प्रभाकर भाटलेकर

अवचटांचं काय करायचं हा साहित्य संमेलनाचा उरूस भरवणाऱ्यांना न पडलेला प्रश्न आहे.
कल्पना करा, साहित्य संमेलनवाले अवचटांकडे जाऊन म्हणाले की, आम्ही तुमची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करीत आहोत, तर अवचट काय म्हणतील?
क्षणाचाही विलंब न लावता म्हणतील, “छे छे, अहो या पदासाठी एखादा प्रतिभावंत किंवा विचारवंत पाहिजे. मी तर दोन्हीही नाही.”
अवचटांना म्हटलं की, तुम्ही लेखक आहात, तर ते म्हणतील, “छे छे, मी पत्रकार आहे.” जर त्यांना म्हटलं, तुम्ही हाडाचे पत्रकार आहात, तर ते म्हणतील, “छे छे, मी साधा पत्रकार आहे, हाडाचा-बिडाचा नाही.”
तुम्ही छान लिहिता असं म्हटलं, तर ते म्हणतील, “मला लेखनापेक्षा इतर गोष्टींतच जास्त इंटरेस्ट आहे. चित्रकला, काष्ठशिल्पं, बासरीवादन, ओरिगामी इ. इ.” तुम्ही कलावंत आहात असं म्हणायचा अवकाश, “छ्या…अहो जरा गंमत म्हणून,”…आलंच अवचटांचं उत्तर.
सुरुवातीला अवचट श्री. ग. माजगावकरांच्या माणूस साप्ताहिकातून लिहू लागले. त्याच सुमाराला एस.एम. जोशींबरोबर त्यांनी बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्याचा दौरा केला. जसं पाहिलं तसं लिहिलं, इतक्या स्वच्छ फोटोग्राफिक शैलीत लिहिलेल्या पूर्णिया या पुस्तकाने साक्षेपी वाचकांचं आणि साहित्यिकांचं लक्ष अनिल अवचटांकडे गेलं. ते पुस्तक वाचल्यानंतर रिपोर्ताज या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला. नंतरच्या काळात त्यांची पुस्तकं लेख इंटरव्ह्यूज वाचनात आले.
त्यावेळच्या मराठी साहित्यात अवचटांचं लिखाण एकदम वेगळ्या तऱ्हेने उठून दिसत होतं. साधी, सरळ, अनलंकृत शब्दरचना. हे लेखन आणि त्याचा लेखक यांच्यात फरकच करता येत नाही. आपण आपल्यालाच आलेला एखादा अनुभव वाचतोय, असं वाटण्याइतपत वाचकाला आपलंसं करणारं, कधी कधी सुन्नबधिर करणारं, विचारात पाडणारं, धक्के देणारं. बरीच वर्षं अवचट लिहीत राहिले. त्यांचा वाचकवर्ग वाढत राहिला, आणि या वाचकाला अवचट ही एक सवयच झाली. साधी शैली आणि लहान मुलाचं निरागस कुतूहल, या गोष्टी उत्तम लागलेल्या दह्यासारख्या त्यांच्या लिखाणात जमून येतात. डॉक्टर झाल्यानंतर सरळपणे डॉक्टरकी न करता अवचट इतर अनेक आवडणाऱ्या गोष्टी करू लागले. पत्नीने- डॉ. सुनंदाने तर त्यांना तसं करायला उत्तेजनच दिलं. (एवढंच काय, सुनंदानेच मला शिकवून माझा अभ्यास घेऊन मला डॉक्टर केलं आहे, असं ते स्वच्छ लिहितात.) प्रथम कुतूहलाने भटकंती, आणि त्यातून निर्माण झालेलं लेखन असा प्रकार सुरू झाला. लेखन त्यांना भावलं. श्वास आला श्वास गेला, ही क्रिया शांतपणे बघत रहायची- असा एक आनापाना म्हणून ध्यानप्रकार आहे. त्याने मनाला हळूहळू शांत सुखकर अवस्था प्राप्त होते. तशीच अवस्था अवचटांची लेखनानंतर होत असावी.
वेगळ्या वाटेने जात अर्थपूर्ण काम करणाऱ्यांकडे अवचट ओढले जातात. अतिशय नितळ शब्दांत त्यांना रेखाटतात, आणि वाचकांना त्या माणसात गुंतवून टाकतात. डॉ. आनंद नाडकर्णींबरोबर व्यसनाधीनांचा वेध घेताना जी भटकंती झाली त्यातून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा पसारा उभा राहिला. पुलं आणि सुनीताबाईंनी सुरुवातीची पाच वर्षे मुक्तांगणला आर्थिक पाठबळ दिलं. या प्रकाराची कुठेही वाच्यता नाही. पुढे अवचटांनी मुक्तांगणची गोष्ट नावाचं पुस्तक लिहिलं, त्यामध्ये हे सगळं उलगडतं. अवचटांनी वृक्षतज्ज्ञ महाजन,खडकांचा अभ्यास करणारे करमरकर, कृषी-ऋषी म्हणावे असे धोंडेसर, शेतकरी बनलेला अरूण देशपांडे, आणि कितीतरी अनेक, प्रसिध्दीकडे पाठ फिरवून मोलाचं काम करणाऱ्या माणसांना वाचकापर्यंत आणून सोडलं आहे. (अभय आणि राणी बंग यांच्याबद्दल प्रथम जाणलं ते अवचटांच्याच लेखात.)
काही वर्षांपूवी अवचटांना विजय तेंडुलकरांच्या हस्ते एक पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांची मुलाखतही घेतली. अतिशय दर्जेदार अशा श्रोत्यांपुढे अवचट व तेंडुलकर यांनी प्रवेश केला, तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व श्रोते उभे राहिले. त्यावेळच्या आपल्या भाषणात अवचट मिश्किलपणे म्हणाले, “…असं काही करू नका…लेखक बिघडतात.” कल्पनेच्या भराऱ्या मारण्यापेक्षा तापल्या जमिनीवरून चालणारा अवचटांमधला लेखक हा मराठी साहित्यविश्वात आगळाच. सफाई कामगारांचं जीवन, देवदासींचा प्रश्न, तंबाखू-विडी कामगार, हळद कामगार, हमाल, अशा भिन्न स्तरावरील कष्टकऱ्यांच्या जीवनाने अवचटांना खेचून घेतलं आणि त्याचा दाहक अनुभव लेखणीतून ते वाचकांना देतात. (मैला सफाई कामगारांच्या प्रश्नावर माहिती घेताना ते कंबरभर मैल्यातून चालले आहेत.)
अवचट असे वेगळेच का घडले..??
याची मुळं आहेत समाजवादी विचारसरणीच्या लढाऊ युवक क्रांती दलात (युक्रांद). सामाजिक अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारणाऱ्या, बाबा आढाव यांच्याबरोबर एक गाव एक पाणवठा चळवळीद्वारे त्यांनी अगदी तरुण वयातच ग्रामीण भाग पिंजून काढला. अगदी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये असल्यापासून विविध उपक्रमांतून अवचट नकळत त्याकाळच्या संवेदनशील व विधायक लोकांपर्यंत पोचत राहिले. सकाळ च्या मो. स. साठ्यांनी त्यांना लिहायला लावलं. वेळू, नांदेड या गावांमधून काम करताना त्यांनी व त्यांच्यासोबतच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भारताचं समाजजीवन जवळून बघितलं. शहरातले समकालीन डॉक्टर्स झकासपैकी पैसा खेचताना पाहून त्यांना तसं करावंसं वाटलं नाही, तर ते ज्यांना नागवतायत त्या पेशंट्सबद्दल ते अनुकंपित झाले. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टरकी कर असं सांगणारे असूनही, अवचटांच्या आतला ‘गांधी’ पीडितांच्या, शोषितांच्याच घरी जात राहिला. त्या पीडिताचे, शोषिताचे अश्रू त्यांनी कदाचित पुसले असतील-नसतील, मात्र नीट निरखले, जाणिवेत वागवले आणि जे निरखले ते लिहिले.
जगभरात पत्रकारितेत एक संकेत मानला जातो. प्रश्न जितका अडचणीचा तितका तो जास्त वेळा आणि खणखणीतपणे विचारला गेला पाहिजे. त्याचं योग्य उत्तर या मार्गानेच मिळतं. आपल्या देशात मात्र हा संकेत, ज्याचं उत्तर मिळत नाहीये, तो प्रश्नच बाद ठरवा, असा पाळला जातो. अवचटांनी अशा वाट वाकडी करून प्रश्न टाळणाऱ्यांच्या वाटेवर हे प्रश्न पुन्हा उभे केले. टाळणं अशक्य केलं. आपल्याला मनोमन कबूल करायला लावलं की, “छ्या: आपण काय हे प्रश्न सोडवणार..? आपली लायकीच नाही.”
सुनंदा आणि अनिल अवचट
अवचटांचा ईश्वरावर विश्वास आहे-नाही याचं नि:संदिग्ध उत्तर त्यांच्या लेखनात मिळत नाही. पण त्यांचं आणि डॉ. सुनंदा सोहोनींचं एकत्र येणं याला ईश्वरी संकेताशिवाय दुसरं काही म्हणता येत नाही. अवचटांनी त्यांच्या या नात्याबद्दल अनेक ठिकाणी लिहिलं आहे. कॉलेज जीवनापासून सोबत असलेल्या, लग्नानंतर डॉ. अनिता अवचट बनलेल्या या मुलीमध्ये प्रेमाचा, चैतन्याचा व कारुण्याचा दैवी झरा अव्याहतपणे वाहात होता, तो तिच्या जाण्यापर्यंत तर आटला नाहीच. पण ती गेल्यावरही अनेकांच्या अंत:करणात त्याचे उमाळे ठेवून गेली. (अशी अलंकारिक भाषा अवचटांना अजिबात आवडत नाही, पण डॉ. सुनंदांच्या बाबतीत यातली एक एक उपमा चपखल आहे.) अनेक बाबींवर असलेल्या तिच्या आगळ्यावेगळ्या अप्रोचमधून अवचटांवर जणू वेळोवेळी संस्कारच झाले, एखाद्या आईकडून मुलांवर नकळत होतात तसे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उभारणीत तिच्या साध्यासुध्या पण मौलिक सूचना, एखाद्या क्रमिक पाठ्यपुस्तकाइतक्या महत्वाच्या आहेत. अशी पत्नी, मित्र, साथीदार...तिच्यासारखी तीच.
साधना साप्ताहिकाचे ते काही काळ संपादक होते. सामाजिक बांधिलकी हा शब्द आजकाल फार बोथट झाला आहे. पण अवचटांच्या जाणिवेत तो प्रखरपणे रुजला आहे. नकलीपणाचा जराही स्पर्श न झालेले त्यांचे खणखणीत लिखाण संवेदनशील मनाला म्हणूनच भिडणारे आहे. राजकारण हे खरे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्त पिणारे बांडगूळच. अवचट थेट राजकारणावर लिहीत नाहीत. पण जे काही लिहितात त्यात ‘बिटविन द लाईन्स’ असा राजकारणावरच प्रहार केलेला असतो.
टीव्ही, इंटरनेट, मोबाइल अशा डोकं गरगरवून टाकणाऱ्या तंत्रप्रगतीने माणूस संवेदनाशून्य होत चालला आहे. खाओ पीओ मजा करो, हीच वृत्ती त्याला खरी वाटू लागली आहे. तरीही अवचट अजून वाचले जाताहेत.
लगे रहो मुन्नाभाईच्या शेवटी, त्यातले बापू म्हणतात..मी गेलेलो नाही, पुन्हापुन्हा येत रहाणार, कुणा ना कुणाच्या डोक्यात केमिकल लोच्या करण्यासाठी. अवचट तरी दुसरं काय करताहेत..??
-प्रभाकर भाटलेकर
मोबाइल – 9833271640
(गेली तीस वर्षे राजकीय अर्कचित्रकार. त्याआधी नऊ वर्षे जाहिरात क्षेत्रात कलादिग्दर्शक. ऐशींच्या दशकातल्या जवळजवळ सर्व इंग्रजी व मराठी दैनिकांतून व नियतकालिकांतून नियमित चित्रे प्रसिद्ध.ऐंशी व नव्वदच्या दशकांत टाईम्स ऑफ इंडिया वृत्तसमूहामध्ये अर्कचित्रकार. द इलेस्ट्रेटेड वीकली या साप्ताहिकातून भरघोस प्रसिद्धी. कवी, चित्रपट समीक्षक. हॉलिवूडमधील कलावंतांवर व चित्रपटांवर अनेक दिवाळी अंकांतून लेख प्रसिध्द.)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content