आगामी अंकात

पुढील अंक : 'अनुभव' दिवाळी अंक २०१७

यंदाच्या अनुभव दिवाळी अंकाची थोडक्यात झलक:

रत्नाकर मतकरी, श्याम मनोहर आणि जयंत पवार या तीन भिन्न प्रकृतीच्या अव्वल लेखकांनी लिहिलेल्या कथा.
• ना. धों. महानोर यांच्या रानकवितेने महाराष्ट्राला भुरळ घातली त्याला यंदा पन्नास वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्त त्यांचे स्नेही रामदास भटकळ यांनी रेखाटलेला महानोर यांचा प्रवास.
शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय प्रवासाचं विश्‍लेषण करणारा राजकीय विश्‍लेषक सुहास पळशीकर यांचा लेख.
मुंबईपासून तळकोकणापर्यंतच्या खारफुटी जंगलांचा फेरफटका मारून आणणारा आणि त्यांच्या र्‍हासाची बित्तंबातमी सांगणारा ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा लेख.
• पत्रकारिता नावाची गोष्ट झपाट्याने संदर्भहीन बनत चालली असताना न्यू यॉर्करसारखं एखादं नियतकालिक जगभरातल्या वाचकांचं भरण-पोषण करण्याचं काम करत राहतं. न्यू यॉर्कर नावाच्या संस्कृतीची निळू दामले यांनी दाखवलेली झलक.
• देशातल्या पत्रकारिता विश्‍वात सध्या संक्रमणकाळ चालू असल्याचे संकेत आहेत. वेबविश्‍वातल्या नाना शक्यता धुंडाळणार्‍या पत्रकारी प्रयोगांबद्दल लिहिताहेत सचिन परब.
मेरील स्ट्रीप या राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीने सार्वजनिक व्यासपीठांवर वेळोवेळी आपली परखड मतं मांडली आहेत. या व्यक्तिमत्वाचा राजेश्‍वरी देशपांडे यांनी घेतलेला वेध.
• चाकोरीतलं आयुष्य झुगारून एक व्यक्ती आदिवासी गावात मुक्काम ठोकते. तिथल्या गरिबीवर मात करण्याचं मॉडेल राबवू बघते. पण नशिबात काही वेगळंच मांडून ठेवलेलं असतं. मुकुंद कुलकर्णी यांचा ह्रद्य अनुभव.
• पश्‍चिम घाटातला ७५० किलोमीटरचा प्रवास पायी पार केलेल्या प्रसाद निकते यांच्या डायरीतली काही पानं.
• रोज सकाळी घराबाहेरच्या झाडांवर किलबिलणारं पक्षीविश्‍व आपल्या घरात दाखल झालं तर काय होतं? सिद्धार्थ अकोलकर यांनी लिहिलेला अनोखा अनुभव.
• इस्लामपूरसारख्या छोट्या गावी राहून स्वतःची चित्रशैली विकसित करणारे तरुण चित्रकार अन्वर हुसेन यांची शर्मिला फडके यांनी करून दिलेली ओळख.
• कोयना जंगलाच्या परिघावरचं अज्ञात जग समजून घेण्यासाठी आदर्श पाटील या तरुणाने केलेली भटकंती.
• महाराष्ट्रातल्या शेती-पाण्याच्या प्रश्‍नांना उत्तरं शोधण्यासाठी आयुष्यभर प्रयोगशील धडपड करणारे लढवय्या कार्यकर्ते संपतराव पवार यांच्यावर गौरी कानेटकर यांनी लिहिलेला लेख.