काश्मीरचे विद्यार्थी ‘देशद्रोही’?

मीरतच्या स्वामी विवेकानंद विद्यापीठात शिकणार्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी ‘एशिया कप’साठीचा भारत-पाकिस्तानमधील सामना पाकिस्तानने जिंकल्यावर आनंदाने टाळ्या वाजवल्या असा त्यांच्यावर आरोप झाला. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये भांडणंही झाली. मग विद्यापीठाने ‘शांतता राखण्याचं’ कारण देऊन ६७ काश्मिरी विद्यार्थ्यांची काश्मीरमध्ये बोळवण केली. पोलिसांनी तर त्या विद्यार्थ्यांवर टाळा वाजवून ‘देशद्रोही कृती’ केली म्हणून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा (कलम १२४ अ.भा.द.वि.चा) गुन्हा नोंदवला. काश्मीरमधून शिक्षणासाठी मीरतला म्हणजे आपल्याच देशातील दुसर्या भागात येणार्या, विश्वासाने अन्य भागातील होस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण करू पाहणार्या विद्यार्थ्यांची मानसिकता देशविरोधी असू शकते? तशी असती तर ते शिक्षण घेण्याऐवजी दहशतवादी गटात सामील झाले नसते?
उपलब्ध माहितीनुसार ते अभूतपूर्व खेळी खेळणार्या शाहिद आफ्रिदीच्या फटकेबाजीने उत्तेजित झाले होते. यात गैर ते काय? आपण क्रिकेटप्रेमींनी ब्रायन लारा, ख्रिस गेल (वेस्ट इंडिज), जयसूर्या (श्रीलंका) यांच्या फटकेबाजीवर वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी यांच्या फटकेबाजीवरील प्रेमासारखंच प्रेम केलं नाही का? त्यांच्या फटकेबाजीमुळे भारत हरला तरी खिलाडूवृत्तीने प्रचंड दाद दिली नाही काय? त्यामुळे आपण ‘देशद्रोही’ ठरलो का? नाही ना? मग शाहिद आफ्रिदी केवळ पाकिस्तानचा आहे म्हणून त्याला दाद द्यायची नाही, हा कोणता न्याय झाला?
समजा, त्यातील काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ टाळ्या वाजवल्या असतील तर ते त्यांनी मन:पूर्वक, जाणीवपूर्वक देशविरोधी भावनेने केलं असेल? हे लक्षात घ्यायला पाहिजे, की हे विद्यार्थी ऐन विशीतील आहेत. म्हणजे १९८९ पासून काश्मीरमध्ये वातावरण कलुषित झाल्याच्या काळात ते लहानाचे मोठे झाले आहेत. लष्कराची उपस्थिती, ‘आफ्स्पा’सारखे कायदे यामुळे भारतविरोधी घोषणा देणार्यांची तिथे वानवा नाही. तरीही ते शिक्षणाकरिता भारतात अन्यत्र जात आहेत त्याअर्थी ते संमिश्र मनोवस्थेत आहेत. अशा वेळी त्यांनी उत्तेजित होऊन टाळ्या वाजवल्या तर अशा संस्कारक्षम मुलांशी संवाद वाढवून, त्यांना मानसिकदृष्ट्याही प्रमुख प्रवाहात आणण्याचा, विश्वास निर्माण करून तुटलेपणाची भावना कमी करण्याचा प्रयत्न करायचा, की भयावह ‘देशद्रोहा’चा गुन्हा नोंदवून त्यांच्यातील तुटलेपणाची भावना वाढवायची, याचा आपण विचार करायला हवा.
काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आवाहन केल्यावर उत्तर प्रदेशचे युवा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमदेपणा दाखवून या विद्यार्थ्यांवरील देशद्रोहाचे आरोप मागे घेतले, हे चांगलंच झालं. परंतु हे विद्यार्थी अजून विद्यापीठात परतले नाहीत. त्यांच्यावरील या काळ्या ठपक्याने त्यांचं शिक्षण खंडित झालं. आणि ते गैरमार्गावर वाटचाल करू लागले तर जबाबदार कोण?
आपण साकल्याने विचार करून दहशतवादाविरोधात खंबीर भूमिका घ्यायला हवी, परंतु कोवळ्या वयातील मुलांच्या छोट्याशा कृतीखातर त्यांच्यावर अतिरेकी कारवाया करत राहिलो तर अतिरेकी कोण ठरेल?
-मिलिंद चंपानेरकर
मोबाइल : ९८२३२४८००३
champanerkar.milind@gmail.com