भालचंद्र नेमाडे

तिसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
भालचंद्र नेमाडे (जन्म- २७ मे १९३८)

Nemade.jpg

भालचंद्र नेमाडे हे मराठी वाङ्मयविश्वातील अतिशय महत्त्वाचं नाव. 'कोसला' या पहिल्या कादंबरीपासून अभिव्यक्तीच्या चौकटी मोडत आलेल्या नेमाड्यांनी मराठी कादंबरीला स्वतःचा चेहरा आणि आत्मविश्वास मिळवून दिला. १९६०च्या दशकातील अनियतकालिकांच्या चळवळीमधे ते आघाडीवर होते. 'देशीवाद' ही संकल्पना मांडून नेमाड्यांनी भारतीय साहित्यविश्वामधे नवीन चर्चेला तोंड फोडलं. हिंदू चतुष्टयातील पहिल्या, 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून त्यांनी आपली देशीवादाची मांडणी अधिक स्पष्टपणे केली आहे. कादंबरीशिवाय कवितेच्या प्रांतातही नेमाड्यांनी आपल्या 'मेलडी' व 'देखणी' या कवितासंग्रहांतून स्वतःचा ठसा उमटवला असून, समीक्षेमधे 'टीकास्वयंवर' या ग्रंथातून उग्र समीक्षेचा मार्ग प्रशस्त केला आहे.

नेमाडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सांगवी इथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण खानदेशातच झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि १९५९मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतली.

kosala_2.jpg
kosala.jpg

बी.ए.च्या काळातील आपल्या अनुभवांवर नेमाड्यांनी पुढे जाऊन (१९६३ साली, वयाच्या २५व्या वर्षी) 'कोसला' ही कादंबरी लिहिली. मराठी कादंबरीच्या परंपरेत एक मजबूत मैलाचा दगड या कादंबरीमुळे रोवला गेला. या कादंबरीत नेमाड्यांनी उभा केलेला न-नायक पांडुरंग सांगवीकर आपली उभी-आडवी भारदस्त सावली पुढच्या पिढ्यांवरही पाडून अजूनही खंबीरपणे उभा आहे. या कादंबरीने समीक्षकांबरोबरच लोकप्रियतेच्या निकषांवरही सरस कामगिरी केली. आपली ग्रामीण मुळं शाबूत ठेवून शहरी वातावरणात रुजू पाहणारा पांडुरंग, प्रस्थापित व्यवस्थेतील भोंगळ कल्पनांवर शेरेबाजी करणारा पांडुरंग, शहरात स्थिर होऊ न शकल्याने गावी परतलेला पांडुरंग, आणि अखेरीस प्रस्थापित व्यवस्थेचं, परंपरेचं श्रेष्ठत्व मान्य करून आपल्या परिस्थितीला होकार देण्यास तयार झालेला पांडुरंग, अशी या नायकाची विविध रूपं 'कोसला'मधे आहेत. नेमाड्यांनी नंतरच्या काळात मांडलेल्या 'देशीवादा'ची सुरुवात या कादंबरीतल्या पांडुरंग सांगवीकरच्या अपयशाचा खुलेपणाने स्वीकार करण्यातून झाली असावी.

नेमाड्यांनी १९६१ साली पुण्यातच डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्रातील एम.ए.ची पदवी घेतली, तर १९६४ साली मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर दीर्घकाळ (सुमारे १९७१ पर्यंत) ते महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी करत होते. या काळातले त्यांचे अनुभव चांगदेव पाटील या नायकाच्या रूपाने त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यातून बिढार, हूल, जरीला, झूल या चांगदेव चतुष्टयातील कादंबऱ्यांचा जन्म झाला. पांडुरंगने बंडखोरी सोडून पण नैतिकता राखून प्रस्थापित व्यवस्थेत स्थिर होण्याचा निर्धार केला होता. चांगदेव हा निर्धार मनात पक्का ठेवून आपली नैतिकता जपत पण व्यवस्थेसोबत राहात आपला प्रवास करण्याचा प्रयत्न करत राहातो.

१९७१मधे नेमाडे लंडन इथल्या स्कूल ऑफ ओरिएन्टल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेमधे प्राध्यापक म्हणून गेले; परंतु तिथे त्यांचं मन रमू शकलं नाही, आणि नंतर परत महाराष्ट्रात येऊन त्यांनी काही काळ औरंगाबादमधे मराठवाडा विद्यापीठात, नंतर काही काळ गोवा विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी केली. आपल्या विद्यापीठीय कारकिर्दीच्या अखेरीस ते मुंबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्यासाठीच्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनावरून निवृत्त झाले.

चांगदेव चतुष्टयामधली अखेरची कादंबरी 'झूल' १९७९ साली प्रकाशित झाली. १९८०च्या आसपास नेमाड्यांनी 'हिंदू' या कादंबरीची घोषणा केली आणि त्यानंतर सुमारे तीस वर्षं ही कादंबरी येत असल्याची हूल वेळोवेळी उठत राहिली. अखेरीस जुलै २०१०मध्ये 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही हिंदू चतुष्टयामधली पहिली कादंबरी प्रकाशित झाली. नेमाड्यांनी ऐंशीच्या दशकात मांडलेल्या देशीवादाची संकल्पनेला खांद्यावर वागवणारा खंडेराव हा या कादंबरीचा नायक. माणूस ज्या ठिकाणी जन्माला येतो, ज्या भाषेच्या व परंपरेच्या सान्निध्यात वाढतो त्या परंपरेचा मान राखत आणि त्यामधे राहूनच सुधारणा करत राहणं, आपली भू-सांस्कृतिक वैशिष्ट्यं जपणं हे देशीवादी तत्त्वज्ञान. 'हिंदू : वंशवृक्ष पारंबी' आणि 'हिंदू : बाहेर काळ मोठा कठीण आहे' या 'हिंदू' चतुष्टयातील पुढच्या दोन कादंबऱ्यांची घोषणा झालेली आहे.

कादंबरीशिवाय नेमाड्यांचं कवितेतील कर्तृत्वही मोठं आहे. किंबहुना त्यांच्या स्वतःच्या मते कविता हा त्यांचा सर्वांत आवडता वाङ्मयप्रकार आहे. १९७० साली नेमाड्यांचा 'मेलडी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर 'मेलडी'तल्या कविता व गोव्यातील वास्तव्यात नेमाड्यांनी केलेल्या कवितांचा एकत्रित असा 'देखणी' हा कवितासंग्रह १९९२ साली प्रकाशित झाला.

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य
या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ,
साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ

या ओळींमधून नेमाड्यांची कवी म्हणून असलेली ताकद लक्षात येईल. या ओळींमधल्याच 'जगण्याच्या समृद्ध अडगळी'चा वापर 'हिंदू'च्या पहिल्या भागाच्या उपशीर्षकात आहे. एकूणच त्यांच्या गद्यभाषेला असलेली काव्यमयता, मौखिकता आणि त्यांच्या उग्र कादंबरीकाराच्या भूमिकेला लाभलेलं कविपणाचं अस्तर यामुळे नेमाडे हे मराठी साहित्यातलं एक प्रचंड मोठं व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.

teekasvayanvar.jpg

नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर' या समीक्षाग्रंथाला १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. २०११ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र फाउन्डेशनचाही पुरस्कार मिळाला आहे.

कादंबऱ्या -

१. कोसला (१९६३)
२. बिढार (१९७५)
३. हूल (१९७५)
४. जरीला (१९७७)
५. झूल (१९७९)
६. हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०)

कविता -

१. मेलडी (१९७०)
२. देखणी (१९९२)

समीक्षा -

१. टीकास्वयंवर
२. Nativism (Desivad)
३. साहित्याची भाषा

इतर -
निवडक मुलाखती
निवडक भाषणे

***********************************************

घुसळण कट्टा

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम तिसऱ्या ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. हा उपक्रम यापुढेही सतत सुरू राहणार आहे.

 • (१८४० ते १९१०) स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री.
 • (1840 -1910)
 • (८ मार्च १८६४ ते ३ मार्च १९१९) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक, नाटककार आणि कवी.
 • (8 March 1864 – 3 March 1919)
 • (१८८० ते ३ डिसेंबर १९५१) निरक्षर पण प्रतिभावंत ग्रामीण कवयित्री.
 • ( 1880 – 3 December 1951)
 • (२ फेब्रुवारी १८८४ ते १० एप्रिल १९३७) मराठी भाषेतला पहिला ज्ञानकोश तयार करणारे साहित्यिक, कादंबरीकार.
 • (2 February 1884 – 10 April 1937)
 • (३१ ऑगस्ट १८८६ – २५ डिसेंबर १९५७) उत्तम शिक्षक, समाजसेवक आणि स्वतंत्र प्रज्ञेचे व्यासंगी लेखक.
 • (31 August 1886 - 25 December 1957)
 • (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) अखिल भारतीय कीर्तीचे इतिहास संशोधक आणि साक्षेपी विचारवंत.
 • (5 August 1890 – 6 October 1979)
 • (१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८) बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.
 • (13 August 1890 – 5 May 1918)
 • (१९ जानेवारी १८९२ ते २१ नोव्हेंबर १९६३) विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार, पाली भाषेचे गाढे अभ्यासक.
 • (19 January 1892 – 21 November 1963)
 • (१ डिसेंबर १९०९ ते २० मार्च १९५६) मराठी नवकवितेचे प्रवर्तक. वेदनेचे काव्य मांडणारे प्रतिभाशाली कवी.
 • (1 December 1909 – 20 March 1956)
 • (१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९) शाहीर, कथा-कादंबरीकार, तमाशाला प्रतिष्ठा देणारा कलावंत.
 • (1 August 1920 – 18 July 1969)

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 

पहिल्या आणि दुस-या ई-संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिसरं - ई साहित्य संमेलन पार पडत आहे. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना आम्ही तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची केलेली विनंती स्वीकारून त्यांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वर्षीपासून मराठी साहित्यिकांचं इंटरनेटवर दस्तावेजीकरण करण्याच्या उपक्रमाची आम्ही सुरूवात करत आहोत.
पुढे वाचा