मिलिंद बोकील

अनिल अवचट यांच्या ‘पुण्याची अपूर्वाई’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पुणे येथे ८ ऑगस्ट २०१० रोजी केलेले भाषण.

अनिल अवचट हे आमच्या अगोदरच्या पिढीचे म्हणा वा समकालीन म्हणा, एक ज्येष्ठ आणि लोकप्रिय लेखक आहेत. चाळीस वर्षांहून जास्त काळ त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लेखन केलेले आहे. या कार्याची पोचपावती मला आज द्यायची आहे. पुस्तक प्रकाशन हे त्यासाठी एक निमित्त आहे आणि हे पुस्तक पुण्यावरचं असल्यानं सयुक्तिकही आहे पण त्यासाठी त्यांना माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती सहज मिळू शकल्या असत्या. मी हे निमंत्रण स्वीकारलं याचं कारण मला माझ्यातर्फे आणि सगळ्याच मराठी वाचकांतर्फे अवचटांनी जे साहित्यिक कार्य केलं आहे त्याची नोंद करायची आहे. यात वैयक्तिक आनंदाचा जसा भाग आहे तसाच वाङ्मयीन कर्तव्याचाही आहे.
अवचटांनी कशा प्रकारचं लेखन केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांपुढे आहे. त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं असलं तरी तरी त्यांची म्हणून जी मुद्रा आहे ती त्यांनी केलेल्या सामाजिक लेखनामुळे. या लेखनाकडे थोड्याशा ‘अकादमिक’ किंवा शास्त्रीय पद्धतीने बघायचं झालं तर असं म्हणता येईल, की ते तीन प्रकारचं आहे. पहिलं म्हणजे अवचटांनी समाजात जे उपेक्षित किंवा वंचित म्हणून घटक असतात त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. या घटकांत समाजातले सर्व प्रकारचे लोक आहेत-दलित, भटके, हमाल, मजूर, विणकर, देवदासी, मुरळ्या असे. यांची वर्गवारी विविध तर्‍हेने होत असली तरी सर्वार्थाने ‘उपेक्षित’ हेच त्यांचं खरं वर्णन आहे. दुसरं म्हणजे अवचटांनी एकूण समाजामध्ये जे प्रश्‍न किंवा समस्या असतात त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यामध्ये मग समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, प्रदूषण, व्यसनांधता, किंवा सध्या आलेला एचआयव्ही-एड्सचा प्रश्‍न अशांचा समावेश होतो. तिसरं म्हणजे त्यांनी समाजातल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सामाजिक कार्यकर्ते आहेत परंतु इतरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण माणसं आहेत. म्हणजे एकूण पाहिलं तर समाजातले वंचित समूह, सामाजिक प्रश्‍न आणि सामाजिक महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याबद्दल अवचटांचं लिखाण आहे.
या लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं म्हणजे अशा प्रकारचं लेखन मराठीत झालेलं नव्हतं. त्या अर्थानं ते अभूतपूर्व असं आहे. मराठीत ललित लेखनाची परंपरा असली तरी त्यातलं बहुतेक लेखन हे वैयक्तिक अनुभूतीचं साहित्यिक प्रकटीकरण असायचं. त्यात सामाजिक अनुभव नव्हते असं नाही परंतु त्याची दृष्टी ही लिहिणार्‍या व्यक्तीला काय वाटलं अशा प्रकारची होती. ते लेखन ‘स्वकेंद्री’ किंवा ‘स्वनिष्ठ’ होतं. अवचटांनी तशाही प्रकारचं लेखन केलेलं आहे आणि त्या परंपरेत मोलाची भर घातलेली आहे (उदाहरणार्थ, ‘छंदांविषयी’ किंवा ‘स्वत:बद्दल’ वगैरे) पण त्यांनी जे सामाजिक लेखन केलेलं आहे ते ‘परकेंद्री’ किंवा ‘वस्तुनिष्ठ’ असं आहे (इथे वस्तू याचा शब्दश: अर्थ घेऊ नये; कारण माणसं किंवा माणसांचे समूह हे वस्तू नसतात. इंग्रजीत ज्याला ‘ऑब्जेक्टिव्ह’म्हणतात त्या अर्थाने). सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अवचटांनी ललित लेखनात ‘दुसर्‍या’माणसाचा विचार आणला. तिचं किंवा त्याचं जगण आणलं, तिची कृती केंद्रस्थानी आणली, स्वत:ऐवजी ‘त्यांना’महत्त्व दिलं. हे पूर्वी इतक्या प्रकर्षानं झालेलं नव्हतं. आधी म्हटल्याप्रमाणे अवचटांचं वैशिष्ट्य म्हणजे यातही त्यांनी उपेक्षित दुसरा माणूस किंवा ‘शेवटचा’ माणूस केंद्रस्थानी आणला. ते तर मराठीत क्वचितच झालेलं होतं. दलित वा भटक्या समूहातील व्यक्तींची आत्मकथनं निर्माण झाली होती परंतु मध्यमवर्गीय माणसानं लिहिताना दुसर्‍या आणि समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवायचं हे इतक्या ठळकपणे घडलेलं नव्हतं. श्री. म. माटे यांनी अशा प्रकारची सुरुवात केली होती परंतु नंतर ही परंपरा पुढे वाढली नव्हती. अवचटांनी हे केवळ उपेक्षित समूहांबद्दलच केलं असं नाही तर त्यांनी ज्या व्यक्तींबद्दल लिहिलं आहे त्यातही हाच दृष्टिकोन ठेवलेला आहे मराठीत व्यक्तींवर लिहिण्याची म्हणजे व्यक्तिचित्रणाची परंपरा मोठी आहे परंतु ज्या व्यक्ती सामाजिकदृष्ट्या खरोखर महत्त्वाच्या आहेत पण समाजाचं ज्यांच्याकडे लक्ष गेलेलं नाही अशा व्यक्तींबद्दल अवचटांनी लिहिलेलं आहे. ‘गुण गाईन आवडी’ हीच अवचटांची परंपरा आहे परंतु त्यातही समाजात जी नम्र, साधी, कष्टाळू आणि तरीही निरलसपणे काम करणारी माणसं असतात त्यांना अवचटांनी प्रकाशात आणलं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं करताना त्यांनी एक समाजिक दस्तावेज तयार केला आहे. त्यांनी ते लिहून ठेवलं या अर्थानं केवळ नाही. लिखाणात रूपांतर झालं, की एक प्रकारचं दस्तावेजीकरण, ग्रंथीकरण होतंच. ते तर काम त्यानीं खूपच केलं आहे. अवचटांच्या सगळ्या पुस्तकांकडे पाहिलं की लक्षात येतं की त्यांनी केवढी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण करून ठेवली आहे. ते नुसते अनुभव घेत फिरलेले नाहीत. जो जो काही अनुभव आला तो त्यांनी आळस न करता, शांतपणे टेबलाशी बसून लिहून काढलेला आहे. एवढंच नाही तर बहुतेकवेळा लिहायचं म्हणूनच ते ठिकठिकाणी गेलेले आहेत, लोकांशी बोललेले आहेत, प्रश्‍न समजावून घेतलेले आहेत. ही नुसतीच लिहिण्याची ऊर्मी नाहीये. ही दस्तावेजीकरण करण्याचीच प्रेरणा आहे आणि सामाजिकदृष्ट्या, साहित्यिकदृष्ट्या ती फार महत्त्वाची आहे. हा केवळ दिसलं ते सांगण्याचा किंवा अनुभव लिहून ठेवण्याचा सोस नाही तर आपल्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीची जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, पद्धतशीर नोंद करून ठेवण्याचा मुद्दा आहे. ही जी पद्धत आहे ती महत्त्वाची आहे. बर्‍याच लोकांना असं वाटत असेल की अवचट ठरवून, त्या विषयाकडे जाऊन लिहितात. मला वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही नुसती एकेक वस्तू किंवा कलाकृती निर्माण करून चालत नाही तर ‘पद्धत’ (मेथड) निर्माण करावी लागते. सामाजिकदृष्ट्या हे गरजेचं आहे. कारण पद्धत निर्माण केली की मग बाकीच्यांना त्याचा उपयोग होतो. पद्धतीचे शास्त्र होते (मेथॉडॉलॉजी). मग इतर लोक त्या पद्धतीचा उपयोग करू शकतात. प्रत्येक भाषेत असं काम व्हायला पाहिजे. मराठीत ते पुरेसं झालेलं नाही. अवचटांनी ते एकहाती केलं हे त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यांच्या पुस्तकांकडे पाहिलं तर लक्षात येईल की आजच्या काळातल्या जवळ जवळ प्रत्येक विषयाला ते भिडलेले आहेत. हेही त्यांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. प्रदूषणापासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि हमालांपासून ते व्यवहार्‍यांपर्यंत सगळे विषय त्यांनी कवेत घेतलेले आहेत. त्या विषयांकडे पाहिलं की एकाच वेळी अवचटांच्या भ्रमंतीने अवाक् व्हायला होतं आणि सामाजिक प्रश्‍नांच्या भीषणतेनं मन दडपल्यासारखं होतं. हे असं सर्व विषयांना भिडणं सगळ्यांनाच जमत नाही. प्रत्येकाचे काही ठराविक विषयच आवडीचे किंवा अभ्यासाचे असतात. इतर विषयांत रस वाटत नाही. किंवा गतीही असत नाही. अवचटांचं तसं नाही. याचं कारण आधी सांगितलं तसं त्यांच्या पद्धतीत आहे. विषय महत्त्वाचा आहे पण पद्धतही महत्त्वाची आहे. त्यांच्याजवळ ही पद्धत आहे, या दस्तावेजीकरणाच्या पद्धतीवर त्यांचा विश्वास आहे म्हणून ते ही गोष्ट सहज करू शकतात. त्यांची वैयक्तिक बहुश्रुतता, त्यांच्या मनातलं कुतूहल, त्यांच्या अंगातली गुणवत्ता या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण ही पद्धत त्यांनी घालून दिली हे फार महत्त्वाचं आहे. आता अनेक तरुण मुलं-मुली त्या वाटेनं जाऊ लागली आहेत, पुढेही जातील.
हे दस्तावेजीकरण तथाकथित अर्थानं ‘शास्त्रीय’ नसलं तरी त्याचा एक उपयोग असा आहे, की समाजशास्त्रज्ञांकरता फार मोठा ऐवज त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. अवचटांचा कोणताही लेख पहिला तरी लक्षात येईल की त्यातून ते वेगवेगळ्या तर्‍हेचं संशोधन-सूचन (इंग्रजीत इनसाइट्स) करत असतात. म्हणजे त्यांचे लेख हे रूढ अर्थानं समाजशास्त्रीय संशोधन किंवा अभ्यास नसले तरी तसे संशोधन करण्यासाठी जी सुरुवातीची माहिती लागते किंवा ज्या कल्पना किंवा गृहीतके लागतात ती त्यांच्या लेखनातून विपुलपणे मिळतात; मग तो लेख विणकरांबद्दलचा असो वा वाघ्या-मुरळींबद्दलचा. याचं कारण असं की अवचट जरी ललितरम्य पद्धतीनं लिहित असले तरी यातला प्रत्येक मुद्दा हा आपल्या देशातली सामाजिक विषमता, दीर्घकालीन इतिहास, प्राचीन ग्रामीण अर्थव्यवस्था, त्या व्यवस्थेतून आलेली सामाजिक-सांस्कृतिक कुचंबणा, वसाहतकालीन गुलामगिरी, शतकानुशतके निर्माण झालेल्या धार्मिक रूढीपरंपरा, सरंजामी मनोवृत्ती, पारंपरिक अधिकारशाही, जातीपातींच्या उतरंडी आणि आधुनिक काळात विकासाच्या प्रक्रियांनी निर्माण केलेला अन्याय अशा सगळ्यांशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्या मुद्यांचे रेखाटन करून अवचटांनी समाजशास्त्रज्ञांकरता फार मोठ्या प्रमाणात कच्चा माल निर्माण करून ठेवलेला आहे. आता ही जबाबदारी समाजशास्त्राच्या अभ्यासकांची आणि संशोधकांची आहे की त्यांनी ह्या कच्च्या मालातून सामाजिक संशोधनाचा पक्का माल निर्माण करावा. एम. फिल. किंवा पीएच.डी. साठी काय संशोधन करू असं हल्ली मुलं-मुली विचारत असतात. त्यांनी अवचटांचा कोणताही लेख घ्यावा. पुढे कशावर संशोधन करावं याचा बीजरूप आराखडा त्यांना त्यात सहज सापडेल.
अवचटांच्या या सगळ्या लेखनामागचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये विशिष्ट असा मूल्यभाव आहे. अवचट हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतून लेखनाशी जोडले गेल्याने असेल किंवा त्यांच्या वृत्तीच तशा असतील म्हणून असेल पण त्यांच्या लेखनामागे पुरोगामी, लोकसन्मुख, इहवादी, वैज्ञानिक, लिंगभेदभावरहित आणि परिवर्तनवादी असा मूल्यभाव आहे. मराठीमध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अशा प्रकारचा सर्वांगीण मूल्यभाव असतो आणि त्या मूल्यभावाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडून त्याची गुणवत्ता डागाळली जाते. मला स्वत:ला अवचटांमधली जी लिंगभेदभावरहित वृत्ती आहे ती मोलाची वाटते. कारण मराठीचा साहित्यव्यवहार हा लिंगभेदभावाने दूषित झालेला आहे. म्हणजे तो फार पुरुषी, पुरुषसत्तावादी झालेला आहे. अगदी पुरोगामी म्हणवणारी जी साप्ताहिके किंवा मासिके असतात त्यातही तो दिसतो. लिंगभाव समानता ही गोष्ट अवचटांच्या लेखनामध्ये अगदी सहजगत्या आलेली आहे. ती शिकण्याचा सायास त्यांना करावा लागलेला नाही. सामाजिक समतेसाठी झटणारे पुष्कळ असतात पण त्यांच्या जीवनात लिंगभाव समानतेला स्थान असतेच असे नाही. त्या पार्श्वभूमीवर अवचटांचा मूल्यभाव महत्त्वाचा आहे.
अवचटांच्या लेखनातून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जसा व्यक्त होतो तसेच त्यांच्या व्यक्तित्वाचेही काही गुणविशेष प्रकट होतात. एक म्हणजे त्यांनी आपलं हे सगळं लिखाण किंबहुना सगळं जगणंच एका ‘निर्वैर’ वृत्तीतून केलेलं आहे. सामाजिक विषमता किंवा अन्यायाबद्दल लिहिताना किंवा वंचितांच्या बाजूने लिहितानाही त्यांनी वैरभाव मांडलेला नाही. अशा प्रकारची निर्वैर वृत्ती असणं आजच्या काळात फार मोलाचं आहे. कारण एकदा तशी ती असली की मग सगळ्या जगण्यातूनच ती प्रकट होते आणि तिची ओळख आणि प्रसार समाजात होत राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जगण्याबद्दलची आणि म्हणून लिखाणाबद्दलची असलेली ‘आस्वादक’ भूमिका. हे आपल्याभोवतालचं जे जग आहे त्याच्याकडे आपण आस्वादक वृत्तीने पाहायला हवं हा अवचटांचा स्थायिभाव आहे. त्याचा उपभोग घ्यायचा किंवा हव्यास धरायचा अशी ही वृत्ती नाही. त्यामुळे त्यांच्या लिखाणात अभिनिवेश नाही. जे आहे, जसं दिसलं ते मांडलं अशी तटस्थता आहे. आधी म्हटल्याप्रमाणे त्यात एक मूल्यभाव जरूर आहे परंतु त्या मूल्यभावामुळे त्यांचं लिखाण आग्रही, अभिनिवेशी झालेलं नाही. त्यांना ज्या विविध कलांची किंवा छंदांची आस आहे तीसुद्धा या आस्वादकवृत्तीतून आलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अवचट तसे ‘आत्ममग्न’लेखक आहेत. ते जरी कायम समाजसन्मुख असले, सामाजिक प्रश्‍नांवर लिखाण करत असले तरी त्यांचं रमणं हे स्वत:तच असतं. हीसुद्धा एक दुर्मिळ अशी गोष्ट आहे.
या सगळ्या लिखाणामधून अवचटांचं म्हणून जे काही योगदान झालं आहे, ज्याची मुख्यत: नोंद व्हायला पाहिजे आणि जे मला खरं तर सांगायचं आहे; ते म्हणजे अवचटांनी मराठी भाषेला दिलेला एक नवीन दृष्टिकोन. जगण्याकडे, समाजाकडे, भोवतालच्या पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. इंग्रजीत ज्याला ‘वर्ल्ड ह्यू’ म्हणतात तो. कोणताही चांगला लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या साहित्यातून असा हा दृष्टिकोन प्रतीत होत असतो. आणि त्या लेखकाचं योगदान जेव्हा लक्षणीय आणि सातत्यपूर्ण असतं तेव्हा त्याचा हा दृष्टिकोन हा त्या भाषेचा दृष्टिकोन होतो. आणि कोणतीही भाषा सामर्थ्यशाली किंवा संपन्न आहे की नाही हे ठरवायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या भाषेमध्ये असे विविध दृष्टिकोन आहेत की नाहीत याचीच चिकित्सा होत असते. त्या भाषेला जर असा प्रश्‍न विचारला गेला की अमुक एक तर्‍हेचा दृष्टिकोन तुमच्याकडे आहे की नाही तर ती भाषा, म्हणजे त्या भाषेतले साहित्य, त्याचे काय उत्तर देते यावर तिची संपन्नता ठरते. म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेला जर असं विचारलं गेलं की स्त्रीच्या आत्मभानाविषयी तुमच्याकडे काही लिहिलं गेलं आहे की नाही? तर आपल्याला उत्तर असं उत्तर देता येईल की हो, आमच्याकडे गौरी देशपांडे, सानिया अशा लेखिका आहेत की ज्यांच्या साहित्यातून स्त्रीच्या आत्मभानाचा दृष्टिकोन व्यक्त होतो. त्यांचं साहित्य तुम्ही वाचा म्हणजे आमच्या साहित्यातला या संबंधातला दृष्टिकोन काय आहे ते तुम्हाला कळेल. किंवा असं विचारलं गेलं की लहान मुलांच्या हळुवार मनोविश्वाबद्दल तुमच्या भाषेला काय म्हणायचं आहे तर आपल्याला असं उत्तर देता येईल की हो, आमच्याकडे प्रकाश नारायण संत आहेत; त्यांचं साहित्य तुम्ही वाचा म्हणजे आमच्या भाषेला या संबंधी काय म्हणायचंय ते तुम्हाला कळेल. तसंच मराठी भाषेला जर कोणी असा प्रश्‍न विचारला की काय हो, तुमच्याकडे सामाजिक कार्याची किंवा समाजप्रबोधनाची एवढी परंपरा आहे असं म्हणता मग तर समाजातल्या उपेक्षित घटकांबद्दल तुमच्या भाषेला काय म्हणायचं आहे? आहे का त्यांची नोंद तुमच्या भाषेत? तर आपल्याला अभिमानाने सांगता येईल की हो, आमच्याकडे अनिल अवचट आहेत; त्यांचं साहित्य वाचा म्हणजे आमच्या भाषेला या घटकांसंबंधी, समाजातल्या समस्यांसंबंधी काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळेल. आमच्या भाषेचा हा दृष्टिकोन आहे, हे आम्हाला म्हणायचंय या विषयांसंबधी, हे आम्ही ग्रंथित करून ठेवलेलं आहे. अवचटांच्या कामगिरीमुळे, मराठीला जर असा प्रश्‍न विचारला गेला तर आपली मान खाली झुकणार नाही. आपण छातीठोकपणे सांगू की हो, आमची भाषा या समूहांबद्दल, या प्रश्‍नांबद्दल किंवा त्या प्रश्‍नांवर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बेफिकीर नाही, आम्हाला त्यांच्याबद्दल आस्था आहे, आम्ही त्यांच्या कार्याची नोंद करून ठेवलेली आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी अवचटांना हे सांगू इच्छितो की त्यांनी मराठी भाषेत ही जी कामगिरी केली आहे तिची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहोत. कारण कोणत्याही लेखकाला अंतर्यामी हा प्रश्‍न पडत असतो. की मी हे जे करून ठेवलं आहे ते या लोकांना समजलंय की नाही? हा जो सगळा खटाटोप केला याची या लोकांना दाद आहे की नाही? याचं मूल्य यांना भावतंय की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की हो, आम्हाला हे समजतंय, ही जी वाट तुम्ही चोखाळली त्याचं महत्त्व आम्हाला माहीत आहे, तुम्ही तुमच्या मागून येणार्‍यांचा रस्ता प्रशस्त केला याची आम्हाला कल्पना आहे.
एखादे पुस्तक प्रकाशित होतानाचा आनंद व्यक्त करताना असे म्हणण्याची पद्धत आहे की या लेखकाने अशीच आणखी पुस्तके लिहावीत आणि आम्हाला वाचनाचा भरभरून आनंद द्यावा. अवचटांना असे म्हणता येईल की त्यांनी समाजातल्या अशाच निरनिराळ्या उपेक्षित घटकांबद्दल लिहावे आणि आमचे लक्ष त्या प्रश्‍नांकडे वेधावे. पण मी तसं म्हणणार नाही. कारण तसं म्हणणं हे त्या लेखकावर अन्याय करणारं असतं. आता एवढा ग्रंथसंभार तयार केल्यावरही आपण म्हणायचे, की हे राहिले, ते राहिले, हे लिहा, ते लिहा; तर ते योग्य होणार नाही. मी असे म्हणेन की तुम्ही आनंदात जगा, मजेत राहा, आपल्या मस्तीत जे लिहायचे ते लिहा. जे तुम्हाला लिहायला जमणार नाही ते आम्ही लिहू. तुमचे जे काम अपूर्ण राहील ते आम्ही पूर्ण करू. आपल्यासोबत आणि नंतरही आणखी चांगली माणसे येतील. ती राहिलेले काम पूर्ण करतील. तुम्ही ज्या आस्वादक, निर्वैर, आनंदी वृत्तीने जगलात तसेच जगा आणि तसे जगताना जे काही निर्माण होईल त्याचे आम्ही चाहते असू. धन्यवाद.
(हे भाषण ललित मासिकाच्या सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झालेलं आहे.)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content