शंकर वासुदेव किर्लोस्कर ऊर्फ शंवाकि

(१८९१ ते १९७५)
‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या नियतकालिकांचे हे आद्य संपादक.

शंकर वासुदेव किर्लोस्कर ऊर्फ शंवाकि

मराठीतील लोकप्रिय आणि त्याचबरोबर समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या नियतकालिकांचे हे आद्य संपादक. राजकारणापासून बाजूला राहूनही आणि बुद्धिवादाचे समर्थन करत त्यांनी या मासिकांचे यशस्वी संपादन केले आणि आज समाजाला अशा साहित्याची गरज आहे हे सप्रमाण सिद्ध केले.
शंवाकि या टोपणनावाने अधिक प्रसिद्ध असलेले शंकरराव यांचे बालपण सोलापुरात गेले. त्यांचे वडील डॉ. वासुदेवराव किर्लोस्कर हे प्रागतिक विचारांचे होते. आपला धर्म, चालीरीती, एकूण सामाजिक परिस्थिती यांचे निरीक्षण आणि अभ्यास करायला हवा; त्यातून आपली मते बनवायला हवीत, आणि ती बोलून, लेखातून लिहून व्यक्त करायला हवीत, हे प्रत्येक सुजाण व्यक्तीचे कर्तव्य आहे असे त्यांना वाटे. आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्टीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहावे असाही त्यांचा आग्रह होता. या वातावरणात शंवाकिंची जडणघडण झाली. पुढील काळात संपादक म्हणून त्यांनी प्रचलित अनिष्ट गोष्टींवर हल्ले चढवून त्यांना विरोध करायची जी एक भूमिका घेतली त्याचे मूळ त्यांच्या वडिलांच्या नवमतवादी संस्कारांत होते असे निश्चितपणे म्हणता येईल.
शंवाकि यांचा चित्रकलेकडे कल होता. विख्यात चित्रकार सातवळेकर यांच्याकडे त्याचे काही धडेही त्यांनी घेतले होते. मुंबईच्या जे. जे. महाविद्यालयात चित्रकलेचे रीतसर शिक्षणही त्यांनी घेतले होते. मुंबईच्या जे. जे. महाविद्यालयात चित्रकलेचे रीतसर शिक्षणही त्यांनी घेतले. मात्र, त्यांचे काका लक्ष्मणराव यांनी सांगलीजवळील किर्लोस्करवाडी येथे लोखंडी नांगर तयार करण्याचा कारखाना सुरू केला. तिथे व्यवस्थापक म्हणून शंकररावांनी राहावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्यात विवेक, संयम, शिस्त, संवादकुशलता हे व्यवस्थापकाचे गुण आहेत अशी लक्ष्मणरावांची खात्री होती. त्यामुळे शंकररावांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि निवृत्त होईपर्यंत निभावली. कारखान्याच्या परिसरातील कर्मचारीवर्गात आप्त परिवाराची भावना निर्माण करण्यात, विशिष्ट सांस्कृतिक वातावरण तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुढे राज्यातील मराठी वाचकांत आणि देशा-परदेशातील मराठी मनांत विशिष्ट स्थान मिळवणारी ‘किर्लोस्कर’ आणि ‘स्त्री’ ही मासिके किर्लोस्करवाडीच्या वास्तव्यातच सुरू झाली.
किर्लोस्करवाडीच्या कारखान्याच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडींची खबर द्यायची, या हेतूने त्यांनी प्रथम ‘किर्लोस्कर खबर’ सुरू केले. ‘फोर्ड टाइम्स’च्या धर्तीवरचे हे हाऊस मॅगझिन होते. गणपतराव विजापुरे, ना. धों. ताह्मनकर हे त्यांचे सहकारी होते. हळूहळू ‘किर्लोस्कर’चे स्वरूप बदलत गेले. बाहेरच्या लेखकांचे लिखाण, स्त्रियांचे पान, विशेष अंक यामुळे तो एक परिपूर्ण अंक बनत गेला. ‘किर्लोस्कर’ला राजकारण, समाजकारण, नवीन प्रयोग, उपयुक्त माहिती यापैकी काहीही वर्ज्य नव्हते. पण पुढे हे मासिक वैशिष्ट्यपूर्ण ठरले ते त्याच्या अंधश्रद्धेला विरोध करून बुद्धिवादाचा स्वीकार करण्याच्या निर्णयामुळे. जुन्या चांगल्या चालीरीती मान्य करायला हरकत नाही; मात्र, मूर्ख रूढींपुढे त्या केवळ जुन्या म्हणून मान तुकवणार नाही, ही जी भूमिका ‘किर्लोस्कर’ने घेतली त्याच्यामागे शंकररावांचा बुद्धि प्रामाण्यवादी विचार होता हे निर्विवाद. त्यामुळेच ‘किर्लोस्कर’चा दबदबा नंतरच्या काळातही टिकून राहिला.
स्त्रियांचे जग निराळे आहे. त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठाची गरज आहे याची जाणीव झाल्यामुळे शंकररावांनी स्त्रियांसाठी वेगळे मासिक काढायचा निर्णय घेतला, आणि १९३० साली ‘स्त्री’ची सुरुवात झाली. या काळाचा विचार करता हा क्रांतिकारकच निर्णय होता. मासिक सुरू झाल्यावर काही काळातच त्याला जो भरघोस प्रतिसाद लाभला त्यावरून या गोष्टीची किती आवश्यकता होती हेच अधोरेखित झाले.
या अंकात मनोरंजन होते, संसार चांगला कसा करावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना होत्या. पण, त्याही पलीकडे जाऊन स्त्रिया या अबला नाहीत आणि त्यांना त्यांच्या सामाजिक हक्कांची जाणीव करून देण्याची भूमिका या मासिकाने सतत घेतली आणि सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महत्त्वाचे काम केले. स्त्रियांसाठीच्या या मासिकाचे संपादन शंकररावांनी करण्यापेक्षा एखाद्या स्त्रीने करावे असा मतप्रवाह होता. मात्र मासिकाचे प्रकाशन हा एक व्यवसाय आहे आणि त्याची माहिती असणाऱ्या कुणीही तो करावा, असे शंकररावांचे म्हणणे होते. ‘स्त्री’च्या नंतरच्या काळात मात्र स्त्री संपादकांनी त्याची धुरा वाहिली. ‘स्त्री’मधे मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी लिखाण केले. हा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर लगेचचा असा संक्रमणाचा काळ होता. या काळातल्या बदलत्या सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचे प्रतिबिंब या अंकात पडलेले दिसते. त्यामुळेच स्त्रियांचा बदलता पोशाख यापासून ‘विधवांनी कुंकू लावावे की नाही?’ इथपर्यंतच्या विषयांची चर्चा अंकात झालेली दिसते. स्त्रीची कुचंबणा, दुर्दशा मांडून त्याच्यावर काही प्रमाणात उत्तरेही शोधायचे धाडस ‘स्त्री’ने शंकररावांच्या आणि नंतरच्याही काळात दाखवले. याच काळात ‘किर्लोस्कर’नेही बुवाबाजीवर प्रहार करत ‘बुवाबाजी विध्वंसक संघा’ची स्थापना केली. ज्या धर्मकल्पना माणसाच्या उन्नतीला विघातक आहेत त्याविरुद्ध जागृती करतानाच नव्या विधायक कल्पना आणि मार्गही या दोन्ही मासिकांनी सुचवले हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
मासिकाच्या निमित्ताने शंकररावांनी जे विपुल लिखाण केले. ते ‘आत्मप्रभाव’, ‘यशस्वी धंद्याचा मार्ग’, ‘व्यापाराचे व्याकरण’, ‘टाकांच्या फेकी’, ‘यांत्रिकाची यात्रा’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे ‘शंवाकीय’ हे आत्मचरित्र महत्त्वाचे आहे. धडाडीचे कारखानदार आणि सामाजिक जाणिवेतून पुरोगामी विचारांच्या नियतकालिकांचे यशस्वी संपादन करणारे कर्तबगार संपादक अशा त्यांच्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यात घडते. एक प्रकारे १९२० ते ७० या पन्नास वर्षांतल्या राज्याच्या सांस्कृतिक जीवनानेच ते चित्र आहे.

शंकर वासुदेव किर्लोस्कर
(६ ऑक्टोबर १८९१ ते १ जानेवारी १९७५)

लेखन - सीमा भानू

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content