जय जवान जय किसान

'मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन' आणि 'अनुभव' मासिक यांचा संयुक्त उपक्रम
लष्कराचं काम आहे देशाच्या सीमांचं रक्षण करणं. काश्मीरच्या सीमारेषा तर गेली ५० वर्षं धगधगत आहेत, अस्वस्थ आहेत. लढायांनी ग्रासलेल्या आहेत. आणि त्यामुळे तिथलं सैन्यही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जागं आहे.
पण काश्मीरमधील लडाख भागात ‘डिहार’ ही लष्कराची एक संस्था अशी आहे जिने लडाखमधील सैनिकांचं जीणं सुकर व्हावं यासाठी जे काम केलं, त्यातून पूर्ण लडाखमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
या संस्थेचं काम मूलभूत आणि जगावेगळं आहे, असं लक्षात आलं ‘मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन’ला. त्यांनी या संस्थेला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. त्यांच्या कामाची ही ओळख.

-गौरी कानेटकर

आपल्यापैकी बहुतेकांना लडाख सिनेमांतून भेटतं.
नजर जाईल तिथवर डोंगर-दर्‍या, काही बर्ङ्गाळ, काही बोडक्या. मधूनच निळ्याशार पाण्याचा एखादा तुकडा.
जनावरांसोबत, पश्मिना मेंढ्यांना घेऊन घराकडे परतणारी दिलदार पहाडी माणसं!
किंवा कारगिलमधल्या कमालीच्या थंडीची पर्वा न करता शत्रूवर तुटून पडणारे सैनिक...
सिनेमांचा कॅमेरा इथवरच पोचतो. त्याला दिसतं ते असं किंवा तसं रोमँटिक लडाख.
पण खरा लडाख? तो सुरू होतो या सिनेमाच्या पलीकडे. या पहाडी लोकांच्या घरांमध्ये आणि सैनिकांच्या बराकींमध्ये. सिनेमाच्या ङ्ग्रेम्समधून बाहेर पडून ही माणसं घरी पोचतात, तेव्हा तिथलं जगणं सिनेमातल्यासारखं रोमँटिक नसतं.
तिथं असतं झगडणं. निसर्गाशी. निसर्गानं वरदान म्हणून झोळीत घातलेल्या अभावांशी.
उबदार प्रदेशातून ट्रेकिंगसाठी, पर्यटनासाठी गेलेल्यांना जे सौंदर्य अलौकिक, थरारक वगैरे वाटतं ते हाडंच नव्हे तर विचारशक्तीही गोठवणारी थंडी घेऊन येतं. हिवाळ्यात उणे ४० अंशांपर्यंत उतरणारं आणि उन्हाळ्यात ३५ अंशांवर चढणारं तापमान. समुद्रसपाटीपासून १० हजार ङ्गुटांवर वसलेला प्रदेश. विरळ हवा, ऑक्सिजनची कमतरता, बर्फाचं साम्राज्य असूनही पाण्याची कमालीची टंचाई आणि हिवाळ्यातले सहा-सात महिने जगाशी पूर्ण तुटणारा संपर्क. पण तरीही गेली कित्येक वर्षं लडाखी लोक या भागात आनंदानं जगत आले आहेत. आपलं जगणं त्यांनी निसर्गाच्या वेड्यावाकड्या वळणांशी जुळवून घेतलं आहे.
पण इथं तैनात असलेल्या लष्कराचं काय?
लष्कराला इथं नुसतं जगायचं नाहीये. त्यांना डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करायचंय. शत्रूशी लढायचंय.
त्यासाठी शरीर आणि मन तंदुरुस्त हवं. पण अतिउंची, टोकाच्या विषम हवामानामुळे होणारे शारीरिक त्रास, अन्नधान्याची, दुधदुभत्याची टंचाई, अशा परिस्थितीत तंदुरुस्ती टिकवणार कशी?
या गोष्टीची जाणीव प्रकर्षानं झाली ती १९६२ च्या भारत-चीन युद्धात. या युद्धात हजारो भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले. त्यात मोठी संख्या होती ती हवामानानं घेतलेल्या बळींची. त्या युद्धानं आपल्याला हाही एक धडा शिकवला.
त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी या प्रश्नाला भिडायचं ठरवलं. ते विज्ञानाच्या मदतीनंच शक्य आहे, हेही ओळखलं. त्याच वर्षी भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञान विकसित करणार्‍या ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ची एक प्रयोगशाळा लडाखमध्ये सुरू झाली. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑङ्ग हाय अल्टिट्यूड रिसर्च’ (डिहार) या नावानं.
‘डिहार’नं गेल्या ५० वर्षांत केलेल्या विविध संशोधनांमुळे लष्कराचं लडाखमधलं वास्तव्य काही प्रमाणात का होईना सुकर झालं आहे. आणि तेही अशा तर्‍हेनं की लष्करासाठी सुरू झालेल्या कामाचा साइड इफेक्ट म्हणून सार्‍या लडाखचाच कायापालट होऊ घातलाय. गेली कित्येक वर्षं संथ, अल्पसंतुष्ट आयुष्य जगणार्‍या लडाखचा गेल्या वर्षीचा आर्थिक विकास दर आहे २३.७८ टक्के. संपूर्ण देशाच्या विकासाचा दर आठ टक्क्यांच्या मागेपुढे असताना लडाखच्या दृष्टीने या २३ टक्क्यांचं महत्त्व किती असेल, हे आपल्या लक्षात येतं. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहेच, पण त्याहूनही मह्त्त्वाचं असं काही लडाखला गवसलंय. भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देता येतं, त्यावर उत्तरं शोधता येतात आणि पल्याडच्या जगाप्रमाणे सुखानं जगण्याचा हक्क आपल्यालाही आहे, याची जाणीव लडाखच्या लोकांना ‘डिहार’च्या निमित्ताने झाली आहे. ती कोणत्याच आकडेवारीत न मांडता येणारी आहे. म्हटलं तर हा चमत्कार आहे, म्हटलं तर अस्मानी संकटांना चिकाटीनं आणि बुद्धीनं दिलेलं सुलतानी उत्तर!
एखाद्या भूप्रदेशाच्या आयुष्यात पंचवीस-पन्नास वर्षं हा क्षुल्लक काळ. गणतीतही धरू नये असा. पण गेली ५० वर्षं लडाखच्या आयुष्यात मात्र निर्णायक ठरली आहेत, कारण शेती, प्राणी, पोल्ट्री, हॉर्टिकल्चर, वनौषधी, फळभाज्या, बायोटेक्नॉलॉजी आणि आता अपारंपरिक उर्जेच्या साधनांपर्यंत नाना परीने विचार करत लडाखच्या प्रश्नावर ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांनी उत्तरं शोधली आहेत. हे संशोधन-तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी लष्करी शिस्त आणि शास्त्रज्ञांचा भिडस्तपणा बाजूला ठेवून ‘डिहार’नं अनेक अर्थांनी आऊट ऑफ द बॉक्स काम केलं आहे. तेही एका अर्थाने सरकारी चौकटीत राहून. लष्करी संस्था असल्याने ही चौकट बरीच सैल झाली असेल, लाल ङ्गितीचा गडदपणा कमी झाला असेल, पण तरीही ५० वर्षांमध्ये ‘डिहार’च्या टीमला अनेक अप्रिय अनुभवांना सामोरं जावं लागलं असणार, यात वाद नाही. पण असा कोणताही अनुभव ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांना ध्येयापासून ढळवू शकला नाही, हे ग्रेटच!
या कामाचं लडाखच्या लेखी काय महत्व आहे, हे या प्रदेशाच्या इतिहास-भूगोलात डोकावलं की लक्षात येतं. लडाख हा जम्मू-काश्मीर राज्याचा एक भाग. बर्फाळ वाळवंट आणि दर्‍याखोर्‍यांनी तयार झालेला. सीमेवरचा भाग असल्यानं लडाखनं आजवर अनेक सामाजिक आणि भौगोलिक स्थित्यंतरं अनुभवली. १८व्या शतकापर्यंत लडाख आंतरराष्ट्रीय व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग होता. या मार्गातून होणार्‍या व्यापारावर लडाखमध्ये करही लावला जायचा. अर्थात तेव्हाही लडाखी लोक प्रामुख्यानं अवलंबून होते ते तुटपुंज्या शेतीवर आणि प्राण्यांपासून मिळणार्‍या उत्पादनांवर. नंतर तिबेटच्या सीमा चीनने बंद केल्याने हा व्यापार जवळपास संपला. स्वातंत्र्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर सैन्य दाखल झालं आणि लडाखच्या इतिहासाला आणखी एक वळण लागलं. चीनच्या युद्धानंतर लडाखच्या अनेक समस्या जशा देशाच्या अजेंड्यावर आल्या, तसा हा अनवट प्रदेश पर्यटकांनाही खुणावू लागला. पण तिबेटी संस्कृतीशी अधिक जवळीक सांगणार्‍या लडाखला आपलंसं करणं आणि टोकाच्या विषम हवामानाशी जुळवून घेणं हे आव्हान सोपं नव्हतं.
‘डिहार’च्या कामाला सुरुवात झाली ती याच तुटलेपणाचा आणि मरणाच्या थंडीचा अनुभव घेत. खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिसायचं ते लांबच लांब पसरलेलं बर्फ. गोठलेलंजीवन. ‘डिहार’मध्ये दाखल झालेले शास्त्रज्ञही या वातावरणाशी परिचित नसलेले. आसपास ना आपल्या माणसांची सोबत, ना करमणुकीचं साधन. त्या काळात दळणवळणाची, संपर्काची साधनंही कमी होती. अशा परिस्थितीत मानसिक, शारीरिक स्वास्थ्य ढळू न देता तग धरणं हेच मोठं यश होतं. पण प्रतिकूल परिस्थितीच्या नाकावर टिच्चून या शास्त्रज्ञांनी डोंगराएवढं काम उभं केलं आहे, असं ‘डिहार’च्या सध्याच्या संचालक डॉ. शशीबाला सिंग आवर्जून सांगतात. देशाच्या विविध भागातून शास्त्रज्ञ इथे आले, स्थानिक युवकांना वेगवेगळ्या पातळीवर या प्रकल्पात सामावून घेत त्यांनी एकाच स्वप्नाचा पाठलाग करणारं एकत्र कुटुंबच लेहमध्ये उभं केलं.
शेती आणि प्राण्यांपासून मिळणार्‍या उत्पादनात गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) आणि संख्यात्मक वाढ (क्वांटिटेटिव्ह) करण्यासाठी संशोधन हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं. पण सुरुवात झाली ती प्रामुख्याने त्या भागात तगणारी झाडं लावण्यापासून. ‘डिहार’मुळे लडाख कसं बदललं आहे, हे पाहण्याआधी हे तसं छोटसं वाटणारं उदाहरणही आपली दृष्टी बदलणारं आहे. वृक्षारोपण हा आपल्याकडे वापरून चोथा झालेला उपक्रम. त्यामुळे त्यात असं मोठं ते काय, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण जीवनदायी ऑक्सिजनची कमतरता असणार्‍या १२ हजार फुटांवर फुलणारं एक-एक झाड मोलाचंच असणार, हे ‘डिहार’च्या पहिल्या फळीतील शास्त्रज्ञांनी ओळखलं. त्या भागात जगणारी झाडं शोधून काढणं, त्यावर प्रयोग करणं आणि ही झाडं जास्तीत जास्त उंचीवर लावत नेणं, याला ‘डिहार’नं कायमच महत्त्व दिलं. आता त्याचं मोल इतरांनाही नेमकं समजतं आहे. त्या काळापासून सातत्याने झालेल्या वृक्षारोपणामुळे लडाखमधील ऑक्सिजनची पातळी जवळपास चक्क ५० टक्क्यांनी वाढली आहे.
या शास्त्रज्ञांसमोर पहिलं आव्हान होतं ते मुबलक आणि विविधता असलेलं अन्न उपलब्ध करण्याचं. ही टंचाई म्हणजे काय ते कित्येक महिने पानात रोज एकच भाजी पडल्याशिवाय किंवा हिवाळ्यात नुसतं सूप पिऊन गुजराण करायला लागल्याशिवाय कळणं अशक्यच. पण लडाखमध्ये सैन्यासाठी, लडाखच्या लोकांसाठी आणि पर्यटन हा पुढच्या काळात इथला प्रमुख व्यवसाय बनेल, असं मानलं तर तो बहरण्यासाठीही अन्नधान्याची, दूधदुभत्याची मुबलकता हवी ही पहिली गरज होती. या हवामानात भाज्या पिकू शकल्या तर लष्करासाठी हवाई मार्गाने अन्न आणण्याचा द्राविडी प्राणायाम आणि खर्च तर वाचणार होताच. शिवाय या भाज्या लष्कराला विकून स्थानिकांच्या हातात पैसेही खेळू शकणार होते. पण इतक्या अतिशीत वातावरणात भाजीपाला पिकणार कसा? त्यामुळे पुढे आला ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाचा पर्याय. भाजीपाला वाढू शकेल, असं तापमान निर्माण केलं तर हा प्रश्न सुटणार होता. फक्त इतरत्र तापमान कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं, इथे तापमान वाढवण्याच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार होतं.
या टप्प्यावर लडाखमधल्या प्रश्‍नांच्या मूळाशी जाताना इथल्या पारंपरिक ज्ञानाचाच आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो, याची जाणीव ‘डिहार’ला होती. अतिशीत आणि विरळ हवेच्या प्रदेशात भाज्यांची लागवड करण्यासाठी ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांनी, शेतीतज्ज्ञांनी ग्रीनहाऊसमधलं जे आधुनिक तंत्रज्ञान शोधून काढलं, ते लडाखी लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करूनच. हिवाळ्यात लडाखमध्ये पाण्याची प्रचंड चणचण असते. लडाखी लोक उन्हाळ्यात पाणी भरून ते जमिनीखाली पुरून ठेवत. जिओथर्मल एनर्जीमुळे बाहेरून बर्फाचं आवरण पसरलं तरी आतलं पाणी गोठत नाही. शास्त्रज्ञांनी हेच तंत्र व्हॅल्यू ऍडिशन करून ग्रीनहाऊसमध्ये वापरलं. ही ग्रीनहाऊसेस योग्य तापमान तर राखतातच, पण काही ग्रीनहाऊसमध्ये सिंचनाचीही सोय आहे. मुख्य म्हणजे त्या भागात उपलब्ध साहित्यात आणि कमी खर्चात ती उभारणं शक्य आहे. ‘डिहार’ने लडाखमध्ये उपयुक्त ठरेल, असं तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे ती उभारणं आणि त्यात शेती करणं सोपं झालं आहे. त्यातच राज्य सरकारचं कृषी खातंही ग्रीन हाऊस उभारण्यासाठी शेतकर्‍यांना ५० टक्के सवलत देतं. त्यामुळे लडाखमध्ये व्यवसायाची नवी संधी खुली झाली आहे. तब्बल २००च्या आसपास ग्रीन हाऊसेस इथे उभी राहिली आहेत.
या ग्रीनहाऊसमध्ये आज एकूण ७८ प्रकारच्या भाज्या होतात. ‘डिहार’च्या कामाला सुरवात झाली तेव्हा हा आकडा होता ङ्गक्त चार! २००८-०९मध्ये भाज्यांचं २२,००० मेट्रिक टन इतकं प्रचंड उत्पादन झालं आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे शेतकर्‍यांच्या हातात त्या वर्षी साधारण ३५ कोटी रुपये पडले. आणि दुसरीकडे लष्कराचे हवाई वाहतुकीपायी खर्च होणारे ६० कोटी रुपये वाचले. ही सगळी पैशांची गणितं. सैनिकांच्या, स्थानिकांच्या जेवणात विविधता आली, पौष्टिक मूल्यं वाढली. त्या समाधानाचं, आरोग्याचं मोजमाप वेगळंच.
‘डिहार’च्या शेती विभागाने केलेलं आणखी एक संशोधन तितकंच क्रांतिकारी आहे. वनस्पती वाढण्यासाठी जसं योग्य तापमान, मातीतील काही घटक आवश्यक असतात, तसंच मातीतले गांडुळासारखे सजीव घटकही. त्यासाठी गांडुळशेती हे आता सर्वत्र रूढ झालेलं तंत्र. पण लडाखच्या हवामानात ही गांडुळं जिवंत कशी राहणार? पण ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांनी माणसांना जगवण्यासाठी इथे गांडुळांनाही जीवदान दिलं आहे. उणे ३३ अंशातही आपलं काम करणारी गांडुळाची जात त्यांनी शोधून काढली आहे. ही जात लडाखच्या शेतीची उत्पादकता वाढवते आहे.
हीच यशकथा जवळपास प्रत्येक विभागाची आहे. ज्याचा अभाव आहे, ते निर्माण करायचं आणि आपल्या आसपास जे आहे त्याचा योग्य वापरही करायचा, हा या यशामागचा मंत्र. साधं उदाहरण घेऊ. लडाखमध्ये ‘सीबकथॉर्न बेरी’ हे न लावता कोठेही उगवणारं रानङ्गळ. आपल्याकडच्या करवंदांसारखं. तिथले लोक ही फळं खायचे, जास्त झाली की उपटून टाकून द्यायचे. ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांनी याच फळावर काम सुरू केलं. लक्षात आलं की यात, ए, बी२ आणि सी व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणावर आहेत. आज या संशोधनामुळे या फळापासून ‘लेह बेरी’ हे व्यावसायिक शीतपेय तर तयार झालंच आहे, पण त्याशिवाय आयुर्वेदिक चहा, हर्बल जॅम, मल्टिव्हिटॅमिन हर्बल पेय अशी अनेक उत्पादनंही बाजारात आली आहेत. आणि त्यातून नव्या व्यवसायाच्या शक्यताही. हॉर्टिकल्चर विभागानं या सार्‍या उत्पादनाचं पेटंट मिळवलेलं आहे आणि ती उत्पादनं खालपर्यंत पोचवण्यासाठी सरकारची मदतही घेतली आहे.
या विभागातच लडाखच्या पाणी टंचाईवर शेतीसाठी उत्तर शोधण्याचा प्रयत्नही झालाय. अतिशय कमी खर्चात आणि लडाखच्या परिस्थितीशी जुळवून घेईल अशी ‘ड्रिप इरिगेशन’ यंत्रणा तयार करण्यात ‘डिहार’ला यश मिळालंय. पूर्वी भाज्यांचा साठा करणंही जवळपास अशक्य होतं. प्रक्रिया केलेल्या भाज्यांचा साठा करणारे ‘झिरो एनर्जी कोल्ड स्टोअरेज स्ट्रक्चर’ हे देखील व्यवसायाचं परिमाण बदलवणारं तंत्रज्ञान आता लडाखच्या लोकांना मिळालं आहे.
पुरेशा प्रमाणात दूध आणि अंडी, पुरेसं, चांगल्या दर्जाचं ताजं मांस उपलब्ध करणं आणि वाहतुकीसाठी घोड्यांची दणकट जात तयार करणं ही आव्हानं ‘डिहार’च्या प्राणी संशोधन विभागानं स्वीकारली. पूर्वी लडाखमधल्या गायी दिवसाला सरासरी एक लिटर दूध द्यायच्या. साहजिकच दुधाची प्रचंड टंचाई होती. ‘डिहार’मध्ये विकसित झालेली गायीची जात आज दिवसाला सरासरी १४ लिटर दूध देते. या गायी आता लडाखच्या घराघरांत पोहोचू लागल्या आहेत. २००८-०९ मध्ये केवळ दुधाची उलाढाल होती सुमारे ३.५ कोटी रुपये. सोलर पोल्ट्री हाऊसिंगमध्ये टुणटुणीत राहतील, अशा कोंबड्यांची जातही इथे विकसित झाली आहे. डोंगराळ भागाचा कणा असणार्‍या झंस्कार या खेचराची दुर्मिळ जात टिकवण्याचं आणि तिच्यात सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं भलंथोरलं कामही ‘डिहार’च्या नावावर आहे.
‘इथल्या प्रश्नांना इथली उत्तरं’ या सूत्राची पुढची पायरी होती इथल्या आजारांना इथली औषधं. समुद्रसपाटीपासून १२ हजार फुटांवरचं जीवन अनेक शारीरिक त्रास निर्माण करणारं असतं. निद्रानाश, कॉग्निटिव्ह डिसङ्गंक्शन्स, ऍडजस्टमेंट डिसऑर्डर्स अशा अनेक त्रासांवर ‘डिहार’मध्ये स्थानिक वनौषधीतून उपाय शोधले जात आहेत. त्यांनी एवढ्या उंचीवर तयार केलेली वनौषधींची बाग हे जगातलं एक आश्‍चर्यच आहे. आतापर्यंत ‘डिहार’ला या वनौषधींपासून ‘यू व्ही प्रोटेक्टेड ऑइल’ आणि भूकवर्धक औषधं तयार करण्यात यश मिळालं आहे.
‘डिहार’ने करून दाखवलेल्या या कामांची दखल केवळ देशानेच नव्हे तर जगानेही घेतली आहे. तंत्रज्ञान आणि त्याचं ऍप्लिकेशन इथपर्यंत मर्यादित नाही. एक संशोधन संस्था म्हणून तिचं योगदान देशाला नव्हे तर जगाला दखल घ्यायला लावणारं आहे. एकतर आपल्या देशाच्या अवाढव्य पसार्‍यात बर्फाळ भाग अक्षरश: नगण्य. त्यामुळे इथं झालेलं संशोधन सार्‍या देशात उपयोगी पडण्याची शक्यता नाही. म्हणजेच अशी उत्तरं शोधणं ही सार्‍या देशाची गरज नाही. पण तरीही ‘डिहार’ उभं राहिलं, प्रश्‍नांना भिडत राहिलं, हाती आलेले तोडगे समाजापर्यंत पोचवत राहिलं. आज लडाखच नव्हे तर इतर देशांतील बर्ङ्गाळ प्रदेशांची परिस्थिती या संशोधनामुळे पालटण्याची शक्यता आहे. इशान्येकडील अतिउंच भागात ‘डिहार’च्या मदतीनं कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. पण मंगोलिया, किरगिझिस्तान आणि रशियानेही सीबकथॉर्नपासून उत्पादनं तयार करण्याचं संशोधन त्यांच्या भागात वापरण्यासाठी ‘डिहार’ची मदत मागितली आहे.
‘डिहार’चं वेगळेपण जसं समस्येचा सर्वंकष वेध घेण्यात आहे तसंच हे तोडगे स्थानिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यातही आहे. ऍग्रीकल्चर एक्स्टेन्शन हा स्वतंत्र विभागच त्यांनी त्यासाठी निर्माण केला आहे. लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या वेगवेगळ्या खात्यांमार्फत तर ही संशोधनं लोकांपर्यंत पोचत आहेतच, पण तंत्रज्ञानाचं ऍप्लिकेशन सोपं करून दाखवणार्‍या पुस्तिका, लघुपटही ‘डिहार’नं तयार केले आहेत. ‘जय जवान-जय किसान-जय विज्ञान’ अशी घोषणा देत ही लष्करी संशोधन संस्था लडाखच्या घराघरांत पोचली आहे. प्रशिक्षण देते आहे. त्यामुळेच ‘डिहार’बद्दल लडाखी लोकांच्या मनात एक खास जागा तयार झाली आहे. इथे दरवर्षी ऑगस्टमध्ये ठरलेल्या तारखांना प्रशिक्षण मेळावा होतो. आणि कोणतीही जाहिरात न करता, बातमी न देताही त्या दिवशी लडाखच्या वेगवेगळ्या भागांतून लोक लेहमध्ये दाखल होतात. दुर्गम भागात राहणार्‍या लोकांसाठी आता ‘डिहार’ने सियाचीन, पर्तापूर आणि कारगिल येथील केंद्रांवरही असे प्रशिक्षण मेळावे सुरू केले आहेत. एरव्ही भारतीय लष्कर सिव्हिलियन्सपासून अंतर राखून असतं. पण इथे मात्र लष्कराने त्या भूमिकेला विचारपूर्वक फाटा दिला आहे. त्यातून लष्कर आणि स्थानिक जनतेतील संबंध सुधारण्यात मोठी मदत झाली आहे. या संशोधनामुळे निर्माण झालेल्या नव्या अर्थव्यवस्थेत लष्कर-स्थानिक संबंध एकतर्फी उरलेले नाहीत. या संशोधनानं सरकारच्या प्रतिमेलाही वेगळा आयाम मिळाला आहे. प्रशासन आणि कल्याणकारी योजना राबवणं हेच सरकारचं मुख्य काम असा बहुतेकांचा समज असताना एखाद्या सरकारी संस्थेनं मूलभूत संशोधनाला अशा प्रकारे हात घालणं लोकांसाठी नक्कीच उत्साह वाढवणारं आहे.
भारतात होणार्‍या यशस्वी इनोव्हेशन्समध्ये ‘डिहार’चं नाव ठळकपणे घ्यावं लागेल, यात शंका नाही. बर्फगार कडाक्याच्या थंडीत आणि लष्कराच्या पोलादी चौकटीत राहून केलेलं इनोव्हेशन हे अशाप्रकारचे प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला वस्तुपाठ ठरावं असं आहे.
हे सारं घडलं ते ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांमुळे. एरवी बहुतेकदा संशोधन हे रिसर्च पेपरपुरतं नि पीएचडीच्या प्रबंधापुरतं उरत असतं. त्यामुळे त्यातलं संशोधन लोकांपर्यंत, त्यांच्या भल्यासाठी अपवादानेच पोचतं. ‘डिहार’च्या शास्त्रज्ञांनी ही रीत मोडून काढली. ते प्रश्नांच्या मुळाशी भिडले. जिथे सर्वसामान्यांचा तर्क थांबतो, तिथून पुढे त्यांनी आव्हान स्वीकारलं. ते केवळ सरकारी कर्मचारी उरले नाहीत. तसं पाहता केवळ बदली झाली म्हणून हे सारे या बर्फाळ प्रदेशात आले. त्यांचं इथलं वास्तव्य किती? तर इथून पुन्हा बदली होईपर्यंत. पण त्यामुळे ‘डिहार’ची कामामागील प्रेरणा आणि वृत्ती बदलली नाही. काम उभं रहात गेलं. लडाख बदलत राहिला.
पण या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात ढगफुटी झाली नि लडाख पुरतं धुवून निघालं. त्यात ‘डिहार’च्या मदतीने उभारलेले उद्योगधंदे जमीनदोस्त झाले.
...पण अशी संकटं आली, गेली तरी त्यावर मात करणारं संशोधन- तंत्रज्ञान आता लडाखच्या हातात आहे. या बेचिराखीतून पुन्हा कसं उभं राहायचं हे त्यांना आता कळलंय. ते कळणं अशा अनेक महापुरांना पुरून उरणारं आहे..

गौरी कानेटकर
मोबाइल : ९६५७७०८३१०

मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन
‘मॅरिको इनोव्हेशन ङ्गाउंडेशन’ ही डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्त्वाखाली २००३ साली स्थापन झालेली संस्था आहे. आधुनिक भारत घडवण्यासाठी सर्वच क्षेत्रात इनोव्हेशन्स झाली पाहिजेत आणि त्यांचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग केला पाहिजे अशी डॉ. माशेलकर यांची भूमिका आहे. तिला अनुसरूनच ‘मॅरिको फाउंडेशन’तर्फे सरकारी, खाजगी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये केली जाणारी इनोव्हेशन्स शोधली जातात आणि त्यांचा गौरव केला जातो. ज्या इनोव्हेशन्सचा उपयोग सर्वसामान्यांचं जगणं सुकर होण्यासाठी होतो अशांचाच विचार पारितोषिकांसाठी केला जातो.
अशी पारितोषिक विजेती इनोव्हेशन्स अधिकाधिक लोकांना माहिती व्हावीत आणि समाजातल्या मोठ्या घटकांसाठी त्याचा उपयोग व्हावा या भूमिकेतून ‘अनुभव’ मासिक आणि ‘मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन’ एकत्र आले आहेत.
त्या मालिकेतील हा पहिला लेख.

Comments

C.It may also be the result of a disrupted female menstrual cycle which can prevent or limit egg release.He reports that he does not drink alcohol smoke or take any medications. Isotretinoin Other cortical areasPamela Crick is years old and suffers from a degenerative joint disease that is caused by the wearing away of tissue around her joints.May eventually see reversal of blood flow Quick Hit In women coarctation of the aorta may be associated with Turner s syndrome.Endocrine causes hyperthyroidism Addisons disease diabetes gastrinoma VIPoma j.

C.It may also be the result of a disrupted female menstrual cycle which can prevent or limit egg release.He reports that he does not drink alcohol smoke or take any medications. Isotretinoin Other cortical areasPamela Crick is years old and suffers from a degenerative joint disease that is caused by the wearing away of tissue around her joints.May eventually see reversal of blood flow Quick Hit In women coarctation of the aorta may be associated with Turner s syndrome.Endocrine causes hyperthyroidism Addisons disease diabetes gastrinoma VIPoma j.

rheumatoid arthritis.Secondline agents include verapamil calcium channel blocker valproic acid anticonvulsant and methysergide.herpes genitalis Infection of skin and genital mucosa caused by the herpes simplex virus HSV. buy retin a without prescription In addition the results of animal studies on the role of VIP in penises of diabetic animals are conflicting Miller et al.Smooth muscle makes up the involuntary or visceral muscles that move internal organs such as the digestive tract blood vessels and secretory ducts leading from glands.These account for of all cases.This set Charnley thinking about biomechanicsthe union of machines and living tissues and factors such as friction bearing surfaces and lubrication.

rheumatoid arthritis.Secondline agents include verapamil calcium channel blocker valproic acid anticonvulsant and methysergide.herpes genitalis Infection of skin and genital mucosa caused by the herpes simplex virus HSV. buy retin a without prescription In addition the results of animal studies on the role of VIP in penises of diabetic animals are conflicting Miller et al.Smooth muscle makes up the involuntary or visceral muscles that move internal organs such as the digestive tract blood vessels and secretory ducts leading from glands.These account for of all cases.This set Charnley thinking about biomechanicsthe union of machines and living tissues and factors such as friction bearing surfaces and lubrication.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा