नरसिंह चिंतामण केळकर

(१८७२ ते १९४७)
साहित्यसम्राट. लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत अनुयायी व त्यांचे पहिले चरित्रकार.

नरसिंह चिंतामण केळकर

लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत अनुयायी व त्यांचे पहिले चरित्रकार म्हणून नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर ओळखले जातात. टिळकांच्या निधनानंतर त्यांनी १२ वर्षं ‘केसरी’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. ‘केसरी’चा लौकिक त्यांनी जपला, जोपासला आणि वाढवला. ‘केसरी’चा ट्रस्ट करून त्यांनी त्याला स्थायी रूप दिलं. पत्रकारितेबरोबरच त्यांनी साहित्याच्या जवळजवळ सर्व प्रांतांत मुशाफिरी केली. कादंबरी, कथा, नाटक, काव्य, चरित्र, इतिहास, तत्त्वज्ञान अशा विविध प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांना लाभलेली ‘साहित्यसम्राट’ ही उपाधी त्यांनी सार्थ ठरवली. ते उत्तम वक्ते होते व टिळकोत्तर राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म २४ ऑगस्ट १८७२ रोजी पंढरपूर तालुक्यातील मोडनिंब या गावात झाला. त्यांचे वडील चिंतामण केळकर हे मूळचे तत्कालीन रत्नागिरी (आता सिंधुदुर्ग) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वानिवडे गावाचे रहिवासी. मिरज संस्थानात नोकरीस असताना मोडनिंब इथे त्यांची मामलेदार म्हणून नियुक्ती झाली होती. नरसिंह त्यांचे तिसरे पुत्र होते. नरसिंहांचे थोरले बंधू नारायणराव ऊर्फ नाना हे शिक्षक होते. प्राचीन मराठी कवितेचा त्यांचा अभ्यास होता. ‘काव्यसंग्रह’ या नियतकालिकाचं त्यांनी दीर्घकाळ संपादन केलं. नरसिंहांचे दुसरे वडील बंधू महादेव ऊर्फ अप्पा हे त्या काळातील उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होते. ते उच्चविद्याविभूषित होते. नरसिंहांना वाराणसी नावाची एक बहीण होती. अल्पवयातच तिचं निधन झालं. चिंतामण केळकर निवृत्तीनंतर साताऱ्यात स्थायिक झाले होते.
तात्यासाहेब केळकरांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिरजेत झालं. १८८८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. १८९१ साली त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर वडील बंधूंच्या मार्गदर्शनानुसार ते एल.एल.बी.च्या अभ्यासाकरता मुंबईला गेले. मुंबईच्या वास्तव्यात त्यांचा वाङ्मयाचा व्यासंग वाढला. लेखन-वाचन व चर्चा-वादविवादात रमल्याने तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीचं चांगलं भान त्यांना आलं. १८९५ मध्ये एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी साताऱ्यात वकिलीला सुरुवात केली. याच दरम्यान १८९६ साली लोकमान्यांच्या निमंत्रणावरून तात्यासाहेब पुण्यात आले व ‘मराठा’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम पाहू लागले. अशा प्रकारे टिळकांच्या सान्निध्यात आल्यानंतर वाङ्मय, पत्रकारिता व राजकारण या क्षेत्रांत तात्यासाहेबांची प्रदीर्घ कारकीर्द घडली.
म. श्री. दीक्षित यांनी तात्यासाहेबांचं वर्णन असं केलं आहे : ‘पुणेरी पगडी शोभायमान दिसे ती खरी नरसोपंतांच्या डोक्यावर. पायांत पातळसे लाल जोडे, शुभ्र धोतर, अंगरखा, कोट आणि शिरी पगडी या नित्यपरिचित वेशात तात्या रस्त्याने डुलत डुलत, मधूनच खाकरत, खांदे उडवत चटाचटा चालत.’ साताऱ्यातून येऊन ‘पुणेरी’ झालेल्या न. चिं. केळकरांचं हे डौलदार वर्णन आहे. तात्यासाहेबांनी पुण्यात आल्यानंतर टिळकांच्या ‘लॉ क्लास’मध्ये शिकवणं सुरु केलं, त्याचबरोबर ‘मराठा’त ते लिहू लागले. इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व असल्याने टिळक त्यांच्या इंग्रजी लेखन, पत्रव्यवहारातल्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा, सल्ला-मसलत करत असत. लोकमान्य टिळक हे वृत्तपत्रीय लेखन वा संपादनाचं चालतं-बोलतं विद्यापीठच होतं. न. चिं. केळकर या वृत्तपत्रकाराची जडणघडण या विद्यापीठात झाली. लोकमान्यांच्या लेखणी व वाणीतील आक्रमकता तात्यासाहेबांच्या लेखणीत नव्हती. मात्र, त्यांची शैली लालित्यपूर्ण होती व त्यांच्या लेखनात चतुरस्रपणा होता. यामुळे ते लोकप्रिय ठरले. कायद्याचं ज्ञान असल्याने कायद्याच्या चौकटीत राहून तारतम्याने ते मुद्देसूद व रोखठोक लिहायचे. केळकरांची कारकीर्द स्वातंत्र्यपूर्व काळात घडली, हे लक्षात घेतलं तर त्या वेळचं लेखन व संपादन हे तलवारीच्या धारदार पात्यावरून चालण्यासारखं होतं. टिळकांचा केळकरांच्या लेखनावर व संपादन- कौशल्यावर विश्वास होता. म्हणूनच कृ. प्र. खाडिलकर बाहेर पडल्यानंतर ‘मराठा’बरोबर ‘केसरी’ची जबाबदारीही त्यांनी केळकरांवर सोपवली. टिळकांच्या तुरुंगवासात त्यांनी ‘केसरी’ची धुरा यशस्वीपणे सांभाळलीच, पण टिळकांच्या निधनानंतर ‘केसरी’चं तेजस्वीपण त्यांनी कायम राखलं. १८९६ ते १९२० अशी पंचवीस वर्षं तात्यासाहेब टिळकांच्या सान्निध्यात होते. त्यांच्या हयातीत व हयातीतनंतर टिळकांचा त्यांच्यावरील विश्वास त्यांनी सार्थ केला. संपादकापदाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘केसरी’त अनेक मनोरंजक व बोधप्रद सदरं सुरू करून त्याची वाचकप्रियता जपली.
तात्यासाहेब टिळकांचे निष्ठावंत अनुयायी होते, पण त्यांचं अंधानुकरण त्यांनी केलं नाही. वेळोवेळी त्यांच्यात मतभेद व्हायचे. टिळकही त्यांच्या मतांचा आदर राखत. समाजसुधारणांच्या बाबतीत त्यांचा कल टिळकांपेक्षा जास्त न्या. रानडे व आगरकरांकडे होता. मात्र, महात्मा गांधींच्या कार्यशैलीबद्दल त्यांची नापसंती कायम राहिली. टिळकांच्या सोबतीने ते राजकारणात सक्रिय होते, तरी टिळकांचं जहाल राजकारण त्यांना नेहमीच सोसवलं असं नाही. काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात टिळक मांडणार असलेल्या एका तहकुबीला पाठिंबा देणारं भाषण तात्यासाहेबांनी करावं अशी टिळकांची इच्छा होती; पण तात्यासाहेबांनी नकार दिला. सुरतचं अधिवेशन मोडण्यास जहाल-मवाळ दोन्ही पक्ष कारणीभूत असल्याची त्यांची धारणा होती. टिळकांनी याचा राग मनात धरला नाही, तर पुढे त्यांनी तात्यासाहेबांची ‘नॅशनॅलिस्ट लीग’च्या चिटणीसपदावर नियुक्ती केली. १९१८ साली इंग्लंडला गेलेल्या शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते. ब्रिटनमधील ‘ब्रिटिश इंडियन काँग्रेस कमिटी’च्या ‘इंडिया’ या मुखपत्राचं त्यांनी संपादन केलं. इंग्लंडच्या त्या दौऱ्यातील घडामोडींचं सविस्तर वर्णन त्यांनी ‘विलायती बातमीपत्रे’ या पुस्तकात केलं आहे. अॅनी बेझंट यांच्यासह टिळकांनी स्थापन केलेल्या ‘होमरूल लीग’मध्ये तात्यासाहेब सक्रिय होते. ‘होमरूलची कैफियत’ त्यांनी इंग्रजीत लिहिली. टिळकांच्या निधनानंतरही केळकर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहिले. गांधींच्या कार्यप्रणालीच्या मतभेदांतून १९२३ साली ‘स्वराज्य पक्ष’ निर्माण झाला. हे मतभेद प्रामुख्याने प्रांतिक व वरिष्ठ कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा की नाही, या मुद्द्यावर होते. स्वराज्य पक्षाने या निवडणुका जिंकल्या. तात्यासाहेब केळकर कायदेमंडळातील स्वराज्य पक्षाचे उपनेते झाले होते. अभ्यास व व्यासंगाच्या बळावर कायदेमंडळात त्यांनी उपयुक्त कामगिरी केली. (१९२३ व १९२६ असे दोन वेळा ते कायदे मंडळावर निवडून गेले होते.) केळकरांचा राजकीय प्रवास काँग्रेस-स्वराज्य पक्ष-प्रतियोगी सहकारिता-हिंदू महासभा असा झाला. जाणकारांच्या मते, तात्यासाहेबांचा पिंड राजकारणाचा नव्हता. टिळकांमुळे ते राजकारणात आले आणि टिळकांनंतर अपरिहार्यतेपोटी त्यांना राजकारणात राहावं लागलं. टिळकांचा ज्वलंतपणा त्यांच्यात नव्हता. ते खूप संयमी होते. तेही समाजसुधारणा इच्छित होते. मात्र, क्रांतिकारक पावलं उचलून नव्हे, तर समाजाचं मन वळवून सुधारणा साधली पाहिजे, या मताचे ते होते.
केळकरांनी ‘टिळक चरित्रा’चे तीन खंड लिहिले. टिळकांच्या मृत्यूनंतर दोन-तीन वर्षांतच केळकरांनी त्यांचं चरित्रलेखन हाती घेतलं. पहिल्या खंडात टिळकांच्या पूर्वजांपासून १८९९ पर्यंतच्या कालखंडाचा समावेश आहे. १८९९ ते १९१४ व १९१४ ते १९२० हे कालखंड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या खंडात समाविष्ट आहेत. या खंडांमध्ये टिळकांच्या आयुष्यातील घडामोडींबरोबरच तत्कालीन राजकीय-सामाजिक स्थितीची तपशीलवार माहिती मिळते. टिळकांच्या सान्निध्यातील व्यक्तीने लिहिलेलं चरित्र म्हणून त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गतगोष्टी’ या त्यांच्या आत्मचरित्रातही समकालीन इतिहास विस्तृतपणे आला आहे. आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीबद्दल ‘माझा जन्मभरचा उद्योग’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. ‘मराठी व इंग्रज’ या पुस्तकातून महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी नजर टाकलेली दिसते. ‘आयर्लंडचा इतिहास’, ‘फ्रेच राज्यक्रांती’ ही इतिहासावरची त्यांची अन्य पुस्तकं. तात्यासाहेबांनी कथा, कादंबरी, कविता व नाटकं लिहिली; पण म. श्री. दीक्षित यांच्या मते- या वाङ्मय प्रकारांत लिहिणं तात्यांना यत्न करूनही जमलं नाही. त्यांचा खरा पिंड पत्रकाराचा, चरित्रकाराचा, निबंधकाराचा. सहा नाटकं त्यांच्या नावावर आहेत, पण ‘तोतयाचे बंड’ याखेरीज एकही यशस्वी ठरलं नाही. केळकरांची वाङ्मय संपदा ‘समग्र केळकर वाङ्मय- खंड १ ते १२’ मध्ये (१९३८) संकलित झाली आहे. अर्थात त्यानंतरही त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. १९२१च्या बडोदे येथील साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं.
तात्यासाहेब केळकरांनी १९३२ साली वयाच्या साठाव्या वर्षी ‘केसरी’चं संपादकत्व सोडलं; मात्र, १९३५ साली सह्याद्री मासिक सुरू करून त्यांनी त्यांची लेखन-संपादनाची कारकीर्द चालू ठेवली. या काळात केसरी-मराठा ट्रस्टची त्यांनी मशागत केली. १९३७ साली त्यांनी या ट्रस्टच्या संचालकपदावरून निवृत्ती घेतली. १९४२ साली वयाच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त ‘सह्याद्री’चा संपूर्ण अंक त्यांनी एकटाकी लिहिला. १४ ऑक्टोबर १९४७ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात त्यांचं देहावसान झालं. तेव्हा त्यांच्या टेबलवर त्यांनी स्वत:च्या हाताने लिहिलेली कविता आढळली. तिच्या ओळी अशा :
‘दिसो लागे मृत्यू परि न भिववू तो मज शके।
तयाच्या भेटीचे असता मजला ज्ञानाचे निके॥
प्रवेश रानी जो धरूनीच शत्घनी निज करी।
न भी तो वाघाला परि हसुनि सुस्वागत करी॥

नरसिंह चिंतामण केळकर
(२४ ऑगस्ट १८७२- १४ ऑक्टोबर १९४७)

लेखन : मनोहर सोनवणे

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content