूर मधल्या काळात बातम्यांमध्ये होतं. पण गावकरी परंपरेच्या बाजूने उभे राहिल्याचं चित्र शिंगणापूरात दिसलं.

या देवस्थानाशी संबंधित श्रद्धाळूंच्या श्रद्धांना क्षणभर बाजूला ठेवून बघितलं तर देवस्थान समिती, विश्वस्त आणि शिंगणापूरचे गावकरी जुन्या परंपरांना का चिकटून राहतात हे लक्षात येऊ शकतं. शनिशिंगणापूर या देवस्थानाभोवती चमत्काराच्या अनुषंगाने जे वलय आज प्राप्त झालं आहे, त्याच्या कोणत्याही आधाराला कुणी धक्का लागू देत नाही. हे वलय आहे म्हणूनच शिंगणापूरला काही अर्थ आहे, हे सा-यांना ठाऊक आहे. गावाची रोजीरोटी आज ब-याच अंशी या देवस्थानाशी गुंतलेली आहे. एक साखर कारखाना सोडल्यास रोजगारासाठी इथे दुसरा कसलाच पर्याय नाही. त्यातल्यात्यात शेती आणि शेतमजुरी हे गावाचं रोजगाराचं साधन आहे. गाव प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर मात्र शनिदेवाच्या कृपाछायेत इथं काही व्यवसायांना धुमारे फुटले आहेत. पूजा-अर्चेचं सामान विक्री, खाजगी वाहनाने प्रवासी वाहतूक आणि हॉटेल्स वा लॉज या तीन प्रकारांत गाव आणि परिसरातली माणसं गुंतलेली आहेत. देवस्थान समितीच्या मालकीचे पूजा-अर्चेचं सामान विकणारे शंभर गाळे असले, तरी गावकरीही स्वतंत्रपणे या क्षेत्रात हिरिरीने उतरले आहेत. पूजा सामानाची विक्री करणारी जवळपास अडीचशे-तीनशे दुकानं गावात आहेत. किरकोळ खाद्य प्रकारांची विक्री करणारी हॉटेल्स वा टप-याही मोठ्या प्रमाणात आहेत. हजारोंच्या संख्येने येणारे भाविक आणि त्यांच्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल बघता, या व्यावसायिकांना गावातल्या गावात उत्पन्नाचं चांगलं साधन मिळालं आहे हे उघड आहे. परंतु गावातल्या गावात एकूणच स्पर्धा वाढल्याने, म्हणावं तितकं उत्पन्न मिळत नाही अशी अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे दुकानांचे गाळे बांधायचे आणि ते स्वत: चालवण्यापेक्षा भाड्यानं चालवायला द्यायचे, असा सोईचा मार्ग अनेकजण स्वीकारत आहेत. शिंगणापूरबाहेरील लोकांनी इथे आधीच जम बसवल्याने गावक-यांची काही प्रमाणात कोंडी झालेली दिसते. तरीही प्रत्येकजण या व्यवसायात कसोशीने शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. यामागे आणखीही एक कारण आहे. शिंगणापूरमध्ये स्वत:च्या मालकीचा गाळा असणं याला इथं प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सोयरिक लगेच जुळते. आसपासच्या गावातील लोक शिंगणापूरात मुली देण्यासाठी उत्सुक असतात, असं गावकरी सांगतात. साहजिकच हुंड्याचा दरही सतत उसळी मारतो, असं लोक खुलेपणाने सांगतात.

शिंगणापूरचे लोक देवस्थानवर अवलंबून असलेला दुसरा व्यवसाय आहे खाजगी वाहतुकीचा. शिंगणापूरला येणारे भाविक हे मुख्यत्वेकरून शिर्डीमार्गेयेतात-जातात. त्यातील बरेचसे भाविक खाजगी वाहनांचा उपयोग करतात; त्यामुळे इथे अशी प्रवासी वाहतूक करणा-या जीप, आर्माडा, टेम्पो टॅक्स, सुमो अशा गाड्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे. शिर्डी-शिंगणापूर या प्रवासासाठी एका व्यक्तीला सत्तर रुपये खर्च येतो आणि हा दर सिझनप्रमाणे बदलत असतो. शिंगणापूरमधले अनेकजण या व्यवसायात आहेत. ज्यांच्या मालकीचे गाळे नाहीत वा गाड्या नाहीत असे अनेक तरुण, कमिशन एजन्ट म्हणून कमाई करतात. प्रवासी शोधणं, त्यांना पूजा सामानासाठी योग्य गाळ्यापर्यंत नेणं याबद्दल वरकमाई मिळते. अशाप्रकारे शिंगणापूरमधले सगळेच व्यवसाय कमीअधिक फळफळले आहेत.
एखाद्या गावात एखादा मोठा कारखाना किंवा उद्योग उभारला गेला, की त्याच्या अनुषंगाने लागणा-या छोट्या मोठ्या सेवा गावातले लोक देऊ लागतात, असं सर्वत्र दिसतं. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गावात तर ही गोष्ट अधिक ठळकपणे जाणवते. शिंगणापूरातही असंच घडत आहे. इथे तर भक्तांच्या आकर्षणाचं सणसणीत कारण या गावात आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणारे लोक ‘भक्त’ या नात्याने येत असले तरी, गावाच्या दृष्टीने ते ‘ग्राहक’ असतात. ग्राहकांचं समाधान हा प्रत्येक व्यवसायाचा धर्मच असतो व त्यामुळे त्याच्या समाधानासाठी सारं काही केलं जातं. इथे शिंगणापुरात श्रद्धेभोवती सारे व्यवहार फिरतात. त्यामुळे सारं गाव या श्रद्धेला धक्का लागेल असं काही होऊ देत नाही. शनिदेवाबद्दलच्या दंतकथा असोत, साडेतीनशे वर्षांत अनुभवास आलेल्या-सांगितलेल्या कथा असोत, चोरी होत नाही हा समज असो किंवा शनिच्या चौथ-यावर स्त्रियांना जाऊ न देण्याची प्रथा असो, या सा-या गोष्टी गाव श्रद्धेने जोपासतं. गावाची परंपरा आणि श्रद्धा यांना ठेच लागू दिली जात नाही.

शिंगणापूरच्या परिघाबाहेरचं जग बदललं आहे. तिथे स्त्री-पुरुष समानता आहे, तिथे घरादारांना कडीकुलुपं आहेत. शनिदेवाच्या प्रत्यक्ष वास्तव्याशिवाय तिथले व्यवहार चालले आहेत. पण शिंगणापूरला त्याच्याशी घेणं नाही. कारण हे गाव या श्रद्धा-परंपरांमुळेच उर्जितावस्थेत आलं आहे. गावाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य त्यातूनच आकाराला आला आहे, येणार आहे.

(या लेखातील माहिती मिळविण्यासाठी प्रामुख्याने खालील व्यक्तींचं सहकार्य लाभलं. श्रीशनैश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब बानकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब दरंदले, खजिनदार पंढरीनाथ शेटे, सचिन शिवाजी शेटे, तुकाराम बानकर, शिंगणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी शेटे, स्टॉलधारक आणि ग्रामस्थ. या सर्वांचे आभार)
संकल्पना संयोजन: सुहास कुलकर्णी
लेखन : विजय चव्हाण, मुकुंद ठोंबरे

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content