अजिंठा पुन्हा साकारतंय - मुक्ता चैतन्य

अजिंठा लेण्यांमधील चित्रांनी भारावलेले कलाकार कमी नाहीत. त्यातल्या प्रत्येकाने अजिंठ्याचं त्याला दिसलेलं रूप आपापल्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजिंठ्याने भारलेला एक अवलिया मात्र अजिंठ्यातली पोपडे उडालेली भग्न चित्रं कॉम्प्युटरवर पुन्हा मूळ रूपात साकार करण्याचं जवळपास अशक्य वाटणारं स्वप्न बघतो आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला गाडून घेतो... त्याची ही गोष्ट.

एका अनाम उत्सुकतेने आपण औरंगाबादजवळची अजिंठा लेणी बघायला जातो. दोन हजार वर्षांपूर्वीची लेणी, त्यातली शिल्पकला आणि मुख्य म्हणजे तिथली अद्वितीय चित्रं आपल्याला खुणावत असतात. गुफांमधल्या काळोखात गाइड दाखवेल ते बघण्याची धडपड आपण करत राहतो. ‘ते चित्र बघा, थ्री-डी आहे..’ असं त्या गाइडने आपल्याला सांगितलं की तो ज्या दिशेने बोट करतोय तिकडे बघत समोरच्या भिंतीवरच्या चित्रातला थ्री-डी इफेक्ट आपण शोधत राहतो. अजिंठ्यातली ही शिल्पं आपल्याला शाळेतल्या पुस्तकांपासूनच भेटत असतात. त्यातलं आपल्या सगळ्यात ओळखीचं असणारं चित्र म्हणजे पद्मपाणी. पण अजिंठ्यात प्रत्यक्ष पद्मपाणी चित्रापाशी उभं राहिल्यानंतर पोटात कालवल्याशिवाय राहत नाही. अजिंठ्यातल्या इतर अनेक चित्रांसारखंच हेही चित्र पापुद्रे निघालेल्या अवस्थेत आपल्यासमोर उभं असतं. भिंतीभर पसरलेल्या या भग्न चित्रातून आपण अजिंठ्याच्या मूळ चित्रवैभवाची कल्पना करत राहतो, त्यातल्या जातककथा शोधत राहतो.
पण अजिंठ्यातली सगळी चित्रं दोन हजार वर्षांपूर्वी जशी काढली होती तशीच्या तशी बघायला मिळाली तर? भग्न झालेला, काळाच्या उदरात लुप्त झालेला तो खजिना त्याच्या मूळ रूपात आपल्यासमोर आला तर? दोन हजार वर्षांपूर्वीची चित्रशैली, कलावैभव, समाजजीवन, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचे सारे बारीकसारीक तपशील आपल्यासमोर साकार झाले तर? आज अजिंठ्यातल्या जवळपास सर्व चित्रांचे पापुद्रे निखळून पडलेले आहेत. चित्रापासून विलग झालेल्या पापुद्य्रांची भुकटी होऊन ती कधीच पंचतत्त्वात विलीन झाली आहे. अशा वेळी ती अद्भुत दुनिया पुन्हा कशी निर्माण होणार?
हे जवळपास अशक्य वाटणारं काम एका ध्येयवेड्या व्यक्तीमुळे शक्य होणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रसाद पवार. नाशिक इथे राहणारा प्रसाद हा चित्रकार आणि फोटोग्राफर. फोटोग्राफी आणि कॉम्प्युटरच्या मदतीने अजिंठ्यातल्या चित्रांच्या डिजिटल रिस्टोरेशनचं अवाढव्य काम सध्या त्याने हाती घेतलं आहे. आपल्या पूर्वजांच्या कलाविष्काराचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांना त्या काळी अवगत असलेल्या तंत्रज्ञानाचा अमूल्य ठेवा काळाच्या ओघात नष्ट होऊ नये, या हेतूने ही सारी धडपड चालू आहे. त्यासाठी त्याने ‘अजिंठा रिसर्च रिस्टोरेशन सोसायटी’ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अजिंठ्यातली चित्रं डिजिटल स्वरूपात जतन करणं, त्या काळातल्या चित्रशैलीचा अभ्यास, रंगशास्त्राचा अभ्यास, असा विविधस्तरीय प्रयत्न सुरू आहे. प्रसादच्या या धडपडीमुळे काळाच्या ओघात भग्न पावलेल्या अजिंठ्यातल्या चित्रांना पुन्हा पूर्णत्व प्राप्त होऊ शकणार आहे.
हे वाचल्यावर डिजिटल रिस्टोरेशन म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न कुणालाही पडला असेल. थोडक्यात सांगायचं, तर अजिंठ्यातल्या चित्रांचे फोटो काढून नंतर कॉम्प्युटरमधल्या फोटोशॉपसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्याचं पोपडे उडालेलं चित्र पूर्ण करायचंय. अजिंठ्याच्या मूळ चित्रांना हात लावण्याची आता कोणालाच परवानगी नाही. पण, किमान कॉम्प्युटरवर तरी त्यांच्या मूळ रूपाच्या जवळ जाणारं चित्र प्रत्यक्षात येऊ शकतं. ते आणण्यासाठी हा खटाटोप. अर्थात, दोन हजार वर्षांपूर्वी काढलेलं चित्र पूर्ण करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. हाताशी तंत्रज्ञान असलं तरी चित्र काढणार्या कलाकाराच्या भूमिकेत शिरून त्या चित्राचा विचार करणं आणि त्यात रंग-रेषा भरणं हे काम अतिशय किचकट तर आहेच, पण त्यात कल्पनाशक्ती, तंत्रज्ञान आणि चिंतन यांचा त्रिवेणी संगम आहे. परकायाप्रवेशच जणू! डोळ्यांना जे चित्र दिसतं, कॅमेर्याच्या लेन्समधून जे टिपलं जातं, त्यापलीकडे चित्र रेखाटणार्या कलाकारांच्या अव्यक्त जाणिवांपर्यंत पोहोचणं हे या कामातलं खरं आव्हान आहे. गेली अनेक वर्षं प्रसाद ती धडपड करतो आहे.

पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. प्रसाद तेव्हा नाशिकच्या कलानिकेतन विद्यालयात शिकत होता. तिथे गुणे सर भारतीय कलांचा इतिहास शिकवायचे. त्यांच्यामुळे प्रसादची अजिंठ्यातल्या चित्रांशी ओळख झाली. दूध, शेण, तांदळाचे तूस, भस्म, डिंक अशा विविध पदार्थांचा वापर करून भिंतींना दिलेलं लेपन आणि त्यावरची नैसर्गिक रंगांतली ही चित्रं, किंवा खरं तर त्या चित्रांचे भग्नावशेष बघून प्रसाद थक्कही झाला आणि खिन्नही. इतकी प्रगत चित्रशैली, दोन हजार वर्षं टिकलेले रंग, त्यांची चमक या सगळ्या गोष्टींनी प्रसादच्या मनात कायमचं घर केलं. पण त्या चित्रांची आजची अवस्था खिन्न करणारी होती. ही चित्रं जतन करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, हा विचार त्याच काळात त्याच्या मनात रुजला. पुढे छायाचित्रकार म्हणून काम करत असताना या ना त्या कारणाने त्याचं मन अजिंठ्याकडे ओढ घेत होतं. दर वेळी चित्रांचे भग्नावशेष बघताना विद्यार्थिदशेत मनात दडलेला सुप्त विचार पुन्हा पुन्हा उसळी घेऊन वर येत होता, पण नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. बरेच दिवस ही ओढाताण झाल्यावर एके दिवशी प्रसादने ‘आता यापुढे अजिंठा हेच आपलं काम’ असं ठरवून टाकलं.
आज प्रसाद जे डिजिटल रिस्टोरेशन करतो त्या पद्धतीपर्यंत तो एका दिवसात पोचला नाही. ही चित्रं जतन केली पाहिजेत हे ठरलं तेव्हा सुरुवातीला प्रसादने ती जशीच्या तशी कॅन्व्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केला. स्वत: चित्रकार असल्याने कॅनव्हासवरचं चित्र हे त्याच्यासाठी सगळ्यात जवळचं माध्यम होतं. चित्र रंगवतानाही मूळ चित्रातला पोत, रंग जसेच्या तसे कॅनव्हासवर आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. अगदी चित्रातला जो भाग गळून पडला आहे तिथल्या भिंतींचं टेक्श्चरही त्याने कॅनव्हासवर आणलं. पण चित्र पूर्ण झाल्यावर दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे चित्र कितीही हुबेहूब रंगवण्याचा प्रयत्न केला तरी कॅनव्हासच्या रेषांचा पोत चित्रातून वगळता येणार नव्हता, आणि दुसरं म्हणजे पोपडे पडलेल्या चित्राची नक्कल करून काढलेलं ते चित्रही अर्थातच अपूर्ण होतं. प्रसादला फक्त चित्र जतन करायचं नव्हतं, तर त्याचं मूळ रूप कसं असेल तेही बघायचं होतं. चित्र पूर्ण करून ते जतन करायचं होतं. या सगळ्या प्रक्रियेत काही वर्षं गेली. स्वत: कुशल फोटोग्राफर असल्यामुळे या कामात फोटोग्राफीची मदत घेता येऊ शकेल असं त्याला वाटलं. डिजिटल रिस्टोरेशनबद्दल तो थोडंफार ऐकूनही होता. त्यामुळे त्याने त्या दृष्टीने अभ्यासाला आणि तंत्रज्ञानाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली.
तंत्रज्ञान हाताशी असलं तरी अजिंठ्यात जाऊन फोटोग्राफी करण्यासाठी ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची परवानगी असणं आवश्यक होतं. मग त्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रसादचा फोटोग्राफीमधला दांडगा अनुभव आणि अजिंठ्याच्या डिजिटल रिस्टोरेशनचा त्यांना सादर केलेला आराखडा बघून ‘एएसआय’ने त्याला फोटोग्राफी करण्याची परवानगी दिली. त्यानंतरही पैशांची उभारणी हेही मोठं आव्हान होतं. फोटोग्राफी आणि प्रत्यक्ष कॉम्प्युटवर काम करण्यासाठीचं सॉफ्टवेअर या सगळ्यासाठी भरभक्कम पैसा लागणार होता. त्याची जुळवाजुळव करत प्रसादने 2009 साली प्रत्यक्ष फोटोग्राफीच्या कामाला सुरुवात केली.

मनात अजिंठ्याने घर करण्यापासून ते प्रत्यक्ष फोटोग्राफीला सुरुवात होईपर्यंत जवळपास वीसेक वर्षांचा काळ गेलेला होता, पण त्या काळात प्रसादचा अजिंठ्याचा अभ्यास सुरूच होता. त्या काळात तो किती वेळा अजिंठ्याला जाऊन आला असेल याची गणतीच नाही.
बौद्ध भिख्खूंच्या वर्षावासाची सोय म्हणून अजिंठ्याची लेणी खोदली गेली. भगवान बुद्धांचं महानिर्वाण इसवीसनपूर्व 570 मध्ये झालं. त्यानंतर इसवीसनपूर्व 300 मध्ये ही लेणी कोरण्यास सुरुवात झाली. जवळपास सातशे वर्षं हे काम सुरू होतं. म्हणजे कलाकारांच्या किती पिढ्या या कामाने झपाटलेल्या होत्या! रिस्टोरेशनच्या कामात मात्र होता एकटा प्रसाद.
अजिंठ्यामध्ये केवळ भिंतींवरच नव्हे तर छतांवरही चित्रं काढलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञान, तत्कालीन समाजजीवन, समाजमन, वैभव या सगळ्या गोष्टींचा आधार घेत ही चित्रं रंगवली गेली आहेत. त्या वेळचं समाजजीवन दाखवताना स्त्री-पुरुषांच्या वेशभूषा, केशभूषा, वस्त्रं, त्यांचे विविध पोत, रंग, अलंकार, गावांची-राजवाड्यांची-घरांची वास्तुरचना, अंतर्गत रचना, मनोरंजनाची साधनं, अशा अनेक गोष्टी या चित्रांमधून बारकाईने चित्रित केल्या आहेत. त्यातल्या पोपडे उडालेल्या जागा कॉम्प्युटरवर भरून काढण्यासाठी चित्रांमधल्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं आणि मुख्य म्हणजे त्यातल्या गोष्टी आपल्या विचारविश्वाचा भाग बनवणं हे प्रसादसमोरचं सगळ्यात मोठं आव्हानं होतं. शिवाय अजिंठ्यातल्या पर्यटकांच्या गर्दीत छायाचित्रण करणं, उंच जागेवरून छायाचित्रण करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्री गुहेत नेणं शक्य नसल्यामुळे स्टुलांवर स्टुलं चढवून छायाचित्रण करणं हेही कमी आव्हानात्मक नव्हतं.
प्रसाद सांगतो, “कामाला सुरुवात करायचं ठरलं, तेव्हा मी या चित्रांचे अर्थ कसे लावणार आणि त्यातल्या भग्न जागा कशा भरणार याची उकल माझी मला होणं गरजेचं होतं. अजिंठ्याच्या कामाची आखणी स्वतःच्या आकलनानुसार करायची की याआधी ज्यांनी अजिंठा अभ्यासलं आहे अशांच्या निष्कर्षांच्या आधारावर, हे ठरवणं महत्त्वाचं होतं. अजिंठ्यावर आजवर प्रसिद्ध झालेल्या अनेक पुस्तकांचे संदर्भ मला लोकांनी सुचवले; पण मी स्वतःच्या मनाचा कौल घेतला आणि निराळ्या मार्गाने जायचं ठरवलं. जतन, दस्तावेजीकरण आणि पुनर्निर्माण अशा टप्प्यांमध्ये मला काम करायचं असल्यामुळे सगळे ठोकताळे माझे मी बांधणं मला गरजेचं वाटत होतं. एखाद्या चित्राचा फोटो काढणं आणि नंतर ते चित्र पूर्ण करणं या दोन्ही गोष्टींसाठी माझ्या जाणिवांचा शोध माझा मलाच घ्यायचा होता. तसं झालं तरच मी हे काम करू शकेन असं मला वाटत होतं. त्यामुळे इतर कशाचेही संदर्भ न घेता मी कामाला सुरुवात केली. दोन हजार वर्षांपूर्वी या चित्रकारांनी चित्र काढताना काय विचार केला असेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. रंगांचा विचार, पोतनिर्मितीचा विचार, प्रतीकांचा विचार मी चित्रकाराप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या गोष्टी मला सापडल्या त्या इतरांपेक्षा निराळ्या आणि कदाचित मूळ संशोधनात भर घालणार्या ठरल्या.”
प्रत्यक्ष काम हा अत्यंत कठीण प्रवास होता. छतावरच्या आणि उंच जागेवरच्या चित्रांचे फोटो काढण्यासाठी स्टुलांच्या चळतीवर चढून हात थरथरू न देता, तोल जाऊ न देता फोटोग्राफी करणं हे अवघड काम होतं; पण सरावाने प्रसाद त्यातही तरबेज झाला. आजूबाजूला माणसांचा कितीही गोंगाट असला तरी शांत चित्ताने, श्वासावर नियंत्रण ठेवत तो फोटोग्राफी करत राहिला. पण आणखी दोन अडचणी त्याच्यासमोर आ वासून उभ्या होत्या.
एक म्हणजे चित्रांच्या जवळ जाण्यासाठी वाटणारी भीती. दुसरी, फ्लॅशचा वापर न करता फोटोग्राफी करणं.
एक तर एक चित्रकार म्हणून प्रसादच्या डोक्यात कोणतीही चित्रं दहा फुटांवरूनच बघायची हे पक्कं होतं. त्यातून अजिंठ्यातली चित्रं अतिशय नाजूक अवस्थेतली. त्यामुळे ‘एएसआय’कडून खास परवानगी मिळूनही प्रसादला चित्रांजवळ जाणं शक्य होत नव्हतं. आपल्या उच्छ्वासानेही चित्राचे पापुद्रे सुटून येतील, चुकून बोटाचा स्पर्श झाला तर, धक्का लागला तर, या भीतीने सुरुवातीचे काही दिवस त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. पण चित्रांच्या जवळ गेलं नाही तर त्यातले बारकावे, कथेतला अंतर्गत गुंफलेला तपशील हाती लागणार नव्हता. त्यासाठी त्याने एक उपाय शोधला. प्रसादचे मित्र, स्नेही आणि चित्रकार नीलेश बोथरे यांची मदत घेतली. बोथरे यांनी चित्राच्या जवळ जाऊन चित्राची गोष्ट नेमकी काय आहे ती समजून घ्यायची, त्याची टिपणं काढायची, ते तपशील प्रसादला समजावून सांगण्याची कामगिरी अंगावर घेतली.
पुढचं आव्हानं होतं ते कमी प्रकाशात फोटोग्राफी करण्याचं. अजिंठ्याच्या गुफांमध्ये प्रकाश खूपच कमी आणि फोटोग्राफीसाठी फ्लॅश लाइट वापरण्याची परवानगी नाही. प्रसादला चार लक्स लाइट वापरण्याची परवानगी मिळाली होती. चार लक्स लाइट म्हणजे एक मेणबत्ती पेेटवल्यानंतर एक मीटर वर्तुळात जेवढा प्रकाश पडेल तितकाच कृत्रिम प्रकाश. मग प्रसादने अपेक्षित प्रकाश देणारी बॅटरी तयार केली. या बॅटरीचा वापर करून चित्रांच्या जवळ जाऊन त्यातले बारकावे, कथा समजून घ्यायला सुरुवात झाली. डिजिटल कॅमेर्यावर काम करत असल्यामुळे अतिशय कमी प्रकाशातही काम करणं त्याला शक्य होतं. फोटोग्राफी करताना विविध प्रयोग करत, एक चित्र कॅमेर्याच्या वेगवेगळ्या मोड्समध्ये काढून बघत सर्वोत्तम ते मिळवण्यासाठी धडपड चालू होती. पण काम सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांत तो सरावला. कमी प्रकाश, लोकांची वर्दळ, चित्रं खराब होऊ नयेत यापायी वाटणारी भीती हे सगळे अडथळे पार करत एकेकागुहेतलं काम संपवत प्रसाद 17 नंबरच्या गुहेत जाऊन पोचला. तिथल्या चित्रांजवळ त्याला एक रंगीत पॅच दिसला. त्याने तोही क्लिक केला. त्या पॅचचे फोटो पाहिल्यावर प्रसादला वेगळीच शंका आली आणि त्याने काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
असं काय होतं त्या रंगीत पॅचमध्ये?
प्रसाद सांगतो, “अजिंठ्याच्या सगळ्या चित्रांना एक प्रकारची पिवळसर झाक आहे. ‘पद्मपाणी’च्या चित्रातलं कमळ आपल्याला हिरवट रंगाचं दिसतं. याचा अर्थ आपण असा लावतो, की या चित्रामध्ये हिरवा आणि पिवळा रंग वापरला गेला आहे. पण सतरा नंबरच्या गुहेत मला असं एक चित्र सापडलं जे इतर चित्रांपेक्षा वेगळ्या रंगांमधलं होतं. आधीची पिवळ्या रंगातली चित्रं आणि सतरा नंबरच्या गुहेतलं हे वेगळ्या रंगातलं चित्र घेऊन मी पुरातत्त्व विभागाकडे गेलो. तिथल्या तज्ज्ञ अधिकार्यांशी चर्चा सुरू झाली आणि इतिहासातला एक तपशील नव्याने कळला. 1934 साली या चित्रांचं जतन करण्यासाठी त्यावर वुडवॉर्निशसारख्या प्रिझर्व्हेटिव्हचा हात मारला गेला होता. बरं, चित्रांचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे तो सर्वत्र सारखा मारला गेला नाही. सर्वसाधारणपणे वुडवॉर्निश मारल्यानंतर कालांतराने त्यावर पिवळट रंग चढतो. तसा तो या चित्रांवर चढला होता. याचा अर्थ चित्रांचा मूळ रंग वेगळा होता. पद्मपाणीच्या हातातल्या कमळाचा रंग हिरवा नव्हे तर पर्शियन निळा आहे हे लक्षात आलं. या चित्रांच्या रिस्टोरेशनचं काम म्हणजे सगळा रंगांचाच खेळ. त्यामुळे मूळ चित्राचा रंग कोणता आहे हे कळणं महत्त्वाचं होतं. तो सगळ्या कामाचा पाया होता. त्यामुळे या नव्या शोधानंतर तोवर केलेलं दीड वर्षाचं काम बाजूला ठेवून दिलं. पुन्हा नव्याने सारा विचार सुरू केला.”
प्रसादने मग नव्याने रंगशास्त्र, प्रकाशाचं रंगशास्त्र, छायाचित्रणातलं प्रतिसादाचं रंगशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास केला. काही प्रयोग करून बघितले आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. याच टप्प्यावर अजून एक बाब प्रसादच्या लक्षात आली. भिंतींवर परावर्तित होणार्या नैसर्गिक प्रकाशातली चित्रं निराळी दिसतात. इतरत्र तो इफेक्ट दिसत नाही. बरं, अजिंठ्यात चित्रांचे आकार सारखे नाहीत. काही चित्रं फुटभर किंवा त्याहीपेक्षा लहान आहेत, तर काही चित्रं 11 फुटांपेक्षाही मोठी आहेत. समजा, शिबी राजाच्या चित्राचं छायाचित्रण करायचे आहे, तर तिथे प्रत्येक चौरस इंचाला रंगाची छटा बदलते. त्यामुळे चित्रांवर झालेल्या वुडवॉर्निशच्या परिणामांना बाजूला सारत चित्र एकसंध, रंगांच्या मूळ छटेत आणणं हे एक नवंच आव्हान होऊन बसलं. चित्रांवर परावर्तित होणारा प्रकाश आणि त्यामुळे चित्रांवर होणारा त्याचा परिणाम वर्षभर निरनिराळा असतो. अशा वेळी कॅमेरा घेतला आणि फोटो काढून आलं, असं होऊ शकत नाही. या सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार फोटो काढण्याआधी करावाच लागतो. म्हणूनच प्रसादने आधीचं काम बाजूला ठेवून वर्षभर कुठल्या गुहेत कधी काम केलं तर सर्वोत्कृष्ट फोटो मिळू शकतो याचा पुर्नविचार करून तशी स्ट्रॅटेजी ठरवली. काम करताना जर गुहेत परावर्तित प्रकाश हवा असेल तर कुठल्या महिन्यात, कुठल्या गुहेत, कुठल्या वेळी काम करायला पाहिजे याचं पूर्वनियोजन करून मगच तो पुन्हा कामाला लागला.
हा सगळा प्रवास पाहिला की प्रसादमध्ये कसलेला फोटोग्राफर, चित्रकार, रंगसंगतीची जाण असलेला कलाकार आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे चिकाटीचा संशोधक दडलेला आहे याची जाणीव होते. एखाद्या विषयात स्वत:ला गाडून घेतल्याखेरीज हे होऊच शकत नाही.
अजिंठ्याच्या चित्रांची फोटोग्राफी करणं जितकं कठीण आहे, तितकंच किंवा काकणभर अधिक कठीण आहे ते संगणकावर काम करणं. चित्रातून हरवलेला भाग पुन्हा चित्रात आणण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि प्रसादला आतून पिळवटून काढणारी आहे. फोटोग्राफीनंतर प्रसाद स्वत:च्या स्टुडिओत कामाला बसतो तेव्हा त्याचा जगाशी संपर्क संपतो. त्याला तो संपवावाच लागतो. त्याची दुनिया रिवाइंड केल्यासारखी दोन हजार वर्षं मागे जाते. एखाद्या चित्राचा फोटो कॉम्प्युटरवर घेऊन त्यातले निखळलेले दुवे शोधण्याची धडपड तो सुरू करतो तेव्हा काम करता करता एखादा गुंता सुटावा तसे चित्रातले अधलेमधले पुसले गेलेले भाग हळूहळू त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. चित्र काढताना चित्रकार कसा उभा असेल किंवा कसा बसला असेल, काय कोनात त्याचा हात असेल, हातात ब्रश कसा धरला असेल, ब्रश फिरवण्याची गती, ब्रश धरताना ब्रशवर दिलेला बोटांचा दाब कसा असेल, या सगळ्या गोष्टींपर्यंत तो पोहोचत जातो. कित्येक पिढ्यांपूर्वीच्या अनोळखी चित्रकाराचं बोट धरून प्रसाद चित्र पूर्ण करतो. अनेकदा या प्रवासाला अल्पविरामही मिळतात. कधी चित्र तुकड्या-तुकड्यात असल्यामुळे प्रसादला गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत. राजाच्या दरबारात वर राजा दिसतोय, मधलं सगळं पुसलं गेलं आहे आणि खालच्या बाजूला फक्त भिंतींच्या कडा उरल्या आहेत. अशा वेळी दरबारातलं मधलं चित्र काय असू शकतं, हा विचार करून ते पूर्ण करताना अनेकदा विखुरलेली टोकं एकमेकांना जुळत नाहीत. अशा वेळी प्रसाद अजिंठ्याचा अभ्यास करणार्या तज्ज्ञांची मदत घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो. त्याच्या मनातला संदर्भ, त्या संदर्भाला आधार म्हणून असलेले त्याच्याजवळचे पुरावे यांची चर्चा करतो. त्यातूनच चित्रांच्या प्रवासाचा योग्य संदर्भ त्याला मिळत जातो आणि चित्र पूर्ण होतं.
गेली पाच वर्षं हा प्रवास अथक सुरू आहे. आतापर्यंत त्याने 100 चौरस फूट चित्रांचं डिजिटल रिस्टोरेशन केलं आहे. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. शिवाय केवळ डिजिटल रिस्टोरेशन एवढंच प्रसादचं ध्येय नाही. अजिंठा संशोधन आणि संवर्धन केंद्र सुरू करावं, अशीही त्याची इच्छा आहे. अर्थातच या सगळ्यासाठी प्रचंड मोठ्या निधीची गरज आहे. उदाहरण द्यायचं, तर या प्रकल्पासाठी आतापर्यंत 80 लाख रुपये खर्च झाले आहेत आणि अद्याप प्रचंड काम बाकी आहे. त्यामुळे डिजिटल रिस्टोरेशनचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून त्यांच्यामार्फत निधी उभा करण्याचा प्रयत्नही प्रसाद आणि त्याचे सहकारी करत आहेत. त्यासाठी अजिंठ्याच्या फोटोंचं आणि प्रसादने केलेल्या कामांचं प्रदर्शन भरवून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचंही काम सुरू आहे. नीलेश बोथरे, रमेश साळवे, प्रवीण पगारे, अभिषेक कुलकर्णी आणि प्रशांत मोरे अशा मित्रांच्या मदतीने प्रसाद हे शिवधनुष्य पेलू बघतो आहे.

हे सगळं कशासाठी?
अजिंठ्याचा अमूल्य ठेवा कणाकणाने संपतो आहे. पुरातत्त्वखात्याने नुकतीच काही लेणी लोकांसाठी बंद केली. येत्या काळात एकेक लेणी बंद होत जाणार आणि पन्नास वर्षांनंतर कदाचित अजिंठ्यातली कोणतीच लेणी लोकांना बघण्यासाठी खुली राहणार नाहीत. पुढच्या पिढ्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी हा ठेवा बघता येणार नाही. म्हणूनच प्रसादच्या नाशिकच्या स्टुडिओत अजिंठ्याचं जणू पुनर्निर्माण सुरू आहे. भले ते डिजिटल का असेना.

-मुक्ता चैतन्य
मोबाइल : 9823388828
mukta.chaitanya@uniquefeatures.in
प्रसाद पवार
मोबाइल : 9373050570
sendprasadpawar@gmail.com

एका फोटोसाठी एक वर्ष..
डिजिटल रिस्टोरेशनसाठी चित्रांची फोटोग्राफी करत असताना प्रसादला तिथल्या शिल्पांचे फोटो काढण्याचा मोहही आवरला नाही. 19व्या गुहेत ध्यानस्थ बुद्धाची चार शिल्पं आहेत. प्रसादला त्या शिल्पांची फोटोग्राफी करायची होती. ध्यानमग्न अवस्थेत डोळ्यांची बुबुळं स्थिर झाल्याचा परिणाम या शिल्पकाराने शिल्पांमध्ये साधला आहे असं प्रसादला जाणवलं. त्यामुळे त्याला फोटो काढतानाही त्या अवस्थेला धक्का न पोहोचू देणारा फोटो काढायचा होता. प्रकाशाची विशिष्ट कोनातली तिरीप या शिल्पांवर पडली तर त्यातले ध्यानस्थ भाव अचूक हेरता येऊ शकतात असं त्याला वाटत होतं. सूर्याच्या दक्षिणायण-उत्तरायण स्थितीचा अभ्यास करत आणि 365 दिवस या मूर्तीवर कसा प्रकाश पडतो त्याचं निरीक्षण करत प्रसादने त्याला हवा असणारा विशिष्ट दिवस गाठला आणि हा फोटो निघाला.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा