बेपत्ता बालपण - यामिनी सप्रे

आपल्या सगळ्यांची मुलं आपापल्या घरी लाडाकोडात आणि सुरक्षित कोषात वाढतात. त्या वेळी देशातली लाखभर मुलं कोणत्या ना कोणत्या कारणाने आपलं उबदार घरटं सोडून वाऱ्यावर भिरकावली जातात. काहींना गरिबीमुळे घर सोडून शहराची वाट धरावी लागते, तर काहींना फसवून कामाला जुंपलं जातं, मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं जातं. कशी असतात या मुलांची दुष्टचक्रात अडकलेली आयुष्यं? या चक्राला खीळ घालण्याचा प्रयत्न कुणी करतंय की नाही?
मुंबईसारख्या अफाट शहरात बेपत्ता, बेवारस आयुष्य जगलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळालेल्या मुलांच्या या कहाण्या.

bepatta balpan.jpg

स्थळ- मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस. वेळ- नेहमीसारखी गर्दीची. स्टेशनातले भल्या थोरल्या घड्याळातील काटे साडेअकरा म्हणतायत. कर्कश हॉर्न वाजवत इंजिनाचं धूड आणि त्यापाठोपाठ डब्यांची रांग स्टेशनात शिरते. जनसाधारण एक्स्प्रेस. सकाळी सहाच्या सुमारास येणारी गाडी तब्बल साडेपाच तास उशिराने आलेली. आता अशी गाडी आली की धांदल उडायचीच. तशी ती उडतेच, मात्र जरा निराळी. या धांदलीला पोलिसांमुळे खाकी रंग चढलेला. जनसाधारणच्या डब्यांमध्ये पोलिस शिरतात, काही बाहेर थांबतात आणि सुरू होते झडती. उतरणारे प्रवासी, स्टेशनातले लोक यांच्या डोळ्यांत कुतूहल दाटलेलं या खाकी झडतीचं. थोडा वेळ जातो. गाडीत शिरलेले पोलिस आणि स्टेशनातले पोलिस आपली झडती मोहीम थांबवतात. या मोहिमेचं फलित- स्टेशनात एका बाजूला गठ्ठ्याने उभी करण्यात आलेली ८३ मुलं. मग सुरू होते या ८३ मुलांची झाडाझडती.
“नाम क्या रे? बाप का नाम? कौन गाँव? कहाँसे आया? क्या करता है? क्यू आया यहाँ?”
काहीजण पढवलेली पट्टी बरोब्बर बोलून दाखवतात. काही चाचरतात. कुणाला दडपून खोटं बोलताना रडू कोसळतं.
या ८३ मुलांमधील बहुतांश मुलं बिहारच्या नालंदा, गयामधून आलेली. काहींच्या पालकांच्या हातावर थोडीशी रक्कम ठेवून विकतच घेतलेली. काहींना जबरदस्तीने आणलेलं. कुणी कुठल्या कुठल्या आमिषाला भुलून आलेले. डोळ्यांत खरी-खोटी स्वप्नं बाळगत मुंबापुरीत आलेल्या या पोरांना या शहरातील मयसभेचे चकवे ठाऊक असणं अवघडच. या मयसभेत त्यांचं पहिलं पाऊल पडण्याआधी आणि बेपत्ता या रकान्यात त्यांची नोंद होण्याआधी ‘प्रथम’ ही सामाजिक संघटना आणि पोलिस यांनी त्यांना सावरलंय.
त्या दिवशी ही ८३ मुलं ‘बेपत्ता’ रकान्यात समाविष्ट होण्यापासून बचावली. मात्र, या रकान्यातील आकडेवारीला दिवसेंदिवस सूज चढते आहे. समाजातील प्रत्येक घटकापुढे प्रश्नांची भेंडोळी भिरकावणारी सूज. तसं बघायला गेलं तर आपल्या अवाढव्य देशात बेपत्ता मुलांच्या तक्रारींची संख्या वर्षाकाठी लाखाच्या घरात जाते. केंद्रीय गृह मंत्रालयाची याबाबतची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. जानेवारी २०११ ते जून २०१४ या साडेतीन वर्षांत देशात बेपत्ता झालेल्या मुलांची संख्या आहे ३ लाख २५ हजार. त्यातही २०१२ या वर्षात मध्य प्रदेशने, तर २०१३-१४ या वर्षात पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशने आपली आकडेवारीच सादर केलेली नाही. त्यामुळे हा आकडा आणखी मोठा असणार. ही आकडेवारी झाली अधिकृत नोंदणीची. त्यातही एफआयआर दाखल करून न घेतलेल्यांचं प्रमाण जवळपास ६० ते ८० टक्के. मग नोंद न झालेल्या बेपत्तांची संख्या किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. यातील ४० टक्क्यांहून अधिक मुलांचा अधिकृतरीत्या कधीच शोध लागत नाही.
कुठे गायब होतात ही मुलं? त्यांचा पत्ता कुठल्या विश्वाचा?
त्यातील अनेक मुलं बालकामगार म्हणून राबत असतात, काही वेश्यावस्तीत जगण्याचं भेसूर गाणं शोधत राहतात, तर काही स्वतःसाठीचा पत्ता शोधत भणंगपणे शहराच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरत राहतात. परराज्यातून आणून उद्योगाला लावलेल्या अनेकांचं जिणं हलाखीचं. केलेल्या कामाचा ना मोबदला, ना दोन वेळचं पोटापुरतं अन्न. या मुलांचे अनुभव, त्यांच्या वाट्याला आलेलं जिणं आणि त्यांची सुटका- सारंच सुन्न करणारं. कोटीकोट श्रीमंतीचा दिमाख मिरवणाऱ्या मुंबापुरीतील हे अधोविश्व. या अधोविश्वातून या मुलांना बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा नाही का?
कायद्याचा काटेकोर वचक असेल तर ही अशी प्रकरणं धसास लागू शकतात, असा अनुभव गेल्या काही दिवसांत मुंबईत आला; पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाला प्रशासकीय यंत्रणा, पोलिस यांना ‘धक्का’ द्यावा लागला. पण त्यामुळे काही मुलं या नरकयातनांमधून सुटली आणि आपापल्या घरी, किंवा किमान बालसुधारगृहांत पोहोचली. त्यातूनच समोर आली विस्कटलेल्या बालपणाची ही काही अस्वस्थ करणारी उदाहरणं. जी मुलं आजही बेवारस आयुष्य जगताहेत त्यांचं काय, हा प्रश्न आपल्यासमोर उभ्या करणाऱ्या या कहाण्या.

बेपत्ता बालपण

रफिक. उत्तर प्रदेशातील १२ वर्षांचा चुणचुणीत मुलगा. खूप मोठं होण्याचं स्वप्न छोट्याशा डोळ्यांत. घरात अठरा विश्व दारिद्य्र. ‘तुमच्या पोराला मुंबईला नेतो, शिकवतो. मोठा साहेब बनेल तो. जात्याच हुश्शार आहे’, अशी साखरपेरणी परिचयातीलच एकाने केल्यानंतर रफिकचे आई-वडील भुलले नसते तरच नवल. घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार, पोराचं भलं होणार आणि वर हातखर्चाला पैसेही, असं उत्तम ‘पॅकेज’ दिल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यांतही स्वप्नांची पेरणी झाली. उत्तर प्रदेशातून रफिकची रवानगी त्या ‘काकां’बरोबर मुंबईत झाली आणि सुरू झाला त्याचा वनवास. घरी अर्धपोटी असणारा रफिक मुंबईमध्ये पूर्ण भुकेला राहू लागला. त्या काकाने शिक्षणाऐवजी हाती सुई नि गम दिला आणि जरीकामामध्ये त्याचे छोटेसे हात बांधले गेले. कमालीच्या बारकाईने करावे लागणारं काम, डोळ्यात तेल घालून द्यावं लागणारं लक्ष, मान-पाठ एक करत सकाळपासून रात्रीपर्यंतची मेहनत, हे सगळंच त्याच्या वयासाठी सोसण्यापलीकडे त्रासदायक होतं. दरम्यानच्या काळात ‘काका’ गायब झाला. घरच्यांशी संपर्क तुटला. केल्या कामाचा पुरेसा मोबदलाही मिळेना. तिकडे आई-वडिलांनी उत्तर प्रदेशात छोकरा ‘बेपत्ता’ झाल्याची तक्रार नोंदवली. इकडे आपल्या वयाच्या इतर मुलांना खेळताना बघून रफिक खट्टू व्हायचा. कधी काम टाळण्याचा प्रयत्न करायचा, कधी तापाने फणफणायचा, भुकेने व्याकूळ व्हायचा. मात्र, तरीही कामातून सुटका नाही. उलट, काम टाळलं तर त्याची वेगळी किंमत मोजावी लागायची.
मध्यंतरी एका छाप्यात रफिक पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरू झाला. तो आता पूर्ण होत आलाय. मात्र, आजही रफिकच्या आठवणींच्या कप्प्यात आहेत त्या वेदना. काम कमी पडलं तर मालक मारायचा. पाठीवर उठणारे वळ किती वेदनादायी असायचे हे सांगताना रफिकच्या डोळ्यांतून पाणी झरत राहतं. “तू शेहेर में जाके बहोत पढ़ेगा। मैं तुम्हें स्कूल भेजेगा। तू बड़ा आदमी बनेगा... ऐसा अंकलने बोला था।” हे सांगत असताना रफिकच्या डोळ्यांत अनामिक दहशत असते. आता पोलिस त्याला त्याच्या आई-वडिलांकडे नेणार आहेत, यावर तरी त्याने कसा विश्वास ठेवावा?
***
परी हेच आपलं नाव आहे का याची तिला कल्पना नाही. सगळे परी म्हणतात म्हणून तीही तेच सांगते. स्वतःबद्दल सांगता येईल असं तिच्याकडे तेवढंच आहे. उत्तर प्रदेशातील एका यात्रेवेळी तिची नि आई-वडिलांची चुकामूक झाली. कुणी तरी तिला स्टेशनपर्यंत आणून सोडलं. पुढे काय करायचं ते न कळून ती समोर उभ्या असलेल्या गाडीत बसली नि थेट मुंबईला पोहोचली. या मायानगरीमध्ये अशाच एका ‘काका’च्या हाती लागली....

संपूर्ण लेख वाचा 'अनुभव'च्या मार्च अंकामध्ये.

'अनुभव'च्या वर्गणीसाठी संपर्क:
युनिक फीचर्स, ८, अमित कॉम्प्लेक्स, ४७४, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे-४११ ०३०.
फोन: (०२०) २४४७०८९६, २४४८६६३७.
वार्षिक वर्गणी (दिवाळी अंकासह) : ५०० रुपये.
'अनुभव' आता पीडीएफ वरही उपलब्ध - PDF वर्गणी : ३०० रुपये.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा