दहशतीच्या छायेतलं सोन चमन - मिलिंद चंपानेरकर

जम्मूहून श्रीनगरचा प्रवास जेमतेम पाऊण तासाचा, पण त्यापूर्वी जम्मू विमानतळावर ‘चेक-इन’ करायला दीड तास लागला. सोबत होती एक हँडबँग आणि एक छोटीशी खांद्यावरची बॅग. परंतु माझ्यासह या सामानाचं किमान तीन वेळा ‘स्क्रीनिंग’ झालं. एवढं कमी नव्हतं म्हणून की काय, सामान विमानात चढवण्यापूर्वी ‘लगेज सेक्शन’मध्ये बोलावण्यात आलं आणि आपापलं सामान ‘ओळखण्यास’ सांगितलं गेलं. अर्थात, ‘काळजीपूर्वक तपासा’चे हे सर्व सोपस्कार सर्वच प्रवाशांना पार पाडणं भाग होतं. यातून दोन गोष्टी सूचित होत होत्या. एक, मी एका ‘असुरक्षित’ ठिकाणी जात आहे; आणि दुसरी विमानातला माझ्यासह कुणीही प्रवासी ‘धोकादायक’ गोष्टी सोबत घेऊन जात नाहीये ना, याची झडतीवजा तपासणी अत्यावश्यक आहे. दीड तासात हा सगळा कार्यक्रम उरकल्यावरच मी विमानात जाऊन बसलो. कुठे जाण्यासाठी? तर जिथे पर्यटक म्हणून जाण्याचा प्रश्नच संभवत नाही अशा काश्मीर खोऱ्याच्या काही अंत:स्थ भागात मी पत्रकार म्हणून चाललो होतो. आणि अर्थात जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्येही फिरण्याचा विचार होताच.

युवा कविमनाची तीव्र वेदना

विमानाचा प्रवास सुरू झाला. 25 नोव्हेंबरपासून काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होणार होत्या. या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व काळात या निवडणुकीकडे आणि त्याला सलग्न अशा मुद्द्यांकडे तेथील लोक कोणत्या मनोभूमिकेतून पाहत आहेत, हे मला पत्रकार म्हणून जाणून घ्यायचं होतं. तीच माझी ‘स्टोरी’ असणार होती. त्यामुळे ‘गृहपाठ’ म्हणून मी आठवडाभरातील स्थानिक वर्तमानपत्रांची कात्रणं सोबत घेतली होती. विमानात बसल्यावर ते ‘टेक-ऑफ’ करण्यापूर्वीच मी माझ्या बॅगेतून ती कात्रणं बाहेर काढली आणि त्यावर खुणा करत त्यांचा ‘फडशा पाडण्यास’ सुरुवात केली. काही वेळाने मला जाणवलं, की माझ्या बाजूला बसलेला साधारणपणे पंचविशीतील एक काश्मिरी युवक त्याच्या ‘लॅपटॉप’वर काही तरी काम करत असताना अधूनमधून माझी ही लगबग पाहत आहे. मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो जरा ओशाळला; परंतु त्याला ‘स्वस्थ’ वाटावं या उद्देशाने मी उगाचच त्याला विचारलं,
“कहाँ, श्रीनगर जा रहे हो?”
“नहीं, दिल्ली।”
मी चमकलो.
“रहता हूँ श्रीनगर लेकिन दिल्ली जा रहा हूँ। जम्मूसे गलतीसे वन स्टॉप फ्लाइट याने श्रीनगर होके दिल्ली जानेवाली इस फ्लाइट का बुकिंग किया था।”
“कोई बात नहीं। श्रीनगर में कहीं किसी को संदेसा देना है तो बता दो!” मी हसत हसत म्हटलं.
“थँक यू, अंकल.” तोसुद्धा स्मित करीत उत्तरला.
मी कात्रणाचं वाचन पुढे सुरू ठेवलं. पाच नोव्हेंबर रोजी बडगाम जिल्ह्यातील छत्तरगामजवळ दोन युवक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हकनाक मारले गेले होते. त्यामुळे खोऱ्यात पुन्हा असंतोषाला वाचा फुटली होती. लष्कराने या घटनेबाबत जाहीर ‘माफी’ मागितल्याचं वृत्त त्याच दिवशी वृत्तपत्रांत आलं होतं. गेल्या अनेक वर्षांत लष्कराने माफी मागण्याची ही ‘पहिलीच वेळ’ असल्याने ही गोष्ट ‘ऐतिहासिक ठरणार’ असल्याचं एका स्थानिक संपादकांनी म्हटलं होतं.
मी सहजच शेजारी बसलेल्या तरुण मुलाला त्या घटनेसंदर्भात विचारलं. त्याने नजरेला नजर न देता मान खाली घातली. थोड्याच वेळात विमान श्रीनगरला पोहोचणार असल्याने ‘लंबी कहानी है, पाच-दस मिनिट में तो कोई बात नहीं हो सकती’ म्हणत त्याने उत्तर देण्याचं टाळलं. तरीही मी आग्रह सोडला नाही. मग तो म्हणाला, “चार दिन पहिले मैंने उसपर एक कविता लिखी है, वह पढ़के बता सकता हूँ अंकल।” मी म्हटलं, “बहुत अच्छे!” त्याने आपल्या ‘बॅक-पॅक’मधून एक कागद काढला आणि कविता वाचण्यास सुरुवात केली-
“माय फ्रेंड, डिड द न्यूज ऑफ माय मर्डर रीच यू?
यस, आय अॅम डेड, शॉट डेड,
यस्टरडे, टुमारो, डे आफ्टर टुमारो
ऑर डे बिफोर यस्टरडे
इन बडगाम, इन बारामुल्ला अँड बानिहाल.
आय कॅन बी एनीवन
फ्रॉम एनीव्हेअर इन काश्मीर
अँड आय अॅम डेड...”
कविता बरीच दीर्घ होती, पण काही ओळींमधूनच त्या काव्यात्म अभिव्यक्तीमधील संवेदनशीलता आणि धार दोन्हींचा अंदाज आला होता. मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसारख्या शहरांतील उच्चमध्यमवर्गीय मुलं जशी रात्री आपल्या मोटारगाडीतील ‘डेक’वर उच्चरवात संगीत लावून तुफान वेगाने ‘ड्राइव्ह’ करत जात असतील, तशीच बडगाम जिल्ह्यातील ही तीन-चार पोरसवदा मुलं जात होती. ‘ड्राइव्ह’ला नव्हे, तर जवळपास कुठून तरी मोहरमची मिरवणूक जाणार होती ती पाहण्यासाठी. वाटेत सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकलं, परंतु गाडी वेगात असल्याने ती थांबवायला त्यांना वेळ लागला. ‘इतका’, की तोवर लष्कराने गाडीवर मागून बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी झाडल्या आणि गाडीतली दोन मुलं जागीच ठार झाली. अशा बळी ठरलेल्या असंख्य ‘मृत’ मुलांची शिकायत त्या युवा कवीने कवितेतून व्यक्त केली होती-
देअर वॉज ब्लड
माय ब्लड, माय कझिन्स बल्ड
अँड अनदर्स... अँड अनदर्स
अवर ब्लड विथ शॅटर्ड ग्लास
शब्दागणिक अंतर्मनातील तीव्र वेदना वाढत गेलेली जाणवत होती.
वी आर स्टिल देअर एम...
आय सी देम एव्हरी डे
दे डोन्ट बिलाँग हिअर
दे आर नॉट अस.
दे आर एलिअन्स.
इशारा अर्थातच भारतीय लष्करावर होता. दरम्यान, विमान श्रीनगरच्या विमानतळावर लवकरच उतरणार असल्याचा इशारा एअर-होस्टेसने दिला. त्या कवी मुलाने, रशीदने मला विचारलं, “अंकल, आगे सुनना चाहते हो?”
“हाँ, जरूर! लेकिन समय...”
“कोई बात नहीं। मैं ना, आपको मेल कर दूँगा।
आप अपना ई-मेल आयडी दिजिए अंकल।”
त्याला पुढे दिल्लीला जायचं असल्याने ‘लॅपटॉप’शी त्याचा चाळा सुरूच राहिला. माझा ई-मेलही त्याने तत्काळ ‘सेव्ह’ करून घेतला. उंचापुरा, देखणा. गोऱ्या चेहऱ्यावर दाढीचे खुंट, नजरेत संवेदनाशीलता, निग्रह आणि त्याच वेळी दयार्द्रता व शांती. उग्रतेचा लवलेशही नाही. आजच्या सुशिक्षित काश्मिरी युवकांचा प्रतिनिधी म्हणता येईल, असाच त्याचा चेहरा होता. पुढील दोन दिवसांतल्या काश्मीर खोऱ्याच्या भटकंतीनंतर मला ते प्रकर्षाने जाणवलं.

ग्रामीण चित्राचं समीप दृश्य

श्रीनगर विमानतळाबाहेर आलो. तिथेही अर्थातच कडक सुरक्षेचं दर्शन घडलं. याकूब मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी मोटारगाडीने विमानतळावर येणार होता. मी त्याला फोन करण्यासाठी खिशातून मोबाइल काढला आणि त्याच क्षणी त्याचा फोन खणखणला. “बाहर आ गए आप मिलिंदजी? बस्स, वही रुके रहिए... मैं सिक्युरिटी क्लिअर कर के वहीं गाडी लेकर आ रहा हूँ।’
याकूबला गेल्याच वर्षी ‘सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय शिक्षक’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं गेलं होतं. एक तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मध्यमवयीन याकूब ‘नागरी सुरक्षा मित्र’ म्हणूनही कार्यरत होता. श्रीनगरहून सुमारे पस्तीस किलोमीटरवर असलेल्या बडगाम जिल्ह्यातील चाडोरा तालुक्यातील एका अंत:स्थ गावाचा तो रहिवासी होता. ग्रामीण भागातील लोक या निवडणुकीकडे कसं पाहतायत हे जाणून घेण्यासाठी मला त्याची मदत हवी होती; श्रीनगरच्या एखाद्या लॉजवर राहून आसपासचा परिसर फिरू, असा माझा विचार होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्याला फोन केल्यावर तो म्हणाला, “नहीं जी, आप मेरे ही घर आएंगे... बाकी कुछ सोचने की बातही नहीं आती... सिर्फ एक ख्याल करिए... किसी भी हालत में चार बजेसे पहले श्रीनगर एअरपोर्ट पहुँचिए... अब अंधेरा जल्दी हो जाता है। एअरपोर्टसे मेरे गाव पहुँचने के लिए समझो डेढ़-दो घंटे लगेंगे। छे बजे तक कैसे भी पहुँचना जरुरी है... उसके बाद पहुँचना ठीक नहीं होगा।” ही गोष्ट त्याने मला तीन-चार वेळा बजावून सांगितली- अर्थात सुरक्षेच्या कारणासाठी. मी त्यानुसार तसा वेळेवरच पोहोचलो होतो.
पाच मिनिटांतच तो विमानतळाच्या मुख्य द्वाराशी पोहोचला. गाडी तिथे थांबवून देत नसल्याने लगबगीने तो गाडीतून उतरला आणि मोठ्या स्नेहाने त्याने मला अलिंगन दिलं. त्याच्यासोबत त्याचा एक शिक्षकमित्र होता. त्याने त्वरेने माझी बॅग हाती घेऊन गाडीच्या डिकीत ठेवली. “चलिए, जल्दी बैठ जाइए।” गाडी तत्काळ निघाली. प्रवासाबाबतच्या दोन-चार गोष्टी झाल्यावर मिश्कीलपणे याकूब म्हणाला, “मिलिंदजी, आपको मालूम है? हमने आपको ‘किडनॅप’ किया है!”
मीही सहजपणे उत्तरलो, “कोई बात नहीं! चाय-वाय पिलाना, खाना खिलाना, इतना तो करोगे ना?”
“वो तो करेंगे... लेकिन आप वापस कैसे जाओगे?”
दरम्यान, त्याच्या गाडीच्या डेकवर सुरू असलेलं त्याच्या आवडत्या मोहम्मद रफीचं ‘हो के मजबूर मुझे किसने बुलाया होगा’ गाणं संपलं होतं आणि काश्मिरी भूमीचं गुणगान करणारं एक लोकगीत सुरू झालं होतं-
इक सोन चमन
इक सोन चमन...
त्या गाण्याचा धागा पकडून मी म्हटलं, “आप छोड़ेंगे नहीं तो रह जाएँगे इस ‘सोन चमन’ में!”
ते दोघं खळखळून हसले. अशाच गमतीजमती करत प्रवास सुरू होता. गाडी श्रीनगर शहराबाहेर निघून नजीकच्या ग्रामीण भागात प्रवेश करती झाली. दुतर्फा लाल-केशरी चिनार वृक्ष दिसू लागले... लाकडी घरं... कुठे ब्रह्मदेशी वास्तुरचनेच्या खुणा दर्शवणारी मशीद... कुठे निवडणुकीतील उमेदवारांची बॅनर्स.... कुठे ‘आझादी’च्या क्रांतिकारी घोषणा सूचित करणारे फलक... थंडीपासून संरक्षण करणारे व पायापर्यंत घोळदार असे ‘फेरान’ घातलेले आणि इथे-तिथे बिनकामाचे उभे असलेले बेकार युवक... रस्त्यालगतच्या अर्ध्या-कच्च्या बैठ्या बांधकामांमधील दुकानं... सलून, पंक्चरची दुकानं, किराणा वा भाजीची दुकानं... बुरख्याचं नामोनिशाण नाही, पण हिजाब घातलेल्या काश्मिरी स्त्रिया तिथे खरेदी करताना दिसत होत्या...
काही वेळाने एक मध्यमवयीन काश्मिरी स्त्री लहान मुलासह रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. याकूबने गाडी थांबवली. ती स्त्री मुलासह गाडीत बसल्यावर आमच्या गप्पांमध्ये खंड पडला. गाडीत बसताना तिने कोणत्याशा गावाचं नाव याकूबला सांगितलं. बाकी त्या दोघांत अवाक्षरही संवाद झाला नाही. याचा अर्थ ती स्त्री याकूबला अपरिचितच होती. दहा-बारा मिनिटांनी एक वस्ती लागली तेव्हा तिने गाडी थांबवण्यास सांगितलं आणि ती मुलासह उतरली. नंतरच्या एखाद तासाच्या प्रवासात याकूबने किमान चारजणांना तरी अशी ‘लिफ्ट’ दिली असेल. विशेष म्हणजे ना त्यापैकी कुणी हात दाखवून गाडी थांबवली होती, ना त्यातलं कुणी याकूबच्या परिचयाचं होतं. हे केवळ याकूबच्या सभ्यतेचं लक्षण नव्हतं, तर आतल्या भागात ‘पब्लिक ट्रान्स्पोर्ट’ची फारशी व्यवस्था नसल्याने सामान्यत: कुणीही गाडीवानाने स्वेच्छेने ‘लिफ्ट’ देणं हा सार्वजनिक सभ्यतेचा भाग झाल्याचं त्यातून प्रतीत होत होतं. यापैकी काही भाग ‘अतिरेकीग्रस्त’ मानला जात असला, तरी ‘लिफ्ट’ देण्या-घेण्याचा हा व्यवहार अगदी नि:शंक मनाने आणि बिनबोभाट होत होता. वर त्यात ना शुक्रिया ना विनंती. काश्मीरच्या अंतर्भागाचं माझ्या दृष्टीने हे पहिलं ‘समीपदृश्य’ (क्लोज-अप) होतं.

गृहस्थ जीवनाची स्नेहार्द बाजू

आम्ही याकूबच्या गावात जाऊन पोहोचेपर्यंत सूर्यास्त झालेला होता. अंधारून आलं होतं. थंडी वाढत चालल्याचं जाणवत होतं. दुतर्फा घरांमध्ये वीज होती पण रस्त्यांवर नव्हती. वीज दिवसातून फार तर 7-8 तास असते, असं याकूब म्हणाला. याकूबने नुकतंच म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी चार खोल्यांचं बैठं घर बांधलं होतं. पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा त्याचा परिवार. एक मुलगा दहावीत, तर मोठा मुलगा व मुलगी महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज श्रीनगरला ‘अप-डाऊन’ करतात. दहा आसनी ‘शेअर सुमो’ गाडीने गावापासून ‘चांडोरा’पर्यंत आणि नंतर तिथून पुन्हा दुसऱ्या ‘शेअर सुमो’ने श्रीनगर असा दररोजचा प्रवास. सार्वजनिक बसेस कमी असल्याने ‘सुमो’ हाच स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय.
पूर्ण मेहमाननवाज़ीनिशी चहापाणी झालं. ‘नमकीन चहा’ (मोठाचा) आणि रोटी हा तिथे संध्याकाळचा नाश्ता. सोबत वेगवेगळी बिस्किटं. इराण-अफगाणिस्तानप्रमाणे इथेही बेकरी उत्पादनांची लयलूट. याकूबच्या परिवाराशी अनौपचारिक गप्पा सुरू होण्यास अर्धा तासही लागला नाही.
थंडी असल्याने सर्वच घरांत आणि घरातील प्रत्येकच खोलीत गालिचे वा जाजम हा अत्यावश्यक भाग. हे गालिचे, पडदे, चादरी, लोड, अभ्रे अशा सर्व गोष्टींवर खास काश्मिरी रंगसंगतीची, कौशल्याची नजाकत दिसून येत होती. चहापाणी झाल्यावर याकूब म्हणाला “चलो, अंदर बैठेंगे।” आत एक मोठीशी खोली होती. त्यात एक पडदा ओढून स्वयंपाकघराची जागा.
त्या खोलीत गेल्यावर लक्षात आलं, की गालिचे काहीसे उबदार आहेत. हे कसं काय, असं विचारताच याकूबने मला बाहेर आवारात नेलं. त्या खोलीच्या मागच्या बाजूच्या भिंतीच्या खोपट्यात एक अग्निकुंड अर्थात ‘फायरप्लेस’ तयार केली होती. तिथे सरपण टाकून शेकोटी. त्यावर एका पाण्याच्या टाकीची (विटांच्याच) योजना केली होती. पाणी उकळू लागलं की त्या टाकीलगतच्या खोलीतली फरशी गरम होते. त्यावर जाडसर गालिचे. त्यावर बसलं की भर थंडीतही सुशेगात वाटतं. वा, काय ‘इंडीजिनस’ कल्पना होती!
थंडीचा पारा तीन-चार डिग्रीवर उतरलेला. मी याकूबसोबत त्या खोलीत जाऊन बसलो. मी बसत नाही तोच घरातील एका सदस्याने येऊन माझ्या अंगावर जाडजूड रजई पांघरली. मी ती नीट करण्याचा प्रयत्न करताच त्याने माझा हात हक्काने बाजूला करून खांद्यापासून पायापर्यंत मला त्यात ‘गुंडाळलं’. थोड्या वेळाने याकूबचा मुलगा फैसलने एक ‘कांगडी’ आणली. ‘कांगडी’ म्हणजे एक वेताची टोपली. त्याच्या आत मातीचं भांडं गच्च बसलेलं. त्यात कोळशाचे निखारे. त्यावरील राख दूर करण्यासाठी एक नक्षीदार धातूची कांडी ‘कांगडी’वर कायमची लटकवलेली. फैसलने रजईच्या आत ‘कांगडी’ ठेवून कसं बसायचं व सतत ऊब कशी मिळवायची याचं ‘नि:शब्द’ प्रात्यक्षिक दिलं. मी जेव्हा जेव्हा त्या खोलीत जात असे तेव्हा त्वरेने घरातलं कुणी ना कुणी स्वत:हून पुढे यायचं व रजईत मला ‘गुंडाळायचं’.
मनात आलं, काश्मीरमध्ये आलेल्या कुणालाही हरप्रकारे सुरक्षितता देण्यासाठी सदैव तयारीत असलेल्या या जनांच्या प्रदेशाला ‘असुरक्षित’ का मानावं? वर ही माणसं जराही कूपमंडुक नाहीत. शेजारीपाजारी, नातेवाईक आदींची घरात सतत ये-जा. तेही या उबदार खोलीत येऊन बसलेले. घरातल्या स्त्रियांसह सर्वजण संध्याकाळी गोलाकार करून या खोलीत बसणार, गप्पा मारणार, ‘टीव्ही’वरील बातम्या पाहणार, मधोमध ठेवलेल्या मोठ्याशा थर्मासमधील नमकीन चहा पिणार, अधूनमधून एकमेकांकडे आळीपाळीने ती ‘कांगडी’ फिरवणार. हे दृश्य तसं सामान्यपणे इथल्या कुठल्याही घरात दिसून येतं. ‘कम्युनिटी लिव्हिंग’ आणखी कसं असतं? स्त्रियांचाही यात पुरुषांच्या बरोबरीने सहभाग दिसत होता.
मी याकूबला ‘बुरख्या’च्या प्रथेबाबत छेडलं, तेव्हा तो काहीसा त्रासिक होऊन म्हणाला, “आपको वहाँ दूरसे कुछ भी लगता है। काश्मीर में कभी भी ‘पर्दा’ अनिवार्य नहीं रहा है। श्रीनगर की बात ही छोड़िए- यहाँ गाँव में भी देखिए। बहुतही थोड़ी औरतें बुरखा पहनती हैं। हाँ, हिज़ाब जरूर दिखेगा... हाँ, वो ‘पब’ में जाना, नाच करना वगैरा यहाँ किसी को मंज़ूर नहीं है।”
मी त्याला विचारलं, “यहाँ गाँव में कुछ पंडित परिवार हैं?”
“कितने दिखाऊँ? चलिए मेरे साथ। हाँ, वो एक दौर था, जब काफी पंडितोंको अतिरेकियों के डरसे जाना पड़ा। अब तो कुछ समस्या नहीं है। और किसी भी पंडित के घर में जाओ... हमारी और उनकी रहनसहन में कुछ फर्क नहीं दिखेगा। फर्क इतनाही की हम नमाज़ पढ़ेंगे और वो पूजा करेंगे... बाकी ‘काश्मीरियत’ तो सबकी एकही है । ‘पोलरायझेशन’ की बात तो सिर्फ सब पॉलिटिकल पार्टीज करती हैं, लोग नहीं।”
हे आमचं बोलणं रात्रीच्या जेवणावरच सुरू होतं. याकूबच्या पत्नीचं आमच्याकडे लक्ष होतं. ती मार्दवाने म्हणाली, “बात करते करते आपने खाना बहुत कम खाया।” थोड्या वेळाने मी हात धुवायला उठू लागलो. त्याचा मुलगा ‘तश्ततारी’ घेऊन आला. ‘तश्ततारी’ म्हणजे एक सुरईसारखी लांब नळी असलेला पाण्याचा जार आणि त्यासोबत चूळ भरण्यासाठी एक पात्र. फैसल माझ्या हातावर पाणी ओतून तोंड धुण्यासाठी पाणी देत होता. तिथे बसलेला कुणीही एकमेकांना अशी ‘सेवा’ देत असतो, बिनबोभाट. जेवण झाल्यावर सर्व स्त्री-पुरुषांनी मिळून क्षणभरात जेवणासाठी अंथरलेले दस्तरखाँ काढून घेतले व स्वच्छ केले. थोड्या वेळाने ‘टीव्ही’वर ‘ज़िंदगी’ चॅनेल सुरू झालं. त्यावरील दर्जेदार मालिका त्या घरातील विशेषत: स्त्रियांनी हमखास पाहिलेल्या होत्या. त्यातील पुरोगामी स्त्री व्यक्तिरेखांबाबत मी चर्चा छेडली तेव्हा सर्वच स्त्रिया मोठ्या उत्साहाने चर्चेत सहभागी झाल्या.
सर्व माध्यमं काश्मीर म्हणजे एक वादग्रस्त भौगोलिक भाग म्हणून समजतात आणि त्यामुळे सर्व चर्चा भारत-पाकिस्तान तणाव, दहशतवाद, अतिरेकी विरुद्ध लष्कर, ‘राष्ट्रद्रोही’ काश्मिरी या मर्यादेत फिरत राहते. तिथल्या लोकांबाबत, त्यांच्या संस्कृतीबाबत, ‘काश्मीरियत’च्या संकल्पनेबाबत, त्यांच्या मानसिकतेबाबत, जीवनशैलीबाबत आणि अर्थात जीवनदृष्टीबाबत कोण बोलणार? ‘राष्ट्रभक्ती’चा तथाकथित ‘अभिमान’ बाळगणाऱ्यांनी गेल्या दहा दशकांत त्यांना कधी जाणून घेतलंय? केवळ लष्करी बळावर भूभागावर पकड ठेवता येईल, पण लोकांशी नातं जोडण्यासाठी ‘शक्ती’ कामास येते का? असे अनेक प्रश्न त्या क्षणी माझ्या मनात येत होते.

पूरग्रस्त श्रीनगर आणि ‘बोलका’ लाल चौक

दुसऱ्या दिवशी सकाळी याकूब श्रीनगरला कामाला जाणार होता. तो मला गाडीने शहरात घेऊन गेला. बांदिपुरा तालुक्यातील (म्हणजे श्रीनगरपासून 40 कि.मी. वर परंतु चाडोराच्या पूर्णत: उलट दिशेला) एक पत्रकार मित्र परवेझ मला तिथे भेटणार होता. तो याकूबच्याही ओळखीचा होता. मला परवेझच्या ‘हवाली’ करून याकूब निघाला. तीन-चार तासांनी मला गाडीने परत नेण्यासाठी तो पुन्हा लाल चौकापाशी भेटणार होता.
परवेझ त्याच्यासोबत त्याच्या आठ वर्षाच्या मुलाला- जुनैदला घेऊन आला होता. परवेझने मला विचारलं, “बोलो, कहाँ जाना है तुमको?” मी म्हटलं, “मुझे लाल चौक के इर्दगिर्दही पैदल चलके कुछ देखना है, कुछ लोगों को- पत्रकारोंको मिलना है; किताबें देखनी हैं... लेकिन तुम तो इस बच्चे को साथ लाये हो। पैदल कैसे चलेंगे?”
परवेझ म्हणाला, “कोई टेन्शन नहीं। वो भी मेरे जैसा कितना भी पैदल चलता है... यहाँ तो ‘रफ-टफ’ बनकेही रहना पड़ता है। अभीसे उसको ‘ट्रेन’ कर रहाँ हूँ।” मी जुनैदकडे पाहिलं. तो नुसताच गोड हसला. मी त्याच्या ‘अब्बा’चा चांगला दोस्त आहे याची खात्री पटल्यावर पाच-दहा मिनिटांतच तो माझा हात धरून बिनधास्त चालू लागला!

लाल चौकमधील ‘घंटाघर’. आजूबाजूला पदोपदी लष्कराचे जवान. जवळच ‘ऑल इंडिया रेडिओ’ची हिरवी टुमदार वास्तू. ‘घंटाघरा’समोर शानदार नक्षीचे ‘लॅम्प्स’. बसायला लोखंडी बाकडी. दुतर्फा वाहतूक आणि मध्ये ‘ऐतिहासिक’ आयलंड! याच ‘घंटाघरा’शी उभे राहून सहा दशकांपूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी काश्मिरी जनांना ‘सार्वमत’ घेण्याचं आश्वासन दिलं होतं. ते वचन न पाळल्याचा सल इथे सर्वांनाच आहे.
इथून दुतर्फा असलेल्या दुकानांच्या वाताहतीकडे पाहून जीव कसानुसा झाला. सप्टेंबरमध्ये झेलम नदीला आलेल्या पुरामध्ये प्रत्येक दुकानाची पडझड झाली होती. प्रत्येक दुकानदार डागडुजीमध्ये व्यस्त होता. फुटपाथवर सर्वत्र ‘सेल’ सुरू होता. बॅग्ज, जीनच्या पँट्स, शर्ट्स, जाकीट, स्वेटर्स सर्व ‘फुटपाथ’वर मांडलं होतं. त्याभोवती ग्राहकांचे गराडे पडले होते. स्वस्त भावात विकून थोडा तरी तोटा भरून निघावा, हा दुकानदारांचा उद्देश. या भागात पुस्तकांची तीन प्रसिद्ध दुकानं आहेत, पण त्यातील कुणीच दुकानदार बोलण्याच्या मनोवस्थेत नव्हता. परवेझ त्यातील एकाशी ‘काश्मिरी’ भाषेत बोलल्यावर त्याने मला पाहिजे तशी माहितीपर पुस्तकं दाखवली. काही पाण्याने पूर्ण ध्वस्त, काही ठीक. तरीही मी जराही ‘सवलत’ न मागता त्याने मागितलेल्या भावात ती घेतली. छोट्या जुनैदने स्वत:हून मला हक्काने हिंदी मुळाक्षरांचं सचित्र पुस्तक घेऊन देण्यास सांगितलं. मग मी ते आणि इसापनीतीचं पुस्तकही बक्षीस दिल्यावर स्वारी प्रचंड खूष!

वाढतं मतदान आणि बदलती समीकरणं

परवेझसोबत मी ‘काश्मीर इमेजेस’ या वृत्तपत्राचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बशीर मंझर यांच्या भेटीसाठी गेलो. रेसिडेन्सी रोडलगतच्या गल्लीत दुसऱ्या मजल्यावर त्यांचं कार्यालय होतं, परंतु त्यांचा छापखाना तळमजल्यावर होता. पुरामध्ये छापखान्याचं मोठं नुकसान झालं होतं, आणि त्यामुळे सुमारे दोन महिने आपलं वृत्तपत्र अन्य मुद्रणालयातून छापून घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. निवडणूकपूर्व चित्राबाबत मंझर यांच्याशी दोन तास बोलणं झालं. धर्मनिरपेक्ष विचारप्रणालीवर ठाम निष्ठा असलेल्या मंझर यांनी एकंदर परिस्थितीचं अगदी वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केलं. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्याने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता-समीकरणं कशी वेगाने बदलत चालली आहेत त्याचं त्यांनी मार्मिकपणे विवेचन केलं.
जम्मू विभाग हिंदुबहुल (65% हिंदू), काश्मीर खोरं विभाग म्हणजे अनंतनाग, श्रीनगर व बारामुल्ला हे जिल्हे मुस्लिमबहुल (97% मुस्लिम) आणि विरळ वस्तीचा लडाख विभाग संमिश्र (45% बौद्ध, 47% मुस्लिम) असं चित्र पूर्वापार असलं, तरी आजवर काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष (एनसी) व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यामध्येच प्रामुख्याने मतविभाजन होत होतं. धार्मिक स्तरावर ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होत नव्हतं. अगदी 1990 च्या दशकात पंडितांचं जम्मू भागात मोठं स्थलांतर झालं हे सत्य असलं, तरीदेखील निवडणूक राजकाणात धार्मिक मुद्यावर लोकांचं ध्रुवीकरण झालं नव्हतं. काही वर्षांपूर्वी किश्तवार भागात दोन्हीकडच्या मूलतत्त्ववाद्यांनी तसा प्रयत्न केला तरी ते शक्य झालं नव्हतं. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखालील ‘भाजप’ने लोकसभा निवडणुकीत राज्यातील 6 पैकी 3 जागा मिळवून यश मिळवलं. मात्र, त्यामुळे मतांसाठी धार्मिक स्तरावर ध्रुवीकरण करण्याला अनिष्ट चालना मिळाली. याच ध्रुवीकरणाच्या आधारे दुसरी प्रतिकूल गोष्ट झाली, ती म्हणजे लडाखमधील बौद्ध मतदारांना आपल्याकडे वळवण्यात ‘भाजप’ला यश लाभलं. यापूर्वी काँग्रेस वा ‘एनसी’कडेच ही मतं जायची.
गिलानी आणि हुरियत कॉन्फरन्सच्या इतर नेत्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ‘निवडणूक बहिष्कारा’ची घोषणा केली; परंतु ते ती मागे घेतील, असा मंझर यांचा अंदाज होता, आणि तो खराही ठरला. यंदा 70-80 टक्के मतदान होत आहे म्हणजे लोकशाहीचा विजय झाला, असा अर्थ काही राजकीय पंडित काढताना दिसत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असलं तरी वस्तुस्थिती पूर्णत: तशी नाही.
मंझर म्हणतात त्याप्रमाणे 2008 च्या विधानसभा निवडणुकीतही वीज, पाणी, रोजगार या मुद्द्यांवर येथील मतदारांनी 60 टक्क्यांच्या वर मतदान केलं, परंतु आताच्या लोकसभा निवडणुकीत 30 टक्केच मतदान झालं. थोडक्यात, केंद्राला त्यांनी ‘आफ्स्पा’पासून अनेक कारणाने विरोध केला. परंतु, स्थानिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी राज्यस्तरावर शक्य तितकं ‘सुशासन’ आणावं या दृष्टीने विधानसभा निवडणुकीत मात्र जास्तीत जास्त मतदान करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे 2008च्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ‘बहिष्कारा’च्या आवाहनाला काही प्रतिसाद लाभणार नाही असा मंझर यांचा होरा होता.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या एकूण 87 जागांपैकी 37 जागा जम्मू विभागात, तर 46 जागा काश्मीर खोऱ्यात आणि चार जागा लडाख विभागात. आता ‘भाजप’च्या ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे या पक्षाला जम्मूत 30च्या वर जागा मिळाल्या आणि सज्जाद लोन आदींशी साटंलोटं करून खोऱ्यातही काही जागा मिळाल्या, तर ‘भाजप’ गठबंधनाद्वारे राज्यात सत्तेवर येऊ शकतो. बहिष्कारामुळे मतदान कमी झालं तर ‘भाजप’चे हे इरादे यशस्वी होऊ शकतात, ही गोष्ट लोकांनाच नाही, तर अतिरेकी तत्त्वांनाही उमजली. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मतदान जास्तीत जास्त करून राज्यस्तरावर ‘सुशासना’ला जागा निर्माण करा, त्याच वेळी ‘आझादी’ची चळवळही दुसरीकडे चालू राहू द्या, असा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे दिसून येतो.
या सर्व पार्श्वभूमीवर या वेळी ‘एनसी’ला कमी संधी आहे, पण मुफ्ती महंमद सैर यांच्या ‘पीडीपी’ला मोठी संधी आहे, असं येथील निरीक्षकांचं म्हणणं आहे. त्यामागे 2-3 कारणं दिली जातात. एक म्हणजे पूर्वी ‘पीडीपी’ सत्तेवर असताना आताच्या ‘एनसी’पेक्षा शासनात (गव्हर्नन्समध्ये) सुधारणा झाली, अशी एक धारणा आहे. दुसरं म्हणजे ‘स्वायत्तते’पेक्षा ‘सेल्फ रूल’चा ‘पीडीपी’चा आग्रह लोकांना आकर्षक वाटत आहे. परंतु अतिरेकी तत्त्वांनाही त्यात सकारात्मकता वाटते. तिसरं म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये एक सकारात्मक ‘पूल’ म्हणून काश्मीरचं स्थान निर्माण करून आणि पाकव्याप्त काश्मीर व जम्मू-काश्मीरमधील व्यापार खुला करू, ही ‘पीडीपी’ची आश्वासनं लोकांना सयुक्तिक वाटत आहेत. अतिरेक आणि सामान्य राजकारण यातील हा त्यांना एक मध्यम मार्ग वाटतो.
परंतु उद्या ‘पीडीपी’ भाजपसोबतही गठबंधन करू शकते का, या प्रश्नाला मंझर यांनी मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, “एनीबडी कॅन बी एनीबडीज बेड-फेलो इन पॉलिटिक्स हियर.”
अर्थात हा लेख प्रकाशित होईपर्यंत निवडणुकीचे निकाल लागले असतील आणि चित्र स्पष्ट झालं असेल.
श्रीनगरमधील निरीक्षकांची अशी निरीक्षणं बडगाममधील ग्रामस्थांशी संवाद साधून पडताळून पाहावी, असा विचार करून मी लवकरात लवकर गावात पोहोचण्याचा विचार केला; परंतु दरम्यान माझं वेळापत्रक बिघडवणाऱ्या काही घटना घडत गेल्या. त्यामुळे मला वेगळे अनुभव घेण्याचीही संधी मिळाली.

तणावपूर्ण क्षण आणि ‘सुरक्षा जाळं’

दुपारी याकूबचा फोन आला. त्याला काही तरी तातडीचं काम निघाल्यामुळे तो श्रीनगरला येऊ शकणार नव्हता. परवेझला टेन्शन आलं. “अब चार बज रहे है। तुम शाम से पहले वहाँ जाओगे कैसे? याकूब ऐसे कैसे कर सकता है? तुम दोस्त हो, मेहमान थोड़े हो?” त्याच्या चमत्कारिक भाष्याकडे दुर्लक्ष करून मी हातपाय हलवण्यास सुरुवात केली. अर्थात, श्रीनगरला अन्य काहीजणांच्या भेटी रद्द केल्या आणि आम्ही जहांगीर चौकात धावपळीने पोहोचलो. हेसुद्धा शहराचं व्यापारी केंद्र. इथून ‘शेअरसुमो’ने चाडोरापर्यंत मला एकट्यानेच जावं लागणार होतं. प्रवासी घेत घेत वा उतरवत उतरवत ‘सुमो’ मला पोहोचवेल कधी, आणि त्यानंतर पुन्हा चाडोरापासून याकूबच्या गावापर्यंत दुसरी ‘सुमो’ मिळेल कधी, मी सुरक्षितपणे पोहोचेन ना, अशा प्रश्नांनी परवेझला घेरलं.
मी त्याला म्हटलं, “चिंता मत करो, मैं पहुँच जाऊंगा।” पण छे. त्याने धडाधडा इथे तिथे फोन केले आणि नंतर तो मला म्हणाला, “चाडोरा बाजार उतरो। वहाँ का पूल गिरा है, इसलिए वहाँसे चलकर ‘उस पार’ चले जाओ। वहाँ मैं कहता हूँ उस ‘मेडिकल शॉप’ में पहुँचो। वो बंदा तुम्हें अंदर गाव ले जाएगा।” बाप रे! माझ्या सुरक्षेसाठी त्यांनी ‘नेटवर्क’च उभं केलं होतं. मी ‘बाहेरचा आहे’ ही गोष्ट कुणाच्याही नजरेत भरणारी होती आणि त्यामुळे मला ‘धोका’ असू शकतो, या विचाराने तो त्रस्त झाला होता.
अखेरीस एका ‘शेअर सुमो’चालकाला त्याने समजावलं आणि त्या ‘सुमो’त बसवून त्याने व छोट्या जुनैदने माझा निरोप घेतला, पण जाण्यापूर्वी ‘चाडोरा पहुँचतेही फोन करो’ असं त्याने मला दहा वेळा सांगितलं. पोहोचता पोहोचता अंधारून आलंच होतं. त्या ‘सुमो’ गाडीत माझ्या पुढच्या ‘सीट’वर चारजण बसले होते. ‘चाडोरा बाजार’ जवळ आल्यावर मी त्यातील एकाला विचारलं, “यहीं पे उतरना होगा?” तो काही बोलला नाही. पण त्याच्या बाजूच्या एका तरतरीत तिशीतल्या युवकाने मला विचारलं, “कहाँ जाना है?” मी म्हटलं, “पूल के उस पार।” “मेरे साथ उतर जाओ।” असं म्हणून तो गप्प बसला. जरा वेळाने गाडी थांबली आणि तो पुढील दरवाज्याने उतरू लागला. मी मागच्या दाराने उतरण्यापूर्वी खात्री करण्याकरिता त्या व्यक्तीकडे पाहिले. त्याचं लक्ष नव्हतं, मात्र त्याच्या शेजारी बसलेल्या एक शांत मध्यमवयीन माणसाचं माझ्याकडे लक्ष होतं. त्याने काही हातवारे न करता ‘आश्वस्त’ नजरेने मला नजर दिली, एक ‘नि:शब्द’ संवाद साधला. मी समजून गेलो आणि उतरलोच नाही. नंतर पुढच्या ‘स्टॉप’वर त्याने मला खूण केली आणि तो उतरल्यावर त्याच्या पाठोपाठ गेलो. त्याने मला ‘उस पार’ जाण्याच्या रस्त्याकडे निर्देश केला आणि कोणतेही ‘आभार’ वगैरे न स्वीकारता तो निघून गेला. या गृहस्थाने ‘त्या’ माणसासोबत न जाण्याचा ‘निर्विकार’ चेहऱ्याने मला सूचित केलेला संकेत मला खूप महत्त्वाचा वाटला.
खरं तर दहशतवादाच्या छायेत जगतानाही जनसामान्य परस्परांशी विश्वासाचं ‘अमूर्त’ नातं कसं जोडत असतील, नि:शब्द सकारात्मक संवाद कसे साधत असतील त्याची झलक मला पाहण्यास मिळाली. जिथे व्यामिश्र परिस्थिती आहे, अंतर्विरोध तीव्र आहेत तिथे लोकांच्या भानाचा, जाणिवेचा स्तर सामान्य परिस्थितीतील जनांपेक्षा उच्चतर असतो, आगळा असतो, याचा प्रत्यय मला पुन्हा प्रकर्षाने आला (यापूर्वी छत्तीसगडच्या भ्रमंतीतही अशाच गोष्टीचा प्रत्यय आला होता.) अर्थात, लोकांशी संवाद साधण्याची तुमची इच्छा तीव्र असली, निरपेक्ष असली तरच ‘शब्देविणा संवादा’ची भाषा साध्य होते, हेसुद्धा तितकंच खरं!
उस पार गेलो, पण परवेझने सांगितलेलं ते ‘मेडिकल शॉप’ बंद झालं होतं. मग खूप फोनाफोनी. माझ्या मनात वाढता तणाव. परंतु, अखेरीस त्या ‘मेडिकल शॉप’च्या मालकाशी फोनवर संपर्क झाला. परवेझने त्याला अनेक वेळा फोन करून सतावलं होतंच. त्या मालकाने जवळच्या दुसऱ्या ‘मेडिकल शॉप’वाल्याला फोन केला. तो तरुण मुलगा होता. फोन झाल्यावर तो काउंटरवरून टुणकन उडी मारून बाहेर आला. मला चौकात घेऊन गेला. दोन-तीन सुमो त्याने टाळल्या. नंतर एका सुमो चालकाशी बोलून त्याने ‘इन्शा अल्ला’ म्हटलं. त्या ‘सुमो’मध्ये बसून मी दाट काळोखी जंगल भागातून जाणाऱ्या रस्त्याने गावाकडे निघालो. महत्त्वाचं म्हणजे इतक्या संध्याकाळीही अनेक शाळकरी मुली त्या सुमोने आपापल्या गावांत जाण्यासाठी त्या ‘सुमो’तून प्रवास करत होत्या. प्रदेश ‘अशांत’ असो, ‘असुरक्षित’ असो, सामान्यजनांचं दैनंदिन जीवन मात्र सुरूच राहतं.... आगळ्याच आत्मिक बळाने! लष्कर आणि अतिरेकी यांचा कितीही रक्तलांछित उद्रेक सुरू राहिला, भयाचा आतंक वाढत राहिला, तरी जगण्याचं शहाणपणही त्यासोबत वाढत असावं... असा विचार करता करता मी कधी त्या गावाच्या मुख्य चौकात पोहोचलो ते मला समजलंच नाही. गाडीतून उतरलो, तर याकूबचा मुलगा मला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे थांबलेलाच होता. बाप रे, माझ्यासारखी एक त्रयस्थ व्यक्ती सुरक्षित रहावी यासाठी श्रीनगर ते पार याकूबच्या घरापर्यंत किती माणसं नेटाने कामाला लागली होती! माझ्याबाबत काही चौकशी न करता आपसूक, शांतपणे एक सुरक्षिततेचं जाळंच तयार झालं! घरी पोहोचल्यावर त्या ‘मेडिकल शॉप’च्या मालकाचाही फोन आला,“पहुँच गये ना जनाब?... चलो, अच्छा हुआ... शुक्रिया!” किती आपलेपण! किती काळजी! या प्रदेशाला कसलंही ‘ग्रस्त’ समजू नये. मनांनी समृद्ध माणसं आहेत ही... मग सहा दशकं झाली तरी आपण त्यांना समजून घ्यायचा, त्यांच्याशी संवाद करायचा प्रयत्न का करत नाही? माध्यमांवरील कित्येकजण त्यांना बिनदिक्कत ‘देशद्रोही’ म्हणून हिणवतात.... त्यांना काय म्हणावं? संवाद साधल्यास काही आगळंच सकारात्मक निष्पन्न होऊ शकेल का?

मुफादपरस्ती आणि तहरिक

याकूबच्या घरी पोहोचल्यावर सर्व परिवाराने पुन्हा एकदा आतिथ्यशीलतेचं दर्शन घडवलं. मी याकूबला म्हटलं, “माझी तू अनेकांशी भेट करून देणार होतास. पण आता वेळ कमी आहे. अतिरेकी नाही, तर किमान त्यांच्या एखाद्या सहानुभूतीदाराला भेटलो तर मला तीही बाजू समजून घ्यायला मदत होईल.” याकूब कामी लागला. तासाभराने एक मुलगा आला. माझ्याशी बोलून त्याने बहुधा मी खुल्या मनाचा पत्रकार आहे याची खात्री करून घेतली असावी. तो मला घेऊन निघाला. गावात वीज गेलीच होती. ठार अंधार. वस्तीतील पायवाटांच्या रस्त्याने तो मला त्याच्या घरी घेऊन गेला.
त्याच्या आई-वडिलांनी माझं स्वागत केलं. वडिलांचं नाव शफी. उंचेपुरे, पन्नाशी पार केलेले. लांब दाढी. आरपार वेध घेणारी नजर. मी निवडणुकीबाबतच्या गप्पा सुरू केल्या. ‘भाजप’ने राज्यात तीसच्या वर मुस्लिम उमेदवार उभे केले, हे कसं शक्य झालं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “सब मुफादपरस्ती है, और क्या?” ‘मुफादपरस्ती’ म्हणजे संधिसाधूपणा; काही तरी मोफत मिळवण्यासाठी कुणाची तरी ‘भक्ती’ केल्याचा आभास निर्माण करणं. मी त्याला विचारलं, “उमेदवारांचा काय फायदा होणार, उलट त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ना!” ते म्हणाले, “नहीं नहीं। किसी पार्टीसे महिनेभर के लिए प्रचार के लिए गाड़ी मिली, कुछ पैसे मिले, इतना बहोत होता उनको। कौन व्होट देगा उनको? यहाँ काश्मीर वैली में ना, उनको एक सीट भी नहीं मिलेगी.” ‘बहिष्कारा’च्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल का, असं विचारल्यावर ते म्हणाले, “अनंतनाग, बारमुल्ला, श्रीनगरमें तो ‘बहिष्कार’ चलेगा। क्योंकि लोग इन मुफादपरस्त नेताओंको जान चुके हैं... यहाँ लोक भी अपने कुछ सामाजिक समस्याओं के कारन उन्हें नहीं मिलते। बस, किसी को एक नौकरी मिलवा दो या कोई ठेका दिला दो, इसीलियेही मिलते! गाँव में कुछ नहीं मिलता, तो लोग भी मुफादपरस्त हो गये हैं और नेता-ठेकेदार सभी पक्ष के नेता पैसा, गुंडे ऐसीही चीजें इस्तमाल करके व्होट मिलवाते हैं.. और आप बोलते हो कि बड़ा मतदान हो गया।”
या निवडणुकीत हिंसाचाराची शक्यता किती, असं विचारलं असता ते म्हणाले, “जब तहरिक (‘आझादी’ची चळवळ) जोरों में थी, तब भी इलेक्शन के वक्त ज़्यादा हिंसा नहीं हुई तो अभी क्यूँ होगी... और होगी तो भी ये बदमाश पार्टियाँ ही करवायेगी वो और इल्जाम लगाएगी तहेरिकवालोंपर ! बड़ा कॉम्प्लेक्स मामला है!”
याच अनुषंगाने बोलता बोलता त्यांनी पोलिसांनी पूर्वी आपल्याला तीन वेळा नाहक खोट्या प्रकरणात गोवल्याचा दावा केला. “पहिली बार पुलिसने मुझे क्यों पकड़ा मालूम है? मैं हररोज हमारे धर्मग्रंथ पढ़ता हूँ। हदिस को मानता हूँ। जब उन्होंने पूछा तो मैंने जबाव दिया, मैं सिर्फ ‘एहले हदिस’ को मानता हूँ। उस वक्त पाकिस्तान का समर्थन करनेवाली कोई ‘एहले हदिस’ नामकी संघटना थी। उन्हें लगा, मैं उसी संघटनसे जुड़ा हूँ... वे मुझे पुलिस स्टेशन ले गये... मैंने उनको समझाया, मैं कुरान के हदिस का जिक्र कर रहा था... किसी संघटनसे मेरा कोई ताल्लुक नहीं... लेकिन ना उन्होंने मेरी बात मानी, ना मेरे विरोधमें कोई ‘एफआयआर’ दर्ज किया। कुछ दोस्तोंने मदद करी और आठ दिन बाद मैं घर आया।”
ते बोलतच राहिले, “दूसरी बार ये हुआ कि मेरे दुकान में काम करनेवाला एक लड़का गाँवसे भाग गया। पुलिसने घर आकर मुझे उठा लिया... मैंने उनको कहाँ, वो लड़का मेरे दुकानमें छे महिना जरूर था, लेकिन वो किसी संघटन के लिए काम करता है या नहीं यह मैं नहीं जानता। उन्होंने मेरी एक बात न मानी और मुझे ऐसेही जेल में बंद रखा... फिरसे मेरे विरोध में कोई केस दर्ज नहीं किया गया था.... पंधरह दिन बाद मुझे छोड़ दिया।”
त्यांच्या म्हणण्याचं सार हे होतं, की पोलिस, न्याययंत्रणा, नेते सर्व भ्रष्ट झाले आहेत आणि नागरिकांना नाहक त्रास देतात. लोक त्या सर्वांच्या व लष्कराच्या विरोधात आहेत, आणि त्यामुळेच निवडणुकीबाबत त्यांना अनास्था असते. “हाँ, किसी पार्टीने कुछ ‘देने की’ बात करी या गुंडोंसे जोर जमाया तो ग्रामीण इलाके में लोग व्होट डालते हैं...” पण काही झालं तरी ‘तहरिक’ चालू राहण्याला पर्याय नाही, असं त्यांचं म्हणणं.
सज्जाद लोनसारख्या बुद्धिमान, सुशिक्षित नेत्याने ‘भाजप’च्या मांडवात जाणंही शफींना रुचलेलं नव्हतं. “बस्स, ‘मुफादपरस्ती’ और क्या? ऐसे करनेसे वो कभी बड़े नेता नहीं बन सकते। देखिए, यहाँ सिच्युएशन बड़ी कॉम्प्लेक्स है। कुछ बोल नहीं सकते।”
‘माने मकसद सून...’
शफीप्रमाणेच अन्य काही गावकऱ्यांशीही रात्री माझा संवाद झाला. हे सर्व डोक्यात घेऊन रात्रीचं जेवण झाल्यावर मी शांतपणे याकूबशी चर्चा करण्यास बसलो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार असल्याने एरवी रात्री दहा वाजताच झोपी जाणारा याकूब त्या दिवशी जागरणासाठी तयार झाला. मी शफीची ध्वनिमुद्रित केलेली मुलाखत ऐकून तो काहीसा अस्वस्थ झाला. तो काही चर्चा करण्याच्या मनोवस्थेत नव्हता. इतक्याशा प्रांतात इतके विचारप्रवाह, आंतरराष्ट्रीय शक्तींचे इतके हस्तक्षेप आणि दबाव, पाकिस्तान-भारताचे टोकाचे आग्रह, त्यात ‘नॉन-स्टेट’ अॅक्टर्सची अनियंत्रित सक्रियता, अशा अनेकविध गोष्टींमुळे काश्मीरची समस्या अत्यंत गुंतागुंतीची झालेली; वर त्यात जनसामान्यांच्या आकांक्षांचा, समस्यांचा विचार अभावानेच. एकीकडे सहा दशकं प्रलंबित राहिलेली, अधिकाधिक गुंतागुंतीची झालेली समस्या आणि त्यामुळे ‘अशांत’ राहिलेला प्रदेश आणि दुसरीकडे जीवनाचं रहाटगाडगं सुरू ठेवण्यासाठी आपलं दैनंदिन जीवन शांतीने, धास्ती-गुंतागुंत पचवत जगण्याचा सामान्यजनांचा संघर्ष अशा विचित्र कोंडीत सापडलेली अशी ही समृद्ध मनं. का नाही याकूबसारखी व्यक्ती सुन्न होणार?
राजकीय गोष्टींवर बोलण्याची त्याची इच्छा नसल्याचं जाणवून मी सुफी संतांची परंपरा इथे अजून कितपत सशक्त आहे असं विचारलं, तेव्हा याकूब म्हणाला, “पहले जैसा कुछ भी नहीं रहा है। कुछ पीर हैं, लेकिन लोगोंपर प्रभाव डालनेवाला व्यक्तित्व उनके पास नहीं है।” त्याच्या मनातील नैराश्याची भावना उघडच दिसून येत होती. मग त्याचा मूड ठीक करण्याकरिता मी त्याला म्हटलं, “चलो याकूब, कुछ यहाँ का खास काश्मिरी गाना गाओ, मैं ‘रेकॉर्ड’ कर लेता हूँ।” चतुरस्र असलेल्या याकूबने डोळे मिटून गाणं म्हणायला सुरुवात केली-
वतनस पन्नीस रंग आसी,
खारून प्रेझलावून देकाऽ लोन, देकाऽ लोन
अय करस पाता ब्रोन्ह नेरून
माने मकसद सून...
गाण्याचा अर्थ असा आहे-
अपने वतन को सजाएंगे, सवारेंगे और अपनी तकदीर बनाएंगे। हमारे जीवन का मकसद क्या है
ये समझकर अपनी सोच बनाएंगे।
काय म्हणायचं, सुचवायचं होतं त्याला या गाण्यातून, याचा सर्वांनीच विचार करायला हवा. निवडणुकीच्या राजकारणासाठी धुवांधार भाषण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरला गेले होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या भाषणाचा दाखला देऊन वाजपेयींनी काश्मिरी जनतेला इन्सानियत, काश्मिरियत आणि जमूरियत (लोकशाही) प्रदान करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि तेच स्वप्न मी पुढे नेणार आहे असं आश्वासन दिलं. ते खरं की केवळ भाषणबाजी? जम्मूत कलम 370 वर टीका, काश्मीर खोऱ्यात त्याबाबत व ‘आफ्स्पा’बाबत अनुल्लेख, अशी अंतर्विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर सच्च्या काश्मिरी मतांचा विश्वास कसा बसणार? या पार्श्वभूमीवर, राजकीय वर्गाच्या नीती-अनीतीकडे दुर्लक्ष करून आणि जनाभिमुख दृष्टिकोन ठेवून काश्मीर समस्या सोडवण्यासाठी नव्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे.
(सुरक्षिततेच्या दृष्टीने काही व्यक्तींची नावं बदलली आहेत.)

- मिलिंद चंपानेरकर
मोबाइल : 9823248003
champanerkar.milind@gmail.com

(मिलिंद चंपानेरकर हे बातम्यांपलीकडच्या वास्तवाची शोधाशोध करणारे मुक्त पत्रकार आहेत. थेट लोकांशी संवाद साधून वास्तवापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’ या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत.)

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा