झाडीपट्टी रंगभूमी: वैनगंगेचा अनोखा प्रवाह - मंदार मोरोणे

विदर्भातल्या वैनगंगेच्या तीरावर बहरलेली समृद्ध नाटक परंपरा म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी.
स्थानिक बोली, स्थानिक कलाकार घेऊन स्थानिक प्रेक्षकांसाठी रंगणाऱ्या या रंगभूमीला मुख्य रंगभूमीनेही हेवा करावा असा अफाट लोकाश्रय मिळाला आहे.
शंभर वर्षांची दीर्घ परंपरा जपणाऱ्या या रंगभूमीचं वेगळेपण मांडणारा अनुभवपर लेख.

नागपूरहून निघून नागभीड ओलांडलं आणि रात्रीच्या अंधारात आमची गाडी गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांवरून धावू लागली. गडचिरोली जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभं राहतं त्याच्या अगदी विरुद्ध वास्तव त्या रस्त्यांच्या रूपाने समोर येत होतं. काळाशार डांबरी गुळगुळीत रस्ता, दोन्ही कडेला साचलेली लालसर माती आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द झाडी. रात्रीच्या किर्र अंधारात गाडीतील म्युझिक प्लेअरवर ‘जगजित’ सुरू होता आणि आम्ही झाडीतला रस्ता मागे टाकत आमच्या नियोजित ठिकाणाकडे मार्गक्रमण करत होतो.
माझा अमरावतीचा कलाकार-दिग्दर्शक मित्र विशाल तराळ, छायाचित्रकार मनीष तसरे आणि मी असे तिघंजण झाडीपट्टीच्या दिशेने चाललो होतो. झाडीपट्टी-झाडीपट्टी रंगभूमी म्हणतात ती चीज आहे तरी काय हे प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता माझ्या मनात अनेक दिवसांपासून होती, आणि आता जसजसा त्या प्रदेशाकडे सरकत होतो तशी ती प्रत्येक किलोमीटरगणिक वाढत होती.
प्रवासातही आमची झाडीपट्टीवर चर्चा रंगली होती, आणि एकाएकी लाऊडस्पीकरवरून मोठ्याने उद्घोषणेचे आवाज ऐकू येऊ लागले. “आलं आपलं गाव!” विशाल म्हणाला आणि त्याने गाडी मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या निमकच्च्या रस्त्यावर आणली. थोड्याच वेळात आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला या गावात पोचलो. विशालच्या नाटक कंपनीच्या नाटकाचा त्या रात्री या गावात प्रयोग होणार होता. रात्रीचे साडेदहा वाजले होते आणि गावातील मुख्य चौक गर्दीने अक्षरश: फुलून गेला होता. अवघ्या अडीच-तीन हजार लोकवस्तीच्या या गावात माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत होते. स्वेटर-टोप्या घातलेली, शाली गुंडाळलेली बायामाणसं, मुलं लगबगीने गटागटाने निघाली होती. गावात जणू काही आज उत्सव असल्यासारखं वातावरण जाणवत होतं. आज गावात नाटक होणार होतं. आणि झाडीपट्टीत कुठल्याही गावात नाटकाचं आयोजन कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नसतं. आम्ही पोचलो त्या रात्री पोर्ला गावात दोन नाटकांचे मांडव पडले होते आणि पंचक्रोशीतून आलेल्या माणसांनी गाव अक्षरश: फुलून गेलं होतं. सगळीकडे नाटकांची पोस्टर्स चिकटवलेली, टांगलेली दिसत होती. माइकवरून नाटकांच्या, कलाकारांच्या नावांची अनाऊन्समेंट चालली होती आणि चौकातच थाटलेल्या बुकिंग काउंटर्सवरून लोक तिकिटं विकत घेत होते. हा सगळा माहोल डोळ्यांत साठवून घेत आम्हीही घाईने पाय उचलून मंडपाकडे चालू लागलो. तिथे पोहोचल्यावर बॅकस्टेजला सगळी कलाकार मंडळी मेकअप करण्यात गुंग असल्याचं चित्र दिसलं. आमच्याबरोबर साधारण सात-आठ तासांचं ड्रायव्हिंग करून आलेला विशालही न थकता लगेच मेकअपला बसला.

दिवाळी ते होळी या काळात झाडीपट्टीत अनेक गावांमध्ये हे असंच वातावरण बघायला मिळतं. या भागाची जीवनदात्री असलेल्या वैनगंगेच्या दोन्ही तीरांवर भंडारा ते सिरोंचा या संपूर्ण पट्ट्यात झाडीपट्टी रंगभूमी स्थिरावली आणि विस्तारली आहे. नवरगाव, पवनी, आरमोरी, वडसा, लाखांदूर, रेंगेपार, नागभीड ही सगळी झाडीपट्टी रंगभूमीची वर्षानुवर्षं महत्त्वाची केंद्रं आहेत.
गावाबाहेर साधारणत: शेतात जागा साफ केली जाते व मोठा चौकोनी खड्डा तयार केला जातो. या खड्ड्यातील माती वापरून उंच रंगमंच तयार केला जातो. समोरच्या खड्ड्यात प्रेक्षकांना बसायला खुर्च्या टाकलेल्या असतात, तर खड्ड्याच्या दोन्ही बाजूंना गाद्या-सतरंज्या अंथरून प्रेक्षकांची बसायची व्यवस्था केलेली असते. मंडपात बसलेल्या सर्वच प्रेक्षकांना रंगमंचावरच्या हालचाली स्पष्टपणे दिसतील अशी व्यवस्था केलेली असते. रंगमंचासमोर ध्वनिसंयोजक, तालवादक आणि कॅसिओवादक यांच्यासाठी जागा ठेवलेली असते. साधारण सत्तर ते ऐंशी रुपये खुर्चीसाठी, तर खाली बसणाऱ्या प्रेक्षकांकडून तीस ते चाळीस रुपये तिकीट आकारलं जातं. मंडपाला तिकीटदरानुसार प्रवेशद्वारं ठेवलेली असतात.
आम्ही पोचलो त्या पोर्ला गावात त्या रात्री ‘संस्कार’ नाटकाचा प्रयोग होणार होता. थोड्याच वेळात माइकवरून नाटक सुरू होत असल्याची घोषणा झाली आणि आम्ही रंगमंचासमोर आमच्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. नाटक सुरू झालं. कलाकारांची एंट्री झाली. आई आणि मुलगी यांच्यातील प्रसंग होता. मन मानेल तशी बिनधास्त वागणारी मुलगी अन् त्यापायी जिवाला घोर लावून घेतलेली आई. सुरुवातीलाच मनात विचार आला, किती हा सगळा भडकपणा!... रंगीत, चमचमणारे कपडे, चेहऱ्यावर थापलेली मेकअपची पुटं, प्रत्येक संवाद वरच्या पट्टीत आणि अमाप हातवारे. कुठला तरी दाक्षिणात्य सिनेमा आपण बघत असल्याचा भास व्हावा, असं सगळं समोर चाललेलं आणि मधेच एक कुठलं तरी गाणं आणि त्यावरचं नृत्य! तुकड्या-तुकड्यांमध्ये प्रसंग बघत आहोत की काय असं वाटायला लागलं होतं. भावनात्मक प्रसंग असो की विनोदी, कलाकाराच्या वाक्यागणिक, हालचालीगणिक कॅसिओवादक ढॅण ढॅण टॅ ढॅण करून पार्श्वसंगीत देत होता. सगळंच कसं भडक होतं! शहरी भागातील मुख्य रंगभूमीवरील नाटकांवर पोसलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला तो भडकपणा प्रकर्षाने जाणवत होता. फक्त एक नक्की जाणवत होतं की गोष्ट पुढे सरकत आहे.
कथेने आता वेग घेतला होता. कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत, भावनांची घालमेल, त्यातून निर्माण होणारं रहस्य आणि उत्कंठा यांची लक्षवेधी गुंफण या नाटकात असल्याचं जाणवू लागलं होतं. भडक असला तरी सगळेच कलाकार प्रेक्षकाला घट्ट बांधून ठेवणारा अभिनय करत आहेत हे लक्षात येत होतं. सगळ्याच भावनांचं प्रकटीकरण भडकपणाच्या ‘सुपरलेटिव्ह’ स्तराचं. भरीस भर म्हणजे नाटकातील ढासू संवाद. ‘जय हो, मंगलमय हो, कशाला जाता लोकांच्या दारी जेव्हा तुमचे काम करी बाबा अघोरी’, ‘ज्याच्या दहशतीने लोकांच्या पोटात दुखते तोच आहे मी सूर्यकांत गुप्ते’, ‘आयुष्यभर मुलांवर संस्कार करू शकलो नाही, पण मुलांवर अंत्यसंस्कार मीच केला पाहिजे’ अशी सगळी तडाखेबाज संवादांची मशिनगन सतत सुरू होती. लोकांना हे सगळं मन लावून बघताना पाहून आधी आश्चर्य वाटत होतं. पण मग विचार आला, अशी भावनेची फोडणी दिलेले संवाद आम्ही ‘धारावाहिक’ मालिकांमधून ऐकत असतोच की! त्या संवादांची शैली वेगळी असते एवढंच. प्रत्येक प्रसंगातील अभिनय, स्टिरिओटाइप असला तरी झाडपट्टीच्या प्रेक्षकांनाच काय तर मलाही पूर्ण बांधून टाकणारा होता आणि एव्हाना समोर बसलेल्या हजार-दोन हजार प्रेक्षकांसोबत मीही प्रसंगागणिक नाटकात, त्या कथेत, अभिनयात आणि कर्कश पार्श्वसंगीतात, लाल-निळ्या-पिवळ्या प्रकाशयोजनेत गुंतत चाललो होतो. तिसरा अंक सुरू असताना नाटकाने माझी पूर्ण पकड घेतली आणि नाटक संपून मी उभा राहिलो तेव्हा एक विलक्षण चांगला, वेगळा अनुभव मिळाल्याचं समाधान माझ्यातच मला जाणवत होतं. समोरचा गाव-खेड्यातला प्रेक्षक मंडपातून बाहेर पडत होता त्या वेळी मी विंगेत उभा राहून त्या उत्तम प्रयोगासाठी टाळ्या वाजवत होतो.
झाडीपट्टी रंगभूमीचा एकंदर टोनच ‘लाऊड’ आहे. झाडीपट्टीचं अगदी वर्णन करायचं झालं तर असं सांगता येईल की अलका कुबलच्या सिनेमाला दक्षिणेतील सिनेमांचा तडका दिला, की झालं झाडीपट्टीतील नाटक तयार! झाडीपट्टीतील नाटकांची गोष्ट सांगण्याची, रंगवण्याची हातोटी अप्रतिम आहे आणि हीच गोष्ट समोर बसलेल्या प्रेक्षकांना घट्ट बांधून, गुंगवून ठेवते. येथील नाटकांनी वर्षानुवर्षं या कथानकांच्या जिवावर रंगभूमी फुलवत ठेवली आहे, आणि आज जवळपास शंभर वर्षांनंतरही तेच तिचं बलस्थान आहे.
एके काळी या परिसरात गोंधळ, भिगीसोंग, खडी गंमत, दंडार आदी लोककला या लोकांच्या मनोरंजनाचं प्रमुख साधन होत्या व त्याद्वारे नृत्य-गाण्यांनी सजलेली पौराणिक ऐतिहासिक कथा सादर केली जाई. ‘दंडार’ या लोकप्रिय कलाप्रकाराचा वारसा घेऊनच पुढे झाडीपट्टीतील नाटक जन्माला आलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात नाटकांचे विषयदेखील प्रामुख्याने ऐतिहासिक-पौराणिक असत. संगीत हा इथल्या नाटकांचा प्राण आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेली अनेक उत्तमोत्तम संगीत नाटकं स्थानिक कलाकारांनी इथे सादर केली आहेत. हळूहळू नाटकांमध्ये लावणीचा शिरकाव झाला आणि लावणीप्रधान नाटकांची लाट आली. एकेका नाटकात पंधरा-वीस लावण्या ही सामान्य बाब होती. नंतरच्या काळात हा ट्रेंड पुन्हा बदलला. आज सामाजिक विषयांवर आधारित नाटकांना झाडीपट्टीत अधिक मागणी आहे. आजही कोणत्याही नाटकात गाणं आवश्यक मानलं जातं. कथानकादरम्यान येणाऱ्या एक किंवा दोन गाण्यांशिवाय दोन अंकांच्या मध्ये हिंदी चित्रपटगीतांवर आधारित दोन रेकॉर्डिंग डान्स हेदेखील अत्यावश्यकच. किंबहुना, नाटकाच्या जाहिरातींमध्ये या नृत्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.
असं तीन अंकांचं व भडक मेलोड्रामा, पल्लेदार संवाद आणि नृत्यं यांचा समावेश असलेलं नाटक हे जवळजवळ संपूर्ण रात्रभर चालतं. रात्रभर कलावंत काम करत आहेत आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षक तसूभरही आपल्या जागेवरून न हलता समरसून नाटक बघत आहेत, हे सगळं प्रत्यक्ष बघणं हा एक विलक्षण अनुभव असतो. रात्रभर नाटक बघणं आणि करणं, हा प्रघातदेखील इथल्या गरजेतूनच तयार झाला आहे. शंकरपटांचं, बैलांच्या शर्यतीचं आयोजन हा येथील जिव्हाळ्याचा विषय. गावोगावचे लोक आपल्या कुटुंबासह शंकरपट व जत्रा बघायला पोचत. शंकरपट झाल्यानंतर जंगलातून आपापल्या गावी जाण्याची सोय नसल्याने रात्रीचा मुक्काम त्यांना गावात करावा लागे. इतक्या लोकांची राहण्याची व्यवस्था करणं तेव्हाही जवळजवळ अशक्य काम होतं, आजही आहे. मग या अपरिहार्यतेतून लोकांच्या मनोरंजनासाठी रात्रभर चालणारी नाटकं सुरू झाली व ही पद्धत आजही सुरू आहे. या निमित्ताने गावोगावचे सगेसोयरे, नातेवाईक एकत्र जमतात आणि अनेकदा या निमित्ताने सोयरिकीदेखील होतात. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटक हे केवळ मनोरंजन नसून या परिसराची सामाजिक व सांस्कृतिक गुंफणच या नाटकांभोवती झाली आहे. कदाचित म्हणूनच येथील नाटकांना मुख्य रंगभूमीने हेवा करावा असा प्रचंड लोकाश्रय लाभलेला आहे. हा अफाट लोकाश्रय हेच ही रंगभूमी जिवंत असण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
“लोकांनी लोकांसाठी सादर केलेली ही कला आहे. आज याचं व्यावसायिकीकरण झालं असलं तर मुळात नाटकातून आर्थिक प्राप्ती ही मूळ प्रेरणा नक्कीच नव्हती. ही येथील सनातन पद्धती आहे, कुळाचार आहे. नाटकांनी भारलेली, नाटक आपल्या गावात झालं नाही म्हणून रडणारी, हळहळणारी, शेती विकून नाटकांचं आयोजन करणारी माणसं इथे आहेत. नाटक हा इथे अनेकांसाठी निष्ठेने खेळला जाणारा जुगार आहे. ते केवळ एक मनोरंजन नाही. येथील नाटकाने जसे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलाकार घडवले तसेच खेडोपाडी राहणारे, पोटापाण्यासाठी राबणारे पण नाटकावर अतीव प्रेम करणारे हजारो रसिक प्रेक्षकही घडवले आहेत. खेड्यातला प्रेक्षक अल्पशिक्षित, अशिक्षित आहे म्हणून तो काहीही खपवून घेईल असं नाही. जसा तो तिकीट घेतल्याशिवाय नाटक बघणार नाही, तसंच नाटकात कमअस्सल, पाट्या टाकणारं काही दिसलं तर विंगेत जाऊन कलाकाराला बेधडक तसं सांगायलाही कमी करणार नाही. नाटकात काम करणं हे वाया गेल्याचं लक्षण आहे असं नागर भागात समजलं जातं, त्याच वेळी इथे ते संपूर्ण गावासाठी भूषण असतं.” डॉ. राजन जयस्वाल सांगत होते. डॉ. जयस्वाल हे नागभीडला मराठीचे प्राध्यापक असून झाडीबोली-झाडीपट्टीचे अभ्यासक-लेखक आहेत.
येथील प्रेक्षकांना ही नाटकं ‘लाइव्ह’ वाटतात. त्यांच्यात आणि कलाकारांत एक जिव्हाळ्याचे अनौपचारिक संबंध निर्माण झालेले असतात. कलावंत गावात आला म्हणून त्याचे पाय धुणारे लोकही इथे आहेत तसंच नाटक आवडलं नाही म्हणून पेंडॉल जाळणारेदेखील. आमीर खान किंवा कॅटरिना कैफ अशा नट-नट्यांपेक्षा या प्रेक्षकांना येथील कलाकारांचं जास्त आकर्षण आहे. स्थानिक कलाकारांच्या या अफाट लोकप्रियतेचा अनुभव आम्ही जागोजागी घेतला. हे कलाकार राहतात कसे, बोलतात कसे याचं इथल्या लोकांना प्रचंड कुतुहल आहे. कलाकारांच्या मेकअप रूममध्ये येऊन त्यांचा मेकअप तल्लीनतेने बघणारी शाळकरी वयातली मुलं दर नाटकाला पाहायला मिळत होती. याच कुतूहलातून त्यांच्यात नाटकात काम करण्याची ऊर्मी निर्माण होत असेल आणि झाडीपट्टीला नवीन कलावंत मिळत असतील.
येथील नाटकाला सर्वच प्रकारे मोठं करण्यात या भागातील कोहळी पाटील समाजाचा मोठा वाटा आहे. आर्थिक व सामाजिक उतरंडीत वरच्या पायरीवर असलेल्या या समाजाने झाडीपट्टीसाठी मोठंच योगदान दिलं आहे. पूर्वी गावागावांत स्थानिकांचे गटच नाटक बसवत असत. या गटांना आर्थिक साहाय्य देणं, नाटकांचं आयोजन करणं, नाटक सर्व प्रकारे देखणं होण्यासाठी लागेल ती मदत करणं इथपासून ते नाटकात प्रत्यक्ष काम करणं असं सगळंच या समाजातील लोकांनी केलं आहे. इतकंच कशाला, घरंदाज घराण्यातील आपल्या सुना-मुलींनादेखील नाटकांमधून काम करण्यास या समाजाने प्रोत्साहन दिलं. ज्ञानेश्वर परशुरामकर हे याच समाजातील ज्येष्ठ कलावंत आहेत व संपूर्ण झाडीपट्टीत जी काही नावं आदराने घेतली जातात त्यापैकी हे एक नाव. परशुरामकर दिवाणी न्यायालयात न्यायाधीश होते व त्याही वेळी न्यायालयाचं काम आटोपल्यावर नाटकात काम करण्यासाठी नाटक ज्या ठिकाणी असेल तिकडे ते धाव घेत असत. एकदा कुणी तरी त्यांची तक्रार केली आणि वरिष्ठांनी त्यांना माफीनामा लिहून देण्याचा आदेश काढला. परशुरामकर वरिष्ठांकडे गेले आणि ‘माफीनामा कशाला, राजीनामाच घ्या’ म्हणत नाटकासाठी नोकरीवर कायमचे पाणी सोडून आले. अशी ही नाटकनिष्ठा!
त्यांच्याशी बोलल्यावर त्यांची नाटकनिष्ठा प्रकर्षाने जाणवली. “झाडीपट्टीचं नाटक हे सामाजिक सलोख्याचं साधन आहे. गावातल्या प्रतिष्ठित माणसांपासून ते अगदी गुरं राखणारा, हरिजन असे सगळे लोक नाटकांतून काम करतात. केवळ दलित समाजातील स्त्रियांचादेखील एक नाटक संच आहे. सत्तर वर्षांपूर्वी नाटकांमधून काम केलेले वयस्क कलावंत आजही आहेत. अगदी दुर्गम खेड्यातदेखील प्रकाशयोजना, नाटकात वापरायचे पडदे ते थेट फिरता रंगमंच, असे सगळे प्रयोग आम्ही स्थानिक स्तरांवर उपलब्ध साधनांच्या आधारे केले आहेत. कनिष्ठ आर्थिक-सामाजिक स्तरातील कलावंत जसे आमच्याकडे आहेत तसेच संगीत नाटकांतील पदंच्या पदं पाठ असणारे प्रेक्षकदेखील खेडोपाडी आहेत.” परशुरामकर यांनी आपला अनुभव सांगितला. वयाची सत्तरी गाठलेले परशुरामकर स्वत: उत्तम गायक-वादक आहेत. आजही ते ऑर्गन, हार्मोनियम, कॅसिओ यांसारखी वाद्यं सफाईने वाजवतात.
झाडीपट्टीतील लोकांसाठी नाटक हा त्यांच्या वार्षिक कॅलेंडरचाच भाग असतोे. संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी पशुरामकरांच्या ‘विसोरा’ या गावी शंकरपट व नाटक असणारच हे अवघ्या झाडीपट्टीला माहीत असतं. काही शेकड्यांमध्ये लोकवस्ती असलेल्या या गावात त्या दिवशी दहा-अकरा नाटकांचं आयोजन केलं जातं आणि जवळपास पंचवीस-तीस हजार लोक त्या रात्री विविध नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र जमतात. त्यामुळेच विसोऱ्याची यात्रा ही झाडीपट्टीच्या सांस्कृतिक श्रीमंतीचं प्रतीक मानली जाते.
स्त्री कलावंत हे झाडीपट्टी रंगभूमीचे अविभाज्य घटक आहेत आणि ही रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचाही तितकाच वाटा आहे. 1960 नंतर स्त्रिया नाटकात काम करू लागल्या आणि संगीतप्रधान, लावणीप्रधान नाटकांच्या वाढत्या मागणीनुसार स्त्री कलावंतांची गरजदेखील वाढू लागली. पूर्वी पुरुषच स्त्री भूमिका साकारत असत. नंतरच्या काळात पुरुष कलावंत गावातील असत व स्त्री कलावंत बाहेरून येऊन भूमिका साकारत. आज तीन ते चार महिला कलावंत प्रत्येक नाट्यसंचात असतात.
येथील लोकप्रिय कलावंत शबाना खान या गेली तीसेक वर्षं नाटकांतून काम करत आहेत. शबाना यांचे वडील मूळचे अफगाणिस्तानातले आणि फाळणीनंतर झाडीपट्टीत येऊन स्थिरावलेले. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची गरज म्हणून त्या नाटकांतून काम करू लागल्या. अफगाणी सौंदर्याचं, गात्या गळ्याचं आणि उत्कृष्ट अभिनयाचं वरदान लाभलेल्या शबाना यांना लवकरच प्रचंड लोकप्रियता मिळाली. नाटकाचे प्रयोग करण्यासाठी त्या गावोगावी जात, तेव्हा शबाना यांची बॅग आपल्याला उचलायला मिळावी म्हणून आयोजक कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागायची. आजही एक ज्येष्ठ कलावंत म्हणूनही शबाना खान तितक्याच लोकप्रिय आहेत.
“एक मुस्लिम स्त्री नाटकात काम करते म्हणून समाजातीलच लोकांकडून टीकाही झाली. सुरुवातीच्या काळात दूरवरच्या खेड्यात प्रयोग असत तेव्हा तिथे पोचण्यासाठी बैलगाडी, सायकल किंवा अगदी नदीपात्रातून चालत जाऊनही रात्र-रात्रभर प्रयोग केले आहेत. नंतरच्या काळात मोटरसायकल आणि आता बस किंवा इतर गाड्यांमधून प्रवास असा सगळाच काळ अनुभवला आहे. ‘नदी में नहाना और होटल में खाना’ अशी म्हणच आम्हा कलावंतांमध्ये रुळली होती. वीस किलोमीटर सायकल चालवत जाऊन मी लावण्या सादर केल्या आहेत. एकदा एका गावात माझ्या स्त्री सहकलाकाराला प्रयोगाच्या अगोदर अपघात झाला. संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला. त्या नाटकात तिची अन् माझी, अशा दोन्हीही भूमिका मला कराव्या लागल्या. तिची राणीची तर माझी भिकारणीची भूमिका. सगळेच प्रसंग एकामागोमाग. भिकारणीचा प्रसंग करायचा, आत जायचं, लगेच राणीचा साजशृंगार करायचा अन् पुन्हा रंगमंचावर! पूर्ण नाटक असंच करावं लागलं, आणि प्रेक्षकांनीही ते सहन केलं. प्रेक्षकांचं अलोट प्रेम आम्ही बघितलंय. प्रेक्षक अपुऱ्या जागेमुळे रंगमंचावर बसले आहेत आणि आम्ही नाटक करतोय, माझा भिकारणीचा रोल आहे आणि हातातील कटोऱ्यात प्रेक्षक खरोखरच पैसे टाकताहेत, असे अनेक अनुभव गाठीशी आहेत.” शबानाताई आत्मीयतेने आपला अनुभव सांगतात.
ज्ञानेश्वरी कापगते हे असंच इथलं आणखी एक लोकप्रिय नाव. झाडीपट्टीच्या लेडी अमिताभ बच्चनच! त्यांच्या नावावर आजही नाटकाला शेकडोंची गर्दी होते आणि सर्व स्त्री-पुरुष कलाकारांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी त्या एक आहेत.
“उणापुरा एक वर्षाचा असावा तेव्हा माझा मुलगा. इकडे मी रंगमंचावर लावणी करत असायची अन् बॅकस्टेजला तो रडत असायचा. सगळं लक्ष त्याच्यावर असताना खोटं हसू आणत रंगमंचावर लावणी सादर करायची. पायांत जड घुंगरू बांधून एकेका नाटकात वीस-वीस लावण्या, त्याही स्वत: लाइव्ह गाणं म्हणत केल्या आहेत. नाटक सुरू झाल्यापासून सूर्य उगवेपर्यंत सलग काम केलं आहे. झाडीपट्टीने अमाप लोकप्रियता दिली, स्थैर्य दिलं तसे आयुष्याचे धडेही दिले, जबाबदारीची जाणीव दिली.” ज्ञानेश्वरी कापगते यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
शबाना खान असो वा ज्ञानेश्वरी कापगते, त्यांची कहाणी ही येथील प्रत्येक स्त्री कलावंताची प्रातिनिधिक कहाणी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव, सिंदेवाही परिसरावर नागर रंगभूमीचा अधिक प्रवाह आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व त्याभोवतीची चळवळ हा एक वेगळा प्रवाह आहे. नाटकांचा हंगाम सुरू झाला की एका नाटक कंपनीत काम करणारे कलावंत आपापल्या गावातून मुख्य ठिकाणी एकत्र जमतात. नवीन नाटकाची तालीम पाच ते सात दिवसांत पूर्ण केली जाते. पूर्वी इथे नाटकाला दिग्दर्शकाची गरज फारशी भासत नसे. कलावंत स्वत:तील प्रतिभेच्या बळावरच नाटक सादर करत असत. मात्र, अलीकडे दिग्दर्शकाला स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे. अमरावतीहून दर वर्षी इथे येऊन झाडीपट्टीत काम करणारा विशाल तराळ आज इथे नाटकांचं दिग्दर्शनदेखील करत आहे. त्याच्या मते झाडीपट्टीत प्रत्येक कलाकार दिग्दर्शक आहे. त्याच्या दिग्दर्शनाचा अनुभव मांडताना तो सांगतो, “मला सगळ्यात पहिले कष्ट घ्यावे लागले ते व्हॉइस मॉड्युलेशनवर. मंडपात बसलेल्या शेवटच्या प्रेक्षकाला नाटक ऐकू जावं आणि दिसावं म्हणून इथे मोठ्या आवाजात संवाद म्हणावे लागतात, भडक मेकअप करावा लागतो आणि जोरजोरात हातवारे करत अभिनय करावा लागतो. इथे सूक्ष्म अभिनयाला स्थान नाही. प्रत्येकच कलावंताने हँगिंग माइकसमोर येऊन बोलायचं असतं. त्यामुळे संपूर्ण नाटक हे 4 बाय 4 एवढ्या जागेतच प्रामुख्याने घडतं. रंगमंचावर स्टूल, खुर्च्या, टीपॉय ठेवलेला असतो, मात्र प्रॉपर्टी म्हणून प्रत्यक्ष नाटकात त्याचा वापर फारच कमी केला जातो. कधी कधी तर संपूर्ण नाटक संपतं पण रंगमंचावरील खुर्चीवर कुणीही जाऊन बसत नाही, आणि तरीही खुर्ची रंगमंचावर आवश्यक असते. नाटकात संगीत ‘मस्ट’. अगदी खलनायकानेदेखील गाणं म्हटलं पाहिजे ही अपेक्षा, व त्यालाही ‘वन्स मोअर’ मिळणार! कलावंतांना नाटकासाठीचे कपडे स्वत: आणावे लागतात, स्वत:चा मेकअप स्वत: करावा लागतो. स्त्री कलावंतांना तर पंचवीस-तीस हजार रुपये याकरिता वेगळे काढून ठेवावे लागतात. बाहेरून येणाऱ्या कलावंतांना किंवा प्रेक्षकाला या नाटकांमध्ये साचेबद्धपणा वाटू शकतो. कलाकारही आपापली इमेज जपण्यासाठी ठराविकच भूमिकांमध्ये अडकून पडतात. मात्र, इथे प्रेक्षक केंद्रस्थानी असल्याने त्यांच्या मागणीबरहुकूम नाटक सादर करावं लागतं. त्यामुळे काही प्रमाणात साचेबद्धता अपरिहार्य आहे.”
वडसा येथील धनंजय स्मृती रंगभूमी संस्थेचे प्रमुख नितीन नाकाडे झाडीपट्टी रंगभूमीबद्दल आपलं निरीक्षण नोंदवताना सांगतात, “आताच्या नाटकांत कथेवर अधिक भर दिला जातोय. कलावंतांच्या तालमी होतात, नाट्यवाचन होतं. स्पर्धा वाढली तसा इथल्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा वाढतो आहे. झाडीपट्टी लाऊड नाटकांसाठी ओळखली जात असली, तरी आता प्रेक्षकांची आवड बदलतेय आणि आता हा ‘लाऊडनेस’ही कमी होतोय“. त्यांचे आजोबा धनंजय नाकाडे झाडीपट्टीला ओळख मिळवून देणाऱ्यांपैकी एक होते. किंबहुना या नाट्यपरंपरेला ‘झाडीपट्टी’ हे नामाभिधान- देखील त्यांनीच दिलं आहे.
झाडीपट्टीने येथील कलावंतांना जसं अमाप प्रेम दिलं तसंच काही प्रमाणात आर्थिक स्थैर्यही दिलं आहे. त्यांच्या-त्यांच्या मागणी व लोकप्रियतेनुसार कलावंतांना एकेका प्रयोगाचं कमीत कमी सातशे ते पुढे अगदी दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत मानधन इथे मिळतं. अर्थात त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनतही घ्यावी लागते. रात्री साडेदहा-अकराला असलेल्या नाटकाच्या प्रयोगासाठी नाटकाकरिता किमान दोन-तीन तास आधी निघून नाटकाच्या ठिकाणी पोचायचं, रात्रभर समरसून परफॉर्मन्स द्यायचा आणि पहाटे पाच वाजता नाटक संपताच परत निघायचं. सर्वांसाठी एकच वाहन असतं व ते ठरलेल्या ठिकाणी सगळ्या कलावंतांना नेऊन सोडतं. त्यानंतर कलाकारांनी आपापल्या सोयीच्या वाहनांनी आपापल्या गावी जायचं हा नित्यक्रम ठरलेला. या कलावंतांमधील कुणाचा सलूनचा, कुणाचा शेतीचा तर कुणाचा आणखी काही व्यवसाय. रात्रभर नाटकासाठी जागल्यावर दिवसभर पुन्हा पोटापाण्याचा मुख्य व्यवसाय करण्यासाठी कष्टायचं आणि रात्री पुन्हा नाटकाला निघायचं. जवळजवळ चार महिने हाच नित्यक्रम, आणि त्यातही पुन्हा उत्साह कायम टिकवायचा. अशाच प्रकारे अनेक कलावंत झाडीपट्टीत वर्षानुवर्षं काम करताहेत. या त्यांच्या साधनेची प्रसिद्धिमाध्यमांतून विशेष दखल घेतली गेली नाही. अर्थात, या सगळ्या गोष्टींची या कलाकारांना गरजदेखील वाटत नाही इतकं प्रेम त्यांना झाडीपट्टीतील प्रेक्षकांकडून प्रत्यक्ष स्वरूपात मिळालं आहे.
झाडीपट्टीतील कलाकारांना मिळणारं मानधन बाहेरच्या कलावंतांनाही खुणावत असतं. त्यामुळे नागपूर, अमरावतीसह विदर्भातील अनेक ठिकाणांहून, किंबहुना महाराष्ट्रातील विविध भागांतून कलावंत इथे येऊन काम करतात. झाडीपट्टीची नाटकांच्या सादरीकरणाची पद्धत ठरलेली आहे आणि बाहेरून येणाऱ्या कलावंतांना त्यानुरूप स्वत:त बदल घडवावे लागतात. कलावंत दमदार असेल, प्रामाणिक असेल, तर अशा बाहेरच्या कलाकारांनाही झाडीपट्टीने सामावून घेतलं आहे, प्रेम दिलं आहे.
कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय ही चळवळ सुरू आहे. नाटकांमधून काम करत आहेत तोपर्यंत कलाकारांना आर्थिक विवंचना नसते. मात्र, गात्रं थकली, काम मिळेनासं झालं की इथल्या अनेक कलाकारांना आर्थिक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. निवृत्तिवेतन वगैरे संकल्पनांशी या कलावंतांचा दूरदूरपर्यंतही संबंध नाही. दोन वर्षांपूर्वी एका अपघातात काही कलावंतांना जागीच मृत्यू आला. मात्र, आजपर्यंत सरकारकडून त्या कलावंतांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नाही. ही नाटक परंपरा हा रात्री चालणारा संसार आहे आणि सर्वांनाच यामागच्या कारणांची कल्पना आहे. असं असतानाही राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच इथेही रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकांवर बंदी घातलेली आहे. अर्थात नको तिथे नियम दाखवून सरकार आडमुठेपणा करतं म्हणून नाटकं बंद पडलेली नाहीत. स्थानिक पोलिसांना त्यांचा हिस्सा पोचवला की नाटकं बिनबोभाट पार पडतात, व हा प्रकार इथे सर्रास चालतो. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत, तर गृहमंत्री आर. आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. तरीही झाडीपट्टीच्या प्रश्नांवर कुठलाही उपाय शोधण्यात आलेला नाही.

झाडीपट्टीत टीव्ही आलेत, स्थिरावलेत. विविध वाहिन्यांद्वारे मनोरंजन होऊ लागलंय. चित्रपट आलेत. चित्रपटगृहं येऊन बंदही पडलीत. आणि आता डिजिटल आणि इंटरनेट मनोरंजन होत असतानाही झाडीपट्टी ताठ मानेने उभी आहे. झाडीपट्टीतील तरुण पिढीही फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर ‘अॅव्हेलेबल’ आहे आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे रंगमंचाभोवतीचं जगही अनुभवत आहे, तोलून धरत आहे. अत्याधुनिक मनोरंजनाच्या भडिमारात रंगभूमी टिकेल का, अशी भीती झाडीपट्टीत कुणालाच वाटत नाही. किंबहुना, ती टिकेलच, हा विश्वास सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतो.
“येथील प्रेक्षकांना कलेचा ‘लाइव्ह’ अनुभव चित्रपटांपेक्षा अधिक हवाहवासा वाटतो. प्रेक्षक व कलाकारांचं एकमेकांशी आत्मीयतेचं नातं आहे. घरोघरच्या सासू-सुनांच्या भांडणातही नाटकातल्या प्रसंगांचे संदर्भ असतात आणि म्हणून चित्रपटगृहं बंद पडत असताना, सादर होणाऱ्या नाटकांची व बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढतच आहे. हे गंगेचं वाहणं आहे. त्याच्या अंताबद्दल कोण सांगणार? येणाऱ्या काळात तांत्रिकदृष्ट्या नाटक अधिक चांगलं होईल. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार, सामाजिक स्थितीनुसार नाटकांचे विषय बदलतील, पण झाडीपट्टी टिकून राहील.” डॉ. राजन जयस्वाल झाडीपट्टीच्या भवितव्याबाबत आत्मविश्वासाने सांगतात.
खरं तर झाडीपट्टी नाटकांतून सादर होणारे विषय, त्यांची पद्धती यांना महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळू शकतो. अवाढव्य पसरलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील प्रेक्षकाला गुंगवून ठेवण्याचं सामर्थ्य या नाटकांमध्ये आहे. आवश्यक बदलांसकट झाडीपट्टीचं नाटक सादर केलं तर गावोगावच्या जत्रा व उत्सवांमधून या नाटकांना मोठा प्रेक्षकवर्ग लाभू शकतो. हे नाटक चार जिल्ह्यांपलीकडे नेण्याचे प्रयत्नही झाले आहेत, मात्र ते फार तोकडे आहेत. या चार जिल्ह्यांमध्येच नाटक अडकून पडण्यामागे जशी सामाजिक-सांस्कृतिक कारणं आहेत, तशी इथल्या लोकांमध्ये असलेली ‘स्वान्त: सुखाय’ प्रवृत्तीदेखील तितकीच कारणीभूत आहेत. सुसंघटित, निश्चयपूर्वक प्रयत्न झाले तर झाडीपट्टीतील नाटक महाराष्ट्रभर पसरलेल्या नाट्यवेड्या प्रेक्षकाला बरंच काही देऊ शकतं आणि कदाचित रंगभूमीच्या मुख्य प्रवाहातदेखील हा वैनगंगेचा प्रवाह मोलाची भर घालू शकतो.
-मंदार मोरोणे
मोबाइल : 9922899437
mandar_moroney@rediffmail.com

चौकट
झाडीपट्टी रंगभूमीचं अर्थकारण

झाडीपट्टीचं नाटक हा एक नियोजनाचा आणि अर्थकारणाचा वेगळाच नमुना आहे. होळीच्या आसपास नाटकांचा सीझन संपला की कलाकार आपापल्या गावी परततात. मात्र, निर्मात्यांचं काम संपत नाही. लोकांकडून मिळालेला प्रतिसाद, कलावंतांची कामगिरी, कंपनीची गरज या आधारावर नवीन कलाकार घेणं, जुने वगळणं, पुढील वर्षी सादर करावयाच्या नाटकांची निवड करणं, नवीन बुकिंग्ज घेणं इत्यादी कामं सुरू होतात. इथे निर्मात्याला बुकिंग्ज मिळवण्यासाठी प्रसिद्धी किंवा प्रयत्न करावे लागत नाहीत. गावोगावची आयोजक मंडळंच निर्मात्यांकडे येतात अन् विशिष्ट नाटकांचं बुकिंग आपल्या गावासाठी करतात. आपल्या गावात त्या वर्षीचं लोकप्रिय नाटक व्हावं यासाठी त्यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ असते. आयोजक या नाटकासाठी विविध प्रकारे निधी उभारतात. त्यासाठी काही देणगीदार मिळवले जातात. या देणगीदारांना किमान अडीचशे रुपये देणगी द्यावीच लागते. गावातील मूळ रहिवासी व सध्या इतरत्र राहत असलेल्या लोकांनाही मानपत्र पाठवून वर्गणी देण्याचं आवाहन केलं जातं. आणि हे लोेकदेखील आपल्या गावात नाटक होणार म्हणून देणगी देतात आणि नाटकाला उपस्थितही राहतात. याशिवाय आयोजक नाटक पाहायला येणाऱ्या गावकऱ्यांकडून खुर्चीचं तिकीट म्हणून सत्तर ते ऐंशी रुपये तर बैठ्या व्यवस्थेसाठी तीस रुपये आकारतात. अशा प्रकारे निधी उभारून नाटकाचं नियोजन करतात.
नाट्यनिर्माते आयोजकांना स्टेजचा नकाशा देतात व त्यानुरूप प्राथमिक स्वरूपाची स्टेज-मंडपाची तयारी आयोजकांना करून द्यावी लागते. जी रक्कम ठरली असेल त्याच रकमेत नाट्यनिर्माते खुर्च्या, रंगमंच, वाहतुकीचा खर्च, नाटकांची पोस्टर्स अशा सगळ्या गोष्टींचा भार पेलतात. प्रसिद्धी अन् मनोरंजन कर आयोजकांना द्यावा लागतो. एका नाटकाच्या प्रयोगाचा खर्च किमान पन्नास हजारांपर्यंत जातो व कलाकारांचं मानधन व इतर खर्च वगळता निर्मात्याला दर प्रयोगामागे तीन ते पाच हजार रुपये सुटतात. निर्मात्याला कलाकार, तंत्रज्ञ, सहायक वगैरे मिळून पन्नास ते साठजणांचा चमू सांभाळावा लागतो. एकदा करारबद्ध केलं की कलाकार सहसा एक कंपनी सोडून दुसरीकडे जात नाही. नाटकाचा दुसरा अंक संपला की आयोजक निर्मात्याला पूर्ण रक्कम देणार आणि तिसरा अंक संपला की निर्माता सर्व कलाकारांना तिथल्या तिथे त्यांचं मानधन देणार. मानधन हे आधीच ठरलेलं असतं. यातली कोणतीही गोष्ट कागदोपत्री होत नाही. आणि वर्षानुवर्षं हा व्यवहार केवळ विश्वासावर बिनधोक सुरू आहे.
गडचिरोलीतील वडसा हे गाव झाडीपट्टीची मुंबई मानलं जातं. वरील सर्व व्यवहार या ठिकाणी होतात. येथील विविध नाटक कंपन्यांची मिळून दर वर्षी साधारणत: चाळीस ते पंचेचाळीस कोटींची उलाढाल होत असते.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा