बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स आणि अ फ्री मॅन या पुस्तकांच्या निमित्ताने

२०१२च्या जयपूर लिटररी फेस्टिवलमधील कॅथरीन बू आणि अमन सेठी यांची मुलाखत.

मुलाखतकार - चिकी सरकार

गेल्या काही वर्षांत भारताबद्दल ‘नॉन-फिक्शन’ प्रकारचं बरंच काही लिहिलं गेलं आहे. ही पुस्तकं म्हणजे बातमीदारीचे उत्कृष्ट नमुने म्हणता येतील. त्यांत शुद्ध मानवतेच्या दृष्टीकोनातून गरीबांबद्दलचे विषय हाताळलेले गेलेले दिसतात. त्यांतली भाषा खुसखुशीत आहे. विषय पकड घेणारे, विचारांना चालना देणारे आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना ती ‘फिक्शन’ प्रकारचीही वाटतात. त्यांपैकीच एक आहे २०११ साली प्रकाशित झालेलं अमन सेठीलिखित ‘अ फ्री मॅन’ आणि दुसरं २०१२ साली प्रकाशित झालेलं कॅथरीन बू हिचं ‘बिहाईण्ड द ब्युटिफुल फॉरेव्हर्स’.

अ फ्री मॅन

अमन सेठी या तरूण पत्रकारानं दिल्लीतल्या सदर बझार इथल्या अश्रफ नावाच्या एका बेघर मजुराशी मैत्री केली. त्यांच्या मैत्रीची कहाणी म्हणजेच ‘अ फ्री मॅन’ हे पुस्तक. अश्रफ दिवसभर मोलमजुरी, कष्ट करायचा आणि कमावलेला पैसा रात्री नशेवर उडवायचा. त्याचा आपल्या कुटुंबियांपैकी कुणाशी संपर्क उरलेला नव्हता, आपल्या आईचा फोननंबरही तो विसरून गेला होता. टीबीनं त्याला जवळ केलं होतं. सेठी हे त्याला पुस्तकात निव्वळ मजूराच्या रूपात सादर करत नाहीत, तर एक बहुरंगी, विनोदाचं अंग असलेल्या, पण परिस्थितीमुळे विक्षिप्त बनलेल्या, सतत उपदेशांचे डोस पाजणाऱ्या, एका रासवट व्यक्तीची शोकांतिकाच आपल्यासमोर मांडतात. ‘अ फ्री मॅन’ हे पुस्तक भारतात बरंच नावाजलं गेलं. गेल्या वर्षी यू.के. आणि उत्तर अमेरिकेतही ते प्रकाशित करण्यात आलं.

बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स

कॅथरीन बू ही पुलित्झर पुरस्कार मिळवणारी पत्रकार. न्यू यॉर्करमध्ये ती लेखिका म्हणून काम करायची. तेव्हा केलेल्या अमेरिकेतल्या दारिद्र्याबद्दलच्या लिखाणासाठी ती ओळखली जाते. सहा वर्षांपूर्वी तिने मुंबई विमानतळाजवळच्या दिमाखदार हयात हॉटेललगत असलेल्या अण्णावाडी या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला सुरूवात केली. ‘बिहाईण्ड द ब्युटिफुल फॉरेव्हर्स’ हे तिचं पुस्तक या लोकांबद्दल आहे. त्यातला प्रमुख आहे अब्दुल, एक चुणचुणीत कचरावेचक तरूण मुलगा; अकरा जणांच्या कुटुंबातला. त्यानं गाठीशी थोडाफार पैसा जमवलेला आहे. त्याला आपल्या कुटुंबियांना एका बऱ्यापैकी घरात रहायला न्यायचं आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. ‘बिहाईण्ड द ब्युटिफुल फॉरेव्हर्स’ हे पुस्तकही गेल्या वर्षी अतिशय नावाजलं गेलं. भारताबद्दल लिहिल्या गेलेल्या काही उत्कृष्ट पुस्तकांमध्ये त्याची गणना होते.
गेल्या वर्षी जयपूर लिटररी फेस्टिवलमध्ये मी या दोघांशी गप्पा मारल्या.

सरकार : सुरूवातीपासून सुरूवात करू या. या कथा जगाला सांगाव्यात असं तुम्हाला दोघांना का वाटलं?
सेठी : मी ‘फ्रंटलाईन’साठी दिल्लीतल्या कष्टकरी जनतेवर आधारित तीन भागांची एक मालिका केली होती. माझ्या पुस्तकाचं मूळ त्यात आहे. २००५-०६मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने दिल्लीचा जोरदार कायापालट सुरू होता. कष्ट करून पोट भरणारी, बारीकसारीक उद्योग-व्यवसाय करणारी दिल्ली बदलत होती. तर या दैनंदिन कामकाजाचं, झगड्याचं चित्रण करावं अशी आमची इच्छा होती. मालिकेचा पहिला भाग बांधकाम-मजुरांवर करायचा ठरला. उत्तर-मध्य दिल्लीतला सदर बझार हा भाग मी त्यासाठी निवडला. तिथे मजुरांचे बाजार भरतात, रोजचे, आठवड्याचे, दोन्ही. इथे भेटलेली माणसंच पुढे माझ्या पुस्तकातली पात्रं बनली. मालिकेच्या पहिल्या भागाचं काम झाल्यावर मला सहा महिन्यांची एक ग्रांट मिळाली. मजूर आणि त्यांचं काम याबद्दल कथास्वरूपात काहीतरी लिहायचं अशी त्यामागे कल्पना होती. त्यापूर्वी, स्टडस् टेर्कलचं ‘वर्किंग’, बेन हँपरचं ‘रिवेटहेड’ आणि अश्याच इतर काही पुस्तकांनी माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला होता. ऑर्वेलचंही असंच एक पुस्तक मी चाळलं होतं - ‘डाऊन अँड आऊट इन पॅरीस अँड लंडन’. अगदी छोटंसं पुस्तक आहे हे, पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण यातलं एकही पुस्तक भारताबद्दलचं नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की तसं काहीतरी आपण आपल्या देशाबद्दल लिहायला हवं. थोडक्यात एक प्रयोग म्हणून याची सुरूवात झाली.

सरकार : पुस्तकातला अश्रफ म्हणजे एखाद्र्या कादंबरीतलं पात्र शोभेल असाच आहे. मग मला असं विचारायचं आहे, की गरिबीबद्दल लिहायचं होतं हे झालंच, पण अश्रफला भेटल्यावर मगच तुला वाटलं का, की येस्स, याची एक चांगली स्टोरी होऊ शकते?
सेठी : खरंतर याच्या उलटच झालं. मी एक बीट रिपोर्टर म्हणून ट्रेनिंग घेतलेला पत्रकार आहे. छोट्या-छोट्या घटनांमधून बातम्या बनवायची मला सवय. त्यामुळे या प्रोजेक्टच्या सुरूवातीला मी दिल्लीबद्दलच्या अश्याच भरपूर छोट्या-छोट्या घटना आणि बातम्या जमवायला सुरूवात केली; दिल्लीच्या कायापालटाबद्दल लिहायला सुरूवात केली. पण मी जसजसं या विषयाच्या खोलात शिरायला लागलो, तसतसं मजुरांच्या एका छोट्या गटात गुंतत गेलो; त्यांच्यातल्याच या अश्रफनं माझं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं. चार-पाच महिने रिपोर्टिंग केल्यावर माझ्या लक्षात आलं, की मी जे काही शंभर-एक तासांचं रेकॉर्डिंग केलं होतं, त्यांतले पन्नास-साठ तास तर अश्रफच बोलला होता. हेच मला हवं होतं किंवा कसं ते मला सांगता आलं नसतं, पण मी ते तसंच चालू ठेवलं. एका अर्थाने अश्रफ त्या प्रोजेक्टपुरता माझा पार्टनर बनला. पुस्तकात हेच सगळं आलेलं आहे.

सरकार : केट, तू हे पुस्तक लिहायचं का ठरवलंस? तुझं आजवरचं लिखाण गरिबीला केंद्रस्थानी ठेवून झालेलं आहे; पण ती गरीबी अमेरिकेतली, भारतातली नाही.
बू : मी स्वतःला एक स्वतंत्र विचारांची आणि फेमिनिस्ट व्यक्ती समजते. त्यामुळे हे सांगताना मला जरा अवघडल्यासारखंच होतंय, की मी माझ्या नवऱ्याच्या (लेखक आणि इतिहासकार सुनील खिलनानी) प्रेमात पडले, माझा बराच काळ भारतात जायला लागला आणि त्यामुळेच मी हे पुस्तक लिहिलं. इथे सतत कानावर यायचं, की आर्थिक विकास कसा झपाट्यानं होतोय, गरिबांचं आयुष्य कसं बदलतंय... काही काळानंतर मला जाणवलं, की नेमक्या आणि काटेकोर बातमीदारीपेक्षा नुसत्या गप्पाच जास्त चालल्या होत्या. पण तरी आधी मी पुस्तक लिहीन असं काही वाटलं नव्हतं. एकतर माझी तशी काही पार्श्वभूमी नाही, कारण मी भारतीय नाही. पण जसजशी मी या अल्प-उत्पन्न गटातल्या लोकांसोबत वेळ घालवायला लागले, तसतसं मला वाटायला लागलं, की यावर काहीतरी लिहायला हवं.

सरकार : तुम्हाला मान्य असो वा नसो, पण तुम्हा दोघांच्याही पुस्तकांकडे कादंबऱ्या म्हणूनच पाहिलं जातंय. त्याचं एक कारण हे असू शकतं, की तुमच्या पुस्तकांतली पात्रं अशी काही खणखणीतपणे समोर येतात, की वाचकांना कादंबरीशिवाय तसं अन्यत्र कुठे पहायची सवयच नाहीये. तुम्ही या पात्रांमध्येच खूप गुंतला होतात का? त्यांच्यामुळेच या कथा जुळून आल्या का?
बू : एक्झॅक्टली! मी त्यांच्यात गुंतलेच. अगदी लगोलग नाही. पण असं होतंच. त्याचंही कारण सांगते - एखाद्र्या गरीब वस्तीत तुम्ही काम करताय, तिथल्या एकाला तुम्ही बाजूला घेऊन प्रश्न विचारायला सुरूवात केलीत, तर तेव्हा त्याचा कामाचा महत्त्वाचा वेळ तुम्ही खात असता. एक रिपोर्टर म्हणून हे होऊ नये याची मी नेहमी काळजी घेते. माझ्या साध्या-साध्या प्रश्नांना उत्तरं द्र्यायची तरी त्या लोकांना त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागत असते. त्यामुळे मी काय केलं? तर अण्णावाडीत सुरूवातीला काही महिने वेड्यासारखी नुसती भटकले; मी त्यांना आपापली कामं करताना नुसती पाहत बसायचे, त्यांचं जीवन निरखायचे.
कुठलंही नवीन मोठं प्रोजेक्ट सुरू करताना माझ्या मनात खूप गोंधळ असतो. मला खात्री नसते, की सर्व बारकाव्यांसह मी ही कथा मांडू शकेन का? यापेक्षा दुसरं काहीतरी सोपं करावं का? पण मग अश्या काही घटना घडत जातात, की मी आपसूकच त्यात ओढली जाते. त्या लोकांच्या आशा-निराशा, समस्या मला खेचून घेतात. अमूक एका प्रोजेक्टसाठी मी इतक्या लोकांसमवेत इतका-इतका वेळ घालवणार असं आधीपासून ठरवून होत नाही. आधी त्या माणसांच्यात खोलवर गुंतावं लागतं. मग विचार करायचा, की त्यांच्या समस्या, त्यांच्यावर होणारा अन्याय यांपैकी काही प्रकाशात आणता येईल का?

सरकार : अमन, तू पुस्तकात सांगितलंयस, की तू कशी ती भयंकर हातभट्टीची वगैरे प्यायलास, ज्यामुळे तुला त्रासच झाला. केट, तू देखील रिपोर्टिंग करताना सांडपाण्याच्या डबक्यात पडल्याचं लिहिलं आहेस. तर, अमन, मला या रिपोर्टिंगचे तुझे अनुभव सांग. कारण असे रिपोर्ताज करायचे म्हणजे आपल्याला त्यात पुरतं मुरावं लागतं.
सेठी : एका पुरूषाला या कामगारांच्या जगात शिरकाव करून घेणं तसं सोपं जातं. तिथे जाऊन बसायचं, दोन-चार सिगरेटी फुंकायच्या, हातात एक चहाचा ग्लास...काही काळानंतर आजूबाजूच्यांचं तुमच्याकडे लक्ष जातंच. मग हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरूवात करायची. यारीदोस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी एक पक्कं ठरवलं होतं, की सुरूवातीला तरी “तुम्हाला किती पैसे मिळतात? तुम्ही ते कसे कसे खर्च करता?” असलं काहीही विचारायला जायचं नाही. बड्याबड्या लोकांच्या लाईफस्टाईल्सबद्दल वगैरे लिहून येणारं मी वाचायचो, तेव्हा मला नेहमी जाणवायचं, की कुणी जाऊन मुकेश अंबानीला हे विचारत नाही, की बाबा, दर महिन्याला तुला किती पैसा मिळतो? मग आपणही तसंच करायचं असं मी ठरवलं. मी तिथे जाऊन आधी विचारलं, “फावल्या वेळात काय करता, रे, तुम्ही?” त्यावर ते म्हणाले, “आम्ही पितो.” मग मी म्हटलं, “आत्ता प्यायची का थोडी थोडी?” आणि ते लगेच तयार झाले! असा हळूहळू त्यांच्या परिघात आपला शिरकाव करून घ्यायचा. मग असं करतकरत एक दिवस मी सहज विचारल्यासारखं म्हणालो, “दिवसभरात तुमची किती कमाई होते?” त्यावर त्यांनीच मला प्रश्न घातला, “तुझी किती होते?” तेव्हा ती माझी पहिलीच नोकरी होती. मी त्यांना म्हटलं, “महिन्याचे पंधरा हजार.” तर त्यावर त्यांचं म्हणणं, “हे तर काहीच नाही! तू त्याहून कितीतरी जास्त शिकलायस!” मी त्यावर नुसती मान डोलावली. मग त्यांनीच मला चहा पाजला. मग मी पुन्हा त्यांच्या कमाईचा विषय काढला. असा एकदा शिरकाव केला, की तुम्ही त्यांच्यातले एक होऊन जाता. मात्र त्या जगाचे म्हणून जे काही अलिखित नीतीनियम असतात ते मोडायचे नाहीत अजिबात. एकदा खात्री पटली, की मग इतर विषय काढायचे - त्यांची गतायुष्यं, नकोश्या आठवणी, बदल घडवणारे अनुभव...फक्त हे सगळं आस्ते-आस्ते करायचं.

सरकार : कॅथरीन, तुझीही अशीच पद्धत होती का?
बू : नाही, अगदीच अशी नव्हती. पहिलं म्हणजे, मी त्या वस्तीत सहज मिसळून जाऊ शकणारी अशी नाही. पण अश्या प्रोजेक्टसमध्ये मी सुरूवातीलाच एक ठरवते, की आपण ज्या लोकांवर काम करणार आहोत त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असला पाहिजे. तिथे जाऊन मी आधी हे विचारते, की “या-या कामासाठी मी इथे आले आहे. तुम्हाला चालणारे ना हे?” त्यामुळे सुरूवातीला बरंच बोलावं लागलं मला, की मी हे काय करते आहे, कश्यासाठी करते आहे, इतरांना त्यात सहभागी व्हायला आवडेल का? असं सगळं. त्याला सगळेच तयार झाले असं नाही. पण बहुतेकांनी त्याला विचारपूर्वक होकार दिला. आपली खरी नावं सांगितली; आपली परिस्थिती माझ्यापुढे खुली केली. त्यांनी हे स्वीकारलं, की मी तिथे परतपरत येणार, ते जिथे जातील तिथे त्यांच्याबरोबर जाणार; मग भले ते आर्थर रोड जेल असेल, नाहीतर टीबी हॉस्पिटल असेल, नाहीतर पोलीसस्टेशनात मार खायला त्यांना नेलं असेल. थोडक्यात सुरूवातीला मी त्या लोकांशी खूप बोलले; माझ्या कामामागची कारणं मी त्यांना सांगितली. त्याचा मला खूप उपयोग झाला.

सरकार : तू पुस्तकात अण्णावाडीची आणि तिथल्या माणसांची कथा अश्या काही आत्मीयतेनं सांगितली आहेस, की जणू तू त्यांच्या मनात, भावविश्वात प्रवेश केला असावास. इतकी आत्मीयता आली कुठून? तू तर त्यांच्या जगापासून कैक योजने दूर आहेस. सर्वांनाच हे ठाऊक आहे, तुलाही त्याची जाणीव आहे. मग इतकी जवळीक कशी साधलीस तू?
बू : मी हे आधीही सांगितलं होतं, आता परत सांगते : माझ्यावर माणसं अगदी लगेच विश्वास टाकतात असं सांगणाऱ्यावर कधीही विश्वास ठेवू नये. असं कुठे असतं का? सुरूवातीला लोकांनी माझी नको इतकी थट्टा केली. त्यामुळे मी त्यांना कह्यात घेतलं किंवा त्यांच्यावर ताबा मिळवला असं अजिबात नाही. ते मला हसायचे, मी त्यांना हसायचे; पण हळूहळू आम्हाला एकमेकांची सवय होत गेली.
एक आठवड्यापूर्वीचीच गोष्ट आहे - मी परत अण्णावाडीत गेले होते, त्यांना पुस्तकाच्या काही कॉपीज् द्र्यायला. ई-बूकमध्ये वापरलेले व्हिडिओजही त्यांना दाखवायचे होते. पुस्तकाबद्दल त्यांना किती उत्सुकता आहे ते पहायचं होतं मला. तर एक मुस्लिम बाई, कहकशां हुसेन, नुकतीच बाळंतीण झालेली होती ती, तर ती म्हणाली, “इथली दुःखं लोकांना वरवर नव्हे, तर सविस्तर कळायला हवीत, उमजायला हवीत. तू तुझ्या पुस्तकातून तेच केलं असशील, तर अर्थातच आम्हाला उत्सुकता आहे.”

सरकार : अमन, तू अखेर अश्रफचा विश्वास संपादन केलास असं तुला वाटतं का?
सेठी : या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मी अजून एक गोष्ट सांगतो, जी आत्ताच माझ्या लक्षात आली. आपण नेहमी किती सहज म्हणून जातो - आपलं जग वेगळं, या लोकांचं जग वेगळं; पण त्याचा नक्की अर्थ आपण लक्षात घेतो का? वास्तविक ही दोन्ही जगं वेगवेगळी नाहीयेत; आपण सगळे एकाच इकोसिस्टिमच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे समूह आहोत. आपली आयुष्यं एकमेकांत गुंतलेली आहेत. हे गुंतणं केटच्या लेखनात अगदी प्रकर्षानं पुढे येतं. आणि मगाशी मी जे किती पैसा मिळतो वगैरे चौकशीबद्दल सांगितलं, त्यातून हेच दिसतं, की जरी आपल्या आयुष्यांमध्ये फरक असला, तरी दर महिन्याच्या अखेरीस मला आणि अश्रफला आपल्याजवळ किती पैसा आहे याचीच तर चिंता असते.

सरकार : अमन, पण मला असं विचारायचं आहे, की एकमेकांत काहीतरी परिचय, मैत्री असल्याशिवाय कुणी कुणाला म्हणणार नाही, की “चल, थोडी थोडी घेऊ”! मग अश्रफ आणि त्याच्या इतर दोस्तांशी अशी मैत्री तू कशी केलीस?
सेठी : माणसाचा भवताल कुठलाही असो, त्याला इतर माणसं जोडायला, मैत्री करायला आवडतंच ना नेहमी. मैत्री म्हटल्यावर आपल्याला जे अभिप्रेत असतं, त्याव्यतिरिक्त एका ‘रोजंदारी मैत्री’बद्दल अश्रफ पुस्तकात बोलतो. मैत्री करायची कशी? तर अधलीमधली. त्याच्या मते या अधल्यामधल्या रोजंदारी मैत्रीत अगदी घनिष्ट असे संबंध नसले, तरी एकमेकांची काळजी तर नक्कीच घेतली जाते. माझ्यात आणि अश्रफमध्येही अशीच मैत्री झाली. पण आमच्या नात्याला काही उलट-सुलट पदरही होते. म्हणजे, एक दिवस त्यानं मला सरळ विचारलं, “या पुस्तकातून तुला काय मिळणार आहे?” मी म्हटलं, “मला श्रीमंत व्हायचंय.” त्यावर तो म्हणाला, “छानच की! तसंही एक ना एक दिवस आपल्याला सर्वांनाच श्रीमंत व्हायचंय.” आम्ही नशेत, झिंगत घरी निघालो होतो आणि जगातल्या सर्वांनी श्रीमंत व्हावं अशी इच्छा व्यक्त करत होतो! एकदा तो कोलकात्यात होता, आजारी होता, तर अचानक तो रडायला लागला आणि मला म्हणाला, “तू माझ्या लहान भावासारखा आहेस.” पण मला तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे नव्हता वाटत. त्यामुळे काय बोलावं ते मला समजेना.

सरकार : बरोबर. मला हेच म्हणायचं आहे, की तुम्ही एक रिपोर्टर म्हणून तिथे जाता. त्या मंडळींशी तुमची मैत्री होतेही आणि नाहीही. त्यांच्या सुखदुःखांशी तुम्ही समरस होता आणि तरीही तुमची स्वतःची आयुष्यं त्यांच्याहून वेगळी असतात. ‘यांच्यावर आधारित मी एक भारी पुस्तक लिहिणार आहे’ इथपासून सुरूवात झालेली असते. मग या दृष्टीकोनात नक्की कधी बदल होतो? मुळात असा बदल होतो का? आणि तुमच्या कामावर त्याचा परिणाम होतो का? केट?
बू : मी काय करतेय हे अण्णावाडीतल्या लोकांना चांगलं ठाऊक होतं. ते त्यात सहभागी झाले, कारण त्यांना त्याचं महत्त्व पटलं. मैत्री आणि असा सहभाग यात त्यांनी गल्लत केली नाही. सर्वांच्या सहकार्यातून हे पुस्तक घडलं. त्यांचे अनुभव जगासमोर आणून त्यायोगे त्यांच्यासारख्याच इतरांची आयुष्यं सुखकर करावीत यासाठीचा तो एकत्रित प्रयत्न होता.
सेठी : मला इथे एक सांगावंसं वाटतंय, की केटच्या आणि माझ्या पुस्तकातली माणसं कष्टकरी वर्गातलीच असली तरीही खूप वेगळी आहेत. केटच्या पुस्तकातली माणसं राब-राब राबतात आणि अधिक सुखदायी जीवनाचं स्वप्न पाहतात. माझ्या पुस्तकातल्या माणसांना ही पद्धत मंजूर नाही. दिवसरात्र मरेस्तोवर काबाडकष्ट करायचे, पैसा वाचवायचा, तो कश्याततरी घालायचा...हे सगळं त्यांचं करून झालेलं आहे. आता ते त्या परिघातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे केटच्या पुस्तकातल्या माणसांना जर वाटत असेल, की त्यांची आयुष्यं जगापुढे यावीत, तर त्यामागची तगमग, तळमळ मी समजू शकतो. पण माझ्या प्रोजेक्टमध्ये मला अशी काही कहाणी पुढे आणायची नव्हती, की ज्यामुळे या लोकांची आयुष्यं बदलून जाणार होती किंवा भ्रष्टाचाराची काही प्रकरणं बाहेर येणार होती. अश्रफ कधीकधी मला विचारायचा, “आमच्याबद्दल जाणून घ्यावंसं कुणाला वाटणार आहे?” पण लोकांच्या जगण्याच्या अगणित तऱ्हांपैकी हा प्रकार मला भावला. कारण त्यात मला एक वैराग्याचा पदर दिसला. रॅट-रेसमधून बाहेर पडून ही माणसं धावणाऱ्या इतरांचं शांतपणे निरिक्षण करणारी अशी आहेत.

सरकार : केट, तुझ्या मते अमनच्या आणि तुझ्या पुस्तकात कोणती साम्यं आहेत?
बू : मला पूर्वीपासूनच असं वाटत आलेलं आहे की भारताबद्दल नॉन-फिक्शन प्रकारचं जे काही लिहिलं जातं, त्यात अनेकदा स्त्रिया आणि मुलं यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं. कदाचित बहुतेकदा पुरूषच हे लेखन करतात म्हणून असेल. दुसरं म्हणजे, या अत्यल्प उत्पन्नगटात पुरूष बहुतेकवेळा दारू पिऊन लास झालेले असतात आणि त्यांची बायका-पोरं आयुष्याच्या दैनंदिन झगड्याला तोंड देत असतात. अण्णावाडीतल्या तीन हजार लोकांपैकी फक्त सहा जणांकडे कायमस्वरूपी नोकरी होती. आता तर ही संख्या अजूनही कमी झाली असेल. मग गरीबीतून वर कसं यायचं याबद्दलच्या लोकांच्या, त्यातही स्त्रिया आणि मुलांच्या, एक-एक अचाट कल्पना कानावर यायच्या. मी देखील फूटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांसोबत वेळ घालवला, नाही असं नाही; पण त्याहीपेक्षा कामात गढलेले लोक काय विचार करतायत, त्यांच्या आशा कश्यावर टिकून आहेत, त्यांचे कष्ट त्यांना गरीबीतून वर काढणार आहेत का हे जाणून घेण्यात मला अधिक रस होता.
पण अमनचं पुस्तक वाचल्यावर मला वाटलं, की त्या माणसांनाही जाणून घ्यायला हवं होतं. आपापल्या कुटुंबियांपासून दुरावलेल्या त्या मंडळींच्या मनात नक्की काय चालू होतं हे माहित करून घ्यायला हवं होतं. त्यामुळे त्या अर्थाने आमची दोघांची पुस्तकं म्हणजे एकमेकांची पूरक म्हटली पाहिजेत. तसंच, अमनसारखं मी त्या लोकांच्या कथानकात स्वतःला गोवलेलं नाही. पुस्तकाच्या शेवटी मी लेखिका म्हणून स्वतःची भूमिका स्पष्ट करणारं एक लांबलचक टिपण तेवढं दिलं आहे. पण असं आव्हानात्मक प्रोजेक्ट करताना जे चित्रविचित्र अनुभव येतात, ते अमननं फार भारी पद्धतीनं मांडले आहेत. मी माझ्या पुस्तकात ते केलेलं नाहीये, पण एक वाचक म्हणून मला ते फार आवडलंय.

सरकार : केटनं मांडलेला हा मुद्दा छान आहे, जो तुमच्या पुस्तकांतला एक महत्त्वाचा फरकही आहे, की तू तुझ्या पुस्तकासाठी काही मवाल्यांसोबत राहिलास आणि केट आयुष्याशी झगडणाऱ्यांसोबत राहिली. तू पुरूषांच्या संगतीत दिवस घालवलेस आणि तिनं बायका-मुलांच्या संगतीत घालवले. इन फॅक्ट, तुझ्या पुस्तकातलं एकमेव स्त्री-पात्र हे आयुष्याशी झगडणारंच आहे. तिच्याबद्दल थोडं सांग.
सेठी : हो, माझ्या पुस्तकात एक खणखणीत पात्र आहे - कल्याणी. ती फूटपाथवर राहणाऱ्यांसाठी देशी दारूचा एक अनधिकृत बार चालवते. फूटपाथवर बसून दारू पिताना या लोकांना पोलिसांची सतत भीती असते. त्यामुळे कल्याणी शक्कल लढवते आणि बाहेरून दारू विकत घेऊन आपल्या खोपटातच दामदुपटीने त्याची विक्री करते. तिचा एक साईड-बिझिनेसही आहे - धान्य गोळा करून विकायचा. त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना अश्रफ माणसांचे दोन प्रकार नमूद करतो. दोन्ही प्रकारची माणसं कष्ट करतात. पण त्यातल्या अश्रफसारख्या माणसांनी कमावलेला पैसा अखेर कल्याणीसारख्या ‘कंट्रोल-टाईप’ माणसांकडे जातो.

सरकार : मला असं वाटतं, की जी माणसं आपल्यासारखी नसतात, आणि हे केवळ गरीबांबद्दलच नाही, एकंदरच, तर अश्यांबद्दल लिहिताना स्वतःला आधी हा प्रश्न विचारायला हवा, की ‘त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्यं आहेत? आणि काय फरक आहेत?’ तर तुमच्या कामादरम्यान तुम्ही स्वतःला असा प्रश्न केलात का?
बू : माझ्या दृष्टीनं हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता. कारण माझ्या मनात पक्कं होतं, की ती माणसं आपल्यासारखीच आहेत; त्या झोपडपट्टीत माझ्यासारख्याच स्त्रिया राहतात. अल्प-उत्पन्न गटातल्या लोकांबद्दल लिहिताना नेहमी एक चूक केली जाते - खरंतर पत्रकारितेतला हा एक दोषच आहे - की आपल्याहून वेगळं काय आहे, आपल्या जीवनपद्धतीशी फटकून असणाऱ्या त्यांच्या कुठल्या बाबी आहेत त्याच निवडल्या जातात; त्यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. वास्तविक त्यांच्यात आणि आपल्यांत विलक्षण साम्यं आहेत. अश्या प्रकारचं लिखाण करताना बऱ्याचदा श्रेष्ठ-कनिष्ठ असा विचार केला जातो. आपल्याला वाटतं, की आपल्या लायकीमुळेच आपण इथे आलो आहोत. अश्या समाजात मग कोण यशस्वी, कोण अयशस्वी हे अगदी सहजगत्या ठरवलं जातं. माझ्या पुस्तकांबद्दल अनेकजण मला विचारतात - “तो मनुष्य इतका हुशार कसा असू शकेल? कचरा वेचणारा तो मुलगा, तो जागतिक विषयावर बोलू शकणार आहे का?” लोकांना हे स्वीकारणंच कठीण जातं. आपल्यासारखाच एखादा जर त्या लोकांच्यातही असेल, असाच हुशार, विचारी, भले तो बोलण्यात वाकबगार नसेल, पण असं असेल तर मग एक समाज म्हणून यशस्वी आणि अयशस्वीपणाच्या व्याख्या करण्यात आपण कुठेतरी चूक करतोय हे नक्की.
सेठी : एक भारतीय म्हणून माझ्या मनाशी हे पक्कं होतं, की तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घेता त्यावर पुढचं बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळे ‘आपण आणि ते’ या गोष्टीकडे मी एक जुगार म्हणूनच पाहतो - मी लिहिणे, या माणसांनी माझ्या लेखनाचा विषय असणे - हे सगळंच; जे होण्यासाठी आपल्यातल्या कुणीच मुद्दामहून, खास प्रयत्न केलेले नसतात. आपला जन्म झाल्याक्षणापासून ठरूनच जातं, की एक ना एक दिवस हे होणार. अश्या वेळी, जेव्हा त्या लोकांच्या व्यथा आपल्याला माहिती नसतात, आपल्या व्यथांची त्यांना कल्पना नसते, तेव्हा केटच्या किंवा माझ्या पुस्तकाचं उद्दीष्ट हेच असतं, की आपल्या परिघाबाहेरचे अनुभव घेता यावेत; काही आयुष्यं कायमस्वरूपी दुःखी, कष्टी का असतात आणि काही आनंदी, सुंदर का असतात हे जाणून घेता यावं. पण, त्यात हे ही आहे, की केवळ ती माणसं गरीब आहेत आणि तुम्ही नाही, म्हणून त्यांच्या आयुष्यात अति ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला कुणी मक्ता नाही दिलेला.

सरकार : अर्थातच. पण ही दोन्ही विश्वं एकमेकांपासून वेगळी आहेत या समजुतीपायीच एकमेकांपासून अलग राहू शकतात. केट, तू एका ठिकाणी म्हणाली होतीस, की “ या झोपटपट्ट्या आतल्या आत कोसळत कश्या नाहीत? तिथे दंगली, हिंसा काहीच कसं होत नाही?” अमन, या मागे काय कारण असावं असं तुला वाटतं? प्रारब्धवाद? ‘आम्ही गरीब म्हणून जन्मलो, तुम्ही श्रीमंत म्हणून, नियतीच्या मनात हेच होतं’ हा विचार?
सेठी : नाही, मला नाही वाटत यामागे नियतीचा काही हात आहे. मात्र भारतात शहरी आणि ग्रामीण वातावरणात फरक असतो. ग्रामीण भागात अशी अस्वस्थता, हिंसा, आतल्या आत कोसळणे हे भरपूर होतं. पण शहरी भागांची रचनाच अशी आहे, की तिथे हा प्रकार कमी घडतो. पोलीसांची भीती असते; केटने तिच्या पुस्तकात दाखवून दिलंय, तसं राजकारण्यांचा, सरकारचा प्रभाव जास्त दिसतो.

सरकार : केट, शेवटचा प्रश्न - शहरांत अशी हिंसा दिसत नाही यामागे पोलीस, राजकारणी हेच कारण आहे असं तुला वाटतं का?
बू : नाही, माझ्या मते, शहरांमधल्या अण्णावाडीसारख्या वस्त्यांमध्ये कमालीचा आशावाद दिसून येतो. वस्तीतल्या लोकांचा आजही यावर विश्वास आहे, की एक ती यशाची गुरूकिल्ली सापडण्याची खोटी, मग या झोपडपट्टीतून तरी आपल्याला नक्की बाहेर पडता येईल, आपल्या मुलांचं भविष्य अधिक सुखकर करता येईल. माझ्या दृष्टीने हे पुस्तक लिहिण्यामागेही एक आशावादच होता. अण्णावाडीसारख्या ठिकाणी माणसं जेव्हा खितपत पडतात, दररोजच भ्रष्टाचाराला, विविध अत्याचारांना सामोरी जातात, तेव्हा तिथून बाहेर पडण्याच्या त्यांच्या मार्गात कोणकोणते अडथळे आहेत हे जाणून घेऊन जर जगासमोर मांडले, तर कदाचित अश्या वस्त्यांच्या बाबतीत काय काय चुकत आलेलं आहे, त्यातलं काय काय सुधारता येईल याबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content