घर वापसी

महिन्याभरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींचं प्रतिबिंब ‘अनुभव’च्या अंकात पडतं असं नाही. कधी एखाद्या विषयावर माध्यमांमध्ये बरीच चर्चा होऊन जाते, तर कधी वाचकांना पुढे नेऊ शकणारी माहिती, आर्ग्युमेंट सापडण्यात वेळ लागतो. कधी ते लिहू शकणारा सुयोग्य लेखक हाती लागत नाही. या महिन्यातले असे विषय कोणते? या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं?
वाचकांचंही त्या त्या विषयाबद्दल काही मत असेल ते आम्हाला कळवा. त्यातील निवडक मतांना आम्ही अंकात जरूर जागा देऊ. - संपादक

घर वापसी

हिंदू धर्मातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात गेलेल्या व्यक्तींना पुन्हा हिंदू धर्मात परत घेण्याची मोहीम सध्या देशात जोरात सुरू आहे. या ‘घर वापसी’च्या निमित्ताने काही मुद्दे उपस्थित होत आहेत.
* हिंदू धर्म सोडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्यांमध्ये दलितांचं प्रमाण सर्वाधिक आहे. हिंदू धर्मात माणुसकीची वागणूक न मिळाल्याने ज्यांनी धर्म सोडला त्या पूर्वाश्रमीच्या अस्पृशांना घर वापसीनंतर हिंदू धर्मात माणुसकीचं आणि सन्मानाचं स्थान मिळेल याची खात्री कोण आणि कशी देणार?
* योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार हे लोक धर्मांतरापूर्वी ज्या जातीत होते तीच जात-तेच गोत्र त्यांना पुन्हा बहाल करण्यात येणार. तसं असेल तर त्यांच्या घर वापसीने काय साध्य होईल?
* सुखी आयुष्य जगण्याची प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यात धर्माचं नेमकं स्थान काय? धर्माची ओळख आणि धर्मांतर यांचं माणसाच्या भौतिक आयुष्यात किती महत्त्व असतं?

वाचकांना याबद्दल काही शेअर करावंसं वाटलं तर त्यांनी आपलं मत आम्हाला अवश्य कळवावं.