गद्धेपंचविशी

‘काय, युनिक फीचर्स सुरू होऊन पंचवीस वर्षं झाली?’
हा प्रश्न आम्हाला हल्ली पुन्हा पुन्हा विचारला जातोय. कुणी हा प्रश्न खेकसत प्रेमाने विचारतो तर कुणी साशंक अचंब्याने. प्रश्न विचारणाऱ्याचा ‘युनिक फीचर्स’शी किती काळ आणि किती घनिष्ठ संबंध आहे यावर प्रश्नांकित स्वराची प्रतवारी ठरते.

जी मंडळी आम्हाला पंचवीस किंवा त्याहून अधिक काळ ओळखणारी आहेत त्यांच्या प्रश्नामध्ये प्रेमाचा ओलावा असतो. पाठीवर मायेने हात फिरवल्याची जाणीव त्यातून होते. ‘झाली ना पंचवीस वर्षं युनिक सुरू करून!’ अशी साफल्याची भावना त्यांच्या बोलण्यात असते. ‘खूप कष्ट केलेत तुम्ही...’ असं काहीसं त्यांच्या न बोलल्या गेलेल्या संवादात असतं.

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही मित्रांनी युनिक फीचर्स ही संस्था सुरू केली तेव्हा आम्ही कोण होतो? कॉलेजातलं शिक्षण संपवून नोकरी-करियरसाठी धडपड करणारी तेवीस-चोवीस वर्षांची मुलं होतो आम्ही. कुणी पत्रकारितेच्या पदवीची नुकतीच परीक्षा दिली होती, तर कुणी पत्रकारितेतली दोन-तीन वर्षांची मुशाफिरी पूर्ण केलेली होती. अनुभवाची म्हणाल तर रेंज एवढीच. प्रत्येकजण कमी-अधिक चळवळ्या. कुणी विद्यार्थी संघटनांमधून काम केलेला, कुणी सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गुंतलेला, कुणी अभ्यास मंडळं-शिबिरं वगैरेंना वळसा घालून आलेला. प्रत्येकाची सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी, पण ‘काही तरी करायला पाहिजे’ची ओढ एकच. या ओढीतून युनिक फीचर्सची कल्पना पुढे आली आणि आकारत गेली. या कल्पनेचा बाप कोण आणि आई कोण हे शोधणं निव्वळ फिजूल. कारण आम्हा मित्रांमधील अस्वस्थतेतून निर्माण झालेली कल्पना होती ती.

अस्वस्थता दोन पातळ्यांवर होती. एक व्यक्तिगत आणि दुसरी थोडी व्यापक. यातली कोणती अस्वस्थता अधिक तीव्र होती, असा विचार आता केला तर त्यात विशेष असा फरक नव्हता असं वाटतं. त्या काळी दैनिकांमधून वगैरे जुन्या-जाणत्या मंडळींचा बराच वरचष्मा असायचा. वयाचा अनुभव हीच ज्येष्ठतेची मुख्य अट. आजकाल माध्यमांमध्ये जशी तरुण मुलामुलींची चलती दिसते, तसं चित्र तेव्हा नव्हतं. त्यामुळे आपल्याला कधी नोकऱ्या मिळणार, कधी जबाबदारीची कामं मिळणार आणि आपण केव्हा मनाजोगतं काम करणार, अशी अस्वस्थता मनात असे. ही व्यक्तिगत पातळीवरची अस्वस्थता. पण ऐन जवानीतली पाच-सात वर्षं उमेदवारी करण्याऐवजी आपणच धडाक्याने काही करायला हवं, असं या अवस्थतेमुळे वाटे. धडाक्याने काम कशासाठी करावंसं वाटे? त्याला व्यापक अस्वस्थता कारणीभूत असावी. तो काळ भारताला राजीव गांधीप्रणीत एकविसाव्या शतकात नेण्याचा होता. दुसरीकडे जमिनीवरची, खेड्यापाड्यांतली परिस्थिती बिकट होती. समाजातला भला थोरला भाग आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास होता, विकासापासून वंचित होता, अन्याय-अत्याचाराने पिडलेला होता. बहुसंख्यांकांच हे जिणं आपल्या माध्यमांमध्ये प्रतिबिंबित होत नाही आणि समाजाचं विपरीत चित्रच रंगवलं जातं, असं आमचं मत होतं. त्यामुळे वंचितांचे प्रश्न आणि सामाजिक प्रश्नांची गुंतागुंत लोकांसमोर यायला हवी, असं आम्हाला वाटाचं. दैनिकांतल्या पत्रकारांना हे सर्व करायला वेळ, संधी, अवसर नसेल तर आपणच ते करायला हवं, याचीही जाणीव होती. पण त्याच वेळेस आपल्या हाती कोणतंही माध्यम नसताना असा विचार करणं फिजूल आहे हेही कळत असायचं. या अस्वस्थतेतून एक मार्ग सामोरा आला. जे प्रश्न आपल्याला दैनिकांत छापून येणं गरजेचं वाटतं त्यावर आपण लिहावं, हा विचार पुढे आला तेव्हा अनुषंगाने येणारे व्यावहारिक व रास्त प्रश्न आम्हा कुणाला पडले नाहीत, हे एक बरंच झालं म्हणायचं. कारण मनात येणारा विचार योग्य असला तरी तो आपण तडीस नेऊ शकतो का, अशी शंका मनाला चाटूनही गेली नाही. वयाच्या पंचविशीतच असला गाढवपणा सुचू शकतो. गद्धेपंचविशी न् काय!

तर सांगत असं होतो, की समविचारी मित्रांनी एकत्र यावं आणि दैनिकांसाठी वगैरे भरपूर लिहावं, हा विचार पक्का होत गेला. म्हणजे म्हटलं तरही मुक्त पत्रकारिता होती; परंतु एकत्रितपणे करणार असल्याने तिचं स्वरूप जरा जास्त संघटित होतं. महाराष्ट्रात यापूर्वी असं काम कुणी केल्याचं ऐकिवात नव्हतं. पण आज गंमत वाटते, की तेव्हा या गोष्टींचं दडपण आलं नाही. उलट, आपण ‘युनिक’ आहोत या विश्वासातून ऊर्जाच मिळे काम करायला. सुरुवातीच्या काळात आम्ही चार-पाच मित्रांची कोअर टीम होती. त्याभोवती आणखी चार-पाच सोबत्यांची साथ. असे आठ-दहाजण सतत उधळलेले. जिकडे-तिकडे. कुणी मुलाखती घेतंय, कुणी विषयांच्या मागे पळतंय. कुणी लेखकांशी बोलतंय, कुणी संपादकांना गाठतंय. कुणी अभ्यास करतंय, कुणी लेख लिहितंय. कामच काम! दिवसातले सोळा-सोळा तास काम. काम करणारे सगळेच सडेफटिंग. मग ती मुलं असोत अथवा मुली. कुणाची लग्नं झालेली नव्हती आणि कुणाचे आई-वडील त्यांच्या मुलांवर फार आशाही लावून बसले नव्हते. त्यामुळे सकाळी उठलं की रात्री उशिरापर्यंत झिंगल्यासारखं काम. सूर्य उगवला नि मावळला तरी त्याचा पत्ता नाही, असं काम. या राक्षसी कामात जे टिकले ते टिकले. ज्यांना हे अघोरीपण झेपलं नाही ते फेकले गेले. पण ‘युनिक फीचर्स’ ही संस्था उभी राहिली ती या सर्वांच्या कष्टांवरच.

अगदी सुरुवातीच्या काळात सर्वांनी लेख लिहिणे हा एकच उद्योग आम्ही आरंभला होता. लेख लिहायचे नि ते संपादून, पुनर्लेखन करून, टाइप वगैरे करून महाराष्ट्रभरातील वृत्तपत्रांना पाठवायचे, हेच काम. थोडीथोडकी नव्हे, तब्बल दहा वर्षं हे काम अव्याहतपणे चालू राहिलं. कामाच्या या स्वरूपामुळेच संस्थेच्या नावात ‘फीचर्स’ हा शब्द जोडला गेला. लेख लिहायचे, दैनिकांत पाठवायचे, छापून आले की त्यातून मिळणाऱ्या पैशांवर आणि (समाधानावर) पुढील काम सुरू करायचं, असं चक्र सुरू झालं. ‘फीचर्स सिंडिकेट’ किंवा ‘फीचर्स एजन्सी’ नामक श्रेणीत मोडणाऱ्या या कामाबद्दल पुढे सांगेन. पण त्या काळी सुप्रसिद्ध संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी ‘निनाद फीचर्स’ नावाची एक संस्था काढली होती. त्याशिवाय कपिल देवची ‘देव फीचर्स’ आणि सुनील गावस्करची आणखी कुठली तरी फीचर्स एजन्सी चालू होती. पण त्यांच्यापेक्षा युनिक फीचर्सचं स्वरूप सर्वस्वी वेगळं होतं. काय-कसं वगैरे तेही पुढे कधी तरी सांगेन.

पण १९९० मध्ये युनिक फीचर्स सुरू झालं आणि हरतर्हेने वाढत गेलं. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या त्या काळच्या मोठ्या दैनिकांपासून महाराष्ट्रातील वीस-बावीस दैनिकांमध्ये आमचे लेख नियमितपणे छापून येत. बहुतेकदा रविवारी. नंतर-नंतर संपादकीय पानांवरही. मग साप्ताहिक सकाळ-लोकप्रभा-चित्रलेखामध्येही लेख छापून येऊ लागले. महाराष्ट्राबाहेरील गोवा व कर्नाटकातील मराठी भाषिक प्रांतांतील दैनिकांतही लेख प्रसिद्ध होऊ लागले. दिवाळी अंकांमध्ये आम्ही लिहू लागलो. असं करत करत महाराष्ट्राच्या छापील माध्यमात आमचा प्रेझेन्स ठळक बनत गेला. लेख कुणाचाही असो, ‘युनिक फीचर्सकडून आलेला लेख’ ही ओळख वाचक आणि संपादकांमध्ये महत्त्वाची बनत गेली. त्यामुळे दैनिकांतून भरपूर आणि मनासारखं काम करता आलं.

त्यानंतर ‘अनुभव’ हे मासिक सुरू झालं २००० साली. त्याआधी १९९४ पासून याच नावाच्या मासिकाची संपादकीय जबाबदारी आम्ही पार पाडत होतो. (या मूळच्या ‘अनुभव’बद्दलही नंतर सांगेन.) २००० साली सुरू झालेला ‘अनुभव’ आजतागायत चालू आहे, वाढत आहे. महाराष्ट्रातील सजग वाचकांचं तो व्यासपीठ बनला आहे. आता तो वेबसाइटवरही उपलब्ध आहे, आणि येत्या काळात अनुभवचं ‘अॅप’ही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. नव्या पिढीशी जुळवून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे. ‘अनुभव’बद्दल ‘अनुभव’चे वाचक सर्व काही जाणून आहेत, त्यामुळे इथे त्यावर आत्ता फार लिहीत नाही.

२००० सालाच्या आगेमागे टीव्ही माध्यमाचा प्रवेश झाला. आधी इंग्रजी-हिंदी आणि मग प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या. या माध्यमात पत्रकारिता करता येईल का, असा किडा आमच्या डोक्यात वळवळणं स्वाभाविकच होतं. त्यानुसार हालचाल सुरू झाली. हिंदीतली ‘सुरभि’सारखी लोकप्रिय मालिका असो, किंवा प्रिया तेंडुलकर, जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांचे हिंदीतले शो असोत, त्यांच्यासाठी ‘रिसर्च’चं काम आम्ही सुरू केलं. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक प्रश्न मांडले जावेत, ते योग्य पद्धतीने मांडले जावेत आणि योग्य माहितीच्या आधारे मांडले जावेत, असा प्रयत्न आम्ही करत असू. पुढे मराठी वाहिन्या आल्यानंतर त्यांच्यासाठी पत्रकारी इनपुट्स असलेल्या चर्चेच्या कार्यक्रमांची निर्मितीच आम्ही सुरू केली. पुढे चार-पाच वर्षांनी आपल्या वाहिन्यांनी मनोरंजनाकडे आपला मोहरा वळवल्यानंतर आम्हीही त्यातून बाहेर पडलो. ‘गड्या आपुला प्रिंट मीडियाच बरा’ असं म्हणत आम्ही छापील माध्यमातील कामं बळकट करू लागलो.

२००६ मध्ये युनिक फीचर्सच्या कामाचा भक्कम विस्तार झाला- ‘समकालीन प्रकाशना’च्या रूपाने. पुस्तक प्रकाशनाचा हा उपक्रम युनिक फीचर्सची पत्रकारितेची दृष्टी अधिक ठळक करणारा ठरला. चांगलंचुंगलं वाचू इच्छिणारा महाराष्ट्रातला वाचक ‘अनुभव’मुळे युनिक फीचर्सशी जोडला गेला होताच. ‘समकालीन’मुळे हा वाचक वाढला, विस्तारला. आज ‘युनिक-अनुभव-समकालीन’ परिवारात सामाजिकदृष्ट्या सजग वाचकांची मांदियाळी भरलेली आहे.

२०१० मध्ये युनिक फीचर्सतर्फे ‘ई-संमेलन’सुरू झालं. वेबसाइटवर भरणारं हे पहिलं साहित्य संमेलन ठरलं. असा उपक्रम कुणी केल्याचं किंवा चालवल्याचं ऐकिवात नाही. यंदाचं वर्ष हे संमेलनाचं पाचवं वर्ष आहे. रत्नाकर मतकरी, ग्रेस, भालचंद्र नेमाडे आणि ना. धों. महानोर या श्रेष्ठ साहित्यिकांनी यापूर्वी या संमेलनाची अध्यक्षपदं भूषविली आहेत. या वेब संमेलनातही अनेक उपक्रम चालू असून वेबजाळ्यात सुरुवातीपासूनच्या महत्त्वाच्या मराठी लेखकांबद्दलची माहिती मराठी व इंग्रजीत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. या ई-संमेलनाची जन्मकथाही ‘युरेका युरेका’ गटातली असल्याने जरा नंतर सावकाशपणे सांगितलेली बरी.

युनिक फीचर्सच्या प्रवासातील अलीकडची भर म्हणजे स्वत:चे दिवाळी अंक. ‘अनुभव’च्या दिवाळी अंकासोबत आता पर्यटन-भटकंती वगैरे विषयांना वाहिलेला ‘मुशाफिरी’, विनोदाभोवती बांधलेला ‘कॉमेडी कट्टा’ आणि कुमारवयीन मुलामुलींसाठी ‘पासवर्ड’ हे अंक प्रकाशित केले जात आहेत. पासवर्डचा अंक मराठीप्रमाणेच इंग्रजीतही उपलब्ध केला जातो. अशा रीतीने दरवर्षी पाच दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा आणि प्रस्थापित करण्याचा विक्रम युनिक फीचर्सच्या नावावर जमा झाला आहे.

गेल्या पंचवीस वर्षांबद्दल सांगण्यासारखं अर्थातच आणखी बरंच आहे. इथे नोंदवलेली ही अगदीच धावती झलक आहे. ‘अनुभव’च्या आगामी अंकात युनिकच्या आजवरच्या प्रवासाबद्दल थोडं विस्ताराने लिहावं असा विचार आहे. बघू यात.

१९९० ते २०१५ असा पंचवीस वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना या संस्थेने काय मिळवलं, काय दिलं याचा तटस्थ लेखाजोखा मांडावा असंही वाटत आहे.
युनिक फीचर्सच्या पंचविशीबद्दलचा हा पहिला धावता लेख थांबवताना मनात एक प्रश्न येतो तो तुमच्यासोबत शेअर करतो. ‘काय, युनिक फीचर्स सुरू होऊन पंचवीस वर्षं झाली?’ हा जो प्रश्न हल्ली आम्हाला विचारला जातो आहे त्यामागे दोन शक्यता असाव्यात असं वाटून जातं.

युनिक फीचर्सचं वय पंचवीस आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाही, याचं कारण या संस्थेच्या ताजेपणात, नवनव्या गोष्टी करण्याच्या झपाट्यात आहे, की पंचवीस वर्षं झटापट करूनही या संस्थेच्या प्रयत्नांची ओळखच ठळक झालेली नाही यात आहे?

पहिली शक्यता असेल तर ती आजवर केलेल्या कामाला मिळालेली पावती आहे असं समजून जोमाने काम करत राहणं स्वाभाविक आहे. दुसरी शक्यता असेल तर नव्याने झडझडून काम करण्याला पर्याय नाही.
थोडक्यात काय, काम करा- काम करा- काम करा! वयाच्या पंचविशीत एकदा गाढवासारखा विचार केल्यानंतर आयुष्यभर गाढवासारखं काम करत राहावं लागणार नाही तर काय?

-सुहास कुळकर्णी
suhas.kulkarni@uniquefeatures.in

अनुभवचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क:
०२०-२४२७०८९६ / ०२०-६५६०५१६८ किंवा subscribe.anubhav@gmail.com