जातीय-वर्गीय उन्मादाचा बळी

नितीन आगे. वय वर्षे 17. राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, राज्य- सुधारकांचं मानलं जाणारं महाराष्ट्र राज्य. नितीन हा अकरावीत शिकणारा दलित मुलगा. 28 एप्रिल 2014 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नितीनला शाळेच्या आवारातून मुख्याध्यापक व शिक्षकांच्या देखत मारहाण करत नेलं गेलं... तीन-चार तास अमानुष छळ करून त्याची हत्या करण्यात आली. का? कारण एका उच्चवर्णीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. कुणी केली हत्या? मुलीचा 21 वर्षीय भाऊ, अन्य नातेवाईक व मित्रांनी.
सध्या निवडणुकीचं वारं सुरू असताना वृत्तवाहिन्यांचे सूत्रधार, भाजपसमर्थक, तथाकथित बुद्धिवादी तावातावाने असं म्हणत होते, की या निवडणुकीवर नवा युवावर्ग आपला मोठा ठसा उमटवत आहे. त्याला जातपात वा धर्माधिष्ठित राजकारणाचं वा विचारांचं जराही मोल राहिलेलं नाही. त्याला हवा आहे विकास, सुशासन. किती विसंगत! नितीन नावाच्या दलित तरुणाची हत्या हे काही दलित अत्याचाराचं विरळा उदाहरण नाही. खैरलांजीपासून एकापाठोपाठ एक अशा अनेक घटना घडत आहेत. हत्या होत आहेत. आणि तरुण दलितांची हत्या करण्यात पुढे आहे तोसुद्धा उच्चवर्णीय तरुण. गावांचं निमशहरीकरण करून विकास साधू पाहणार्यांना, ‘सोशल मीडिया’तील तरुणांच्या ‘लाइक्स-अॅग्री’ वा थिल्लर ‘कॉमेंट्स’वरून युवावर्गाचा सामाजिक सहभाग व त्यांची सक्रियता वा ‘बदलत्या जाणिवा’ याबाबत अनुमान काढणार्यांना जातिभेदाची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे कसं कळणार? महत्त्वाचं म्हणजे ज्या सवर्ण युवावर्गाच्या हाती विकासाची ङ्गळं लागली आहेत तोच युवा घटक अधिक जातीय अहंमन्यता, उन्माद, विद्वेष बाळगून आहे का, असे प्रश्न आभासी ‘वेब दुनिये’त जगू पाहणार्यांना कसे पडणार? नरेंद्र मोदी यांना भरभरून मतं देणार्या युवावर्गाने जात-धर्म यापलीकडे जाऊन केवळ ‘विकासपुरुष’ म्हणून त्यांना मतं दिली, असं माध्यमवीर आणि अनेक स्तंभलेखक आज बिनदिक्कत म्हणताना दिसत आहेत, परंतु जमिनीवरचं वास्तव मात्र विपरीत आहे, हेच नितीन आगे हत्या प्रकरणामुळे पुढे आलं आहे.
‘प्रगत’ युवावर्ग अधिक उन्मत्त?
नितीनचा मृत्यू वैयक्तिक भांडणातून ओढवला आणि त्याने नैराश्यातून आत्महत्या केली; यात जातीय तेढीचा काही प्रश्न नव्हता, असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि गावातील धनदांडगं कुटुंब, पोलिस, शाळा असे समाजातील किती तरी घटक त्यासाठी प्रयत्नशील होते, असे आरोप स्थानिक दलित कार्यकर्त्यांनी हत्येनंतर केले होते. त्याची दखल घेऊन राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांची अनेक सत्यशोधन पथकं त्वरित खर्डा इथे जाऊन पोहोचली. त्यामुळेच त्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं व शासनावर दबाव वाढून कारवाईला योग्य दिशेने सुरुवात तरी झाली.
घटना घडून गेल्यावर ज्या अनेक सत्यशोधन समित्या खर्डा इथे जाऊन पोहोचल्या त्यात पन्नालाल सुराणा यांच्या नेतृत्वाखाली गेलेली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑङ्ग सोशल सायन्सेस’ (टीआयएसएस)मधील अभ्यासकांची समिती; ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, प्रतिमा जोशी आणि सुबोध मोरे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेली ‘दलित अत्याचारविरोधी कृती समिती’; पुण्याहून किरण मोघे, संजय दाभाडे, मनोहर जाधव; मुंबईहून अशोक ढवळे आदींचं एक पथक अशा अनेकांचा समावेश आहे. या समित्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांतून या घटनेशी निगडित अनेक पैलूंवर प्रकाश पडला आहे, अनेक तथ्यं समोर आली आहेत. या समित्यांचे निष्कर्षही जवळपास सारखेच आहेत. त्यातून या घटनेमागील अनेक जातीय-वर्गीय पैलू स्पष्टपणे पुढे येतात.
जातीय-वर्गीय पैलू
या अहवालांनुसार नितीनचे वडील राजू आगे व त्यांचं कुटुंब हे आधी जवळच्याच गीतेवाडी गावात राहत होतं. दहा वर्षांपूर्वी या भूमिहीन कुटुंबाने खर्डा गावात स्थलांतर केलं. खर्डा गावात मजुरी मिळण्याच्या संधी तुलनेने अधिक होत्या. राजू आगे यांना येथील एका गिरणीशी निगडित उद्योगात दगडङ्गोडीचं काम मिळालं. खर्डा गावाच्या गावठाणापासून एखादा किलोमीटर दूर (राज्यमार्ग 157च्या लगत) एका झोपडीवजा कुडाच्या घरात ते राहू लागले. त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना ‘रयत शिक्षण संस्थे’च्या शाळेत घातलं.
मुख्य आरोपी सचिन गोलेकरची पार्श्वभूमी अगदी याउलट. मराठा समाजातील गोलेकर कुटुंबाचा गोतावळा बराच मोठा. संयुक्तपणे त्यांची संपत्ती पाहिली तर एकूण सुमारे पाचशे एकर जमीन, काही किराणा दुकानं, कपड्यांचं दुकान व एक मोठी वीटभट्टी, ज्यावर सुमारे 30-40 मजूर काम करतात.
आता इतकी जातीय-वर्गीय तङ्गावत असल्याने नितीनने सचिनच्या बहिणीशी प्रेम करणं ही गोष्ट सचिनला सहन झाली नाही. घटनेपूर्वी काही दिवस आधी सचिन व त्याच्या मित्रांनी नितीनला मारहाण करून समज दिल्याचंही गावकरी सांगतात. परंतु असं असूनही 28 एप्रिलला जेव्हा नितीन व सचिनची बहीण शाळेच्या मागील भागात एकमेकांशी बोलताना आढळले तेव्हा सचिन व त्याच्या मित्रांनी नितीनला धरलं व शाळेच्या आवारातच मारहाण करण्यास सुरुवात केली. शाळेच्या घंटेचा टोल वाजवण्यासाठी वापरात असलेल्या दांडक्याने त्याच्यावर प्रहार केले जात होते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी नितीनला वाचवण्याचा प्रयत्न न करता उलट ‘जे काय करायचं ते आवाराबाहेर नेऊन करा’, अशी ‘अजब’ भूमिका घेतली. त्यानंतर नितीनला तिथून मारत मारत, ङ्गरङ्गटत गोलेकरांच्या वीटभट्टीवर नेलं गेलं. तिथे गरम सळईने त्याला चटके दिले. गरम सळई त्याच्या गुदद्वारात खुपसली गेली. असे सर्व अत्याचार त्याच्यावर होत असताना एका मजूर बाईने त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. नंतर नितीनला जवळच्या भैरोबा डोंगरावर नेलं गेलं आणि तेथील एका झाडावर टांगून त्याने ङ्गास लावून आत्महत्या केल्याचा देखावा उभा केला गेला. सकाळी साडेअकरापासून सुमारे तीन तास हे क्रौर्याचं नाट्य सुरू राहिलं. दुपारी साडेतीनच्या दरम्यान नितीनचं शव तिथे आढळल्याची बातमी कुणी तरी राजू आगे यांना सांगितली. (तोवर नितीन घरी का आला नाही याच चिंतेत ते होते.) त्यानंतर हलकल्लोळ उडाला. गावच्या दलित कार्यकर्त्यांनी पोलिसांना वर्दी दिली, पण त्याआधी त्यांनी नितीनच्या शरीरावरील जखमांचीही छायाचित्रं काढली होती.
गोलेकर कुटुंबाचा गावात मोठा दबदबा असल्याने पोलिस ‘अपघाती मृत्यू’चा गुन्हा दाखल करून मोकळे होण्याच्या प्रयत्नात होते. शवविच्छेदनाच्या अहवालात चटके दिल्याच्या जखमांचा उल्लेख नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. त्यानंतर उपरोक्त अनेक ‘सत्यशोधन पथकं’ तिथे पोहोचल्यावर दबाव वाढला. परंतु, तेथील उप-अधीक्षक पाटील यांनी या समित्यांनाही तपशील सांगण्यास टाळाटाळ केली. एका समितीचे प्रतिनिधी शाळेच्या मुख्याध्यापकांनाही भेटले; परंतु त्यांनीही ‘नितीन त्या दिवशी शाळेतच आला नव्हता’ इथपासून ‘डिङ्गेन्स’ घेण्यास सुरुवात केली, तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. मग तर मुख्याध्यापकांचा खरोखरच रक्तदाब वाढला आणि त्यांनाच दवाखान्यात भरती करावं लागलं. पोलिसांनी शाळेच्या शिक्षकांची व वीटभट्टीवर नितीनचा बचाव करू पाहणार्या बाईची जबानी का नोंदवून घेतली नाही, या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर पोलिस देऊ शकले नाहीत. कार्यकर्त्यांच्या मते ‘रयत शिक्षण संस्थे’चे चालक आणि गोलेकर कुटुंब ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’शी निगडित असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात कडक पावलं उचलण्यास कचरत आहेत.
वाढतं शिक्षण, वाढता अत्याचार!
एकंदरीत, राज्यभर या प्रकरणाची वाच्यता झाल्याने अखेरीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी सचिन गोलेकर, त्याचे मामा शेषराव येवले व अन्य अकराजणांना अटक केली आहे. या प्रकरणात पुढे खरोखरच न्याय मिळेल अशी आशा आहे.
या अहवालातून पुढे आलेला आणखी एक महत्त्वाचा पैलू हा, की खर्डा गावात इतरांच्या तुलनेच दलित समाजातील शिक्षणाचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे गावातील सुमारे 80 दलित घरांपैकी 10 घरांकडे प्रत्येकी एक ते दीड एकर जमीन, तर बाकी सर्व भूमिहीन, मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारे वा बँडपथक चालवणं वगैरे उद्योग करणारे. मात्र, इतर जातींच्या तुलनेत त्यांच्यात शिकण्याचं प्रमाण मोठं होतं. त्यामुळे गावाच्या आर्थिक-सामाजिक रचनेत हलकासा बदल संभवत होता. या पार्श्वभूमीवर, ङ्गक्त एका शाळेत शिकतो म्हणून नितीनला गोलेकर कुटुंबातील मुलीशी मैत्री करण्याचा हक्क पोहोचतो, हे उच्चवर्णीयांना सहन होत नव्हतं. हे सरंजामी वृत्तीला आव्हान देणारं वाटत होतं.
यातील अखेरची गोष्ट. नितीनचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
परंतु तिला एका अन्य शहरातील इस्पितळात ठेवलं गेलं
व ती मृत्यूशी झुंजत आहे, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी यावरही ‘चुप्पी’ साधलेली आहे. सर्व समित्यांनी तिच्या सुरक्षेची हमी देण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.
एकंदरीतच विषण्ण करणारी ही घटना. उदारीकरणाच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, या न्यायाने गावातील सवर्ण-समृद्ध जन अधिक श्रीमंत झालेच, पण त्याचसोबत जातीय विद्वेषी भाव अधिक तीव्र झाला असंच म्हणावं लागेल. ‘टीआयएसएस’च्या अहवालात ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’ने (केंद्रीय गृहखात्याच्या अधिपत्याखालील) प्रसृत केलेल्या आकडेवारीचा हवाला दिला आहे. त्यानुसार 2009मध्ये अनुसूचित जातीविरोधातील गुन्ह्यांची संख्या 33,655 इतकी होती. महाराष्ट्रात अशा गुन्ह्यांची संख्या 2010 मध्ये 1132 होती, तर 2012 मध्ये 1091 इतकी होती. या पार्श्वभूमीवर, नितीनच्या हत्येचं प्रकरण धसास लागणार वा नाही याला महत्त्व राहणार आहे
- मिलिंद चंपानेरकर