फिरत्या ‘सिनेमा’ची गोष्ट - नम्रता भिंगार्डे

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमाचं अर्थकारण सुधारल्याची बरीच चर्चा आपल्याकडे होते आहे, पण त्याही आधीपासून मराठी सिनेमांना पैसे मिळवून देणारं एक माध्यम आपल्याकडे अस्तित्वात आहे याची माहिती आपल्यापैकी कितीजणांना आहे? ‘टूरिंग टॉकीज’ नावाची एक अद्भुत दुनिया गेल्या अनेक वर्षांपासून जत्रांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरते. त्या दुनियेचा हा फेरफटका.

‘बंदे हैं हम उसके, हमको किसका डर..’ जत्रेतल्या तंबूत समोर लावलेल्या लांबलचक आयताकृती काळ्या पडद्यावर चाललेला ‘धूम-3’ रंगात आला होता. स्टाइलमध्ये बाइक चालवणाऱ्या आमीर खानला बघून तंबूतलं वातावरण शिट्या आणि आरडाओरड्याने भरून गेलं होतं. 400 ते 500 प्रेक्षक सहज मावतील एवढी ऐसपैस जागा तंबूत असल्याने कुणी मांडी ठोकून, कुणी पाय सोडून तर कुणी चक्क लोळत सिनेमा पाहत होतं.
परभणी जिल्ह्यातल्या बाराशीवच्या जत्रेत माणसांच्या प्रचंड गजबजाटाच्या मधोमध अगदी मोक्याच्या जागी शामियान्यासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या तंबूभोवती लोकांचे जथ्थेच्या जथ्थे घुटमळताना दिसले आणि नकळत माझी पावलं तिकडे वळली. जत्रा म्हणून माझ्या डोळ्यांसमोर जी काही चित्रं होती त्यात हा तंबू कधीच नव्हता. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी त्या तंबूत डोकावले आणि टूरिंग टॉकीज नावाचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उलगडत गेलं.
***
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावात वर्षातून एकदा देवाच्या नावाने जत्रा होतात. कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात नमन, दशावतार असे मनोरंजनाचे प्रकार होतात, तर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या जत्रांत तमाशाचे फड आणि तंबूतले सिनेमे रंगतात. एरवी गावागावांतल्या प्रेक्षकांना चित्रपट पाहायचाच असेल तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एकमेव चित्रपटगृहावर अवलंबून राहावं लागतं. कधी ते सिनेमागृह बंद असतं तर कधी कामाच्या धबडग्यातून वेळ मिळत नाही. त्यामुळे गावखेड्यातल्या जत्रेच्या निमित्ताने अख्खंच्या अख्खं सिनेमागृहच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. पूर्वी गावोगावच्या प्रेक्षकांपर्यंत सिनेमे नेणाऱ्या बायोस्कोपचं अवाढव्य स्वरूप म्हणजेच टूरिंग टॉकीज, अर्थात फिरतं सिनेमागृह.
गावातली जत्रा जवळ आली की एका सकाळी देवाच्या नावे असलेल्या मोकळ्या शेतात टॉकीजचं सामान येऊन पडतं. पाठोपाठ सिनेमाचा तंबू उभारणाऱ्या कामगारांची लगबग दिसू लागते. यात्रेचा मुख्य दिवस नजरेत ठेवत तंबू उभारण्याचं काम सुरू होतं.
‘‘हम चार भाई। हमारे आठ लडके और दो भांजे सब इदरकू काम करते। हम टाकी लगाते, पोस्टर लगाते, मशिन संभालते।’’ वयाच्या साठीला आलेले उस्मानचाचा तंबूसाठी खड्डा खणता खणता सांगत होते. जत्रेत लागलेली एक टाकी (हा ‘टॉकीज’चा अपभ्रंश) उस्मानचाचांच्या परिवाराची. शिक्षणाचा अभाव, अंगमेहनतीची तयारी आणि विस्तारित कुटुंबपद्धती यामुळे टूरिंग टॉकीजच्या व्यवसायात मुसलमान मोठ्या प्रमाणावर आढळतात. उस्मानचाचांच्या परिवारातला प्रत्येक पुरुष टॉकीजवर काम करतो. बोलता बोलता गोलाकार पद्धतीने खड्डे खणून झाले. सगळ्यांनी एकमेकांच्या मदतीने मातकट रंगाचं जाड कापड अस्ताव्यस्त पसरून टाकलं. ते चक्रीच्या साहाय्याने हळूहळू वर चढवलं जाऊ लागलं आणि बघता बघता चारी बाजूंनी खिळे ठोकून ताणून धरलेल्या कनातीने आकार घेतला. आता तंबू एखाद्या शामियान्यासारखा डौलदार दिसू लागला. तंबूच्या आतून लावलेल्या काळ्या कापडामुळे आणि चहुबाजूंनी बंदिस्त असल्याने आतमध्ये चांगलाच काळोख असतो. पडद्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला छोट्याशा झरोक्यातून येणारा प्रोजेक्टरचा पांढरा झोत हाच काय तो प्रकाश. त्यामुळे इथल्या प्रेक्षकांनाही अंधाऱ्या सिनेमागृहात पडदाभर पसरलेला चित्रपट पाहण्याची मजा लुटता येते.
टूरिंग टॉकीजची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा यात्रेपासून होते. नंतर म्हसवड, पुसेगाव, पाली, औंध अशी या जत्रेतून त्या जत्रेत मजल दरमजल करत टूरिंग टॉकीज जवळपास 400 जत्रांमध्ये लागते. एका जत्रेत दोन ते दहापर्यंत तंबू ठोकलेले असतात. प्रत्येक तंबूत वेगळा चित्रपट लावलेला असतो. एकापेक्षा जास्त सिनेमांचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे टूरिंग टॉकीजला एक प्रकारचं फिरतं मल्टिप्लेक्स म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अर्थात टूरिंग टॉकीजची तुलना मल्टिप्लेक्सशी केली तरी मल्टिप्लेक्समध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा इथे मागमूसही आढळत नाही. त्यामुळे अर्थातच तिकिटंही कमी दराची असतात. आणि म्हणूनच खेड्यापाड्यातल्या गरिबांच्याही खिशाला ही चैन परवडू शकते. 25 रुपयांपासून तिकिटाची सुरुवात होते. लहान मुलांना बहुतेकदा फुकटच आत सोडलं जातं. अनेकदा चित्रपट सुरू झाला की दारावरची दराची पाटी बदलते. मधूनच चित्रपट बघायचा असेल तर फक्त 10 रुपये मोजून उरलेला चित्रपट पाहता येतो. तंबूत बसायला खुर्च्या असतातच असं नाही, पण त्याने कुणाचंही काही अडत नाही. रणरणत्या उन्हात उभ्या असलेल्या बंदिस्त कनातीत घामाच्या धारा टिपत, मातीतच बसकण मांडून प्रेक्षक एकचित्ताने चित्रपट पाहतात. शिवाय तंबूतही पिक्चर पाहताना खायचे मोठे पापड आणि पोंगे (नळ्या) यांनी भरलेल्या परड्या घेऊन एक-दोघंजण तयारच असतात. सिनेमाचं एक रीळ संपलं, म्हणजेच इंटरव्हल झालं की कनातीचं कापड वर गुंडाळलं जातं आणि हे विक्रेते प्रेक्षकांमध्ये घिरट्या घालू लागतात. तंबू सिनेमात असा इंटरव्हल कमीत कमी दोन वेळा होतो. त्यामुळे तंबू सिनेमाच्या आधाराने पोंगे, पापड विकणारे, पान-सुपारी आणि चहाची टपरी चालवणारे अनेक व्यावसायिक या इंटरव्हलमध्ये चांगली कमाई करतात.

टूरिंग टॉकीजचा प्रवास

महाराष्ट्रातल्या जत्रांमध्ये टूरिंग टॉकीजची सुरुवात नेमकी कोणी आणि कधी केली याची नोंद नाही. खुद्द व्यवसायात असलेल्या लोकांनाही याबाबत ठामपणे सांगता येत नाही. बहुतेक 1954 पासून तंबूत सिनेमा दाखवायला सुरुवात झाली असावी. तेव्हा मूक चित्रपट दाखवले जायचे. तेव्हा तिकीट असायचं दहा आणे. पूर्वी तंबूत मधोमध पडदा लावला जायचा. पडद्याच्या एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला बायका असं वर्गीकरण व्हायचं. त्यामुळे बायकांना चित्रपट उलटा बघावा लागायचा.
‘‘आधी मूक चित्रपट, नंतर ब्लॅक अॅन्ड व्हाइट बोलपट, मग रंगीत, असा भारतीय सिनेमाचा प्रवास टूरिंग टॉकीजमध्येही बघायला मिळतो. सुलोचना, राजा गोसावी यांचे कौटुंबिक चित्रपट; मग चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, लीला गांधी यांचे तमाशाप्रधान चित्रपट; आधीच्या पिढीत दादा कोंडके आणि नंतरचं लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे विनोदी चित्रपट, अशा मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या सगळ्या लाटा टूरिंग टॉकीजने आणि इथल्या प्रेक्षकांनीही अनुभवल्या आहेत,’’ असं घुमट पाटील सांगतात. टूरिंग टॉकीजमध्ये तंबू ठोकणारा कामगार ते तंबूमालक असा पाटील यांचा प्रवास आहे. पण आता टूरिंग टॉकीजचं सुवर्णयुग संपलं आहे, असं त्यांचं म्हणणं. ते सांगतात, ‘‘मी स्वत: दहा वर्षांपूर्वी या हातांनी जत्रांमध्ये एकेका दिवशी चार-चार लाखांचं कलेक्शन घेतलं आहे. पण मधल्या काळात तंबूतला कामगार जगवताना हातातोंडाशी गाठ पडणंही मुश्किल झालं.’’
मधल्या काळात चित्रपटाच्या कॅसेट्स, सीडी, टीव्ही मालिका, इंटरनेट, यू ट्यूब अशा अनेक माध्यमांमधून गावांपर्यंत मनोरंजन पोहोचलं. त्याचा फटका जसा मराठी चित्रपटाला बसला तसाच तो तंबू सिनेमांनाही बसला. त्या काळात अनेक टॉकीज मालक कर्जबाजारी झाल्याने हा धंदा बंद केल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
महाराष्ट्रातल्या गावाखेड्यांत टीव्हीवर चित्रपट, मालिका यांचा चोवीस तास मारा सुरू असल्यामुळे टूरिंग टॉकीजला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली आणि तंबू तोट्यात जाऊ लागले. त्यातही तंबूत सिनेमा लावण्यासाठी मोजलेले पैसे, तंबू उभारण्याचा खर्च, जनरेटर चालवण्यासाठी डिझेलचा खर्च, कामगारांच्या जेवणाखाण्याचा खर्च, सावकाराकडून घेतलेलं कर्ज, तर कधी सोसाट्याचा वारा आणि वळवाच्या पावसाने तंबूंचं होणारं नुकसान यामुळे या धंद्यातून मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण कमी होतं गेलं. आता शंभर एक टूरिंग टॉकीजमधील केवळ 40 ते 45 टूरिंग टॉकीज तग धरून आहेत. या टॉकीजना तारलं ते हिंदी आणि तमिळ चित्रपटांनी. पूर्वी टूरिंग टॉकीजमध्ये फक्त मराठी सिनेमेच लागायचे; पण त्यावर पोट चालत नाही म्हटल्यावर हिंदी आणि डब केलेले तमिळ चित्रपट दाखवून तंबू व्यावसायिकांनी नफ्या-तोट्याचं गणित सांभाळलं.
हा व्यवसाय नेमका होतो तरी कसा? एक म्हणजे भाडे पद्धती. यात निर्माता सुरुवातीला तंबूवाल्याला काही रक्कम देऊन यात्रा बुक करतो. या पद्धतीत तंबू उभारण्यासाठी लागणारं भांडवल आधीच उपलब्ध होतं, त्यामुळे तंबूमालक तोट्यात जात नाही आणि यात्रेत पिक्चर चाललं तर निर्माताही बक्कळ पैसा कमावतो. दुसरी पद्धत म्हणजे टक्केवारी. यात पैशाचा व्यवहार सुरुवातीला केला जात नाही, तर तिकिटाचे पैसे अर्धे-अर्धे वाटून घेतले जातात. पण या पद्धतीत रोजचं कलेक्शन घेण्यासाठी स्वत: निर्माता जातीने हजर असावा लागतो. कारण निर्मात्यांना तंबूवाल्याकडून फसवलं जाण्याची भीती वाटते. तिसरा प्रकार म्हणजे फिक्स हायर. बहुतेक हिंदी चित्रपट या पद्धतीने भाड्याने घेतले जातात. एक तर चित्रपटांची बोली लागते किंवा तंबूवाला निर्मात्याला ठराविक रकमेची हमी देऊन चित्रपट घेतो. चित्रपट फ्लॉप गेला तर तंबूमालक स्वतःच्या खिशातून हमी रक्कम भरतो. पण अनेक जत्रांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्या प्रकारचा चित्रपट चालेल याबाबतचे तंबूमालकांचे ठोकताळे तंतोतंत बरोबर येतात. एखादा चित्रपट चालत नाहीये असं दिसलं तर चित्रपटाचं नाव, पोस्टर बदलून तंबूमालक मुद्दलाइतकं तरी नक्कीच कमावू शकतो. वर्षातले सात महिने महाराष्ट्रभर चालणाऱ्या या टूरिंग टॉकीजची वार्षिक उलाढाल अंदाजे 50 कोटींच्या घरात आहे.

सिनेमे कोणते, कलाकार कोण?

‘एका विवाहितेचा सूड... पहा- भरला मळवट रक्ताने!’- अनुप टूरिंग टॉकीजमधल्या स्पीकरने माझं लक्ष वेधून घेतलं आणि टॉकीज लावलेल्या पोस्टरवर माझी नजर खिळली. पोस्टरवर हातात कोयता घेतलेल्या तेजा देवकरला पाहून बायाबापड्यांनी तिकिटासाठी गर्दी केली होती.
जत्रांमध्ये फेरफटका मारला की कधीही नाव न ऐकलेल्या मराठी सिनेमांची पोस्टर्स तंबूवर झळकताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मामाच्या राशीला भाचा, माझी शाळा, स्वप्न सौभाग्याचे, भरला मळवट रक्ताने हे कोणते सिनेमे, ते कधी आले असा प्रश्न आपल्याला पडतो. यातले काही सिनेमे फक्त टूरिंग टॉकीजसाठी बनवलेले असतात, तर काही सिनेमांचं नामांतर झालेलं असतं. कलाकृती निर्मितीच्या वगैरे भानगडीत न पडता टूरिंग टॉकीजमध्ये पैसा कमावणं या शुद्ध व्यावसायिक हेतूने हे सिनेमे बनवलेले असतात. प्रस्थापित मराठी सिनेमामधील सृजनशील, गंभीर वगैरे चित्रपटांना इथे कुणीही विचारत नाही. जत्रेत नाग किंवा सापाचा चित्रपट हमखास चालतो. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे चित्रपट जत्रेत चवीने पहिले जातात. सावत्र आई, सुनेचा सासरी होणारा छळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना नायिकेची होणारी तगमग अशा विषयांवरचे भडक सिनेमे जत्रेत निर्मात्याला किंवा तंबूमालकाला लाखोंची कमाई करून देतात. म्हणूनच आजूबाजूच्या तंबूंत धूम-3, गुंडा, रामलीला असे हमखास गर्दी खेचणारे सिनेमे चालू असूनही ‘भरला मळवट रक्ताने’सारखे कौटुंबिक सिनेमे चांगली कमाई करतात.
खास जत्रेतल्या मराठी सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची एक मोठी फळी आहे. मराठीतील ट्रॅजेडी क्वीन, म्हणजेच अलका कुबल तंबू सिनेमात आघाडीवर आहेत. आजवर कोणत्याही मराठी नायिकेला मिळाली नसेल इतकी लोकप्रियता अलका कुबल यांना महाराष्ट्रात खेडोपाड्यांतल्या प्रेक्षकांकडून मिळाली. अलका कुबल यांच्यानंतरचं लोकप्रिय नाव आहे तेजा देवकर. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सेलिब्रिटी नट्यांना मिळते तशी वागणूक तेजाला टूरिंग टॉकीजच्या विश्वात मिळते. तिची आई नीता देवकर यांनी तेजाला घेऊन निर्मिती केलेल्या ‘हिरवं कुंकू’ या चित्रपटाने तंबू सिनेमात न भूतो न भविष्यति असा गल्ला कमावला. याखेरीज विजय कदम, मनोज जोशी, वंदना वाकनीस, मिलिंद गवळी, रीना जाधव, दीपाली सय्यद असे अनेक कलाकार लोकप्रिय आहेत. याखेरीज मराठीतली प्रसिद्ध अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची नक्कल करणारी कलाकार जोडीही तंबू सिनेमा जगात तुफान लोकप्रिय आहे. शिवाय दादा कोंडके यांचे ‘वाजवू का’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘पांडू हवालदार’ असे ओरिजनल चित्रपट टूरिंग टॉकीजमध्ये दर वर्षी भरपूर गल्ला कमावून देतात. तसेच ताजे हिंदी आणि तमिळ पिक्चरदेखील जत्रांमध्ये जोरात चालतात. गेल्याच वर्षी हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ने आणि डब केलेल्या रगडा, जाँबाज की जंग या चित्रपटांनी चांगला धंदा केला. ‘डर्टी पिक्चर’ने तर वसुलीचे सगळे विक्रम मोडीत काढले, असं तंबूमालक सांगतात.

पोस्टर्सची चलती

एक मळकट धोतर घातलेले आजोबा टॉकीजच्या ठिकाणी एकामागून एक पोस्टर पाहत फिरत होते. एका मोठ्या पोस्टरपाशी ते बराच वेळ रेंगाळले. विस्फारलेले डोळे, सोन्यासारखा चमचमणारा मुकुट, आशीर्वादासाठी उठलेला हात. पोस्टरवर एक नायिका देवीच्या भूमिकेत होती. बराच वेळ ते पाहणाऱ्या आजोबांनी निघताना नकळत हात जोडले आणि पोस्टरवरील देवीला मनोभावे नमस्कार केला. ‘‘ह्यो म्हातारा रात्री बायका-पोरास्नी घेऊन येणार बगा!’’ अलंकार टॉकीजचे मालक मला म्हणाले.
शहरी भागात प्रेक्षक टीव्हीवर लागणारे प्रोमोज, इंटरनेट अथवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणारी समीक्षा वगैरे वाचून चित्रपट पाहायला जातात. मात्र, गावखेड्यांतल्या प्रेक्षकांसाठी जत्रेत लावलेलं पोस्टर हाच चित्रपटाचा प्रोमो. त्यामुळे प्रेक्षकांची मानसिकता ओळखून त्याप्रमाणे चित्रपटाचं पोस्टर तयार केलं जातं. या धंद्यात सर्वांत महत्त्वाचं काय तर प्रेक्षकांना खेचून घेणारं पोस्टर तयार करणं. नवा निर्माता मारे कौतुकाने चित्रपटाच्या विषयाचं सूचक पोस्टर बनवून पाठवतो, पण जत्रा कोळून प्यायलेले डिस्ट्रिब्युटर्स ‘हे पोस्टर न्हाय चालणार’ म्हणून सरळ रद्द करतो. चित्रपट मराठी असेल तर चित्रपटातील ओळखीचा चेहरा (उदा. अलका कुबल यांचा रडवेला चेहरा) पोस्टरवर झळकलाच पाहिजे, हा अलिखित नियम. अलका कुबल यांचा रडवेला चेहरा पोस्टरवर झळकला की सिनेमा कौटुंबिक आहे हे कुणालाही वेगळं सांगावं लागत नाही आणि बायकांची चित्रपटाला तुफान गर्दी होते. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या स्त्रीशक्तीचा पुरस्कार करणारा चित्रपट असेल तर पोस्टरवर चित्रपटाची नायिका रागावलेल्या दुर्गेच्या रूपात अवतरते आणि चित्रपट जबरदस्त चालतो. अनेक देवभोळे प्रेक्षक पोस्टरवरील नायिकेच्या देवीच्या रूपातील फोटोला मनोभावे नमस्कारही करतात. त्याचप्रमाणे कौटुंबिक चित्रपटात सुनेचा छळ होतानाचं दृश्य असेल तर ते पोस्टरवर हमखास जागा मिळवतं.
चित्रपटाचा विषय कोणताही असो, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नाना तऱ्हेच्या कल्पना पोस्टरवर झळकवल्या जातात. ज्याचं पोस्टर आकर्षक त्यालाच प्रेक्षक जास्त, हे ठरलेलं समीकरण आहे. जत्रेत मराठीसोबत हिंदी चित्रपटही तुफान चालतात. हिंदी चित्रपटांच्या पोस्टरमध्ये बदल करावे लागत नाहीत, ते पुरेसे बोलके असतात. ‘सिंघम’च्या पोस्टरवरील रक्ताळलेला अजय देवगण असो किंवा ‘बॉडीगार्ड’मधला सलमान असो, त्यांना तंबूतले प्रेक्षकही ओळखतात. सलमानची तर इथे खास क्रेझ आहे. ‘दबंग’ने शहरांमधल्या मल्टिप्लेक्समध्ये जितकी कमाई केली त्याच्या तोडीस तोड टूरिंग टॉकीजमध्येही केली याची खबरबात आपल्याला नाही. हिंदीतील सलमान आणि साऊथमधील नागार्जुन अगदी ‘वसूल’ कॅटेगरीतले. साऊथच्या चित्रपटाचं पोस्टर मात्र रंगबेरंगी असतं. कमी कपडे घातलेल्या बोल्ड नायिका आणि एकाच वेळी दहा-पंधरा गुंडांना चीत करणारे नायक. अनेकदा पोस्टरवर झळकणारे चेहरे सिनेमात असतातच असंही नाही. ही पण एक गंमतच. एखादा हिंदीत डब केलेल्या साऊथ सिनेमाचं पोस्टर तयार करताना डिस्ट्रिब्युटर मंडळी स्वतःच इंटरनेटवरून बायकांचे बोल्ड फोटोज शोधून काढतात आणि सन्मानपूर्वक त्यांना पोस्टरवर स्थानापन्न करतात. कॉपीराइटचा भंग वगैरे त्यांच्या डोक्यातही नसतो.

नावांची हेराफेरी

जत्रेत आल्यानंतर चित्रपटांच्या पोस्टर्सना जसं आपलं बाह्यरूप बदलावं लागतं अगदी तसंच चित्रपटाच्या नावाच्या बाबतीतही होतं. जत्रेत लागणाऱ्या चित्रपटाचं शीर्षकही पोस्टर्सप्रमाणे लक्षवेधी असावं लागतं. पोटच्या पोराचं नाव ठेवावं तितक्याच कौतुकाने चित्रपट दिग्दर्शक अथवा निर्माता आपल्या चित्रपटाचं नाव ठेवतो. त्यामागे सृजनात्मक आणि व्यावसायिक असा दोन्हींचा विचार त्याने केलेला असतो; पण तो त्याच्या दृष्टीने. बारशाला जमलेले डिस्ट्रिब्युटर्स त्या नावाकडे बघून नाक मुरडतात आणि बिनधास्त दुसऱ्याच्या अपत्याला स्वतः नाव देऊन मोकळे होतात. कारण धंद्याचं गणित त्यांना अनुभवाने माहीत असतं. चित्रपट बनवला की तो सेन्सॉर बोर्डाकडे तपासायला जातो. कित्येकदा चित्रपटाच्या आधी त्याचं नाव रजिस्टर्ड केलं जातं, पण हे रजिस्टर्ड नाव जत्रेतल्या प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कधी माहीतही नसतं.
चित्रपट एकच पण जत्रेनुसार नाव आणि पोस्टर्सही बदललेली किती तरी उदाहरणं टॉकीजवाले हमखास देतात. ‘शिवशक्ती’ या चित्रपटाला पहिल्या दोन यात्रांत थंडा प्रतिसाद मिळाला. मग डिस्ट्रिब्युटरने नागदेवाचा नवीन फोटो बनवून घेतला, नायिकेला रडवेल्या चेहऱ्याने पोस्टरवर झळकवलं आणि पिक्चरला नाव दिलं ‘भाऊ माझा नागराजा’. पुढच्या जत्रेला याच सिनेमाचं नामकरण ‘डमरूवाले बाबा’ असं झालेलं होतं. हा सिनेमा प्रत्येक जत्रेत धो धो चालला. निर्माती नीता देवकर यांचा ‘हिरवं कुंकू’ हा सिनेमा नावावर आणि नागाच्या पार्श्वभूमीवर जोरदार गल्ला कमावून गेला. मात्र, याच नीता देवकर यांनी आणलेल्या ‘ऑक्सिजन’ नावाच्या सिनेमाकडे कोणी फिरकलंसुद्धा नाही. एका जत्रेत मोठ्या पोस्टरवर दीपाली सय्यद दुर्गेच्या अवतारात झळकत होती. नाव होतं ‘दुर्गा म्हनत्यात मला’. तर त्याच वर्षी दुसऱ्या एका जत्रेत त्याचं सिनेमाचं आणखी एक पोस्टर मी पाहिलं, तेव्हा नाव होतं ‘हे मीलन सौभाग्याचे’!
एका जत्रेतला चित्रपट दुसऱ्या जत्रेत जातो तो हमखास नवं नाव धारण करून. ‘हर हर महादेव’ हे देवभोळ्या प्रेक्षकांना आकर्षित करणारं नाव असतानाही ‘नागराज पावला नवसाला’ असं नवीन नाव देऊन पैसा कमावला जातो. चित्रपटांची नावं वसूल करण्यात जमील खानचा हात कुणीच धरू शकत नाही. ‘शहरातली बायको खेड्यातला नवरा’, ‘बायको वाघीण प्रेमिका नागीण’, ‘लग्नाचा करार बायको फरार’ अशी एकापेक्षा एक भन्नाट नावं जमील खान त्याच्या चित्रपटांना देतो.
‘‘कसलं पिक्चर बनवंलय! ष्टोरीच नाय. निस्तं चाकावर धावतंय. नि जादूबी जमत न्हाय. त्यापरीस काल या अंगाला बघलेला जादूचा तंबू झ्याक हाय.’’ ‘धूम-3’च्या इंटरव्हलमध्ये पिक्चर न आवडलेली धोतरा-लुगड्यांतली मंडळी चिडचिडत तंबूवाल्याकडे पैसे परत मागत होती. टूरिंग टॉकीजमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची अभिरुची ओळखणं शहरातल्या दिग्दर्शकांसाठी अशक्य गोष्ट असते. तंबूवाल्याने सेटिंग करून त्यांना लगेचच बाजूच्या तंबूतला पिक्चर बघायला घुसवलं. पिक्चरचं नाव होतं ‘मळवट भरला रक्ताने’!
दुसऱ्या एका तंबूत तृप्ती भोईर आणि नितीन देसाई यांचा ‘हॅलो जयहिंद’ चित्रपट सुरू होता. त्यातल्या ‘दुर्गे, कुंकू नको विस्तव लाव’ या डायलॉगमुळे स्त्रीवर्गात कमालीची अस्वस्थता पसरली. विस्तव लावणं म्हणजे नवरा सोडणं असा सरळ सरळ अर्थ काढलेल्या त्या भाबड्या बायकांनी पुन्हा त्या सिनेमाचं तोंड बघितलं नाही. परिणामी, चित्रपट तोट्यात गेला. इथल्या प्रेक्षकाला कोणता सिनेमा आवडेल आणि कोणता आवडणार नाही याबाबत वर्षानुवर्षं इथे मुरलेले तंबू व्यावसायिकच फक्त विश्वासाने सांगू शकतात.

ऐका हो ऐका!

‘आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ’ हा पिक्चर पाहणारच! गॉगल लावणाऱ्यांनो, मिसरूड फुटलेल्यांनो आणि शाळेच्या पोरीवर मरणाऱ्यांनो, टाइमपास करायला जरूर या- फक्त कोहिनूर टूरिंग टॉकीजमध्ये!’... टूरिंग टॉकीजमध्ये लागलेल्या ‘टाइमपास’ चित्रपटाची ही पब्लिसिटी फारच बोलकी होती. जत्रेत लागलेल्या गावातल्या प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात. गावात ‘टूरिंग टॉकीज’ पोहोचण्याआधीच त्या गावात टॉकीजमध्ये लागणाऱ्या चित्रपटांची घोषणा करत एक छोटा हत्ती आजूबाजूच्या गावांत फिरत असतो. कधी या घोषणा रेकॉर्डेड असतात तर कधी काही उत्साही मंडळी माइकवर स्वतः काव्य रचत घोषणा देतात.
टॉकीजमध्ये लागलेल्या चित्रपटांची पोस्टर्स गावातल्या प्रत्येक दुकानाच्या शटरवर, खांबांवर, भिंतींवर चिकटवतात. अगोदर कोणी तरी लावलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर आपलं पोस्टर डकवण्याचा खोडसाळपणा ही नेहमीचीच बाब. याखेरीज तंबू लावलेल्या जागी तैनात असलेले स्पीकर्स चित्रपटांची पब्लिसिटी करत असतात. अशा पद्धतीने त्या मैदानात लागलेले सगळ्या तंबूंचे स्पीकर्स एकाच वेळी विविध चित्रपटांच्या नावांची घोषणा देत एकच कल्ला करतात. अलका कुबल यांनी एका जत्रेत बुकिंगमध्ये उभं राहून आपल्या चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. अलका कुबल यांनी सही केलेला त्यांचा फोटो मिळवण्यासाठी तिकीटबारीवर बायकांची नुसती झुंबड उडाली. ही आयडिया चांगलीच कामी आली आणि यामुळे अलकाताईंनी चित्रपटाला तिप्पट नफा मिळवून दिला. ‘‘तिकीटबारीच्या जाळीआडून प्रत्येक दोन तिकिटांवर एक फोटो मी दिला होता. आजही मी जेव्हा जत्रेत जाते तेव्हा अनेक प्रेक्षक मला मी पहिल्यांदा दिलेला फोटो पाकिटातून काढून दाखवतात.’’ या लोकप्रियतेने भारावून गेल्यामुळे आजही अलकाताई टूरिंग टॉकीजमध्ये जातात. अनेकदा तंबूमालक सिनेमातील एखद्या नटीला देवीच्या वेशभूषेत तिकीटबारीत बसवतात. त्या देवीला नमस्कार घालत अनेक प्रेक्षक पिक्चरचं तिकीट काढतात. कधी तिकिटांच्या नंबरांवर लकी ड्रॉ काढून प्रेक्षकांना कुकर, शॅम्पू, साडी अशा भेटवस्तू देण्याची ट्रिक वापरली जाते. पिक्चरमधल्या नटीच्या हातून साडी मिळेल या आशेने अधिकाधिक बायका पिक्चर बघायला येतात. जत्रेतले हे सिनेमे तुफान पब्लिक गोळा करत असूनही अजूनही मार्केटिंग कंपन्यांचं मात्र पुरेसं लक्ष याकडे गेलेलं नाही. सध्या जत्रेत फक्त पार्ले जी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या दोनच कंपन्या जाहिराती लावतात. त्यातही पार्ले जी थेट अलका कुबल यांनाच ‘पार्ले जी’च्या जाहिरातीसाठी तिकीटबारीवर पाचारण करतात. यामुळे ‘पार्ले जी’ची जाहिरात तर होतेच, पण अलकाताई आहेत म्हटल्यावर सिनेमाही जोरदार चालतो. आणखी काही कंपन्यांनी तंबू सिनेमाकडे जाहिरातीच्या दृष्टिकोनातून पहिलं तर या व्यवसायात तग धरणं तंबूमालकांना शक्य होऊ शकेल.

कोण करतं हा व्यवसाय?

तमिळ इंडस्ट्री, बॉलिवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या खालोखाल महाराष्ट्रात टूरिंग टॉकीजचा व्यवसाय गणला जावा इतकी आर्थिक उलाढाल आणि त्यात काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आढळते. बहुतेकदा तंबू व्यवसाय परंपरागतरीत्या पुढच्या पिढीत आलेला आहे. हा व्यवसाय सात महिनेच चालतो. पैसा येण्याचा एकच मार्ग असला तरी निर्मात्याकडून घेतलेली सिनेमाची रक्कम, कामगारांचा पगार, तंबू लावण्याचं लायसन्स, यात्रा कर याखेरीज कधी पोलिसांना तर कधी गावगुंडांना, असे पैसा जाण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातून तंबू कामगारांचा संपूर्ण कबिला तब्बल सात महिने सोबत असल्याने त्यांना अडीअडचणीसाठी द्यायला मालकांना खिशात हात घालावाच लागतो. त्यामुळे सरतेशेवटी व्यवसायात फायद्यापेक्षा तोट्याचेच हिशोब मांडावे लागतात. अशा परिस्थितीत कोणी नवखा व्यवसाय म्हणून टूरिंग टॉकीजचा पर्याय निवडेल अशी शक्यता कमीच. त्यामुळे परंपरागत आलेल्या या व्यवसायाचा तंबू गुंडाळून ठेवणं किंवा ते ओझं वाहण्यासाठी समर्थ होणं हे दोनच पर्याय आताच्या तंबूमालकांच्या पुढे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीमुळे आणखी काही वर्षांनी टूरिंग टॉकीज दंतकथा होतील असं वातावरण तयार झालेलं असताना बुडणाऱ्या या नौकेला तंबू सिनेमातील आजची पिढी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
सातारा जिल्ह्यातल्या वडूजच्या अनुप टूरिंग टॉकीजचा मालक अनुप जगदाळे हा पदवीधर तरुण विविध प्रयोग करत तंबू व्यवसायाला आजच्या काळाबरोबर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने तंबू सिनेमात पहिल्यांदाच यूएफओ तंत्रज्ञान आणलं. सीसी टीव्ही कॅमेरे लावणारा आजघडीला त्याचा एकमेव तंबू आहे. ‘‘वडिलांना अपघात झाला आणि या परंपरागत व्यवसायाची जबाबदारी माझ्याकडे आली. सुरुवातीचे काही महिने ‘इतका शिकलेला असूनही पुन्हा या दलदलीत अडकलो’ असे विचार मनात यायचे. पण हळूहळू सावरलो आणि आता या व्यवसायाला नवं रूप देण्याचं आव्हान मी स्वीकारलं आहे.’’
दुसरं ताजं उदाहरण म्हणजे ‘टूरिंग टॉकीज’ चित्रपटाची निर्माती आणि नायिका तृप्ती भोईर. तृप्तीने या चित्रपटाद्वारे थेट ऑस्करच्या शर्यतीत भाग घेतला. तृप्ती भोईर आणि गजेंद्र अहिरे यांनी प्रथमच मल्टिप्लेक्स प्रेक्षकांची ओळख टूरिंग टॉकीजशी करून दिली. तृप्ती भोईरने ‘अगडबंब’ चित्रपटापासून जत्रेतल्या सिनेमाची चव चाखली होती. ‘अगडबंब’ चित्रपट शहरांपेक्षाही तंबू सिनेमात जास्त चालला. तृप्ती सांगते, मला ‘टूरिंग टॉकीज’ने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. जत्रेतला हा तंबू सिनेमा, त्याचं विश्व मी जवळून पाहिलं आहे आणि तेच मला अधोरेखित करायचं होतं.’’ मुंबईच्या ‘सो-कॉल्ड व्हाइट कॉलर’ मराठी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला ‘जत्रेतल्या सिनेमात काम करते’ म्हणून तृप्तीची यथेच्छ हेटाळणी झाली; पण त्याने आत्मविश्वास ढळू न देता तृप्ती टूरिंग टॉकीजसाठीही काम करत राहिली आणि मराठी चित्रपटसृष्टीतही. सदाशिव अमरापूरकर यांची मुलगी रीमा अमरापूरकर हिनेही ‘आरं, आरं आबा आता तरी थांबा’ या सिनेमाची निर्माती-दिग्दर्शक म्हणून गावोगावच्या जत्रा गाजवल्या.

गावोगावच्या जत्रांमधलं मार्केट लक्षात घेऊन परंपरागत सिनेमांबरोबरच काही नवे प्रयोगही टूरिंग टॉकीजमध्ये होताहेत. यंदा प्रथमच सांगलीला पहिलावहिला ‘टूरिंग टॉकीज’ महोत्सव भरवला गेला.
हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टीतला सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तो तंबूत झळकायला वेळ लागायचा. पण गेल्या वर्षीपासून ज्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित होतो त्याच दिवशी जत्रेतही तो ‘यूएफओ’द्वारे लावला जातो. गेल्या वर्षीच्या जत्रेतील तंबूमालकांना आणि प्रोजेक्टर चालवणाऱ्यांना ‘यूएफओ’ तंत्रज्ञान शिकवण्यासाठी खास शिबिर घेतलं गेलं होतं. त्याच्याही पुढे प्रगती करत यंदा आलेला ‘थ्री-डी शोले’ गावोगावच्या तंबू सिनेमाच्या प्रेक्षकांनी डोळ्याला चष्मा लावून पाहिला. थ्री-डीचा चष्मा लावून जत्राभर भटकणारी लहानसहान पोरं दिसली आणि वाटलं, दशकभरापूर्वी मरणासन्न अवस्थेत असलेल्या टूरिंग टॉकीजचा पुनर्जन्म होत आहे.

-नम्रता भिंगार्डे
मोबाइल : 9619672768

(या लेखासाठी चर्चा व सहकार्य : अलका कुबल, मोहिनी पटेल, सुहास देशमुख, घुमट पाटील, जावेद भाई, अनुप जगदाळे, शौकत पठाण)

अनुभव वासंतिक विशेषांक मे २०१४

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा