एक गाव जेव्हा आयटीचं जंक्शन बनतं

आयटी पार्कमुळे प्रकाशझोतात आलेल्या पुण्याजवळच्या हिंजवडी गावाबद्दल पाच-सात वर्षांपूर्वी कुणाला काही माहीत नव्हतं. आज मात्र हिंजवडी या गावाशेजारी देशातल्या नि जगातल्या नामवंत कंपन्या येऊन ठेपल्या आहेत आणि इथे हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. इथे एक अचाट, अफाट नि झगमगती दुनियाच अवतरली आहे. मात्र गंमत अशी आहे की, या समृद्धीचा हिंजवडी या गावाला स्पर्शही झालेला नाही. शेजारी प्रचंड पैसा नि समृद्धी आलेली असली, तरी हे गाव जसं होतं तसंच राहिलं आहे. किंबहुना अधिकच बकाल बनलं आहे.
एकाच परिसरात दोन स्वतंत्र विश्व इथे कशी नांदत आहेत याचा ‘युनिक फिचर्स’ने घेतलेला शोध. आपल्या देशात प्रगती कशी होते यावर प्रकाश पाडणारा.
-युनिक फीचर्स
ऑगस्ट २००७

एका वाक्यात ओळख किंवा वैशिष्ट्य सांगता येईल असं पुण्याजवळच्या हिंजवडी या गावात काहीही नव्हतं. भारतातील लाखो खेड्यांसारखंच ते एक खेडं होतं. मात्र याच हिंजवडीला आता ग्लोबल ऍड्रेस लाभला आहे, ग्लोबल स्टेटस मिळालंय.भारतातील आणि काही प्रमाणात जगातील नामांकित आयटी कंपन्यांना हिंजवडीने चुंबकासारखं आपल्याकडे खेचून घेतलंय. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हिंजवडी आता आयटीच्या हायवेवरचं महत्त्वाचं जंक्शन बनलंय. पुणे शहर आता ‘आय.टी.चं शहर’ म्हणून आपली नवी ओळख स्थापित करत आहे. हिंजवडीमुळे ही ओळख अधिक ठसठशीत होत आहे. नवी अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण याच्या अपरिहार्य परिणामांमुळे पुण्यासारख्या चहुबाजूंनी वाढणाऱ्या शहरातूनच एक नवं शहर कसं उदयाला येतं, याचं हिंजवडी एक उत्तम उदाहरण आहे.
चार-पाच वर्षापूर्वी हिंजवडी गावाचा पत्ता पुण्यात कोणाला विचारला असता तर सांगणारेही गोंधळून गेले असते. आता मात्र हिंजवडी आयटीचं हॉट डेस्टिनेशन बनल्याने कॉलेजमधल्या तरुणांनाही हिंजवडीचा ठावठिकाणा नीटपणे ठाऊक झालाय. भौगोलिकदृष्ट्या बोलायचं तर हिंजवडी पुण्याच्या वायव्येला मुळशी तालुक्यात आहे. पुण्यापासून २२ किमी अंतरावर असलेलं हिंजवडी हे तसं बघायला गेलं तर पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्टयाला अगदी लागून आहे. पुण्यातून हिंजवडीला जाताना औंध, सांगवी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, धुमाळवस्ती मागे टाकत वाकडच्या दिशेने जाताना छोटी छोटी गावठाणं, हिरव्यागार शेतांचे पट्टे आणि काही ठिकाणी मधूनच उभ्या राहिलेल्या अलिशान इमारती नजरेस पडतात. रस्त्याच्या कडेला असलेले रो हाउसेस, फ्लॅट-प्लॉट्स् विक्रीची पुण्यातील नामांकित बिल्डर्सची होर्डिंग्ज, आधुनिक चेहऱ्या-मोहऱ्याचे ढाबे, भली मोठाली मंगल कार्यालयं अजून शहराची हद्द संपलेली नाही हेच जाणवून देतात. हा नजारा डोळ्यात साठवत वाकडच्या फाट्यावर आलं की, आडवा येतो पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे. खरं म्हणजे एक्सप्रेस हायवे आणि आयटी हायवेचं हे खऱ्या अर्थाने जंक्शनच म्हणता येईल. हिंजवडीला शहरीकरणाच्या वळणावर आणणारं हेच जंक्शन महत्त्वाचं ठरलंय.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ओलांडला की हिंजवडी गावाची हद्द सुरु होते. एक्स्प्रेस वेपासून आणखी दोन तीन किलोमीटर. आत गेल्यावर हिंजवडीचं महत्त्वाचं ठाणं लागतं. हा हिंजवडी गावाचा मुख्य नाका. या नाक्यावर उभं राहिलं की गाव आणि शहरीकरण यांची झालेली सरमिसळ छानपैकी जाणवते. हा नाका म्हणजे बाजाराचा भाग. नाक्याच्या उजव्या भागाला थोडं आत मूळ हिंजवडी गाव आहे. छोटी मोठी क्लिनिक्स, स्टेशनरी, किराणा, रेडिमेड कपड्यांची दुकानं, गॅरेजेस्, बँका, मोबाईल शॉपी अशी कितीतरी प्रकारची दुकानं यांनी हा भाग गजबजलेला दिसतो. बाहेरगावावरुन येणाऱ्या जाणाऱ्या बस गाड्यांचा थांबा हाच. नाक्याच्या उजव्या बाजूला ग्रामपंचायतीची दोन मजलीच पण आडवी पसरलेली इमारत आहे. ग्रामपंचायत इमारतीमध्ये कनिष्ठ महविद्यालय, माध्यमिक शाळा, श्री सेवागिरी पतसंस्था, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी ऑफिस असं बरंच काही एकवटलंय. नजरेत भरणारी दुसरी बाब म्हणजे हिंजवडी नाक्यावरचे छोटेछोटे फूड स्टॉल्स. वडापाव, मिसळ, भजी हे खाद्यपदार्थ विकणाऱ्या बऱ्याच टपऱ्या नाक्याच्या चहुबाजूंना पसरलेल्या दिसतात. या टपऱ्यांवर दिवसभर कष्टकरी वर्गाची वर्दळ असते.
नाक्याच्या डाव्या अंगाने जाणारा रस्ता राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या दिशेने जातो. हिंजवडी गाव ज्या टेकडीच्या एका अंगाला वसलंय, त्या टेकडीवर नाथपंथीय म्हातोबा ग्रामदेवतेचं छोटंसं देऊळ आहे. या टेकडीच्या माथ्यावर उभं राहिल्यावर समोर आयटीची भव्य नगरी आणि खालच्या अंगाला टिकली एवढं हिंजवडी गाव नजरेच्या टप्प्यात येतं. या दोन भिन्न संस्कृती एकाच परिसरात, पण परस्परांपासून अंतर राखून आहेत. शहरीकरणाच्या अगदी जवळ येऊनही हिंजवडी गावच राहिलंय. शाळेच्या वेळेत अनवाणी पायाने जथ्थ्याने जाणारी मुलं, पंपावर पाणी उपसणाऱ्या गावातील महिला, बसथांब्यावर गठुडे, सामान घेऊन थांबलेले प्रवासी, शेव-गाठ्या, बत्तासे-रेवड्या, भात्कं विकणाऱ्या गाड्या, हिंजवडीपासून काही अंतरावर असणाऱ्या श्री तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने लादलेल्या बैलगाड्या असं टिपिकल ग्रामीण ठशाचं दृश्य दिसतं. हिंजवडी नाक्यावर दिवसभर वाहनांची गजबज असते. प्रवासी गाड्या आणि इनोव्हा, होंडा, स्कॉर्पियो, मर्सिडिझ बेन्झ वगैरे पॉश खाजगी गाड्या रस्त्यावरच्या गायी-म्हशींना टाळून नाक्याच्या डाव्या हाताने जाणाऱ्या राजीव गांधी इन्ङ्गोटेक पार्कच्या दिशेने वळतात. इथून अत्यंत वेगळ्या संस्कृतीत आपण प्रवेश करतो.
राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसराचं प्रथम दर्शन आपल्याला सुखावून टाकतं. स्वच्छ सुंदर, रुंद प्रशस्त रस्ते, सिमेंट टाईल्सचे फुटपाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली झाडी, स्ट्रीट लाईट्स्, अतिशय कल्पकतेने सुशोभीत केलेले-सजवलेले स्क्वेअर आयलंडस् आणि आधुनिक वास्तुसौंदऱ्याचे सगळे पैलू दाखवणाऱ्या महाकाय तसंच शेकडो एकरात पसरलेल्या आयटी, बीपीओ कंपन्यांच्या इमारती. हे आहे हिंजवडीच्या आयटी पार्कचं दर्शन. एकूण ३३० हेक्टर जमिनीवर राजीव गांधी इन्फोटेक पार्क उभं राहतंय. ‘उभं राहतंय’ असं म्हणण्याचं कारण इन्फोटेक पार्कच्या फेज वन आणि फेज टूच्या मूलभूत सुविधांची कामं केव्हाच पूर्ण झाली असून या सुविधांचा लाभ ज्या आयटी कंपन्या घेणार आहेत त्यांच्या इमारतींच्या सांगाड्यांना आकार देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. इन्फोसिस, विप्रो, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर सोल्युशन्स, टाटा टेक्नॉलॉजीस्, कॉग्नीझन्ट टेक्नॉलॉजीस्, व्हेरिटाज्, कन्सल्टिंग इंजिनिअर्स, पर्सिस्टंट सिस्टिम्स, सिम्बॉयसिस् सेंन्टर फॉर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, ऍझटेक सॉफ्टवेअर... वगैरे आयटी क्षेत्रातल्या बिग शॉटस्नी आपला तळ उभारुन काम सुरूही केलंय. आजमितीस या आयटी पार्कमध्ये तीसपेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. शंभराहून अधिक कंपन्यांनी इथे शेकडो एकरांचे प्लॉटस् ताब्यात घेतले असून तिथे बांधकाम सुरू केलं आहे. त्यालाही आता दोन वर्षांहून अधिक काळ झालाय.
महाराष्ट्र सरकारने लाल गालिचे पसरून आमंत्रण दिल्यावर राजीव गांधी आयटी पार्कमध्ये प्रथम आगमन झालं ते इन्फोसिसचं. साहजिकच इन्फोसिसचा कॅम्पस हा आयटी पार्कच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आयटी पार्कचा मुख्य चौक इन्फोसिसनेच सजवलाय. यालाच इन्फोसिस स्क्वेअर अथवा टाईमपास स्क्वेअर म्हणतात. खरोखरच इथे उभं राहिलं की वेळ कसा जातो ते कळतही नाही. आयटी पार्कचा हा मुख्य बस थांबा आहे.
या चौकात हिंजवडीकडे पाठ करुन उभं राहिलं की, उजव्या हाताला इन्फोसिस, डाव्या हाताला टाटा टेक्नॉलॉजिसचा कॅम्पस आणि उजव्या हाताला कोपऱ्यासमोर विप्रो टेक्नॉलॉजीसचा जवळपास ५० एकरावर पसरलेला परिसर आहे. एकेक कॅम्पस म्हणजे मोजून पारखून घ्यावा असा. उज्ज्वल भविष्य आणि अमाप संपत्तीचा जिथे संगम झालाय तो परिसर सर्वसाधारण थोडाच असणार? प्रत्येक कंपनीचं मुख्य प्रवेशद्वार अतिशय कल्पकतेने उभारलेलं दिसतं. यात टाटा, जॉमेट्रिक, युजीएस या कंपन्या खास करून आघाडीवर आहेत. अपवाद फक्त इन्फोसिसचा. इन्फोसिसने साधेपणाला आणि सोयींना अधिक महत्त्व दिलंय. अर्थात या नॉलेज सिटीत काम करणाऱ्यांना कामाचा आनंद मिळावा यासाठी प्रत्येक कंपनीने सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. कॅफेटेरिया, फूडकोर्ट, रेस्टरुम्स, स्विमिंग पूल, स्पेशल स्मोकिंग झोन, ऍम्फी थिएटर, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, क्लब्ज असं खूप काही. कम्फर्ट हा शब्द फिका पडावा एव्हढ्या सुविधा प्रत्येक कॅम्पसमध्ये आहेत. अपेक्षा एकच... तणावमुक्त, प्रदुषणमुक्त वातावरणात आनंदाने भरपूर काम करा आणि भरपूर पैका कमवा. कामाचा मुबलक मोबदला देण्यासाठी आयटी क्षेत्र जगात आघाडीवर आहेच. महिन्याला किमान वीस हजारापासून ते दीड दोन लाखापर्यंत सॅलरी पॅकेज मिळत असेल, तर आयटीत भविष्य घडवू इच्छिणाऱ्या तरुणाईचे पाय हिंजवडीकडे वळणार, यात नवल नाही. आजघडीला हिंजवडी आयटी पार्कमध्ये किमान पंचवीस-तीस हजारांना रोजगार मिळालेला आहे. हा आकडा थेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांचा आहे. याशिवाय आयटी पार्कवर अवलंबून असणाऱ्या ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स, कन्स्ट्रक्शन या व्यवसायांमुळे जो रोजगार निर्माण झालाय तोही नोंद घ्यावा असाच आहे .
या परिसरातील प्रत्येक कॅम्पसचं दर्शन इतकं लुभावणारं आहे की आत जाऊन हा परिसर बघावा असा मोह होतोच. हिरवेगार लॉन्स आणि त्यावर उभ्या केलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या इमारती बघणाऱ्यांना अगदी खेचून घेतात. या परिसरात तुमचं काम नसेल तर आत प्रवेश मिळणं अवघडच आहे. कारण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाच आत जाता येत नाही. गेटजवळील सिक्युरिटी रूमला लागून प्रत्येक कंपनीने गेस्टरुम बनवलेली असून तिथे अभ्यागतांचं अगत्याने स्वागत होतं. कामाचं स्वरुप जाणून घेतल्यावर संबंधित व्यक्तीला निरोप जातो. ज्या काही गाठीभेटी होतात त्या इथेच. कंपनीच्यादृष्टीने ‘खास’ असलात तरच कंपनीच्या इमारतीत तुम्हाला प्रवेश मिळतो. प्रत्येक कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये अनेक इमारती दिसतात. इथे इन्फोसिसच्या तब्बल पंधरा इमारती आहेत. जॉमेट्रिक सॉफ्टवेअर सोल्युशन्सने तर आपल्या इमारतींना आग्रा फोर्ट आणि रेड फोर्ट अशीच नावं दिली आहेत. यापैकी रेड फोर्ट पाच मजली पिरॅमिडच्या आकाराचा आहे. शेकडो एकर जमीन या कंपन्यांनी व्यापलेली आहे आणि हा केवळ फेज वनचा नजारा आहे.
फेज वनमध्ये आयटी कंपन्यांची गजबज दिसते, तर फेज टू मध्ये आयटीसोबतच बीटी म्हणजे बायो टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग इन्डस्ट्रीज, इंजिनिअरिंग, रिसर्च लेबॉरेटरिज अशा अनेक आधुनिक उद्योगांची वर्दळ वाढणार आहे. तिथेही अशीच मोठाली बांधकामं उभारण्याचं काम सुरू आहे. याशिवाय फेज थ्री आणि फेज फोरसाठी अनुक्रमे ३५० हेक्टर आणि ४६१ हेक्टर जमीन विकसित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हिंजवडीच्या म्हातोबाच्या टेकडीवरुन या इमारतींचे सुळके आणि अवाढव्य आकाराच्या क्रेन्स दिसतात. प्रश्न असा पडतो की ज्या उद्योगात अवजड यंत्रसामुग्री नाही, जिथलं उत्पादन वजनात दाखवता येत नाही त्या उद्योगात एवढ्या अजस्त्र इमारतींची काय आवश्यकता? या प्रश्नाचं उत्तर हे आयटी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या मनुष्यबळात दडलेलं आहे. या संदर्भात एकट्या केपीआयटीचं उदाहरण पहा. केपीआयटीचा विस्तार वेगाने होतोय. अशावेळी मनुष्यबळात वाढ करणं ही त्यांच्यासाठी अपरिहार्य बाब आहे. केपीआयटी येत्या काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारांहून कितीतरी अधिक वाढवण्याच्या विचारात आहे. आयटी उद्योगात कर्मचाऱ्यांच्या संख्येला सीट्स असं म्हणतात. हिंजवडीच्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये आज पंचवीस हजार सीट्स असून नजिकच्या काळात ही संख्या दीड लाखांहून अधिक वाढणार आहे. जॉमेट्रिक सोल्युशन्स, विप्रो, इन्फोसिस, टाटा, कॉग्निझंट वगैरे सर्वच कंपन्यांनी सीट्सची संख्या तिपटीहून अधिक वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या कंपन्यांची जागेची मागणी वाढतच जाणार आहे.
ज्या ठिकाणी इतकं मनुष्यबळ एकवटतं, जिथे मोठं उद्योगविश्व आकाराला येतं त्या परिसरात इतर उद्योग व्यवसायही वाढीस लागतात. हिंजवडीच्या राजीव गांधी पार्कच्या परिसरात मुद्रा शेरेटन, तमन्ना हॉटेल आदी प्रथम दर्जाची हॉटेल्स, केक्स ऍण्ड बेक्स सारखं फुड आऊटलेट, आर्चिज गॅलरीज्, बुके सेंटर, एटीएम सेंटर, बँका वगैरे सुविधांचं जाळं वाढलंय. सोबतच होस्टेल्स, बिझिनेस मॅनेजमेन्ट स्कूल्स किंवा ट्रेनिंग सेंटर वगैरे या परिसरात विखुरलेले दिसतात. तमन्ना हॉटेलमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने ‘वाईन ऍण्ड डाईन’चा उत्सव कायम सुरू असतो. मूळ हिंजवडी गाव मराठी वळणाचं असलं तरी आयटी महानगरीत बहुभाषिकांचा गोतावळा जमा झालाय. यातील सगळ्यांनाच कंपनीच्या कॅफेटेरियातलं वा फुडकोर्टमधलं किंवा हॉटेलमधलं खाणं मानवतंच असं नाही. अशांची क्षुधाशांती करण्यासाठी एक ‘मल्टीकुझिन’ आकाराला येत आहे. सध्या हा वर्ग घरगुती जेवणाची भूक भागवण्यासाठी आंध्रमील किंवा आंध्र मेसचा आधार घेताना दिसतो.
या झाल्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांसाठीच्या सुविधा, पण इथल्या फाईव्ह स्टार आयटी उद्योगांसाठी फाईव्ह स्टार इन्राकोस्ट्रक्चरही उपलब्ध होत आहे. स्पेशल टेलिफोन एक्स्चेंज, डिजिटल इन्टरनेट लाईन्स, २२० केव्ही पॉवर स्टेशन, वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट, मुबलक आणि स्वस्त पाणीपुरवठा, याशिवाय आयटी आणि बीटी क्षेत्र मिळून सांडपाणी प्रक्रिया केंद्र, विविध प्रयोगशाळा (उदा. बायो इन्फर्मेटिक लॅब, केमेस्ट्री लॅब, प्री क्लिनिकल, क्लिनिकल अशा अनेक लॅब) निवासी संकुलं अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. एमआयडीसी आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपीआय) यांच्या अंदाजानुसार नजिकच्या भविष्यकाळात सहाशेहून अधिक आयटी, बीटी, बीपीओ, इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योग इथे तळ ठोकणार आहेत. थोडक्यात हिंजवडीचा आयटी पार्क मारुंजी, माण या गावांनाही आपल्या पंखाखाली घेणार आहे. काल परवापर्यंत नकाशावर शोधूनही सापडणार नाही अशा, टिचकीभर असलेल्या हिंजवडी गावात जगभरची आधुनिकता येऊन ठेपली आहे ती अशी!
आज म्हातोबाच्या टेकडीवरून पाहताना या गावाची दोन्ही रुपं आपल्याला दिसतात. मात्र आयटी पार्क झाल्याचा हिंजवडी या गावाच्या विकासासाठी काही उपयोग झालेला नाही, हे ही टेकडीवरून दिसतं. इथे दोन स्वतंत्र विश्व उभी आहेत. हे पाहूनच हिंजवडीच्या आसपासच्या गावांमध्ये आयटी पार्कच्या विस्तारीकरणाला विरोध होत आहे. माणचा संघर्ष हा त्याचाच एक भाग. मात्र पुणे-मुंबई पट्ट्यातील ही गावं अशा मोक्याच्या ठिकाणी वसलेली आहेत की त्यामुळे तिथल्या जमिनींना भलतीच मागणी तयार झाली आहे. आता हिंजवडीचंच बघा ना. हिंजवडी पुण्यापासून केवळ २० किमी अंतरावर आहे. इथून पुणे- मुंबई एक्सप्रेस वे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. याशिवाय मुबलक जमीन, वीज, पाणी, तज्ज्ञ मनुष्यबळ पुण्याच्या परिसरात सहजपणे उपलब्ध आहे. मागच्या पाच वर्षांत संगणक, जैवविज्ञान, व्यवस्थापनशास्त्र क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण देणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बऱ्याच संस्था पुण्यात सुरू झाल्या आहेत. हाच प्रशिक्षित वर्ग आयटी-बीटी उद्योगाला हवा असतो. तो सहजी उपलब्ध असल्याने आयटी कंपन्यांचं पुण्याकडे आणि पर्यायाने हिंजवडीकडे लक्ष वळणं स्वाभाविक आहे. शिवाय मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ साडेतीन तासाच्या अंतरावर असल्याचा फायदा हिंजवडीला मिळालाय. आयटी कंपन्यांनी पुण्याला अग्रक्रम देण्याचं आणखी एक कारण आहे. बंगलोरमध्ये या व्यवसायाच्या वाढीला आता फारसा वाव नाही. हा व्यवसाय आणि शहराची वाढ यादृष्टीने बंगलोर सॅच्युरेट झालंय. आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची सत्ता गेल्यानंतर सायबर सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या हैदराबादची चमक काहीशी कमी झालीय. चेन्नईने सुरुवात चांगली केली होती परंतु आक्रमकतेच्या अभावी चेन्नईला वेग टिकवता आलेला नाही. कोलकत्यालाही आयटीचं महत्त्वाचं जंक्शन बनायचंय, पण तिथे तज्ज्ञ-प्रशिक्षित कामगारांचा अभाव आहे, कामगार संघटनांचा त्रास आहे. त्यामुळे या सगळ्यांचा फायदा पुण्याला मिळालाय. १९९०मध्ये देशभरात आयटीची बूम वाढताना त्याचा अचूक फायदा बंगलोर-हैदराबादने उचलला. या बूमचा फायदा महाराष्ट्राने तेव्हा घेतला नव्हता. मात्र आयटी क्षेत्रामुळे होणारा फायदा लक्षात आल्यावर महाराष्ट्राने दहा वर्षांपूर्वी चुकलेली बस आक्रमक धोरण स्वीकारून निव्वळ पकडलीच नाही तर त्यावर ताबाही मिळवला.
महाराष्ट्र शासनाने आय.टी. उद्योगाला महाराष्ट्रात आमंत्रित करताना अनेक सोयी-सुविधा देऊ केल्या. उदाहरणार्थ, राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा कारभार बघणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांना स्टॅम्प ड्युटीवर पंचाहत्तर टक्के सूट, ऑक्ट्रॉय करात माफी व इतर काही सवलतींबरोबरच या कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या शेकडो एकर प्लॉटस्ना फ्री होल्ड प्रॉपर्टींचा दर्जा दिला आहे. म्हणजे पुढील काळात या प्लॉटस्च्या खरेदी-विक्रीसाठी कंपन्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणात कुठल्याही प्रकारची नियमावली आड येणार नाही. फक्त बांधकाम करताना त्याची माहिती तलाठी, तहसिलदार अथवा जिल्हाधिकारी यांना द्यावी लागेल आणि ग्रामपंचायतीचा बांधकाम कर भरावा लागेल, याशिवाय, या उद्योगांना आवश्यक अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एमआयडीसीने १९९०च्या सुमारास हिंजवडी-माण परिसरातली शेकडो हेक्टर मोकळी गायरान जमीन ताब्यात घेऊन हे औद्योगिक क्षेत्र घोषित केलं होतं. या परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन आरक्षणाखालीही आणली गेली होती. त्यामुळे अनायसेच या क्षेत्राची इन्फोटेक पार्कसाठी निवड झाली.
अर्थात १९९०मध्ये इथे एमआयडीसीने जमीन संपादित केली, तेव्हा इथं नेमकं काय उभं राहणार आहे, याची जाणीव हिंजवडीच्या ग्रामस्थांना नव्हती. यात आपला फायदा होणार आहे की तोटा याचीही त्यांना कल्पना नव्हती. गावकऱ्यांचा हमखास फायदा झाला असता अशा दोन योजनांबाबत मात्र शासनाने हिंजवडीला हुलकावणी दिली. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत हिंजवडीजवळ असलेल्या मुळा नदीच्या पात्रात धरण बांधायचं घाटत होतं, असं इथले वयस्कर गावकरी सांगतात. पुढे हे धरण मुळशी तालुक्यातील कासारसाईला गेलं. धरण तर गेलंच पण काहींची शेतीही गेली. कॅनॉलसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या जमिनीवर अद्यापपर्यंत कॅनॉल्स उभे राहिलेले नाहीत. १९८०च्या सुमारास मुळशी तालुक्यातील श्री तुकाराम सहकारी साखर कारखाना हिंजवडी इथे उभारण्याचा प्रस्ताव समोर आला होता, पण कुठेतरी माशी शिंकली आणि ही योजनाही हिंजवडीच्या हातून निसटली. अशा हुलकावणीचा हिंजवडीकरांना पूर्वापार अनुभव आहे. शेती हाच गावाचा परपंरागत व्यवसाय आहे. ऊस, भात, ज्वारी, कांदा, लसूण, भाजीपाला वगैरे उत्पादनासाठी मुळशी तालुका प्रसिद्ध आहेच. हिंजवडीही त्याला अपवाद नाही. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे शेती आधारित उद्योगही गावात चालतात. काहीजण बारमाही तर काहीजण आठमाही शेती करतात. शेती हाच गावाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा होता आणि आहे. फक्त काळानुरुप त्याला इतर व्यवसायांचीही जोड मिळत गेली. १९७० मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यावर १९७२ च्या दुष्काळाच्या सुमारास रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात रस्त्यांची कामं झाली. औंधला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्यावर गावातील तरुण औद्योगिक प्रशिक्षण घेऊन पिंपरी-चिंचवडच्या विविध उद्योग समूहांत आणि पद्मजी पेपर मीलमध्ये तसंच खडकीच्या ऍम्युनेशन फॅक्टरीत नोकरीला लागले. या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने हिंजवडीत पैशाची आवक जावक वाढली. गावाची परिस्थिती सुधारली. गावात स्थिरता आली. हिंजवडी हे मुळशी तालुक्याचं प्रवेशद्वार समजलं जात असल्याने हिंजवडीला बाजार गावाचा दर्जा आपोआपच लाभला. १९९० मध्ये एमआयडीसीने या परिसरातील जमीन संपादित केल्यानंतर या गावाला बदलाची चाहून लागली खरी, पण २००० साल उजाडेपर्यंत या गावात उद्योग-कारखाने पोहचलेच नव्हते, मात्र २००१नंतर राजीव गांधी इन्फोटेक पार्कची उभारणी सुरू झाल्यानंतर खाऊन-पिऊन सुखी असलेल्या या शांत गावात एकदम चहलपहल वाढली. वातावरण झपाट्याने बदलू लागलं. एक मोठं आणि अत्याधुनिक औद्योगिक जग एका छोट्या गावाच्या अवतीभवती पाय रोवू लागलं. या घडामोडीचा हिंजवडी गावावर काय परिणाम झाला?
हिंजवडी गावाची लोकसंख्या २००१च्या जनगणनेनुसार साडे पाच हजार आहे. इन्फोटेक पार्कची उभारणी सुरू झाल्यानंतर या लोकसंख्येत आता काही प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: परप्रांतियांची वर्दळ वाढू लागली आहे. कंत्राटी कामगार, चहा-पान, बिडी-सिगारेट, वडा-पाव, स्टेशनरी, झेरॉक्स वगैरे छोट्या-छोट्या व्यवसायांमध्ये परप्रांतियांनी जम बसवलेला दिसतो. यात राजस्थानातून आलेला वर्ग आघाडीवर आहे. थोडक्यात, अशा छोट्या-छोट्या व्यवसायांमध्ये स्थानिक गावकरी फारसे दिसत नाहीत.
इथल्या इन्फोटेक पार्कला वेग आल्यानंतर, या परिसरातल्या शेतकऱ्यांकडे शेतजमिनीच्या विक्रीबाबत चौकशी होऊ लागली. याआधी एमआयडीसीने केलेल्या आरक्षणात दहा-पंधरा टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्याचे फायदे-तोटे इथल्या शेतकऱ्यांच्या समोर होते. अर्थात फायद्यापेक्षा तोटेच जास्त होते. एक तर जमीन गेली, कायम उत्पन्नाचं साधन गेलं. दुसरं म्हणजे, या जमिनीच्या मोबदल्यात जी भरपाई मिळाली तिला अनेक वाटा फुटल्या. शेतकऱ्यांच्या हातात फारसं काही राहिलं नाही. या पार्श्वभूमीवर आता या परिसरातले शेतकरी सावध झाले आहेत. गेल्या वर्षी माण परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाच्या विरोधात तीव‘ आंदोलन केलं होतं. माण बचाव कृती समितीचे संतोष पारिख सांगतात, शेतकऱ्याचं अवघं घर शेतीवर अवलंबून असतं. सात बाराच्या उताऱ्यावर घरातल्या सर्व सदस्यांची नावं असतात. एमआयडीसीच्या आरक्षणात ज्यांची जमीन गेली, त्यांना एकरी किमान आठ लाख रुपये मिळाले खरे पण या पैशाच्या इतक्या वाटण्या झाल्या की ते पैसे कोणाच्या पासंगाला पुरले नाहीत. अनेकांच्या घरात वाटण्यांवरून भांडणं झाली. त्यामुळे शेती हे उपजीविकेचं हक्काचं साधन शेतकऱ्यांनी का गमवावं?
अर्थात, इन्फोटेक पार्कमुळे इथल्या जमिनींचे भाव वधारलेत, आणि या संधीचा फायदा घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना चढ्या भावाने विकल्या आहेत. त्यांना एकरी बारा ते पंधरा लाख रुपये भाव मिळाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. यातल्या काही शेतकऱ्यांनी दौंड-इंदापूर भागात थोड्या कमी भावात जमिनी खरेदी करून आपली पारंपरिक शेती पुढे चालू ठेवली आहे. हिंजवडीच्या चारही बाजूंना आज काही प्रमाणात शेती दिसत असली, तरी त्यापेक्षा विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या मोठ्या मोठ्या प्लॉटसची संख्या कितीतरी जास्त आहे. असं सगळं असलं तरी या सगळ्या घडामोडीचा मोठा लाभ बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या खिशातच जात आहे.
हे बांधकाम व्यावसायिक इथल्या जमिनी तीस ते पन्नास लाख रुपये भावाने विकत आहेत. तशा जाहिराती त्यांच्या वेबसाईटवर दिसतात. पुण्या-मुंबईसह देशातील नामवंत बिल्डर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांनी हिंजवडीवर जणू आक्रमणच केलं आहे. लक्झुरियस फ्लॅटस्, लॅण्डस्केप गार्डन्स अशा आलिशान-फाइव्ह स्टार स्कीम्स इथे उभ्या राहात आहेत. एक किंवा दोन बेडरुम्सच्या फ्लॅटस्ना इथे थाराच नाही. ‘इफ यू आर वर्किंग ऍट आयटी, यू शुडन्ट बी लिव्हिंग एनिव्हेअर एल्स’ हिंजवडीत अशा प्रकारची होर्डिंग्ज लक्ष वेधून घेतात. किमान तीन हजार रुपये स्क्वेअर फूट हा इथल्या बांधकामाचा रेट आहे. एक फ्लॅट म्हणजे एक युनिट, हे एक युनिट किमान तीस लाखाच्या पुढेच आहे. (हा आकडा वेगाने वाढतो आहे.) ही किंमत परवडू शकेल, असा उच्च उत्पन्न गटातील वर्गच इथे स्थायिक होत आहे. हिंजवडी परिसरातील बांधकामाच्या या बूमचा लाभ काही प्रमाणात स्थानिक लोकही घेत आहेत, हे खरं आहे. उदाहरणार्थ, काही स्थानिक लोक बांधकाम व्यवसायात उतरले आहेत. बांधकामासाठी आवश्यक मटेरिअल पुरवण्याच्या व्यवसायात काहीजण आहेत. बांधकामांसाठी वीट, वाळू, डबर पुरवणं असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. यातून या मंडळींना पैसाही मिळत आहे. त्याच्या खुणा गावात दिसतात. हिंजवडीतल्या जुन्या बैठ्या घरांच्या ठिकाणी आर.सी.सी. बांधकामं झालेली दिसतात. आय.टी., बीपीओ कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना घरं भाड्याने देण्याचं प्रमाणही वाढलंय. ‘केवळ आयटी, बीपीओ कंपनीत नोकरी करणाऱ्यांनीच घरांबद्दल चौकशी करावी,’ अशा पाट्या घरासमोर लटकवलेल्या दिसतात. तथापि याला बदलत्या हिंजवडीची एक बाजू असं म्हणता येईल, दुसऱ्या बाजूने पाहिलं, तर हिंजवडी अद्याप कोरडंच राहिलेलं दिसतं.
आयटी पार्कमधल्या उद्योगांवर सरकारकडून सवलतींचा वर्षाव होत आहे. पायाभूत सुविधा उभ्या राहात आहेत. गॅसची स्पेशल पाईपलाईन आणण्याचं घाटतंय, एमआयडीसीच्या परिसरात २२० केव्हीचं पॉवर स्टेशन उभं राहिलंय, पण हिंजवडी गाव मात्र लोडशेडिंगच्या चक्रव्यूहात अडकलेलं आहे. गावात आठ-आठ तास वीज नसते. शेतीचे पंप बहुतेक वेळा बंदच असतात. एमआयडीसीने गावाला मुबलक पाणी पुरवण्याची हमी दिली होती पण अद्याप हे आश्वासन कागदावरचं आहे. एमआयडीसीने गावाजवळच्या जमिनीवर आरक्षण करताना गावाचा विचार केला नाही. गावातील तरुणांसाठी उद्योग-व्यवसायाकरता स्पशेल झोन निर्माण केला नाही, की त्यांना आयटी उद्योगविश्वात सामावूनही घेतलं नाही. ज्या कोणाला इथे नोकऱ्या मिळाल्या त्या अगदी किरकोळ स्वरुपाच्या आहेत. कोणी वॉचमन तर कोणी गार्डनर. हिंजवडीतल्या आयटी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या पुण्यात अनेक संस्था आहेत. यापैकी कुठल्याही संस्थेने गावात कॉलेज सुरू करण्यात पुढाकार घेतलेला नाही. नाही म्हणायला ग्रामपंचायतीकडे बांधकाम कराचा ओघ सुरू झाला आहे, पण येणाऱ्या पैशाचे दृष्य परिणाम गावाच्या विकासावर तरी झालेले दिसत नाहीत. नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी हिंजवडीकरांना अजून तरी पुण्याकडेच धाव घ्यावी लागतेय. राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष हिंजवडीकडे नाही तर हिंजवडीतून होणाऱ्या फायद्याकडे आहे. ‘चारों तरफ दिवाली मेरे घर में अंधेरा’ अशी हिंजवडीची अवस्था दिसते.
हिंजवडी हे गाव पुणे शहराच्या कुशीत आहे. किंबहुना, हिंजवडीमध्ये आयटीपार्क उभं करण्याची योजना पुण्याला केंद्रस्थानी ठेवूनच करण्यात आलीय. गेल्या पंधरा-वीस वर्षांत आयटी आणि इतर क्षेत्रातील उद्योग पुणे आणि भोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलतोय, संस्कृती बदलतेय. ज्ञानाधारित उद्योगांच्या पुण्यातील वाढत्या पसाऱ्यामुळे नजिकच्या काळात वर्षाला दोन लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. हे अर्थातच उच्चशिक्षितांसाठी, कुशल-अतिकुशल लोकांसाठी असतील. इन्फोसिस, विप्रो, हेवलेट पॅकर्ड, कॉग्निझंट, पर्सिस्टन्ट, टाटा टेक्नॉलॉजिस अशा नावाजलेल्या कंपन्या आताच पुण्याच्या दारात उभ्या राहिल्या आहेत. पुणे हा आयटी क्षेत्रातला जागतिक दर्जाचा ब्रॅन्ड बनू पाहतोय. तसा तो बनणार हे नक्की आहे. आज ना उद्या पुणे नावाच्या महानगरात हिंजवडी हे गाव सामावून जाईल. नव्या वास्तू, नव्या माणसांनी गजबजून जाईल. या गजबजाटात जुनं हिंजवडीही कुठेतरी असेल. उद्याचं कोणी सांगावं, पण आज तरी हिंजवडीमध्ये आयटी आहे, पण या आयटीत हिंजवडी नाही!

माहिती संकलन - मुकुंद ठोंबरे

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content