जागतिकीकरणाबरोबरच देशीवाद वाढतच जाईल

‘युनिक फीचर्स’तर्फे वेबसाइटवर भरवण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन 20 मार्च 2013 रोजी मुंबईत झाले. या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जागतिकीकरण व देशीवाद यांच्यातील परस्परसंबंधांबाबत आणि आज-कालच्या मराठी साहित्याबद्दल व्यक्त केलेले विचार.

‘युनिक फीचर्स’ आणि ‘अनुभव’ मासिक यांचा आणि माझा फार जवळचा संबंध आहे. त्यांनी आयोजित केलेल्या या ‘ई-साहित्य संमेलनामधे भाग घेताना मला अतिशय आनंद होतोय. खरंतर मी इंटरनेटच्या क्षेत्रात पूर्ण निरक्षर माणूस आहे, पण या गोष्टींचे फायदे काय याची मला पूर्ण कल्पना आहे. एकतर इंटरनेटमुळे कागद लागत नसल्यामुळे ते पर्यावरणपूरक माध्यम आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच ई-रिडींग, ई-बुक अशा नव्या माध्यमांमधल्या सहभागाला कायमच होकर देत आलो, आताच्या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासही मी म्हणूनच होकार दिला. अशा उपक्रमांची वाढ होणं ही चांगलीच गोष्ट आहे.

आज-कालचं मराठी साहित्य
सुरुवातीलाच मराठी आणि उर्वरित भारतीय भाषांच्या संदर्भात जागतिक साहित्यातल्या संदर्भांना आपण पुसटसा जरी स्पर्श केला तरी आपल्याला आपल्या साहित्यविषयक बोलण्याचं भान येईल. मी अनेक वर्षं जागतिक साहित्य शिकवत आलो, भारतीय साहित्याचा एक पेपरही मला शिकवावा लागत होता आणि मराठी साहित्य हा माझ्या आवडीचा विषय आहे. याशिवाय मी लिहितो आणि मुख्य म्हणजे अगदी अलिकडच्या साहित्यापर्यंत वाचत असतो. हे सर्व पाहून मला असं वाटतं की, मराठीत लिहिणं, वाचणं आणि मराठीत असणं ही एक चांगल्या भाग्याची गोष्ट आहे. कारण अशी व्हायब्रन्ट वाङ्मयीन संस्कृती जगातल्या फार थोड्या भाषांमधे आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन यांच्या इतकी आपली वाङ्मयीन संस्कृती जागरूक नसली तरी अफ्रिका, मध्यपूर्वेतील देश किंवा चीन यांच्या तुलनेत आपली वाङ्मयीन परंपरा अतिशय जागरूक असल्याचं दिसतं. याचं कारण आपल्याकडे पहिल्यापासून सगळ्या क्षेत्रांतल्या लोकांनी साहित्यात योगदान दिलेलं आहे. चोखामेळा, नामदेव शिंपी यांच्यापासून ते आताचे लक्ष्मण गायकवाड, अशोक पवार यांच्यापर्यंत असं विविध सामाजिक गटांमधल्या लोकांचं योगदान मराठी साहित्यात राहिलेलं आहे. अशी परंपरा जगात क्वचितच पाहायला मिळते. अगदी इंग्लंडमधेही ती नाही. तिथे अजूनही वरचा वर्ग, मध्यम वर्ग यांचीच साहित्यिक अभिव्यक्ती होताना दिसते. अगदी डी. एच. लॉरेन्सचं उदाहरण घेतलं, तरी तो मजुराचा मुलगा होता, पण मजूर नव्हता. तिथेही कामगार हक्कांच्या गोष्टी होत असल्या, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. सकाळी अंधारात कामाला बाहेर पडायचं आणि रात्री अंधारात परत यायचं, असा तिथला कामगारवर्ग वर्षानुवर्षं काम करतोय, पण त्यातून कोणी चांगलं काही लिहिलेलं मला अजून वाचायला मिळालेलं नाही. पण आपण आता दुसर्यां चे दोष काढण्यापेक्षा स्वतःचेच दोष काढूया.
मराठीत विविध पातळ्यांवरच्या लोकांचं जगणं साहित्यात येत असल्याचं जरी आपण म्हटलं तरी ज्या प्रमाणात परिघावरचं लेखन केंद्रस्थानी यायला हवं तितक्या प्रमाणात ते येत नाही. उदाहरणार्थ, नामदेव शिंप्यासारख्या महत्त्वाच्या लेखकाला तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या प्रमाणात वारकरी संप्रदायात महत्त्व नाही. संबंध हिंदुस्थानात फिरून क्रांतिकारी भूमिका घेणारा असा हा मोठा माणूस, पण त्याचं साहित्य वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी येत नाही. याला काही समाजशास्त्रीय कारणं असतील, पण एक साहित्यिक म्हणून मला वाटतं की, असं व्हायला नको.
परिघावरचं हे साहित्य केंद्रस्थानी आणण्यासाठी काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ती प्रसारमाध्यमं आज वाढलेली आहेत, पण नको ते वाद, नको त्या चर्चा यांच्यावर त्यांचा बराच वेळ आणि अवकाश वाया जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अशा वृत्तीचं दर वर्षीचं उदाहरण आहे. त्यामधे साधारण महिनाभराचा अवकाश वाया जातो. तेवढेच पैसे आणि कागद जर दुसर्यार कुठल्या गोष्टीत गुंतवले तर आपल्याला बरंच पुढे जाता येईल. आपल्या वाङ्मयीन संस्कृतीतले हे दोष आपण समजून घेतले पाहिजेत.
दोष काढण्याची सुरुवात करायची तर आम्ही 1960च्या दशकात लिहायला लागलो तेव्हापासून करता येईल. आम्ही लिट्ल मॅगझिन्स काढली साधारण 61 सालापासून. दहा वर्षांनंतर आम्ही आमचा अनियतकालिकांचा उपक्रम थांबवला, कारण आमच्या असं लक्षात आलं की, त्यांची आता गरज उरलेली नाही. कारण आम्हाला जे करायचं होतं ते इतर प्रकाशन संस्थांनी, मासिकांनी स्वतःहून जोरात करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, आम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा ‘सत्यकथा’ या प्रस्थापित मासिकात तेच तेच लोक, तेच तेच अनुभव असं फार असायचं, पण दहा वर्षांत त्यांनी घुमजाव करून विदर्भापासून विविध प्रांतांमधले लोकांचं साहित्य एकत्र आणून आपलं स्वरूप बदललं. यात आमच्या योगदानापेक्षा सत्यकथेच्या प्रकाशकांचं मोठेपण होतं असंच खरंतर म्हणायला पाहिजे. पण एकदा आधीची बैठक बदलली की ती संस्था नामशेषच होण्याची शक्यता असते. तसंच सत्यकथेचंही झालं आणि पुढे ते मासिक बंद पडलं. पण नंतर निघालेल्या अनेक मासिकांनी, प्रकाशकांनी अधिक खुला दृष्टीकोन आत्मसात केला. उदाहरणार्थ, पहिली दलित आत्मकथा पुण्यातल्या जोश्यांनी प्रकाशित केली. तिच्या प्रकाशनासाठी कोणाला प्रस्थापित व्यवस्थेशी भांडावं लागलं नाही.
आणखी मागे जाऊन विचार करायचा तर 1950 पर्यंत आमच्या समोर कोणताही आदर्श नव्हता. त्याकाळी लघुकथांचं युग होतं. लघुकथांनी मोठ्या प्रमाणात व्यापारी वृत्ती वाढवली होती. पाचशे - सातशे दिवाळी अंक निघत, त्यांच्या जाहिरातीही अशा असत की, अमुक अंकात अडिचशे कथा आणि सव्वादोनशे कविता आहेत. कुठे जी. ए. कुलकर्णी, तर कुठे गंगाधर गाडगीळ, मधेच कुठेतरी शरच्चंद्र चिरमुले अशी परिस्थिती होती. हा वाङ्मयप्रकार इतका गोंधळ घालायला लागला की त्यात आपण लिहूच नये असं आमच्या पिढीला वाटू लागलं. त्यामुळे आमच्या पिढीतल्या कोणी लघुकथा लिहिल्या नाहीत. भाऊ पाध्ये किंवा बाबुराव बागूल यांनी सुरुवातीच्या काळात कथा लिहिल्या. फॉर्म म्हणून त्यांनी कथा लिहिली असली तरी तिला त्यांनी चांगला आकार दिला. तीन-चार पानांत कायतरी चटपटीत लिहिणं आणि चमत्कृतीपूर्ण शेवट करणं, आपल्या मनातले विचार मक्त त्यातल्या पात्रांच्या तोंडी घालणं असं त्या पूर्वीच्या कथेचं स्वरूप होतं. तसं बागूलांच्या किंवा पाध्यांच्या बाबतीत झालं नाही. त्यातही भाऊ पाध्यांनी नंतर कथा थांबवून कादंबरीलेखनच केलं आणि ते उत्तम रितीने केलं. एका अर्थी तेच आमच्यासमोर एक मॉडेल म्हणून तयार झाले.
त्यापूर्वीच्या कादंबरीच्या बाबतीत सांगायचं तर डॉ. श्री. व्यं. केतकर आणि साने गुरूजी यांच्यानंतर वीस-तीस वर्षांत मोठा कादंबरीकार मराठीत नव्हता. त्यामुळे आमच्या पिढीसमोर मॉडेल कोण, असा प्रश्न निर्माण झाला. कुठल्याही परंपरेत मॉडेल असावं लागतं. मॉडेलप्रमाणे वागणं सुरक्षित असतं. म्हणजे अरण्यात एखादा रस्ता पडलेला असतो, तो वाकडातिकडा असतो, पण तोच बरोबर असतो. तो आपण शोधलेला नसतो, आपल्या पूर्वजांनी अनुभवांमधून तो रस्ता निवडलेला असतो. अशा रस्त्यासारखंच वाङ्मयीन मॉडेल असावं लागतं.
तसे एक फार मोठे लेखक होते व्यंकटेश माडगूळकर. माडगूळकरांनी कथा लिहिल्या नसत्या तर ते ग्रेट लेखक झाले असते. त्यांनी ‘मौज’-‘सत्यकथे’च्या कॉलमांच्या मर्यादेत माणदेशी माणसांच्या गोष्टी लिहिल्यामुळे त्यांचा फॉर्म चुकला. त्यांनी जर त्याच कथानकांची कादंबरी लिहिली असती तर त्यांच्या हातून हिरमोहन सेनापती, पन्नालाल पटेल, प्रेमचंद अशा थोर भारतीय लेखकांच्या परंपरेत बसणारी कलाकृती निर्माण झाली असती.
दुसरं एक नाव विभावरी शिरूरकरांचं घेता येईल. त्यांची ‘बळी’ ही एक मॉडेल ठरू शकणारी कादंबरी होती. परंपरा नसतानाच्या काळात आलेली ही कादंबरी होती हे एक वैशिष्ट्य. शिवाय शिरूरकरांनी आपल्या नोकरीच्या निमित्ताने गुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या जमातींचं जीवन जवळून बघितलं होतं, त्या अनुभवांमधून त्यांची कादंबरी तयार झाली, त्यामुळे ती तशी अस्सल होऊ शकली.
अशा परिस्थितीत आमची प्रतिकिमया आधीच्या पिढीतल्या लघुकथालेखकांविरुद्धच प्रामुख्याने होती. रस्त्यात कोणीतरी भलताच माणूस बसलेला असतो, त्याला उठायलाही सांगता येत नाही आणि त्याच्याकडून घेण्यासारखंही काही नसतं, तसं लघुकथालेखकांच्या बाबतीत आमच्या पिढीचं झालं. त्यांच्याकडून घेण्यासारखी भाषा होती, ना काही मूल्यं. त्यामुळे आम्ही आमचा मार्ग स्वतःच शोधू लागलो. स्वतःचे स्त्रोत शोधू लागलो. कोणी संतसाहित्यात हा मार्ग शोधला. मी स्वतः वारकरी घरातला असल्यामुळे संतसाहित्याची परंपरा होतीच. शिवाय खानदेशातलं समृद्ध लोकवाङ्मय होतं, प्रसिद्ध तमाशा संस्कृती होती, बहुरूपी, वासुदेव अशी मंडळी होती. तो एक मोठा स्त्रोत होता. याशिवाय पुण्यात फर्ग्युसन कॉलेजात शिकायला आल्यानंतर मराठीबरोबरच संस्कृत, इंग्रजी भाषांशी संबंध आला. या भाषांमधून आणखी मोठा परिसर माझ्या जाणिवेमधे आला. विशेषतः संस्कृतमधून कुठे वेदातले आणि उपनिषदातले वेचे असायचे, भवभूतीचं नाटक असायचं. या तोडीचं काही साहित्य मराठीत दिसत नव्हतं. मराठीत नाटकं आली ती बरीचशी इंगमजीवरून आली. शेक्सपियरची पाच अंकी नाटकं, इब्सेनची नाटकं यांतून बराच प्रभाव मराठी नाटकांवर पडला. पण हे काही आपल्या परंपरेशी, लोकवाङ्मयाशी जुळत नाही, त्यामुळे नाटकाचा फॉर्मही आम्हाला जवळचा राहिला नाही.
आता उरलेले फॉर्म होते कविता आणि कादंबरी. आणि मग तेच आमचे आवडते वाङ्मयप्रकार झाले. शिवाय, आपल्याला जे आवडत नाही, मोडावंसं वाटतं त्यासंबंधीची मांडणी करण्यासाठी आम्ही आमच्या परंपरेला अनुरूप समीक्षाही करायला सुरुवात केली. त्यापूर्वी कादंबरीही पाश्चात्त्य प्रभावातून लिहिली जात होती आणि समीक्षाही तशाच प्रभावातून आल्यामुळे त्याला पुस्तकी रूप आलं होतं. या सर्व प्रभावाचं वर्तुळ झालं होतं. हे वर्तुळ मोडण्यासाठी आपल्या परंपरेची मूल्यं शोधणं आवश्यक असल्याचं लक्षात येऊन आम्ही तशी समीक्षा केली.
परंपरेबरोबरच जे आपल्या परंपरेत नाही ते त्यात आणणं हेही काम होतं. किंबहुना हे परंपरेत नसणारं करणं हेही आपल्या परंपरेतच आहे. त्यामुळे तसाही आमचा शोध सुरू होता. सुदैवाने त्या काळात पेपरबॅक क्रांती झाल्यामुळे डोस्टोव्हस्की, टॉलस्टॉय यांच्यासारख्या लेखकांचं क्लासिक साहित्य दोनेक रूपयांत फूटपाथवर मिळू लागलं होतं.
साठीच्या दशकातलं आणखी एक वैशिष्ट्य जाणवतं ते म्हणजे एकत्र येऊन काही केलं पाहिजे असं आमच्यापैकी अनेकांना वाटायचं. काही काळ पुण्याला असताना हस्तलिखित स्वरूपात मासिकांचे प्रयोग आम्ही कॉलेजात केले होते. पण मी एम.ए. करायला मुंबईला आलो होतो तेव्हा छापील स्वरूपातही असं करता येण्याची शक्यता दिसू लागली. अनेक मित्रमंडळी आजूबाजूला होती. त्यातूनच आम्ही लघुपत्रिका काढल्या. मी मुंबईल आलो तेव्हा ‘असो’ आणि तिथून औरंगाबादला गेलो तेव्हा ‘वाचा’ अशा लघुपत्रिका काढण्यात सहभाग घेतला. आपापल्या खिशातून पैसे काढून अनियतकालिक छापणं असे ते सहकारी तत्त्वानुसार घडलेले हे प्रयत्न होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात भाषांतरंही झाली, मुख्यत्त्वे कविता खूपच मोठ्या प्रमाणावर लघुपत्रिकांमधून छापून आल्या.
आताच्या लघुपत्रिकांबद्दल बोलायचं तर, ते अशा पत्रिका का काढतात हाच प्रश्न पडतो. त्यांचं लिखाण प्रस्थापित मासिकांपैकी कोणी छापणार नाही, अशी परिस्थिती आता नाही. अश्लिल आहे वगैरे असं म्हणून कोणी त्यांचं लिखाण नाकारेल असं मला वाटत नाही, मग वेगळी प्रकाशनं का असा प्रश्न निर्माण होतो. नवदोत्तरीतल्या या नव्या लेखकांनी सुदैवाने आम्हाला काही विरोध केला नाही. ते जरासं धोकादायकच आहे. निसर्गनियमानुसार त्यांनी विरोध केलेला चांगला, कारण आमचं कुठेतरी चुकलेलं असेलच. पण अजून तरी कोणी ते दाखवून दिलेलं नाही. त्यांनी आम्हाला आदरच दिला. म्हणजे आम्ही केलेली क्रांती यशस्वीच झाली की काय, असं वाटतं. किंवा आणखी खोलवर क्रांती व्हायला हवी होती.
नवीन लेखकांपैकी सदानंद देशमुखांची ‘बारोमास’ किंवा राजन गवासांची ‘भंडारभोग’ किंवा अशोक पवारांची ‘इळनमाळ’ या कादंबर्याम पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की, असा अनुभव आधी कोणत्या लेखकाच्या कादंबर्यांंमधे आला नव्हता. या लेखकांनी आपल्या अनुभवातलंच बेधडकपणे लिहिलं आहे. यापूर्वी दलित साहित्याच्या बाबतीत असं झालं होतं. पण दलित साहित्याला केवळ ‘दलित’ संबोधल्यानं गोंधळ झाला असं वाटतं. या संबोधनामुळे ते केवळ एकाच जातीत बंदिस्त झालं. दलित साहित्याला आपण फारच डोक्यावर घेतलं असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळेच कदाचित आता त्यातून काही नवीन येत नाही की काय, अशी अवस्था आलेली आहे. एक प्रकारची कुंठा आलेली आहे. ही कोंडी मोडण्यासाठी इतरांच्या व्यथांशी जोडून घेणं आवश्यक आहे.

देशीवाद
साधारण 1975-80च्या दरम्यान मला देशीवादाच्या संकल्पनेचं महत्त्व जाणवलं. खरंतर त्या आधी आमचे वाङ्मयीन स्त्रोत म्हणून ज्या परंपरांचा उल्लेख केला त्या देशीच होत्या, पण जागतिकीकरणाच्या जाणिवेतूनच देशीवादाचा जन्म झाला. आपण आपल्या गोष्टी गमावतोय याच्या जाणिवेतून देशीवाद तयार झाला. आपल्या गोष्टी सुंदर आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली ग्रामसंस्था होती, ती सुंदर पद्धतीची होती, तिच्यात अंतर्गत सुधारणा करणं शक्य होतं. पण सगळ्याच समाजाकडून आक्रस्ताळे निर्णय झाले. अगदी संतमंडळी असतील, आंबेडकरी चळवळ किंवा शेतकरी चळवळीनेही आधीचं टाकाऊ होत चाललंय आणि आपल्याला काहीतरी नवीन ‘सेक्युलर’ आणावं लागेल अशी भूमिका घेतली. खेडी सोडून शहरांकडे जावं लागेल, असं त्यांचं म्हणणं होतं. या पार्श्वभूमीवर देशीवादाची जाणीव तयार झाली.
पहिल्यांदा मी म्हैसूरमधे एका सेमिनारमधे 1977च्या सुमारास देशीवादाची मांडणी केली. पण तेव्हाही तिला विरोध झाला. त्यावेळी उपस्थितांमधे आर. के. नारायण वगैरे मंडळीही होती. देशीवादामुळे आपण पुन्हा मागे गेल्यासारखं होईल, त्यात पुन्हा अस्पृश्यता सुरू करायची का, असे प्रश्नही विचारले गेले. त्यावर मी तेव्हा उत्तरं दिली आणि तो वाद पुढे बराच काळ सुरू राहिला.
सिमल्यातल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅ डव्हान्स्ड स्टडीज’मधे मी देशीवादासंबंधी दिलेल्या चार भाषणांचं इंग्रजी पुस्तक त्याच संस्थेनं काढलंय. त्या पुस्तकाचाही मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाल्याचं दिसतंय. अनेक विद्यापीठांमधे ते अभ्यासक्रमाला लावलं गेलंय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधे ते राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलंय. याचं कारण असं की, नष्ट होत असलेल्या गोष्टी किमान आपल्या जाणिवांमधे जागृत ठेवाव्या असं लोकांना वाटत असतं, त्यामुळे जागतिकीकरण वाढत जाईल तितका देशीवादाचा स्वीकारही वाढत जाईल.
ईशान्य भारतातल्या लोकांना तर देशीवाद जास्तच जवळचा वाटताना दिसतो. तिथे झाडं तोडलीत तर तुमच्यावर देवाचा कोप होईल अशा पद्धतीच्या प्रथा आहेत. झाडांपासून ऑक्सिजन मिळतो म्हणून ती तोडू नका, याऐवजी देशीवादानुसार या कारणाने ती झाडं टिकून आहेत. इथे ससा मारला ना तर तुमची नातवंडं मरतील, अशा प्रथांमुळे तिथे जंगलं टिकून आहेत. ईशान्येत सर्वत्र हिरवळ टिकून आहे त्याचं कारण देशीवाद आहे आणि पुण्या-मुंबईची वाट लागलेय त्याचं कारण जागतिकीकरण आहे.
याचं दुसरं उदाहरण म्हणजे, मुंबईत गुढीपाडव्याला मोठमोठे कडुनिंबाचे भारे घेऊन लोक येतात. पाच रुपयाला एकेक फांदी विकतात. त्यामुळे कडुनिंब टिकलं पाहिजे ही जाणीव टिकून राहिली. विमानसेवा सुरू करा, रस्ते रुंद करा, हे जसं वाढत जाईल तसंच दुसरीकडे झाडं टिकवण्याची जाणीवही देशीवादामुळे वाढत जाईल. परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकाच वेळी पुढे जात असतात. सध्या तर पारंपरिक आहे ते खर्याय अर्थाने आधुनिक आहे आणि आधुनिक आहे ते पारंपरिक आहे.
वाङ्मयामधे याचं उदाहरण शोधायचं तर आपल्याकडे तमाशा आहे. त्यात कसं असतं पाहा, कृष्णाचं फार स्तोम माजतंय असं दिसलं की तिथे पेंद्या म्हणतो, ‘अरे कृष्णा.., तुझी चड्डी सुटत चालली.’ अशी त्याची रेवडी उडवणं हे आपल्या परंपरेतूनच येतं. आता आधुनिक काळात प्रवीण बांदेकरची कादंबरी ‘चाळेगत’चं उदाहरण घ्या. आपल्याकडे प्रचलित असलेल्या लोकवाङ्मयाच्या पारंपरिक गोष्टी साफसूफ करून त्यांचा वापर करणं हे त्या कादंबरीत आलंय.
देशीवादावर असा आक्षेप घेतला जातो की, बुरसटलेले, फॅसिस्ट, अंधश्रद्धावादी, युद्धखोर राष्ट्रवादी, कट्टर धार्मिकतवादी देशीवादाचा गैरवापर करतील. तर मग या तत्त्वज्ञानाचं मोल कसं करायचं? पण हे होतंच. लोकांना मान्य होत असलेल्या कुठल्याही तत्त्वज्ञानाच असा वापर होणारच. कुरापतखोर लोकांना चांगल्या गोष्टींचा बुरखा लागतो, पण त्याचा दोष मूळ देशीवादी तत्त्वज्ञानाकडे जात नाही. याला एकच उत्तर असं देता येईल की, जे लोक असा वापर करतील त्यांचा स्वतःचा पाया कुठलातरी वेगळाच असतो. उदाहरणार्थ, धार्मिक उन्माद दाखवणार्या राजकीय वृत्तींमध्ये देशीवादी काहीच नाही.
देशीवादाची व्याख्या अशी आहे की, तुमचा जो भौगोलिक परिसर असेल त्याच्यावर प्रेम करा, त्यात वनस्पती असतील, आजूबाजूला वाढीला लागलेल्या अनेक गोष्टी असतील. अगदी शेंदूर लावलेलं एखादं देऊळ असेल तर तेही या परिसरात आलं, त्यामुळे त्यावरही प्रेम केलं पाहिजे, कारण ते आता एक भौगोलिक भाग झालेलं आहे, केवळ धार्मिक वास्तू उरलेलं नाही.
याची आणखी काही उदाहरणं देतो.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेकडे पाहा. तिथे आता खूप अपघात होतात. वास्तविक तिथे प्रवासाच्या अनेक सोई आहेत, पोलीस आहेत, पण तरी अपघात कमी होत नाहीत. आता पूर्वीच्या पुणे-मुंबई मार्गाचं पाहा, तिथे शिंगडोबाचं देऊळ असायचं. तिथे प्रत्येक वाहन थांबलं पाहिजे, नारळ वगैरे ठेवून पुढे गेलं पाहिजे, अशी परंपरा होती. यातला अंधश्रद्धेचा भाग जाऊ दे, पण एवढ्या मोठ्या घाटाच्या प्रवासात कुठेतरी थांबणं आवश्यक असतं, त्यामुळे तुम्हीही थंड होता आणि इंजिनही थंड होतं. पण एक्सप्रेस हायवेवर असं होत नाही, तिथे आपल्याला वेगाची धुंदी आलेली सते. मग सूचनांचे कितीह बोर्ड लावले तरी त्याने अपघाताचं प्रमाण कमी होत नाही. परंपरेने काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या फार विचार न करता मान्य केल्या पाहिजेत.
महात्मा गांधींचे नातू आणि मोठे विचारवंत रामचंद गांधी यांनी काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता, त्यात धारवाडचे विचारवंत शहा यांचं उदाहरण दिलं होतं. शहा केंब्रिज विद्यापीठात लुडविग विट्गेन्स्टाईनचे विद्यार्थी होते. विट्गेन्स्टाईनचे विद्यार्थी त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जात, तेव्हा त्यांच्यात संवाद होत असे. शहा तेव्हा एकवीस-बावीस वर्षांचे असतील. त्यांना एकदा विट्गेन्स्टाईनने विचारलं, ‘शहा म्हणजे तुम्ही मुसलमान काय?’ तर, शहांनी नकारार्थी उत्तर दिलं. मग विट्गेन्स्टाईनने म्हणाला, ‘बरं बरं, मला नावावरून तसं वाटलं. मग तुम्ही हिंदू का?’ त्यावरही शहांनी नकारार्थी उत्तर दिलं नि म्हणाले की, ‘मी जैन आहे.’ त्यावर विट्गेन्स्टाईन म्हणाला, ‘तुमच्यात अशी परंपरा असल्याचं मी वाचलंय की, सगळे साधू वर्षातून एकदा कुठल्यातरी दिवशी एकत्र जमतात आणि एका पर्वताच्या शिखरावर बसून चर्चा करतात.’ यावर शहा म्हणाले, ‘छे छे, ह्या सगळ्या भाकड समजुती आहेत आणि आमच्याकडे असल्या अनेक मूर्ख गोष्टी आहेत.’ हे ऐकल्यावर विट्गेन्स्टाईनने शहांना उलट झापलं, ‘शहा, तू स्वतःला तुझ्या परंपरेपेक्षा शहाणा समजतोस का? परंपरा तुझ्या आयुष्यापेक्षा मोठी आहे. हजारो वर्षांची. आणि तुझ्यापेक्षा बुद्धिमान लोकांनी ती तयार केलेली आहे. तुला ती समजत नसेल तर बोलत जाऊ नकोस.’ तेव्हा शहांना लक्षात आलं की, खरंच, ही वर्षातल्या चर्चेची जैन परंपरा महत्त्वाची आहे. आत्ताच्या संदर्भात सांगायचं तर, हे साधू एकत्र येऊन स्त्रियांच्या बलात्कारावर बोलले असते. अगदी विसाव्या शतकातला सगळ्यांत मोठा विचारवंत विट्गेन्स्टाईनही परंपरेचं महत्त्व जाणणारा होता.
व्यक्ती जन्मते तेव्हा ज्ञान घेऊन जन्मत नाही, ती फक्त शारीरिक जन्म घेते. पण ज्ञान अनेक पिढ्यांचं संकलित झालेलं संचित असतं. चोरी करू नये, कुणाचा खिसा कापू नये, या स्वरूपाचंही ज्ञान त्यात असतं. या परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात मार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात.
टी. एस. इलियटचंही एक उदाहरण या संदर्भात देता येईल. त्या काळात इंग्लंडमधे कंडोम वापरण्याचं शिक्षण मुलांना द्यावं किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यासंबंधी इलियटला विचारलं, तर तो म्हणाला, ‘असं शिक्षण अजिबात देऊ नये. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की, आपली बायको सोडून दुसरीकडे जाणं बरोबर नाही. आपल्या परंपरेतच ते आहे. कंडोम वापरण्याचं शिक्षण देऊन गुप्तरोग काही कमी होणार नाही, फक्त कंडोमनिर्मितीचे कारखाने मात्र चालतील.’ असा इलियटसारखा मोठा कवीसुद्धा परंपरा मानणाराच होता.
आपल्याकडेही कपील, गौतम या कोणीही जातीचा अंत करा, जातिव्यवस्था तोडा, असं म्हटलेलं नाही. त्यांनी फक्त प्रेम करावं, सगळ्या जाती सारख्या आहेत त्यामुळे जातिभेद नाहीसा करा, असं म्हटलं. महात्मा फुलेसुद्धा म्हणत की, ख्रिस्त महंमद मांग बमाह्मणाशी, धरावे पोटाशी. म्हणजे ‘पोटीशी धरावे’ असं म्हणताना जातिव्यवस्था मोडण्याचं शेखमहम्मदी स्वप्न त्यांनी दाखवलं नाही. त्यानंतरच्या सेक्युलर मंडळींनीच जातिव्यवस्था मोडण्याची आवाहनं केली.
जातिव्यवस्था मोडणं शक्य नाही, कारण आपली व्यवस्थाच तशी आहे. आपल्याला आपली आयडेन्टीटी लागते. तरीही आपल्या देशात जास्तीत जास्त जेनेटिक सरमिसळ आहे. हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आलं की, आदिवासींपासून सर्व जातींमधे आंतरजातीय विवाह होत आलेत आणि ‘शुद्ध’ आर्य असं काही सापडलेलं नाही. ही वृत्ती मधल्या काळात मात्र गेली, त्यामुळे संघटित पातळीवरची धार्मिक, जातीय आणि पितृसत्ताक व्यवस्था निर्माण झाली. अगदी हिंदुत्त्वावाद घेतला तरी तो ब्रिटीश साममाज्यवादानंतर आला. त्यापूर्वी तसलं काही नव्हतं. पूर्वी वारकरी मंडळी असतील किंवा सुफी परंपरेतही सगळ्या धर्मांना सहभागी होण्याचं स्वातंत्र्य होतं. त्यामुळे हिंदुत्त्वावाद हाच मुळात देशी नाही असं मग सिद्ध होतं. देशीवाद म्हणजे भौगोलिक परिसर निश्चित करून भूसांस्कृतिक विचार करणं.
देशीवाद आणि देशीपण यांतला फरकही समजून घ्यायला पाहिजे. आधी जे उदाहरण दिलं शिंगडोबाला नमस्कार करण्याचं, ते त्यामागचं कारण समजून घेऊन केलं तर तो देशीवाद झाला, अन्यथा ते केवळ देशीपण झालं. परंपरा समजून घेऊन ती जाणिवेत उतरवणं म्हणजे देशीवाद. केवळ आपलं आहे म्हणून तसंच केलं पाहिजे, असा आग्रहच करत राहिलं तर त्यात यश येऊ शकत नाही.
नवीन पिढीला हे जास्त चांगलं कळतं. ही पिढी मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणाला सामोरी जातेय. ती आपोआप शिकत असते. उदाहरणार्थ, माझे दोन्ही मुलगे इंजिनियर आहेत. एक मेटरॉलॉजीमधे तर दुसरा इंस्ट्रुमेन्टल सायन्समधे. त्यातले एक लहानपणी कविता करायला. अशा मुलाने चौथी-पाचवीत मराठीत कविता करणं आणि पुढे इन्स्ट्रुमेन्टल इंजिनियर होऊन नंतर आयआयटीत प्राध्यापक होणं हा बदल जागतिकीकरणामुळे झालेला आहे. नाहीतर आधी असा मुलगा मराठीत बी.ए. होऊन कुठेतरी पसायदान वगैरे शिकवत बसला असता. पण मदुरितांचे तिमीर जावो’ हे किती दिवस म्हणत बसणार! त्यापेक्षा तिमिरातच काहीतरी केलेलं परं, असं ते ठरवतात. नवीन मुलांना आपल्यापेक्षा जास्त जाणीव असते, त्यामुळे काय सोडायला हवं ते ते सोडतात आणि नवीन मार्ग शोधतात.
जितकी आपली मुलं जागतिक होणार तितकं त्यांनी ‘कोसला’ आणि तुकाराम वाचलेलं असणार. जागतिकीकरण वाढणार तसं देशीवाद वाढणार हे निश्चित. एका अर्थी, पूर्वग्रह न ठेवता भूमिका घ्यायची तर जागतिकीकरण आणि देशीवाद हे एकमेकांना पूरकच आहेत असं म्हणता येईल. म्हणजे आम्हाला जागतिकीकरणाला विरोध करायचा नाही, तर आमचं जे सुंदर आहे ते टिकवायचंय म्हणून देशीवाद महत्त्वाचा.
कादंबरीकाराला या गोष्टींची जाणीव असणं आवश्यक आहे. आपण ज्या मराठी कादंबरीच्या परंपरेत आहोत, त्यात त्याने अद्ययावत असलं पाहिजे. लिहिणार्यारला आपण राहतो त्या जगाच्या परिमाणांचं भान असावं लागतं. ते आजच्या कवींना अजिबातच नाही, कादंबरीकारांना थोड्या फार प्रमाणात आहे. हे भान येण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. एखाद्या विषयावर आज लिहायला घेतलं तर त्यासाठी काही वर्षांचा कालावधी देणं भाग आहे. एक वर्षं किंवा पाच वर्षं अशा अंतराने कादंबरी लिहीत जाणं याला काही अर्थ नाही. कादंबरी लिहिण्यापूर्वी अभ्यासाचे कष्ट घ्यायला हवेत. पण जागतिकीकरणाच्या युगातलं हे भान आजच्या लेखकांना आहे असं दिसत नाही. ते येणं आवश्यक आहे.
‘कोसला’तल्या पांडुरंग सांगवीकराला असं वाटत होतं की, परंपरेच्या विरुद्ध जावं, पितृसत्ताक पद्धती मोडावी. याचाच परिणाम होऊन तो शिक्षण सोडून गावी निघून जातो. पण नंतर अचानक तो बदलतो. बैलासारखं खुंट्यावर यायलाच पाहिजे, हे त्याच्या लक्षात येतं आणि तो परंपरेला होकारच देत जातो, तिचा खोलवरचा स्वीकार करतो. शंभर टक्के उलट होऊन प्रवाहाबरोबर पोहायला लागतो, त्यातूनच चांगदेव चतुष्टयातला नायक चांगदेव पाटील तयार झाला. तो आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. ‘हिंदू’मधला खंडेराव पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटलाचे गुण घेऊन येतो. आज मला असं वाटतं की, मी प्रामाणिकपणे पांडुरंग सांगवीकराला त्याचा पराभव मान्य करायला सांगितलं त्याचा उपयोग मला आत्ता झाला. आतून खरं बोलायची, वाचकांपासून काही न लपवण्याची सांगवीकराची वृत्ती आहे, त्यामुळे तो आपला पराभव मान्य करतो. पराभवाची कबुली देण्यात काय गैर आहे. त्यामुळे पुढचाही प्रवास तो प्रामाणिकपणे करत जातो. आता ‘हिंदू’च्या दुसऱ्यास भागात हिंदू समाजाने परंपरेत राहूनच कसे बदल घडवले ते दाखवण्याचा माझा मानस आहे.
खरंतर तुम्ही कुठे जाता, काय करता हे सगळंच वरवरचं असतं. आपण आपल्या आयुष्याची ही पोकळी काहीतरी करून भरून काढत असतो. त्यामुळे माझ्या कादंबऱ्यांलमधले तीनही नायक आयुष्याला मार महत्त्व देत नाहीत, पण आहेत ते दिवस आनंदानं घालवणं हे कर्तव्य मानतात. तेच शेवटी महत्त्वाचं असतं.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 

पहिल्या आणि दुस-या ई-संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिसरं - ई साहित्य संमेलन पार पडत आहे. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना आम्ही तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची केलेली विनंती स्वीकारून त्यांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वर्षीपासून मराठी साहित्यिकांचं इंटरनेटवर दस्तावेजीकरण करण्याच्या उपक्रमाची आम्ही सुरूवात करत आहोत.
पुढे वाचा