धडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट

२००० साली ‘युनिक फीचर्स’ने दहा वर्षांचा टप्पा पार केला तेव्हा एक छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली होती. त्या पुस्तिकेच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं : ‘फीचर्स सर्व्हिस’. ‘फीचर्स सर्व्हिस’ म्हणजे काय हा प्रश्न आम्हाला दहा वर्षांपूर्वी अनेक वेळा विचारला गेला... पण आता ‘युनिक फीचर्स’ म्हणजे काय हे सांगावं लागत नाही’...
या वाक्याचा एक साधा अर्थ असा, की ‘फीचर्स सर्व्हिस’ नावाची चीज जी मराठी लेखन व्यवहारात नव्हती ती युनिक फीचर्सने रुजवलीच, शिवाय काम करता करता स्वत:ची अशी ओळखही तयार केली!
हे विधान कुणाला आत्मप्रौढीचं वाटू शकतं, परंतु ते लिहिताना मनात काही शंका नव्हती किंवा आपण काही क्रेडिट घेतोय अशीही भावना नव्हती. आणि जे लिहिलं होतं ते खरंच होतं की!
१९९० साली आम्ही मित्रांनी एकत्र येऊन काही करावं असा विचार सुरू केला, तेव्हा पहिला विचार सुचला तो ‘फीचर्स सर्व्हिस’चा. अमेरिकेत फीचर्स एजन्सीज असतात आणि त्या एकच लेख एकाच वेळेस अनेक दैनिकांत प्रकाशित करण्याचं काम करतात, असं आम्ही ऐकून होतो. पण त्या काळी आजच्याएवढं जग छोटं नव्हतं. आज कसं, काहीही कळलं की आपण झटकन नेटवर जातो, पाहिजे ते गुगल करतो आणि पाचव्या मिनिटाला माहितीने परिप्लुत होतो. पण तेव्हा तसं नव्हतं. कळलेली माहिती आपल्याकडच्या चार अनुभवी लोकांना किंवा अमेरिकेतीलच कुणाला तरी विचारल्याशिवाय कन्फर्म होणार नव्हती. पण ते वय असं होतं आणि कळलेली कल्पना इतकी आकर्षक वाटत होती की चार लोकांना विचारून पावलं टाकण्याचा धीर आमच्यापैकी कुणालाच नव्हता. बावीस-चोवीस वर्षांची मुलं होतो आम्ही तेव्हा. त्यामुळे ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ या म्हणीप्रमाणे ‘उचललं पाऊल, लागले कामाला’ अशी आमची अवस्था होती.
अमेरिकेत खरोखर फीचर्स एजन्सीज आहेत का, त्या काम कसं करतात, कुण्या लेखकाचा एकच लेख एकाच वेळी अनेक दैनिकांत प्रसिद्ध करता येतो का, पैशापाण्याचे व्यवहार कसे केले जातात, कॉपीराइटसारख्या कायद्यात असं काही करणं बसतं का, वगैरे कोणताही विचार न करता आम्ही थेट कामच सुरू केलं. मनात प्रश्न होते, परंतु त्यावर रीतसर विचार करून कायदेशीर सल्ला वगैरे घेऊन निर्णय करावा असं कुणाला वाटलं नाही. आपल्याला अशी एक भन्नाट कल्पना सुचलीय जी आपण प्रत्यक्षात आणू शकतो, यावर आम्ही एवढे खूष होतो की विचार-बिचार करण्याची बातच नव्हती!
‘आम्ही’ म्हणजे कोण होतो? अगदी पहिल्या दिवसापासून स्वत:ला कामाला जुंपून घेण्यात आनंद अवधानी, संतोष कोल्हे, प्रसाद मिरासदार, राजेश्वरी देशपांडे आणि मी- सुहास कुलकर्णी असे होतो. त्यात लगोलग अमिता नायडू, राजेंद्र साठे ही मित्रमंडळी रुजू झाली. किरकोळ कामांसाठी मदतनीस म्हणून मंगेश दखने आला. (आणि अनेक गोष्टी शिकत प्रगती करत गेला. नंतर आलेला दिलीप पानसरेही असाच. अशा सेल्फमेड सहकाऱ्यांबद्दल पुढे कधी सांगेन.) त्याच काळात राहुल आणि शुभदा भिरंगे, वंदना पाबळे, राजश्री कुलकर्णी हे सहकारीही जोडले गेले. पुढे वर्ष-दोन वर्षांत शेखर देशमुख, मंगेश पाठक, हर्षल प्रधान, मंगेश वैशंपायन, राजू इनामदार, कामिल पारखे, अस्मिता कुकडे, ज्योती गंधे, सिकंदर सय्यद, संयोगिता ढमढेरे, शेखर जोशी, रवींद्र कोल्हे, शुभदा चंद्रचूड, रमेश दिघे, विलास पाटील, वैशाली चिटणीस, रवी जोगळेकर, रमण देशपांडे आणि कोण कोण गोळा होत गेले. पुण्यापाठोपाठ मुंबईत राजू कोरडे, शिल्पा शिवलकर, सिद्धार्थ कांबळे, प्रवीण काजरोळकर, सागर जगधनी; नागपूरमध्ये मुकुंद कुलकर्णी, औरंगाबादमध्ये दिलीप वाघमारे, अशी आमच्या वयाच्या आसपासची मुलं-मुली जोडली गेली. युनिक फीचर्स ही कल्पना एवढी इंटरेस्टिंग वाटत होती की त्यामुळे पत्रकारितेत काही करू इच्छिणारी मंडळी त्याकडे अक्षरश: खेचली जात होती. त्याही पुढे हा सिलसिला चालू राहिला. सुनील तांबे, सतीश तांबे, अतुल सुलाखे, सुनीता लोहकरे, मंजुषा वारघडे, महेश सरलष्कर, अमृता वाळिंबे, मुकुंद ठोंबरे, दीपा कदम, हारिस शेख, योगिनी नेने अशी किती नावं सांगावीत... लिहिणाऱ्यांची आणि पडतील ती कामं आपली मानून करणाऱ्यांची एक ङ्गौजच इथे तयार झाली. जयंत गोडबोले, अमलेंदू चौधरी, चंद्रशेखर बेगमपुरे, आनंद नाखरे असे अनेक हुनर अंगी असलेले मित्रही सोबतीला होते. यातील ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात युनिक फीचर्स मार्फत केली, त्यातील अनेकांनी युनिकमध्ये आणि नंतर अन्यत्रही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या दिसतात.
हे थोडं विषयांतर झालं. मी सांगत होतो युनिक फीचर्स सुरू झाल्याबद्दल. फीचर्स एजन्सीची अमेरिकन कल्पना घेऊन आम्ही लागलो कामाला. त्या काळी पुण्यातून ज्येष्ठ संपादक मुकुंदराव किर्लोस्कर हे आशा मुंडले यांच्या सोबतीने ‘निनाद फीचर्स’ नावाचा एक उपक्रम राबवत होते. मुकुंदराव तेव्हा ‘किर्लोस्कर’ मासिकांच्या जबाबदारीतून मुक्त झालेले होते आणि स्वतंत्रपणे लेखन करत होते. वर्तमानपत्रांतून काही विषय आवर्जून लिहिले जावेत यासाठी ते हा उपक्रम राबवत होते, मात्र त्याचं स्वरूप व्यावसायिक नव्हतं. दुसरीकडे ‘देव फीचर्स’ आणि ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप’ नावाच्या दोन फीचर्स एजन्सीज (कपिल देव व सुनील गावस्कर यांच्या नावाशी जोडलेल्या) काम करत होत्या. त्यांचं स्वरूप अति व्यावसायिक होतं. तिसरीकडे कुलदीप नय्यर, बलराज पुरी, खुशवंतसिंग वगैरे नामवंत पत्रकारांचे लेख एकाच वेळी देशभर अनेक दैनिकांत वितरित होत असलेले दिसत होते. पण यापैकी कोणतंही मॉडेल आम्हाला लागू होईल असं नव्हतं. आम्हाला मुकुंदराव किर्लोस्करांसारखं सेवाभावी काम करणं शक्य नव्हतं, कारण आमचा चरितार्थ चालवण्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक होतं. ‘देव’ किंवा ‘पीएमजी’प्रमाणे आम्ही व्यावसायिक होऊ शकत नव्हतो, कारण क्रिकेटसारख्या खपाऊ विषयात काम करण्यात आम्हाला रस नव्हता. तिसरीकडे, आम्ही सर्वच लोक पत्रकारितेत नवे असल्याने आमच्या नावाने लेख-कॉलम वगैरे छापून येणं शक्यच नव्हतं. याचा अर्थ आमचा मार्ग आम्हालाच शोधावा लागणार होता. हे अर्थातच आव्हानात्मक होतं.
अर्थात, आत्ता मी हे जसं लिहितोय तसंच्या तसं तेव्हा वाटत होतं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. तेव्हा विचार वगैरे करायला वेळच नव्हता जणू. ‘फीचर्स एजन्सी’ ही कल्पना राबवायची असं ठरलं तेव्हा काय जमवाजमव करायची हेही माहीत नव्हतं. पुण्या-मुंबईच्या चार मोठ्या दैनिकांशिवाय महाराष्ट्रात किती दैनिकं आहेत, ती कुठून प्रकाशित होतात, त्यांचे मालक-संपादक कोण आहेत, त्यांच्या दैनिकांचा-पुरवण्यांचा संपादकीय दर्जा कसा आहे, त्यांना कोणत्या प्रकारच्या कामाची गरज आहे वगैरे जवळपास काहीही माहीत नव्हतं. या संदर्भात रीतसर शोधाशोध करणं भाग होतं. हेही आजच्यासारखं सोपं नव्हतं. नेटवर जाऊन वेबसाइट बघायची किंवा फेसबुकवर जाऊन संबंधित व्यक्तीशी बोलायचं, अशी सोय तेव्हा नव्हती. लँडलाइन फोन हीदेखील चैन असण्याचा तो काळ होता. त्यामुळे प्रत्यक्ष त्या त्या गावी जाऊन संबंधितांना भेटून येणं हाच पर्याय होता. आमच्यातले एक-दोघं त्या कामी लागले आणि एक-दोघं संपादकीय कामाला लागले. हाती लागेल ते वाचून अभ्यास करणे, विषय काढणे, जमतील तेवढे लेख लिहून बघणे, कोणते विषय कोण लिहू शकेल यासाठी लेखकांचा शोध घेणे, सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातल्या मंडळींना गाठून विषय मिळवणे, त्यातल्या मंडळींना लिहिण्याची विनंती करणे आणि हे सर्व काम करण्यासाठी संपादकीय सहकाऱ्यांचा शोध घेणे अशी कामं सुरू झाली.
पाहता पाहता जमवाजमव झाली. दरम्यान महाराष्ट्रभर पसरलेल्या दहा-बारा जिल्हा दैनिकांशी संपर्क साधून झाला. आमची कल्पना त्यांच्यासाठी अर्थातच नवी होती. एकमेकांच्या सोयीने काम केलं तर कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, ही गोष्ट त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्पष्ट होत गेली. मग त्यांच्याशी बोलून दर पंधरा दिवसांनी दहा लेख पाठवावेत असं ठरलं. विषय कोणते, लेखक कोण वगैरे सर्व आपलं आपण ठरवायचं. (हा नियम पहिल्या दिवसापासून आम्ही पाळला. ‘मागणीप्रमाणे पुरवठा’ तत्त्वाला पूर्ण नकार!) पण त्यामुळे जबाबदारीही खूप येऊन पडली. सगळ्या दैनिकांचा विचार करून, त्यांना आकर्षक आणि नावीन्यपूर्ण वाटतील असे विषय ठरवायचे आणि रंजकपणे लिहायचे, असं ते आव्हान होतं. दर पंधरवड्याला दैनिकांकडे जाणाऱ्या लेखांना आम्ही ‘लेख संच’ असं नाव दिलं. हा लेख संच एकाच वेळी दहा-बारा दैनिकं प्रकाशित करत असत. बहुतेक दैनिकं हे लेख रविवार पुरवणीत प्रकाशित करत. कुणी संपादकीय पानावरही हे लेख छापत. पुढे लवकरच रविवारच्या पुरवणीसाठी लेख संच सुरू झाला आणि दर आठवड्याला पुरवणीतून लेख छापून यायला लागले. जेव्हा हे लेख प्रकाशित होऊन येत तेव्हा आम्हाला केवढा म्हणून आनंद होत असे!
एक सांगायचं राहिलं. सुरुवातीच्या या धावपळीत एक (बेसिक) गोष्ट ठरवायची राहून जात होती. संस्थेचं नाव काय ठेवायचं? ‘बघू रे ते नंतर... आधी हातातली कामं संपवू यात’... असं म्हणत ते सारखं मागेच पडत होतं. पण एक दिवस असा उजाडला की ‘आजच्या आज नाव ठरवायलाच हवं’- असं झालं. आम्ही सर्वजण गप्प झालो. आलीच का ही बिलामत, असाच प्रत्येकाचा चेहरा. तेव्हा कोणकोणती नावं चर्चेत आली हे आता आठवत नाही, पण एक नाव पुढे आलं- ‘युनिक फीचर्स’. त्यातील फीचर्स हा शब्द आधीच ठरला होता, कारण कामाच्या स्वरूपाचं ते वर्णन होतं. सगळी गाडी पहिल्या नावाशीच थांबली होती. ‘युनिक’ हे नाव आम्हा कुणालाच इंटरेस्टिंग वाटत नव्हतं. फारच गुळमुळीत आणि शेंडा-बुडखा नसलेलं वाटत होतं. किराणा मालाच्या दुकानापासून हेअर कटिंग सलूनपर्यंत कशालाही चालणारं. पण तेव्हा या नावाच्या बाजूने कोणते तर्क पुढे आले ते सांगतो. एक, आपण जे काम करू पाहतोय ते कुणालाच माहीत नाही, त्यामुळे संस्थेचं नाव सोपं पाहिजे. आणि दोन, नाव इंग्रजी असलं तरी उद्या आपण महाराष्ट्राबाहेर काम करायचं ठरवलं तर हे नाव उपयोगी पडेल. खरं तर हे दोन्ही तर्क भरपूर चर्चा-वाद-भांडणं करण्यास पुरेसे होते. पण का कुणास ठाऊक, एका समजदारीने आम्ही म्हटलं- ठीक आहे, ठरवून टाका हे नाव. कदाचित नाव ठरवण्यात किती वेळ दवडायचा, असाही व्यवहार्य विचार आम्ही तेव्हा केला असावा.
पण गंमत म्हणजे आम्ही कल्पना केली नव्हती एवढ्या वेगाने ‘युनिक फीचर्स’ हे नाव महाराष्ट्रात ओळखलं जाऊ लागलं. याला दोन-तीन प्रमुख कारणं होती. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्रातल्या दहा-बारा दैनिकांत आमचे लेख नियमितपणे प्रकाशित होऊ लागले होते. प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक लेखाच्या शेवटी कंसात युनिक फीचर्स -म्हणजे (युनिक फीचर्स) असं छापून येत असे. त्यामुळे युनिक फीचर्स ही गोष्ट सर्वत्र कुतूहलाचा विषय बनून गेली. हळूहळू ही ओळख ठळक बनत गेली. आम्ही जे विषय वृत्तपत्रांसाठी लिहीत होतो किंवा लिहवून घेत होतो त्यामुळेही हे कुतूहल निर्माण होत होतं. वृत्तपत्रांच्या पुरवण्यांना आणि संपादकीय पानांनाही या लेखांमुळे तजेला आला होता. संपादक-पुरवणी संपादकही त्यामुळे आमच्यावर खूष होते. दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या विषयांप्रमाणेच पुण्या-मुंबईतल्या नामवंत लेखकांना आम्ही आमच्यामार्फत या दैनिकांसाठी लिहितं केलं होतं. जी नावं केवळ बातम्यांमध्येच छापून येत अशांचे लेख किंवा सदरं आम्ही या दैनिकांसाठी उपलब्ध करून दिली. कोण होते हे लेखक? विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, दया पवार, लक्ष्मण माने, यू. म. पठाण, गंगाधर महांबरे, शं. ना. नवरे, ह. मो. मराठे, रा. रं. बोराडे, ज्योत्स्ना देवधर यांच्यापासून कुमार केतकर, निळू दामले, अशोक शहाणे, निखिल वागळे, प्रिया तेंडुलकर, शिरीष कणेकर, व. कृ. जोशी, सुहास शिरवळकर, शरणकुमार लिंबाळे असे किती तरी लोकप्रिय लेखक आमच्यासाठी लिहीत होते. डॉ. बाबा आढाव, डॉ. नीलम गोऱ्हे, एच. एम. देसरडा, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, प्रकाश जावडेकर अशा राजकीय-सामाजिक क्षेत्रातल्या लेखकांनाही आम्ही लिहितं केलं होतं. नानासाहेब गोरे यांचं एक सदरही आमच्यातर्फे प्रकाशित होत असे. मुख्यमंत्री मनोहर जोशी हे आजवरचे एकमेव मुख्यमंत्री असतील, ज्यांच्या नावाने काही काळ साप्ताहिक सदर दैनिकांत प्रकाशित झालं असेल. त्याशिवाय मालती कारवारकर, लीना मोहाडीकर, बाळ ज. पंडित, वर्षा उसगावकर, स्मिता तळवलकर अशाही अनेक नामवंतांची सदरं युनिक फीचर्सतर्फे प्रकाशित होत. अशी अनेक माणसं! या नामवंतांमुळे युनिक फीचर्सची क्रेझच तयार झाली होती त्या काळी. ‘अमुक मोठं नाव हवंय, तुम्ही मिळवून द्या की जरा’ असं दैनिकं आम्हाला म्हणत. खूप कमी काळात हे सर्व घडून आलं.
तिसरी गोष्ट म्हणजे रविवार पुरवण्यांपलीकडे अनेक विषयांत आम्ही मुसंडी मारली. त्या काळी ‘स्वतंत्र विषयांना स्वतंत्र पुरवण्या’ अशी पद्धत फारशी रूढ झालेली नव्हती. काही दैनिकांमध्ये अशा रीतीने काम होत असे, परंतु त्यांना मजकुराची वानवा असे. त्यामुळे आम्ही सिनेमा-नाटक-कला, महिला, आर्थिक घडामोडी, बालवाचक यांना डोळ्यांसमोर ठेवून आठवड्याला एकेक पानाचा मजकूर उभा करायला सुरुवात केली. मग हळूहळू मनोरंजनाची दर आठवड्याला स्वतंत्र पुरवणीच सुरू केली. लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर दररोज एक पान सुरू केलं. अर्थसंकल्पाच्या काळात आर्थिक विषयावर स्वतंत्र पुरवण्या प्रकाशित होऊ लागल्या. वर्षाच्या अखेरीस वर्षभराचे आढावे घेणारी दहा पानांची एक मालिका तर निव्वळ हिट झाली! ही पानं म्हणजे त्या काळी आम्ही केलेलं इनोव्हेशनच होतं. मराठी दैनिकांमध्ये असे आढावे घेण्याची तेव्हा फारशी प्रथा नव्हती. कुणी छापत असेल तर ते बरंच त्रोटक असे. परंतु आम्ही एकेका विषयावर एकेक पान उभं केलं. प्रत्येक पानात वर्षभरातील घडामोडींचा तारीखवार तपशील, त्या वर्षातील वलयांकित व्यक्तीचं प्रोफाइल, आढावा घेणारा लेख, त्या त्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यक्तीची कॉमेंट आणि काही रंजक मजकूर, असं काय काय त्या पानात असे. जवळपास दहा वर्षं ही पानं आम्ही करत असू. महाराष्ट्रात एकाच वेळी दहा-बारा दैनिकांत हा मजकूर प्रसिद्ध होत असल्याने ‘युनिक फीचर्स म्हणजे भारी काम’ अशी प्रतिमा तयार होत गेली. आम्ही खरोखर कितपत चांगलं काम करत होतो हे आम्हाला माहीत, पण बहुतेक भारीपणाचं बिरूद या पानांच्या कल्पकतेमुळे लाभलं असावं. पुढे आम्ही जेव्हा सिंडिकेटेड दिवाळी अंक करून त्यांचं जिल्हावार वाटप केलं, तेव्हा तर ‘आता हे काय करतील याचा नेम नाही’ असं कुणी कुणी म्हणू लागले.
पुढे आमची भूक आणखी वाढत गेली. महाराष्ट्रात आम्ही दहा-बारा दैनिकांसाठी काम करत असलो, तरी खरं तर वीस-बावीस दैनिकं असल्याचं आमच्या लक्षात आलं होतं. पण ही दैनिकं आम्ही ज्या दैनिकांना लेखसेवा पुरवत होतो त्यांची स्पर्धक दैनिकं होती. अशा वेळेस ही दैनिकं आमचे लेख कसे छापणार, असा प्रश्न आमच्यासमोर होता. पण आम्ही लेखांचा स्वतंत्र संच तयार केला आणि या दहा-बारा स्पर्धक दैनिकांसोबत बोलणी केली. आश्चर्य म्हणजे ही दैनिकंही आमची लेखसेवा घ्यायला तयार झाली. या घडामोडीमुळे उभा-आडवा महाराष्ट्र आणि कर्नाटक व गोव्याचे मराठी भाषक वाचक या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचू लागलो. एका अर्थाने मराठी भाषकांपर्यंत पोहोचणारं माध्यमच आम्ही बनलो होतो. तेव्हा आम्ही गमतीने आणि अभिमानानेही म्हणायचो, ‘महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत वगैरे पेपर्स बडे आहेत खरे, पण त्यांच्याहून अधिक वाचक युनिक फीचर्सकडे आहेत.’ आम्ही करत असलेल्या कामाबद्दलची स्वप्रतिमा उंचावण्यासाठी अशा आगाऊपणाची तेव्हा गरजच असावी आम्हाला!
जिल्हा पातळीवरील किंवा विभागीय पातळीवरील दैनिकांसोबत काम करताना आम्ही पहिल्या दिवसापासून काही पथ्यं पाळली. एक म्हणजे संपादकांशी बोलताना आम्ही संपूर्ण पारदर्शकता ठेवली. तुम्हाला मिळणारा मजकूर ‘एक्स्क्लुझिव्ह’ नाही, तो ‘सिंडिकेटेड’ आहे आणि तुमच्याशी स्पर्धा नसलेल्या अमुक अमुक दैनिकांमध्ये प्रकाशित होणार आहे, असं आम्ही त्यांना स्पष्ट करत असू. या स्पष्टतेमुळे आम्ही सर्वांसोबत मोकळेपणाने काम करू शकलो. अशी पारदर्शकता लेखकांसोबतही पाळली गेली. तुमचे लेख एकाच वेळेस अनेक दैनिकांत प्रकाशित होणार आहेत, आणि त्यातून मिळणाऱ्या मानधनाचा एक हिस्सा तुम्हाला मिळणार आहे, हे त्यांना स्पष्ट केलेलं असे. त्यामुळे तिथेही काही लपवाछपवी नसे. आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये अशी पारदर्शकता असायला हवी, ही बुद्धी आमच्यात कुठून आली कोण जाणे! कारण एरवी आपलं बिझनेस मॉडेल कळू न देण्याची काळजी व्यावसायिक घेत असतात. (रूढार्थाने आम्ही व्यावसायिक वृत्तीचे नव्हतो आणि अजूनही नाही.) परंतु आम्ही करत असलेल्या मेहनतीवर आमचा एवढा विश्वास होता, की अन्य कुणी असं काम करूच शकणार नाही, याची खात्री वाटत होती. (आमच्यासारख्या काही फीचर्स एजन्सीज निघाल्याही, परंतु त्या अल्पजीवी ठरल्या किंवा प्रभावहीन ठरल्या. त्यातील काही आमच्यासोबत असणाऱ्यांनीच काढल्या, पण आमचे-त्यांचे संबंध कधी बिघडले नाहीत. त्यांचे प्रयत्न फसल्यानंतर त्यातील काही स्वगृही परतलेही).
दुसरं पथ्य पाळलं गेलं, ते म्हणजे वेळेअभावी, सोयी-साधनांअभावी किंवा प्राधान्यक्रमाअभावी दैनिकं ज्या गोष्टी करू शकत नाहीत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या कामामुळे दैनिकांत काम करणाऱ्या पत्रकारांचं काम हिरावून घेतलं जाऊ नये, असा आमचा सतत प्रयत्न राहिला. त्यामुळे दैनिकांतील पत्रकारांना आमची कधी भीती वाटली नाही आणि ‘युनिकमुळे अंकाची क्वालिटी वाढायला मदत होते’ अशी भावना मालक-संपादकांमध्ये रुजत गेली. ‘युनिक’वाले सतत काही तरी नवं करत असतात’ अशी प्रतिमा त्यातून तयार होत गेली.
जिल्हा दैनिकांसाठी काम करत असतानाच आम्ही पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य दैनिकांसाठी आणि साप्ताहिकांसाठीही स्वतंत्रपणे काम करत होतो. त्यांच्यासोबत केलेल्या कामाबद्दल पुढील लेखात सांगेन. पण सिंडिकेशन (म्हणजे एकच लेख एकाच वेळी अनेक दैनिकांत प्रसिद्ध होणं)बाबत सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. आमच्या महत्त्वाकांक्षेला कसे धुमारे फुटत होते त्याचं हे लक्षण मानावं. मराठी दैनिकांसोबत काम सुरू केल्यानंतर तीन-चार वर्षांतच आम्हाला इंग्रजी दैनिकांचेही वेध लागले. त्या काळी महाराष्ट्रात दोन मोठी इंग्रजी दैनिकं होती- टाइम्स आणि एक्स्प्रेस. या दैनिकांच्या पुणे आवृत्त्यांसोबत आम्ही थोडं काम सुरू केलं. मग मुंबईत जाऊन धडकायचं ठरलं. तेव्हा राजदीप सरदेसाई मुंबईत टाइम्समध्ये होते. आमचं काम आणि कामाचा पिंड समजून घेतल्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं, “तुम्ही टाइम्सच्या नादी लागू नका. तुमचा आणि टाइम्सचा पत्रकारितेचा अॅप्रोच सारखा नाही.” टाइम्सची दारं बंद झाली. पाठोपाठ राजदीपही टाइम्स सोडून गेले.
पण आम्ही कसले थांबतोय! ‘टाइम्स नहीं तो और सही’ असं म्हणत आम्ही देशभरातल्या प्रादेशिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी दैनिकांना हुडकून काढलं. कर्नाटकातले महत्त्वाचे पेपर कोणते, केरळातले कोणते आणि बंगालातले कोणते असं शोधत गेलो. बारा-पंधरा पेपर्स सापडले आम्हाला. हिंदीतही सहा-आठ दैनिकं असल्याचं कळलं. शिवाय राज्याराज्यांत त्या त्या प्रादेशिक भाषेत अनेक दैनिकं निघत असल्याचं लक्षात आलं. या दैनिकांना इंग्रजीतून लेख द्यावेत आणि त्यांनी आपापल्या भाषेत अनुवादित करावेत, असं आमचं म्हणणं होतं. सगळ्यांशी पत्रव्यवहार आणि फोनाफोनी सुरू केली. कुणीच प्रतिसाद देईना. मग काय करायचं? जिकडे-तिकडे जाणं शक्य नव्हतं. वेळही नव्हता, पैसाही नव्हता आणि भाषेचीही अडचण होती. एखादा सोडला तर आम्ही सर्वचजण सर्वस्वी ‘मराठी बांधव’ होतो. इंग्रजी भाषेपासून चार हात दूर राहणारे. पण अंगात रग अशी, की आपल्याला इंग्रजी येत नसलं तरी आपण इंग्रजी फीचर्स एजन्सी चालवू शकतो, असं वाटत होतं. वेडेपणाच तो! पण धडकत राहिलो. मग एकेक अडचण कळत गेली. पहिली गोष्ट कळली, ती म्हणजे हिंदी प्रांतात ‘फीचर्स एजन्सी’ ही एक बदनाम गोष्ट आहे. तिकडे कुणी कुणी अशा एजन्सीज काढून नको नको ते धंदे केल्याने दैनिकांनी त्यांच्यासाठी ‘नो एंट्री’चे बोर्ड लावलेले. त्यामुळे तिथे प्रवेश बंद! दुसरी गोष्ट म्हणजे, जिथे हिंदी बोलली जात नाही अशा राज्यांतल्या प्रादेशिक भाषिक दैनिकांना दूर महाराष्ट्रातील विषयांबद्दल स्वारस्य नव्हतं. आमचे लेख अनुवादित करून वगैरे छापण्याचा उत्साहही त्यांना नव्हता. तिसरी गोष्ट, राज्याराज्यांतील प्रादेशिक इंग्रजी दैनिकांना अनुवादाचा प्रश्न नव्हता, पण त्यांना कुणाला अशी सर्व्हिस गरजेची वाटत नव्हती. त्यांना आमच्याबद्दल विश्वासही वाटत नव्हता. कोण-कुठली पुण्याची माणसं; त्यांना का ‘एंटरटेन’ करायचं असं त्यांना वाटत असावं. चौथी गोष्ट, तो काळ १९९३-९४चा. बाबरी मशीद ध्वंसानंतर मुंबईत दंगली होऊन गेल्या होत्या. बाँबस्फोट मालिका घडून गेली होती. शरद पवारांचं भूखंड प्रकरण गाजत होतं. अण्णा हजारे- स. शं. तिनईकर- गो. रा. खैरनार कामाला लागले होते. मेधा पाटकर यांचं नर्मदा आंदोलन जोरात होतं. १९९१ नंतरच्या काळातील जागतिकीकरण-खासगीकरणाची प्रक्रिया चर्चेत होती. शिवाय आमच्या दृष्टीने जातीयवाद-अस्पृश्यता-विषमता हे मुद्दे महत्त्वाचे होते. या विषयांवर भारतभर छापून यायला पाहिजे असं मनापासून वाटत होतं. पण दूर केरळच्या दैनिकाला खैरनार-तिनईकर कोण हेच कळत नव्हतं. पवारांवरील आरोपांचे बारीकसारीक तपशील किंवा त्यांची उलट-सुलट बाजू वाचकापर्यंत पोहोचवणं त्यांना महत्त्वाचं वाटत नव्हतं. मुंबई दंगलीतील वैशिष्ट्यपूर्ण सहभागामुळे शिवसेनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं, त्यामुळे आम्ही त्याबद्दल लिहू पाहत होतो. पण या दैनिकांची कार्यशैली आणि आमची समज यांचं समीकरण कुठे जुळत नव्हतं. एका अर्थाने ‘मॅक्रो आणि मायक्रो’ यांतील तफावत आम्ही साधू शकत नव्हतो. आता कळतंय, ज्याला आजच्या प्रचलित भाषेत ‘बिग पिक्चर’ म्हणतात ते त्यांना हवं होतं आणि आम्ही मात्र त्यांना बारीक बारीक तपशील देऊ पाहत होतो.
या साऱ्यामुळे आमची बिगरमराठी दैनिकांशी काही नाळ जमू शकली नाही. आम्हाला पहिलं मोठं अपयश आलं. तोपर्यंत ‘वेडात दौडलेल्या आम्हा वीरांना’ पहिल्यांदाच वास्तवाची झळ बसली. अपरिपक्वतेचा आणि अपुऱ्या तयारीचा फटका बसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आम्ही देशभर पोहोचण्याचा नाद सोडून दिला. हा सर्व उपद्व्याप चालवलेला असताना मराठी दैनिकांसाठीचं सिंडिकेशनचं काम चालूच होतं. बड्या दैनिकांसाठीचंही काम चालू होतं. तेव्हा खासगी टीव्हीचं आगमन होत होतं. त्यामुळे हाताशी काम चिक्कार होतं. एक मोहीम फसल्याने खचून जाण्याचा प्रसंग त्यामुळे आमच्यावर ओढवला नाही.
याच काळात आम्ही सिंडिकेशनच्या तत्त्वावर आणखी एक उपक्रम राबवून बघितला. फीचर्स एजन्सीच्या धर्तीवर न्यूज एजन्सी. आम्ही ज्या दैनिकांसाठी काम करत होतो ती बहुतेक पुण्या-मुंबईपलीकडची होती. त्यांना या मोठ्या शहरांतील बातम्या हव्या असू शकतात असं वाटत होतं. पुणे ही मराठी लोकांची सांस्कृतिक राजधानी आणि मुंबई ही राजकीय-आर्थिक राजधानी. त्यामुळे इथे घडणाऱ्या घटना आणि इथून मिळणाऱ्या बातम्या दैनिकांना हव्या असू शकतात, असा आमचा होरा होता. काही बऱ्या आर्थिक परिस्थितीतील दैनिकांची पुण्या-मुंबईत कार्यालयं होती, कुणाचे फक्त प्रतिनिधी. कुणाकडे तीही व्यवस्था नव्हती. या दैनिकांसाठी काम करायचं तर त्यांना हव्याशा वाटतील अशा बातम्या देणं भाग होतं. शिवाय त्या ‘एक्स्लुझिव्ह’ असणंही आवश्यक होतं. कारण जनरल महत्त्वाच्या बातम्या त्यांना वृत्तसंस्थांकडून मिळत होत्याच. त्यामुळे त्या-त्या दैनिकाच्या प्रभावक्षेत्राशी संबंधित बातम्या मुंबईतून मिळवणं, असं आम्ही आरंभलं. म्हणजे त्या त्या शहराच्या विकासयोजनांबद्दल आमदार-मंत्र्याबद्दल, सामाजिक प्रश्नांबद्दल वगैरे बातम्या मिळवून त्यांना द्यायच्या. त्यासाठी मुंबईत टीम बांधली, धावाधाव करू इच्छिणारी उत्साही मुलं निवडली. बातम्या जाऊ लागल्या. संपादक मागण्या करू लागले. जिकडे-तिकडे बातम्या छापून येऊ लागल्या. पुरवण्यांमध्ये लेख छापून येत होतेच; आता दैनिकांतही युनिक फीचर्सचं नाव रोेज झळकू लागलं. मजा येऊ लागली.
पण हे मॉडेलही फार काळ टिकू शकलं नाही. एकाच वेळेस अनेक दैनिकांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करणं सहज शक्य नाही, असं लक्षात येऊ लागलं. हे करायचं तर टीम मोठी पाहिजे, त्यांचं पगारपाणी पाहिलं पाहिजे. तेवढे पैसे दैनिकांनी द्यायला पाहिजेत. दैनिकांच्या मागण्या होत्या, पण त्यासाठी लागणारे पैसे देणं त्यांच्या बजेटमध्ये बसेना. शिवाय त्या काळात इंटरनेटसारखी स्वस्त सेवा अस्तित्वात नव्हती. फॅक्स नावाचं तंत्र आम्हाला वापरावं लागे. त्याचा खर्चही कुणाला परवडत नव्हता. पब्लिक बूथमधून फॅक्स केला तर खर्च खूपच असे. म्हणून आम्ही स्वत:चं यंत्र विकत घेतलं आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला; पण तरीही जमा-खर्चाचा ताळमेळ बसेना. त्यामुळे आमची ही आयडियाही फोल ठरणार असं लक्षात येत गेलं. खूप काम करूनही, मेहनत करूनही, मगजमारी करूनही अपयश हाती आलं. (पण या उपक्रमामुळे युनिक फीचर्सच्या नावात ‘अँड न्यूज’ नावाचं शेपूट जोडलं गेलं ते गेलंच!) युनिक फीचर्स सुरू होऊन जेमतेम चार-पाच वर्षं होत होती. या छोट्याशा प्रवासात आम्हा मुलांना बसलेला हा दुसरा झटका होता. तो पचवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. परंतु अपयशातून धडा शिकण्याची, त्यातून योग्य तो अर्थ शोधण्याची, नवे प्रयोग करताना काळजी घेण्याची सवय आम्ही स्वत:ला लावून घेतली. गद्धेपंचविशी संपून जरा ‘मॅच्युअर’ होण्याची ही चिन्हं असावीत.
आम्हाला व्यक्ती म्हणून आणि संस्था म्हणूनही मॅच्युअर करणाऱ्या काही घडामोडी त्या काळी वातावरणात व्यापून होत्या. त्यातील पहिली घडामोड अयोध्येत चालू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाची. आमच्या तोवरच्या पंचवीस-तीस वर्षांच्या आयुष्यात कळती वर्षं म्हणाल तर जेमतेम दहा-बारा. अयोध्येतील एका जागेवरून वाद चालू आहे हे १९८५ पर्यंत कुणाच्या गावीही नव्हतं. तोपर्यंत पंजाबचा प्रश्न, मग काश्मीरचा प्रश्न, मग आर्थिक सुधारणांचा प्रश्न वगैरे चर्चेत असायचे. पण अयोध्येचा प्रश्न आणि राखीव जागांचा प्रश्न हे विषय झपकन चर्चेत आले आणि देशाचं सगळं विचारविश्वच बदलून गेलं. सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना राखीव जागा देण्यात अडचण काय आणि वादग्रस्त जागेवर सामंजस्य घडवण्यात प्रश्न कुठे येतो हे आम्हाला तेव्हा कळत नव्हतं. पण या दोन मुद्द्यांबद्दल त्या काळी अक्षरश: घमासान माजलं आणि समाज ढवळून निघाला. समाजातले विविध घटक एकसारखा विचार करत नाहीत, ही जाणीव स्पष्ट होत गेली. या दोन प्रश्नांनी आमची पिढी घडवली. मागासांना राखीव जागा देण्यावरून झालेलं राजकारण आणि अयोध्येच्या मुद्द्यावर हिंदू समाजाचं झालेलं हिंदुत्वीकरण यामुळे आमच्या विचारकक्षा चांगल्याच रुंदावल्या. अर्थात एकीकडे हे शिक्षण चाललेलं होतं आणि दुसरीकडे विचार करणं, लिहिणं, लिहवून घेणं, वृत्तपत्रांना पटवून देणं चाललेलं होतं. परंतु आरक्षणविरोधी भूमिका आणि हिंदुत्ववादी भावना यांनी मध्यमवर्गाला (आणि अर्थातच बहुतेक माध्यमांना) असं काही घेरलं होतं, की आपली समंजस आणि सहिष्णू भूमिकाही अप्रस्तुत बनते की काय असं वाटू लागलं. ‘तुम्ही जे लिहिताय ते वाचकांच्या पचनी पडत नाहीये. हिंदुत्वाची हवा असेपर्यंत असं काही छापता येणार नाही’ असं काही संपादकांनी आम्हाला म्हटलंही. या अनुभवातून एक गोष्ट शिकावी लागली. आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकमानस काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं, ही ती गोष्ट. खरं पाहता युनिक फीचर्स ही कधीच एखाद्या विचारसरणीला बांधून असलेली संस्था नव्हती. पहिल्या दिवसापासून तिची भूमिका ‘जग समजून घेण्याचीच’ होती. पण तरीही आसपास घडणाऱ्या घटना तुम्हाला ‘कोर्स करेक्शन’ करायला लावतात. तेवढी दुरुस्ती तुम्ही करून घेतली नाही तर पाहता पाहता तुम्ही अप्रस्तुत बनता.
ज्याअर्थी युनिक फीचर्स ही संस्था पंचवीस वर्षं टिकली, वाढली आणि पुढे निघालीय, त्याअर्थी हे कसब आम्ही अंगी बाणवू शकलो असं म्हणता येईल. असं ‘कोर्स करेक्शन’ करावं लागतं ही बाब १९९०च्या दशकाने आम्हाला शिकवली. आमच्या या अंगभूत गुणामुळे की कशामुळे माहीत नाही परंतु युनिक फीचर्स या संस्थेला समाजातल्या सर्व थरांनी आपलं मानलं. स्वीकारण्यात आमचे वाचक तर होतेच, परंतु संपादक, लेखक, अभ्यासक, समाजसेवक, कार्यकर्ते, विचारवंतˆ सर्वांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि सोबत केली. असं भाग्य अर्थातच फार थोड्यांना मिळतं.
‘युनिकची मुलं धडपडी आहेत, त्यांना साथ द्यायला हवी’ अशी या साऱ्यांच्या मनातली भावना होती. फीचर्स एजन्सी म्हणून सुरू झालेली ही संस्था या भावनेच्या पाठिंब्यावर वाटचाल करत राहिली आणि कामाचा परीघ वाढवत राहिली.
पहिल्या दहा वर्षांत सिंडिकेशनचा जो उपक्रम आम्ही राबवला त्याची ही धावती गोष्ट. याच काळात आरंभलेल्या अन्य उपक्रमांची गोष्ट पुढच्या महिन्यात.

-सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures.in

'अनुभव'च्या वर्गणीसाठी संपर्क:
युनिक फीचर्स, ८, अमित कॉम्प्लेक्स, ४७४, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे-४११ ०३०.
फोन: (०२०) २४४७०८९६, २४४८६६३७.
वार्षिक वर्गणी (दिवाळी अंकासह) : ५०० रुपये.
'अनुभव' आता पीडीएफ वरही उपलब्ध - PDF वर्गणी : ३०० रुपये.

Comments

मुंबईत ‘नाइटलाइफ’ सुरू करावं?