नेटक्या मराठीला जोड चित्रभाषेची...
लिहावे नेटके,
ज्योत्स्ना प्रकाशन.
‘मी पुस्तक घाई नव्हती’ हे काही वाक्य नव्हे. वाक्यातील प्रत्येक शब्दाचा दुस-या शब्दाशी काही तरी संबंध असतो आणि तो स्पष्ट झाल्याखेरीज वाक्याला अर्थ मिळत नाही. हा अर्थ स्पष्ट होण्यासाठी क्रियापदाला काही प्रश्न विचारावे लागतात.
बघ : काय नव्हती? - घाई नव्हती
कोणाला नव्हती? - मला नव्हती.
कशाची नव्हती? - पुस्तकाची घाई नव्हती’’
जाडजूड , चांगलं लांबरुंद आणि दोन मोठे नि एक छोटा भाग करूनही वजनानं जरा जडच झालेलं पुस्तक माधुरी पुरंदरे यांनी पूर्ण केलं, ते बाजारात येऊनही काही महिने झाले.. पण माधुरी पुरंदरे यांना खरंच पुस्तकाची घाई नव्हती, हे आत्ता-आत्ताच ब-याच जणांना पटू लागलं असेल. ‘लिहावे नेटके’ या पुस्तकातल्या ‘विभक्तिप्रत्यय’ या भागात (पान 248 ) एका चौकटीत पुस्तकाची घाई नसल्याबद्दलचं हे वाक्य येतं. तोवर आपली वाटचाल दुस-या भागाकडे सुरू झालेली असते आणि ‘पुस्तक नेटके असणे’ या एकही विभक्तिप्रत्यय नसलेल्या वाक्यांशाचा संकल्पनात्मक अर्थ आपल्याला कळू लागलेला असतो!
‘बालमित्रांनो’ किंवा ‘छोटय़ा दोस्तांनो’ वगैरेला सुट्टी देऊनसुद्धा मुलामुलींसाठी लिहिता येतं, असा माधुरी पुरंदरे यांचा दंडकच आहे बहुधा. तो आधीच्या ‘चित्रवाचन’ प्रकल्पातही दिसला होताच, पण इथं ‘लिहावे नेटके’मध्ये तो आणखी प्रकर्षानं पुढे येतो.
हे पुस्तक मुलीनं किंवा मुलानं गाळलेल्या जागा भरून पूर्ण करण्याचं आहे. पाचवी ते सातवीतल्या मुलामुलींच्या ऐवजी मोठय़ा माणसांनीच हे पुस्तक अभ्यासलं तरी त्यांचं मराठी सुधारणारच, पण कुणाच्याही एकटय़ाच्या ‘वाचन- मनन- लेखना’ची सुविधा हे पुस्तक पुरवतं. त्यामुळे ‘शेजारचा तक्ता बघ’, ‘पुढील उतारा नीट वाच’ अशा संवादात्मक सूचना त्यात येतात. उदाहरणार्थ ‘वर्तमानकाळ’ या भागात (पान १३६ )..
‘‘‘सर्कशीचा खेळ सुरू होण्याची वेळ झाली तरी तुझ्या मित्रांचा कंपू पोहोचलेला नाही. त्यांची तिकिटे काढून तू ती डोअरकीपरकडे ठेवली आहेस आणि तंबूत जाऊन समोर जे दिसत आहे, त्याचे वर्णन मित्रांना मोबाइलवरून सांगत आहेस. त्यातील हे काही मुद्दे :
- प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला तंबू.
- सर्व वयांचे प्रेक्षक; त्यांत मुलांची संख्या जास्त
- रिंगणात दोन विदूषक, एक हत्ती, त्याच्या पुढय़ात मोठा चेंडू
आणखी खूप भर घालून वर्णन रंगव, म्हणजे तुझे मित्र लवकर येतील. त्यांना काय काय सांगशील? लिही.
- मी तिकिटं काढलेली आहेत.. ’’’
असा थेट संवाद साधण्यावर या पुस्तकाचा भर आहे!
आणि फक्त मराठी भाषेतूनच नाही साधलेला हा संवाद.. सर्कशीबद्दलच्या या उता-यासोबत सर्कशीचा फोटो आहे आणि पुस्तकाच्या पानोपानी स्वत: माधुरी पुरंदरे यांनी केलेली चित्रं आणि संदेश भंडारे यांनी टिपलेले फोटो! याखेरीजही काही फोटो- उदाहरणार्थ मोनॅको या देशातल्या दृश्याचा वगैरे.. पुस्तकात काही ठिकाणी वापरले आहेतच. पण या पुस्तकातली चित्रभाषा एवढय़ावरच संपत नाही.
इथं सोबत काही स्केचवजा चित्रं दिसताहेत, ती ‘बघून त्यातले संवाद ऐकण्याचा’ प्रयत्न करायला हे पुस्तक सांगतं! मग हे ‘चित्रातून ऐकलेले’ संवाद लिहून काढण्याचा प्रयत्नही करायचाच.. किंवा भूकंप, 26 जुलैसारखा मोठा पूर, जळणारं शेत अशा दृश्यांचे फोटो (पान :172 ‘भूतकाळ’) आणि ‘या दृश्यांसारखी दृश्ये तू स्वत: कधी पाहिली किंवा अनुभवली आहेस का? किंवा ज्यांनी अनुभवली, त्यांच्याकडून त्याबद्दल काही ऐकले-वाचले आहेस का? काय घडले? कसे घडले? का घडले? पाहून किंवा ऐकून तुला काय वाटले? लिही.’ असा स्वाध्याय.
पुस्तकाच्या अनेक वेगळेपणांपैकी, त्याची दृश्यमयता हा अगदी व्यवच्छेदक वेगळेपणा! मराठी व्याकरणातल्या संकल्पना ‘वापरकर्त्यां’च्या गळी उतरवणारं कोणतंही पुस्तक एवढं सचित्र नाही. चित्रांमुळे पुस्तकाची निर्मितीमूल्यं चांगलीच असावी लागतात- कागद पांढराधोपच वापरायचा, तो किमान अमुकतरी ‘जीएसएम’ जाडीचा हवा, संगणकीय रंगनिश्चिती किंवा ‘कलर करेक्शन’मध्ये पिवळा-लाल-निळा या तीन छटांचा समतोल योग्यच हवा.. ती सगळी बंधनं खुषीनं पाळणारं हे पुस्तक आहे, असं ‘दिसतं’!
‘चित्रं आहेत..? छान छापलीत? व्वा वा वा.. ’असं म्हणालाच नाहीत किंवा तुम्हाला तसं वाटलंसुद्धा नाही तरीदेखील हे पुस्तक तुमच्यावर परिणाम करतंच. ‘तुमच्या’वर म्हणजे, लहानथोर सर्व वयांच्या वापरकर्त्यांवर. वाचणं, चित्रं पाहणं, प्रश्नांची उत्तरं लिहिणं या सा-या क्रिया म्हणजे पुस्तकाच्या ‘वापरा’चे भाग. माधुरी पुरंदरे तुम्हाला नसल्या ओळखत तरी भाषा शिकण्याच्या युक्त्या त्या जाणतात. ‘सिनास्थेशिया’चा (संवेदना आणि ज्ञानेंद्रिये यांची मेंदूशी आंतरकर्मीय आंतरसंबंधता - म्हणजे ऐकून किंवा वाचून दृश्य डोळय़ांसमोर येणं, दृश्य पाहून त्यातले आवाज कळणं, असा) अनुभव तुम्हाला आल्याखेरीज तुमचं शिकणं घट्ट होत नाही. केवळ ‘मेंदूत साठवा’ अशा पद्धतीनं व्याकरण नाही शिकता येत. तुम्हाला कशासाठी कोणतं क्रियापद ‘योजायचं’ कोणता शब्द ‘निवडायचा’ हे सवयीचं झालं की तुम्ही भाषेचे ‘नेटके’ प्रयोग करू शकता. मराठी भाषेचे असे योजक प्रयोग इतके कमी होतात की ‘योजक कोठे मिळेऽनाऽ’ अशा स्थितीचं वर्णन करण्यासाठी ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ या संस्कृत शब्दांचाच आधार घ्यावासा वाटतो.
मोबाइल, लॅपटॉप, कार्टूनची सीडी.. असे भरपूर इंग्रजी शब्द या पुस्तकात आहेत. ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ या मूळ संस्कृत सुभाषितांशाला जसा अस्सलपणाचा गाभा आहे आणि ‘योजक कोठे मिळेऽनाऽ’ हे ‘ठीक- पण- उपरं’ वाटतं, तसा प्रकार या शब्दांबद्दलही आहे. शिवाय, ‘स्टेशनावर’, ‘टेबलाच्या’ अशी सामान्यरूपं आपण एरवीही वापरतो, ती पुस्तकात बेमालूमपणे, पण आवर्जून वापरली आहेत!
वर्णमालेच्या ओळखीपासून पुढे अनुस्वार, क्रियापद, कर्ता, कर्म, सर्वनाम, तिन्ही काळ, विभक्तीप्रत्यय यांचं मूलभूत ज्ञान देतानासुद्धा असाच ‘बेमालूपणा’- विभक्तीप्रत्ययांच्या भागात कुठेही ‘प्रथमा- द्वितीया’ अशा त्या व्याकरण नामक आढय़ ऋषीच्या सप्तकन्या तुम्हाला छळायला येत नाहीत. त्याऐवजी ‘योजकता वाढवणे आणि ती तासून/घासून लखलखीत करणे’ यावरच पुस्तकाचा भर आहे. दुस-या भागातल्या विशेषणं, समानार्थी आणि समोच्चारी, उपसर्ग, उभयान्वयी अव्यय यांच्यापासून ते लेखन-संवादभाषा, वाक्यरचना, वाक्प्रचार, परिच्छेद, शब्द-अर्थाची देवाणघेवाण, आणि शब्दांशी खेळण्याचं (रण/) अंगण खुलं करून देणारा अखेरचा ‘शब्दक्षेत्र’ हा भाग इथर्पयत सगळीकडे मराठीखेरीज ‘दृश्यभाषा’ महत्त्वाचं काम बजावते. भाषा म्हणजे व्याकरणाची ओझी वाहणं नाही, भाषा म्हणजे व्यक्त होणं, ‘नेटका’ संवाद साधू शकणं आणि त्याद्वारे चांगलं जगणंसुद्धा, असा विश्वास हे पुस्तक सर्व पानांमधून जपतं. पुस्तकावर आक्षेपच घ्यायचे असतील तर, ‘समाजाच्या एका विशिष्ट आर्थिक वर्गातल्या मुलामुलींचंच भावविश्व या पुस्तकानं गृहीत धरलं आहे’ असा लंबाचौडा आक्षेप घेता येईल. पण ‘शेत जळतंय आणि त्यावर कुणीतरी पाणी ओततंय म्हणजे ही शेतीमधली ‘भाजणी’ची क्रिया की खरंच शेताला आग लागलीय?’ असे प्रश्न त्या आर्थिक वर्गार्पयत नक्की पोहोचवण्याचं कामही या पुस्तकातून झालं आहेच. भाषेबद्दल गळे काढायचे किंवा भाषाप्रेम दाखवणारे बंद गळय़ाचे टीशर्ट घालायचे एवढंच मध्यम आणि उच्च मध्यम आर्थिक वर्गीय मराठीजनांना माहीत असल्याचं गेल्या दशकभरात वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्या वर्गाला ‘टार्गेट’ करून भाषाप्रेम पुन्हा शिकवण्याची गरज होतीच, ती या पुस्तकानं पूर्ण केली आहे.
लिहावे नेटके : माधुरी पुरंदरे
ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई
पाने : ६०३ दोन खंड मिळून
(तिसरा उत्तरे- खंड)
संचाची किंमत :400 रु.
- लेख- त्रिगुण त्रैलोक्य (सौजन्य दैनिक प्रहार)
मराठी समृद्ध होत आहे
कोण म्हणतं मराठीत अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक काम होत नाही ? अलीकडे मराठीमध्ये अनेक अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक प्रकल्प प्रकाशित झाले आहेत. काही येऊ घातले आहेत. अशा काही भरभक्कम प्रकल्पांची ही ओळख.
प्रकल्प
ई-संमेलन कशासाठी? - भूमिका
'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.
गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा


Comments
Post new comment