पुस्तकांना बोलकं करताना

ऑडिओ बुक म्हणजे ऐकलं जाणारं पुस्तक. आपण रेकॉर्ड केलेली गाणी ऐकतो, कविता ऐकतो तसंच एक पुस्तकही ऐकता येतं. पण आपल्याकडे अजून ही संकल्पना फारशी प्रचलित नाही. मराठी साहित्याशी संबंधित असा एक उपक्रम अलीकडे स्नॉवेल या कंपनीमार्फत काहीजण करत आहेत. मराठी साहित्यातल्या काही कथा आणि कादंबर्या त्यांनी ऑडिओ बुकच्या रूपात आणल्या आहेत. या उपक्रमाविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

__________________________

ही कल्पना कशी सुचली? सुरुवातीचा अनुभव काय होता? त्यामागच्या प्रेरणा कोणत्या होत्या?

प्रगत देशांत लोक बराच काळ आणि स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. अशा वेळी रेडिओ किंवा अन्य साठवलेली गाणी ऐकणं याव्यतिरिक्त फारशी करमणूक उपलब्ध नाही. अशा वेळी मुळात ऑडिओ बुक्स ही संकल्पना पुढे आली. भारतातही आता लांबचा प्रवास करून रोज ऑफिसला जाणारी मंडळी कमी नाहीत. वैयक्तिक वाहन नसलं तरी सार्वजनिक वाहनं वापरून तितकाच प्रवास केला जातो. त्यात गर्दीमुळे तर अनेकदा पुस्तक वाचणंच काय, उघडणंही अशक्य असतं. अशा वेळी प्रगत देशांसारखी आपल्याकडेही ऑडिओ बुक्स का नाहीत, हा प्रश्न आम्हाला पडला होता. या प्रश्नातूनच एक संधी आणि त्याचबरोबर एक आव्हानही आकार घेत होतं. त्यातूनच २००९ साली ‘स्नॉवेल’ची कल्पना प्रत्यक्षात आली. सुरुवातीला आम्ही लहान मुलांचं साहित्य श्राव्य माध्यमात आणण्याचा प्रयत्न केला. मग असं लक्षात आलं, की लहान मुलांसाठी बरंच साहित्य ऑडिओ रूपात उपलब्ध आहे, परंतु मोठ्यांसाठी अशा माध्यमातून साहित्य निर्माण करण्याचा फारसा प्रयत्न झालेला नाही. त्यानंतर आम्ही चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘कोंडुरा’ कादंबरीतल्या काही भागाचं ऑडिओ रूप सादर केलं. सदानंद देशमुखांच्या ‘रगडा’ कथासंग्रहातून ‘अमृतफळ’ नावाची कथा आणि मग जी. ए. कुलकर्णी यांची ‘राधी’ अशा कथा आम्ही रेकॉर्ड केल्या. या प्रयत्नांवेळी आम्हाला अनुभवही मिळाला आणि साहित्यक्षेत्रातील लोकांची ओळख व त्यांचं प्रोत्साहनही मिळालं. हे सुरुवातीचे तीन प्रयत्न प्रायोगिक स्तरावरचे आणि खासगी पातळीवर वितरित करण्यासाठीचे होते.

या अनुभवातून शिकत आम्ही हे प्रयत्न पुढे व्यावसायिक स्तरावर करण्याचं ठरवलं. त्याची सुरुवात १९ फेब्रुवारी २०११ रोजी चार श्राव्य उपक्रमांचं लोकार्पण करून झाली. दि. बा. मोकाशी लिखित चार कथांचा संग्रह ‘कथा मोकाशी’, मिलिंद बोकिलांची ‘समुद्र’ कादंबरी, जयवंत दळवी ह्यांचे ‘प्रवासी घडीचे’ आणि गो. नी. दांडेकरांची ‘शितू’ ही कादंबरी या साहित्यकृतींचा यात समावेश होता. याच वेळी आम्हाला प्रभाकर पेंढारकरांची गाजलेली ‘रारंग ढांग’ ही कादंबरी खुणावत होती. पुढे तिचंही ऑडिओ बुक ‘स्नॉवेल’ने २०१२ मध्ये सादर केलं.

ऑडिओ बुक हे छापील पुस्तकापेक्षा वेगळा अनुभव देणारं माध्यम आहे. या दोन्हींमधला फरक स्पष्ट कराल का?

पुस्तक वाचताना वाचणार्याच्या डोळ्यांसमोर त्या कथेचं एक चित्र उभं राहत असतं. स्नॉवेल ज्या पद्धतीची ऑडिओ बुक तयार करते त्यात हे चित्र अधिक परिणामकारकरित्या उभं राहतं. यासंबंधी कदाचित काहींचं मत भिन्न असेल, पण कथेमधे आणि पात्रांमधे एक जिवंतपणा येतो.
भारताचा विचार केला, तर ‘कराडी टेल्स’ नावाच्या चेन्नईस्थित कंपनीला पहिली ऑडिओबुक कंपनी म्हणायला हरकत नसावी. २००८ साली अमर चित्रकथा (ACK) यांनी ती विकत घेतली. त्याच दरम्यान, काही मोठ्या प्रकाशकांनीही स्वतःकडील पुस्तकांची ऑडिओ बुक्स आणायला सुरुवात केली होती. २००९ साली रीडू (Reado) नावाची एक कंपनी सुरू झाली. परंतु कराडी टेल्स वगळता इतर बहुतांश प्रयोगांत ऑडिओ बुक्स म्हणजे केवळ पुस्तकाचं वा कथेचं शब्दश: वाचन दिसून येतं.

आम्ही ‘स्नॉवेल’च्या माध्यमातून करतो ते ऑडिओ बुक म्हणजे त्या कथेतला मजकूर फक्त जसाच्या तसा वाचणं असं नाही. आम्ही मूळ कथेवरून एक स्क्रिप्ट तयार करतो. त्यातल्या विविध पात्रांचे संवाद आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या व्यक्ती वाचतात आणि त्याला आवश्यक तिथे संगीताची जोड दिलेली असते. यासाठी एक दिग्दर्शक आम्ही निश्चित करतो. आमच्या दृष्टीने हा एक नवीन कलाप्रकारच आहे. त्यामुळे त्याची तुलना थेट पुस्तकाशी होऊ नये. मूळ कथेपुरतीच ती तुलना राहावी. त्यापलीकडे रूप म्हणून ऑडिओ बुक ही वेगळी गोष्ट आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.
उपयोगाचं म्हणाल, तर दृष्टिहीन लोकांना किंवा ज्या परभाषक लोकांना मराठी भाषा फक्त बोलताच येते अशांना तर ऑडियोबुक हे मोठंच वरदान ठरतं. शिवाय आधी मी सांगितल्याप्रमाणे आताच्या वेगवान युगात अनेकांना ‘वाचना’चं वैचारिक खाद्य ऑडिओ बुकमधून मिळू शकतं.

या प्रकल्पाच्या आर्थिक बाजूंचा विचार कसा केला?

ऑडिओ बुक्सचं अर्थकारण भारतात अजून नीट बसलेलं नाही. भारताबाहेर हा ९००० कोटींचा मोठा व्यवसाय आहे. पण आपल्याकडे ही ‘इंडस्ट्री’ अजून विकसित होत आहे. ‘स्नॉवेल’च्या बाबतीत सांगायचं तर स्टुडिओचा खर्च खूप आहे. शिवाय दिग्दर्शक, कलाकार यांचं मानधन असतं. प्रत्येक चित्रपटाचं जसं बजेट असतं तसं आमच्या प्रत्येक उपक्रमाचं वेगळं बजेट तयार करावं लागतं. वितरणव्यवस्था जितकी सक्षम असेल तितकं आर्थिक गणित साधणं सोपं जाईल. वितरणाचे तीन-चार प्रकार आहेत. एक तर ऑनलाइन डाऊनलोड, ऑनलाइन सीडी विक्री, दुकानांमधून सीडीची विक्री, किंवा आय-ट्यून्सच्या माध्यमातून वितरण. सध्या तरी आम्ही सीडी दुकानांमधून विकण्याचा आणि ऑनलाइन सीडी विक्रीचा वितरणमार्ग चोखाळला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य दुकानांत स्नॉवेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हळूहळू इतर मार्गांनीही वितरणाचा आमचा विचार आहे.

या ऑडिओ बुक्सना ‘वाचक’श्रोत्यांचा प्रतिसाद कसा आहे?

गेल्या दोन वर्षांत आम्हाला अत्यंत वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. दोन वेगळे अनुभव सांगतो.
आम्ही पहिल्यांदा जेव्हा ‘राधी’च्या ऑडिओ बुकची विक्री सुरू केली, तेव्हा चिंचवडहून एका गृहस्थांनी ती कथा ऐकून त्यांच्या सहावीतल्या मुलीला ऐकवली, त्यानंतर त्यांचा आम्हाला फोन आला. ते म्हणाले, की गेले चार दिवस माझी मुलगी ती कथा ऐकल्याशिवाय झोपतच नाही. यातून आम्हाला खात्री पटली की ऐकून तरी मुलांना साहित्याची गोडी लागू शकते. आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने हा अनुभव खूपच महत्त्वाचा होता.

दुसरा अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा वीणाताई देव यांना आमच्या कामाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्याकडून कौतुकाची पावती मिळाली. अभिवाचन, श्रुतिका या कलाप्रकारांबद्दल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यातून आपण जे काही करत आहोत ते योग्य दिशेने सुरू आहे याची जाणीव झाली नि हुरूपही आला.

लेखक–प्रकाशक या मंडळींचा आतापर्यंतच प्रतिसाद कसा होता?

लेखक मंडळी या माध्यमाबद्दल खूप उत्साही आहेत. आतापर्यंत भेटलेल्या सगळ्यात लेखकांचे आम्हाला खूप सहकार्य मिळाले आहे. प्रकाशक मंडळी मात्र या संधीकडे थोडं दबकत बघताना दिसतात, परंतु आम्ही ज्या प्रकाशकांना या कामानिमित्त भेटलो त्यांनी आम्हाला सहकार्यच केलं.

स्नॉवेलतर्फे प्रकाशित करायच्या साहित्याची निवडप्रक्रिया कशी ठरते? आणि एकूणच ऑडिओ बुक तयार होतानाची प्रक्रिया काय असते?

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे साहित्यकृती ही काही थोडी श्रवणमूल्यं असलेली असावी. त्यानंतर त्यातल्या कथेवरून स्क्रिप्ट तयार करणं, पात्रसंयोजन करणं, अंमलबजावणीसाठी एखाद्या दिग्दर्शकाला सहभागी करून घेणं आणि त्यानंतर पार्श्वसंगीताचा भाग सांभाळण्यासाठी संगीतकार निश्चित करणं, अशी ही सांगण्यासाठी लहानशी पण प्रत्यक्षात बर्यापैकी वेळ आणि श्रम घेणारी प्रक्रिया आहे. ऑडिओबुक तयार होताना प्रॉडक्शनची ही सुरुवातीची प्रक्रिया वेळखाऊ आहे.

ऐकताना वाचकाला वेगळा आणि जास्त परिणामकारक अनुभव मिळावा म्हणून केवळ ध्वनीप्रसंगाची वेळ, परिसर, पात्रांची स्थिती, एकमेकांमधील अंतर, आवाजाच्या तीव्रतेमधून त्यांचे भाव, हावभाव, आवाजाचा पोत, संगीत या अनुरूप गोष्टींच्या मदतीने अधिक ताकदीचं चित्र श्रोत्यांपुढे उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे हे पुस्तकाचं केवळ ‘वाचन’ न राहता त्याचं विविधांगांनी ‘श्राव्य सादरीकरण’ होतं.

ऑडिओ बुकची आणखी काय वैशिष्ट्यं सांगता येतील?

प्रत्येक वाचक पुस्तक वाचताना स्वतः समांतरपणे कथेचं, त्यातील पात्रांचं एक चित्र तयार करत असतो. श्राव्य माध्यमातून तीच कथा समोर आल्यावर त्या चित्राला आवाजाचा आणि संगीताचा पैलू लाभतो आणि ते चित्र आपोआप अधिक परिणामकारक वाटतं. अजून एक मोठा फरक असा आहे, की इतर माध्यमं श्रोत्याला पॅसिव्ह बनवतात. ऑडिओ बुक्स श्रोत्याला अॅक्टिव्ह ठेवतात. म्हणजे टीव्ही बघता बघता किंवा पुस्तक वाचता वाचता हातातली इतर कामं करता येणं कठीण व बर्याचदा अशक्य असतं. थोडक्यात, इतर माध्यमं ही वाचकाला एका जागी बसण्याची मागणी करतात, तर याउलट श्राव्य माध्यम बॅकग्राउंडला चालू ठेवून ऐकणा-यालाही त्याचा आस्वाद घेता येतो. यामुळे ऑडिओ बुक्स कुठेही कधीही ऐकता येतात. त्यामुळेच सध्याच्या काळाला हे माध्यम सुसंगत ठरतं आणि साहित्यानुभवाशीही जवळीकही साधू देतं.

ही नवी कल्पना राबवताना काय अडचणी वाटतात ?

छापील पुस्तकांच्या क्षेत्रात दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. व्यवस्था आणि अवधी. आधुनिक युगात, इंटरनेटमुळे हे दोन्ही प्रश्न ब-याच प्रमाणात निकालात निघाले आहेत. आम्हीदेखील ऑडिओ बुक्स इंटरनेटवरून वितरित करणं सुरू केलं आहे. तेव्हा ई-बुक्स आणि ऑडिओ-बुक्समुळे हे दोन्ही ताप बरेच कमी होतील असं दिसतं. मात्र परदेशाशी तुलना केली तर या क्षेत्रात मोठा वाव दिसतो. मोठे प्रकाशक या क्षेत्रात यायला बिचकत असल्याने यात मोठी ‘गुंतवणूक’ होत नाही. मोठमोठे प्रकाशक या क्षेत्रात उतरायचं की नाही या द्विधा मनःस्थितीत दिसतात. दुर्दैवाने सद्यःस्थितीत ही कमी स्पर्धा असणे हा आमच्यासाठी एक अडथळा ठरत आहे. या क्षेत्रात अधिक श्रोतृवर्ग तयार होण्यासाठी, त्यांना अशी पुस्तकं ऐकण्याची सवय होण्यासाठी आरोग्यपूर्ण स्पर्धा सध्या तरी गरजेची आहे.

लोकांचं बदलतं जीवनमान बघता येत्या पाच-सहा वर्षांत ऑडिओ बुक्सचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. अर्थात छापील पुस्तकांवर त्याचा त्वरित परिणाम दिसत नसला, तरी वीसेक वर्षांनंतर जेव्हा आताच्या तंत्रयुगात वाढलेली नव्या सहस्रकातली पिढी ग्राहक बनेल, तेव्हा कदाचित छपाई ही एक महागडी आवड म्हणून शिकत राहण्याकडे वाटचाल करू लागेल असं वाटतं. ही संकल्पना लोकांपर्यंत पोचणं हे सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. या नव्या कल्पनेला वेगळ्या कलाविष्काराच्या स्वरूपात रुजवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

समीर धामणगावकर आणि वैभव कुलकर्णी (स्नॉवेल)

घुसळण कट्टा

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम तिसऱ्या ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. हा उपक्रम यापुढेही सतत सुरू राहणार आहे.

 • (१८४० ते १९१०) स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री.
 • (1840 -1910)
 • (८ मार्च १८६४ ते ३ मार्च १९१९) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक, नाटककार आणि कवी.
 • (8 March 1864 – 3 March 1919)
 • (१८८० ते ३ डिसेंबर १९५१) निरक्षर पण प्रतिभावंत ग्रामीण कवयित्री.
 • ( 1880 – 3 December 1951)
 • (२ फेब्रुवारी १८८४ ते १० एप्रिल १९३७) मराठी भाषेतला पहिला ज्ञानकोश तयार करणारे साहित्यिक, कादंबरीकार.
 • (2 February 1884 – 10 April 1937)
 • (३१ ऑगस्ट १८८६ – २५ डिसेंबर १९५७) उत्तम शिक्षक, समाजसेवक आणि स्वतंत्र प्रज्ञेचे व्यासंगी लेखक.
 • (31 August 1886 - 25 December 1957)
 • (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) अखिल भारतीय कीर्तीचे इतिहास संशोधक आणि साक्षेपी विचारवंत.
 • (5 August 1890 – 6 October 1979)
 • (१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८) बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.
 • (13 August 1890 – 5 May 1918)
 • (१९ जानेवारी १८९२ ते २१ नोव्हेंबर १९६३) विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार, पाली भाषेचे गाढे अभ्यासक.
 • (19 January 1892 – 21 November 1963)
 • (१ डिसेंबर १९०९ ते २० मार्च १९५६) मराठी नवकवितेचे प्रवर्तक. वेदनेचे काव्य मांडणारे प्रतिभाशाली कवी.
 • (1 December 1909 – 20 March 1956)
 • (१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९) शाहीर, कथा-कादंबरीकार, तमाशाला प्रतिष्ठा देणारा कलावंत.
 • (1 August 1920 – 18 July 1969)

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 

पहिल्या आणि दुस-या ई-संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिसरं - ई साहित्य संमेलन पार पडत आहे. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना आम्ही तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची केलेली विनंती स्वीकारून त्यांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वर्षीपासून मराठी साहित्यिकांचं इंटरनेटवर दस्तावेजीकरण करण्याच्या उपक्रमाची आम्ही सुरूवात करत आहोत.
पुढे वाचा