ई-संमेलनामागची भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पाच वर्षांपूर्वी ई-संमेलनाची सुरुवात केली, तेव्हा या संमेलनाचं स्वरूप कसं असावं, याचा आखीव आराखडा तयार नव्हता. हे संमेलन थेट वाचकांशी जोडलेलं असावं, साहित्य संमेलनांमध्ये सहसा चर्चिल्या न जाणाऱ्या विषयांवर लिहिलं-बोललं जावं, साहित्यातल्या दुर्लक्षित अंगांचा विचार व्हावा, आपल्या साहित्यातलं भलंबुरं ओळखून एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारं चर्चा-विचारांचं संमेलन भरवावं, अशी ही कल्पना होती. मजकूर आणि ऑडिओ-व्हिज्युअल्सच्या स्वरूपात केवळ वेबसाइटवर हे संमेलन भरवावं, असं चर्चेअंती ठरलं. ही कल्पना नवी आणि प्रयोगशील असूनही ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं. आपल्या खणखणीत विचारांमधून संमेलनाचा हेतू पुढे नेण्याचं मोलाचं काम केलं. त्यापुढच्या संमेलनांमध्येही कवीवर्य ग्रेस, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारून आपलं साहित्यविषयक ठोस म्हणणं वाचकांसमोर मांडलं. त्याशिवाय या ई-संमेलनांत साहित्यातली इतरही अनेक कर्तीधर्ती मंडळी लिहिती झाली. आणि प्रत्येक वर्षागणिक या संमेलनाला स्वतःचं असं रूप मिळत गेलं.
आजवरच्या ई-संमेलनांनी वेगवेगळे विषय हाताळले आहेत. साहित्य विश्व म्हणजे केवळ लेखक अन् कवी ही संकुचित व्याख्या दूर सारून प्रकाशक, चित्रकार, पुस्तक विक्रेते, ग्रंथप्रदर्शनांचे आयोजक, अशा साहित्यातल्या अविभाज्य, पण पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अनेक घटकांना या संमेलनाने सामावून घेतलं आहे. त्यांचं काम, त्यांचं म्हणणं आणि त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे संमेलन इटंरनेट माध्यमातलं असल्यामुळे या माध्यमातला साहित्य व्यवहार समजून घेण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. अजूनही सुरू आहे. मराठी ई-साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उपक्रमांची ओळख करून देणं, दरवर्षी निवडक ब्लॉग्ज वाचकांसमोर आणणं असं काम हे ई-संमेलन नेमाने करतं आहे.
या ई-संमेलनाने उचललेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे मराठी साहित्यिकांचं ई-डॉक्युमेंटेशन. इंटरनेटच्या महाजाळात मराठीचं अस्तित्व फारसं नाही. मराठीतल्या अनेक दिग्गज लेखकांच्या नावाने गुगलवर सर्च दिला तर काहीच माहिती हाती लागत नाही, अशी लाजिरवाणी परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मराठीतल्या ज्येष्ठ दिवंगत साहित्यिकांचं कार्यकर्तृत्त्व उलगडून दाखवणाऱ्या नोंदी या संमेलनाच्या माध्यमातून इंटरनेटवर प्रकाशित करतो आहोत. यंदाही १० लेखक-पत्रकारांच्या सविस्तर चरित्रनोंदी या संमेलनात समाविष्ट केल्या आहेत. या नोंदी मराठीसोबतच इंग्रजीतही उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सर्व उपक्रमांना जगभरातल्या मराठी वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी तर अनेक परदेशी मराठी वाचकांनी साहित्य संमेलन आणि ई-संमेलन याबद्दलचं त्यांचं म्हणणं आणि सूचनाही आमच्याकडे नोंदवल्या आहेत. त्यांचा एक विशेष विभाग यंदाच्या संमेलनात वाचायला मिळेल.
यंदा संमेलनाचे अध्यक्ष अनिल अवचट असल्याने वास्तववादी साहित्याचा धांडोळा घेण्यावर आम्ही भर दिला आहे. अनिल अवचट यांची युनिक फीचर्समधील पत्रकारांनी घेतलेली मुलाखत, त्यांच्या पत्रकारितेबद्दलचं-पुस्तकांबद्दलचं त्यांचं स्वतःचं ऑडिओ-व्हिज्युअल म्हणणं संमेलनाच्या पानांवर ऐकता-पाहता येईल. रिपोर्ताज प्रकारचं लिखाण करून समाजातलं वास्तव साहित्यात आणणारी अवचटांसारखी काही मोजकी मंडळी मराठी साहित्य विश्वात आहेत. निळू दामले आणि राजा शिरगुप्पे ही त्यातली दोन प्रमुख नावं. या दोन्ही लेखकांच्या लिखाणाबद्दल या संमेलनात वाचायला मिळेल. इतरही काही पत्रकार अशा स्वरूपाचं काम करताहेत. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पुस्तकांबद्दल या संमेलनात लिहिलं जावं, अशी आमची इच्छा आहे. वाचकांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आमचं आवाहन आहे.
महाराष्ट्राबाहेर, राष्ट्रीय स्तरावरचे इंग्रजी पत्रकार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं वास्तववादी लिखाण करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. त्यातल्या काही निवडक पुस्तकांबद्दलची माहिती या ई-संमेलनात दिली आहे. अर्थात, ती पुस्तकं फक्त उदाहरणादाखल घेतली आहेत. आपल्याला अनुभवसमृद्ध करणारी अशी अजूनही अनेक पुस्तकं असतील. त्याबद्दल वाचकांनी त्यांचं म्हणणं लिहून पाठवलं तर ते या संमेलनात जरुर समाविष्ट करता येईल. समांतर पत्रकारिता करणाऱ्या काही महत्त्वाच्या वेबसाइट्सच्या लिंक्सही आम्ही या संमेलनात दिल्या आहेत. वर्तमानपत्रं आणि न्यूज चॅनन्समधून हाताळले न जाणारे विषय या वेबसाइट्सवरून वाचकांना सामोरे येतील, अशी खात्री आहे. याशिवाय ई-माध्यमात भरपूर आणि सकस लिखाण करणाऱ्या निवडक ई-लेखकांचे ब्लॉग्जही या संमेलनात समाविष्ट करून घेतला आहेत.
समाजातले ताणेबाणे समजून घेण्यासाठी शोधाशोध करणं हे युनिक फीचर्सच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य. युनिकने आजवर केलेले विविध शोधलेख आणि रिपोर्ताजही या संमेलनासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
असं बरंच काही या संमेलनाच्या निमित्ताने वाचकांसमोर ठेवत आहोत. मुख्य म्हणजे यापुढे हे संमेलन वर्षभर सुरू राहील आणि अनेक नव्या कल्पना वर्षभरात या संमेलनामध्ये प्रत्यक्षात येतील, असा विश्वास वाटतो. हे संमेलन केवळ युनिक फीचर्स या संस्थेचं न राहता ते वाचकांचं व्हावं, वाचकांनी त्यासाठी सूचना कराव्यात, संमेलनात लिहावं, असंही आमचं मनापासून आवाहन आहे.

या संमेलनाची वेबपानं तयार करणाऱ्या `स्प्लेंडरनेट टेक्नॉलॉजी`मधील प्रताप श्रोत्रीय, आशिष अंमळनेरकर, शिवाजी शिंदे आणि शिव गायकवाड यांचे, तसंच अनिल अवचट यांच्या व्हिडिओंचं एडिटिंग करून देणाऱ्या मुक्तल मावळ यांचे आभार. या संमेलनाचे वेबकास्टिंग पार्टनर `महाराष्ट्र ज्ञान महामंडळा`चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत.
साहित्यिकांच्या दस्तावेजाचं लिखाण करणारे मनोहर सोनवणे आणि सीमा भानू यांचे, तसंच या दस्तावेजांचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्रा. व्यंकटेश उपाध्ये यांचेही आभार.

आपले,
आनंद अवधानी
सुहास कुलकर्णी
गौरी कानेटकर
चिराग देशपांडे
हे संमेलन उभं करण्यात आमच्या या सर्व सहका-यांचाही मोलाचा वाटा आहे...
महेंद्र मुंजाळ, प्रीति छत्रे, संपत मोरे, मेघा चवले, मंगला घरडे, अशोक देव, अपूर्वा कदम, अजय कसबे.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content