ग्रेस

दुसऱ्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ग्रेस (१० मे १९३७ – २६ मार्च २०१२)

Kavi_Grace 01.jpg

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ग्रेस (१० मे १९३७ – २६ मार्च २०१२) हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी. उत्कट प्रतिमा आणि संध्याकाळच्या वातावरणातील भावनांची पकड यातून त्यांची कविता वाचकाला एका गूढ प्रांताची सफर घडवते. कवितेशिवाय ग्रेस यांनी ललितबंध हा गद्य साहित्यप्रकारही हाताळला, आणि त्यातही त्यांनी आपल्या गूढ भाषिक कामगिरीचा प्रत्यय वाचकांना जाणवू दिला. त्यांच्या शब्दांमधे असलेलं अपरिहार्य कारुण्य कोणत्याही स्पष्टतेला धुडकावू शकणारं आहे. स्पष्ट अर्थाचा शोध घेण्याऐवजी एका गूढ अनुभूतीच्या अंगाने त्यांच्या कवितांना भिडलं तर अभूतपूर्व अनुभव देण्याची ताकद ग्रेस यांच्या काव्यात आहे.

ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते.

ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कवितासंग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली. त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली.

यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६)
आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते.

क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी।
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे ।
बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे॥

- अशा ग्रेस यांच्या ओळींमधून वास्तव, स्वप्न, जाणीव, नेणीव यांची विलक्षण सरमिसळ जाणवते. ईश्वर, स्त्रीसंबंधीची शारिर व मानसिक पातळीवरची ओढ, मृत्यूचं आकर्षण आणि भय याभोवती त्यांच्या लिखाणाची मुख्य आशयसूत्रं दिसतात. 'दुःख' या अमूर्त जाणिवेचं ग्रेस यांना अबोध आणि गूढ आकर्षण होतं. त्यामुळेच दुःखाशी संलग्न व्याकुळता, भावार्तता, नैराश्य, औदासीन्य, खिन्नता अशा अनेक भावच्छटांनी त्यांची कविता ओथंबून आलेली दिसते. या भावच्छटा ग्रेस यांच्या कवितेत अप्रतिम अशा प्रतिमा घेऊन अवतरतात. उदाहरणच द्यायचं, तर

दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका।
दुःखसुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका॥

या ओळींमधे ग्रेस यांच्या कवितेतील दुःखाचा सूर दिसून येतो.

ग्रेस यांचं मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे.

Olya veluchi basri 2.jpg

माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं.

पहाटे चारला पोहायला जाण्याच्या दैनंदिन सवयीपासून ते घराच्या दारावरच्या 'आय एम फ्री बट नॉट अॅव्हेलेबल' आणि 'द फ्लॅट इज फॉर सेल बट नॉट फॉर अ जंटलमन' या पाट्यांपर्यंत ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याभोवती गूढत्वाचं वलय निर्माण करत गेलं. गूढतेशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर कवितेला असलेलं अस्तर होतं दुर्बोधतेचं. आपल्या कवितेवर होणाऱ्या दुर्बोधतेच्या आरोपाचं निराकरण आपल्याला करायचं नाही, अशी स्पष्ट भूमिका ग्रेस यांनी आपल्या 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या लेखातून घेतली आणि ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत जपली. अनेक समीक्षकांनी म्हटल्याप्रमाणे ग्रेस यांची कविता पहिल्या किंवा कुठल्याही वाचनाच्या प्रयत्नात संपूर्णपणे कळून घेण्याचा सोस फारसा योग्य नाही. त्यापेक्षा एक अनुभव घेण्याच्या भूमिकेतून त्यांची कविता वाचावी, तिच्यातील शब्दांचा भाव रिचवावा, त्यातील व्याकुळता जाणवून घ्यावी- हाच ग्रेस यांच्या कवितेचा खरा आस्वाद ठरतो.

मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल

असं म्हणून गेलेल्या ग्रेस यांच्या शब्दांमधे एकीकडे स्वतःला विसरणं आणि दुसरीकडे स्वतःला शोधणं या दोन गोष्टी वाचक म्हणून केल्या की ग्रेस यांची कविता आपलीशी वाटू लागते.

'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' यासारख्या ग्रेस यांच्या कवितांच्या ओळींना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते' या त्यांच्या कवितेचं संगीतबद्ध रूप 'महाश्वेता' या दूरचित्रवाणी मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरलं गेलं. अशा संगीतबद्ध रचनांमधून ग्रेस यांच्या कवितेला लोकप्रियतेचाही लाभ काही प्रमाणात झाला.

विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या 'युगवाणी' या नियतकालिकासाठी त्यांनी संपादकाची भूमिकाही १९७१ ते १९७४ या काळात निभावली. या शिवाय रॉयटर्स सेंटर्सतर्फे निघालेल्या 'संदर्भ' या द्वैमासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी (१९७५-१९७६) काम पाहिले.

ग्रेस यांच्या 'संध्याकाळच्या कविता' या संग्रहाला १९६८ साली महाराष्ट्र सरकारचं कवी केशवसुत पारितोषिक मिळालं. त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. २०१२ साली 'युनिक फीचर्स'ने आयोजित केलेल्या 'दुसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलना'चं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

ग्रेस यांचे कवितासंग्रह–

संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)

ललितबंध संग्रह-
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)

****************************************

घुसळण कट्टा

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम तिसऱ्या ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. हा उपक्रम यापुढेही सतत सुरू राहणार आहे.

 • (१८४० ते १९१०) स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री.
 • (1840 -1910)
 • (८ मार्च १८६४ ते ३ मार्च १९१९) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक, नाटककार आणि कवी.
 • (8 March 1864 – 3 March 1919)
 • (१८८० ते ३ डिसेंबर १९५१) निरक्षर पण प्रतिभावंत ग्रामीण कवयित्री.
 • ( 1880 – 3 December 1951)
 • (२ फेब्रुवारी १८८४ ते १० एप्रिल १९३७) मराठी भाषेतला पहिला ज्ञानकोश तयार करणारे साहित्यिक, कादंबरीकार.
 • (2 February 1884 – 10 April 1937)
 • (३१ ऑगस्ट १८८६ – २५ डिसेंबर १९५७) उत्तम शिक्षक, समाजसेवक आणि स्वतंत्र प्रज्ञेचे व्यासंगी लेखक.
 • (31 August 1886 - 25 December 1957)
 • (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) अखिल भारतीय कीर्तीचे इतिहास संशोधक आणि साक्षेपी विचारवंत.
 • (5 August 1890 – 6 October 1979)
 • (१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८) बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.
 • (13 August 1890 – 5 May 1918)
 • (१९ जानेवारी १८९२ ते २१ नोव्हेंबर १९६३) विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार, पाली भाषेचे गाढे अभ्यासक.
 • (19 January 1892 – 21 November 1963)
 • (१ डिसेंबर १९०९ ते २० मार्च १९५६) मराठी नवकवितेचे प्रवर्तक. वेदनेचे काव्य मांडणारे प्रतिभाशाली कवी.
 • (1 December 1909 – 20 March 1956)
 • (१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९) शाहीर, कथा-कादंबरीकार, तमाशाला प्रतिष्ठा देणारा कलावंत.
 • (1 August 1920 – 18 July 1969)

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 

पहिल्या आणि दुस-या ई-संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिसरं - ई साहित्य संमेलन पार पडत आहे. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना आम्ही तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची केलेली विनंती स्वीकारून त्यांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वर्षीपासून मराठी साहित्यिकांचं इंटरनेटवर दस्तावेजीकरण करण्याच्या उपक्रमाची आम्ही सुरूवात करत आहोत.
पुढे वाचा