पद्म पुरस्कार

महिन्याभरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींचं प्रतिबिंब ‘अनुभव’च्या अंकात पडतं असं नाही. कधी एखाद्या विषयावर माध्यमांमध्ये बरीच चर्चा होऊन जाते, तर कधी वाचकांना पुढे नेऊ शकणारी माहिती-अर्ग्युमेंट सापडण्यास वेळ लागतो. कधी ते लिहू शकणारा सुयोग्य लेखक हाती लागत नाही. या महिन्यातले असे विषय कोणते?

या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? वाचकांचंही त्या त्या विषयाबद्दल काही मत असणार. ते आम्हाला जरूर कळवा. त्यातल्या निवडक मतांना आम्ही अंकात जरूर जागा देऊ. आपल्या प्रतिक्रिया नेमका मुद्दा मांडणाऱ्या असाव्यात, एवढीच अपेक्षा. –संपादक

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारत सरकारतर्फे ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्कार ज्यांना दिले जातात त्यातील अनेक नावांबद्दल वाद होत असतात. देश ज्यांना सन्मानित करतो त्यांच्याबद्दल तरी वाद होऊ नयेत, अशी कुणाचीही भावना असणार. नवं सरकार याबाबत काही ‘अच्छे दिन’ आणेल अशी आशा अनेकांना होती; परंतु याही सरकारच्या बाबत ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती दिसते.
लोकसभा निवडणुकीत विविध क्षेत्रांतील ज्या ज्या सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला त्यातील अनेकांची वर्णी पद्म पुरस्कारांच्या यादीत लागलेली आहे. उघड हिंदुत्ववादी भूमिका असणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रातल्या मंडळींना या पुरस्कारांची खिरापत वाटलेली दिसत आहे. काहींना त्यांचं हिंदुत्ववादी असणं हेही पुरस्कार मिळवण्यासाठी आक्षेपार्ह वाटू शकतं. पण तो मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यातील काही लोकांचं ‘कर्तृत्व’ खरोखरच शोधावं लागेल असं आहे. ही मंडळी हिंदुत्वनिष्ठ आहेत, या एकाच बाबीवर त्यांच्यावर कृपादृष्टी झाडली असण्याची शक्यता त्यामुळे ठळक बनते.
एक देश म्हणून हा मोह आपण टाळू शकत नाही का? सोयीच्या अपरूढी बदलण्याची गरज नाही का?
पण हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार ना विरोधी पक्षांना आहे ना जनतेला. कारण पूर्वी काँग्रेस सरकार याच रीतीने वागत आलं आहे आणि त्याविरुद्ध कुणी फार आवाज वगैरे उठवला आहे असं ऐकिवात नाही.
अशा परिस्थितीत आपण काय करावं? ‘सुशासना’चे गोडवे गावेत, पुरस्काराचा बदला पुरस्काराने, हे तत्त्व मान्य करावं की हे असंच चालत राहणार, असं म्हणून हात चोळत बसावं?

वाचकांना याबद्दल काही शेअर करावंसं वाटलं तर त्यांनी आपलं मत आम्हाला अवश्य कळवावं.