‘मंगल’ यश : मेड इन इंडिया - मयुरेश प्रभुणे

केवळ एक वर्षाच्या काळात भारताने मंगळयानासारखी महत्त्वाकांक्षी मोहीम राबवून तंत्रज्ञान आणि पैसा या दोन्ही दृष्टीने बलाढ्य असणाऱ्या देशांच्या तोडीस तोड, किंबहुना त्याहूनही घवघवीत असं यश मिळवलं आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे यान पाठवणारा भारत हा जगातला पहिला देश बनला. पूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आणि ‘नेव्हर से नो’ कार्यसंस्कृती या बळावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हे शिवधनुष्य कसं पेललं त्याचा ही मोहीम जवळून अभ्यासणाऱ्या पत्रकाराने लिहिलेला लेखाजोखा.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारताचं मंगळयान असणाऱ्या ‘मार्स ऑर्बायटर मिशन’(मॉम)ने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रिफत जावेद या नागरिकाने यानाला ट्विटरवर प्रश्न विचारला, “मंगळावर तुला काय दिसतंय?” त्यावर मंगळयानाने ट्विट केलं, “रिफत जावेद, आत्ता तरी हे ठिकाण बर्फाळ ध्रुवाप्रमाणे डोंगर, दऱ्या आणि धुळीच्या वादळांचं घर असल्यासारखं वाटतं आहे. ही तर सुरुवात आहे. पुढे बघू.”
भारताचं मंगळयान चक्क ट्विटरच्या माध्यमातून स्वत: लोकांशी संवाद साधत आहे. अर्थात, यानाच्या नावाने इस्रोमधील अधिकारीच लोकांशी संवाद साधत आहेत. पण, यान स्वत: बोलतंय, या रंजक कल्पनेमुळे लोक थेट या मोहिमेशी जोडले जात आहेत. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ‘मॉम’ने आणखी एक ट्विट करून मंगळापासून 74,500 किलोमीटरवरून घेतलेलं एक छायाचित्र प्रसिद्ध केलं. मंगळाच्या भूमीचं स्पष्ट दर्शन होत असलेल्या या छायाचित्रात मंगळाच्या उत्तर गोलार्धात धुळीचं वादळही दिसत आहे. या ट्विटमध्ये यानाने म्हटलं, ‘इथे काही तरी उसळलं आहे.’ आणखी एका नागरिकाने यानाला ट्विटवरून सुचवलं, ‘तुझा ‘सेल्फी’ (स्वत: काढलेलं स्वत:चं छायाचित्र) पाठव ना!’ यावर यान उत्तरलं, ‘मी उड्डाण केलं तेव्हा सेल्फी वगैरे काही प्रचलित नव्हतं. पण बरं झालं तुम्ही सुचवलंत. असं करा, मला एक आरसा पाठवून द्या. त्याच्या मदतीने मी माझा सेल्फी पाठवतो.’
सध्या मंगळयानाचा भारतीयांशी असा गमतीदार आणि माहितीपूर्ण संवाद सुरू आहे. भारतीयांनी आजवर ‘अमंगळ’ मानलेल्या मंगळाशी गट्टी जमवून देण्याचं काम मंगळयानाने सुरू केलं आहे. पूर्णपणे भारतीय असणाऱ्या या यानाने घडवलेल्या सफरीतून भारतीयांना मंगळाचं खरं स्वरूप समजलं तरी ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी ठरली असं म्हणता येईल.
मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत पोहोचल्या पोहोचल्या, म्हणजे 24 सप्टेंबरपासूनच मंगळाच्या भूमीचं छायाचित्रण सुरू केलं. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) त्यातील काही छायाचित्रं फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. इस्रोतर्फे या मोहिमेविषयी प्रसिद्ध होणारी माहिती, छायाचित्रं तसंच इतर ठिकाणांहून मिळणारी माहिती मी ‘मंगळयान अपडेट’ या फेसबुकच्या मराठी पेजवरून प्रसिद्ध करत आहे. मंगळावरील धुळीच्या वादळाचा फोटो पोस्ट करून मी सहज पेजवरील जुन्या पोस्टवर नजर टाकू लागलो. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातला मंगळयानाच्या यशाचा जल्लोष, पृथ्वीपासून मंगळाच्या दरम्यानच्या प्रवासात यानाच्या मार्गात करण्यात आलेली सुधारणा, डिसेंबर 2013 मध्ये यानाची पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्तता, त्याआधी नोव्हेंबरमध्ये यानाच्या पृथ्वीभोवतीच्या फेऱ्या, पाच नोव्हेंबरला श्रीहरिकोटावरून झालेलं यशस्वी उड्डाण... एक पत्रकार म्हणून मी भारताची मंगळ मोहीम अगदी सुरुवातीपासून कव्हर करत असलो, तरी हा सगळा प्रवास पाहून मी पुन्हा एकदा थक्क झालो. ही भारताची मोहीम आहे की गेली चाळीस वर्षं सातत्याने मंगळावर यानं पाठवणाऱ्या नासाची? एवढा ध्यास? इतकी अचूकता?
नाटकाच्या स्क्रिप्टमधील बारकाव्यांसह चोख भूमिका बजावण्यासाठी नव्या कलाकाराला किती रिहर्सल करावी लागते, अचूकता येण्यासाठी तर कित्येक प्रयोग जावे लागतात. त्यामुळे पहिल्याच प्रयोगात ती अचूकता साधून दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेणाऱ्या कलाकाराचा उदो उदो होणारच. अर्थात, भारताचं मंगळयान एक निर्जीव यंत्र आहे. तेव्हा या अचूकतेचं आणि त्यातून आपल्याला मिळालेल्या निर्मळ यशाचं संपूर्ण श्रेय जातं ते त्याच्या निर्माणकर्त्यांना, इस्रोच्या तंत्रज्ञ-शास्त्रज्ञांसोबतच देशातील ज्या अनेक उद्योगांनी या मोहिमेच्या जडणघडणीत योगदान दिलं आहे त्यांना, बदलत्या काळानुसार एका पूर्णपणे वैज्ञानिक उद्दिष्टं असणाऱ्या मोहिमेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणाऱ्या तत्कालीन केंद्र सरकारला. मुख्य म्हणजे केवळ वर्षभराच्या कालावधीत मोहीम फत्ते करण्याची क्षमता आपल्यात येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या इस्रोच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृतीमध्ये या मोहिमेच्या यशाची बीजं रुजलेली आहेत.

एप्रिल 2012ची गोष्ट आहे. इंटरनेटवरच्या एका छोट्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं होतं : ‘केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या मंगळ मोहिमेच्या खर्चाला मंजुरी दिली. पुढील वर्षी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.’ पहिल्यांदा मला वाटलं, बातमी देताना काही तरी चूक झालेली दिसतीय. कारण भारताची मंगळ मोहीम 2016 मध्ये ठरली असल्याचं इस्रोने त्याआधीच जाहीर केलं होतं. शिवाय, ज्या जीएसएलव्ही रॉकेटद्वारे ही मोहीम राबविण्याचं ठरलं होतं त्या रॉकेटला यश येत नसल्याने मोहीम आणखी दोन वर्षांनी पुढे जाण्याची शक्यता होती, याचाही मला अंदाज होता. मग पुढच्याच वर्षी मंगळ मोहीम कशी काढणार? पण इस्रोच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर खरोखरच 2013 मध्ये मंगळावर यान पाठवणार असल्याचं समजलं. योगायोगाने त्यानंतर काही दिवसांतच अहमदाबादला जाण्याचा योग आला. इस्रोची मातृसंस्था असणारी ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ (पीआरएल) अहमदाबादला असल्यामुळे या मोहिमेविषयी अधिक माहिती तिथून मिळू शकणार होती. इस्रोच्या वैज्ञानिक मोहिमांमधील शास्त्रीय प्रयोगांची आणि उद्दिष्टांची निश्चिती ‘पीआरएल’मध्येच करण्यात येते.
अहमदाबाद विद्यापीठाच्या जवळ असणाऱ्या याच प्रयोगशाळेच्या आवारात 1948 मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी विशी-पंचविशीतल्या तरुणांसोबत खगोलशास्त्रीय प्रयोग सुरू केले होते. त्याच प्रयोगांमध्ये भारताच्या आजच्या अवकाश कार्यक्रमाची बीजं रुजलेली होती. पहिल्या चांद्रमोहिमेनंतर मंगळ मोहिमेच्या वैज्ञानिक प्रयोगांची जबाबदारी ‘पीआरएल’कडेच होती. संस्थेचे संचालक डॉ. जे. एन. गोस्वामी यांच्यासोबत आगामी मंगळ मोहिमेविषयी गप्पा सुरू झाल्या. डॉ. गोस्वामींकडची माहिती ऐकून मी अवाकच झालो, आणि खरं तर थोडा साशंकही.
डॉ. गोस्वामी सांगत होते, “मंगळ मोहिमेसाठी आमच्यासमोर दोन पर्याय होते. आधी ठरल्याप्रमाणे थेट 2016 मध्ये जीएसएलव्हीच्या साह्याने एक सुसज्ज यान मंगळावर पाठवायचं, किंवा 2013 मध्ये एक छोटं प्रायोगिक यान पाठवायचं, ज्याच्या अनुभवाचा फायदा 2016च्या मोहिमेसाठी होऊ शकेल. प्रायोगिक यान पाठवण्यावर सर्वांचं एकमत झालं, कारण त्याला खर्च कमी येणार होता. हे यान पाठवण्यासाठी आवश्यक त्या बहुतेक यंत्रणा आपल्याकडे तयार आहेत, आणि नोव्हेंबर 2013चा मुहूर्त, म्हणजे लाँच विंडो गाठणं या प्रायोगिक मोहिमेला नक्कीच शक्य आहे. हे लक्षात आल्यावर इस्रोच्या समितीने केंद्र सरकारकडे रिपोर्ट सादर केला आणि सरकारने त्यासाठी तत्काळ 125 कोटी रूपये मंजूर केले.”
मंगळावर यान पाठवण्यासाठी मंगळ आणि पृथ्वीमधील अंतर जेव्हा सर्वांत कमी असतं असा कालावधी निवडण्यात येतो. त्यामुळे इंधन कमी लागतं आणि यशाची शक्यता वाढते. दर 26 महिन्यांनी ही ‘लाँच विंडो’ खुली होते. नोव्हेंबर 2013 नंतर जानेवारी 2016 मध्ये ही लाँच विंडो खुली होईल.
डॉ. गोस्वामी म्हणत होते, “पुढील दहा महिन्यांत आम्हाला या मोहिमेसाठी रॉकेट सज्ज करावं लागेल. चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी वापरलेलं ‘पीएसएलव्ही- एक्सएल’ हे रॉकेट आपल्याकडे तयार आहे. सध्या त्याच्याच साह्याने आपण जड उपग्रहांचंही प्रक्षेपण करतो. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष यान तयार करावं लागेल. यानावर कोणकोणती उपकरणं असावीत याबाबत अजून चर्चा सुरू आहे. या यानाला महत्त्वाचे 11 प्रयोग करता यावेत या दृष्टीने उपकरणांची निवड सुरू आहे. या सर्व उपकरणांचं मिळून वजन 25 किलोपेक्षा जास्त असून चालणार नाही. ही उपकरणं पुढील आठ ते नऊ महिन्यांत इस्रोच्या विविध केंद्रांमधून तसंच देशभरातील लघू-मध्यम व मोठ्या उद्योगांमध्ये तयार होतील. तिसरं आव्हान आहे ते सुमारे 20-25 कोटी किलोमीटर अंतरावरून यानाशी संपर्क साधणारी यंत्रणा आपल्याला या वर्षभरात उभारावी लागेल. यान पाठवण्याचा निर्णय झाला आहे. आता वर्षभरात हे सर्व करावंच लागेल. पण अशा प्रकारे युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची इस्रोला सवय आहे. त्यामुळे आपण 2013चा मुहूर्त गाठू शकू, असा आम्हाला विश्वास वाटतो. अन्यथा, अशा प्रकारच्या मोहिमांच्या तयारीसाठी इतर देशांना किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो.”
“या मोहिमेमधून आपण मंगळाचे अज्ञात पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळावरील वातावरण पूर्वी पृथ्वीसारखंच होतं असं मानलं जातं. त्याचा र्हास कसा झाला, मंगळाचं चुंबकीय क्षेत्र प्रभावी का नाही, मंगळावर मिथेन आहे का आणि त्याचा स्रोत जैविक प्रक्रियांमध्ये आहे की रासायनिक, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपली मोहीम करेल. अर्थात, सध्या तरी सर्व काही कागदावर आहे. केंद्राकडून प्रत्यक्ष निधी मिळाल्यावर वेगाने काम सुरू होईल.”
‘सध्या तरी सर्व काही कागदावर आहे..’ पीआरएलमधून बाहेर पडताना हेच शब्द डोक्यात घोळत होते. मे 2012 मध्ये कागदावर असणारं मंगळयान फक्त दीड वर्षाने नोव्हेंबर 2013 मध्ये पूर्ण सज्जतेसह आणि यशाच्या खात्रीसह प्रत्यक्ष मंगळाकडे झेपावेल? का कोण जाणे, डॉ. गोस्वामींच्या ‘इस्रोला युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची सवय आहे’ या शब्दांवरही विश्वास ठेवावासा वाटत होता. कारण त्याआधीची चांद्रमोहीमही भारताने नियोजित वेळातच यशस्वी करून दाखवली होती.
15 ऑगस्ट 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढील पाच वर्षांत आम्ही चंद्रावर यान पाठवू, अशी घोषणा केली होती. आणि त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी 20 ऑक्टोबर 2008 ला भारताचं यान चंद्राकडे झेपावलं होतं. एवढंच नव्हे, तर पहिल्याच प्रयत्नात ते चंद्राच्या कक्षेत शिरण्यात यशस्वी झालं. 14 नोव्हेंबर 2008ला भारतीय तिरंग्याची मोहोर असणारा ‘मून इम्पॅक्ट प्रोब’ चंद्रावर उतरला. याच मून इम्पॅक्ट प्रोबने आपल्या अवघ्या 20 मिनिटांच्या प्रवासात चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा ऐतिहासिक शोधही लावला, जो चंद्रावर प्रत्यक्ष माणूस पाठवलेल्या महासत्तांना गेल्या 40 वर्षांत लावता आला नव्हता.
याच चांद्रमोहिमेतून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर भारत मंगळावर यान पाठवू पाहत असल्याने या वेळीही यश मिळेलच असं मानायला जागा होती.
अपेक्षेप्रमाणे 15 ऑगस्ट 2012ला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून 450 कोटींचा खर्च असणाऱ्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची घोषणा केली आणि नोव्हेंबर 2013मध्ये मंगळयानाचं प्रक्षेपण करण्यात येईल असं जाहीर केलं. या मोहिमेचं अधिकृत नाव होतं ‘मार्स ऑर्बायटर मिशन’ (मॉम)- मंगळाभोवती फिरणारं यान. सूर्यमालेतील इतर ग्रहांवर यान पाठवण्याचं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणं आणि मंगळाच्या अज्ञात पैलूंचा शोध घेणं ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं असतील, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या या घोषणेची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली. त्यामागे तसंच कारण होतं. नासाच्या ‘मॅव्हेन’ या यानाचं प्रक्षेपणही नोव्हेंबर 2013लाच होणार होतं. या मोहिमेचा खर्च भारतीय मंगळ मोहिमेच्या तब्बल नऊ पट होता आणि मोहिमेची तयारी सुरू झाली होती 2008 मध्ये. इथूनच इस्रो आणि नासाच्या मंगळ मोहिमांची तुलना सुरू झाली.

इस्रोच्या सर्व संस्थांमधील जवळजवळ 10 हजार शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोहिमेच्या तयारीला जुंपले. यान, रॉकेट तसंच संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक सुटे भाग अवघ्या तीन ते चार महिन्यांत तयार करून हवे होते. त्यासाठी देशभरातील 170 लहान-मोठ्या उद्योगांना ऑर्डरी देण्यात आल्या. गेली अनेक वर्षं इस्रोला विविध यंत्रणा आणि सुटे भाग पुरवणाऱ्या गोदरेज, लार्सन अँड टुब्रो, वालचंदनगर इंडस्ट्रीज अशा कंपन्यांसोबत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधील अनेक लघू आणि मध्यम उद्योगांकडेही सुटे भाग तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली.
सुरतमधील हिम्पसन इंडस्ट्रियल सिरॅमिक्स या कंपनीने पीएसएलव्ही रॉकेटवर लावण्यात येणाऱ्या सहा हजार उष्णतारोधक सिरॅमिक टाइल्स तीन महिन्यांत बनवून दिल्या. गोदरेज अँड बॉईस कंपनीने यानावरील हाय गेन अँटेनाची डिश तयार केली. बेंगळुरूमधील अवसरला टेक्नॉलॉजीजने यानावरील हीट ट्रान्स्फर पाइप आणि काही जमिनीवरील उपकरणं बनवून दिली, तर केरळच्या त्रिशूरमधील वाजरा रबर या लहान कंपनीने रॉकेटच्या दिशादर्शनासाठी आवश्यक फ्लेक्स सील पुरवले. बेंगळुरूमधील सँटम इलेक्ट्रॉनिक्सने यानाच्या संपर्कासाठी आवश्यक असे इलेक्ट्रॉनिक्सचे भाग पुरवले, तर हैदराबादमधील एमटीएआर कंपनीने गोदरेजच्या सोबत पीएसएलव्ही रॉकेटमधील विकास इंजिनातील काही महत्त्वाचे भाग पुरवले. स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सेल) सालेममधील (तामिळनाडू) प्लांटने यानावरील इंजिनासाठी आवश्यक इंधनाच्या टाक्या तयार केल्या, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने रॉकेटमधील अनेक महत्त्वाचे भाग कमी कालावधीत तयार करून इस्रोकडे सुपूर्त केले.
दरम्यान, यानावर एकूण 15 किलो वजनाची पाचच वैज्ञानिक उपकरणं बसवण्याचं इस्रोने निश्चित केलं. उपकरणांची संख्या कमी झाल्याने त्यातल्या त्यात सर्वांत महत्त्वाच्या प्रयोगांना प्राधान्य देण्यात आलं. त्यामुळे मोहिमेच्या वैज्ञानिक उद्दिष्टांना काहीशी मर्यादा आली. उपकरणांचं वजन 15 किलो ठेवणं भाग होतं. कारण यानावरील इतर अत्यावश्यक यंत्रणांचं अवाढव्य असणारं वजन. यात पृथ्वीच्या कक्षेपासून मंगळाच्या कक्षेत शिरेपर्यंत लागणारं इंधन, यानाचं मुख्य इंजिन (याला लिक्विड अॅपोजी मोटार- एलएएम म्हणतात), बॅटरी, सोलर पॅनेल, यानाचं सुरक्षा कवच असं सगळ्यांचं मिळून तब्बल 1350 किलो वजन भरणार होतं. पीएसएलव्ही-एक्सएल हे रॉकेट 1400 किलोपर्यंतच्याच उपग्रहाचं प्रक्षेपण करू शकत असल्यामुळे स्वाभाविकपणे यानावरील वैज्ञानिक उपकरणांची संख्या आणि वजन यावर मर्यादा आल्या.
देशभरातील उद्योगांकडून सुटे भाग मिळाल्यावर इस्रोच्या विविध केंद्रांमध्ये त्यांचा उपयोग करून मोहिमेच्या विविध यंत्रणा आकार घेऊ लागल्या. अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये मंगळावरील मिथेनचा शोध घेणारे मिथेन सेन्सर आणि इन्फ्रारेड सेन्सर बनवण्यात आले. मंगळाच्या विरळ वातावरणाचा अभ्यास करणारं लेमन अल्फा फोटोमीटर हे उपकरण बेंगळुरूच्या लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीमने तयार केलं. तिरुअनंतपुरमच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीने मार्शियन एक्झोस्फेरिक न्युट्रॉन कॉम्पोझिशन अॅनलायझर (मेनका) या उपकरणाची निर्मिती केली. इस्रोच्या रिमोट सेन्सिंग उपग्रहांमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांच्या आधारे मंगळाचं छायाचित्रण करणारा मार्स कलर कॅमेरा निर्माण करण्यात आला. भारताच्या भूस्थिर उपग्रहांमध्ये 36 हजार किलोमीटरची कक्षा गाठण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनाचा उपयोग मंगळयानावरील मुख्य इंजिनासाठी करण्यात आला. हेच इंजिन याआधी चांद्रयानासाठीही वापरण्यात आलं होतं. त्यात मंगळ मोहिमेसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. दूर अवकाशात असणाऱ्या यानाशी संपर्क साधण्यासाठी बेंगळुरूजवळील ब्याललू गावात असलेलं इस्रोचं डीप स्पेस नेटवर्क अद्ययावत करण्यात आलं. चांद्रयानाशी संपर्क साधणाऱ्या 32 मीटर व्यासाच्या अँटेनाची क्षमता दहा पटींनी वाढवण्यात आली, तसंच 18 मीटर व्यासाची आणखी एक अँटेना त्या ठिकाणी बसवण्यात आली.
देशभरातील विविध केंद्रांमध्ये निर्माण करण्यात आलेली उपकरणं जून 2013 मध्ये बेंगळुरूच्या इस्रो सॅटेलाइट सेंटरमध्ये दाखल झाली. सॅटेलाइट सेंटरमध्ये यानाचा सांगाडा सज्ज होता. त्यावर सर्व उपकरणं आणि यंत्रणा बसवून झाल्यावर पुढील महिनाभराच्या कालावधीत सुसज्ज यानाच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये यानाला विविध कोनांतून फिरवण्यात आलं. चुंबकीय लहरींचा, उष्णतेचा, थंड तापमानाचा, कमी दाबाचा त्यावर काय परिणाम होतो हे तपासण्यात आलं. सर्व चाचण्यांमधून तावून-सुलाखून निघाल्यावर मंगळयान प्रक्षेपणासाठी सज्ज असल्याचं जाहीर करण्यात आलं.

या यानाची निर्मिती प्रयोगशाळेत अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात केली गेली होती. आता यान पीएसएलव्हीवर बसवेपर्यंतही त्याला कोणतीही इजा पोहोचणार नाही याची कोटेकोर दक्षता घेणं गरजेचं होतं. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विधिवत पूजाअर्चा करून मंगळयान एका विशेष कंटेनरमध्ये ठेवलं. या कंटेनरमुळे यान एक प्रकारे प्रयोगशाळेतील वातावरणातच राहणार होतं. हा कंटेनर एका मोठ्या ट्रकद्वारे बेंगळुरूहून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या श्रीहरिकोटाकडे रवाना झाला. ट्रकच्या मागेपुढे सीआयएसएफच्या जवानांचा ताफा होता. एखाद्या व्हीव्हीआयपी मंत्र्याला मिळणारी सुरक्षा मंगळयानाला देण्यात आली होती. ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे केल्यामुळे वाटेत लागणाऱ्या लहान-मोठ्या गावांतल्या लोकांना या ताफ्यांच्या मध्ये असणाऱ्या ट्रकमधून नेमकं काय चाललं आहे हे कळत नव्हतं. ताशी दहा किलोमीटर वेगाने होणाऱ्या या प्रवासाचं इतिवृत्त बेंगळुरू आणि श्रीहरिकोटा येथील शास्त्रज्ञांना दर काही मिनिटांनी मिळत होतं.
दुसरीकडे 5 ऑगस्ट 2013ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात धृवीय उपग्रह प्रक्षेपकाची (पीएसएलव्ही-सी 25) निर्मिती सुरू झाली होती. मंगळयानाला पृथ्वीभोवतीच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत नेताना पीएसएलव्ही आपलं रौप्यमहोत्सवी (पंचविसावं) यशस्वी उड्डाण साजरं करणार होतं. सलग 24 उड्डाणं यशस्वी ठरलेली असल्याने इस्रोचं पीएसएलव्ही रॉकेट जगातील सर्वांत भरवशाचं रॉकेट मानलं जातं. या रॉकेटच्या साह्याने 1400 किलोपर्यंतच्या उपग्रहाला पृथ्वीभोवती उच्चध्रुवीय कक्षेत सोडण्यात येतं. चांद्रयानाचं प्रक्षेपणही याच रॉकेटच्या साह्याने करण्यात आलं होतं. त्यामुळे मंगळ मोहिमेचा पहिला टप्पा (पृथ्वीवरून उड्डाणाचा) पीएसएलव्हीद्वारे यशस्वी होणार याबाबत इस्रोला कोणतीही शंका वाटत नव्हती.
पाहता पाहता खरोखर इस्रोने वर्षभराच्या कालावधीत मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण केली. या मोहिमेचे प्रोग्रॅम डायरेक्टर (जे चांद्रयानाचेही मिशन डायरेक्टर होते.) डॉ. एम. अण्णादुराई यांच्या शब्दांत सांगायचं, तर “मंगळ मोहिमेच्या तयारीसाठी फक्त वर्षभराचा कालावधी लागला असला, तरी कामाचे तास (वर्किंग अवर्स) लक्षात घेता या काळात इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल चार वर्षांचं काम केलं, तेही इस्रोच्या परंपरेनुसार अचूक आणि दर्जेदार! या मोहिमेने खरोखर सर्वांना झपाटून टाकलं आहे.” अण्णादुराई यांचे हे उद्गार नासाच्या चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमेची आठवण करून देणारे आहेत. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी ‘पुढील दहा वर्षांत आम्ही चंद्रावर माणूस पाठवू’ अशी घोषणा केल्या केल्या संपूर्ण अमेरिका या एकाच मोहिमेला जुंपली होती. देशभरातील संशोधन संस्था, विद्यापीठं आणि लहान-मोठे उद्योग डेडलाइन पाळण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होते. त्याचा परिणाम 22 जुलै 1969ला संपूर्ण जगाने पाहिला. अथक परिश्रमांमुळे मंगळ मोहिमेलाही असंच यश मिळणार याचा इस्रोला विश्वास होता.
चांद्रमोहिमेतली अनेक उपकरणं या मोहिमेत वापरण्यात आली असली तरी मंगळ मोहिमेमध्ये इस्रोतर्फे प्रथमच दोन मोठे प्रयोग करण्यात येणार होते. त्या प्रयोगांच्या यशावरही या मोहिमेचं यश अवलंबून होतं. त्यातला पहिला प्रयोग यानाच्या पृथ्वीवरून होणाऱ्या उड्डाणादरम्यान करण्यात येणार होता. पीएसएलव्ही हे चार टप्प्यांचं (इंधनाने भरलेल्या आणि एकमेकांशी जोडलेल्या चार भागांचं) रॉकेट आहे. खालच्या भागाचं ज्वलन सुरू झालं की रॉकेट पृथ्वीवरून अवकाशाकडे झेपावतं. त्यातलं इंधन संपलं की त्या टप्प्याचे भाग रॉकेटपासून निसटून समुद्रात पडतात. पाठोपाठ दुसऱ्या आणि मग तिसऱ्या टप्प्याचं ज्वलन सुरू होतं आणि यानाचा अवकाशाच्या दिशेने प्रवास सुरू राहतो. चौथ्या टप्प्यात, म्हणजे रॉकेटच्या सर्वांत वरच्या भागात यान बंदिस्त असतं. अपेक्षित उंची गाठल्यावर ते चौथ्या टप्प्यापासून अलग होतं आणि पृथ्वीभोवती फिरू लागतं. मंगळ मोहिमेमध्ये तिसऱ्या टप्प्याचं ज्वलन संपल्यावर लगेचच चौथ्या टप्प्याचं काम सुरू होणार नव्हतं. या वेळी चौथा टप्पा कोणत्याही ज्वलनाशिवाय तब्बल 20 मिनिटं पृथ्वीच्या परिवलनाचा उपयोग करून पुढे सरकत राहणार होता. त्यानंतर चौथ्या टप्प्याचं ज्वलन होऊन यानाला अपेक्षित कक्षेत सोडण्यात येणार होतं. या प्रयोगामुळे इंधनाची मोठी बचत होणार होती आणि रॉकेटचं वजनही कमी ठेवणं शक्य होणार होतं.
दुसरा प्रयोग यानावर करण्यात येणार होता. यान मंगळावर पोचल्यावर पृथ्वी आणि यानातलं अंतर 20 ते 45 कोटी किलोमीटर असणार होतं. त्यामुळे पृथ्वीवरून यानापर्यंत रेडिओ संदेश जाण्यासाठी 12 ते 24 मिनिटांचा कालावधी लागणार होता आणि यानाकडून पृथ्वीवर संदेश येण्यासाठी तितकाच. यानाशी लाइव्ह संपर्क नसल्यामुळे दरम्यानच्या काळात यानाला काही अडचणी आल्या तर त्यावर तोडगा काढण्यासाठी यानावर कॉम्प्युटर बसवून यान स्वयंचलित करण्यात आलं. त्यामुळे बिकट प्रसंगी यान स्वत:चे निर्णय स्वत:च घेऊ शकणार होतं. मात्र, त्यासाठी आवश्यक सर्व प्रोग्रॅम्स काही महिन्यांच्या कालावधीत नव्याने आणि प्रथमच तयार करण्यात आले. यानावरील सर्व यंत्रणा कॉम्प्युटरला जोडण्यासाठी तब्बल 83 सॉफ्टवेअर्स विकसित करण्यात आले. या सॉफ्टवेअर्समध्ये झालेली एखादी लहानशी चूकही मोहिमेला अत्यंत महागात पडणार होती. मात्र, जमिनीवरील त्याच्या सर्व चाचण्या व्यवस्थित पार पडल्या.
मंगळ मोहिमेचं प्रक्षेपण करण्यासाठीची 20 दिवसांची लाँच विंडो (प्रक्षेपणासाठीचा अनुकूल कालावधी) 28 ऑक्टोबरला खुली होणार होती. 28 ऑक्टोबरलाच मंगळयानाचं प्रक्षेपण करण्याचं इस्रोने निश्चित केलं. त्या दृष्टीने यानाची आणि पीएसएलव्ही रॉकेटच्या सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात आली. मात्र, एकाएकी मोठी अडचण निर्माण झाली. पीएसएलव्हीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या दरम्यान जो नवा प्रयोग करण्यात येणार होता त्या वेळी रॉकेट प्रशांत महासागरावरून प्रवास करणार होतं. हा टप्पा व्यवस्थित पार पडतोय की नाही हे पाहण्यासाठी जमिनीवरून त्यावर देखरेख करणं आवश्यक होतं. मात्र, त्या भागात कोणतंही टेलिमेट्री स्टेशन नसल्यामुळे इस्रोने आवश्यक यंत्रणेने सुसज्ज अशी दोन जहाजं प्रशांत महासागराकडे रवाना केली. त्यापैकी नालंदा हे जहाज अपेक्षित ठिकाणी वेळेत पोहोचू न शकल्यामुळे मंगळयानाचं प्रक्षेपण आठवडाभर पुढे ढकलण्यात आलं. 19 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन इस्रोने मंगळ मोहिमेचं प्रक्षेपण पाच नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून 38 मिनिटांनी होईल असं जाहीर केलं. आता पाच नोव्हेंबरची ही संधी हुकली असती तर मात्र इस्रोला मंगळयानाचं प्रक्षेपण करण्यासाठी 2016 ची वाट पाहावी लागली असती, असं इस्रोतल्या एका अधिकाऱ्याने त्या वेळी आम्हाला सांगितलं.

श्रीहरिकोटामधून होणाऱ्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्याउड्डाणाचं वार्तांकन करण्यासाठी देशा-विदेशांतील 250 पेक्षा अधिक माध्यमांचे प्रतिनिधी एक नोव्हेंबरपासूनच चेन्नईमध्ये दाखल झाले. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आठवडाभर आधीपासूनच भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेचं सविस्तर वार्तांकन सुरू झालं होतं. याच काळात इस्रोमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या मोहिमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इस्रोला कायम माध्यमांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता मात्र काळाची गरज लक्षात घेऊन इस्रोने मंगळ मोहिमेचं फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंट सुरू केलं. या सोशल नेटवर्किंगसाठी इस्रोने 25 तरुण शास्त्रज्ञांची एक टीमच तयार केली. या मंडळींना विज्ञान सोप्या शब्दांत सांगण्याची कला आणि सोशल नेटवर्किंगची भाषा अवगत होती. हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला. मंगळमोहिमेविषयी टाकलेल्या एकेका पोस्टला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळू लागले. मंगळ मोहिमेचे टप्पे कसे पार पडणार आहेत, त्यात कोणतं विज्ञान दडलं आहे याच्या चर्चा त्या पेजवर झडू लागल्या. शेकडो तरुण आणि शालेय विद्यार्थी या क्षेत्रात काम करण्यासाठी काय करावं लागेल, अशी विचारणा करू लागले आणि त्या पेजद्वारे इस्रोकडून त्यांना थेट प्रतिसादही मिळू लागला. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मंगळ मोहीम जगातील भारतीयांशी जोडली गेली आणि ती त्यांच्या अस्मितेचं प्रतीकही बनली.
देशभर दिवाळी साजरी होत असताना इकडे श्रीहरिकोटामध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ यानाच्या प्रक्षेपणाच्या तयारीत मग्न होते. 56 तास 30 मिनिटांचं काऊंटडाऊन संपायला अवघे तीन तास शिल्लक असताना आम्हा पत्रकारांच्या गाड्या सतीश धवन अवकाश केंद्रात दाखल झाल्या. या वेळी मीडिया सेंटरचा माहोल काही वेगळाच होता. अनेक विदेशी चेहऱ्यांसह राष्ट्रीय-स्थानिक इलेक्ट्रॉनिक मीडियानेही ही घटना कव्हर करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मीडिया सेंटरच्या गच्चीवर कॅमेरे लावण्यासाठी एकच लगबग सुरू होती. एकाच वेळी देशी-विदेशी अनेक भाषांचं लाइव्ह वार्तांकन कानावर पडत होतं. प्रक्षेपणाची वेळ जशी जवळ येत होती तसा सर्वांच्या आवाजाचा जोर आणखी वाढला. प्रत्येकजण आपल्या दर्शकांसाठी भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या प्रक्षेपणाची लाइव्ह झलक दाखवण्यासाठी आतुर होता. एका बाजूला गच्चीवर लावलेल्या स्पीकरमधून कंट्रोलरूममधील सर्व संवाद आणि प्रक्षेपणाच्या सर्व घटनाक्रमांचं इतिवृत्त ऐकायला मिळत होतं. मायनस टेन, नाइन, एट हे शब्द कानावर पडले तशी सर्वत्र शांतता पसरली. थ्री, टू, वन, झीरो, प्लस वन, प्लस टू, थ्री, फोर हे शब्द ऐकू आले तसा गगनभेदी आवाज कानावर पडला. दूर निलगिरीच्या झाडांमागून एक प्रखर नारिंगी ज्योत अवकाशाकडे झेपावताना नजरेस पडली. बघता बघता पीएसएलव्ही धुरांचे लोट मागे ठेवून आकाशात दिसेनासा झाला. मंगळयान अखेर अवकाशात झेपावलं!
अर्थात, प्रक्षेपण यशस्वी झालं की नाही हे समजण्यासाठी 44 मिनिटं लागणार होती. मीडिया सेंटरमध्ये लावलेल्या स्क्रीनवर पीएसएलव्हीचा नियोजित मार्ग हिरव्या रंगाच्या रेषेत दाखवण्यात आला होता. त्या नियोजित मार्गावरूनच रॉकेटचा प्रवास सुरू आहे की नाही हे एका ठिपक्याद्वारे समजत होतं. एका क्षणासाठीही या ठिपक्याने हिरव्या रेषेवरील आपला प्रवास सोडला नाही. तसंच ज्या क्षणाला पीएसएलव्हीचे एकेक टप्पे पार पडणं अपेक्षित होतं त्याच क्षणाला ते पार पडत आहेत हे पाहून विदेशी पत्रकारही टाळ्या वाजवून कौतुक करत होते. अत्यंत अचूकतेने पीएसएलव्हीने तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यादरम्यानचा प्रयोग यशस्वी केला तेव्हा मात्र कंट्रोल रूममध्ये जल्लोष झाला. या काळात रॉकेटच्या चौथ्या टप्प्याने कोणत्याही ज्वलनाशिवाय अपेक्षित वेगाने 23 मिनिटं प्रवास करून नियोजित अंतर कापलं. त्यानंतर 37 सेकंद चौथ्या टप्प्याचं ज्वलन झालं आणि मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित झालं. मंगळ मोहिमेच्या तीन मुख्य टप्प्यांपैकी पहिला टप्पा भारताने यशस्वीपणे पार पाडला. इस्रोने भारतीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली!
जगभरातील माध्यमांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं. इस्रोच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर हजारो शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, हा मोहिमेचा पहिला टप्पा होता. त्यातही कोणत्याही उपग्रहाला अवकाशात पाठवण्यासारखीच ही प्रक्रिया असल्यामुळे इस्रोसाठी ती नित्याची बाब होती. खरं आव्हान पुढे होतं, ज्याचा इस्रोला कोणताही अनुभव नव्हता. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर काढून मंगळाच्या दिशेने रवाना करणं आणि तिसऱ्या टप्प्यात यानाला मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित करणं. पुढील 25 दिवसांत यानाची पृथ्वीभोवतीची लंबवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने विस्तारण्यात आली. या कक्षाविस्तारणातून यानाचं पृथ्वीपासूनचं अंतर अडीच लाख किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आलं. एक डिसेंबरला रात्री 12 वाजून 49 मिनिटांनी यानावरील 440 न्यूटन क्षमतेचं मुख्य इंजिन सुरू करण्यात आलं. यान पृथ्वीच्या कक्षेतून मुक्त होऊन मंगळाच्या दिशेने मार्गस्थ झालं. मंगळ मोहिमेचा दुसरा टप्पाही यशस्वीपणे पार पडला. 24 सप्टेंबर 2014ला मंगळाच्या जवळ पोहोचण्याआधी पुढच्या 300 दिवसांच्या प्रवासात यान निद्रिस्त अवस्थेत राहणार होतं. फक्त त्याचा मार्ग भरकटू नये यासाठी एप्रिल, जून आणि ऑगस्टमध्ये यानावरील आठ छोट्या इंजिनांच्या साह्याने त्याची कक्षा सुधारण्यात येणार होती.

मंगळयानासारख्या मोहिमांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा कळलं. मंगळ मोहिमेचा मोठा फायदा या मोहिमेसाठी सुटे भाग बनवून दिलेल्या कंपन्यांनाही होऊ लागला. मंगळयानातील सहभागाच्या जोरावर अनेक कंपन्यांना नवी कॉन्ट्रॅक्ट्स मिळू लागली. गोदरेज कंपनीला मंगळ मोहिमेतून मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पट रकमेचं काँट्रॅक्ट गुजरातमधील न्युक्लियर प्लांटसाठी मिळालं, तर एका लहान कंपनीच्या मिळकतीत नोव्हेंबर 2013 नंतर चक्क 30 टक्क्यांनी वाढ झाली. इस्रोच्या मोहिमांमध्ये सातत्याने सुटे भाग पुरवण्याचा फायदा हा असतो, की त्यामुळे कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा वाढतो, अधिक अचूकता येते. ‘इस्रोशी केलेल्या सहकार्याच्या जोरावर गेल्या तीन वर्षांत विदेशी निर्यात पाच टक्क्यांवरून तब्बल 33 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं’ अवसरला टेक्नॉलॉजीजने म्हटलं आहे.
मंगळ मोहिमेवर खर्च करण्यात आलेल्या 450 कोटींपैकी एक वाटा या उद्योगांकडेही गेला. त्यातून हजारो लोकांना काम मिळालं. तसंच मोहिमेच्या यशातून या कंपन्यांना मिळणाऱ्या नव्या कामांमुळे आणि त्यातून होणाऱ्या फायद्यामुळेही अनेकांना रोजगार मिळणार आहे. इस्रोला सध्या देशभरातील 400 कंपन्यांकडून सुटे भाग पुरवले जातात. येत्या काळात या कंपन्यांची संख्या आणखी वाढणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून असल्या अवकाश मोहिमा राबवण्याऐवजी देशातील गरिबी, कुपोषण यासारख्या समस्यांवर सरकारने खर्च करावा, असं सुचवणाऱ्यांनी मोहिमेचं हे फलितही जाणून घेणं आवश्यक आहे. 450 कोटींच्या खर्चाच्या तुलनेत मोहिमेनंतर होणारा अप्रत्यक्ष आर्थिक फायदा त्यापेक्षाही अधिक असेल हे निश्चित.
दहा महिन्यांच्या शांततेनंतर सप्टेंबर 2014च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मंगळ मोहिमेची चर्चा सुरू झाली. यान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित करण्याचा 24 सप्टेंबरचा तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा टप्पा कसा पार पडतोय याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या. आतापर्यंतच्या प्रवासात एप्रिल आणि जूनमध्ये यानाच्या मार्गात सुधारणा करण्यात आली होती. यान योग्य मार्गावर असल्यामुळे ऑगस्टमधील नियोजित सुधारणा करावी लागली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यानाने मंगळाच्या मार्गावरील आपला 95 टक्के प्रवास पूर्ण केला होता आणि 22 किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने यान मंगळाकडे झेपावत होतं.
यानाला मंगळाच्या कक्षेत शिरताना जे निर्णय स्वत: घ्यायचे होते त्यासाठी आवश्यक कमांड्स 14 आणि 15 सप्टेंबरला यानाकडे पाठवण्यात आल्या. या वेळी यानाने आपला 98 टक्के प्रवास पूर्ण केला होता आणि त्याच्याशी संपर्क साधायला इस्रोच्या शास्त्रज्ञांना 12 मिनिटांचा कालावधी लागत होता. कमांड्स योग्य रीतीने पोहोचल्या असल्याचं आणि सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचं यानाने कळवलं. मात्र, खरी परीक्षा होती 22 सप्टेंबरला. या दिवशी यानाला मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या मार्गात थोडी सुधारणा करण्यात येणार होती. त्यासाठी यानाचं मुख्य इंजिन चार सेकंद सुरू करण्यात येणार होतं. मात्र, पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी एक डिसेंबर 2013ला वापरण्यात आलेलं मुख्य इंजिन 300 दिवसांनंतर पुन्हा सुरू होतं की नाही याची सर्वांना चिंता लागलेली होती. यानाची निर्मिती सुरू असतानाच यानावरील इंजिनाच्या प्रतिरूपाची जमिनीवरील चाचणी सुरू करण्यात आली होती. त्या चाचणीत मुख्य इंजिन आणि आठ थ्रस्टरना एका हवाबंद आणि कमी तापमानाच्या तावदानात बंद करण्यात आलं. एकदा इंजिन सुरू करून त्याला तब्बल 450 दिवसांनी ऑगस्ट 2014 मध्ये सुरू करण्यात आलं. आश्चर्य म्हणजे इतक्या दिवसांनी ते इंजिन सुरू झालं आणि अपेक्षेपेक्षा अधिक काळ सुरू राहिलं. त्यामुळे 22 सप्टेंबरला यानावरील इंजिन सुरू होणार याची शास्त्रज्ञांना खात्री पटली. त्यासाठी 19 तारखेला आवश्यक संदेश यानाकडे धाडण्यात आले. 22 सप्टेंबरला दुपारी अडीच वाजता यानावरील मुख्य इंजिन सुरू झालं आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष केला. 22 तारखेला मुख्य इंजिन सुरू होण्याचा अर्थ ते 24 तारखेलाही सुरू होऊन आपलं काम चोख बजावणार असा होता. 24 तारखेच्या सर्वांत कठीण टास्कसाठी आता इस्रोचा आत्मविश्वास दुणावला होता.
यानाला मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी सुरू होणार असल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना रात्री तीन वाजताच बेंगळुरूच्या प्रेस क्लबमध्ये बोलावण्यात आलं. यानाचं प्रक्षेपण श्रीहरिकोटावरून झालं असलं, तरी यानाशी संपर्क बेंगळुरूच्या इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कच्या (इस्ट्रॅक) मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समधून (मॉक्स) होणार होता. इस्ट्रॅकच्या बाहेर भर पावसात शंभरेक माध्यमांच्या प्रतिनिधींच्या रांगा लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे प्रत्येकाची कसून तपासणी झाली. कंट्रोलरूममधील दृश्य पाहून आपण खरोखर भारतातच आहोत ना, असा प्रश्न पडला. हॉलिवुडपटांमधून दिसणारी नासाची कंट्रोलरूम प्रत्यक्ष पाहतोय असाच भास होत होता. समोर मोठ्या पॅनेलवर यानाच्या विविध यंत्रणांचं स्टेटस दाखवणारी माहिती, यानाचा मार्ग, पुढील दोन-तीन तासांत पार पडणाऱ्या प्रक्रियांची लिस्ट दिसत होती, तर त्याखाली पन्नासेक कॉम्प्युटर्ससमोर बसलेले इस्रोचे शास्त्रज्ञ. पण शास्त्रज्ञांकडे पाहिल्यावर ही कंट्रोलरूम भारताच्या इस्रोची आहे हे स्पष्ट जाणवत होतं. पंचविशीच्या तरुणांपासून ते साठी गाठलेले साध्या वेशातले अनुभवी वरिष्ठ, जीन्स- टीशर्टमधील मुलींपासून केसांत गजरे माळून सणासुदीच्या साड्या नेसून आलेल्या महिला शास्त्रज्ञ. नव्या-जुन्या पिढ्यांचे चेहरे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर खिळलेले पाहून एका वेगळ्याच भारताचं दर्शन घडत होतं.
स्क्रीनवरील लिस्टप्रमाणे जसजसे एकेक टप्पे पार पडत होते तसा कंट्रोलरूममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. सहा वाजून 56 मिनिटांनी यानाला विरुद्ध दिशेने वळवण्यात आलं. सात वाजून नऊ मिनिटांनी तसा संदेश कंट्रोलरूमला प्राप्त झाला आणि मोहिमेचा सर्वांत कठीण टप्पा सुरू झाला. यानाला मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी यान मंगळाच्या जवळ आलं असताना त्याचा वेग आपल्याला अपेक्षित कक्षेनुसार कमी करावा लागतो. मंगळाच्या प्रभावक्षेत्रात शिरताना मंगळयानाचा वेग 22.57 किलोमीटर प्रतिसेकंद होता. त्याच वेळी मंगळाचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग 25.71 किलोमीटर प्रतिसेकंद होता. यान मंगळाच्या जवळ गेल्यावर यानाचा वेग मंगळाच्या तुलनेत 5.7 किलोमीटर प्रतिसेकंद असणार होता. मात्र, मंगळाभोवती 423 बाय 80,000 किलोमीटरची अपेक्षित कक्षा गाठण्यासाठी यानाचा वेग 5.7 किलोमीटर प्रतिसेकंदावरून 4.6 किलोमीटर प्रतिसेकंदापर्यंत खाली आणणं आवश्यक होतं. यान विरुद्ध दिशेने फिरवून त्याचं इंजिन सुमारे 24 मिनिटं सुरू राहिल्यावर 1.1 किलोमीटर प्रतिसेकंदाने (1098 मीटर प्रतिसेकंद) हा वेग कमी करणं शक्य होणार होतं. त्यासाठी यान विरुद्ध दिशेला फिरवून मुख्य इंजिन प्रज्वलित करण्यात येणार होतं. या प्रक्रियेतून यानाचा वेग कमी होणार होता. यानाला वळवण्यात आल्यानंतर सात वाजून 17 मिनिटांनी मुख्य इंजिन सुरू झालं. तसा संदेश 7:30 ला कंट्रोलरूमला मिळाला. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. पुढील काही मिनिटं यान मंगळाच्या मागे गेल्यामुळे त्याच्याकडून संदेश प्राप्त झाले नाहीत. पंतप्रधानांसह सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली होती. ठीक आठ वाजता यानाकडून संदेश आला- इंजिन नियोजित वेळेत सुरू होऊन नियोजित वेळेत बंद झालेलं आहे. यानाने 1098.7 मीटर प्रतिसेकंद इतका वेग गाठणं अपेक्षित होतं. यानाने 1099 मीटर प्रतिसेकंद इतका वेग गाठला. जवळपास अचूक! मार्स ऑर्बायटर मिशन (मॉम) यशस्वी झालं! भारताने इतिहास रचला! कोणत्याही मोहिमेत कमालीची अचूकता हे इस्रोचं वैशिष्ट्य मंगळ मोहिमेतही जपलं गेलं आणि त्यामुळेच इस्रोने हे ऐतिहासिक यश प्राप्त केलं. मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे यान पाठवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. मंगळ मोहीम यशस्वी करणारा आशिया खंडातील पहिला, तर जगातील चौथा देश बनला.
मोहीम यशस्वी झाल्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांची एकच झुंबड उडाली. सर्वत्र फ्लॅशचा लखलखाट सुरू होता. थम्सअप आणि व्हिक्टरीच्या खुणा करून शास्त्रज्ञ कॅमेरांना पोज देऊ लागले. एखाद्या सरकारी कार्यालयातील कर्मचारी वाटावे अशा साध्या वेशातील वरिष्ठ शास्त्रज्ञ, कॉलेजमधून थेट कंट्रोलरूममध्ये आल्यासारखे वाटणारे तरुण आणि एखाद्या सणाच्या दिवशी देवदर्शनाला निघाल्या आहेत असं वाटणाऱ्या इस्रोच्या ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ बघून खरोखर सर्व पत्रकार आश्चर्यचकित झाले. बीबीसीने तर साडी नेसलेल्या महिला शास्त्रज्ञांचा जल्लोष करणारा फोटो प्रसिद्ध करून ‘हा फोटो हजार शब्द सांगून जातो’ असं म्हटलं. हाच फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रसिद्ध झाला त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या. ‘अवकाश मोहिमेचं यश साजरं करणाऱ्या भारताच्या महिला शास्त्रज्ञ याआधी कधी कोणी पाहिल्या आहेत?’ इथपासून ‘लॅबकोट आणि पाश्चिमात्य पेहराव करूनच शास्त्रज्ञ होता येतं, हा समज या दृश्याने दूर केला,’ इथपर्यंत अनेक प्रतिक्रिया.
मंगळयानाशी संवाद साधणारी जी प्रक्रिया 24 सप्टेंबरला मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समध्ये सुरू होती त्या यंत्रणेचं नेतृत्वही एक महिला करत होती, हे समजल्यावरही सर्वांनाच सुखद धक्का बसला. 44 वर्षांच्या नंदिनी हरिनाथ या दोन मुलांच्या आई आहेत. मीनल संपत यांच्या टीमने यानावरील तीन उपकरणं बनवली असून इस्रोच्या केंद्राच्या पहिल्या महिला संचालक व्हायचं त्यांचं स्वप्न आहे. इस्रोतील 15 हजार कर्मचारी-शास्त्रज्ञांपैकी महिलांचं प्रमाण 20 टक्के असून गेल्या काही वर्षांत त्यात वेगाने वाढ होत आहे. लवकरच इस्रोला पहिली महिला अध्यक्ष मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
साधी राहणी असणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कार्य मात्र असामान्य आहे. इस्रोतील बहुतेक सर्व शास्त्रज्ञ हे सर्वसामान्य, निमशहरी आणि ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत. चांद्रयानाच्या मोहिमेनंतर मंगळ मोहिमेचीही जबाबदारी सांभाळणारे एम. अण्णादुराई हे तामिळनाडूतील एका खेड्यातून पुढे आले आहेत. पदवीपर्यंतचं त्यांचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झालं. मंगळ मोहिमेअंतर्गत विविध प्रकल्पांचं नेतृत्व करणारे एस. के. शिवकुमार, व्ही. आदिमूर्ती, पी. कुन्नीकृष्णन, एस. अरुणन, ए. एस. किरण कुमार, एम. चंद्रदत्तन, एम. वाय. एस. प्रसाद, व्ही. केशवराजू, तसेच स्वत: इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचं शिक्षण पूर्णपणे भारतातच झालं आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांपासून सुरू झालेली परंपरा इस्रोत आजही कायम आहे. सामान्य पार्श्वभूमीच्या तरुणांकडून असामान्य काम करून घेण्याचा हा मंत्र इस्रोला बहुतेक डॉ. साराभाईंकडूनच मिळाला असावा. त्याच जोरावर असामान्य कामगिरी करणारे शेकडो प्रज्ञावंत इस्रोने घडवले आणि त्यांच्या जोरावर अत्यंत कमी कालावधीत ऐतिहासिक कामगिरीही करून दाखवली. एवढंच नव्हे, तर इस्रोनेच तयार केलेली नवी पिढीही आता या प्रक्रियेत सामील होत आहे. 2007 मध्ये इस्रोने तिरुअनंतपुरम इथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (आयआयएसटी)ची स्थापना केली. या संस्थेतून बारावीनंतर आयआयटीच्या धर्तीवर अवकाशशास्त्राचं शिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना थेट इस्रोच्या विविध केंद्रांमध्ये सामावून घेतलं जातं. मंगळ मोहिमेत अशा नव्याने इस्रोत आलेल्या तरुण संशोधकांचाही सहभाग होता. यापैकीच काहीजणांनी फेसबुक आणि ट्विटरवरून मंगळयान मोहीम कोट्यवधी भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. कमलेशकुमार शर्मा या विशीतील तरुणाकडे तर इस्रोने मोठी जबाबदारी दिली होती. यानाचं प्रक्षेपण झाल्यानंतर त्याची कक्षा विस्तारण्याचा पहिला आदेश तसेच यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त करण्याचा 1 डिसेंबर 2013 चा आदेशही त्यानेच दिला होता. यान मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यावर कॅनबेरा आणि गोल्डस्टोनमधील टेलिमेट्री स्टेशनकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करून मोहीम यशस्वी झाल्याचा निष्कर्षही या विशीतील तरुणानेच काढला हे विशेष.

भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते केल्याचा परिणाम फक्त देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून येत आहे. मंगळ मोहिमेपाठोपाठ झालेल्या पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये नासा आणि इस्रोमध्ये करार झाला असून, त्यानुसार भविष्यातील मंगळ मोहिमा तसेच सूर्यमालेतील आणखीही काही संशोधन मोहिमा भारत आणि अमेरिका संयुक्तरीत्या राबवणार आहेत. याच अमेरिकेने दबाब आणल्यामुळे रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन देण्याचं नाकारलं होतं, हा इतिहास आत इस्रोने स्वकर्तृत्वाने इतिहासजमा केला आहे.
-मयूरेश प्रभुणे
मोबाइल : 9922929165

.....
चौकट
इस्रोच्या यशाचं मूळ कशात?
इस्रोचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष डॉ. विक्रम साराभाई यांनी इस्रोची घडी अत्यंत दूरदृष्टीने घालून दिली. त्यामुळेच ही संस्था इतर संशोधन संस्थांपेक्षा वेगळी ठरते. अवकाश विभाग हा थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत असतो आणि इस्रोचे अध्यक्ष हे स्वत: या विभागाचे सचिव असतात. त्यामुळे सरकारी निर्णय इतर संस्थांपेक्षा अतिशय वेगाने होतात. अवकाश विभागांतर्गत येणारी स्पेस कमिशन ही या संस्थेची सर्वोच्च समिती असते आणि ती इस्रोअंतर्गत येणाऱ्या सर्व संशोधन संस्थांची धोरणं आणि अर्थसंकल्प निश्चित करते. सर्व संस्थांना त्यांच्या निर्णयांमध्ये स्वातंत्र्य दिल्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा उंचावतो.
तसंच, स्थापनेपासूनच इस्रोने कमी खर्चात दर्जेदार तंत्रज्ञान निर्माण करण्याचं तंत्र आत्मसात केलं. इतर संस्थांच्या तुलनेत इस्रोच्या यशाचं प्रमाणही अधिक आहे. इस्रोवर करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत त्यापासून देशाला होणारा लाभ जास्त असतो. त्यामुळेच इस्रोला सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यातही अडचणी निर्माण होत नाहीत. दुर्दैवाने इस्रोची ही कार्यसंस्कृती देशातील इतर संशोधन संस्थांमध्ये अजूनही रुजू होऊ शकलेली नाही.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा