माग आमच्या शोधाशोधीचा!

Unique lekh photo.jpg

‘युनिक फीचर्सची मंडळी आलीत याचा अर्थ आमच्या हाती काही तरी खमंग विषय पडणार!’ असं म्हणत आमचं स्वागत कुणी संपादक करेल, असं ही संस्था सुरू करताना आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ‘युनिक फीचर्स’ हा उपक्रम सुरू झाल्यानंतर दोन-तीन वर्षांतच असे सुखावणारे शब्द आमच्या कानावर पडू लागले. तेही कुणाकडून, तर ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून, गोविंद तळवलकर संपादक असलेल्या दैनिकातून. अशोक जैन यांच्या तोंडून! उत्साहाने फुरफुरणाऱ्या आमच्यासारख्या बावीस-चोवीस वर्षांच्या मुलांना आणखी काय शाबासकी हवी होती तेव्हा?
ही गोष्ट १९९२-९३ची. दोन वर्षांपूर्वी युनिकची सुरुवात झाली होती. आम्ही सर्वजण महाराष्ट्रभर पसरलेल्या महत्त्वाच्या स्थानिक दैनिकांसाठी सर्वशक्तीनिशी लेखनकामाठी करत होतो. हे काम प्रामुख्याने सिंडिकेशनचं (म्हणजे एक लेख एकाच वेळी अनेक दैनिकांत प्रसिद्ध करणं.) होतं. या तंत्रामुळे अल्पावधीत ‘युनिक फीचर्स’चं नाव महाराष्ट्रभर पसरलेल्या चांगल्या वाचकांच्या तोंडी बसलं होतं. (याबद्दल मागील लेखात मी सविस्तर लिहिलेलं आहेच.) पण या स्थानिक दैनिकांप्रमाणेच पुण्या-मुंबईच्या बड्या दैनिकांसाठीही आपण काम करावं, असं आम्हाला सुरुवातीपासून वाटत होतं. आसपास अस्वस्थ करणारे अनेक विषय होते. या विषयांवर शोधाशोध करून उभ्या महाराष्ट्राला हलवून सोडावं, लोकांचं सामाजिक मन ढवळून काढावं, त्यांना खडबडून जागं करावं असं फार वाटे. त्या काळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ ही दैनिकं आघाडीची होती. या दैनिकांतून लिहिलं तर धमाका होईल असं वाटे.
आम्ही बहुतेकजण ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचतच घडलेलो होतो. ‘म’ महाराष्ट्र टाइम्सचा असं वाटणाऱ्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी. म्हटलं, ‘मटा’लाच धडकावं. पण आम्ही इतकी छटाक मुलं होतो की आम्हाला मुंबईत ‘मटा’च्या ऑफिसात तरी घेतील का, असंही वाटे. त्या काळी ‘मटा’चा काहीच्या काही दबदबा होता. मराठी अभिजनांचं मुखपत्रच ते. मराठी साहित्यातली ‘नामी’ माणसं त्यात लिहीत. या नामवंतांच्या मांदियाळीत आपल्याला काय किंमत, असं अंतर्मन म्हणे. पण ते वय धडकण्याचं होतं. एखादा जबरदस्त विषय घेऊन जाऊ ‘मटा’कडे आणि बसू यात त्यांच्या परीक्षेला, असं आम्ही म्हणत असू.

तो काळ महाराष्ट्रातल्या सामाजिक खळबळीचा होता. १९९० साली महात्मा फुले यांची स्मृतिशताब्दी साजरी झाली होती. पुण्यातील डॉ. बाबा आढाव यांनी त्यात बराच पुढाकार घेतला होता. तोपर्यंत आमच्या पिढीला महात्मा फुले फक्त शाळेच्या पुस्तकातच भेटलेले. पण बाबांच्या प्रयत्नांमुळे पुण्यात अनेक उपक्रम राबवले गेले. य. दि. फडके यांनी महात्मा फुल्यांचं समग्र लेखन नव्याने संपादित केल्याने आमच्या पिढीची फुल्यांच्या विचारांशी ओळख झाली. जातिभेद हा विषय महत्त्वाचा आहे, पण जणू तो अस्तित्वातच नाही असं आपला समाज भासवत आहे, असं त्या काळात लक्षात येत होतं. जातिभेद हे महाराष्ट्राचं वास्तव आहे, पण पुरोगामित्वाच्या झुलीखाली ते लपवून ठेवलं जातंय, असं आम्हाला वाटत होतं. महात्मा फुल्यांनी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या घरातली विहीर खुली करून अस्पृश्यतेच्या प्रथेवर आपल्या वर्तनातून दणका दिला होता. त्यानंतर बाबा आढावांनी ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ चालवून जातिभेदाच्या भिंती पाडण्याचा प्रयत्न केला होता; पण तरीही जातिभेदाचा अनुभव सर्वांना सर्वत्र येतच होता. त्यामुळे एकीकडे फुल्यांच्या नावाचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भेदाभेदही चालू ठेवायचा, हे वास्तव आम्हाला अस्वस्थ करणारं होतं.
महात्मा फुल्यांच्या स्मृतिशताब्दी पाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दीही महाराष्ट्राने साजरी केली. पुन्हा तेच. नावाचा गजर आणि जगण्यात मात्र ठणाणा! केवळ जातिभेदच नव्हे तर महाराष्ट्रात अस्पृश्यताही पाळली जातेय, अशी काही उदाहरणं समोर येत होती. हे वास्तव डोक्यात कल्लोळ उडवणारं होतं. म्हणून मग या उदाहरणांचा शोध घ्यायचं आम्ही ठरवलं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महाराष्ट्रभर फिरलो. कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी. आमच्यातील पाच-सहाजण फिरत होते. दलितांवर जिथे-तिथे अन्याय होत आहेत, त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नाहीये, जमीन-पाणी-देवळं-स्मशानं यावरून रीतसर अस्तृश्यता पाळली जातेय, असं धक्कादायक चित्र आम्हाला या फिरतीत दिसलं.
या फिरतीवर आम्ही एक मोठ्ठाच्या मोठ्ठा लेख लिहिला : ‘गाव एकच, पाणवठे अनेक’. महाराष्ट्र टाइम्सने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन ब्रॉडशीटची तब्बल दीडेक पानाची जागा दिली. हा लेख छापून आला आणि त्याद्वारे महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातलं गेलं. जातिभेदाच्या अनुषंगाने आमच्यात असलेली अस्वस्थता महाराष्ट्रभर पोहोचवण्यात या शोधलेखामुळे पहिल्याच झटक्यात यश मिळालं.
युनिक फीचर्सच्या आजवरच्या प्रवासातील हा पहिला शोधलेख. या पहिल्याच लेखाने ‘युनिक फीचर्स’ या नावाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवार पुरवणीचे संपादक अशोक जैन यांच्याशीही या लेखामुळे आमची गट्टी जमली. त्यामुळे लिहिला शोधलेख की आलाच छापून महाराष्ट्र टाइम्समध्ये, असा सिलसिला सुरू झाला.
जातिभेदाच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या वास्तवाने आम्ही तेव्हा झपाटलेलोच होतो जणू. त्यामुळे आम्ही मित्रांनी महाराष्ट्रभर फिरून आणखी दोन खणखणीत शोधलेख लिहून काढले. हे दोन्ही लेख ‘मटा’ने छापले. हे लेखही असेच पानपानभर होते. त्या काळी पुरवण्यांच्या पानांची संख्या कमी असे, पण तरीही मोठे लेख छापण्याची चांगली पद्धत तेव्हा होती. पण आमचे शोधलेख ‘मोठ्या’ लेखांच्याही मापात बसणारे नव्हते. त्यामुळे लेखाच्या आकारावरून अशोक जैन कुरकुर करत, पण विषयांचं गांभीर्य पाहून पूर्ण लेख छापत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त मनाशी धरून आम्ही दलित समाजाच्या अगदी जिव्हाळ्याच्या एका विषयाला हात घातला. १९९१ साली सरकारी जमिनीवरील दलितांनी केलेली अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. महाराष्ट्रभर जी गरीब भूमिहीनांची आंदोलनं चालू होती त्याच्या रेट्यातून हा निर्णय घेतला गेला होता, परंतु विविध कारणांनी या निर्णयाची अंमलबजावणी जवळपास होतच नव्हती. हे का होत आहे, कसं होत आहे, कुणामुळे होत आहे याचा शोध आम्ही मराठवाड्यात फिरून घेतला. गरीब भूमिहीनांना जमिनीच्या मालकीपासून वंचित ठेवण्यातच व्यवस्थेचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत, हे आम्ही आमच्या लेखातून पुढे आणलं. कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळीचा आधार घेत लेखाला शीर्षक दिलं : ‘कधी दिसणार भाकरीचा चंद्र?’ सरकारी पातळीवर मंत्रालयात निर्णय घेतला गेला तरी खेड्यापाड्यांतल्या खोपट्यांपर्यंत निर्णय पोचण्यासाठी काही हजार किलोमीटरच्या अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते आणि त्यातच संबंधितांची कशी दमछाक होते याचं अस्वस्थ करणारं वर्णन आम्ही या लेखात केलं होतं. हा लेख छापून आल्यानंतर मुंबईत मंत्रालयात खळबळ माजली आहे आणि सरकारी निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवून देण्याचा विचार चालला आहे, असं कुणी कुणी आम्हाला सांगत होतं.
या लेखाने गरीब भूमिहीनांच्या दु:खाला आपण आवाज देऊ शकलो, याचं समाधान मिळालंच, पण त्याच वेळेस मराठवाड्यातील गरीब-वंचित-दलित समाजातील कार्यकर्ते-संस्था-संघटनाही आमच्या मित्र बनल्या. ‘युनिक फीचर्स’ची मुळं समाजात रुजायला तेव्हापासून सुरुवात झाली.
त्यानंतर आम्ही मित्रांनी लिहिलेला आणि महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात गाजलेला आणखी एक लेख ‘मटा’च्या ‘मैफल’ पुरवणीत प्रसिद्ध झाला. तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय त्यांनी घेतल्याने तो परिसर धुसफुसत होता. दलित आणि सवर्ण समाज एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. हिंसक घटनाही घडत होत्या. त्यातून खटले दाखल होत होते. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रोसिटी अॅक्ट) हाही वादाचा विषय झाला होता. या कायद्याचा दलितांकडून गैरवापर होत आहे आणि त्याद्वारे खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जात आहेत, असं सवर्णांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे, जातीवरून अन्याय केला जातोय म्हणून खटले दाखल केले जाताहेत, असं दलितांच्या संघटना म्हणत होत्या. एकूण परिस्थिती बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवर वातावरण निवळावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘किरकोळ’ खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. खुद्द रामदास आठवल्यांनीही ‘दलितांनी खोट्या केसेस स्वत:हून मागे घ्याव्यात’ असं आवाहन केलं होतं. या साऱ्यामुळे खरं काय नि खोटं काय हे कळेनासं झालं होतं.
आम्ही या विषयाचा माग काढायचं ठरवलं. मराठवाड्यात अनेक ठिकाणी फिरलो. दलितांनी खोट्या केसेस केल्या आहेत असं सांगितलं जात होतं, तिथे गेलो. दोघा-दोघांच्या गटाने आमच्यापैकी मंडळी फिरली. केसेस समजून घेतल्या. पीडित, आरोपी, स्थानिक कार्यकर्ते-नेते, पोलिस अधिकारी यांच्याशी बोललो आणि केसेसच्या दुरुपयोगाबद्दलचं आमच्यापुरतं उमगलेलं सत्य लेखाद्वारे वाचकांसमोर ठेवलं. या लेखाने मोठाच गजहब माजला. सत्य परिस्थिती मांडण्याचं धाडस केल्याबद्दल अनेकांनी आमचं कौतुक केलं, तर काहींनी खोट्या प्रचाराला तुम्ही बळी पडलात, अशी दूषणं दिली. हा लेख छापून आल्यानंतर अनेक वर्षं या लेखाबद्दल आम्हाला उलट्या-सुलट्या प्रतिक्रिया मिळत राहिल्या. कौतुक आणि दूषणं अशा टोकाच्या प्रतिक्रिया मिळणारा हा आमचा पहिलाच अनुभव होता. समकालीन सामाजिक प्रश्न किती गुंतागुंतीचे असतात आणि त्यात शिरून तो गुंता समजून घेणं किती जिकिरीचं असतं, याचं शिक्षण या लेखामुळे झालं.
‘मटा’मध्ये छापून आलेल्या आणखी दोन-तीन गाजलेल्या शोधलेखांबद्दल सांगायलाच हवं. तो काळ रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाने काळवंडून गेलेला होता. देशाची या प्रश्नावरून फाळणीच झाली होती जणू. ही फाळणी केवळ हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नव्हती. हिंदूंमधील सहिष्णू घटक आणि आक्रमक बनलेले घटक यांच्यातलीही होती. देशातील धार्मिक वातावरण बिघडत असल्याने दररोज हिंदू व मुस्लिम यांच्यातील कट्टरवाद्यांमध्ये भरच पडत होती. त्यामुळे भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची मवाळ, सहिष्णू आणि सहअस्तित्वाची परंपराच धोक्यात आली आहे, असं वाटत होतं. ही भावना फक्त आपलीच आहे की समाजातील अनेकांची आहे, याची चाचपणी करावी असं मनात येत होतं. लोकांशी संवाद साधून लोकांचं मन समजून घेतलं तरच हाती काही लागेल, असं वाटत होतं. पण हे कसं करावं हे कळत नव्हतं.
एका क्षणी ही कोंडी फुटली. सालाबादाप्रमाणे देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे जाणारी वारकरी दिंडी पुण्यात पोहोचत होती. आम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सोहळा पाहत होतो. वारकरी ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत विसाव्याच्या जागी निघाले होते. त्यांचं चालणं, त्यांचं दिसणं, त्यांच्या तोंडी असलेला पांडुरंगाचा गजर हे सर्व एका प्राचीन आणि पवित्र परंपरेतून आल्याचं जाणवत होतं. देशात जो धार्मिक गदारोळ चालला आहे त्यातील आक्रमकता त्यांना स्पर्शच करू शकणार नाही, असं मनोमन वाटत होतं. अचानक चमकून गेलं, वारीतल्या लोकांशी बोलावं!
कल्पना सुचल्यानंतर आम्ही आपापसात बोललो. अनपेक्षितपणे वादळी चर्चा झाली आमच्यात. ‘बिचारे वारकरी, अध्यात्माच्या मार्गाने निघालेत. तर यांना कशाला या वादात ओढायचं?’ असं एक म्हणणं होतं. तर वारकरी हे सहिष्णू परंपरेचे पाईक असल्याने धार्मिक तंट्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्यायला हवं. त्यातून सहिष्णू भारतीयांना सांप्रदायिक विंचू डसला आहे का हे कळेल, असं दुसरं म्हणणं होतं. निर्णय होईना. अखेर वारकऱ्यांशी बोलून पाहू यात, असं ठरलं.
तिसऱ्या दिवशी आमच्यातले चौघं-पाचजण सकाळी वारकऱ्यांबरोबर निघाले पंढरीच्या वारीला. पुणे-हडपसर असं आठ किलोमीटर चालत त्यांनी शेकडो वारकऱ्यांशी अयोध्येतील राममंदिर वादाबद्दल गप्पा मारल्या. अयोध्येत राम मंदिर बांधावं का आणि बांधायचं असल्यास मशीद पाडून मंदिर बांधावं का, असे प्रश्न आम्ही विचारले. वारकऱ्यांकडून उलटसुलट उत्तरं आली. ‘मंदिर व्हावं पण मशीद पाडून नको’, किंवा ‘राम-रहीम एकच आहेत, त्यामुळे मंदिर काय नि मशीद काय’ असा एक समजुतदार स्वर अनेकांच्या बोलण्यात होता. पण बऱ्याचजणांची भावना आक्रमक प्रचाराने भारलेली होती. आम्ही वारकऱ्यांशी केलेल्या गप्पा या काही शास्त्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांत बसणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे किती टक्के वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे, वगैरे गोष्टी त्यातून स्पष्ट होत नव्हत्या. पण शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने वारकरी संप्रदायाच्या समन्वयवादी आणि उदारमतवादी विचारावर कर्मठपणाचं लेपन होत असल्याचं कळत होतं. संत शिकवणुकीची मूस वितळतेय की काय असं वाटायला लावणाऱ्या या प्रतिक्रिया होत्या. हा लेख अशोक जैनांनी ‘मटा’त आषाढी एकादशीच्या निमित्ताने छापला. राम मंदिराच्या निमित्ताने निर्माण झालेला सांप्रदायिक ज्वर किती खोलवर पसरला आहे याचं भान या लेखाने तेव्हा महाराष्ट्राला दिलं.
‘मटा’मध्ये लिहिलेला असाच एक लेख तेव्हा गाजलेला. १९९५ साली आम्ही तो लिहिला होता. या लेखाची गंमत म्हणजे आम्ही हा लेख लिहिला त्याचं निमित्त वेगळं होतं, पण त्याचा शेवट वेगळीकडे झाला. केरळच्या साबरीमल या गावी भगवान अय्यपाचं मंदिर आहे. त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता. या बाबीची दखल घेऊन तिथल्या नारीमुक्ती आंदोलनाने मंदिरप्रवेशाची सुरुवात केली होती. म्हटलं तर दूर केरळातील ती एक घटना होती. पण आम्ही पडलो चळवळे. आम्ही म्हटलं, ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, हे शोधायला पाहिजे. तेव्हाच्या धडाडीच्या स्त्री कार्यकर्त्या डॉ. नीलम गो-हे यांच्याशी आम्ही बोललो. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातही शेकडो मंदिरांत महिलांना प्रवेश नाही.” आम्ही उडालोच. शोधाशोध सुरू केली. ठिकठिकाणी मंदिरांवर ‘महिलांना प्रवेश नसल्याच्या’ स्वच्छ पाट्या लटकावलेल्या होत्या. वर्षानुवर्षं ही प्रथा चालू असल्याचं गावोगावचे लोक सांगत होते. हिंदूंप्रमाणेच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही स्त्री-पुरुष भेदाभेद असल्याचं सांगितलं जात होतं. ही सर्व माहिती घेऊन आम्ही धर्मशास्त्राच्या अभ्यासकांकडे गेलो. स्त्री चळवळीतल्या जुन्या-नव्या नेत्या-कार्यकर्त्यांना भेटलो. आम्हाला जे कळलं होतं ते त्यांना सांगितलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. ‘महाराष्ट्रात हा अन्याय सहन करता कामा नये’ असं सर्वांचं म्हणणं पडलं. ‘मंदिरप्रवेश हा सांस्कृतिक हक्क असल्याने मंदिरप्रवेशाची चळवळच उभी करायला हवी’, असंही कुणी कुणी म्हटलं. हे सर्व आम्ही त्या लेखात लिहिलं.
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्राचे डोळे उघडणारा हा लेख होता. तेव्हा चीनच्या बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली होती. तिथे स्त्रियांच्या हक्कांबद्दल बरंच काय काय बोललं जात होतं, पण जमिनीवर काय परिस्थिती आहे, हे या लेखाने स्पष्ट होत होतं.
एरवी आपला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आपण प्रतिक्रिया स्वीकारण्यापुरते असतो, अशी आमची तोपर्यंत भावना होती. पण या लेखानंतर आम्ही एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं. लेख प्रकाशित झाल्यानंतर लवकरच पुण्याजवळ आळंदीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाच्या अध्यक्षा शांताबाई शेळके होत्या. आम्ही म्हटलं, एक स्त्री लेखिका एका सर्वोच्च व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून बसणार आहेत. मात्र, ज्या आळंदीत हा मान एका स्त्रीला मिळणार आहे, त्याच आळंदीत संत ज्ञानेश्वरांच्या समाधी परिसरातील अजानवृक्षाखाली बसण्यास मात्र महिलांना मज्जाव आहे. (ही बाब फोटोसह आम्ही लेखात लिहिलेली होतीच.) स्त्री-पुरुषांमध्ये भेदाभेद करणाऱ्या या प्रथेला आव्हान देण्याची ही चांगली संधी आहे, असं मानून आम्ही एक पत्रक काढलं. स्त्रियांचा धार्मिक अधिकार नाकारणारी ही प्रथा बंद व्हायला हवी, असं काहीसं त्यात म्हटलं होतं. शिवाय स्वत: शांताबाईंनी अजानवृक्षाच्या सावलीत बसावं आणि ही प्रथा मोडावी, असं आवाहन त्यात केलं. या पत्रकावर मान्यवरांनी सह्या केल्या तर एखादं-दुसरं पाऊल पुढे पडेल, किमान मंदिरप्रवेशाचा मुद्दा पुढे सरकेल, असं वाटत होतं. या पत्रकावर विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, डॉ. बाबा आढाव वगैरे नामवंतांनी सह्या केल्या. ही बातमी ठळकपणे पहिल्या पानावर ‘मटा’मध्ये झळकलीही. पण शांता शेळके यांनी या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यांनी दुर्लक्ष करण्याला काही कारणं असतीलही; पण हाती आलेली एक चांगली संधी आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने गमावली, असं तेव्हा वाटून गेलं.
पहिल्या चार-पाच वर्षांत आम्ही असे सणसणीत लेख घेऊन महाराष्ट्र टाइम्सकडे जात असल्याने लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संपादकांना खमंग विषयांचा वास येणारच! यातला गमतीचा भाग सोडा; पण या लेखांमुळे ‘युनिक फीचर्स’ हे नाव महाराष्ट्रातल्या सुजाण आणि विचारी कुटुंबांच्या घरातलं बनलं. आम्हाला या लेखांनी लोकमान्यता मिळवून दिली. महाराष्ट्रभर पसरलेल्या ज्या दैनिकांसोबत आम्ही काम करत होतो त्यांनाही आमच्याबद्दल विश्वास वाटू लागला. थँक्स मटा! थँक्स अशोक जैन!

‘मटा’मार्फत आम्ही असे सामाजिक विषय पुढे आणत असतानाच ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांच्याशी आमचा संवाद चालू होता. त्या काळी त्यांचं नाव मोठं होतं. तडफदार माणूस. मनात आलं तर मुख्यमंत्र्यांच्या खोलीचं दार ढकलून ते जाऊ शकतात, अशी त्यांची प्रतिमा. त्यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीसमोर आम्ही सगळे म्हणजे लिंबूटिंबूच. पण त्यांच्या मनात एखादा विषय आला, की ते आम्हाला बोलावून घेत आणि कामाला लावत. (पुढे ‘लोकसत्ता’ला ऐतिहासिक वळण देण्याचं काम केलेल्या अरुण टिकेकरांशी आमची तिथेच ओळख-भेट झाली.) गडकरींच्या कामाचा धडाका वेगळा होता. चर्चा वगैरेंची भानगड त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हती. ‘अमुक अमुक विषय आहे तो करून द्या’ असं त्यांचं फर्मान निघे. जे असं काम करू शकतात त्यांच्यावर ते प्रेमाचा, मायेचा वर्षाव करणार, अशी त्यांची ख्याती होती. ज्या अर्थी ते आम्हाला बोलावून घेऊन कामाला लावत, त्या अर्थी आम्ही त्यांच्या परीक्षेत पास होत होतो तर!
गडकरी ‘लोकसत्ता’त होते तेव्हा त्यांच्या सोबत जे शोधलेख आम्ही केले, त्यातील एक उदाहरण सांगतो. हा लेख नेमका केव्हा छापून आला त्याची नोंद माझ्याकडे नाही, पण त्या काळी एकशिक्षकी शाळांचा प्रश्न चर्चेत होता. खेड्यापाड्यांतील चौथीपर्यंतच्या सरकारी शाळांमध्ये सर्व वर्गांना मिळून एकच शिक्षक असे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्येला कदाचित एकाहून अधिक शिक्षक नेमणं सरकारला परवडत नसणार. पण त्यामुळे शिक्षकांची ओढाताण होत होती आणि मुलांच्या शिक्षणाची आबाळ. ही परिस्थिती कळल्याने गडकरींनी हा प्रश्न धसाला लावण्याचं ठरवलं असावं. ते बोलले काहीच नाहीत, पण त्याचा उलगडा नंतर झाला.
आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातील खेडी पालथी घातली. एकशिक्षकी शाळांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि एक दणदणीत शोधलेख लिहून दिला. गडकरी खूष! त्यांनी ठळकपणे हा लेख छापला आणि शिक्षणाचा एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणला. पण एवढं करून ते थांबले नाहीत. एक सणसणीत अग्रलेखही लिहिला त्यांनी. त्यांचा अग्रलेख म्हणजे ‘फटके’बाजीच! इकडे आम्ही खूष! आपल्या लेखावर गडकरींसारख्या संपादकाने अग्रलेख लिहिला म्हणून. पण गंमत पुढेच होती. या लेखांमुळे विधानसभेत हा विषय चर्चेला आला आणि चक्क एकशिक्षकी शाळांचं रूपांतर दोनशिक्षकी शाळांमध्ये करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयावर गडकरींची प्रतिक्रिया काय होती माहीत नाही, पण आम्ही मात्र हवेत होतो. आपल्या लेखाचा आधार घेऊन शासन एक निर्णय घेतं, हा आम्हा मुलांसाठी भलताच थोर अनुभव होता. स्वओळख निर्माण करणारा, स्वप्रतिमा उंचावणारा.

युनिक फीचर्सच्या सुरुवातीच्या काळात आम्ही एकीकडे महाराष्ट्रभर पसरलेल्या दैनिकांसाठी सिंडिकेशनच्या माध्यमातून काम करत होतो आणि दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ताकडे निवडक विषयांवर मोठे शोधलेख लिहीत होतो. आमचं मुंबईत येणं-जाणं होतं, पण आम्हा सर्वांचं वास्तव्य पुण्यातच होतं. तेव्हा पुण्यातलं मुख्य दैनिक होतं ‘सकाळ’. मात्र गंमत अशी, की मुंबईसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील दैनिकांसाठी आम्ही मुबलक लिहीत होतो, पण खुद्द पुण्यात मात्र ‘सकाळ’मध्ये एकही अक्षर छापून येत नव्हतं. असं का हे कळायला मार्ग नव्हता, पण फीचर्स एजन्सीकडून मजकूर घेणं त्यांना कमीपणाचं वाटत असावं, असं कुणी कुणी सांगत होतं. त्यामुळे एखाद-दुसरा अपवाद वगळता ‘सकाळ’मध्ये पहिल्या दहा वर्षांत आमचं नामोनिशाण नव्हतं. या गोष्टीचं तेव्हा वैषम्य वाटे; पण या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा पर्याय आम्ही स्वीकारला. ‘पुण्यात पहिल्या दिवसापासून ‘सकाळ’मध्ये आमचं लिखाण छापून आलं असतं, तर प्रसिद्धीमुळे आम्ही आळशी आणि अप्पलपोटे बनलो असतो. त्यामुळे तिथे छापून आलं नाही ते बरंच झालं,’ असं आम्ही मानतो. ‘सकाळ’ची दारं बंद असल्याने आम्ही महाराष्ट्रभर खूप धडपड केली आणि स्वत:च्या बळावर संस्थेचं नाव उभं केलं. (पुढे २००० सालानंतर ‘सकाळ’सोबत अनेक प्रकल्पांमध्ये आम्ही भरपूर काम केलं; पण त्याबद्दल पुढे कधी सांगेन.)
‘सकाळ’सोबत काम करता आलेलं नसलं तरी पुण्यातील अन्य माध्यमांसोबत आम्ही काम करत होतो. युनिक फीचर्स सुरू होण्याआधीपासून मी ‘केसरी’त टोपणनावाने एक राजकीय सदर लिहीत होतो. वय वर्षं २३च्या मानाने ही मोठी संधी होती. त्या काळी ‘केसरी’ हे फार प्रभावी नसलं, तरी पुण्यातील महत्त्वाचं दैनिक होतं. मोठी लेखकमंडळी तिथे लिहीत. आल्हाद गोडबोले रविवार पुरवणीचे संपादक होते. (पुढे ते ‘मटा’त गेले.) नेमकेपणाने आणि नेटकेपणाने लिहिण्याची जणू शिकवणीच लागली होती माझी त्यांच्याकडे. दुसरीकडे, त्या काळी उतरणीला लागलेल्या ‘स्वराज्य’मध्येही आम्ही लिहीत असू. पुढे ‘सकाळ’तर्फे ‘साप्ताहिक सकाळ’ सुरू झालं आणि सदा डुंबरे यांच्या संपादकत्वाखाली या साप्ताहिकाने जोरदार लोकप्रियता मिळवली. डुंबरे यांच्याशी आमची ओळखपाळख असण्याची काहीच शक्यता नव्हती, पण त्यांनी युनिकची ‘टीमवर्क’ची संकल्पना उचलून धरली. त्यामुळे वर्षांमागून वर्षं आम्ही ‘साप्ताहिक सकाळ’साठी लिहीत राहिलो. पहिली पाचेक वर्षं तर प्रत्येक अंकात आमचा एक लेख असेच असे. बऱ्याचदा कव्हरस्टोरी म्हणूनही लेख छापून येत. हे सर्व लेख फिरून, माहिती गोळा करून, मुलाखती घेऊन लिहिलेले असत. ‘टेबलमेड’ स्टोरीला पूर्ण फाटा देऊन आमचं काम चाले. दर आठवड्याला असा एक लेख म्हणजे किती धावपळ असेल याचा विचार करा. पण अशा मुबलक लिखाणामुळे ‘साप्ताहिक’मधून आम्ही किती रिपोर्ताज आणि शोधलेख लिहिले याला काही गणतीच नाही. आता मागे वळून पाहताना लक्षात येतं, की शोधलेखनाची ‘युनिक’ शैली तयार होण्यात सदा डुंबरे यांचा संपादकीय वाटा बराच मोठा आहे.
मुंबईत अशोक जैन आणि माधव गडकरी (नंतर अरुण टिकेकर) यांनी चांगलं आणि भरपूर लिहिण्याची संधी दिली, तेच पुण्यात सदा डुंबरे यांच्या बाबतीत घडलं. विषय शोधणं, त्याचे कंगोरे शोधणं, मुद्द्यांची मांडामांड करणं आणि तटस्थपणे लिहिणं या सर्व गोष्टी एका शिस्तीत व्हायलाच पाहिजेत याबद्दल त्यांचा कटाक्ष असे. आम्ही वर्षांमागून वर्षं त्यांच्यासोबत काम करत होतो, त्यामुळे त्यातून मैत्रीचं नातंही तयार होत गेलं; त्यामुळे आधी त्यांच्याकडून शिकायला आणि नंतर त्यांच्यासोबत काम करायला मजा आली.
‘साप्ताहिक सकाळ’च्या नियमित अंकांच्या पलीकडे दिवाळी अंकांत लिहिण्याचीही संधी सदा डुंबरे यांनी दिली. ‘मटा’मध्ये एखादा शोधलेख छापून आल्यानंतर जसा व्यापक (आणि निवडकही) प्रतिसाद मिळे, तसा प्रतिसाद ‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकातील लेखनालाही मिळे. मोठमोठी नावं या अंकात लिहीत; आमचे शोधलेख या अंकांमध्ये घेऊन डुंबऱ्यांनी ‘युनिक फीचर्स’लाही सेलिब्रिटींच्या यादीत नेऊन सोडलं. ‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकात आम्ही मित्रांनी लिहिलेला पहिला लेख होता-‘धारावी’. पुढच्या वर्षी लिहिलं भेंडीबाजारवर. मग गिरणगाववर. असं एकेक करत मुंबईतल्या कष्टकरी वस्त्यांचं जगणं आम्ही शोधत गेलो आणि लिहीत गेलो. सहा-आठ-दहा पत्रकारांचा गट चार-चार महिने एकेका विषयावर काम करत असे. त्यांच्या सामूहिक मेहनतीतून एकेक लेख उभा राहत असे. एकीकडे रक्त आटवणारा आणि त्याच वेळेस कमालीचं समाधान मिळवून देणारा हा उपक्रम एक-दोन नव्हे; तब्बल आठ वर्षं आम्ही चालवला. या उपक्रमाला खुद्द सदा डुंबरे यांनी भरभरून पाठिंबा दिला. विजय तेंडुलकर यांनाही आमची ही शोधाशोध खूप महत्त्वाची वाटे. त्यामुळेच या शोधलेखांचं संकलन करून २००१ साली ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हा त्यांनी आनंदाने आणि आत्मीयतेने प्रस्तावना लिहून दिली.
‘युनिक फीचर्स’तर्फे शोधलेखाच्या क्षेत्रात जे काही काम झालं त्यातील सर्वोत्तम म्हणजे मुंबईवरील हे लेख, असं लोक आम्हाला सांगत असतात. कुणाला हे लेख समाजशास्त्रीय अभ्यास म्हणून महत्त्वाचे वाटतात, तर कुणाला हे लेख समकालीन मुंबईचा दस्तावेज वाटतात. कुणी तर लिहिलं होतं, की गोविंद नारायण माडगावकरांनी १८६२ साली लिहिलेल्या ‘मुंबईचं वर्णन’ या पुस्तकाइतकंच हे सरस पुस्तक आहे. आजही आमच्या या पुस्तकाला नवनवा वाचक मिळतो आहे आणि जवळपास १० हजार वाचकांनी हे पुस्तक विकत घेतलं आहे. हे लेख आणि हे पुस्तक म्हणजे ‘युनिक फीचर्स’चं ब्रँड अॅम्बॅसडरच बनलं आहे!
मुंबईवरील या लेखांपैकी पहिले एक-दोन लेख लिहिले गेले, तेव्हा ते फार ठरवून वगैरे लिहिलेले नव्हते. त्या काळी धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी मानली जात असे. ती आतून कशी आहे याचा उलगडा करावा एवढाच मर्यादित हेतू मनात ठेवून आम्ही धारावीत शिरलो होतो. तसंच भेंडीबाजारवरील लेखाचं. त्या काळी बाळासाहेब ठाकरे भेंडीबाजारला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधत. त्यामुळे ही काय भानगड आहे हे समजून घ्यावं, असं वाटल्याने आम्ही तिथे पोहोचलो होतो. या दोन लेखांनंतर मात्र त्यामागील सूत्र दिसू लागलं आणि मग आग्रीपाडा, कोळीवाडे, कामगार वस्त्या, दलितबहुल वस्त्या, वेश्यावस्त्या आमच्या टीमने पालथ्या घातल्या आणि मग त्यातून ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक आकारलं.
युनिकच्या टीमने लिहिलेल्या आणखी एका शोधलेख मालिकेतून ‘देवाच्या नावाने’ नावाचं पुस्तक तयार झालं. मात्र, हे पुस्तक एका पूर्वनियोजित आराखड्यातून तयार झालेल्या शोधलेखांतून बनलेलं होतं. हे लेखही विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेले होते. पण इथे त्या लेखांबद्दल आणि एकूणच दिवाळी अंकांत आम्ही लिहिलेल्या शोधलेखांबद्दल पुढील लेखात सांगेन. कारण साप्ताहिक सकाळसह लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, दीपावली, अक्षर, कालनिर्णय आणि अनुभव या लोकप्रिय दिवाळी अंकांसाठी आम्ही जे विस्तृत लेखन केलं त्याबद्दल सविस्तरच सांगायला हवं. गेली पंचवीस वर्षं सलगरीत्या चाललेल्या या शोधकामाबद्दल या एकाच लेखात लिहिणं म्हणजे कोंबाकोंब केल्यासारखं होईल. त्यामुळे त्याबद्दल पुढील लेखात.

आज हा लेख लिहीत असताना आम्ही केलेल्या शोधलेखांची यादी करायला लागलो, तर किमान शंभर लेखांचे विषय कागदावर उतरले. हे जमतील तसे आठवलेले लेख. यापेक्षा किती तरी अधिक लेख गेल्या पंचवीस वर्षांत आम्ही लिहिले हे उघड आहे. ही सर्व शोधाशोध करण्याची इच्छा कुठून निर्माण झाली असावी? त्यामागील प्रेरणा काय असावी? सैल बोलीभाषेत म्हणतात त्याप्रमाणे ही ‘उठाठेव’ आम्ही कशासाठी केली असावी? (आणि अजूनही करत आहोत!)
‘युनिक फीचर्स’ ही कल्पना ज्या कारणांमुळे आमच्यातून उचंबळून वर आली, त्याच कारणांमुळे आम्ही या शोधलेखांचा घाट घातला हे उघड आहे. पण शोधलेख हा फॉर्म नेहमीच्या एकरेषीय लेखापेक्षा निराळा; हिंडून-फिरून, लोकांशी बोलून लिहावा लागणारा. वेळखाऊ. बराच खर्चिक आणि एकेका विषयात अनेक दिवस (किंवा महिने) काम करत राहावा लागणारा. पण तरीही हा फॉर्म आम्हाला सर्वांत जवळचा वाटला. गुंतागुंतीची कोणतीही घटना-घडामोड बसल्या जागेवरून समजून घेता येऊ शकत नाही; आणि ती समजून घ्यायची तर संबंधित परिसरात जाऊन तिचे विविध कंगोरे संबंधित घटकांशी बोलल्याशिवाय कळू शकत नाहीत, असं आम्हाला पहिल्या दिवसापासून वाटत होतं. त्यामुळे सामाजिक महत्त्वाच्या विषयांबद्दल जेव्हा तुम्हाला स्पष्टता हवी असते तेव्हा तुम्हाला परिस्थितीशी भिडावंच लागतं. हे भिडणं आणि सत्याच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणं हे केवळ थ्रिलिंग असतं. हा आनंद मिळवायचा तर शोधलेखांच्या निमित्ताने लोकांमध्ये जाणं आणि त्यांच्यामार्फत सत्यापर्यंत पोहोचणं, हा एक अजब अनुभव असतो. बहुतेक या आनंदासाठीच आम्ही शोधलेखांची कास धरून ठेवलेली असावी.
दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण ‘चळवळे’ कॅटेगरीतले होतो. अस्वस्थ आत्मे. अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे यांचा धोशा धरलेले. समाजात जे बरं-वाईट चाललेय त्याबद्दल स्वतंत्र मत बाळगणारे. जे चुकीचं वाटतंय ते लोकांमध्ये जाऊन, तपासून लिहून काढायला हवं असं मानणारे. या चळवळेपणामुळे आम्ही काही ना काही खटपटही करत राहिलो असू. दुसरी गोष्ट म्हणजे माध्यमांतून सांगितलं जातंय तेवढंच सत्य असतं, ही गोष्ट जशी आम्ही कधीच सर्वस्वी स्वीकारली नाही, तसंच माध्यमं जे सांगत नाहीत ते अस्तित्वातच नसतं असंही आम्ही कधी मानलं नाही. अनेकदा समाजातील काही घटक दबलेले असतात, त्यामुळे त्यांचं म्हणणं पुढे येतच नाही, असा अनुभव येत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांचं म्हणणं ऐकून वाचकांसमोर आणणं हे आपलं कामच आहे, असं आम्ही मानत आलो. प्रत्येक विषयाला अनेक बाजू असतात, अनेक कंगोरे असतात. ते शोधणं आणि स्वत:ला (आणि वाचकांनाही) स्पष्टता आणणं, ही बाब आम्हाला नेहमीच आकर्षित करत राहिली. त्यामुळे दिसला विषय की शोध कंगोरे, जा लोकांमध्ये, घे समजावून आणि मिळालेल्या माहितीची लाव संगती, अशा पद्धतीने आम्ही काम करत राहिलो.
अशा प्रकारचं काम करणारे आम्ही अर्थातच पहिले नव्हतो. आपल्याकडे असं काम पहिल्यांदा (आणि दीर्घकाळ) अनिल अवचट यांनी केलंय. १९७०च्या दशकात त्यांनी जे विषय ज्या रीतीने हाताळले त्यातून मराठीत ‘रिपोर्ताज’ प्रकारचं लेखन रुजत गेलं. त्यांनी समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी वर्गाचं जगणं, त्यांचे प्रश्न, त्यांचं शोषण, त्यांच्याबद्दलची बेफिकिरी या अनुषंगाने केलेल्या लिखाणाने लोकांची झोप हराम केली. आम्ही काम सुरू करण्याआधी म्हणजे १९७० आणि१९८० अशी दोन दशकं ते अखंड लिहीत होते. त्यांचे लेख आणि पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. युनिक फीचर्समधील आम्हा सर्वांवर तर त्यांच्या या लेखनाचा जणू पगडाच. समाजचित्रण करायचं तर असंच, असं वाटावं इतका हा प्रभाव. लिहिण्याची थेट आणि बिनपाल्हाळिक चित्रमय शैली भिडणारी. त्यामुळे माणसं, कोंडमारा, धागे उभे आडवे, संभ्रम, धार्मिक, छेद ही त्यांची पुस्तकं कितीदा वाचलेली. त्यामुळे आमच्या शोधलेखांवर अवचटांचा प्रभाव पडणं स्वाभाविकच. इथे सांगण्यासारखी गंमत म्हणजे अवचटांचं सामाजिक लेखन आवडणारी आणि तसं काम करू इच्छिणारी मुलं-मुली आपोआप युनिकमध्ये येत गेली. आजही नवी मुलं आमच्याकडे येतात तेव्हा त्यांनी अवचट वाचले आहेत का याची चाचपणी आम्ही करतो. वाचले नसतील तर ‘आधी ही पुस्तकं वाचा, मग बघू’ असं म्हणतो.
अवचटांच्या लेखनाचा आमच्यावर एवढा प्रभाव असला तरी त्यांच्या शैलीचं अनुकरण आम्ही केलं नाही, करू शकलो नाही. अवचटांनी प्रामुख्याने रिपोर्ताज शैलीने लिहिलं. त्यामुळे चित्रण करत प्रसंग-घटना-प्रश्न उलगडत नेण्याची त्यांची पद्धत. आमच्यात अवचटांचं ‘लेखकपण’ नसल्याने रोकडेपणा अधिक. शिवाय चित्रमय लिहिण्यासाठी जी जागा मिळावी लागते त्याची दैनिकांमध्ये मारामारच. त्यामुळे मिळालेली माहिती, घेतलेल्या मुलाखती, कागदपत्रं, रिपोर्ट्स वगैरेंच्या आधारे ज्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलेलो असू त्याला केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमचा शोधलेख बांधतो. रिपोर्ताजपेक्षा ही पद्धत जरा निराळी.
रिपोर्ताज हा लेखनप्रकार समर्थपणे हाताळणारे दुसरे पत्रकार म्हणजे निळू दामले. त्यांचं सुरुवातीचं राजकीय लेखन वेगळं; पण त्यांनी रिपोर्ताज पद्धतीचं जे लेखन केलं आणि अनेक विषय उकलून दाखवले, ती पद्धत आम्हाला जवळची वाटली. आपल्या अनुभवविश्वात नसलेले विषय उकलून दाखवण्याची आणि हे करत असताना वाचकाला सहजपणे सोबत घेण्याची त्यांची पद्धत आम्हाला जवळची वाटणारी. आमच्या शोधलेखांच्या लेखनशैलीत त्यांच्याही लेखनशैलीचं प्रतिबिंब फारसं दिसत नसलं, तरी विषय कसे उकलायचे याबाबत त्यांचं लेखन आम्हाला नेहमीच मदतकारक ठरलं.
निळूभाऊंप्रमाणेच ज्यांच्या ‘इंटिग्रिटी’चा आमच्यावर प्रभाव पडला ते तिसरे पत्रकार म्हणजे जगन फडणीस. त्यांचा-माझा वैचारिक जिव्हाळा होता. त्यांनी शोधलेखांचा ज्या रीतीने अस्त्र म्हणून वापर केला तसा आम्ही कधी करू शकलो नाही, परंतु कटू वाटणाऱ्या गोष्टी निर्भीडपणे कशा लिहाव्यात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. (‘लोकसत्ता’सोबत केलेला ‘लोकजागर’ प्रकल्प हे त्याचं ठळक उदाहरण. त्याबद्दल पुढे सांगेनच.) दुर्दैवाने फडणीसांना भरपूर आयुष्य मिळालं नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र काम करता आलं नाही. युनिक फीचर्स सुरू होण्याआधी माझं-त्यांचं बोलणं होत असे. फीचर्स संस्था सुरू करण्याबाबत त्यांच्या मनात शंका होती. माझ्यावरील प्रेमाखातर त्यांचा त्याला विरोधही होता. परंतु आमचे शोधलेख गाजू लागल्यावर ते मला म्हणाले, “तू माझं ऐकलं नाहीस ते बरंच केलंस, अन्यथा एक चांगला प्रयोग प्रत्यक्षातच आला नसता.” त्यांचा हा निर्मळपणा किती लोभसवाणा!
अनिल अवचट-निळू दामले-जगन फडणीस ही तीन वेगवेगळ्या प्रकारची माणसं, पण तिघांचाही ‘युनिक फीचर्स’शी अगदी जैव संबंध. मात्र, हे तिघंही एकेकट्याने काम करणारे. आम्ही शोधलेख किंवा रिपोर्ताज हा प्रकार हाताळला तो प्रामुख्याने टीम म्हणून. चार-पाच-सहाजणांच्या गटाने एकाच विषयाचा अनेकांगांनी शोध घ्यावा, आपापला अनुभव शेअर करावा, मिळून डोकेफोड करावी आणि मगच लिहावं, अशी आमची पद्धत. कुण्या एकाच्या मतावर, अनुभवावर किंवा निरीक्षणावर अवलंबून न राहता सांघिक पद्धतीने विषयांचा धांडोळा घेतला की विषय कॅलिडोस्कोपमधून पाहिल्यासारखे दिसतात, असं आमचं म्हणणं, आणि अनुभवही. त्यामुळे त्यांच्या-आमच्या कामाच्या पद्धतीत बराच फरक. दुसरा एक फरक म्हणजे आमची विषय शोधण्याची शैली पत्रकारी असली तरी सामाजिक शास्त्राच्या संशोधकीय शिस्तीचा त्याला आधार असतो. (या प्रकारच्या लेखांबद्दल आणि प्रकल्पांबद्दल पुढे कधी सांगेनच.) तिसरा एक फरक म्हणजे शोधलेख अथवा रिपोर्ताज लिहिण्यासाठी आम्ही अन्य काही फॉर्म्सचाही वापर करतो. उदाहणार्थ, लेखी अथवा तोंडी सर्व्हे करून लोकांचा कल समजून घेण्याचा व त्याद्वारे सामूहिक मत समजून घेण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला आहे. कधी या सर्व्हेच्या आधारे तर कधी सर्व्हेच्या सोबत शोधाशोध करून आम्ही लिहिलं आहे. एखाद्या विषयाचा शोध घेण्यासाठी आम्ही लोकांशी गटागटांनी चर्चा करून, ती रेकॉर्ड करून त्यातील कंटेंटचा वापर केला आहे. हे लेख रूढार्थाने रिपोर्ताज प्रकारचे नसले तरी विषयांचा शोध घेण्याची एक रीतसर पद्धत त्यातून विकसित झालेली आहे. या पद्धतीबद्दल आणि या पद्धतीने लिहिलेल्या दीर्घलेखांबद्दलही पुढील लेखात लिहिन.
तर असा हा युनिक फीचर्सच्या शोधलेखांचा धावता प्रवास. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अव्याहत चाललेला. दैनिकांतल्या पुरवण्यांपासून सुरू झालेला आणि दिवाळी अंकांतील दीर्घ लेखांपर्यंत येऊन स्थिरावलेला. शोधा, खोदा, लिहा आणि समजेत भर घाला, या तत्त्वावर चालणारा.
या सर्व शोधाशोधीचा मराठी वाचकांवर काय परिणाम झाला ते त्यांचं त्यांना माहीत, पण या कामामुळे सामाजिक प्रश्नांबद्दलची आमची समज वाढत गेली हे नि:संशय!
-सुहास कुलकर्णी
suhas.kulkarni@uniquefeatures.in

(या लेखात उल्लेख केलेले अनेक शोधलेख ‘युनिक फीचर्स’च्या www.uniquefeatures.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. वाचकांनी हे लेख अवश्य वाचावेत.)

'अनुभव'च्या वर्गणीसाठी संपर्क:
युनिक फीचर्स, ८, अमित कॉम्प्लेक्स, ४७४, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे-४११ ०३०.
फोन: (०२०) २४४७०८९६, २४४८६६३७.
वार्षिक वर्गणी (दिवाळी अंकासह) : ५०० रुपये.
'अनुभव' आता पीडीएफ वरही उपलब्ध - PDF वर्गणी : ३०० रुपये.