अनंतराव काशीनाथ भालेराव

(१९१९ ते १९९१)
साक्षेपी संपादक, निर्भीड व धडाडीचे पत्रकार. हैदराबाद मुक्ती संग्रामातले सेनानी.

अनंतराव काशीनाथ भालेराव

अनंतराव भालेरावांची ओळख स्वातंत्रसेनानी, साक्षेपी संपादक, निर्भीड व धडाडीचे पत्रकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकर अशी आहे. 'मराठवाडा' हे वृत्तपत्र नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
अनंतरावांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१९ रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे झाला. त्यांचे वडील वारकरी होते त्यामुळे लहानपणापासूनच अनंतरावांवर वारकरी संप्रदायाचे आणि संत साहित्याचे संस्कार झाले. अनंतरावांचे प्राथमिक शिक्षण वैजापूर, गंगापूर येथे तर माद्यमिक शिक्षण औरंगाबाद येथे उर्दू माध्यमाच्या शाळेत झाले. पुढे उस्मानिया म्याट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय कॉलेजात इंटरच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. त्या दरम्यानच त्यांची औरंगाबाद येथे गोविंदभाई श्रॉफ यांच्याशी भेट झाली. आणि त्यांच्या प्रेरणेतूनच अनंतराव भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. १९३८ साली वसतिगृहात वन्दे मातरम म्हणण्यास निजाम सरकारने बंदी घातली म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्यावेळी त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. या चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.
पुढे त्यांनी सेलू येथे काही सहकार्यांना बरोबर घेवून नूतन विद्यालय ही राष्ट्रीय शाळा सुरु केली. त्या दरम्यानच १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाला सुरुवात झाली. अनंतरावांनी सेलूत राहूनच आंदोलनचे कार्यक्षम केंद्र चालवले. स्टेट कॉंग्रसच्या कामातही त्यांनी काही काळ योगदान दिले. १९४६ पासून सुरु झालेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या शेवटच्या पर्वात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. या चळवळीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्वाचे आहे. या चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी आ. कृ. वाघमारे यांनी १९३८ साली 'मराठवाडा साप्ताहिक' सुरु केले होते. १९४८ पासून अनंतराव या साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम पाहू लागले. १९५३ साली ते अर्धसाप्ताहिक झाले आणि संपादकपदाची धुरा अनंतरावांकडे सोपवण्यात आली. त्यानंतर या अर्धसाप्ताहिकाचे स्वरूपच पालटून गेले. अनंतरावांचे धारदार लिखाण, सडेतोड विचार, रोखठोक भूमिका यामुळे 'मराठवाडा'चा दबदबा कमालीचा वाढला. अनंतरावांच्या लिखाणाचे आणि पर्यायाने या अर्धसाप्ताहिकाचे हजारो चाहते निर्माण झाले. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. अनंतराव त्यातही हिरीरीने उतरले. अनंतरावांचा प्रभावी संपादकात्वाखाली 'मराठवाडा'ने हैदराबादच्या भाषिक विभाजनास व संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस मराठवाड्यातील जनतेचे मत अनुकूल करून घेण्यास महत्वाची भूमिका बजावली.
अनंतरावांनी १५ ऑगस्ट १९६८ पासून 'मराठवाडा' अर्धसाप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात केले. मराठवाड्याच्या विविध प्रश्नांना त्यांनी या दैनिकातून वाचा फोडली. विशेषत: राज्य पुनर्रचना झाल्यानंतर मराठवाड्यातील जनतेचे, मराठवाड्याच्या आर्थिक विकासाचे प्रश्न, तिथल्या सरकारी नोकरांचे प्रश्न हिरीरीने मांडले. मराठवाड्यातील दलित, शेतमजूर, छोटे शेतकरी, आदि आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच त्याचबरोबर या घटकांवरील अन्यायालाही त्यांनी वेळोवेळी वाचा फोडली. १९७५ साली भारतावर लादल्या गेलेल्या आणीबाणीविरुद्ध त्यांनी खंबीर भूमिका घेतली होती. आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केला म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.
अनंतरावांची संपादकीय कारकीर्द तब्बल ४०-४५ वर्षांची. अनंतराव हे कमालीचे धेय्यवादी पत्रकार होते. वृत्तपत्रीय लिखाणात त्यांनी अनेक विषय हाताळले. अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी पेटून उठायची. विचारांवर ठाम, कर्मासाठी निष्टुर आणि निर्णयाला पक्के अशी त्यांची ख्याती होती. ते भावनात्मक होवून विचार करायचे पण त्यात मुद्दा हरवणार नाही याचीही काळजी घ्यायचे. 'मराठवाडा' वृत्तपत्राचा जन्मच मुळी चळवळीतून आणि ध्येयवादी विचारांतून झाला होता. त्यामुळे वाचकांना एखादा विषय समजावून सांगण्याची जबाबदारी संपादकांना अग्रलेखातून पार पाडावी लागते असे त्यांचे मत होते. अग्रलेख लिहिताना वाचकांची आवड, समज, आकलन लक्षात घ्यायला हवे. मात्र, संपादकाने फक्त त्याच्यामागे न धावता आपले ठाम मत मांडले पाहिजे असे त्यांचे मत होते. 'केसरी'तील टिळकांचे अग्रलेख, 'मराठा'तील अत्र्यांचे अग्रलेख, आणि यानंतर अनंतरावांनी 'मराठवाडा'साठी लिहिलेले अग्रलेख महत्वाचे मानले जातात हे या संदर्भात पुरेसे बोलके आहे. अनंतरावांच्या पत्रकारितेचा प्रभाव महाराष्ट्रातल्या त्या काळच्या अनेक पत्रकारांवर पडलेला दिसतो.' मराठवाडा' दैनिकात त्यांनी अनेक पत्रकार घडवले.
अनंतरावांनी तब्बल नऊ हजारपेक्षा अधिक अग्रलेख आणि दोन हजारहून अधिक इतर लेख लिहिले. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या मृत्यूलेखांची संख्या आहे तब्बल साडे तीनशे. अनंतरावांची 'आलो याचि कारणासी'(अग्रलेख संग्रह), पेटलेले दिवस(हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणी), पळस गेला कोकणा'(प्रवासवर्णन), कावड(स्तंभलेख), हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा(चळवळीचा इतिहास), स्वामी रामानंद तीर्थ(चरित्र), मांदियाळी, समग्र भालेराव (वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि रचनात्मक कामालाही अनंतरावांनी नेहमीच पाठींबा दिला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कामातही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
पत्रकारिता क्षेत्रातील स्पृहणीय कामगिरीसाठी मानाच्या फाय फौंडेशन, तसेच गोयंका पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात ध्येयवादी, निर्भीड आणि पत्रकारितेला व्यवसाय न मानता प्रबोधनाचे, समाज बदलाचे साधन मानणाऱ्या पत्रकार-संपादकांची एक पिढीच कार्यरत होती. या पिढीचे अग्रणी म्हणून अनंतराव भालेराव यांचे नाव सदैव लक्षात राहील. असा हा समाजभिमुख संवेदनशील पत्रकार-संपादक २६ ऑक्टोबर १९९१ रोजी अनंतात विलीन झाला.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content