आपल्याला दिसलं ते इतरांना सांगण्याच्या उर्मीतून लिखाण

‘युनिक फीचर्स’ने पत्रकारिता सुरू केली ती अवचटांच्या रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचं आहे याची खुणगाठ बांधून. यंदाचं वर्ष हे ‘युनिक फीचर्स’चं २५ वं वर्ष. त्या निमित्ताने अनिल अवचट यांच्या या सामाजिक साहित्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना यंदाच्या मराठी ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची विनंती आम्ही केली. त्यानिमित्त ‘युनिक फीचर्स’मधील संपादकीय सहकाऱ्यांनी अनिल अवचट यांच्याशी मारलेल्या गप्पा.

समाजाच्या विविध थरांतल्या विविध मानवसमूहांचं जगणं, त्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आपल्या लिखाणातून मांडून पांढरपेशा-मध्यमवर्गी वाचकांना सांस्कृतिक धक्का देण्याचं, त्यांचा परीघ विस्तारण्याचं काम अनिल अवचट यांनी केलं. सुरुवातीला विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांची पुढे पुस्तकं झाली. पूर्णिया, माणसं, कोंडमारा, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, संभ्रम, धार्मिक अशी अवचटांची पुस्तकं म्हणजे समाजाभिमुख पत्रकारितेचा वस्तुपाठ आहेत.
अनिल अवचटांचं सामाजिक विषयावरचं पुस्तक उघडून वाचायला लागलं की आजही एका क्षणात आपण त्या विषयाकडे खेचले जातो. त्यांच्यातला पत्रकार-अभ्यासक प्रत्येक विषयाचे ताणेबाणे समजून घेतो आणि त्यांच्यातला लेखक ती सगळी गुंतागुंत आपल्याला एखाद्या डॉक्युमेंट्रीप्रमाणे उलगडून दाखवतो. आपणही लेखासाठी फिरणाऱ्या अवचटांसोबत आहोत, असं वाटायला लावणारा हा अनुभव. थेट लोकांच्या जगण्याला भिडणारा. तो अनुभव घेताना प्रत्येक वेळी अवचटांच्या लिखाणाबद्दल नव्याने प्रश्न पडतात.

तुमची पुस्तकं उपेक्षितांचं आजवर दृष्टीआड असलेलं जगणं वाचकांसमोर आणतात. भटके-विमुक्त असतील, हमाल असतील, वेश्याव्यवसायात अडकलेल्या बायका असतील किंवा मच्छीमार असतील. आम्हाला वाटणारी उत्सुकता अशी, की तुम्हाला हे जग कसं दिसू लागलं?
लहानपणापासूनच माझी सधन मुलांबरोबर मैत्री नव्हती. मी गरीब मुलांमध्येच रमायचो. माझे एक गुरुजी दलित होते. त्यांच्याशी माझं छान जुळायचं. त्यामुळे मी त्यांच्या वस्तीतच असायचो. सुतारांसारख्या कसबी मंडळींभोवती घोटाळायचो. त्यांच्याकडून काही तरी शिकायचा प्रयत्न करायचो. खरं तर मी सधन कुटुंबातला होतो. वडील डॉक्टरच होते ना! पण माझं मन कधी शाळेतल्या अभ्यासात रमलं नाही. पाढे यायचे नाहीत. स्पेलिंगं पाठ व्हायची नाहीत. त्यामुळे मी कायम कुचंबलेला असायचो. त्या न्यूनगंडातूनच मी कदाचित सर्वसामान्य लोकांमध्ये जास्त मिसळू लागलो असेन. जे काही असेल ते, पण अगदी लहानपणापासून तसं होतं खरं.
पुढे कॉलेजसाठी पुण्याला आलो तेव्हाही शहरातल्या झोपडपट्ट्या पाहून चकित झाल्याचं मला आठवतं. आमच्या गावाला गरिबांची वस्ती होती, पण ती घरं मातीची असली तरी घरं असायची. त्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असायची. पण इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती. मी पहिली झोपडपट्टी पाहिली ती वडारवाडी. तेव्हा मी त्या भागात नुसता फिरायचो. लोकांना काहीबाही विचारायचो आणि ते विसरूनही जायचो. त्यांच्याबद्दल काही लिहिलं वगैरे नाही. त्यांचं जगणं जाणून घ्यावं, एवढीच प्रेरणा त्या वेळी होती. पुढे सामाजिक चळवळीत ओढला गेलो आणि वेगळं जग सामोरं आलं. त्या जगाने मला मोठेच धक्के दिले. त्यामुळे साहजिकच आपल्याला दिसलेलं हे जग इतरांनाही सांगावंसं वाटू लागलं.
दुसरं असं, की कुतूहल हा माझा एक स्ट्राँग पॉइंट आहे. रस्त्याकडेला एखादा म्हातारा बसलेला दिसला की माझ्या मनात प्रश्न घोंघावायला सुरुवात करतात... हा कुठून आला असेल, याच्या घरी कोण असेल, हा कुठे राहत असेल, रात्री थंडी वाजत नसेल का, असे नाना प्रश्न. बरं, प्रश्न पडतात ते पडतात, पण त्यांची उत्तरं शोधण्यासाठी त्या म्हाताऱ्याच्या शेजारी जाऊन त्याची विचारपूस करण्याची मला कधी लाजही वाटली नाही. आजही वाटत नाही. त्यामुळे कुतूहल शमवताना खूप काय काय नवं कळत जातं.

तुम्हाला हे आसपासचं जग तेव्हाही दिसत होतं. पण तुम्ही पहिल्यांदा लिहिलंत ते मात्र बिहारला जाऊन तिथल्या परिस्थितीबद्दल. ‘पूर्णिया’ या पुस्तकात. हे कसं काय? त्याआधी इथल्या विषयांवर लिहावं असं वाटलं नाही का?
तसं आधी थोडंफार लिहिलं होतं. पण ते कसं होतं... मी मेडिकलला असताना आम्ही मुलं बिहारच्या दुष्काळासाठी पैसे जमवत होतो. कोणी बूटपॉलिश करायचे, कोणी पूनम हॉटेलमध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवायचे, असं सुरू होतं. तेव्हा आम्हाला खूप चित्रविचित्र अनुभव आले होते. तेव्हा लोकमान्यनगरमध्ये माझ्याशेजारी ‘सकाळ’चे सहसंपादक मो. स. साठे राहायचे. त्यांना मी हा अनुभव सांगत होतो. ते म्हणाले, “हे लिहून दे मला.” मी त्यांना म्हटलं, “अहो, मी कुठे लेखक आहे? मी कसं लिहू?” तर ते म्हणाले, “आत्ता जे बोललास तेच लिहून दे.” तसाच घरी गेलो, लिहून काढलं आणि त्यांना दिलं. मला वाटलं, त्यांच्या एखाद्या लेखात संदर्भ म्हणून ते हा मजकूर वापरतील. पण दुसऱ्या दिवशी माझ्या नावानेच तो लेख छापून आला. तो बहुतेक माझा पहिला लेख. त्या लेखामुळे मला कळलं की लिहिणं म्हणजे काही फार अवघड गोष्ट नव्हे. आपण जे बोलतो तेच लिहायचं. मग ‘साधने’तही मी सुरुवातीला थोडंफार लिहिलं, पण लिखाण हा आपला प्रांत आहे असं काही तेव्हा जाणवलं नव्हतं.
मी बिहारला दोनदा गेलो. आधी बिहारमधला दुष्काळ समजून घ्यायला आणि नंतर एस. एम. जोशींसोबत गेलो तेव्हाही लिहायचं डोक्यात नव्हतं. फक्त बघणं आणि समजून घेणं होतं. बिहारच्या पहिल्या भेटीवेळी मी पुण्यातल्या मित्रांना पत्रं पाठवत होतो. ती बरीच सविस्तर असायची. मित्र सांगायचे, आम्ही त्या पत्रांचं जाहीर वाचन करतोय आणि आम्हाला ते खूप आवडतंय. तरीही मी ते अनुभव लिहिले नव्हते. मग नंतर एस. एम. जोशींसोबत भूमिमुक्ती आंदोलनासाठी बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यात गेलो. दारिद्य्र, भूकबळी, गुलामगिरी यांसारखे आधी फक्त वाचलेले शब्द दाहक आकार घेऊन माझ्यापुढे आले. त्याने मी हादरून गेलो. पुण्याला परतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी ते अनुभव लिहायला घेतले. ते ‘माणूस’मध्ये छापून आले. पुढे माजगावकरांनीच पुढाकार घेऊन त्याचं पुस्तक केलं. पुस्तकाचं नाव ‘पूर्णिया’ असलं तरी त्यात दोन्ही बिहारभेटींमधल्या अनुभवांची सरमिसळ आहे. हे असं मिश्रण करता येतं का, ते करणं साहित्याला चालतं का वगैरे असे प्रश्न मला त्या वेळी पडले नाहीत. जे वाटलं ते मी लिहीत गेलो.

पुढचे विषय कसे दिसत गेले? लिखाण हेच आपलं काम आहे हे कधी लक्षात येऊ लागलं?
मी मेडिकलला शिकत होतो. पण आपण काही डॉक्टरकी करू शकणार नाही, तो आपला प्रांत नाही, याची जाणीव शिक्षण पूर्ण होण्याआधीच झाली होती. आधी मी ‘युक्रांद’मध्ये (युवक क्रांती दल) सक्रिय होतो. नंतर त्यातून बाहेर पडत गेलो आणि बाबा आढावांच्या संपर्कात आलो. त्यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीत मी भाग घेतला. हमाल पंचायतीच्या कामातही माझा सहभाग असायचा. त्यामुळे समाजाबद्दलची समज तयार होत होती. वेगवेगळ्या स्तरांतल्या माणसांचं जगणं समोर येत होतं. महाराष्ट्रात कुठेही एखादी अत्याचाराची घटना घडली की तिकडे धाव घ्यायची, तिथे नेमकं काय घडलं हे समजून घ्यायचं, असं माझं सुरू होतं. ‘माणसं’मधला हमालांवरचा लेख, ‘कोंडमारा’मधला बावड्याचा बहिष्कार हा लेख त्यातूनच लिहून झाले. अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा माग मी काढत होतो. समाजातल्या व्यवस्थेत नाडलेल्यांबद्दल मी लिहीत होतो. हमालांवरचा लेख लिहिला, तो ‘मौजे’त जसाच्या तसा छापून आला. लोकांना तर तो आवडलाच. पुढे अशिक्षित हमालांसाठी आम्ही त्याचं वाचन केलं, तेव्हा हमाल म्हणाले, “माझ्या शेजारच्या डेपोमध्ये हा मिरची कामगार काम करतो, पण त्याचं जगणं इतकं हालाखीचं आहे हे मला माहितीच नव्हतं. आम्हाला आमचेच प्रश्न मोठे वाटत होते.” म्हणजे या लेखाने फक्त मध्यमवर्गालाच सेन्सिटाइझ केलं असं नव्हे, तर त्याच समाजातल्या सर्व थरांनाही एकमेकांची माहिती कळली.
मग पुढे हे लिखाणाचं सत्र सुरूच राहिलं. लिहिणं आपल्याला आवडतंय आणि ते जमतंय हे जाणवायला लागलं. मुख्य म्हणजे जे जग आजवर माहितीच नव्हतं ते या लिखाणाच्या निमित्ताने मला दिसत होतं. माझ्यासारखंच समाजातल्या एका मोठ्या वर्गाला ते माहिती नसणार याची खात्री होती. त्यामुळे त्याचं चित्रण करणं हेही एक महत्त्वाचं काम आहे, असं माझ्या लक्षात येत गेलं.

‘माणसं’, ‘कोंडमारा’, ‘धागे आडवे उभे’ या पुस्तकांमधले लेख त्या त्या घटनेमागची किंवा मानवसमूहांच्या जगण्यातली गुंतागुंत उलगडून दाखवतात. तुम्ही त्या समाजाचा भाग नव्हतात, तरीही ती गुंतागुंत तुम्हाला कशी काय लक्षात आली?
माझं पुणे विद्यापीठात जाणं-येणं असायचं. तिथे गेलो की तिथल्या मित्रांमुळे समाजशास्त्रात तसंच इतर शाखांमध्ये नवं काय चाललंय ते मी समजून घ्यायचो. तेव्हा विद्यापीठीय लिखाणात व्हिलेज स्टडी नावाची एक लाट आली होती. म्हणजे एक गाव घेऊन त्याची सगळी माहिती घ्यायची, सर्व बाजूंनी अभ्यास करायचा. तिथल्या जाती, तिथले व्यवसाय, त्यांच्यातले व्यवहार असं सगळं. मला आठवतं, हिंदीतले प्रसिद्ध लेखक राही मासूम रझा यांचं ‘आधाँ गाव’ हे पुस्तकही त्याच प्रकारातलं होतं. तेही मी वाचलं होतं. त्या सगळ्याचा माझ्या मनावर नकळत परिणाम झाला असावा. त्या वेळी राम बापट, भास्कर भोळे आणि इतर अनेक लोकांशी मी या विषयावर बोलायचो. समाजातले ताणतणाव, जातिव्यवस्था, त्यातून तयार झालेली गुंतागुत हे सगळं या लोकांनी मला समजावून सांगितलं. त्यातून घटनांकडे बघण्याची माझी दृष्टी विस्तारत गेली. एखादी घटना घडली तर पत्रकाराप्रमाणे ती कशी घडली, घटनाक्रम काय होता, कोण काय म्हणालं हे जाणून घेण्यापेक्षा त्या घटनेपर्यंत परिस्थिती कशी आली हे समजून घेणं हे आपलं काम आहे हे लक्षात आलं. अनेकदा अनेक छोट्या छोट्या घटना घडलेल्या असत. त्या इतरांच्या दृष्टीने अदृश्यच असायच्या, पण त्यांचा एकत्रित परिणाम-उद्रेक म्हणूनच मोठी घटना समोर आलेली असायची. ते समजून घेत गेल्यामुळे माझ्या लिखाणाला पत्रकारितेबरोबरच हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनही मिळाला. अर्थात हे सगळं तेव्हा कळत नव्हतं. मागे वळून बघताना समाजशास्त्रीय संस्काराचा मुद्दा मला आता लक्षात येतो आहे.

तुमचे लेख वंचितांची बाजू सांगणारे, त्यांच्यावरच्या शोषणाची-अत्याचाराची पाळंमुळं खणून काढणारे. दलित अत्याचाराच्या घटना असतील किंवा हमाल-निपाणी बिडी कामगारांसारखे लेख, तुम्ही त्या त्या ठिकाणच्या आरोपींच्या, शोषणकर्त्यांच्या नावांसह लेख छापलेत. कुठे नाव बदलणं नाही की नाव टाळून आरोप करणं नाही. हे धाडस कुठून आलं?
खरं सांगू का, तसा मी स्वभावाने भित्रा-बुजरा, पण या बाबतीत मात्र मला भीती वाटली नाही हे खरं बुवा. हे असे लेख सुरू झाले तेव्हा मला काहीजण म्हणायचे, की ‘तू हे असं उघड लिहू नको. लिहिलंस तर कुठे तरी लपून बस.’ पण मी तसं कधी केलं नाही. माझे सगळे मित्र वेगवेगळ्या सामाजिक कामांत होते, आंदोलनं करत होते. तसं मी काही करू शकत नव्हतो. लिहिणं हेच माझं सामाजिक काम होतं. मग त्यात आपण पूर्ण निर्भय असायला हवं असं मला वाटायचं. फार फार तर काय होईल? मेलो तर प्रश्नच नाही. पण मारहाण होईल, हात फ्रॅक्चर होईल. किती वेळ लागतो हाड भरून यायला? एक महिना- दीड महिना- जास्तीत जास्त सहा महिने. असं किती वेळा होईल? फार फार तर पाच-सहा वेळा. मग झालंच तसं तर आयुष्यातली तीन-पाच वर्षं त्याला दिली असं मानायचं. असा साधा-सरळ हिशोब होता माझा. त्यामुळे मी निर्धास्तपणे लिहू शकायचो.
हां, पण मी कधीही आक्रमकपणे लिहिलं नाही की कुणाबद्दल अपशब्द वापरले नाहीत. जे घडलं ते लिहिलं. त्यामुळे मनात भीती आलीच नाही. मी बुवाबाजी-अंधश्रद्धा वगैरेंबद्दलही लिहिलं. त्या बाबा-माता मंडळींचे शिष्य चिडण्याची शक्यता होती; पण तसं काही झालं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या वेळी महाराष्ट्रात चळवळींचं वातावरण होतं. नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, बाबा आढाव यांच्यासारख्या नेत्यांचा दबदबा होता. अशी मंडळी, त्यांचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी होते. मी एकटा नाही असं मला वाटायचं. पण आज तसं वातावरण नाही. लोक फार लवकर चिडतात. जात-धर्म-पंथ... नाना गोष्टींवरून लोक हळवे झालेत. त्यामुळे आज कदाचित तसं लिहिता नाही येऊ शकणार.

लिखाणाची तुमची अशी स्वतःची शैली आहे. रिपोर्ताज प्रकारचं हे लिखाण तुम्ही पहिल्यांदा मराठीत आणलंत. ती शैली तुम्हाला कशी सापडली?
हे रिपोर्ताज वगैरे प्रकरण काय ते मला माहिती नाही. तो फ्रेंच शब्द आहे असं म्हणतात, पण ते मूळ रिपोर्ताज प्रकारचं लिखाणही मी वाचलेलं नाही. त्यामुळे माझं लिखाण कोणत्या प्रकारात मोडतं याची मला कल्पना नाही. त्याने मला काही फरकही पडत नाही. खरं तर मी मूळचा लेखक नव्हेच. शिक्षणाने डॉक्टर. कलांमध्ये रस असणारा आणि चळवळ्या. पण आपल्याला जे दिसलं ते इतरांना सांगायला हवं, या मानवी ऊर्मीतून मी लिहू लागलो. मी कधीच कोणत्याही साहित्यिक वर्तुळाचा भाग नव्हतो. चार-पाच पुस्तकं आल्यावर माझ्या इतर लेखकांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. त्याआधी मी फारसं कुणाचं वाचलं नव्हतं आणि नंतरही फारसं वाचलं नाही. लहानपण खेड्यात, ओतुरला गेलेलं. त्यामुळे तिथे फार काही चांगली लायब्ररी नव्हती. त्यामुळे मराठी साहित्यातलं सगळं वाचून काढण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता. पण त्यामुळेच माझ्या लिखाणावर कुणाचाच प्रभाव पडला नाही. किंवा लिखाण म्हणजे हे असंच असायला हवं, अशी बंधनंही मी स्वतःवर लादून घेतली नाहीत. त्यामुळे मी माझा माझा लिहीत गेलो. अगदी लहानपणापासूनच मी मनस्वी होतो. म्हणजे काय, तर जे स्वतःला पटेल-रुचेल तेच करायचं. बाकीच्या भानगडीत पडायचं नाही.

आणि तुमच्या ओघवत्या- डॉक्युमेंट्रीसारख्या भाषेबद्दल काय सांगाल?
मी पडलो खेड्यातला साधा माणूस. खेड्यात जाडजूड, ग्रांथिक कोणी बोलत नाही. लोक साध्या भाषेत बोलतात. ती भाषा फंक्शनल असते. तिला दृश्यमानता असते. तीच माझी भाषा होती. त्यामुळे साधं, सरळ आणि जसं दिसलं तसं मी मांडत गेलो. मी जे काही वाचलं होतं त्यावरून मी काही शब्द बाद केले होते. मला ती अलंकारिक, बोजड, गुळगुळीत वाक्यं अजिबात आवडायची नाहीत. स्टॉकमधले शब्द-वाक्यं वापरायची नाहीत असं ठरवलं आणि त्यातूनच ही शैली वगैरे तयार होत गेली असावी.
चित्रकार असल्याचाही परिणाम झाला असावा माझ्या लिखाणावर. कोणताही चांगला कलाकार कला साकारताना त्यात वरकड काही ठेवत नाही. प्रिसाइजनेस आणि सेन्स ऑफ प्रपोर्शन ही चांगल्या कलेची लक्षणं आहेत. जसं चित्रकलेचं तसंच लिखाणाचं.
शैलीबद्दल बोलायचं तर आणखी एक गोष्ट हल्ली हल्ली लक्षात येऊ लागली आहे बरं का. त्या काळी मी सिनेमे खूप पाहायचो. तेव्हा ‘कॅपिटल’ सिनेमामध्ये मॅटिनीला चांगले चित्रपट लागायचे. तिथे उत्तम बंगाली सिनेमे मी पाहिले. सत्यजित रेंचे सिनेमे.. अनेक डॉक्युमेंट्रीज पाहिल्या. त्या सगळ्या दृश्य माध्यमाचा माझ्यावर परिणाम झाला असावा असं मला वाटतं. माझ्या लिखाणात दृश्यमयता आहे असं लोक म्हणतात ती कदाचित तिथून आलेली असावी. कॅमेऱ्याला जे दिसतं ते तो आपल्याला दाखवतो. माझंही तसंच होतं काहीसं. मी लेखासाठी कुठेही गेलो की ती गावं, तिथले रस्ते, घरं असं तर नोंदवलंच, पण एका लेखात तर आम्ही उभे होतो तो खडक मुरुमाचा होता, असंही निरीक्षण आलंय. आता हे निरीक्षण मी अनाहूतपणे नोंदवलं होतं. पण पुढे मला आमच्या धोंडे सरांनी सांगितलं, की मुरूम कसा आहे यावरून त्या गावात पाणी आहे की नाही हे कळू शकतं. म्हणजे या निरीक्षण करत जाण्याच्या सवयीतूनच विषयाचे वेगवेगळे पैलूही समजून घ्यायला मदत झाली म्हणा की.
आता वेश्यांवरचा लेख बघा. तिथेही पुण्याच्या बुधवार पेठेतल्या वेश्यांच्या घरांची मी वर्णनं केली आहेत. खोल्यांची अवस्था, तिथल्या भिंतींवर लटकलेल्या तसबिरी, त्या वेश्यांचं बसणं, घरवालीला घाबरणं या सगळ्याची वर्णनं मी करत गेलो. त्यामुळे त्या बायका माझ्याशी फारशा बोलल्या नाहीत तरी त्यांचं जगणं वाचकांपर्यंत पोहोचू शकलं. पण त्यात कुठेही करुण, विदारक असे शब्द नाहीत. आपण वर्णनं अशी करायची की आपल्याला जे म्हणायचंय ते लोकांना शब्द न उच्चारता कळलं पाहिजे.

पण ही सगळी निरीक्षणं नंतर लेखात नोंदवण्यासाठी तुम्ही त्या त्या वेळी नोट्स काढायचात?
अजिबातच नाही. अगदी सुरुवातीला तसा प्रयत्न केला; पण लवकरच मला जाणवलं, की आपण ज्या थरातल्या लोकांचं जगणं समजून घेऊ पाहतोय ती मंडळी कागद-पेन पाहिला की बिचकतात, घाबरून जातात. त्यांच्या ज्या काही तक्रारी- गाऱ्हाणी असतील त्या बाजूला ठेवून ‘आमचं कुनाहीबद्दल कायबी म्हननं नाही बगा’ असं म्हणून टाकतात. हे लक्षात आल्यावर मी कागद-पेन बाजूला ठेवलं. एकदा माझ्या बहिणीने मला परदेशातून एक चांगल्यापैकी टेपरेकॉर्डर पाठवला. तोही मी वापरून पाहिला. पण बोललेलं सगळं पुन्हा ऐकणार कोण आणि त्याचं शब्दांकन कोण करणार? हे म्हणजे प्रचंडच काम होऊन बसलं. मग मी ठरवलं, आपल्या जे लक्षात राहील तेच महत्त्वाचं; जे राहणार नाही ते लक्षात ठेवण्याजोगं नव्हतंच असं मानायचं. आता बघा, एखाद्या गावात किती घरं आहेत वगैरे आकडेवारी कदाचित नाही लक्षात राहणार, पण घटना-दृश्यं लक्षात राहतात. एखाद्या घरात एक चूल, दोन पातेली आणि काही लाकडं होती. बाकी काहीही सामान नव्हतं. एकही डबा नव्हता. हे दृश्य तुम्ही कसं विसराल? मनाला चटका बसलेला असतो त्या दृश्याने. लक्षात राहायचंच ते. माहिती समजून घेतल्यावर किती तरी दिवसांनी, वर्षांनीही मी लेख लिहिलेले आहेत, पण आठवत नाही असं कधी झालं नाही.
लक्षात राहण्याचं आणखी एक कारण होतं. मेमरीला ‘रीकॉल’ची गरज असते. नुसत्या नोट्स काढून उपयोग नसतो. त्या मेमरीची उजळणी झाली की ती पक्की होते. कुठेही जाऊन आलो की तिथे काय काय घडलं त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी सुनंदाला, माझ्या इतर मित्रांना सांगायचो. अनायासे उजळणी व्हायची. लक्षात राहायचं. नोट्स

या लेखांच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रभर चिक्कार फिरलात. तेव्हा असं उठून बाहेर जाऊन, विषय समजून घेऊन लिहिणं असं नव्हतंच. तुम्ही ते कसं जमवलंत? आणि मुख्य म्हणजे पैशा-पाण्याचं काय?
लिहिणं हे मी माझं काम मानलं होतं. त्यामुळे ज्या विषयावर लिहावंसं वाटतं त्यावर लिहायचो. विषय मिळाला की जाऊन संपादकांशी बोलायचो. ‘साधने’त यदुनाथ थत्त्यांशी, ‘माणूस’मध्ये माजगावकरांशी, ‘मनोहर’मध्ये दत्ता सराफांशी. पुढे ‘मौजे’त श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्याशी. बहुतेक वेळा त्यांना विषय आवडायचा. कारण त्या वेळी खरोखरच असं फिरून, विषय समजून घेऊन कोणी लिहीत नव्हतं. पण पैसे काही फारसे मिळायचे नाहीत. एकदा मी कुणा तरी संपादकांना म्हणालो, “तुम्ही जेवढं मानधन देता त्यातून माझा प्रवासाचा खर्चही निघत नाही.” ते म्हणाले, “बरोबर आहे. पण बाकी सगळ्या लेखकांचं मानधन एकत्र केलं तर त्याहून तुमचा आकडा जास्त आहे.” आता यावर काय बोलणार? मराठी नियतकालिकांची-मराठी समाजाची एकूण परिस्थिती तेवढीच होती. पण लिहिणं ही माझी गरज होती. माझ्यात आणि सुनंदात तसं ठरलंच होतं, की तिने नोकरी करायची आणि मी लिहायचं. त्या वेळी गरजा अतिशय कमी होत्या. एसटीतून सगळीकडे फिरायचो. फक्त कार्यकर्त्यांच्या घरीच राहायचो. ते जे खातील ते खायचो. त्यामुळे खर्च कमी व्हायचा. सुनंदाला पगारातून जेवढे पैसे मिळायचे त्यातून भागायचं आमचं.

आपल्याकडे लेखकांना एकदा लिखाणाची दिशा मिळाली की ते त्याच दिशेने चालत राहतात. त्यांची एक चाकोरी तयार होते. तुम्ही मात्र सुरुवातीला वंचित-शोषितांवर लिहिलंत, पर्यावरणातले प्रश्न हाताळलेत, व्यक्तिचित्रं लिहिलीत, स्वतःविषयी लिहिलंत, कविता लिहिल्यात. हे कसं काय?
मी मानवसमूहांवर लिहीत होतो, तेव्हा एकदा कुणी तरी मला विचारलं, “काय, मग या दिवाळीत कुणावर लिहिताय? कोणत्या मजुरांवर?” मला तो धोक्याचा इशारा वाटला. आता त्याच पद्धतीने लिहीत गेलं तर स्वतःचंच रिपिटिशन होणार हे जाणवलं. मग मी मार्ग थोडा बदलायचं ठरवलं. तिथून वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे गेलो, त्यांच्या कामाविषयी लिहिलं. विषय तोच, पद्धत वेगळी. त्यातून ‘कार्यरत’ आलं. आता त्यापुढचं ‘कार्यमग्न’ येऊ घातलंय. ‘प्रश्न आणि प्रश्न’मध्ये मच्छीमारांचे प्रश्न आहेत, खाणकामगारांचे प्रश्न आहेत. फक्त घटना, मानवसमूह यांच्याबद्दल लिहीत बसलो असतो तर ते कंटाळवाणं झालं असतं.
ललित लिखाणही असंच अचानक बाहेर आलं. एकदा मूर्तिजापूरला एका घरी राहिलो असतानाचा मोराचा अनुभव सत्यकथेचे संपादक राम पटवर्धनांना सांगत होतो. ते म्हणाले, “अहो, किती छान अनुभव आहे हा! लिहा.” माझ्या मनात आलं, आपण तर सामाजिक विषय लिहितो; हे कसं काय लिहायचं? पण त्यांनी आग्रह केला आणि मी लिहिलं. आणि मग तो एक ओघच सुरू झाला. विद्यापीठात जाऊन राम बापटांशी मी किती तरी विषयांवर गप्पा मारायचो. अगदी ओतुरच्या आठवणींपासून आमच्या मुलींपर्यंत. ते सांगता सांगता लक्षात यायचं, की अरे, यात लेख आहे. सामाजिक वास्तवाची शोधाशोध करत होतो तशीच स्वतःच्या आतही शोधाशोध करावीशी वाटू लागली. आपल्याला आलेले अनुभव इतरांसोबत वाटून घ्यावेत असं वाटू लागलं आणि मग ‘स्वतःविषयी’, ‘जगण्यातील काही’, ‘दिसले ते’ ही पुस्तकं आली.

तुम्हाला कधी कथा-कादंबऱ्या लिहाव्याशा वाटल्या नाहीत का?
खरं सांगायचं तर नाही. तो आपला प्रांत नाही, हे मला फार लवकर कळून चुकलं होतं. आपल्याला जे मनापासून वाटतं ते लिहायचं हे मी पक्कं ठरवलेलं होतं. अगदी सुरुवातीच्या काळात मो. स. साठ्यांकडे मो. ना. कुलकर्णी नावाचे लेखक यायचे. साठे नाटक लिहायचे, तर कुलकर्णी कथालेखक होते. त्यांच्या कथांचं वाचन असायचं. ते मी ऐकायचो, तर वाटायचं, ‘अरे बाप रे! हे भलतंच अवघड प्रकरण दिसतंय.’ पण तरीही त्या काळात कुलकर्ण्यांच्याच आग्रहावरून मी एक कथा लिहिली आणि ती त्यांनाच वाचायला दिली. ती वाचून त्यांनी त्या कथेची अशी काही चिरफाड केली की विचारू नका. मला नंतर साठे म्हणाले, “अरे, तू कथा मला का नाही दाखवलीस?” पण मी म्हटलं, “नकोच त्या फंदात पडायला”. पुढे माझं लिखाण प्रसिद्ध होऊ लागल्यावर सरोजिनी वैद्य मला कादंबरी लिहिण्यासाठी नेहमी आग्रह करायच्या. म्हणायच्या, “कादंबरीचे विषय तू या लेखांमध्ये वाया घालवतो आहेस. लेख आज आहेत, उद्या नाहीत. पण कादंबरी चिरकाळ टिकते.” विजय तेंडुलकरांनाही मी कादंबरी लिहावी असं वाटायचं. पत्र लिहून ते मला त्याची आठवण करून द्यायचे. पण मला त्या रस्त्यावर जावंसं वाटलं नाही हेच खरं.

आज तुम्हाला कोणते विषय खुणावतायत?
गेल्या काही दिवसांपासून विज्ञानातल्या आश्चर्यांनी मला भारून टाकलं आहे. आपल्या आसपासचे कीटक, पक्षी; एवढंच काय, बॅक्टेरिया, हे सगळं जग किती अद्भुत आहे! आता आपलंच शरीर बघा. किती आश्चर्यं दडली आहेत त्याच्यात! ते सगळं समजून घेतोय. समजलेलं वाचकांबरोबर शेअर करतोय. या मालिकेतला एक लेख नुकताच लिहून पूर्ण केलाय- ‘मानवी जन्माची गोष्ट’. आईच्या पोटात जलचर असणारा गर्भ बाहेर येतो आणि हवेत मस्तपैकी जगू लागतो, हे आश्चर्य कसं काय घडतं याबद्दलचा. या लेखांचं लवकरच पुस्तक येतंय. ‘समकालीन’तर्फे माझ्या चित्रकलेच्या प्रवासावरचं ‘माझी चित्तरकथा’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. आता सध्या काष्ठशिल्पांच्या प्रवासाबद्दल लिहितोय. असं काय काय सुरू आहे.
दुसरीकडे, चंद्रपूरच्या औष्णिक केंद्रामुळे झालेल्या प्रदूषणाबद्दल लिहावं, पुण्यातल्या कचरा समस्येवर-फुरसुंगीतल्या कचरा सहन करणाऱ्या लोकांवर लिहावं असं वाटतंय. पण त्या त्या विषयात मला एखादा नेमका माणूस भेटावा लागतो. तो त्या विषयाचं मर्म असं काही उलगडून दाखवतो की मग माझी गाडी पुढे विनाधक्का सुरू होते. तसं घडण्याची मी वाट पाहतोय.
ˆ अनिल अवचट
दूरध्वनी : 020-25659407
aawachat@gmail.com
शब्दांकन : गौरी कानेटकर

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content