आभासी विश्वाचे वास्तव

संवेद गळेगावकर.

'रेषेवरची अक्षरे' हा इंटरनेटवरच्या मराठी साहित्याचा एक दर्जेदार दिवाळी अंक. हा अंक मराठी ब्लॉग विश्वातून सकस मराठी लेखन शोधून काढतो आणि अशा 'हौशी' लेखकांच्या दर्जेदार लेखनाची मेजवानी ई-वाचकांना देतो. या अंकाच्या उपक्रमाबद्दल त्यांच्याच शब्दांत...

वेब २.० आलं आणि दुतर्फा संवादाच्या असंख्य शक्यता नव्याने जन्माला आल्या. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग इ. ही सारी वेब २.०ची अपत्ये. प्रत्येकाचा हेतू एकच-संवाद. संवाद या एका मूलभूत गरजेच्या किती म्हणून मिती असाव्यात याच्या सा-या कल्पनांना मोडीत काढत, या माध्यमांनी, नवनवीन आभासी विश्वांना जन्म दिलाय.

ब्लॉग बद्दल बोलायचं तर थोडसं नोंदवही/डायरी, असं रूप असलेलं, तुलनेनं अनाकर्षक असं हे माध्यम. आपण लिहीलेलं कुणी आणि का वाचावं या संभ्रमात असलेले ब्लॉगर्स (ब्लॉग-लेखक), शब्दांच्या महापुरात नेमकं काय आणि किती वाचावं याचा अंदाज घेऊ न शकणारे वाचक आणि (मुख्यतः) इंग्रजीतून संवादाचं बंधन यामुळे या माध्यमाचं भविष्य काय हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच युनिकोडच्या रूपाने प्रादेशिक भाषांमधे लिहीणा-यांसाठी एक छोटीशी क्रांतीच झाली. युनिकोडमुळे कुठल्याही विशेष सॉफ्टवेअर्सच्या गरजांशिवाय मातृभाषेत लिहीण्याची सहजच सोय झाली. बघता बघता मराठीतही ब्लॉगर्सचा सुकाळ झाला. साहित्यिक, पाककलाविषयक, भविष्याबद्दल, तांत्रिक माहीती देणारे असे एक ना अनेक विविध विषयांवर मराठी ब्लॉग वेगाने उदयाला आले आणि बरेचसे वेगाने बंदही झाले.

याच सुमारास, ब्लॉगवरच्या साहित्यविषयक नोंदींचं संकलन करण्याच्या संकल्पनेला एक ठोस स्वरूप देण्यासाठी संवेद (http://samvedg.blogspot.com/), मेघना(http://meghanabhuskute.blogspot.com/), अ सेन मॅन (http://asanemanthinks.blogspot.com/) आणि ट्युलिप (http://tulipsintwilight.blogspot.com/) ही ब्लॉगर मंडळी एकत्र आली. या मंडळींनीं रेषेवरची अक्षरे(http://reshakshare.blogspot.com/) या नावाने २००८ मधे पहिला ब्लॉग-दिवाळी अंक काढला. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे नियम म्हणजे निवडलेल्या नोंदी साहित्य-प्रकारात मोडणा-या असाव्यात आणि ठराविक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या त्या सर्वोत्तम नोंदी असाव्यात. या सा-या प्रक्रियेत संपादक म्हणून आमच्यापुढे असंख्य अडचणी असतात. काही समान आवडींमुळे आम्ही चौघे एकत्र आलो आहोत. पण ही ओळख इंटरनेटच्या आभासी विश्वाला साजेशीच आहे. आम्ही चौघे कधीही एकत्र भेटलेलो नाहीत. काही टोपणनावांखालच्या ख-या ओळखी सोडल्या तर अगदी चेहरेही सर्वथा अनोळखी! दिवाळीच्या काही महिने आधी आम्ही आमच्या वाईट्ट व्यावसायिक वेळापत्रकातून वेळ काढून, जगाच्या कानाकोप-यातून रात्रीबेरात्री इंटरनेटच्या माध्यमातून भेटतो. सर्वसाधारणपणे १५०-२०० ब्लॉग आणि त्यावरच्या पाचसहाशे नोंदी आम्ही संपादकाचा चष्मा लावून चाळून काढतो. प्रत्येक संपादकाने निवडलेली प्रत्येक नोंद ही कशी सर्वोतम आहे हे इतर तीन संपादकांनां पटेपर्यंत प्रत्येक लेखाचा कीस पाडला जातो. आणि इतर ब-याच खटाटोपींनंतर `रेषेवरची अक्षरे`चा अंक प्रकाशित होतो.

आज गेली चार वर्ष सलग हा उपक्रम चालवल्यानंतर मागे वळून बघताना या उपद्व्यापामागच्या उर्जेचा शोध घेताना बरंच काही उमजत गेलं. `रेषेवरची अक्षरे` सुरू केलं तेव्हा ब्लॉगवरच्या काही सर्वोत्तम साहित्यिक नोंदींचं संकलन एव्हढाच ढोबळ उद्देश होता. पण या मागची व्यापकता कालांतराने उलगडली. ब्लॉग हा तसा ब-यापैकी हौशी मामला. आपापले व्यवसाय सांभाळत लिहीताना काळ-काम-वेग या त्रैरासुराच्या राज्यात लिखाणाचा कोंभ कधी कोमेजून गेला, हे ब-याच चांगल्या ब्लॉगर्सनां समजतही नाही. अनुभवांनां निव्वळ शब्दबद्ध करणं म्हणजे लिखाण नाही, गजलेचं वजन सांभाळल्यानं चांगली गजल बनत नाही, बेताल कविता म्हणजे मुक्तछंद नाही हे आणि असेच जुनेच अनुभव संपादक म्हणून आम्हाला नव्याने आले. इंटरनेटच्या महाजालात चांगलं लिहिलेलं विरून जायला वेळ लागत नाही, हे ही लक्षात आलं. संपादकाची भूमिका थोडीशी गंभीर झाली. `रेषेवरची अक्षरे`चे चारही वर्षांचे अंक आम्ही संदर्भासाठी म्हणून एका जागी आणले.

ब्लॉगरनां लिहीण्याची उर्मी सोडली तर कसलंच मोटिव्हेशन, फायदा नसतो. त्यांना लिहीतं ठेवण्यासाठी नोंदींचा खो खो असे काही उपक्रमही आम्ही केले. "मला मूळात लिहावं का वाटतं?" किंवा "मावशीबोलीतल्या कविता" हे काही समाधान देऊन गेलेले खो खो. एका ब्लॉगरनं लिहायचं आणि परिचित ब्लॉगरला याच विषयावर लिहीण्यासाठी खो द्यायचा असं काहीसं या खेळाचं स्वरूप. या वर्षी एक पायरी ओलांडून आम्ही "लैंगिकता आणि मी" या विषयावर `रेषेवरची अक्षरे`च्या अंकात मुक्तचिंतन ठेवलं होतं. त्याला लिहिणा-यांचा आणि वाचणा-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच विषयावर कथा, कविता, आत्मचिंतन अशा कित्येक प्रकारे ब्लॉगर प्रकट झाले.

ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याला नवं वळणं द्यायचा प्रयत्न करतो असं म्हणणं फार धाडसाचं आहे. पण आमच्या ग्लोबल गावकरी असण्याने, विविध संस्कृतींना सामोरे जाण्याने, बहुभाषिक असण्याने मराठीत नवे संदर्भ येताहेत हे नक्की. कथांमधे चित्रकलेसारखे क्युबिझमचे प्रयोग केले जाताहेत. चित्रकलेला शब्दात रंगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक संस्कृतीचे दुवे स्थानिक संदर्भात मिसळून गंभीर कथा लेखन होत आहे. एकीकडे पारंपरिक वळणाच्या अलंकारिक कवितांना उजाळा मिळताना दिसतोय तर दुसरीकडे स्वतःला अंतर्बाह्य तपासणा-या कविता मुक्तछंदातून प्रकट होताना दिसताहेत. पारंपरिक अर्थाने किंवा प्राध्यापकीय समीक्षा नसेल पण कविता: आधी, आता आणि पुढे? किंवा `कोसला आणि `कॅचर इन द राय` - एक तुलना` असे अत्यंत गंभीरपणे केलेले लिखाण समीक्षेच्या आयामात आपल्या परीने भर घालत आहे.

ब्लॉग हे माध्यम आम्ही गंभीरपणे घेतोय. गरज आहे ती या प्रयत्नांना प्रोत्साहान देण्याची, मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाशी या नव्या दमणूक करणा-या माध्यमाला एक समांतर प्रवाह म्हणून मान्यता देण्याची. आमच्या लिहीण्यावर, वाचण्यावर, विचारक्षमतेवर विविध व्यवसाय, विविध देश, विविध भाषा पूर्वी कधीच नव्हता एव्हढा प्रभाव टाकताहेत. त्यातून मिळणारे अनुभव काही प्रस्थापित चौकटी मोडणारेही असतील आणि काही नवनिर्माण करणारे असतील. या आभासी विश्वाचं खरं तर एवढंच वास्तव!
........................

Comments

पहिला दिवाळी अंक

इंटरनेटवरचा पहिला दिवाळी अंक मायबोलीने 2000 मधे सुरु केला. रेषेवरच्या अक्षरांच्याही अगोदर कितितरी दिवाळी अंक सुरु झाले. त्यामुळे हा अंक पहिलाच काय पण पहिल्या दहात सुद्धा नाही.

छान लेख....आता पर्यन्त चे

छान लेख....आता पर्यन्त चे सगळे दिवाळयी अन्क वाचलेले आहेत. अतिशय उत्तम उपक्रम आहे. बहेरच्या देशात राहणार्या लोकाना दिवाळी ची मेजवानी आहे ही. 2011 च्या अन्का मधला 'लैन्गिकता आणि मी' हा विभाग विशेश(पोटफोड्या श कसा लिहयचा?) आवडला.

Post new comment

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Use to create page breaks.

More information about formatting options

CAPTCHA
This question is for testing whether you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Image CAPTCHA
Enter the characters shown in the image.

ई - बुक

चार ई-बुकं वाचली म्हणजे...

ई-बुक म्हणजे नक्की काय ? इंटरनेटच्या क्रांतीने पुस्तकांचं जग कसं बदलतंय ? त्याने छापील पुस्तकांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह खरंच निर्माण केलंय का ?... या सगळ्याचा उहापोह.

शिफारस

यात आम्ही करतोय शिफारस, आवर्जून भेट द्यावी अशा काही संकेतस्थळांची, ब्लॉगची...मराठी साहित्य आणि भाषेशी संबंधित मराठी वेबविश्वावरच्या निरनिराळ्या उपक्रमांचा अंदाज त्यावरून वाचकांना नक्कीच येऊ शकेल.

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष. 

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं  अवघडच होतं.
पुढे वाचा